मुंबई निसर्ग निर्मित नाही!

Submitted by मार्गी on 26 July, 2026 - 09:06

✪ कोळी व आगरी वस्ती असलेला ७ बेटांचा समूह
✪ हॉर्नबी वेलार्ड प्रोजेक्टअंतर्गत पुलांद्वारे सर्व बेटं जोडली गेली
✪ वाळूचे भराव, बांध व तटबंद्यांद्वारे समुद्राचं पाणी अडवलं गेलं
✪ १७८३ मधील प्रकल्पानंतर १८५० च्या सुमारास मुंबईला एकसंघ रूप
✪ वाळू आणि पाणथळ जमिनीवर मुंबई उभी!
✪ मुंबईचा खरा सत्ताधीश समुद्रच!

नमस्कार. आज २६ जुलै! २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेला महापूर कोण विसरू शकेल? आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा धडा त्या दिवशी आपल्याला मिळाला. अशी ही मुंबई आणि तिचा मुंबई स्पिरिट! पण मुंबई निसर्गनिर्मित नाही हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल? मुंबई हा ७ बेटांचा समूह आहे, हे अनेकांना माहिती असेल. माहिम, वरळी, परळ, लहान कुलाबा, कुलाबा, माझगांव आणि बाँबे ह्या नावांनी ती सात मुख्य बेटं ओळखली जात होती. पण ती बेटं एकमेकांना जोडलेली नव्हती. एकमेकांच्या जवळ होती पण एकसंघ नव्हती. पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटीश राजाला मुंबई बेट समूह मिळाल्यानंतर व्यापारी उद्देशाने ब्रिटीशांनी इथे पाय रोवले. बाजारपेठ, सुरक्षित बंदर व व्यापारी केंद्र ह्या त्यांच्या गरजेतून त्यांनी मुंबईचा विकास केला. ह्या बेटांवर वस्ती आधीपासून होती. कोळी, आगरी अशा वस्त्या होत्या आणि प्राचीन लेण्यासुद्धा ह्या बेटांवर होत्या. पण ही बेटं एकत्र नव्हती. पावसाळ्यामध्ये त्यांच्यामधला समुद्री संपर्क खंडित होत होता. हे शहर म्हणून विकसित करायचं तर इथे प्रवास आणि लोकांचं येणं- जाणं सोपं असलं पाहिजे ही‌ गरज होती.

(माझ्या ब्लॉगवर हा लेख इंग्रजीत वाचता येईल. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)


ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.

त्यासाठी हळु हळु ब्रिटीशांनी इथे वेगवेगळे पूल (कॉजवे) बांधले आणि १७८३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील स्थानिक तत्कालीन गव्हर्नर विलियम हॉर्नबी ह्यांनी सगळी बेटं एकमेकांना जोडण्यासाठी प्रकल्प राबवला. पुढे चिकणमाती आणि गाळाची माती वापरून खाडी भरावाचं काम अनेक दशकं चाललं. १८३५ मध्ये सर्व बेटं जोडली तर गेलीच पण भराव आणि तटबंद्यांद्वारे समुद्राला मागे ढकलून आज दिसतं ते मुंबईचं स्वरूप मिळालं. खाड्या बुजवून सलग जमिनीचा पट्टा तिथे तयार करण्यात आला. काळाच्या ओघात पुढे ब्रिटीश सत्तेचं आणि नंतर भारतातलं प्रमुख आर्थिक केंद्र, अतिशय महत्त्वाचं शहर आणि पुढे आर्थिक राजधानी म्हणून मुंबई प्रसिद्ध झाली.

जमीन एकसंघ झाली तरी पाण्याचा निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग गेले. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती होऊन रस्ते व परिसर पाण्याखाली जाणं हे इथे तेव्हापासून नेहमीचंच. पुढे तर समुद्रामध्ये आणखी भराव घालून समुद्राला मागे केलं गेलं. रिक्लेमेशन म्हणून ओळखला जाणारा हा भाग! त्याबरोबर काळाच्या ओघामध्ये प्रचंड लोकसंख्या, शहरीकरण आणि पुढे तर ४०- ६० मजल्यांच्या इमारती ह्या मूळात वाळूच्या आणि खाडीच्या असलेल्या जागेवर आणि समुद्रावर उभ्या राहिल्या!

मुंबई कितीही उच्च दर्जाचं शहर असलं आणि मुंबईची महत्ता फार मोठी असली तरी ह्या शहराला भविष्य नाही ही गोष्ट आता स्पष्ट आहे. अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी व वैज्ञानिकांनी मुंबई बुडण्याचे इशारे दिलेले आहेत. इतक्या प्रचंड लोकवस्तीचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं ओझं त्या ब्रिटीशकालीन भरावावर आहे हे विसरून चालणार नाही. शिवाय आज छोटी शहरंही एक- दोन दिवसांच्या पावसात पाण्याखाली येत आहेत. तिथे मुंबई तर समुद्राचंच आहे! आतून ते किती कमकुवत झालं असेल कोण सांगणार! आपलं क्षेत्र "रिक्लेम" करणं समुद्राला किती कठिण असेल? मुंबईचा खरा सत्ताधीश तोच तर आहे!

मुंबईमध्ये तशीही मानवी प्रतिष्ठा मातीमोल आहे. लोक किडा- मुंगीसारखे जीव मुठीत धरून वावरतात. मुंबईला दोन शतकांचा इतिहास आणि विलक्षण असा वर्तमान आहे पण भविष्य नाही. आणि मुंबईच्याच वाटेवर कमी- अधिक प्रमाणात इतर शहरंही आहेत. तिथेही मानवी जीवनाची प्रतिष्ठा किती आहे हा प्रश्न आहे. तेव्हा ह्याविषयी सावध आणि सजग राहिलेलं चांगलं!

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 26 जुलै 2026.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख/माहिती
मुंबई ७ बेटांची हे बहुतेकांना माहीत असेलच. भूगोल्याच्या पुस्तकात होते आणि त्यातले एक बेट आमचे माझगाव होते Happy
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे सखल भागात पावसाचे पाणी साठते जे उपसून काढावे लागते याचीही कल्पना होतीच.
पण या जमिनीवर जे शहर उभे आहे ते खचून बुडू शकते हा विचार कधी केला नव्हता. मनात शंका टाकली खरी. कारण गेल्या दहाबारा वर्षात मुंबईत इतक्या उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत की आता तुमचा लेख वाचून भीती वाटू लागली.
उद्या तशीच वेळ आली तर आमचे माझगाव उंचावर आणि कधीच पावसाचे पाणी न साठणारे असल्याने ते सुरक्षित राहील का असा विचार आता करतोय..

मुंबईची गर्दी कमी होणं अत्यावश्यक होतं म्हणून नवीन मुंबई स्थापन झाली, ' उद्योगाचं विकेंद्रीकरण ' हे धोरण कित्येक दशकं नेटाने व यशस्वीपणे राबवलं गेलं. आणि, आता पुन्हा कितीतरी पटीने तीच गर्दी वाढावी याच दिशेने जोरात योजना आखल्या व राबवल्या जात आहेत. सगळंच अचंबित व बेचैन करणारं आहे !!!!!

@ ऋन्मेऽऽष जी, ओह! खरं आहे पण. डॉ. नारळीकरांची "एका महानगराचा मृत्यु" सुंदर कथा आहे. मुंबईविषयीचीच. सर्वांना धन्यवाद.

धारावी पुनर्वसना करता भांडुप, मुलुंडच्या जमिनी दान करण्याचा जो प्रकार सुरु आहे, त्यामुळे मध्य रेल्वेचा प्रवास पावसाळ्यात ठाणे पलीकडे मुंबईच्या दिशेने अशक्य होईल. खात्रीने रेल्वे ट्रॅक पाण्यात जातील. पूर्व द्रुतगती मार्गाची अवस्था आताच भयानक आहे, त्याची पण वाटचाल पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दिशेने सुरु आहे. एकंदरीत सामान्य माणूस अतिशय वाईट प्रकारे नाडला जाणार आहे, कारण अविरत नवीन बांधकामे होत आहेत आणि शहराची अवस्था एका गॅस चेंबर सारखी होऊ लागली आहे, समुद्र शेजारी असण्याचा एकमेव फायदा म्हणजे हवा दिल्ली सारखी दाटून राहत नाही.

बुडालो बुडालो बुडालो. पाण्याखाली गेली मुंबई वाचवा कोणीतरी हेलिक्याप्टेर घेऊन या.

मी मुंबईकर नाही, पण मला मुंबई फार आवडते आणि विलक्षण कुतूहल पण आहे मुंबईबद्दल.

या लेखावरून एक लहानपणीची गोष्ट आठवली. माझी एक मावशी विक्रोळीला राहायची. तिचं घर बैठं होतं.. पुढे मागे अंगण होतं... तिनी एकदा सांगितलं होतं की तिच्या मागच्या अंगणात जरा खोल खणलं की पाणी लागतं... प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही.. ती म्हणायची अस.

*...पण मला मुंबई फार आवडते* - मुंबईतल्या जीवनाचे अतिशय दुर्मिळ, विलक्षण व हेवा वाटावा असे खूप पैलू आहेत . पण गर्दीच्या अतिरेकात व श्रीमंतीच्या तोऱ्यात त्या पैलूंची गळचेपी होतेय, हे खऱ्या मुंबईकरांचं दुःख आहे. त्यातच, विकासाच्या रेट्यात मुंबई विनाशाकडे तर जात नाहीय ना, ही शंकाही आता माझ्यासारख्या मुंबईनेच घडवलेल्या ज्येष्ठ मुंबईकरांना भेडसावते आहे !

@ Ashwini_९९९ जी, ओहह! नुसतं शहर म्हणूनच ते इतक्या जोखमीमध्ये आहे आणि त्याची अशी निर्मिती. खरंच खूप विचार करण्याची गोष्ट आहे ही. सर्वांना धन्यवाद.

वातावरणीय बदलांमुळे कित्येक देशांच्या किनारपट्टीवरील शहरे २०५० पर्यंत पाण्याखाली जाणार हे भविष्य वर्तवुन २५-३० वर्षे सहज झाली असतील. त्या शहरांमध्ये मुंबईचेही नाव आहे.

हे भविष्य माहित असले तरीही शहर विकसित करताना त्याच्याकडे पुर्ण कानाडोळा केलेला आहे, आजही करताहेत.

नवी मुंबईतला सायन पनवेल व ठाणे बेलापुर महामार्ग जेव्हा चार पदरी व डांबरी होता तेव्हा त्यावर पावसाळ्यात जराही पाणी साचत नसे. नंतर तो सहा पदरी सिमेंटचा झाला. सहा पदर करताना बाजुची गटारे सांभाळायला हवीत हे लक्षात राहिले नाही. आता रस्त्याच्या बाजुला अधुन मधुन व्यवस्थित गटारे आहेत तर मध्येच ती गडप झालीत. जिथे गडप झालीत तिथे पावसाळ्यात पाणी साचते.

मुंबई फार मोठी महत्ता वगैरे असलेले शहर असले तरी इथला दररोजचा प्रवास व घराबाहेरचा वावर अजिबात सुखावह नाही. लोकल ट्रेनमध्ये मेंढरांसारखा प्रवास, बसगाड्यांमध्येही तिच अवस्था, रस्त्यावरुन चालणे मुश्किल इतक्या गाड्या व कोलाहल. मुख्य मार्ग सोडले तर आतल्या रस्त्यांवर गाड्यांची व माणसांची गर्दी आणि कोलाहल हे मुंबईचे वैशिष्ट्य बनले आहे.

मला मुंबई कधीच आवडली नाही. संधी मिळताच मी कायमचा रामराम ठोकला. तरी नवी मुंबई मुम्बैपेक्षा बरी अशी स्थिती होती.

मुंबई बुडाल्यात जमा आहे आहे आता डोंबिवली देशाची आर्थिक राजधानी म्हणून उदयास येत आहे. जगातील सगळ्यात प्रथम क्रमांकाचे शहर डोंबिवली होणार आहे.

इतक्या प्रचंड लोकवस्तीचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं ओझं त्या ब्रिटीशकालीन भरावावर आहे हे विसरून चालणार नाही
>>>

याचे उत्तर chat gpt वर चेक केले ते असे.

मुंबईबाबत हा अतिशय चांगला भू-तांत्रिक (Geotechnical) प्रश्न आहे. याचे उत्तर असे आहे की हो, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जमीन खचणे (Settlement) होऊ शकते; परंतु केवळ उंच इमारतींच्या वजनामुळे संपूर्ण मुंबई समुद्रात बुडेल किंवा खचेल, अशी शक्यता नाही.

मुंबईची भौगोलिक रचना

- मुंबई ही मूळ सात बेटे जोडून विकसित करण्यात आली आहे.
- आजच्या मुंबईचा बराचसा भाग भराव (Reclaimed Land) करून तयार करण्यात आला आहे.
- भरावाची जमीन नैसर्गिक खडकाच्या तुलनेत अधिक मऊ व दाबाला बळी पडणारी असते.

मग उंच इमारतींचे वजन कसे पेलले जाते?

आधुनिक उंच इमारतींचा भार फक्त भरावाच्या मातीवर टाकला जात नाही. बहुतेक इमारतींना:

- खोल पाइल फाउंडेशन (Deep Piles),
- बॅरेट्स (Barrettes) किंवा
- कॅसन (Caissons)

यांच्या साहाय्याने खाली असलेल्या डेक्कन बेसॉल्ट (Deccan Basalt) या अतिशय मजबूत खडकापर्यंत भार पोहोचवला जातो. त्यामुळे इमारतींचा मुख्य भार खडकावर जातो, मऊ भरावाच्या मातीवर नाही.

तरीही जमीन खचू शकते का?

हो, पण ती स्थानिक पातळीवर होऊ शकते. उदाहरणार्थ:

- भरावाची जमीन कालांतराने दाबली जाऊन बसू शकते (Consolidation).
- मऊ जमिनीवर उथळ पाया (Shallow Foundation) असल्यास अधिक Settlement होऊ शकते.
- मोठ्या प्रमाणातील उत्खनन किंवा भूजलातील बदल यांचाही परिणाम होऊ शकतो.

संपूर्ण मुंबई खचण्याचा धोका आहे का?

सध्या उपलब्ध वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी अभ्यासानुसार संपूर्ण मुंबई खचण्याची शक्यता नाही.

याची प्रमुख कारणे:

- मुंबईच्या मोठ्या भागाखाली मजबूत बेसॉल्ट खडक आहे.
- आधुनिक इमारती योग्य भू-तांत्रिक तपासणी करून खोल पायांवर उभारल्या जातात.
- त्यामुळे इमारतींचे वजन सुरक्षितपणे खडकापर्यंत पोहोचवले जाते.

निष्कर्ष

अभियांत्रिकीच्या दृष्टीने पाहता:

- उंच इमारतींच्या वजनामुळे संपूर्ण मुंबई खचेल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही.
- मात्र, भरावाच्या किंवा मऊ जमिनीच्या काही भागांमध्ये स्थानिक Settlement होऊ शकते, आणि त्याचा विचार इमारतींच्या डिझाइनमध्ये आधीपासूनच केला जातो.
- भविष्यात मुंबईसाठी अधिक मोठे आव्हान म्हणजे समुद्राची वाढणारी पातळी, चक्रीवादळांमुळे येणाऱ्या भरतीच्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे होणारा पूर, हे आहे; इमारतींचे वजन नव्हे.