भस्मबीज – भाग ७

Submitted by नितनवे on 26 July, 2026 - 05:48

भस्मबीज - भाग ६
पूर्वभाग
मल्लीच्या आयुष्यात चंद्रिकेच्या आगमनाने प्रथमच माया, मैत्री आणि निरपेक्ष प्रेमाचा आधार निर्माण होतो. समाजाच्या सततच्या अपमान आणि तिरस्कारातही दोघे एक सन्मानाचं, शांत आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहतात; मात्र जत्रेच्या रात्री चंद्रिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या होते. न्याय मिळावा म्हणून मल्लीने कायद्याचा आधार घेतला, पण राजकीय दबाव, खोटे साक्षीदार आणि गायब झालेले पुरावे यांमुळे प्रकरण दडपलं जातं. न्यायव्यवस्थेच्या या विश्वासघातामुळे विदीर्ण झालेल्या मल्लीच्या मनात अखेर सूडाचं बीज रुजतं आणि तो न्याय स्वतःच्या हाताने मिळवण्याचा निर्धार करतो.
************************************************************************************************************************
भस्मबीज – भाग ७ - मल्लीचा सूड

देवप्पाने एक खोल श्वास घेतला, समोरच्या वाऱ्याने हलणाऱ्या तुळशीकडे बघत पुन्हा बोलू लागला. अभिजित आणि नेहा दोघेही समोर बसून तल्लीन होऊन ऐकत होते.

मल्लीच्या सूडाची सुरुवात झाली होती.

चंद्रिकेच्या मृत्यूच्या रात्री तिच्यावर हात टाकणाऱ्या तिघांपैकी पहिला माणूस एका ओसाड घाटरस्त्यावर मृतावस्थेत सापडला, मृतदेहावर धारदार शस्त्राचे तीन खोल घाव होते.
रोज रात्री दारूच्या गुत्त्यावरून घरी परतताना तो त्याच घाटरस्त्याने जायचा, हे मल्लीने आठवडाभर पाळत ठेवून पक्कं करून घेतलं होतं. त्या रात्री मल्ली अंधारात, घाटाच्या वळणावरच्या एका मोठ्या दगडामागे लपून बसला. हातात एक धारदार कोयता.

तो लडखडत जवळ आला, तसा मल्ली अंधारातून बाहेर पडला आणि त्याच्यावर कोयत्याचा वार केला. "चंद्रिका... आठवतेय?" इतकंच पुटपुटत मल्लीने आणखी दोन वार केले, आणि त्याचा जीव जाईपर्यंत डोळ्यांत रोखून पाहत राहिला.

दुसरा माणूस काही दिवसांनी शेतातल्या विहिरीजवळ एकटाच सापडला मल्लीने त्याला मानगुटीला धरून विहिरीच्या काठावर आणलं, आणि "हे चंद्रिकेसाठी" म्हणत त्याचं डोकं धारेवर आपटून आपटून ठेचलं, मग त्याला विहिरीत ढकलून दिलं.

पण तिसरा...आमदाराचा धाकटा भाऊ, त्याला मारणं सर्वांत कठीण होतं.
त्याच्याभोवती नेहमी दोन-तीन सशस्त्र माणसांचा गराडा असायचा. त्याची दहशत इतकी होती की पोलिसांपासून तालुक्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळे त्याच्यासमोर वचकून असायचे.

अनेक रात्री अंधारात दबा धरून, पावलागणिक पाळत ठेवल्यानंतर मल्लीला अखेर एक संधी सापडली.

रात्री उशिरा तो एका दूरवरच्या फार्महाऊसमधून बाहेर पडला, दारूच्या नशेत लडखडत.
मल्ली श्वास रोखून बाहेर दबा धरून बसला होता. तो फार्महाऊसेमधून बाहेर पडताच मल्ली सावलीसारखा त्याच्या मागे सरकत गेला.

हल्ला अचूक होणार होता...

पण अपेक्षेपेक्षा लवकर अंगरक्षक तिथे धावून आले. "कोण आहे... पकडा याला!"

क्षणात चार दिशांनी माणसं त्याच्यावर तुटून पडली. मल्लीने प्रतिकार केला; हातातल्या सुऱ्याने, नखांनी, दातांनी. दोन जणांना त्याने खाली पाडलं. पण त्यांची संख्या खूपच जास्त होती. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा जोरदार प्रहार झाला. आणि मल्लीच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला.

शुद्ध आली तेव्हा त्याचे हात मागे घट्ट बांधलेले होते, दोरीने मनगटं सोलवटलेली. एका जुन्या, कुजट वासाच्या गोदामात तो जमिनीवर पडला होता.
समोर खुर्चीत बसून आमदाराचा भाऊ दारूचा ग्लास हलकेच फिरवत होता, त्याच्या चेहऱ्यावर थंड विजयी हास्य होतं.

"माझी दोन माणसं मारलीस..." तो शांतपणे म्हणाला.

"...आणि आता मला मारायला आलास?"

त्याने मल्लीच्या हनुवटीला बोटांच्या चिमटीत पकडून जबरदस्तीने वर उचललं. "तुला काय वाटलं होतं, माझ्यापर्यंत पोहोचशील?"

मल्लीने एकही शब्द न बोलता त्याच्या चेहऱ्यावर थुंकलं. पुढच्याच क्षणी आमदाराच्या भावाचा चेहरा संतापाने विकृत झाला, शिरा तटतटल्या.

"याला असा धडा शिकवा, की पुन्हा उभं राहायची याची लायकी राहणार नाही."

त्या रात्री मल्लीवर अमानुष अत्याचार झाले. त्याच्या शरीरापेक्षा त्याचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तो जिवंत राहील की नाही, याचीही तिथे कुणाला यत्किंचितही पर्वा नव्हती. पहाटेच्या सुमारास त्याला ओढत नेऊन एका जीपमध्ये फेकण्यात आलं. जीप यानाच्या दाट, काळोख्या जंगलाच्या काठाशी थांबली.

"इथून पुढे जनावरं बाकीचं काम करतील." असे म्हणत त्याला खोल दरीच्या कडेला भिरकावून देण्यात आलं.

किती वेळ गेला, माहीत नव्हतं. पण डोळे उघडले तेव्हा प्रत्येक श्वासागणिक जीव कासावीस करणारी अंगभर असह्य वेदना पसरलेली होती.

वर झाडांच्या फांद्यांमधून चाळणीसारखं फिकट निळं आकाश दिसत होतं. आणि सोबतीला दाट जंगल, कीटकांचा संथ आवाज, ओलसर मातीचा वास, रक्ताचा वास.

मल्लीने कसंबसं स्वतःला ओढत पुढे सरकायला सुरुवात केली, प्रत्येक हालचालीगणिक शरीरातून वेदनेची लाट उसळत होती. प्रत्येक इंचावर वेदना होत होत्या. पण आता सध्या त्याचं एकाच ध्येय होतं - जिवंत राहायचं. कारण चंद्रिकेला न्याय अजून मिळालेला नव्हता.

नेहाचा हात नकळत तिच्या तोंडावर गेला होता. तिचे डोळे पाणावले होते. "इतकं सगळं सहन करून... आणि तरी तो जगायचा प्रयत्न करत होता, फक्त तिच्यासाठी, तिच्या निर्घृण हत्येचा सूड घेण्यासाठी?"
देवप्पाने काही न बोलता नुसती मान हलवली.
अभिजित शांत बसून राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण लपत नव्हता. त्याने हळूच नेहाकडे बघितलं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं आणि श्वास थरथरत होता.
देवाप्पा पुढे सांगू लागला.
************************************************************************************************************************
अनेक वर्षांपूर्वी कल्लेश्वर बाबा नावाचा एक तांत्रिक साधु याना जंगलाच्या आतल्या भागात एकांतवासात राहायला आला. एकेकाळी तो एका मोठ्या मठाचा शिष्य होता, पण गुरूंनी नाकारलेल्या निषिद्ध विद्यांच्या मागे लागल्यामुळे त्याला मठातून हाकलून देण्यात आलं होतं.

वर्षानुवर्षं जुन्या हस्तलिखितांचा, तंत्रग्रंथांचा अभ्यास करत त्याला भस्मबीजची कथा सापडली. भस्मासुराच्या राखेतून जन्मलेली, मानवी वासनेवर पोसणारी शक्ती. त्याला त्यात स्वतःसाठी एक संधी दिसली. जर भस्मबीज जागृत झालं आणि त्याच्यावर ताबा मिळवता आला, तर त्या शक्तीतून चिरतारुण्य आणि अमाप धन मिळवता येईल, अशी त्याची खात्री होती.

मात्र ग्रंथांत स्पष्ट लिहिलेलं होतं की विधी फक्त तृतीयपंथी व्यक्तीच करू शकते, आणि तीही स्वखुशीने; बळजबरीने केलेला विधी साधकावरच उलटतो.

कल्लेश्वर बाबाने आजूबाजूच्या भटक्या हांडी जोगी जमातीतील काही लोकांना हाताशी धरलं. त्यांना खजिन्याचं आमिष दाखवून त्याने एक काम सोपवलं. आसपासच्या गावांतून, जत्रांतून, यात्रांतून एखादा तृतीयपंथी शोधून काढायचा, जो स्वतःहून हा विधी करायला तयार होईल.

त्या माणसांनी अनेक गावं पालथी घातली. कधी मंदिराबाहेर भेटलेल्या तृतीयपंथींशी बोलणी केली, कधी शहरातल्या वस्त्यांमध्ये जाऊन शोध घेतला. पैशांचं आमिष मोठं होतं, काहींना क्षणभर मोहही पडला. पण विधीचं स्वरूप ऐकताच, त्यातली भीषणता समजताच, प्रत्येकाने नकार दिला. कुणी सरळ पाठ फिरवली, कुणी घाबरून पळून गेलं. कुणालाही आपला जीव आणि आत्मा एका राक्षसी शक्तीच्या सेवेत गमवायचा नव्हता.

अनेक महिन्यांचा शोध निष्फळ ठरत असताना, त्याच सुमारास त्या हांडी जोगी माणसांपैकी दोघे जण जळणासाठी लाकडं गोळा करायला याना जंगलाच्या त्या दरीजवळ गेले, तिथे रक्ताने माखलेला, जखमांनी विद्रूप झालेला, तरीही अजूनही श्वास घेणारा तो देह पाहून ते क्षणभर हबकलेच.
जखमांवर उपचार करताना त्यांच्या लक्षात आलं की तो तृतीयपंथी आहे. कित्येक महिन्यांच्या निष्फळ शोधानंतर मिळालेली ही संधी त्यांनी सोडली नाही.

त्यांनी मल्लीला जंगलातल्या पानां-मुळ्यांच्या औषधांनी शुद्धीवर आणलं, आणि त्यांनी त्याला कल्लेश्वर बाबासमोर आणून उभं केलं.

बाबाने त्याच्या जखमांकडे पाहिलं आणि काहीही न विचारता त्याला ठेवून घेतलं.

पुढचे अनेक दिवस मल्ली मृत्यूशी झुंज देत होता. कल्लेश्वर बाबा स्वतः त्याच्या जखमांवर औषधी वनस्पतींचे लेप लावत असे, काढे पाजत असे आणि दिवस-रात्र त्याची शुश्रूषा करत असे. हळूहळू मल्लीच्या शरीराच्या जखमा भरू लागल्या; पण मनातल्या जखमा मात्र तशाच खोल राहिल्या.
त्या दिवसांत बाबा त्याच्याशी फार कमी बोलत असे. ना तो त्याच्या भूतकाळाची चौकशी करत होता, ना कोणताही उपदेश करत होता. फक्त शांतपणे त्याचं दुःख ऐकून घेत होता. अनेक रात्री मल्ली चंद्रिकेच्या आठवणीने कोसळून रडत असे, आणि बाबा नुसता त्याच्या शेजारी बसून राहायचा.

काही आठवड्यांत मल्लीच्या मनात बाबाविषयी अढळ विश्वास निर्माण झाला. या जगात कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्याला आधार देणारा हा एकमेव माणूस आहे, अशी त्याची खात्री झाली.

तेव्हाच, एका रात्री, बाबाने प्रथमच भस्मासुराची कथा, भस्मबीजाची आख्यायिका आणि त्या निषिद्ध विधीचा उल्लेख केला.
"तुझ्या डोळ्यांत मी तेच बघतो आहे, जे शतकांपूर्वी एका राखेतून जन्म घेण्याची वाट पाहणाऱ्या शक्तीने मागितलं होतं." साधू म्हणाला

त्या रात्री साधूने मल्लीला भस्मासुराची, त्याच्या जळालेल्या राखेची, आणि त्या राखेला पुन्हा जागं करू शकणाऱ्या एका निषिद्ध, प्राचीन विधीची कथा सांगितली.

मल्लीने ते शब्द ऐकले. आणि त्या क्षणी त्याच्या मनात हरवलेल्याला परत मिळवण्याची आस निर्माण झाली.

देवप्पाने पुढे सांगायला सुरुवात केली, आवाज आणखी गंभीर झाला होता.

मल्लीच्या डोळ्यांतली सूडाची आग, ती खोल जखम कल्लेश्वर बाबाला नेमकं तेच हवं होतं. तुम्ही एका उद्ध्वस्त, न्याय नाकारलेल्या जीवाला त्याचं सर्वांत मोठं स्वप्न दाखवलं तर त्याला फसवणं फार अवघड नसतं.

कल्लेश्वर बाबाने मल्लीला वचन दिलं की हा विधी पूर्ण झाला की चंद्रिका परत येईल.

"पण हे खोटं होतं?" अभिजित म्हणाला.

"साफ खोटं. भस्मबीजाच्या विधीत मृतांना परत आणण्याची कुठलीच शक्ती नाही. पण त्या क्षणी मल्लीसाठी सत्यापेक्षा आशा अधिक महत्त्वाची होती. त्याने त्या विधीवर विश्वास ठेवला, कारण त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही आधार उरला नव्हता.”
************************************************************************************************************************
देवप्पाने दीर्घ श्वास घेतला आणि पुढे निषिद्ध ग्रंथातले कल्लेश्वर बाबाने मल्लीला शिकवलेले नियम सांगू लागला.
" भस्मबीजाला पूर्ण देह धारण करण्यासाठी तेरा आत्मे लागतात. प्रत्येक आत्मा अधिक मास अमावस्येला जन्मलेला असावा लागतो.

नेहा पुढे झुकली, तिचे डोळे रोखलेले.

"कल्लेश्वर बाबाने मल्लीला हे स्पष्ट सांगितलं होतं, प्रत्येक अशा अमावस्येला, त्याने त्या जागृत होत जाणाऱ्या राखेजवळ जायचं. सुरुवातीला त्या राखेच्या वर्तुळात ती राख निर्जीव, थंड, कुठलाही आकार नसलेली होती. पण मल्लीने पहिल्या रात्री त्या वर्तुळातल्या अदृश्य शक्तीला स्वतःचं शरीरसुख अर्पण केलं, आणि त्या क्षणापासून राख बदलू लागली."
"म्हणजे नेमकं काय घडतं त्या रात्री?" अभिजितने दबक्या आवाजात विचारलं.

"साधकाला त्या राखेच्या वर्तुळात मंत्र म्हणत बसावं लागतं, आणि वासनेने व्याकुळ अदृश्य अस्तित्वाची चाहूल लागताच स्वतःचं शरीर त्याला समर्पित करावं लागतं. त्या क्रियेतून त्या अस्तित्वाला जी ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेच्या साहायाने ते राखेत सामावले जाते. पहिल्या रात्री फक्त एक हलकीशी उब जाणवते राखेत, जणू ती श्वास घेतेय. दुसऱ्या रात्री तिच्यात हालचाल दिसू लागते. तिसऱ्या रात्री तिला अस्पष्ट पण ओळखू येण्याजोगा आकार यायला लागतो."

"आणि हे प्रत्येक चक्रागणिक वाढत जातं?" नेहाने विचारलं.

"होय. चौथ्या, पाचव्या, सहाव्या चक्रांत तिला चेहरा येऊ लागतो पण अजून पूर्ण नाही, अजून राखेतच अर्धवट अडकलेला. सातव्या-आठव्या चक्रापर्यंत ती बोलू लागते, दुर्बळ आवाजात, कुजबुजल्यासारखी. दहाव्या-अकराव्या चक्रापर्यंत तिचे डोळे उघडतात, आणि त्या डोळ्यांत पहिल्यांदाच वासनेपलीकडची एक जाणीव, एक इच्छाशक्ती दिसू लागते. आणि बारावं चक्र पूर्ण झाल्यावर..." देवप्पा इथे थांबला, नजर डोंगरांकडे वळवली.

"बारावं चक्र पूर्ण झाल्यावर काय?" अभिजितने विचारलं.

"तिला जवळजवळ पूर्ण देह मिळतो. फक्त शेवटचा एक अंश उरतो. तेरावा आत्मा, जो तिला खऱ्या अर्थाने 'जिवंत' बनवेल, तिला या जगात कायमचं चालण्याफिरण्याचं, विचार करण्याचं, आणि स्वतःची इच्छा राबवण्याचं पूर्ण सामर्थ्य देईल. तोपर्यंत ती फक्त त्या गुहेपुरतीच मर्यादित असते. बाहेर पडू शकत नाही, फक्त स्वप्नांतून हाक मारू शकते, वास पाठवू शकते, सावल्यांमधून डोकावू शकते आणि कधी कधी भास निर्माण करून लोकांना संकटात टाकू शकते."

अभिजितच्या अंगावर काटा उभा राहिला. "आणि तेरावी रात्र?"

देवप्पाचा आवाज जवळजवळ कुजबुजल्यासारखा खाली आला. "तेराव्या रात्री ती पूर्ण देह धारण करते. राखेचं वर्तुळ ओलांडून बाहेर पडू शकते. आणि त्या क्षणापासून तिला कुठलंच बंधन उरत नाही; ना गुहेचं, ना अमावस्येचं, ना कुठल्याही मानवी मर्यादेचं."

देवप्पाचे शब्द संपले, आणि खोलीत एक जड शांतता उरली. बाहेर सूर्य डोंगरांच्या मागे उतरू लागला होता, आणि आकाशाचा रंग हळूहळू तांबूस-सोनेरीतून जांभळट-निळ्या छटेकडे बदलत होता. पहिली एखादी चांदणी अंधुकशी चमकू लागली होती. हवेत संध्याकाळचा गारवा उतरू लागला.

नेहा उठून अंगणाच्या कठड्याजवळ गेली, हातावर हनुवटी टेकवत तिने त्या मावळत्या उजेडाकडे बघितलं. अभिजित तिच्या शेजारी येऊन उभा राहिला, दोघेही काही क्षण शांत राहिले. मल्लीची फसवलेली आशा, त्या अनोळखी बारा स्त्रिया, आणि आता स्वतःचं आणि नेहाचं यात गुंतलेलं भविष्य, हे सगळं त्या शांत, सुंदर सांजवेळेच्या पार्श्वभूमीवर विचित्रपणे विसंगत वाटत होतं.

देवप्पा हळूच कण्हत उठला, आणि अंगणातल्या तुळशीजवळ गेला. तिथे ठेवलेला मातीचा दिवा त्याने काडेपेटीने पेटवला. ज्योत क्षणभर लवलवली, मग स्थिर झाली. संधिप्रकाशाच्या त्या निःशब्द क्षणी, दूरवरच्या देवळातून घंटानाद घुमू लागला.

देवप्पा दिव्याजवळ उभा राहून त्या ज्योतीकडे बघत राहिला, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर सांजवेळेचा फिकट प्रकाश पसरलेला होता.

"रोज हीच वेळ असते," तो हळू आवाजात, जवळजवळ स्वतःशीच म्हणाला, "जेव्हा मला सर्वांत जास्त भीती वाटते. दिवसाचा प्रकाश विरतो, आणि रात्रीचा अंधार अजून पूर्ण दाटलेला नसतो. त्या मधल्या क्षणी, असं वाटतं, जणू तीच रेषा आहे जिथून पलीकडचं जग या जगात डोकावू शकतं."

त्याचं हे वाक्य ऐकून तिघेही काही क्षण त्या उतरत्या काळोखाकडे बघत राहिले, आणि दूरवरच्या घंटानादाचा शेवटचा प्रतिध्वनी हवेत विरून गेला.
************************************************************************************************************************
देवप्पाने दीर्घ श्वास घेतला, "आज इतक्यातच हे सगळं उलगडणं शक्य नाही. वेळ कमी आहे, आणि काही गोष्टी घाईत बोलण्यासारख्या नाहीत. पण एक सांगतो; जे काही होणार आहे, ते टाळणं कठीण आहे, पण अशक्य नाही."

"कसं?" अभिजितने विचारलं.

"अभिजित, तुला तुझं मूळ कुळ, कुळदेव आणि कुळाचार शोधून काढावे लागतील.”

"आणि सापडलं मला हे कुळ, तर पुढे काय?"

“तुझ्या घराण्याकडे जे कवच आहे, ते शोधून ते घेऊन इथे परत यावं लागेल.”

"तुझं कुळ कळलं कि तुझ्या कुलदेवतेनुसार कुलाचार करावे लागतील, इतकी वर्षे कुलाचार पाळता आले नाहीत त्याबद्दल कुलदेवतेची माफी मागून तुला व्रत करावे लागेल, आणि कुलदेवतेच्या गुप्त मंत्राची दीक्षा घ्यावी लागेल. तेव्हाच तुला ती शक्ती मिळेल, जिच्याशिवाय भस्मबीजाला रोखणं अशक्य आहे."

"संपवणं नाही, फक्त रोखणं?" अभिजितने विचारलं.

देवप्पाचा चेहरा गंभीर झाला. "संपवणं कोणाच्याच हातात नाही, अभिजित. आपण जास्तीत जास्त काय करू शकतो. शतकांसाठी त्याला पुन्हा राखेत ढकलणं. कायमचा अंत... तो कुणालाच शक्य नाही."

"पण का नाही?" अभिजितने विचारलं. "जर आपण त्याला राखेत परत ढकलू शकतो, तर ती राख जाळून, विखरून, कायमची नष्ट का करता येत नाही?"

"कारण ते बीज आहे, अभिजित. फक्त राख नाही...बीज. आणि काही बीजाचा स्वभावच असा असतो की ते कितीही जाळलं, विखरलं, गाडलं, तरी त्याच्या गाभ्यातली शक्ती पूर्णपणे संपत नाही. त्याला फक्त सुपीक जमीन हवी असते, आणि थोडंसं खाद्य, थोडंसं पोषण; ते मिळालं की ते परत उगवतं. आपण आज त्याला थांबवू, कदाचित शंभर वर्षं, दोनशे वर्षं शांत ठेवू. पण जोपर्यंत एखाद्याच्या मनातली लालसा , अतृप्त वासना त्याच्या विवेकापेक्षा वरचढ होईल,; तोपर्यंत हे बीज कुठेतरी, कधीतरी, पुन्हा मूळ धरण्याची वाट बघत राहील."

"उशीर होतोय," देवप्पा शेवटी म्हणाला, आवाजात एक थकवा. "तुम्हाला निघायला हवं, नाहीतर परतीचा प्रवास कठीण होईल."

अभिजित उठला, पण त्याचे पाय जड झाले होते. "देवप्पा, पुढे कधी भेटायचं?"

"जेव्हा तुझं कुळ सापडेल, कवच सापडेल, तेव्हा परत ये. तोपर्यंत मी इथेच आहे, वाट बघत; जशी गेली कित्येक वर्षं बघितली, तशीच आणखी काही महिने बघेन."
************************************************************************************************************************
देवप्पाच्या घरातून निघून परतीच्या वाटेने चालताना संध्याकाळचा गार वारा वाहू लागला होता.

वाटेत दोघेही फारसे बोलले नाहीत. शब्दांची गरजच उरली नव्हती, जणू मल्ली आणि चंद्रिकाची कथा त्या दोघांमध्ये एक नवा, अनपेक्षित धागा विणून गेली होती.
नेहा बऱ्याच वेळाने म्हणाली, ""सर... मला कधी वाटलंच नव्हतं की एका गोष्टीमागे इतकं दुःख असू शकेल."

अभिजित तिच्याकडे वळला. तिच्या डोळ्यांतलं पाणी अजूनही तसंच होतं, संध्याकाळच्या संधिप्रकाशात चमकत.

"आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये?" तो जड आवाजात म्हणाला, "मल्ली चुकीचा नव्हता, हे मान्य करायला माझं मन तयार होतंय. फक्त मार्ग चुकीचा निवडला त्याने."

"की दुसरा मार्गच त्याच्यासाठी उरला नव्हता?" नेहाने विचारलं, आवाजात एक विचित्र सहानुभूती.

अभिजित काही क्षण गप्प राहिला, तिच्या प्रश्नाचं वजन जाणवत. "कदाचित दोन्ही खरं असेल."

अभिजितच्या डोक्यात अजूनही निषिद्ध ग्रंथाचे तपशील, तेरा आत्म्यांचा हिशोब घुमत होता. तो शांतच होता, विचारांत बुडालेला.

नेहाने त्याच्या शांततेचा अंदाज घेत बोलायचं प्रयत्न केला. "सर, एक गोष्ट सांगू?"

"हं?" तो भानावर आला.

"देवप्पा जेव्हा त्या अधिक मास अमावस्येबद्दल बोलत होते ना, तेव्हा मला अचानक आठवलं...मी देवाप्पासमोर सांगितले नाही, पण..."

"काय आठवलं?"

"माझा जन्मही अधिक मास अमावस्येलाच झालाय. पंधरा जुलै, एकोणीसशे शहाण्णव."

अभिजित जागच्या जागी थबकला. "काय?"

नेहा त्याची ती प्रतिक्रिया बघून हसू लागली, जणू त्याची भीती तिला मजेशीर वाटत होती. "अहो घाबरू नका इतकं! आमच्या घरी हे आधीच माहीत होतं की माझा जन्म कुठल्यातरी विशेष तिथीला झालाय. आजोबांनी लगेच एक शांती केली होती माझी, लहान असतानाच भटजी बोलावून, हवन वगैरे करून. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका."

अभिजित तिच्याकडे बघत राहिला, तिच्या चेहऱ्यावरचं ते निर्धास्त हसू, आणि त्याच्या मनात मात्र एक भीतीची लहर उठली. देवप्पाने आज सांगितलेलं सगळं ऐकल्यावर, "शांती केलेली आहे म्हणून टेन्शन नाही" हे इतकं साधं समीकरण खरंच पुरेसं आहे का, याची त्याला खात्री वाटेना.

घरी परतल्यावर तो बराच वेळ पलंगावर तसाच बसून राहिला, चंद्रिकाचा चेहरा...जरी त्याने तिला कधीच बघितलं नव्हतं, तरी देवप्पाच्या शब्दांतून त्याच्या डोळ्यांसमोर जणू ती जिवंत उभी राहिली होती आणि मल्लीची वेदना, या दोन्हींनी त्याचं मन व्यापून टाकलं होतं.

न्याय नाकारला गेलेला एक जीव, आणि त्या नाकारण्यातून जन्मलेला एक राक्षस. त्याला जाणवलं, हे युद्ध फक्त भस्मबीजाशी नव्हतं, ते या जगाने शतकानुशतकं केलेल्या दुर्लक्षाशीही होतं.

तो दिवा मालवून झोपी गेला, पण त्या रात्री त्याला मल्लीचं स्वप्न पडलं. यावेळी असुरासारखा नाही, तर एका तरुण, प्रेमात बुडालेल्या मुलासारखा, चंद्रिकाच्या हातात हात घालून चांदण्यांशी गप्पा मारणारा.

भस्मबीज - भाग ८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त...
नेहाचे या गोष्टीशी कनेक्शन असणार असे वाटलेच होते.
अभिजीतला त्याचे कुलाचार लवकर कळू देत.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

कथा गुंतवून ठेवतेय.
अजूनही काही प्रश्नांची उत्तर मिळतील पुढच्या भागात.
नेहा च connection तिच्या जन्म तिथीमुळे असेल असा अंदाज होता पण देवप्पा आणि अभिजीत का जोडले गेले?
देवप्पा च थोड स्पष्टीकरण मागच्या भागात असेल, पुन्हा वाचायला हवं, अभिजीतच्या कुळामुळे त्याला शक्ती मिळेल हे ही कळलं, पण अभिजीत कुतूहल म्हणून नाही आला तर कुणीतरी आणलं त्याला, ती शक्ती कोण?
वाचतोय....

>>>>>> देवप्पा आणि अभिजीत का जोडले गेले?
देवप्पा च थोड स्पष्टीकरण मागच्या भागात असेल, पुन्हा वाचायला हवं,
नाही देवप्पा व अभिजीत कसे जोडले गेले याचे स्पष्टिकरण मला तरी सापडले नाही.

नाही देवप्पा व अभिजीत कसे जोडले गेले याचे स्पष्टिकरण मला तरी सापडले नाही.

>>>> मागे एका भागात आहे ना. अभिजीत त्याच्या परीने तपास करताना, बहुतेक, एका बातमीमध्ये की लेखात त्याला देवप्पा चा email id मिळतो आणि तो त्याला इमेल करतो

मागचे भाग वाचले पुन्हा
काही उल्लेख सापडले...
देवप्पा चा email ID अभिजीतला मिळतो,
देवप्पा ३२ वर्षांपासून वाट पाहतोय, त्याला आवाज ऐकू येत नाहीत, त्याने थांबवायचा प्रयत्न केला होता पण आता त्याच्या हातात नाही, तो फक्त राखणदार आहे.
कदाचित तो मल्लिकार्जुन ला किंवा त्याचा उपयोग करून घेणाऱ्याला ओळखत असेल.
पाहूया पुढे लेखक काय करतात ते

धन्यवाद आबा!
@manya, सामो पुढच्या काही भागात हळूहळू उलगडा होईल.