
कितीतरी वर्षांपासून मी त्याच शाळेसमोरून जातोय — जिथे माझी दहावी झाली, आणि जिथे आमचं जुनिअर कॉलेज भरायचं. आज ती इमारत तशी राहिलेली नाही; सगळं काही बदलून गेलंय. पण आठवणी मात्र अजूनही तिथल्या हवेत विरघळून राहिल्या आहेत.
प्रत्येकाच्या मनात आपली एक हक्काची शाळा जिवंत असते. शाळा म्हटलं की शिक्षक आले, विषय आले, अभ्यास-परीक्षा आणि सोबतीने मार्क्सही आले! त्या मार्क्समुळे कितीतरी रात्री विचारात आणि घरच्यांचा ओरडा खाण्यात गेल्या असतील. पण याच्या पलीकडे जाऊन बघितलं, तर खरी शाळा काही वेगळीच होती.
वर्षाच्या सुरुवातीला नवीन पुस्तकांना खाकी कव्हर घालण्याचा तो सुगंधी काळ... पहिल्याच दिवशी वहीच्या पहिल्या पानावर सुंदर अक्षरात नाव लिहिण्याचा तो उत्साह! शाळेत उशिरा पोहोचलं की शिक्षकांची नजर चुकवून मागच्या रांगेत उभं राहायचं. कधी हाती सापडलोच, तर भिंतीकडे तोंड करून स्टेजवर उभं राहण्याची शिक्षा ठरलेलीच! आवडत्या खेळाडूचं चित्र असलेली वही घेऊन येण्यात एक निराळाच रुबाब असायचा. आपल्याला नेमकं काय वाटतं, तेही वहीच्या शेवटच्या पानावर कुठेतरी लिहिलेलं असायचं. पेनाने हातावर काढलेली ती नक्षी, कंपास पेटीत जपून ठेवलेलं नटराजचं खोडरबर, आणि कोणत्या दिवशी कोणता तास आहे याचं एक छोटंसं वेळापत्रक तिथं चिकटवलेलं असायचं.
दुपारची सुट्टी झाली की ग्राउंडवर गोल करून एकमेकांच्या डब्यातलं खाणं... कोणाच्या डब्यात बटाट्याची भाजी, तर कोणाच्या मेथीची भाजी आणि आवडीची पोळी! डबा संपवून पाण्याच्या नळावर पाणी पिण्यासाठी होणारी गर्दी, आणि मग रंगणारे ते खेळ — कधी कागदी-कापडी बॉलने एकमेकांना मारणं, तर कधी पावसात चिखलाने माखून किंवा उन्हातान्हात फुटबॉल-क्रिकेट खेळणं. पहिल्या पावसाचा तो मातीचा सुगंध आजही त्या ग्राउंडची आठवण करून देतो.
वर्गात गोंधळ घातला की पूर्ण वर्गाला शिक्षा व्हायची. मागच्या बेंचवर, खिडकीशेजारी बसण्यासाठी आणि बाहेरचं ऊन-पाऊस पाहण्यासाठी वर्गात भांडणंही व्हायची. विज्ञानाच्या तासाला प्रयोगशाळेत नवीन गोष्टी पाहण्यात एक हवीहवीशी गंमत असायची — आपलं वजन पृथ्वीवर एक आणि दुसऱ्या ग्रहावर वेगळं असतं, असे कितीतरी रंजक किस्से तेव्हा कळायचे.
गणिताच्या तासाला कोणाचं लक्ष नसेल, किंवा लसावि-मसावीचं उत्तर देता आलं नाही, तर सर तास सुरू असतानाच खडू भिरकावून मारायचे — त्यामुळे त्यांच्या तासाला सतत नजर फळ्याकडेच ठेवावी लागायची! इंग्रजीच्या तासाला तर सरांच्या कानावर जरा जरी कुजबुज पडली, तरी तास सुरू असतानाच ते उभं करायचे... पण या सर्वांत सर्वात जास्त चापट्या खाल्ल्या असतील, तर त्या संस्कृतच्या मॅडमकडून! त्यांचा उच्चारांवर प्रचंड कटाक्ष असायचा, आणि त्या जे म्हणतील ते जसंच्या तसं त्यांच्यामागोमाग म्हणावं लागायचं — जरा जरी चूक झाली, तरी हातावर छडी बसायची!
इंग्रजीच्या तासाला Subject, Object आणि Verb यांच्यातला गोंधळ आणि भिंतीवर चिकटवलेला टेन्सचा तक्ता... मराठीचं पुस्तक म्हटलं की आठवायचे ते 'स्मशानातील सोनं' आणि 'उपास'सारखे अजरामर धडे!
भूगोलाच्या पुस्तकात मध्येच एखादा नकाशा असायचा, आणि विशेष आकर्षण वाटायचं ते थंड प्रदेशातल्या इग्लू घराचं — ते पाहून वाटायचं, आपणही असंच एखादं बर्फाचं घर बांधावं!
नेहमीच्या शाळेपेक्षा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवसांची तयारी करताना मात्र एक वेगळीच ओढ असायची. वर्गातली काही मुलं NCC मध्ये असायची, तर काही स्काउटमध्ये — आणि दोघांनाही सर पंधरा दिवस आधीच ग्राउंडवर घेऊन जायचे. पूर्ण ग्राउंडची साफसफाई, आणि मग जिथे झेंडावंदन होणार तिथे रोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर परेडचा सराव — हे ठरलेलंच! झेंडावंदनाच्या दिवशी सर्वांचे कपडे इस्त्री केलेले आणि बूट पॉलिश केलेले असायलाच हवेत, असे कितीतरी नियम पाळावे लागायचे. कानावरचे केस किंवा नखं जरी वाढलेली दिसली, तरी ग्राउंडला अनेक राऊंड पळायला लावायचे — आणि शिक्षा तर वेगळीच! झेंडावंदन झालं की मग सर मोठ्या मुलांसोबत आम्हालाही गावात प्रभातफेरीसाठी घेऊन जात, आणि वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन होत असे.
शाळेच्या गेटबाहेरचा तो बोरं आणि बर्फाचा गोळा विकणारा माणूस... खिशातला एखादा रुपया खर्च करून मिळणारा आंबट-गोड चिंचेचा गोळा, तर कधी तिखट-मीठ लावलेली कैरी! गोळा खाऊन एकमेकांची लाल झालेली तोंडं पाहण्यात एक वेगळा आनंद असायचा.
शाळा म्हटली की आठवतात ते शिक्षकांनी कॉलर धरून मारलेले फटके, मॅडमच्या छड्या, प्रार्थनेला उशीर झाल्यामुळे मित्रांसोबत खाल्लेला मार, आणि 'परत असं कधी वागणार नाही' असं दिलेलं ते खोटं-खोटं आश्वासन! रात्री जागून केलेला अभ्यास, अवघड पेपरच्या दिवशी होणारी मनातली घालमेल... आणि शेवटी तो निकालाचा दिवस!
त्यावेळी हे कळतच नव्हतं, की हे क्षण परत कधीच मिळणार नाहीत. आपल्यासोबत असणारे ते चार-पाच खास मित्र — तेच खऱ्या अर्थाने या शालेय जीवनात रंग भरायचे. दुर्दैवाने तेव्हा हे उमगलं नाही; आणि आज त्यांना भेटण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते — व्हॉट्सअॅपवरचं 'हाय-हॅलो' तेवढंच काय ते उरलेलं नातं.
आज वय वाढलंय, खिसे भरलेत — पण मन तितकंच रितं झालंय. त्या अल्पशा पैशात मित्रांसोबत वाटून खाल्लेली कैरी आणि गोळा जो आनंद द्यायचे, तोच आनंद आज कितीही पैसे मोजले तरी विकत घेता येत नाही.
माझी शाळा म्हणजे त्या फक्त चार भिंती नाहीत, तर माझ्या सोबतीचे ते मित्र आहेत — आणि तीच माझी खरीखुरी शाळा आहे!
छान लेख..!
छान लेख..!