भस्मबीज - भाग ४
पूर्वभाग
देवप्पाच्या ई-मेलनंतर अभिजित नेहाला सोबत घेऊन याना येथे पोहोचतो, कारण भाषेची अडचण दूर करण्यासाठी तिची मदत आवश्यक असते. देवप्पा त्याला सांगतो की भस्मासुराच्या राखेतून जन्मलेल्या 'भस्मबीज' या दुष्ट शक्तीला पूर्ण रूप धारण करण्यासाठी तेरा आत्म्यांची गरज आहे आणि बारा स्त्रियांचा बळी (?) आधीच गेला आहे. मल्लिकार्जुनच्या सूडातून सुरू झालेल्या या भयावह चक्राचा शेवट आता जवळ आल्याचे तो स्पष्ट करतो. शेवटी देवप्पा अभिजितला दुसऱ्या दिवशी गूहेत एकट्याने येण्यास सांगतो.
************************************************************************************************************************
भस्मबीज – भाग ५ - गुहेची भेट
आदल्या दिवशी देवप्पांच्या घरातून निघताना अभिजितने नेहाला स्पष्ट सांगितलं होतं,
"उद्या तुम्ही यायची गरज नाही. देवप्पांनीही सांगितलंय, गुहेपर्यंतचा रस्ता फक्त माझ्यासाठी आहे. तुम्ही आजीकडेच थांबा. मी संध्याकाळपर्यंत परत येईन."
नेहाने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं.
"मी गुहेपर्यंत येणार नाही, सर," ती म्हणाली. "पण घरी थांबूनही काही उपयोग नाही. मी देवप्पांच्या घरापर्यंत येते. तिथेच बाहेर थांबेन. "
"नेहा..."
"प्लीज, सर." तिच्या आवाजात काळजी होती.
अभिजितने तिच्या डोळ्यांत पाहिलं. तो आणखी वाद घालू शकला नाही.
"ठीक आहे," तो शेवटी म्हणाला. "पण देवप्पा जे सांगतील, तसंच वागायचं."
"ठीक आहे."
त्या रात्री दोघांनाही फारशी झोप लागली नाही. अभिजितच्या मनात गुहेबद्दलचे प्रश्न घोंघावत होते, विचारांच्या या गर्दीत त्याला अचानक जाणीव झाली; मुंबई सोडून आज दुसरा दिवस संपत आला होता, आणि त्याने एकदाही घरी फोन केला नव्हता. रोज फोन करण्याचं वचन त्याने स्वातीला दिलं होतं, आणि ते त्याच्याच नकळत मोडलं गेलं होतं.
त्याने घाईघाईने फोन उचलला. स्क्रीनवर स्वातीचे दोन मेसेज दिसले "पोहोचलास का नीट?" आणि नंतर "काळजीत आहे, फोन कर जमलं की."
त्याला खूप अपराधी वाटलं. त्याने नंबर लावला. दोन रिंगमध्येच स्वातीने फोन उचलला. "अभिजित! किती काळजी करत होते मी. दोन दिवस झाले, एक फोन नाही, एक मेसेज नाही..."
"सॉरी स्वाती, खरंच सॉरी. इथे इतकं काही घडलं की... वेळच नाही मिळाला."
"काय घडलं असं? अभिजित, नीट सांग मला, मी खूप अस्वस्थ आहे."
त्याने डोळे मिटले, काय सांगावं आणि किती सांगावं हा प्रश्न पुन्हा त्याच्यासमोर उभा राहिला. "सगळं सांगेन स्वाती, वचन देतो. पण आत्ता फोनवर नाही, समोरासमोर सांगायचंय हे. फक्त एवढं समज मी ठीक आहे, आणि वेळेत घरी येईन."
पलीकडे काही क्षण शांतता राहिली. मग स्वातीचा आवाज मऊ झाला, काळजी अजूनही तशीच पण रागाची धार कमी झाली. "ठीक आहे. पण उद्यापासून रोज फोन कर, प्लीज. मुलं विचारतायत सारखी."
"करेन. वचन देतो यावेळी खरंच."
फोन ठेवल्यावर तो बराच वेळ अंधारात बसून राहिला, इतक्या साध्या वचनालाही तो जागू शकला नव्हता, आणि हे त्याला त्याच्या स्वतःच्याच नजरेत लहान करून गेलं.
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच नेहा आणि अभिजित पुन्हा डोंगराच्या वाटेने देवप्पांच्या घराकडे निघाले. सकाळचं धुकं अजून विरलं नव्हतं. झाडांच्या फांद्यांतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी पायवाट उजळत होती, पण दोघांच्या मनावर मात्र कालच्या भेटीचं दडपण अजूनही कायम होतं.
देवप्पा अंगणातच वाट बघत उभा होता, हातात एक जुनी, काळपट झालेली पितळी समई.
देवप्पाने मान हलवली, मग अभिजितकडे वळून म्हणाला, "तयार आहेस?"
"हो."
"आणि ती?" त्याने नेहाकडे बोट दाखवलं.
"मी इथेच थांबते," नेहा म्हणाली, आवाजात संकोच लपत नव्हता. "काल सांगितलं होतंत तसं."
देवप्पाने समाधानाने मान हलवली. "आत बस. गार पाणी आहे, हवं तर पी. आम्ही परत येईपर्यंत बाहेर पडू नकोस."
नेहा अभिजितकडे वळली, तिच्या डोळ्यांत काळजी स्पष्ट दिसत होती. "काळजी घ्या."
"घेईन." अभिजित म्हणाला, आणि तिच्याकडे बघून हसला तिला धीर देण्यासाठी, आणि स्वतःलाही.
पुढच्याच क्षणी देवप्पा वळला आणि डोंगराच्या आत जाणाऱ्या अरुंद पायवाटेने चालू लागला.
अभिजितने एकदा मागे वळून नेहाकडे पाहिलं. तिने नुसताच हात हलवला. आणि तो देवप्पाच्या मागोमाग गुहेच्या दिशेने निघाला.
देवप्पा आणि अभिजित घरामागच्या एका अरुंद, फारशा वापरात नसलेल्या पायवाटेने निघाले. वाट सुरुवातीला साधीच होती, पण जसजसे ते पुढे सरकत गेले, तसतशी झाडी दाट होत गेली. झाडांच्या फांद्या एकमेकांत इतक्या गुंतल्या होत्या की वरचं आकाशही दिसेनासं झालं. सूर्यप्रकाश विरळ होत गेला आणि सभोवताल मंद सावल्यांनी व्यापला.
काही वेळ शांततेत चालल्यानंतर अभिजितने विचारलं, "किती लांब आहे अजून?"
"अर्धा तास... कदाचित थोडा जास्त," देवप्पा म्हणाला. "पुढे डोंगर चढायचा आहे."
पायवाट आता अधिक चढणीची झाली होती. देवप्पा अधूनमधून थांबत होता. तो काठीवर दोन्ही हात टेकवत काही क्षण श्वास सावरायचा आणि मग पुन्हा पुढे निघायचा. एकदा अभिजितने पुढे होऊन त्याचा हात धरायचा प्रयत्न केला.
देवप्पाने मान हलवली. "नको."
क्षणभर श्वास आवरत तो म्हणाला, " मुवत्तेरडू..बत्तीस वर्षं ही वाट तुडवतो. अजून पाय साथ देतील मला”
तासाभराच्या अवघड चढाईनंतर झाडी अचानक विरळ झाली. आणि पुढच्या क्षणी अभिजित जागच्या जागी थबकला. त्याच्या समोर एक प्रचंड काळा कातळ उभा होता… आकाशाला भिडलेला.
क्षणभर त्याचा श्वास रोखला गेला. हे हुबेहूब तसंच होतं; स्वप्नात दिसलेलं, आता प्रत्यक्ष समोर.
कातळाच्या पायथ्याशी एक अरुंद, काळसर फट दिसत होती. इतकी लपलेली की ती कुणाच्या सहज नजरेत पडणं अशक्य होतं.
अभिजितने कापऱ्या आवाजात विचारलं, "हीच... ती जागा?"
देवप्पाने मान हलवली. " नाही, या गुहेच्या मागं यक पायवाट असते, जी एका कपारीत गुडूप होते त्या कपारीच्या मागे.
देवप्पा आणि अभिजित पायवाटेने चालत जाऊन त्या कपारीत गुडूप झाले आणि दुसऱ्या टोकाला त्या गुहेच्या तोंडाशी पोहचले.
देवप्पाने समई पेटवली, आणि दोघे त्या अरुंद फटीतून आत शिरले. पहिलंच पाऊल गुहेत पडताच अभिजितच्या अंगावर शहारा आला.
तोच वास...ओलसर दगडांत मिसळलेला राखेचा गंध. तीच अस्वाभाविक थंडी...आणि छातीवर दाब देणारा तोच जडपणा...हे सगळं त्याने याआधी स्वप्नांत अनुभवलं होतं.
पायाखालचे दगड बर्फासारखे गार होते. टप... टप... टप... कुठूनतरी पाण्याचा आवाज घुमत होता. अभिजितचे डोळे विस्फारले. हाच तो आवाज... स्वप्नात ऐकू येणारा.
समईच्या फिकट, थरथरणाऱ्या प्रकाशात गुहेचा आतला भाग हळूहळू उलगडू लागला. भिंतींवर काही चिन्हं कोरलेली होती. अर्धचंद्र आणि त्याखाली एकामागोमाग एक खुणा. अभिजित नकळत पुढे गेला. त्याची बोटं त्या कोरीव खुणांवरून फिरू लागली. एक...दोन...तीन...हात नकळत थरथरू लागले. बारा. बरोबर बारा खुणा एका सरळ रांगेत कोरलेल्या होत्या. आणि त्यांच्या पुढे...तेराव्या जागी फक्त एक अस्पष्ट रेषा. दगडावर आखलेलं चिन्ह…पण अजून पूर्ण कोरलं गेलेलं नव्हतं.
"हेच ते..." देवप्पाचा आवाज गुहेत घुमला. त्याची नजर त्या अपूर्ण खुणेवर खिळलेली होती.
"प्रति चक्र एक खूण. बारा झाली... आता तेराव्याची येळ...."
अभिजितची नजर त्या रेषेवर खिळून राहिली. गुहेच्या मध्यभागी राखेचं एक विशाल वर्तुळ होतं, कालानुरूप विरळ झालेलं. अभिजितने त्याच्याजवळ जाऊन गुडघे टेकले, हात पुढे केला, पण स्पर्श करायचं धाडस झालं नाही.
"हात लावायचं नाय," देवप्पा म्हणाला.
अभिजितने हात मागे घेतला. त्याचवेळी त्याला जाणवलं त्या वर्तुळाकडे बघताच त्याच्या डोक्यात स्वप्नातले तुकडे एकामागोमाग उलगडू लागले. पाठमोरी आकृती. तो स्त्रीस्वर. "उशीर होतोय..."
"तुम्हाला हा आवाज ऐकू येतो का कधी?" अभिजितने विचारलं.
देवप्पाने नकारार्थी मान हलवली. "मी फक्त रखवालदार. मला नाय आईकू येत. ती फक्त निवडलेल्यांना येते."
"निवडलेले?"
देवप्पा त्याच्याकडे वळला, नजरेत एक जड, अपरिहार्य सत्य. "तू आणिक तुझं घराणं, अभिजित. तू योगायोगानं नाही आला."
अभिजितच्या छातीत धडधड वाढली. "काय म्हणायचंय तुम्हाला?"
देवप्पाने दीर्घ श्वास घेतला, जणू पुढचे शब्द उच्चारायला त्याला स्वतःचं सगळं बळ एकवटावं लागत होतं.
"तुझ्या घराण्याचा आणिक या गुहेचा संबंध फार जुना असणार…"
गुहेत एक जड, थंड शांतता पसरली. बाहेरून वाऱ्याचा एक मंद झोत आत घुसला, समईची ज्योत क्षणभर थरथरली.
देवप्पा त्या रिकाम्या तेराव्या खुणेजवळ बराच वेळ शांत उभा राहिला, जणू त्या कोऱ्या जागेकडे बघणंच त्याला त्रासदायक होतं. मग त्याने काठी टेकत गुहेच्या आणखी आत, वर्तुळाच्या पलीकडे जायला सुरुवात केली.
"इथे ये," तो म्हणाला.
अभिजित त्याच्या मागोमाग गेला. गुहेचा हा भाग आणखी अरुंद होता, छत खाली झुकलेलं, चालताना वाकावं लागत होतं. समईच्या प्रकाशात भिंतीवर आणखी काहीतरी कोरलेलं दिसलं; यावेळी अक्षरं, जुनी हळे कन्नड लिपीत होती.
"हे काय आहे?" अभिजितने विचारलं.
"मंत्र. विधीचे मंत्र, इथेच कोरलेले, जेणेकरून कधी ग्रंथ हरवला तरी विधी विसरला जाऊ नये." देवप्पाचा आवाज कडवट झाला.
अभिजितने भिंतीवर हात फिरवला, अचानक त्याला एक आवाज ऐकू आला फार लांबून, फार अंधुक, "जवळ आलास..."
अभिजित जागच्या जागी गोठला. "तुम्हाला ऐकू आलं का ते?"
देवप्पाने त्याच्याकडे बघितलं, चेहऱ्यावर चिंता. "काय आईकले?"
"आवाज. 'जवळ आलास' म्हणाला."
देवप्पाचा चेहरा फिकट पडला. "आता निघावं. इथं जास्त येळ थांबणं बरोबर नाय."
अभिजितच्या छातीत धडधड वाढली. "पण... याचा अर्थ काय होतो माझ्यासाठी?" त्याचा आवाज नकळत थरथरला.
“इथं नको, चल जाऊ आता”
दोघे परतीच्या वाटेने निघाले. गुहेच्या तोंडाशी येताच अभिजित नकळत थांबला. त्याने एकदा मागे वळून पाहिलं. समईचा प्रकाश आता गुहेच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता. आत फक्त गडद, जिवंत वाटणारा अंधार उभा होता. काहीच दिसत नव्हतं...तरीही त्याच्या अंगावर पुन्हा काटा आला.
तो क्षणभर स्तब्ध उभा राहिला. मग देवप्पाचा आवाज आला. "चल... मागं बघायचं नाय."
अभिजितने काही न बोलता पावलं पुढे टाकली.
गुहेबाहेर पडताच दुपारचं ऊन अंगावर पडलं. थंड, ओलसर अंधारातून बाहेर येताच त्याने नकळत खोल श्वास घेतला.
दोघे डोंगर उतरू लागले. देवप्पा पूर्ण वाटेत एक शब्दही बोलला नाही. काठीचा नियमित टक... टक... टक... आवाज आणि पायाखाली चुरगळणाऱ्या सुक्या पानांचा खसखसाट एवढंच ऐकू येत होतं.
त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण गंभीरपणा उतरला होता. जणू गुहेत पाहिलेल्या त्या अपूर्ण खुणेने त्याच्या मनात पुन्हा एखादी जुनी भीती जागी केली होती.
घराजवळ पोहोचताच नेहा दारातच वाट बघत उभी दिसली, तिचा चेहरा चिंतेने ग्रासलेला.
"किती वेळ लावला तुम्ही!" ती अभिजितजवळ धावत आली, जवळजवळ त्याला स्पर्श करता करता थांबली. "ठीक आहात ना?"
"ठीक आहे," तो म्हणाला, पण आवाजात एक थकवा स्पष्ट जाणवत होता.
देवप्पाने त्या दोघांना बसायला सांगितलं आणि स्वतः आत जाऊन तीन तांब्याचे पेले घेऊन आला आणि गार पाणी प्यायला दिले.
नेहा दोघांकडे आळीपाळीने बघत होती, तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि भीती दोन्ही स्पष्ट दिसत होती. "देवप्पा, आत काय झालं? अभिजित सर परत आल्यापासून एक शब्दही बोलले नाहीत."
देवप्पाने दीर्घ श्वास घेतला, स्वतःचा पेला एका घोटात संपवला. "बहुलष्टु नडेदिदे. मत्तु इन्न्नु बहुलष्टु हेलुवुदु बाकि इदे. बरंच काही झालं. आणि अजून बरंच काही सांगायचं बाकी आहे."
अभिजितच्या डोक्यात विचारांची नुसती गर्दी झाली होती. अनेक प्रश्न त्याला भंडावून सोडत होते.
पहिला प्रश्न - ही स्वप्नं फक्त त्यालाच का पडतायत? तो स्त्रीस्वर फक्त त्यालाच का ऐकू येतो?
तेरावी बळी कोण असणार?
आणि सर्वांत महत्त्वाचं - हे कसं थांबवायचं, किंवा संपवायचं?
पाणी संपवून त्याने पेला बाजूला ठेवला, आणि त्याने हे सगळे प्रश्न देवप्पासमोर मांडले
देवप्पा काही क्षण शांत बसून राहिला. जणू सुरुवात कुठून करावी, याचाच तो मनात शोध घेत होता. मग त्याने अभिजितकडे एक नजर टाकली आणि बोलायला सुरुवात केली. मध्येच कानडी, मध्येच मोडकं-तोडकं मराठी. अभिजितला त्यातलं बरंचसं कळत नव्हतं. नेहा मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती आणि मध्येच त्याचा अर्थ मराठीत सांगत होती.
"तु जे पाहिलं... ते आत्ता समजून घेणं सोपं नाही," देवप्पा म्हणाला.
"तुला ही स्वप्नं पडतायत आणि तो स्त्रीस्वर ऐकू येतोय, म्हणजे तू याच मातीतला आहेस," देवप्पा म्हणाला.
"हे कसं शक्य आहे?" अभिजित उपहासाने म्हणाला. "मी बारामतीजवळच्या सुप्याचा इनामदार. माझा आणि कर्नाटकाचा काय संबंध?"
देवप्पाने मधेच हात वर करून त्याला गप्प बसण्यास सांगितलं. "आधी माझं बोलणं पूर्ण होऊ दे, मग तुला काय सांगायचंय ते सांग." तो कानडीत म्हणाला. नेहाने हाताने अभिजितला थोडे थांब अशी खूण केली.
त्याने पुढे बोलण्यास सुरुवात केली, "तुला तुझं मूळ कुळ, कुळदेव आणि कुळाचार शोधून काढावे लागतील. कारण त्याशिवाय हे थांबवायचं बळ आपल्यात नाही. आणि तेरावी बळी अशी स्त्री असणार, जिचा जन्म अधिक मास अमावास्येला झालेला आहे."
हे अभिजितसाठी नवीन होतं. "म्हणजे पूर्वीच्या बारा स्त्रियांचीही जन्मतिथी अधिक मास अमावस्या होती?"
"हो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे काही शतकांसाठी थांबवू शकतो. त्याला संपवणं कोणाच्याच हातात नाही," देवप्पा म्हणाला.
नेहा डोळे विस्फारून हे सगळं ऐकत होती. या सगळ्या गोष्टींवर तिचा विश्वासच बसत नव्हता. आणि तरीही तिला आता भीती वाटू लागली होती.
"पण आधी एक गोष्ट समजली पाहिजे मल्ली कोण होता... आणि तो इथपर्यंत कसा पोहोचला. त्याची कहाणी कळल्याशिवाय त्याने जे केलं, त्यामागचं कारण तुम्हाला कधीच पूर्णपणे समजणार नाही." देवप्पा पुढे म्हणाला.
नेहा नकळत पुढे सरकली. तिच्या आवाजात उत्कंठा होती.
" हेळी…सांगा ना; पण त्या आधी आपण जेवून घेऊ, तिने आजीने दिलेला डबा उघडला.
बाहेर दुपारचं ऊन अंगणभर पसरलं होतं. तुळशीच्या पानांवरून मंद वारा अलगद फिरत होता. यानाच्या गुहेतून परतल्याचा थकवा अजूनही अभिजितच्या अंगात रेंगाळत होता. दूर कुठेतरी एका पक्ष्याचा एकसुरी आवाज शांततेला अधिक गडद करत होता.
देवप्पाने जेवता जेवता हळूहळू बोलायला सुरुवात केली.
************************************************************************************************************************
उडुपीपासून काही कोस आत, सह्याद्रीच्या घनदाट जंगलांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव. सुपारीच्या बागा, काजूची झाडं, आणि पावसाळ्यात ढगांनी वेढलेले डोंगर. गावाच्या एका बाजूला मारिकांबा देवीचं छोटं देऊळ, दुसऱ्या बाजूला सीता नदीचं वाहतं पाणी, आणि थोडं पुढे गेलं की घनदाट जंगलाचा प्रदेश सुरू व्हायचा. याच गावात, नारायणस्वामींच्या घरात मल्लिकार्जुनचा जन्म झाला.
घर तसं साधंच; लाल कौलारू छप्पर, समोर लाकडी खांबांची पडवी आणि अंगणात डौलाने उभं असलेलं तुळशीवृंदावन. एका कोपऱ्यात वार्यावर डोलणारी नारळ आणि सुपारीची उंच झाडं.
वडील नारायणस्वामी दिवसभर मळ्यात राबायचे, संध्याकाळी गावातल्या इतर पुरुषांबरोबर देवळाच्या पारावर बसून गप्पा मारायचे.
मल्लिकार्जुनला वयाच्या दहाव्या वर्षापासूनच जाणवू लागलं होतं... की तो या शरीरात, या नावात, या घरात कुठेतरी चुकीच्या साच्यात अडकला आहे.
लहानपणापासूनच त्याला बाहुल्यांशी खेळायला आवडायचं, टॉवेल कमरेला गुंडाळून साडीचा पदर खोचल्यासारखं करून आरशासमोर उभं राहून नाचायला आवडायचं. गावातल्या यक्षगान मंडळींचे कार्यक्रम पाहायला तो तासन् तास बसून राहायचा; विशेषतः जेव्हा एखादा पुरुष कलाकार स्त्री-वेष घेऊन, घुंगरू बांधून रंगमंचावर उतरायचा, तेव्हा मल्लिकार्जुनचे डोळे चमकायचे. त्या क्षणी त्याला वाटायचं…हो, हेच मला व्हायचं आहे. ही हालचाल, हे घुंगरू, हा साज... हे माझं आहे.
शाळेतली मुलं मात्र त्याला खूप त्रास देत. कन्नड माध्यमाच्या त्या सरकारी शाळेत, मधल्या सुट्टीच्या वेळी मैदानावर मुलांचा एक घोळका नेहमी त्याच्याभोवती जमायचा. "हेंगसरु बंदा, हेंगसरु!" बायल्या आला, बायल्या! असं ओरडत ते त्याची नक्कल करायचे, त्याच्या हातवाऱ्यांची, त्याच्या चालण्याची टिंगल उडवायचे. काही वेळा दगड मारायचे, त्याचं दप्तर हिसकावून फेकून द्यायचे. मल्लिकार्जुनला त्या शब्दांचा नेमका अर्थ तेव्हा पूर्णपणे कळत नसे, पण प्रत्येक वेळी तो शब्द कानावर पडला की आत कुठेतरी काहीतरी तुटायचं, काळीज चिरत जायचं. तो रडत रडत घरी यायचा…धुळीने माखलेला, गुडघे सोलवटलेले, डोळे सुजलेले.
पण समजावण्याऐवजी वडील नारायणस्वामी संतापायचे. गावातल्या इतर पुरुषांसमोर त्यांची मान खाली जायची. "तुझा मुलगा बायकांसारखा वागतो" हे वाक्य त्यांच्या कानात सतत घुमायचं, आणि त्या लाजेचं रूपांतर रागात व्हायचं. त्यांना वाटायचं, माराने त्याचा 'नाद' सुटेल. नारळाच्या झावळ्यांच्या काठीने मार बसायचा. " हिजडा", "घराण्याच्या नावाला काळिमा फासणारा" असे शब्द त्याच्या कानांवर आदळायचे. कधी कधी वडील त्याला दिवसभर एका खोलीत कोंडून ठेवायचे, अन्नावाचून, फक्त "सुधार" व्हावा म्हणून. पण शरीराला होणाऱ्या वेदनेने मनातलं सत्य कसं पुसलं जाईल.
एकदा तर गावातल्या एका तांत्रिकाकडे नेऊन विधी केला होता, जणू त्याच्यात शिरलेली कुठलीशी 'वाईट शक्ती' हाकलून काढायची होती. मल्लिकार्जुन त्या धुरात, त्या मंत्रोच्चारात, भीतीने थरथरत बसून राहिला होता,आणि त्या क्षणी त्याला पहिल्यांदा वाटलं होतं की देवसुद्धा माझ्या बाजूने नाही.
रात्री सगळे झोपल्यावर, घरातला दिवा मालवल्यावर, आई चोरपावलांनी त्याच्या जवळ येऊन बसायची. त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची, पाठीवरच्या, पायांवरच्या वळांवर हळुवारपणे खोबरेल तेल चोळायची. "सहन कर बाळा, मोठा झालास की सगळं ठीक होईल," ती पुटपुटायची, पण तिच्या आवाजातच तिचा विश्वास डळमळीत असल्याचं जाणवायचं. तिच्या डोळ्यांत असहायता, माया आणि भीती एकत्र दाटून आलेली असायची. ती त्याला वाचवू इच्छित होती... पण कुणापासून वाचवायचं; स्वतःच्या नवऱ्यापासून, की या गावाच्या नजरेपासून, की या समाजाच्या साच्यांपासून हेच तिला कधीच नीट कळलं नाही. आणि जरी कळलं असतं, तरी त्या काळात, तिच्याकडे त्याविरुद्ध उभं राहण्याचं बळ नव्हतं.
तेराव्या वर्षी एक घटना घडली, जिने मल्लिकार्जुनच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. गावात दरवर्षी होणाऱ्या यक्षगान मेळाव्यात, एका कलाकाराने त्याला उत्साहाने रंगमंचामागे स्त्री-वेष चढवून पाहू दिला. साडी, दागिने, घुंगरू, आणि चेहऱ्यावर हलकंसं सौंदर्यप्रसाधन. आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहताच मल्लिकार्जुनच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पहिल्यांदाच स्वतःची ‘ओळख’ पटल्याचे अश्रू. काही क्षणांसाठी त्याला वाटलं, आरशात दिसणारी व्यक्ती खरी आहे, आणि रोजचं आयुष्य खोटं आहे.
पण कुणीतरी हे पाहिलं, आणि गावभर बातमी पसरली. त्या रात्री घरी नारायणस्वामींनी त्याला इतकं बडवलं की तो तीन दिवस धड चालूही शकत नव्हता. "पुन्हा असं काही केलंस, तर याच हातांनी जीव घेईन," वडलांचे हे शब्द त्याच्या कानात कायमचे कोरले गेले.
काही दिवसांनी एका पहाटे, कोंबडा आरवायच्याही आधी, त्याने घर सोडलं. दवाने भिजलेल्या मळ्यातून, अंधारात चाचपडत तो चालत राहिला.
वाटेत मारिकांबा देवीच्या देवळापाशी क्षणभर थांबला, हात जोडले, आणि पुटपुटला "आई, तुझ्याशिवाय आता कुणाचाच आधार नाही." मग पुढे निघाला.
कोणाला काही सांगितलं नाही. कारण सांगण्यासारखं काही उरलंही नव्हतं.
एका जुन्या कापडी पिशवीत दोन जोड कपडे, आणि आईने आदल्या रात्री कुणाच्याही नकळत त्याच्या हातात ठेवलेली शंभर रुपयांची एक दुमडलेली नोट...एवढीच त्याची संपत्ती होती. त्या नोटेसोबत तिने त्याच्या मुठीत आणखी एक गोष्ट कोंबली होती, देवीच्या पायावरची एक छोटी हळदी-कुंकवाची पुडी. "ही सोबत ठेव, ती तुला सांभाळेल," डोळ्यांत पाणी आणून ती म्हणाली होती.
गावाची वेस ओलांडून तो मुख्य रस्त्याला लागला. तिथून जी पहिली बस आली, ती कुठे जाते हेही न विचारता तो त्यात चढला. बसच्या गर्दीत एका कोपऱ्यात खिडकीपाशी जाऊन बसला, खिडकीबाहेर मागे सरकणाऱ्या डोंगररांगांकडे पाहत राहिला, आणि हळूहळू त्याचे डोळे मिटले.
त्या क्षणापासून मल्लिकार्जुनचं जुनं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं.
ज ब र द स्त....
ज ब र द स्त....
फारच गुंगवून टाकलं आहे आहे.
लवकर टाका पुढचा भाग...
मस्तच!
मस्तच!
अभिजीत आमच्या भागातीलच म्हणायचा कि
भारी चालली आहे कथा!
भारी चालली आहे कथा!
फार फार ताकदवान कथा आहे.
फार फार ताकदवान कथा आहे.
पहाटे उठून प्रथम हा भाग वाचून
पहाटे उठून प्रथम हा भाग वाचून काढला.
Gripping story line!
ज ब र द स्त....
ज ब र द स्त....
अतिशय उत्कंठा वर्धक कथा ss
अतिशय उत्कंठा वर्धक कथा ss
नितिन मस्त चालली आहे गोष्ट .
नितिन मस्त चालली आहे गोष्ट ... आज सगळे भाग वाचून काढले. तुमच्या कथांच्या विषयांचा आवाका खरोखरच अफाट आहे.. ब्लॅक अँबर आणि आता हि गूढ कथा . तुमची कल्पनाशक्ती आणि कथाकथनाची शैली अप्रतिम आहे. मनापासून कौतुक !
ते देवप्पाच खलनायक आहेत की
ते देवप्पाच खलनायक आहेत की काय?
धन्यवाद ऋतुराज., आबा., झेलम,
धन्यवाद ऋतुराज., आबा., झेलम, सामो, केशवकूल, माबो वाचक, अनघा. आणि सामी!
ते देवप्पाच खलनायक आहेत की काय? >>> नाही सामो, देवप्पा खलनायक नाही.
>>>>>नाही सामो, देवप्पा
>>>>>नाही सामो, देवप्पा खलनायक नाही.
धन्यवाद.