साप घुशी येती घरा||

Submitted by mi_anu on 21 July, 2026 - 06:38
Snake,cat, rodents

भल्या पहाटे(म्हणजे 7.45 ला) वर्क फ्रॉम होम दिवस.
अचानक नवरा जोरजोरात हाका मारायला लागला.नेहमी अश्या हाका ऐकू आल्या की मी पळत जाऊन बेसिन च्या कपाटावरचं लाल हिट काढते, पळत जाऊन ते ओरडणाऱ्याच्या 2 फुटावर ठेवून पळत पळत दुसऱ्या खोलीत पलंगावर पाय वर ठेवून बसते.(इतकं करून पण पालींना देवाने भिंती, छतावर चढण्याचं माझ्याकडे नसलेलं स्किल दिल्याने भीती असतेच.)

पण हिट घेऊन आले तर तो म्हणाला 'खोलीत साप आहे.आता मी दार उघडताना दारातून आत गेला'.आमच्या मागे शेत असल्याने खिडकीला जाळी लावेपर्यंत एक्झॉस्ट च्या खिडकीत उंदीर, कमोड वॉशरच्या नळावर सरडा, कधीतरी ते मागून सापासारखं आणि पुढून पालीसारखं दिसणारं हायब्रीड चमकदार काहीतरी दिसणं या अतिशय कॉमन गोष्टी होत्या.आता सर्व खिडक्यांना जाळी, वॉशिंग मशीन च्या ड्रेन च्या छिद्राला, बेसिन च्या पाईप ला, गॅलरी च्या ड्रेन ला बोरिक पावडर चं मॅरीनेशन करून दुहेरी जाड चिकटपट्टी बंद केलेल्या, गॅलरी च्या पत्र्याच्या लाटांमध्ये जुन्या चिंध्या घालून सील असं सर्व करून पण घरात साप येणे म्हणजे फारच टू मच अन्याय होता.अर्थात हे पाली आणि झुरळं यांच्यासाठीचे उपाय आहेत.त्यामुळे साप 'नॉट ऍप्लिकेबल टू मी' म्हणून बिनधास्त आत घुसला असावा.

'अश्या ओव्हर रिऍक्शन काय देतेयस?पटकन पातेलं आण.'
आतापर्यंत हा साप नक्की किती साईझ चा, कोणता, काळा की गोरा हे दोघांपैकी कोणीही विचारलं आणि सांगितलं नव्हतं.त्यामुळे वेगवेगळ्या आकाराची पाच पातेली घेऊन आले.
'हे काय?सापाला नैवेद्याचा स्वयंपाक नाही करायचाय.आणि भांडी किती छोटी आणलीस?चादर घेऊन ये.'
'अरे, साप किती मोठा आहे?कोणता आहे?पट्टे आहेत का? खोलीच्या बाहेर ये, गमबूट घाल.लांब हो.आधी फोटो व्हिडीओ काढू.साप चावला तर कोणता आहे सांगावं लागतं डॉक्टरांना.'
'हे घ्या.शुभ बोल नाऱ्या म्हटलं की मांडवाला आग लागली म्हणालीच पाहिजे बाई.द सिक्रेट वाच.आपण जे बोलतो ते मॅनीफेस्ट होतं. काशीस जावे नित्य वदावे.शुभ बोलावे.'(गडी लगेच लीडरशिप पेप टॉक द्यायला लागला.)
असे टिपिकल प्रेमळ संवाद झाल्यावर चादर आणली.
'बरोबर मी घेतो अंगावर तीच आणलीस ना चादर?ती गॅलरी च्या दारात पाल ब्लॉक करायला लावलेली जुनी फाटकी आण'
'इथे जीवावर बेतलंय पण चादरीचा मोह सुटत नाही.घ्या एकदाचे जुनी चादर.'

इतकी कचकच ऐकून वैतागून तो साप एका जुन्या लाकडी साईड टेबल सदृश रिकाम्या चौकोनात घुसला.आता आम्ही चादर बाजूला ठेवून तो चौकोन बंद करायला लाकूड शोधू लागलो.अगदी हुबेहूब झाकण म्हणून जोडी जुळेल असा चौकोन मिळाला पण ते साईड टेबल लांबी रुंदी वेगळी 1 सेंटीमीटर बाहेर आलेलं, त्यामुळे ते बंदच होणार नव्हतं.सापालाच दया आली आणि तो आम्हाला घाबरवून वर्क टेबलखाली नीट दिसेल अश्या जागी गेला.
'माझा कॉल आहे 8.30 ला.याला बाहेर काढायला हवं.'
'इथे रोम जळतंय.तुम्ही मीटिंग चं फिडल वाजवत बसा.'
त्या सापाला टेबलाखाली फळ्या रचून एका मर्यादेत ठेवून घरच्या छोट्या मेंबरला खुर्चीवर पाय वर करून खोलीच्या दुसऱ्या टोकाला लक्ष ठेवायला बसवून सर्पमित्र शोधायला गेले.

तोवर बाहेर सिक्युरिटी ला विचारलं.तो शूर गडी. मोठे मोठे बेडूक हाताने धरून बाहेर काढणारा.'अभी मैने साप पकडना बंद कर दिया है' म्हणाला.सर्पमित्र फोन नंबर घेतला होता तो 2 वर्षांपूर्वीचा होता.त्याला विचारलं अजून साप पकडता का?तर त्याने घराजवळ असलेल्या एकाचा नंबर दिला.
अगदी 5 मिनिटात रिक्षाने हे सर्पमित्र येऊन अगदी जाता जाता ओळखीच्या नातेवाईकाकडून लाडूचा डबा कलेक्ट करून पुढे निघून जावं तसं सापाला लहान पाणी बाटलीत घालून घेऊन गेले.वर 'घाबरू नका.साधा बिनविषारी कवड्या साप आहे.भिंतीवर चढता येणारा एकमेव साप.कधी दार उघडं राहून आत आला असेल.खिडक्या तुम्ही चांगल्या बंद केल्या आहेत.तिथून नाही आला.' सांगून गेले.
(भिंती आणि छत चढणारा तो महागुरू साप.आणि आम्ही याला लाकूड फळ्या,चादर घडी टाकून थांबवत होतो.अज्ञानात सुख असतं म्हणतात ते हेच.)
'पण यापुढे येणार नाही म्हणून काय करावं लागेल?'
'पॅनिक होऊ नका हो.आला की मला बोलवा.साप मारू नका.तुमच्या सोसायटीत मी घोणस आणि नाग पकडलेले आहेत.परवा एका नागाला cpr पण दिला मी.'
(इथे मला बरेच प्रश्न पडले.असेल बुवा.नागाला चेस्ट मसाज दिला असेल.बहुतेक साप लोकांना ओठ नसल्याने माऊथ टू माऊथ दिला नसावा.)
(हा बघा कवड्या महाराजांचा व्हिडिओ.व्हिडिओ बघा.टेबलखालची धूळ बघू नका.तिथे काहीतरी होतं त्याच्या मागची धूळ आहे ती.या चॅनल वर काहीही अपडेट येत नाहीत.त्यामुळे लाईक सबस्क्राईब शेअर करू नका.केलं तर दात पाडेन.)
https://youtube.com/shorts/XdZkqkVjF8g?si=JqmSt20X6yD3Mk7D

असंच एक छान देखणं मांजर आमच्याकडे यायला लागलं. आम्ही त्याचं नाव अर्थशास्त्र ठेवलं.अर्थशास्त्र का, याला काही अर्थ नाही.त्यावेळी आमच्याकडे घरातला एक मेंबर अहोरात्र एका ca चा शेअर्स चा चॅनल बघायचा.त्याचा सुप्त परिणाम असेल.अर्थशास्त्र आलं, आता आजूबाजूला पाली, कोळी कमी होतील अशी आशा होती.म्हणून आम्ही तिला दूध द्यायला लागलो.एक भुरा बोका तिला भेटायला पण यायला लागला. पण ही मांजर अशी शिष्ठ की दूध आणि पोळी दिली तर नुसतं दूध शोषून पोळीचे तुकडे तसेच ठेवून निघून जायची.मारी बिस्कीट ला तोंड लावून नाक उडवून नको म्हणून निघून जायची.शिवाय शी करायला मात्र हक्काने यायची.(ती मागच्या वेळी शी करणारी कुत्री मांजर ती ही नव्हे.ही वेगळी.तिची सवय मोडली.आता ही नवी.)परत एकदा फिनेल, नीम फिनेल असे लेप टाईल्स ना चालू झाले.मग अर्थशास्त्र मॅटरनिटी प्लॅनिंग साठी आमच्या वॉशिंग मशीन मागे जागा शोधायला लागली.तेव्हा मात्र आम्ही दूध देणं बंद केलं आणि तिला हाकलून द्यायला लागलो.हल्ली मांजरी काहीही खात नाहीत.मांजरी उभ्या आणि शेजारी वरून पाल फिरत असते.उंदीर रात्री यायचे तसे येतात.मांजरांना कोणीतरी हे समजावून सांगण्याची गरज आहे की त्यांच्या मूळ कि परफॉर्मन्स इंडिकेटर्स नुसार त्यांनी उंदीर आणि हे सर्व प्राणी अधून मधून खाणं अपेक्षित आहे.

या सर्व घोळात आमच्या घरी एक घूस यायला लागली.कोकोपीट,भाज्या देठ, कंपोस्ट कल्चर टाकलेल्या भरलेल्या प्लास्टिक कुंड्या उलट्या पाडणे, माती खणून ठेवणे असे भीतीदायक उद्योग चालू झाले.शिवाय उंदीर,घूस,बेडूक नामक बुफे डिनर खायला धामण नामक खादाड प्राणी येण्याची शक्यता वाढते.उंदराच्या वड्या आणून त्या काजू कतलीच्या तुकड्यावर चिकटवून इकडे तिकडे टाकून ठेवणे हा नवा उद्योग झाला.तुकडे गेलेले होते.पण घूस येत जात असल्याचे पुरावे पण दिसणं बंद झालं नव्हतं.घुशीने खणलेले खड्डे मी रोज नव्या दमाने बुजवून किंवा त्यात रोपं लावून तिचा पोपट करतेय. घूस तिकडे तिच्या व्हॉटसप वर 'एक रंगीत कपडे घातलेला राक्षस येऊन माझं बांधलेलं घर पाडून जातो' अश्या भावनिक पोस्ट टाकत असेल.कालच्या काजू कतली चे तुकडे आणि वरच्या वड्या गायब आहेत.आणि आम्ही 'उंदीर एकदा खाऊन,मरतात बाहेर जाऊन' ची वाट बघतो आहे.

| समाप्त |

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा! अनू खूप दिवसांनी माबोवर…

सध्या इथे ‘आया मौसम सापों का’ सुरू आहेसं वाटतंय. मध्यंतरी आम्रीकेतल्या एका मुलीकडे (नाव विसरले) नी आता तुझ्याकडे.

लेख नेहमीप्रमाणे खुसखुशीत मी_अनू शैलीत.
बाकी घरात साप असताना सर्पमित्राला तुम्ही अजून साप पकडता का विचारण्याचं मला सुचलं नसतं.

या एवढ्या मोठ्या सापाला पाण्याच्या बाटलीत भरलं?

अनु.. Lol
मस्त लेख.
" तुम्ही अजून साप पकडता का?" विचारणं खरंच किती मजेदार! म्हणजे तसे बरोबरच आहे म्हणा!
खरंच.. मांजरी हल्ली काहीही शिकार करून खात नाहीत!

व्हिडिओ मध्ये तर साप चांगला सरसर वर चढतो आहे की!
आणि त्याला मार्कर कशाला दिला ?खेळायला, की पट्टे ओढायला?

सुप्पर come back
कित्ती दिवसांनी तुमच्या नावाचा धागा दिसला.
Dp सुद्धा मस्त आहे माबोचा
खुसखुशीत लिहिलं आहे
पण चांगलीच धावपळ करवणारे प्राणी आले घरी.

अनु, वेलकम बॅक!
नेहमीप्रमाणे खुसखुशीत लेख. लिहीत रहा. आता इतक्या मोठ्या गॅप घेणार नाहीस, अशी आशा आहे.

अनु, जोरदार पुनरागमन! Lol

तुम्ही वड्यांसाठी का होईना, घुशीला काजूकतली दिलीत?
#वड्डेलोग_(उंदराची)वड्डीबातें

वोह अनु आयी नही उसे लाया गया है....
साप आणि घुशींनी Proud

मस्त खुसखुशीत आणि वेलकम बॅक Happy

पण एका लेखापुरते आला आहात की आता येत जात राहणार हे सुद्धा क्लिअर करा.. कारण तुमचे चर्चेच्या धाग्यांवरचे प्रतिसाद छान असतात. जे इथून हरवले आहेत.

मांजराचं नाव अर्थशास्त्र हे कसं सुचलं हाच प्रश्न पडलाय.
सदमा मधे श्रीदेवीने कुत्र्याच्या पिल्लाचं नाव असंच काहीतरी ठेवलं होतं, त्याला चेक आणि मेट.

बैठं घर आहे का? आमच्याकडे पण असे प्रसंग व्हायचे. मग बाहेर फरशी, ओटा केला. कमी झाले. घूस मात्र घराखाली पोखरत होती. तिला एका गारूड्याने काहीतरी दिलं खायला. नंतर घुशींचा प्रॉब्लेम संपला. जाताना मिसेस गारूड्याने सोन्याचे दागिने पण हळूच नेले.

भारी लेख एकदम अनुस्टाइल !!

सदमा मधे श्रीदेवीने कुत्र्याच्या पिल्लाचं नाव असंच काहीतरी ठेवलं होतं, >> हरी प्रसाद

भारीच लेख

पण एकच सांगेन.

साप म्हणून नये धाकला.( आणि नवरा म्हणून नये आपला)

केवळ सहा इंची फुरसे चावल्याने विषबाधा झालेला नौदलातील सैनिक गोव्यात पाहिलेला आहे.

त्यामुळे हे काम सर्पमित्रांनाच करू द्यावे

अरे वा वा! खूप दिवसांनी लेख बघून आधी आनंदच झाला! भले सापाचं निमित्त का होईना!
नेहमीसारखंच मस्त लिहिलंयस. Lol

आता येत जा नियमितपणे. नो दांड्या मारणे प्लीज.

वेलकम बॅक!
मस्तच लिहिलं आहे. मजा आली.

छान लेख. तुम्हाला लिहितं करण्यासाठी अधून मधून असे पाहुणे तुमच्या घरी पाठवायला हवेत. Light 1
तुमच्या मांजरावर एखादा खुसखुशीत लेख येऊ द्या, बरेच दिवस झाले.

अरे वाह अनु ! काल परवाच तुझी आठवण काढली होती. अनू इज बॅक !!
खुसखुशीत लेख, पण पटकन संपला असं वाटलं.
आता संपला ना तुझा ब्रेक?

खुशखुशीत लेख न म्हणता फुस्सफुशीत म्हणेन Lol सॉरी फॉर पीजे

तुझी विनोदबुद्धी अशा प्रसंगात वाखाणण्यासारखी आहे Happy जादुगार तर आहेसच तू.. घुशीचा पोपट केलास Wink

अर्थशास्त्र Lol व्हॉट अ फनी नेम

विडीओ स्केअरी आहे. शेवटची जंप.. बापरे!

वेलकम बॅक. खुसखुशीत लेख.
तरी बरं सापाला कान नसतात. नाहीतर हे सगळं ऐकुन हसत तो इथे छान मनोरंजन होतेय मी आता इथेच रहातो म्हणुन ठाण मांडुन बसला असता.

बरं, त्या सर्पमित्राने काही पैसे घेतले साप का पकडण्याचे? एआय मुळे सेल्फ एम्प्लॉयमेंट गेले तर हा उद्योग करावा म्हणतो.

खतरनाक खतरनाक लिहिलं आहे! खूप मज्जा आली. वेलकम बॅक.

सापाला नैवेद्याचा स्वयंपाक आणि परवा एका नागाला cpr पण दिला मी या दोन वाक्यांना अक्षरशः हहगलो! Rofl

वेलकम ब्याक!! तुमच्या घरात सांप येत राहोत आणि तुमचे घुसघुशीत लेख वाचायला मिळोत , असे सांगू शकत नाही म्हणा!

उदंड प्रतिसाद, चौकशी बद्दल धन्यवाद मंडळी!! सर्व प्रतिसाद चवीने,आनंदाने वाचले, काही प्रश्नांची उत्तरं तितकी लिहिते-

माझेमन:
अगं साप खूप मोठा नव्हता.तो मतदानाचा हक्क असलेला पूर्ण वाढलेला ऍडल्ट असला तरी त्याची लांबी जेमतेम एक फूट होती.त्यामुळे पाण्याच्या त्या मीटिंग रूम मध्ये चौकोनी छोट्या बाटल्या असतात त्यातली एक त्यांनी आणली होती छिद्र पाडून, त्यात मावला.कवड्या दिसायला मण्यार सारखा असल्याने घाबरगुंडी उडाली होतीच.(मण्यार चे शरीर थोडे त्रिकोणी वर टोक असलेले, आणि पट्टे बॉडी च्या डोक्यापासून 2 इंच उशिरा चालू होतात आणि पट्टे एकदम ठळक असतात.)

स्वानंदी:
मार्कर सारखा दिसतो पण तो जुना बाद झालेला aa सेल आहे.

श्रद्धा:
हो, ती काजूकतलीच समोर होती.अजून बड्डे लोग म्हणजे केशर वाली होती.अगदी एकच छोटी वडी 4 तुकडे करून वापरली..दुसरा ऑप्शन खमंग भजी तळून त्याला वड्या चिकटवण्याचा, पण त्यासाठी भजी तळून शिल्लक राहायला हवीत ना Happy दुसऱ्या दिवशी पासून कापलेल्या टोमॅटो ला वड्या चिकटवण्यावर आलो.

अनया:
वाचनात गॅप नाहीच.लिखाणात आहे खरा, काही भिजत घोंगडी नोटपॅड वर अर्धी लिहून पडली आहेत, पूर्ण करतेच.

सुबोध:
हो सापाला कधीच हाताने पकडत नाही आम्ही.आमच्या सोसायटीत सर्पमित्र एकदम नियमित येत असतात.सोसायटीच्या ग्रुपवर सापांचे फोटो पण.एकदोन वेळा माकड पण येऊन गेले लोकांकडे.सर्पमित्र येईपर्यंत सेफ्टी आणि सापाला एका एरियात थांबवून आपण लांब राहणे इतके करतो.

रुन्मेष:
सध्या तरी लेखपुरती, पण मला परत बागडायला यायचं आहे.शिवाय तुम्हा लोकांना कठीण 'दृष्यावरून गाणे ओळखा'देऊन बरेच महिने लोटले.अब अवतार लेना पडेगा. तोवर गुण्यागोविंदाने नांदा. राजकारण काढून भांडत बसू नका Happy

अस्मिता:
वाक्यां चक्क खरी आहेत.

उबो:
धन्यवाद. एक मांजर इन प्रोसेस आहे

धनुडी,
येईन लवकरच ब्रेक वरून परत! तुही ये.तुझे येणे कमी झाले आहे असे वाचले.

अंजली:
हो त्या जम्प ला मागे आमची घाबरलेली वाक्य आहेत ती म्युट केलीयत.तो सर्पमित्र अगदी आरामात जवळून व्हिडिओ काढून त्याला बाटलीत भरून घेऊन गेला.

मानव:
एरवी घेत नाहीत सर्पमित्र, पण आम्हीच विचारले, ते अगदी 4 मिनिटात धावून आले मदतीला त्यामुळे.मग 500 द्या म्हणाले, आम्ही दिले.

हपा:
नागाला cpr 100% खरा आहे.आम्ही सगळे घाईत होतो. नाहीतर त्यांना 'कसा दिलात व्हिडिओ दाखवा'वगैरे केलेच असते.

राज ज्ञानी:
हो बैठे घर.आणि मागे शेत.काही वर्षांनी शेत विकून एखादी उंच स्कीम उभी राहील.

धन्वंती(आता टायपो नाही दुरुस्त करणार), किल्ली, अमित, सामो,प्रज्ञा,शर्मिला, भ्रमर,देवकी,ऋतुराज,अश्विनी धन्यवाद!! असाच लोभ राहू द्या.

मला नागाच्या CPR बद्दल जबरदस्त कुतूहल वाटून मी काही बाही कल्पना केल्या. सर्पमित्र नाग बेशुद्ध असताना पुंगी वाजवून नागिणीला बोलवत असतील फ्रेंच किस/ माऊथ टू माऊथ. कारण नागनागीण असेही विरहाच्या अग्नीत "कितने दिनोंके बाद है आयी सजना रात मिलन की" रूपातच डोळ्यासमोर येतात. त्यांची विरहापासून शापमुक्तता वर जितू-नागाचा जीव वाचवल्याचे पुण्य दोन्ही पक्षी एकाच पुंगीत! नंतर नागनागीण दोघांनाही लांब तळजाईला हनिमूनला सोडून येत असतील. एकदम सकारात्मक कल्पना! Proud

धमाल आणि खुसखुशीत लेख.

“मान ना मान, मैं तेरा मेहमान” अशा आगंतुक पाहुण्याने चांगलीच तारांबळ उडवली कि !

साप घुशी येती mi_anu च्या घरा
तोच माबोकरांचा ‘वाचन’ दिवाळी-दसरा

इच्छाधारी सर्पाने लेख लिहून आपल्या प्रजातीबाबत मानवाचे काय विचार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल ही सीपीआर प्रमाणे एक दुर्मिळ शक्यता मनात आली.

नागाला सीपीआर वाचून बरेच प्रश्न डोक्यात आलेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीपीआरने नाग रिव्हाईव्ह झाला आणि त्याला अचानक त्याची बॉडीली ऑटोनॉमी आठवली तर?

Pages