किस्से "किस्सा कुर्सी का" (१९७८) चित्रपटाचे

Submitted by राज अज्ञानी on 19 July, 2026 - 05:07

शाळेत असताना नुकतंच वर्तमानपत्र वाचायला सुरूवात केलेली तेव्हां आणिबाणी, इंदिरा गांधी, संजय गांधी, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण ही नावं हेडींगमधे वाचून माहिती व्हायला सुरूवात झाली होती. हेडींग शाळेत सांगावी लागत. वरच्या यत्तेत गेल्यावर टिव्ही आला. तेव्हां आंधी, किस्सा कुर्सी का ही नावं माहिती झाली. यावर सतत काही ना काही कॉण्ट्रोवर्सी चालू असे. कॉलेजला पोहोचल्यावर इलस्ट्रेटेड वीकली वगैरे मधून बंदीचे संदर्भ येत. तेव्हां अर्थातच ही जुनी गोष्ट झाली होती, पण पडसाद उमटत होते, ते आजतागायत चालू आहे. आता क्षीण झाले आहेत संदर्भ.

"आंधी" तर रिलीज झाला पण "किसा कुर्सी का" नाही असं वाचलं होतं. ही "कुर्सी.... 'काय भानगड आहे हे कधीच समजलं नाही. खूप वर्षांनी "आंधी" दूरदर्शवर पाहिला तेव्हां यात बंदी घालण्यासारखं काय आहे हा प्रश्न पडला होता. काळाच्या ओघात किस्सा चित्रपट विस्मरणात गेला.
आठवड्यापूर्वी एक डॉक्युमेण्टरी समोर आली. यात "किस्सा.." ची माहिती दिलेली होती. ती पाहिल्यानंतर चक्क हा चित्रपट युट्यूब फीड मधे अवरतरला.
554 .jpg

या डॉक्युमेण्टरीने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट स्क्रीनिंग कमिटीने मंजूर केला. पण सेन्सॉर बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष के एल खांडपूर (१९७५) यांनी माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाला या चित्रपटाबद्दल तक्रार केली. त्यांच्या सूचनेनुसार प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ होऊ लागली. दिग्दर्शक अमृत नाहटा यांनी विचारणा केल्यानंतर चित्रपटाबद्दल शंभरेक आक्षेप नोंदवले गेले.

नाहटा न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आणिबाणी लागू झाली. तीत सरकारवर टीका करता येणार नाही असा नियम लागू झाला. त्यानुसार किस्सा कुर्सी का च्या प्रदर्शनावर बंदी घातली गेली. पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाल्यावर मास्टर प्रिंट सहीत सर्व रीळं ताब्यात घेऊन गुडगावच्या मारूतीच्या कारखान्यात नेऊन जाळून टाकली गेली. हा चित्रपट पूर्णपणे नष्ट झाला. काही रीळांचे तुकडे तुकडे करून हायवेवर फेकण्यात आले. हा भारताच्या इतिहासातला सर्वात दुर्दैवी चित्रपट ठरला.

नंतर जनता सरकार आल्यावर या प्रकरणाची चौकशी झाली. त्या आधी न्यायालयाने अपमानाची नोटीस बजावल्यानंतर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं कि रीळं आमच्याकडून गहाळ झाली. त्यामुळे न्यायालयाला पुढे सुनावणी करणे अशक्य झाले. पण पुढे जनता सरकार आल्यानंतर संजय गांधी यांना दोन वर्षांची कारावासाची सजा सुनावण्यात आली जी प्रत्यक्षाfunction at() { [native code] }अ अंमलात आली नाही.

राजवट बदलल्यानंतर अमृत नाहटा यांनी या सिनेमाचं पुन्हा शूटींग केलं. बरेचसे कलाकार पुन्हा तयार झाले. काहींच्या तारखा मिळाल्या नाहीत. शबाना आजमी, उत्पल दत्त, राजकिरण हे मुख्य कलाकार पुन्हा परतले. नंतरही अनेक कट सुचवले गेले. त्यानंतर हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

इथपर्यंतची कहाणीच एखाद्या चित्रपटाची कथा होऊ शकते. पण पुढेही अशा पॉलिटिकल सटायर मधे ट्रॅजिक एंड असतो. तसंच झालं. वितरक आणि थिएटरमालकांनी भीतीपोटी या सिनेमाला थंड प्रतिसाद दिला. कुठे कुठे तुरळक ठिकाणी सिनेमा प्रदर्शित झाला. जे व्हायचं तेच झालं. सिनेमा लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. तो डिझास्टर झाला.

अर्थात सिनेमा मोठ्या प्रमाणावर झळकला असता तरी त्या काळी लोकांना आवडला असता का हा प्रश्नच आहे. कारण सिनेमाची हाताळणी त्या वेळी पूर्णपणे वेगळी होती. पुढे जाऊन जाने भी दो यारोने पॉलिटिकल सटायर यशस्वी होऊ शकतं हे दाखवलं. पण किस्सा कुर्सी का चं टायमिंगच दुर्दैवी होतं. त्याची शैली अनोळखी होती. ट्रीटमेण्ट पथनाट्यासारखी होती. यात सिंबलिक प्रेझेंटेशन होतंं.

प्लॉट :
शबाना आझमी जनता दाखवली आहे. ती मुकी आहे.
एक अनपढ मनुष्य प्रोफेसर गंगाराम (मनोहर सिंग) म्हणून प्रोजेक्ट केला जातो. त्याला प्रोजेक्ट करणारी मीरा देवी ही महत्वाकांक्षी स्त्री (सुरेखा सिक्री = बालिका वधू मालिकेतली दादीसां) आहे. राजकिरण हा प्रशासनातला आदर्शवादी बडा बाबू आहे.

गंगारामच्या पार्टीचं चिन्ह मोटार आहे. संजय गांधींच्या मारूती मोटरच्या प्रयत्नांवरचं ते भाष्य आहे. उत्पल दत्त हे वादग्रस्त तांंत्रिक चंद्रास्वामी / धीरेंद्र ब्रम्हचारी आहेत. आणखी एक बाबू बहिरा दाखवला आहे. त्याकडे मुकी जनता दाद मागायला जाते.

गंगारामला सल्ले देणारा स्टेनो , देशपाल (चमन बग्गा) हे पात्र आर के धवन वर आधारीत असावे. आर के धवन हे सुद्धा क्लार्क होते. पुढे चापलुसीमुळे मंत्री झाले. हे ज्यांना आठवत असेल त्यांना जास्तीचं मनोरंजनमूल्य सापडेल. बाकिच्यांना सुद्धा एका वेगळ्या शैलीचा सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळेल.

काही काही प्रसंग मजेशीर आहेत. उदा.

गंगाराम जन गण मन देशाचा प्रेसिडेंट म्हणून निवडून येतो. त्याला सर्वात मोठी खुर्ची मिळते. तो खुर्चीवर बसताच खुर्ची त्याला धक्का देऊन खाली पाडते आणि त्याच्यावर हसते. ती सांगते कि मला प्रणाम केल्याशिवाय तुला माझ्यावर बसता येणार नाही. मग ती त्याला अष्टोपदेश करते. जी आश्वासने दिली ती विसरून जा, ज्या मित्रांनी निवडून दिले त्यांना दूर लोट, ज्यांनी मदत केली त्यांचे नाव घेऊ नकोस इत्यादी.

दुसर्‍या दिवशी मीरा देवी गंगारामला भेटायला येते तेव्हां गंगाराम तिला विचारतो कि देशाची सर्वात मोठी समस्या काय आहे? ती विचारते काय?
गंगाराम सांगतो रोटी. पोटाची भूक.
मीरा देवी विचारात पडून सांगते कि तू म्हणतोस ते खरे आहे. कारण पुस्तकात मी असेच वाचले आहे.
आता गंगाराम बुचकळ्यात पडून विचारतो "पुस्तकात? कुठल्या?"
मीरा देवी सांगते, "Poiltical economy of Sociocultural Dynamics of Growth in National Policies of Developing and Underdeveloping Nations of Asia, Africa and Latin America"
सोशल मीडीयात पण हल्ली कागदावर काळी म्हैस दाखवली नाही तर एखाद्याचं अस्तित्व सुद्धा नाकारण्यात येतं.
काही वेळा जाने भी दो यारो ची आठवण येते. तर काही वेळा मै आझाद हूं ची.

पुढे गंगारामला एक उंदीर त्याच्या प्लेटमधलं अन्न खाताना दिसतो. तेव्हां तो युरेका युरेका सारखं ओरडत उघडाबंब धावत मध्यरात्री संसदेचं अधिवेशन बोलावतो. तेव्हां सर्व सांसद झोपेतून असेल तसे येतात. बनियन चड्डी, लुंगी या अवतारात. गंगाराम त्यांना देशाची समस्या भूक आहे आणि त्याचं कारण उंदीर असल्याचं सांगतो. घोषणा देतो "उंदीर पकडा, उंदीर मारा"

मग देशपाल त्याच्याकडे एका विदेशी व्यापार्याला घेऊन येतो. त्याचं नाव डबल टेंडर. तो उंदीर मारण्यासाठी देशाला दहा लाख मांजरं सप्लाय करण्याचं आश्वासन देतो. त्यासाठी त्याला दहा कोटी रूपये द्यायचे. त्या बदल्यात त्याला दहा लाख कुत्री सप्लाय करायची. त्याचे तो वीस कोटी देणार. देशपाल सांगतो कि आपण मांजरं घ्यायची नाहीत आणि कुत्री द्यायची नाहीत. कागदावर सह्या करायच्या. आपल्या दहा कोटींचा नफा. त्यातले चार कोटी डबल टेंडरला. तीन कोटी गंगारामला आणि दोन कोटी देशपालला. एक कोटी देशाच्या तिजोरीत.

अशा रितीने देशाच्या तिजोरीत भर घालणारा हा देशहिताचा प्रोजेक्ट पार पडतो .पण मीरा देवी मांजरं कुठे आहेत असा सवाल विचारते. तेव्हां तिला एक अभ्यास दाखवला जातो. जेव्हां सीमेवर कुत्री जाऊन मांजरं येत होती तेव्हां भयंकर युद्ध होऊन कुत्र्यांनी मांजरं खाऊन टाकली.

मीरा देवी पण उंदीर मारायच्या समस्येवर एक विदेशी कन्सल्टंट घेऊन येतात. तो फीस घेऊन सल्ला देतो कि जनतेला एक उंदीर मारला कि दहा रूपये द्या म्हणजे उंदरांचा नायनाट होईल. यात अनेक बदमाश लोक सरकारी बाबूंना एका उंदरामागे एक रूपया देऊन सर्टिफिकेट आणि कॅशियरला एक रूपया या दराने कुणी शंभर उंदीर मारले कुणी हजार असे दाखवून पैसे छापतात.

मुकी जनता मेलेले उंदीर घेऊन येते तेव्हां तिला अनेक पुरावे मागितले जातात. शेवटी तिला फ्रॉड ठरवूनन जेलमधे टाकले जाते.
Picture1_0.png
दुसरीकडे उत्पल दत्त (चंद्रास्वामी) हे उंदीर हे देवाचे वाहन आहे आणि सरकर धार्मिक भावना दुखावतेय म्हणून उपोषणाला बसतात. तेव्हां गंगाराम त्यांना सोन्याचा उंदीर भेट देतो आणि व्हिस्कीपान करून उपोषण सोडायला लावतो. हा अशक्य प्रकार आहे.

हे राजकीय प्रहसन धमाल आहे. जाने भी दो यारो प्रमाणेच कल्ट सिनेमा आहे. कदाचित हिंदीत राजकीय विषयावरचा हा पहिला सिनेमा असावा. आंधी राजकीय पार्श्वभूमीवरची प्रेमकथा आहे. ते प्रहसन नाही. न्यू दिल्ली टाईम्स, मै आझाद हूं, सिंहासन आणि असे काही मोजके सिनेमे पॉलिटिक्स, पॉलिटिकल क्राईमवर भाष्य करतात.

आजही परिस्थिती अजिबात बदललेली नाही.
मूळ समस्या आहे तिच्यावर भलतीच उपाययोजना सांगून त्यातून कारभार कसा भरकटत जातो यावर हे मार्मिक भाष्य आहे. उलट आज तर मूळ समस्याच गायब झाली असल्याने सिनेमाचा पार्ट टू यायला हवा. आता येणारे सिनेमे हे कुठल्यातरी राजकीय प्रपोगंडाला सपोर्ट करणारे असतात. म्हणजे एका राजकीय पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या विरोधात बनवलेले असतात. ते स्वतंत्र नसल्याने पहावेसे वाटत नाहीत. अशा चित्रपटाची आजच्या काळात कधी नव्हे ती गरज आहे.

पण कोण बनवेल असा सिनेमा?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७५ ची आणिबाणी उठल्यानंतर जनता पक्षाचे सरकार आले तेंव्हा अशोक जैन आणी अरुण साधू ह्या पत्रकारद्वयींनी सत्तांध म्हणून एक पुस्तक लिहिले. आणिबाणीपुर्वी आणि आणिबाणीत गांधी परिवार, मुख्यत्वे संजय गांधी आणि त्याची धवन, यशपाल शर्मा, कमलनाथ, विद्याचरण शुक्ला आदी चौकडींनी काय काय उपद्व्याप केले त्याचे साग्रसंगीत वर्णन आहे. संजय, मारुती उद्योग, दिल्ली मास्टरप्लान, धीरेन्द्र ब्रह्मचारी, नगरवाला प्रकरण अशा बऱ्याच गोष्टींना रंगवून रंगवून सांगितले आहे. कदाचित जनता पक्षानेच हे पुस्तक लिहवून घेतेले की काय इतपत शंका येते. नंतरचा ह्या पत्रकारद्वयींचा मार्ग पाहता हीही खरी वाटू लागते. नंतर हे पुस्तक इंदिराजींच्या पुनरागमनानंतर औट ऑफ प्रिंट झाले की बैन झाले मला माहित नाही. एका अत्यंत लहान गावाच्या सार्वजनिक वाचनालयात मला ते वाचायला मिळाले होते. त्यावेळे त्याची किंमत कळाली नाही पण सध्या त्याचे पुनर्मुद्रण केल्यास प्रचंड खपेल हे निर्विवाद. सद्य सरकारच सगळ्या प्रति आनंदाने घेईल. असो.

त्या पुस्तकात किस्सा कुर्सीका हे स्वतंत्र प्रकरणच रंगवले आहे. गुडगावच्या मारुती कारखान्यात कशा रिळा लपवल्या, नष्ट करण्यासाठी नेल्या हेही तपशील त्यात आहेत

कायच्या काय अफलातून प्रकार दिसतोय. धन्यवाद या माहितीबद्दल Happy या पिक्चरचे नाव ऐकले होते पण बाकी काहीच माहिती नव्हती.

अभ्या,
सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सत्तांध आचार्य अत्रे हॉल मधे दिसले होते, पण घ्यायचं राहिलं. आता घेईन. अरूण साधूंच्याच कादंबरीवर सिंहासन आला होता. ते स्टार पत्रकार आणि लेखक होते. समाजवाद्यांकडे कल, झुकाव असेल पण ते निव्वळ कॉंग्रेस विरोधक नव्हते.

त्या काळात सत्तेत कॉंग्रेस असल्याने पत्रकार आपोआप विरोधी पक्षात असत. त्यांचे सुद्धा गुणदोष असणार. पण आजच्या इतके भ्रष्ट पत्रकार तेव्हा (अपवाद वगळता) नसावेत असं मला वाटतं.

आणीबाणीचे संदर्भ सिनेमात आले आहेत. तो नंतरच्या आवृत्तीतला बदल वाटतो हे खरे आहे.

अस्मिता. फारएण्ड युट्यूबवर बघू शकाल.