प्रदोष (१/४)

Submitted by आर्त on 16 July, 2026 - 11:21

२५ सप्टेंबरची संध्याकाळ होती. मी आखेनच्या एका छोट्या ट्रेन स्टेशनवर उतरलो. आयुष्याच्या तेवीस वर्षात मी पुणे, बेळगाव आणि गोवा सोडून इतर कुठे क्वचितच गेलो होतो - आणि एकटा तर अजिबातच नाही. असं असताना मी उच्चशिक्षणासाठी जर्मनीला यायचं ठरवलं. इथे कुणाला ओळखत नव्हतो, घरापासून कधी दूर गेलो नव्हतो, अगदी विमान प्रवासही कधी केला नव्हता. असं असताना माझ्या दोन बॅग घेऊन मी जेव्हा स्टेशनवर उतरलो, तेव्हा मनात मोठा प्रश्न आला - जी व्यक्ती मला घ्यायला येणार होती, ती आलीच नाही तर? जर्मनीला यायच्या आधी जर्मनीतील एकाशी ईमेल व्यवहार झालेला. हा त्याचा मित्र होता. त्याला मी ना ओळखत होतो, ना त्याचा फोन क्रमांक माझ्याकडे होता. इंटरनेट आणि आंतरराष्ट्रीय सिम-कार्ड हेही नव्हते. का नव्हते? बारा वर्षांपूर्वी याची सुविधा उपलब्ध नव्हती, असं नाही. “पण हा अधिक खर्च कशाला? जर्मनीला जाऊन घेईनच”, असा माझा विचार होता. यात कंजूसपणापेक्षा सगळं काही सुरळीत होईल, असा आंधळा आणि अल्लड विश्वास होता.

अशा विचारांमध्ये व्यस्त असताना, माझं लक्ष आकाशाकडे गेलं. आकाशी निळ्या-गुलाबी रंगांचा अप्रतिम विस्फोट झालेला. स्वच्छ आकाशात काही विमानं दूरवर उडताना दिसली. त्यांच्या मागून त्यांनी सोडलेली वाफेची शेपटी, तांबडी चमकत होती. एका सुंदर चित्रावर कुणीतरी ओरबडून वण सोडावे, तसे ते दिसत होते. पण या वणांनी मात्र त्या चित्राचं सौंदर्य वाढलं होतं. त्या दृश्याला एक चमत्कारिक रूप लाभलं होतं. मी घड्याळाकडे पाहिलं. पुण्यात जास्तीत जास्त सात-सव्वासात पर्यंत अंधार झालेला मी पाहत आलेलो. इथे रात्रीचे आठ वाजून गेलेले. अजूनही इतका प्रकाश? मी चकित झालो. ते अद्भुत आकाश बघून मनातल्या व्याकुळतेला थोडा उतार मिळाला. उत्सुकतेने आणि कुतूहलाने तिची जागा घेतली. मी प्लॅटफॉर्मच्या प्रवेशदाराकडे एकटक बघत, शांत बसलो. आयुष्यातील नवीन पर्वाला अशी रोमांचक आणि अविस्मरणीय सुरुवात झाली.

पण प्रदोष कितीही सुंदर असला तरी त्यानंतर येते ती काळी रात्र.

सुरुवातीचे काही महिने त्या नवीन आयुष्याशी परिचित होण्यात गेले. काही बनून दाखवण्याची जिद्द होती. घेतलेल्या आर्थिक कर्जाची काळजी नसली तरी जबाबदारी वाटत होती. जर्मनी सोडून एका वर्षाने बेल्जियमला राहायला गेलो. तिथून नोकरीसाठी पुन्हा दक्षिण जर्मनीत, स्टुटगार्ट इथे आलो. शिक्षण बघता बघता आवरलं, नवीन नोकरी लागल्याचा आनंद होता आणि नव्या शहरात नवीन सुरुवात करायचा जोश होता. जशी वर्षे सरली, तसे नव्याचे नऊ दिवसही सरले. आपल्या कुटुंबाकडून, घराकडून आणि संस्कृतीकडून दूर असल्याची जाणीव खूप होऊ लागली. सारे बालपणीचे, कॉलेजचे मित्र जगभर पसरलेले. गर्लफ्रेंडबरोबर नातं तुटलेलं. जवळचं असं कोणीच जवळ नव्हतं. मनमोकळेपणाने बोलण्याची मला सवय नसली तरी गरज वाटू लागली.

इथे थंडीचे दिवस सुरू झाले, की सकाळी नऊ वाजता थोडं उजाडतं आणि चार पर्यंत पुन्हा अंधार पसरतो. साधारण चार महिने क्वचितच सूर्य दिसतो, कारण सदैव मळभ दाटलेलं असतं. अशात थंडीही भरपूर. यामुळे लोकांशी संपर्क येणं आणि बाहेर जाणं कमीच होतं. इतक्या अंधाराची सवय नव्हती. सतत असलेल्या अंधारामुळे, एकटेपणा खूप जाणवू लागला.

असे एक एक वर्ष सरता सरता, माझ्या देहाने सूर्यभोवती अठ्ठावीस प्रदक्षिणा पूर्ण केल्या. जन्मापासून इथपर्यंत माझ्या आयुष्याला तीच रूपरेषा होती जी साधारण प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आयुष्याला असते. शाळा, दहावी, बारावी, शिक्षण, उच्चशिक्षण आणि नोकरी. “पुढे काय?”, हा प्रश्न बरेचदा आला तरी त्याचं उत्तर त्या सामाजिक साच्याने लिहून ठेवलेलं होतं. या क्रमात पुढील टप्पे म्हणजे लग्न, मुलं, त्यांची शाळा, त्यांची दहावी इत्यादी इत्यादी. त्यात भर पाडण्यासाठी अजून एक घटक म्हणजे - “वय निघून चाललंय”. या पुढील टप्प्यांचा मला प्रचंड मनस्ताप झाला. हा साचा कितीही सुंदर असला तरी माझ्या मनाला त्याचा आकार घेता येईना. एकीकडे मला या गोष्टी पटत नव्हत्या पण दुसरीकडे त्यांची धास्तीही असायची. तरीही भीती वाटते हे दाखवून चालणार नव्हतं कारण जिथे भीती दिसते तिथे शोषण आणि दबाव वाढतो. म्हणून मनातून मी कितीही खचून गेलो तरी चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास कायम ठेवायचे अवघड नाटक मी शिकलो. या लग्नाच्या प्रश्नाने जणू किती लोकांचा घात केलाय, देव जाणे.

मला मुळात ठरवलेल्या (अरेंज्ड) लग्नांमध्ये विश्वास नाही. लग्न का करावं, हाही मोठा प्रश्नच आहे. याचा अर्थ असा नाही की त्यास माझा विरोध आहे. ज्यांना पटेल आणि आवडेल त्यांनी नक्की करावं. पण मी ठरवलेलं की लग्न करायचं तर कमीतकमी प्रेमासाठी. कुणा अनोळखी व्यक्तीला दोन-चार वेळा भेटून लग्न करायचं आणि पुढील संपूर्ण आयुष्य घालवायचं, हा विचार मला आजही भीतीदायक वाटतो. वयाच्या अठ्ठाविशीनंतरचे दोन-तीन वर्ष अशामुळे प्रचंड अवघड गेले. भेटलेली प्रत्येक व्यक्ती हेच विचारायची, “लग्न कधी करणार रे?” किंवा “तोंड गोड कधी करणार आमचं?”. मला या आणि अशा प्रश्नांचा प्रचंड वैताग आलेला. कित्येकदा वाटलं की आपण अस्तित्वातच नसावं. डोळे बंद करावे आणि गायब! कुणाच्या स्मरणातही नसावं आणि विस्मरणात. मरण म्हटलं की कुणाला तरी दुःख होईल, याचं वाईट वाटतं. पण कधी अस्तित्वातच नसलो असतो, तर ना कुणाला मी असल्याचा आनंद आणि ना नसल्याचे दुःख.

-----------------------------
टीप: हा मी लिहिलेला पहिलाच लेख आहे. एकूण चार लेखांची ही मालिका असणार आहे. हे लेख पूर्णतः माझ्या अनुभवांवर आधारित असून काल्पनिक नाहीत. तुमचे विचार, मत आणि सुधारणा जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद.

(२/४) प्रवास https://www.maayboli.com/node/88596

Group content visibility: 
Use group defaults

जर्मनीतील वास्तव्याबद्दल जरुर लिहा. खूप कुतूहल आहे. सुरुवात जबरदस्त आहे.
>>>>>> त्याला मी ना ओळखत होतो, ना त्याचा फोन क्रमांक माझ्याकडे होता.
बाप रे!! फार धाडसी आहे हे.

बाप रे!! फार धाडसी आहे हे. >> माझ्या वेळेला आलेल्या बर्‍याच जणांचा हा अनुभव होता. ओळख असलेले फारसे नसायचे, जुजबी ओळख असलेले चुकार. अमक्याच्या ओळखीचा तमका , ह्याच्या शेजारच्याचा मामेभाऊ, कॉलेजमधला सिनियर अशा शिदोर्‍यांवर प्रवास सुरू होत असे नि सुरळित पार पडत असे. एकदा आपले झाले, कि "पे इट फॉरवर्ड" ह्या तत्वावर हि आगगाडी चालत असे. " सगळं काही सुरळीत होईल, असा आंधळा आणि अल्लड विश्वास होता." हे जे काही लिहिलय ते एकदम परफेक्ट लिहिलय. आता मागे वळून बघताना पोटात खड्डा पडतो. Happy

सुरूवात मस्त झालीये. एकदम को-रिलेट करता येईल अशी आहे. चार भागांपेक्षा अधिक लिहिले तरी हरकत नसावी. Happy

आसाम्या अगदी खरय रे. तुला आठवते का २००० च्या सुरवातीला आपली माबो पण अशीच होती. सगळेच अनोळखी तरीही ओळखीचे. डोळे झाकुन विश्वास ठेवुन गप्पा व्हायच्या. परक्या देशात सगळेच माबोकर घरचे वाटायचे.

सर्वांचे खूप आभार. @सामो धाडसी म्हणता येईल. पण @असामी आणि @रिमझिम यांनी लिहिल्या प्रमाणे, तेव्हा असं चालून जायचं. सगळं इतक्या कमी तयारीने यायचे असं नाही. पण माझ्या सारखे अल्लड शहाणे होतेच हाहा. खरं अश्या वृत्तीचा मला जीवनात आणि प्रवासात खूप फायदा झाला आणि होतो. माणसांवर विश्वास ठेवायची क्षमता वाढली माझी. आणि अजूनही फिरताना मी इंटरनेट किंवा फोनचा वापर कमीच करतो. त्यामुळे मी बरेचदा अडचणीत आलो, पण त्यातून सुटकाही झाली.

छान सुरवात.

आम्ही पुण्यात येताना अशाच अतिशय तुटपुंज्या माहितीवर आलो होतो. अमुक ठिकाणी कॉट बेसिस वर राहायची सोय आहे. इतकीच माहिती. ना कोणाची कोणी नातेवाईक पुण्यात ना कोणाचे मित्र. 2001 ची गोष्ट.
अर्थात माझ्या सोबतीला 3 क्लासमेट असल्याने एकटेपणा नव्हता आणि भारतातच असल्याने भिती नव्हतीच.

छान लिहिले आहे.
Happy
लग्नाबद्दल मुलांना धास्ती का वाटत असावी हे कुतूहल आहे.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

छान सुरुवात!
जुन्या काळात सगळे असेच भाबडा विश्वास ठेवून परदेशात यायचे आणि सगळे सुरळीत होत असे. मित्राच्या मित्राच्या भावाचा कॉलेजमधला रुममेट अशा दुरच्या ओळखीवर कुणीतरी चक्क ४ तास ड्राईव करुन एअरपोर्ट न्यायला येणार, अजून कुणाकडे तरी दोन दिवस रहायची सोय वगैरे. प्रवासात जुने, जाणते देशी सहप्रवासी असल्यास ते देखील नवखेपण बघून चौकशी करत, शक्यतो होस्टच्या ताब्यात देवून, वर स्वतःचा लँडलाईन फोन नं. देवून मार्गस्थ होत.

सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. जरी या कथेची पार्श्वभूमी जर्मनी असली, तरी त्यातील अनुभव जागतिक आहे हे मला जाणवून आलं. तुम्ही स्वतःचे अनुभव इथे शेर केले, त्याबद्दल धन्यवाद.
1982 मधे माझे वडील जेव्हा पुण्यात आले, तेव्हा त्यांचा अनुभव असाच काही होता. हो, त्यांना भाषा येत होती. पण तेव्हा सुविधा अजून कमी होत्या आणि ठिकाणांमध्ये अंतर जास्त होतं. म्हणून त्यांनाही अडचणी आल्याच होत्या, आणि लोकांवर विश्वास ठेऊनच काम चालायचं.
@स्वानंदी लग्नाबद्दल धास्ती नाही. चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न लावलं जाईल, याची धास्ती होती मला.

मी पुढील भाग प्रकाशित केला आहे. दुवा वरील मुख्य मजकुरात दिला आहे. सगळ्यांचे पुन्हा खूप आभार.