ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २८

Submitted by नितनवे on 4 July, 2026 - 11:39

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २७
पूर्वभाग
आरव देशमुख आणि त्याची टीम “Vienna. 72 Hours.” हा संदेश एक पडताळणी चाचणी असल्याचे शोधून काढते. “व्हिएन्ना प्रोटोकॉल” त्यांची उद्दिष्टे तपासतो आणि अखेरीस दुसऱ्या अधिकृत धारकाची मंजुरी मिळते.
आरव एकटाच व्हिएन्नामध्ये एका रहस्यमय स्त्रीला भेटतो. ती त्याला दुष्यंतची जुनी नोट आणि एक फोटो देते, ज्यातून Black Ember ची सुरुवात गुन्हेगारांनी नव्हे तर जग सुधारण्याची इच्छा असलेल्या आदर्शवादी लोकांनी केली होती, हे उघड होते.
दुष्यंतच्या नोंदीतून धक्कादायक सत्य समोर येते की Adrian Keller हा सुरुवातीला त्यांच्याच गटाचा भाग होता. संरक्षणाच्या नावाने सुरू झालेली चळवळ हळूहळू प्रभाव, नियंत्रण आणि भीतीच्या साम्राज्यात बदलली.
यानंतर उघड होते की “फॅमिली कम्पार्टमेंट” हे कोणतेही दस्तऐवज लपवण्यासाठी नव्हते, तर एका जिवंत व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेले गुप्त जाळे होते.
भागाच्या शेवटी ती स्त्री स्वतःची ओळख एलेना वोल्कोव्ह म्हणून देते आणि सांगते की तिने गेली २५ वर्षे हे रहस्य जपले आहे. आता फॅमिली कम्पार्टमेंट उघडण्याआधी आरवला दुष्यंतबद्दलचे आणखी एक जीवन बदलणारे सत्य समजणे आवश्यक आहे.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २८ – Subject A

व्हिएन्ना.
पाऊस अजूनही पडत होता. जुन्या पुस्तकांच्या दुकानात मात्र पूर्ण शांतता होती. एलेनाचे शेवटचे शब्द अजूनही हवेत तरंगत होते, "पुढचं सत्य तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकेल."

आरव तिच्याकडे पाहत राहिला. "बाबांबद्दल अजून काय माहीत असायला हवं?"

एलेनाने काही क्षण उत्तर दिलं नाही. मग तिने तिच्या पिशवीतून एक जुनी फाईल बाहेर काढली. साधी कागदी फाईल; जुनाट, कडा झिजलेल्या. जणू ती अनेक वर्षं कुणीतरी खूप जपून ठेवली होती.

एलेनाने ती आरवसमोर ठेवली. "हे दुष्यंतने मला दिलं होतं."

"कधी?"

"पंचवीस वर्षांपूर्वी."'

आरवचा श्वास मंदावला. "फॅमिली कंपार्टमेंट सील करण्याच्या आधी?"

एलेनाने शांतपणे मान डोलावली. "हो."

आरवने फाईल उघडली. आत फारशी कागदपत्रं नव्हती. फक्त काही फोटोग्राफ्स, काही हाताने लिहिलेल्या नोट्स आणि एक छोटासा सीलबंद लिफाफा. त्याने पहिला फोटोग्राफ उचलला. एका रुग्णालयाचा फोटो. दुसरा एका नवजात बाळाचा. तिसरा त्याच बाळाला हातात धरून उभा असलेला एक पुरुष. आरव काही क्षण स्तब्ध झाला. कारण तो पुरुष दुष्यंत होता. तरुण, हसतमुख आणि पूर्णपणे वेगळा; जसा आरवने त्याला कधीच पाहिलं नव्हतं.

"हे कोण आहे?"

एलेना बराच वेळ उत्तर देत नव्हती. मग म्हणाली, "तोच प्रश्न दुष्यंतनेही विचारला होता."

आरव गोंधळला. "म्हणजे?"

"त्या मुलाबद्दल," एलेनाचा आवाज आता कुजबुजण्याइतका मंद झाला होता.

दुकानात पुन्हा शांतता पसरली. आरवने पुढचा फोटोग्राफ उचलला. या वेळी फोटोमध्ये दुष्यंत नव्हता, फक्त एक स्त्री होती. तिच्या हातात तेच मूल होतं. फोटो थोडासा धूसर होता, पण चेहरा स्पष्ट दिसत होता. आरवचा हात क्षणभर थरथरला. कारण ती स्त्री... एलेना होती. त्याने पटकन वर पाहिलं. एलेना त्याच्याकडेच पाहत होती. कोणतीही प्रतिक्रिया न देता, कोणताही बचाव न करता. जणू हा क्षण येणार, हे तिला आधीपासून माहीत होतं. आरव पुन्हा फोटोकडे पाहू लागला, मग एलेनांकडे, मग पुन्हा फोटोकडे. त्याच्या मनातले तुकडे आता एकमेकांना जोडले जाऊ लागले होते. Family Compartment. Subject Unaware. Protection Protocol. Guardian. Elena. Dushyant.

अचानक त्याला जाणवलं, हे एखाद्या गुप्त एजंटचं किंवा साक्षीदाराचं संरक्षण नव्हतं. हे खूप वैयक्तिक होतं. खूपच.

"एलेना..." त्याचा आवाज अडकला. "तो मुलगा कोण होता?"

बराच वेळ कोणीही बोललं नाही. बाहेर पावसाचा आवाज वाढत होता. शेवटी एलेनाने उत्तर दिलं.

"तोच प्रश्न फॅमिली कंपार्टमेंटच्या केंद्रस्थानी आहे," ती हळू आवाजात म्हणाली. "आणि म्हणूनच दुष्यंतने त्याचं नाव कुठेही लिहिलं नाही."

आरव काही बोलणार इतक्यात एलेनाने टेबलावरचा तो सीलबंद लिफाफा त्याच्याकडे सरकवला. "हे उघड."

"आताच?"

"हो."

आरवने तो लिफाफा हातात घेतला. त्यावर दुष्यंतच्या हस्ताक्षरात एकच ओळ लिहिलेली होती: FOR THE SUBJECT ONLY
आरवचा श्वास अडकला. कारण त्याला आता भीती वाटू लागली होती की त्या लिफाफ्यात नक्की काय असेल. आणि एलेनाच्या डोळ्यांत पहिल्यांदाच त्याने अश्रूंची हलकी चमक पाहिली.

दुकानात पूर्ण शांतता होती. आरवच्या हातात ते सीलबंद पाकीट होतं. FOR THE SUBJECT ONLY
तो बराच वेळ त्या शब्दांकडे पाहत राहिला. मग त्याने हळूहळू सील उघडलं. आत एकच पत्र होतं. दुष्यंतच्या हस्ताक्षरात. आरवने वाचायला सुरुवात केली.

“जर तू हे पत्र वाचत असशील, तर याचा अर्थ एलेनाने योग्य निर्णय घेतला आहे.”
आरवचा श्वास मंदावला.
“याचा अर्थ व्हिएन्ना प्रोटोकॉल पूर्ण झाला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं... तू अजूनही जिवंत आहेस.”
आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या.
पुढची ओळ वाचताना त्याच्या हातात हलकी कंपनं आली.
“फॅमिली कंपार्टमेंट माहिती लपवण्यासाठी नाही तर एका व्यक्तीची ओळख लपवण्यासाठी तयार केला होता.”
“अनेक लोकांना वाटेल की मी 'ब्लॅक एम्बर'पासून एखादं गुपित वाचवत होतो. ते चुकीचे असतील कारण मी एका मुलाला वाचवत होतो.”
आरव काही क्षण स्तब्ध बसला.
“त्या मुलाला त्याच्या अस्तित्वाबद्दल काहीच माहिती नसावी, अशीच आमची इच्छा होती. कारण जर एड्रियन केलरपर्यंत ती माहिती पोहोचली असती, तर त्या मुलाच्या जीवाला धोका होता.”
आरवची नजर धूसर होऊ लागली. त्याने पुढची ओळ वाचली.
“म्हणूनच आम्ही त्याचं नाव आर्काइव्हमध्ये कधीच नोंदवलं नाही. म्हणूनच सब्जेक्ट अनअवेअर. म्हणूनच गार्डियन. म्हणूनच फॅमिली कंपार्टमेंट.”
त्याच्या हातातील पत्र आता थरथरत होतं.

एलेना काही बोलत नव्हती. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती; अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर.

“जर तू इथपर्यंत पोहोचला असशील, तर तुला आता एक सत्य कळायला हवं. त्या मुलाचं नाव आरव आहे.”

वेळ जणू थांबला. दुकान, पाऊस, व्हिएन्ना सगळं एका क्षणासाठी दूर गेलं. फक्त ती एक ओळ उरली.

“त्या मुलाचं नाव आरव आहे.”

आरवने डोळे मिटले. त्याच्या आयुष्यातले असंख्य प्रसंग डोळ्यांसमोर चमकून गेले. का कुणी त्याच्यावर लक्ष ठेवत होतं? का काही लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते?

सगळे तुकडे आता एकमेकांना जोडले जाऊ लागले. थरथरत्या हातांनी त्याने पुढची ओळ वाचली. “आणि एलेना व्होल्कोव्ह...”

तो पुढे वाचूच शकत नव्हता. त्याने मान वर करून पाहिलं. एलेनाच्या डोळ्यांत आता अश्रू स्पष्ट दिसत होते; अनेक वर्षं दाबून ठेवलेले अश्रू.

आरवने पुन्हा पत्राकडे पाहिलं. “एलेना व्होल्कोव्ह ही केवळ त्याच्या संरक्षणासाठी निवडलेली व्यक्ती नाही. ती त्याची आई आहे.”

आरवच्या हातातून पत्र जवळजवळ निसटलं. त्याने ती ओळ पुन्हा वाचली, मग पुन्हा आणि पुन्हा. जणू शब्द बदलतील अशी त्याची अपेक्षा होती, पण तेच शब्द तिथे होते. ती त्याची आई आहे.

दुकानात पूर्ण शांतता होती. बाहेर पाऊस पडत होता, पण आरवला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर अचानक अनेक वर्षांचे क्षण चमकून गेले. शाळेचा पहिला दिवस, पालक सभांमध्ये नेहमी रिकामी राहणारी खुर्ची, इतर मुलं आईचा हात धरून घरी जात असताना स्वतः मात्र एकटं उभं राहणं. वाढदिवस, सण, यश, अपयश आणि प्रत्येक वेळी मनात पडणारा तोच एक प्रश्न "माझी आई कुठे आहे?" ज्याचं उत्तर त्याला आजवर कधीच मिळालं नव्हतं.

आरवने हळूहळू वर पाहिलं. एलेना समोर बसली होती. तीच स्त्री, जिचा तो इतका काळ पाठलाग करत होता. जिच्यावर कधी त्याने विश्वास ठेवला, कधी संशय घेतला, तर कधी राग केला. आणि आता, त्याला तिच्याकडे सरळ पाहताही येत नव्हतं.

"का?" त्याच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला.

एलेनाने डोळे मिटले. तो प्रश्न ती पंचवीस वर्षांपासून स्वतःला विचारत होती.

ती कुजबुजली, "मला भीती वाटत होती."

आरव स्तब्ध झाला. "भीती?"

पहिल्यांदाच एलेनाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. "हो. प्रत्येक दिवस, प्रत्येक वाढदिवस, प्रत्येक वर्ष. मी दूर राहिले ते मला तसं सांगितलं गेलं होतं म्हणून नाही; मी तुझ्याजवळ आले असते, तर केलरने तुला शोधून काढलं असतं. मी तो धोका पत्करू शकत नव्हते."

तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. आरव काहीच बोलू शकत नव्हता.

एलेना पुढे म्हणाली, "तुला वाटतंय मी तुला सोडलं. पण सत्य हे आहे की, मी तुला आयुष्यात एकदाही सोडलं नाही. मी प्रत्येक वर्षी तुझा फोटो पाहिला. तू कोणत्या शाळेत जातोस हे मला माहीत होतं. तुला पहिल्यांदा ताप आला तेव्हा मला माहीत होतं. तू कॉलेजमध्ये गेलास तेव्हा, तू पहिली नोकरी मिळवलीस तेव्हा आणि दुष्यन्त गेला तेव्हाही."

आरवचा श्वास अडकला. "मग... मग एकदाही माझ्यासमोर का आली नाहीस?"

या प्रश्नाने एलेना पूर्णपणे तुटली. तिने डोळ्यांवर हात ठेवला; अनेक वर्षांनी पहिल्यांदाच.

"कारण मला भीती होती, की एकदा तुला मिठी मारली तर मी पुन्हा तुला सोडू शकणार नाही," ती रडत म्हणाली.

त्या शब्दांनंतर दुकानात पुन्हा शांतता पसरली. आरवच्या डोळ्यांतही पाणी आलं. कारण त्याला एका आईचं ओझं समजलं होतं. पंचवीस वर्षं तिने आई म्हणून जगण्याचा अधिकार गमावून केवळ त्याचं रक्षण केलं होतं. आरवच्या हातात अजूनही दुष्यंतचं पत्र होतं. पण आता 'ब्लॅक एम्बर', केलर, गार्डियन सगळं काही क्षणांसाठी मागे पडलं होतं. कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्याला त्याच्या स्वतःच्या कथेचं हरवलेलं पान सापडलं होतं.
आणि व्हिएन्नामध्ये फॅमिली कंपार्टमेंटचं सर्वात मोठं रहस्य अखेर उघडलं होतं.

पाऊस थांबला होता, पण आरवच्या मनातलं वादळ अजून शांत झालं नव्हतं. एलेना समोर बसली होती अनेक वर्षांपासून हरवलेली आई. आणि त्याच्या हातात अजूनही दुष्यंतचं पत्र होतं. काही मिनिटं कोणीच बोललं नाही.

शेवटी आरवने विचारलं, "दुष्यंतने फॅमिली कंपार्टमेंट का तयार केला?"

एलेनाने डोळे मिटले, जणू ती उत्तर देण्याआधी पंचवीस वर्षं मागे गेली.
"कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता."

आरव गोंधळला. "म्हणजे?"

एलेना उठली आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली.
"तुला वाटतंय फॅमिली कंपार्टमेंट एखादी योजना होती," ती हळू आवाजात म्हणाली. "पण ती योजना नव्हती. ती शेवटची निवड होती."
"त्या काळात केलर अजून पूर्णपणे बदलला नव्हता, पण दुष्यंतला तो बदल दिसायला लागला होता."

आरव लक्षपूर्वक ऐकत होता.

"लोक अचानक गायब होऊ लागले. रेकॉर्ड्स गायब होऊ लागले. ज्यांना खूप माहिती होती..." ती काही क्षण थांबली, "...ते एकामागोमाग एक नाहीसे होत होते."

आरवचा चेहरा गंभीर झाला. "ब्लॅक एम्बर?"

एलेनाने मान डोलावली. "सुरुवातीला आम्हाला वाटलं ते योगायोग आहेत. नंतर आम्हाला कळलं की ते एक पॅटर्न होतं."
ती वळून त्याच्याकडे पाहू झाली. "आणि मग एक दिवस दुष्यंतला काहीतरी सापडलं."

"काय?"

एलेना काही क्षण शांत राहिली. "एक लिस्ट."

आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या. "कसली लिस्ट?"

"फ्युचर रिस्क."

दुकानात पूर्ण शांतता पसरली.

"ब्लॅक एम्बर ज्या लोकांना भविष्यात धोका मानत होती, त्यांची लिस्ट."

आरवचा श्वास मंदावला. "आणि?"

एलेनाच्या आवाजात आता वेदना होती. "त्या लिस्टमध्ये तुझा संभाव्य उल्लेख 'SUBJECT A' असा होता."

वेळ जणू थांबला. आरव काही सेकंद काहीच बोलू शकला नाही. "मी... मी तर लहान होतो."

"हो," एलेना म्हणाली. "म्हणूनच दुष्यंत घाबरला. कारण त्या लिस्टमध्ये तू काय केलं होतंस म्हणून तुझं नाव नव्हतं, तर तू कोण होतास म्हणून होतं."

आरवचा श्वास अडकला.

एलेना पुढे म्हणाली, "त्या क्षणी त्याला समजलं की ब्लॅक एम्बर फक्त वर्तमान नियंत्रित करत नव्हती, ती भविष्यही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती."

"आणि मग फॅमिली कंपार्टमेंट?" आरवने विचारलं.

एलेनाने हळूहळू मान डोलावली. "त्या रात्री दुष्यंतने पहिल्यांदा मला सांगितलं; जर त्यांनी त्याचं नाव शोधलं, तर ते त्याच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर ते त्याच्यापर्यंत पोहोचले, तर आपण त्याला गमावून बसू."

आरवच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण त्याला फॅमिली कंपार्टमेंटमागची खरी भीती समजू लागली होती. फॅमिली कंपार्टमेंट म्हणजे एका वडिलांचा शेवटचा प्रयत्न होता; स्वतःच्या मुलाला जिवंत ठेवण्यासाठी.

एलेना टेबलाजवळ परत आली. तिने हळूच एक जुना डॉक्युमेंट आरवसमोर ठेवला.

त्याच्या वरच्या ओळीत लिहिलं होतं: RISK ASSESSMENT: SUBJECT A
आणि खाली: STATUS: UNRESOLVED

त्या डॉक्युमेंटमध्ये अजून काहीतरी होतं, जे एलेनाने अजून त्याला दाखवलं नव्हतं.

आरवसमोर तो जुना डॉक्युमेंट पडला होता.
RISK ASSESSMENT: SUBJECT A STATUS: UNRESOLVED

त्याने हळूच मान वर करून पाहिलं. " SUBJECT A म्हणजे मी आहे."
तो प्रश्न नव्हता, तो निष्कर्ष होता.

एलेनाने शांतपणे मान डोलावली. "हो."

आरवने तो डॉक्युमेंट उघडला. आत फक्त काही ऑब्झर्व्हेशन्स, काही रेफरन्सेस आणि शेवटी एक पॅराग्राफ होता. तो वाचताना त्याचा श्वास मंदावला.
Subject possesses no immediate threat. Current age irrelevant. Risk originates from future inheritance pathway.

आरवने कपाळावर आठ्या आणल्या. "फ्युचर इन्हेरिटन्स?"

एलेना बराच वेळ काही बोलली नाही. मग म्हणाली, "तुला वाटतंय केलरला तुझी भीती होती."

"नव्हती?"

"नाही," तिने स्पष्ट उत्तर दिलं. "त्याला एका लहान मुलाची भीती नव्हती."

"मग?"

एलेना खिडकीबाहेर पाहत म्हणाली, "त्याला दुष्यंतची भीती होती. दुष्यंतकडे काहीतरी होतं."

"आर्काइव्ह?"

"नाही."

"गार्डियन?"

"नाही." एलेनाने डोकं हलवलं. "त्याच्याकडे पुरावे होते."

आरव स्तब्ध झाला. "कशाचे?"

"ब्लॅक एम्बरच्या सुरुवातीचे. त्यांच्या पहिल्या ऑपरेशन्सचे, पहिल्या मॅनिप्युलेशन्सचे आणि पहिल्या बळींचे." तिचा आवाज आता जड झाला होता. "आणि केलरला माहीत होतं, की एक दिवस ते पुरावे कुणाकडे तरी नक्की जाणार."

आरवच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. "माझ्याकडे." एलेनाने उत्तर दिलं नाही, त्याला स्वतःच उत्तर मिळालं होतं.

Future Inheritance.

ते पैसे किंवा मालमत्ता नव्हती; ते सत्य होतं. दुष्यंतच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे पोहोचणारं सत्य.

आरवने डॉक्युमेंटमधली पुढची ओळ वाचली. Probability of transfer remains high. Subject must be monitored.

त्याचा श्वास अडकला. "त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं होतं."

"हो," एलेना म्हणाली. "पण त्यांना एक गोष्ट माहीत नव्हती."

"कोणती?"

एलेनाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकंसं स्मित उमटलं. "दुष्यंत त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे होता."

तिने टेबलावर दुसरं पान ठेवलं. या वेळी ते दुष्यंतच्या हस्ताक्षरात होतं. अत्यंत छोटं, फक्त दोन ओळींचं.

If Subject A is identified, Subject A no longer exists.

आरव काही क्षण ते वाक्य समजू शकला नाही. मग एलेना म्हणाली, "फॅमिली कंपार्टमेंट, गार्डियन, सब्जेक्ट अनअवेअर... ही सगळी नावं नंतर आली. पण सुरुवात या एका निर्णयाने झाली होती."

तिने त्या ओळीवर बोट ठेवलं. "जर त्यांनी आरवला शोधलं, तर आरव अस्तित्वातच राहणार नाही."

दुकानात पुन्हा शांतता पसरली. आता आरवला सगळा प्रकार समजत होता. त्याची ओळख, त्याचा भूतकाळ, त्याचे संबंध सगळं काही तुकडे-तुकडे करून लपवलं गेलं होतं. कारण केलरला आर्काइव्ह नष्ट करायचा नव्हता, त्याला वारस नष्ट करायचा होता.

एलेना हळू आवाजात म्हणाली, "त्या रात्री दुष्यंतने मला एकच गोष्ट सांगितली होती."

आरव तिच्याकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. "तो म्हणाला, तू कदाचित त्याला मोठा होताना पाहू शकणार नाहीस. पण जर तो जिवंत राहिला, तर एक दिवस तो स्वतःहून तुला शोधत येईल."

दुकानात पुन्हा शांतता पसरली. एलेनाने आरवकडे पाहिलं…अनेक वर्षांनंतर, एक आई म्हणून.

"तो बरोबर होता."

आरव काही बोलला नाही. कारण पहिल्यांदाच त्याला फॅमिली कंपार्टमेंटचं खरं उत्तर मिळालं होतं. आणि आता, दुष्यंतचा तो शेवटचा निर्णय पूर्ण झाला होता.
************************************************************************************************************************
जिनेव्हा.

रात्र झाली होती. शहराच्या दिव्यांचा प्रकाश तलावाच्या पाण्यावर चमकत होता, पण एड्रियन केलरचं लक्ष बाहेर नव्हतं. त्याच्या समोर एकच फाईल उघडी होती - SUBJECT A.

काही क्षण तो त्या नावाकडे पाहत राहिला, मग त्याने फाईल बंद केली. "पंचवीस वर्षं," तो स्वतःशीच पुटपुटला. "दुष्यंत..."

त्याच्या आवाजात राग नव्हता; फक्त थकवा होता. आणि कदाचित... पश्चात्ताप.

दरवाज्यावर हलकी टकटक झाली. "कम इन."

एक वृद्ध व्यक्ती आत आली. 'ब्लॅक एम्बर'च्या उरलेल्या मुख्य सदस्यांपैकी ती एक होती.

"सिच्युएशन?" केलरने विचारलं.

"फायनान्शियल एक्स्पोजर वाढत आहे. इन्व्हेस्टिगेशन्स वाढत आहेत. आपली काही नेटवर्क्स आपण कायमची गमावली आहेत."

केलर शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती, जणू तो हे आधीच अपेक्षित करत होता.

"आणि सब्जेक्ट ए?"

त्या व्यक्तीने काही क्षण उत्तर दिलं नाही. "अ‍ॅक्टिव्ह. व्हिएन्ना."

केलरने डोळे मिटले. जणू त्याने अपेक्षित उत्तरच ऐकलं होतं. "तर मग शेवटी तो तिथपर्यंत पोहोचलाच."

त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारलं, "तुम्हाला माहिती होतं?"

केलर हलकेच हसला. "दुष्यंतला मी जितका ओळखत होतो, तितकं त्याला दुसरं कोणीही ओळखत नव्हतं."

काही क्षण खोलीत शांतता पसरली. मग केलर खिडकीजवळ गेला.

"त्याला वाटायचं मी सत्ता शोधतोय. मी सत्ता शोधत नव्हतो," त्याने बाहेर पाहतच उत्तर दिलं. "मी स्थैर्य शोधत होतो."

ती वृद्ध व्यक्ती काहीच बोलली नाही, कारण हा युक्तिवाद तिने याआधी अनेकदा ऐकला होता.

केलर पुढे म्हणाला, "लोकांना स्वातंत्र्य हवं असतं, पण प्रत्येक संकटात ते सुरक्षिततेचीच मागणी करतात. प्रत्येक युद्धानंतर, प्रत्येक आर्थिक संकटानंतर, प्रत्येक महामारीनंतर..." तो हळूहळू बोलत होता. "जगाला निवडीचं स्वातंत्र्य हवं असतं, पण परिणामांची जबाबदारी नको असते. आणि म्हणूनच 'ब्लॅक एम्बर' आवश्यक होता."

त्या शब्दांनंतर खोलीत कमालीची शांतता पसरली.

"नेसेसरी," केलरने तो शब्द पुन्हा उच्चारला, जणू तो स्वतःलाच पटवून देत होता. "सरकारं बदलतात, बाजार कोसळतात, नेते मरतात... पण अनागोंदी कायम राहते. कोणीतरी ती नियंत्रित केलीच पाहिजे."

त्या वृद्ध व्यक्तीने हळू आवाजात विचारलं, "आणि जर तो 'कोणीतरी' होण्याचा अधिकार आपल्याला नसेल तर?"

पहिल्यांदाच केलर शांत झाला. मग त्याने उत्तर दिलं, "तोच प्रश्न दुष्यंतने मला विचारला होता."

काही क्षण पूर्ण शांतता राहिली.

"आणि?"

केलर खिडकीबाहेर पाहत म्हणाला, "मी चुकीचं उत्तर दिलं."

ती वृद्ध व्यक्ती स्तब्ध झाली. कारण पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच एड्रियन केलरने आपली चूक मान्य केली होती.

पण त्याचं पुढचं वाक्य अधिक धक्कादायक होतं.

"पण आता मागे फिरणं शक्य नाही."

त्याने टेबलावरील फाईल पुन्हा उघडली. या वेळी त्यात आरवचा अलीकडचा फोटो होता. केलर बराच वेळ आरवच्या फोटोकडे पाहत राहिला. व्हिएन्ना, बुकस्टोअर, एलेना सगळं त्याच्या डोळ्यांससमोर होतं.

"दुष्यंत..." तो हळू आवाजात म्हणाला. "तू शेवटपर्यंत तसाच राहिलास."

खोलीत शांतता पसरली. त्याने फाईलमध्ये असलेलं शेवटचं पान उघडलं. त्यावर फक्त एकच ओळ होती: SUBJECT A - ACTIVE

काही क्षण तो त्या शब्दांकडे पाहत राहिला, मग त्याने फाईल बंद केली.

"पंचवीस वर्षांपूर्वी..." तो शांतपणे म्हणाला, "...मी एक चूक केली."

समोर बसलेल्या व्यक्तीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

केलर पुढे म्हणाला, "दुष्यंतला थांबवायला हवं होतं. पण मी त्याला कमी लेखलं." त्याच्या आवाजात पश्चात्ताप नव्हता, फक्त वस्तुस्थिती होती. "आणि आता..." त्याने टेबलावर बोटांनी हलकेच टकटक केलं, "...त्याने मागे ठेवलेली गोष्ट माझ्यासमोर उभी आहे. सब्जेक्ट ए."

खोली पुन्हा शांत झाली.

"केलर..." समोरची व्यक्ती सावधपणे म्हणाली. "तो अजून काहीच जाणत नाही."

"आज नाही," केलरने उत्तर दिलं. "पण उद्या?"

कोणीच काही बोललं नाही, कारण त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीत होतं. दुष्यंतने इतकी वर्षं जे लपवून ठेवलं होतं, ते आता कायमचं लपून राहणार नव्हतं.

केलर उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. खाली जिनेव्हा शहर चमकत होतं.

"दुष्यंतला वाटलं होतं की तो वेळेला जिंकेल. तो जिंकलाही... पंचवीस वर्षांसाठी." पहिल्यांदाच त्याच्या आवाजात थोडासा आदर जाणवत होता. "पण प्रत्येक खेळ कधीतरी संपतो. आणि हा खेळ आता संपणार आहे."

खोलीतील सर्वजण शांत होते, कारण त्यांना पुढचं वाक्य काय असणार हे अचूक समजलं होतं.

केलरने टेबलावरील फाईल उचलली. एक क्षण आरवच्या फोटोकडे पाहिलं, मग ती फाईल बंद केली आणि शांत, निर्विकार आवाजात म्हणाला:
"Subject A must be terminated."

खोलीत पूर्ण शांतता पसरली. अनेक वर्षांनंतर एड्रियन केलरने स्वतः अंतिम आदेश दिला होता.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात जास्त दोलायमान वळणे असणारा भाग! रूटीन वाचण्याची सवय झाली होती ब्लॅक एंबर बद्दल, एकदम जबरदस्त ट्विस्ट पडला !

मस्त झालाय हा भाग . आता पुढे काय आणि कसे होणार हि उत्सुकता वाढली .
एलेना सब्जेक्ट A ची आई आहे हे केलर ला माहित आहे कि नाही ?

धन्यवाद जेम्स वांड, Sharadg, सामी, झकासराव आणि अनिंद्य.

एलेना सब्जेक्ट A ची आई आहे हे केलर ला माहित नाही अजुन तरी.