ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २६
पूर्वभाग
“गार्डियन प्रोटोकॉल” हा केवळ गुप्तता राखण्यासाठी नसून एखाद्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आला होता, हे दुष्यंतच्या रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होते. त्याचबरोबर “Secondary Authorization” अस्तित्वात असल्याचे समोर येते, म्हणजे या रहस्यामागे दुष्यंतसोबत आणखी एक व्यक्ती होती.
फ्रँकफर्टमध्ये एलेना वोल्कोव्ह ला “Guardian File Accessed” आणि “Secondary Authorization Activated” असे संदेश मिळतात, ज्यामुळे ती अनेक वर्षांपूर्वीच्या एका गुप्त निर्णयाची आठवण काढते.
मुंबईत आरव देशमुख आणि त्याची टीम शोधून काढते की फॅमिली कम्पार्टमेंट उघडण्यासाठी दुसरी किल्ली अजूनही जिवंत असलेल्या कोणाच्या तरी ताब्यात आहे. त्या व्यक्तीची ओळख सीलबंद असली तरी तिच्याशी संपर्क साधण्याचा मार्ग उपलब्ध झालेला असतो.
आरव अखेर दुष्यंतच्या रेफरन्ससह एक पडताळणी संदेश पाठवतो. काही वेळाने उत्तर येते की ओळख दूरून पडताळता येणार नाही आणि प्रत्यक्ष भेट आवश्यक आहे.
भागाच्या शेवटी एक निर्णायक संदेश मिळतो “Vienna. 72 Hours.” यामुळे टीमसमोर नवा मार्ग उघडतो: फॅमिली कम्पार्टमेंटच्या दुसऱ्या किल्लीधारकाला भेटण्यासाठी व्हिएन्नाला जाणे, जिथे पुढील मोठे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग २७ - The Woman in Vienna
जिनेव्हा.
एका उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावर एड्रियन केलर एकटाच उभा होता. त्याच्या समोर जगभरातून आलेले रिपोर्ट्स पडले होते.
फायनान्शियल फ्रीजेस. इन्व्हेस्टिगेशन्स. अॅसेट सिझर्स. कम्युनिशन फेल्युअर्स.
'ब्लॅक एम्बर'चे अनेक लेयर्स आता दबावाखाली येत होते.
त्याचा असिस्टंट आत आला. "सर."
केलरने मागे वळून पाहिलं.
"कोरिलेशन अॅक्टिव्हिटी पुन्हा वाढली आहे."
केलर काही बोलला नाही.
असिस्टंटने पुढची फाईल टेबलावर ठेवली. "गार्डियन रेफरन्स पुन्हा दिसला."
खोलीत काही क्षण शांतता पसरली.
"कुठे?" केलरने विचारलं.
"unknown."
पहिल्यांदाच केलरच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची एक हलकी रेषा उमटली. ‘Unknown’ हे उत्तर त्याला आवडत नव्हतं. दुष्यंतने तयार केलेल्या गोष्टींची एकच मोठी समस्या होती; त्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, याची खात्री कधीच देता येत नव्हती.
************************************************************************************************************************
मुंबई.
रात्र पुन्हा सरकत होती. माया एका नवीन रिपोर्टवर काम करत होती. कबीर नेटवर्क ट्रेसेस तपासत होता. समीर मात्र वेगळ्याच दिशेने विचार करत होता.
"आपण व्हिएन्नाला जाणार हे गृहित धरलंय," तो अचानक म्हणाला.
आरवने त्याच्याकडे पाहिलं.
"पण जर आपल्याला तिथे पोहोचायचंच नसेल तर?"
कबीर लगेच म्हणाला, "म्हणजे."
समीर पुढे झुकला. "जर समोरची व्यक्ती खरंच प्रोटोकॉल जाणत असेल, तर ती आपल्याला ऑब्झर्व्ह करत असेल. आपण कसं उत्तर देतोय हे पाहत असेल."
मायाच्या डोळ्यांत चमक आली. "म्हणजे?"
"म्हणजे व्हिएन्ना डेस्टिनेशन नाही," समीर म्हणाला. "ती टेस्ट असू शकते."
शेडमध्ये पुन्हा शांतता पसरली.
विनायकराव हलकेच हसले. "शेवटी कुणीतरी योग्य प्रश्न विचारला."
आरव काही क्षण विचारात पडला. मग त्याने व्हिएन्नाचा मेसेज पुन्हा उघडला. आणि पहिल्यांदाच त्याला एक गोष्ट जाणवली. मेसेजमध्ये मीटिंगची वेळ नव्हती. पत्ता नव्हता. हॉटेल नव्हतं. कॉन्टॅक्ट नव्हता. फक्त दोन शब्द होते. व्हिएन्ना. बहात्तर तास.
जणू समोरची व्यक्ती म्हणत होती, जर तू योग्य व्यक्ती असशील, तरच पुढचा मार्ग तुला सापडेल.
आरवने हळूहळू स्क्रीन बंद केला. आता खेळ बदलला होता. कोणीतरी त्याची परीक्षा घेत होतं.
व्हिएन्ना. बहात्तर तास. तो संदेश आल्यापासून बारा तास उलटले होते, पण त्यांना अजूनही पुढचं पाऊल सापडलं नव्हतं. फक्त ते दोन शब्द.
"हे मीटिंग इन्व्हिटेशन नाही," माया पुन्हा म्हणाली. "हे व्हेरिफिकेशन चॅलेंज आहे."
कबीरने स्क्रीनवरचा संदेश पुन्हा तपासला. "पण चॅलेंज कशाचं?"
कोणीच उत्तर दिलं नाही.
तेवढ्यात समीरने आरवसमोर एक प्रिंटआऊट ठेवलं. "हे बघ."
तो गेल्या काही तासांपासून जुन्या आर्काइव्ह लॉग्समधून पॅटर्न शोधत होता. आरवने कागद हातात घेतला. त्यावर काही टाईमस्टॅम्प्स होते.
"हे काय आहे?"
समीर म्हणाला, "गार्डियन रेफरन्सेस. जितक्या वेळा गार्डियन रेफरन्स दिसला, त्याच्यानंतर काही दिवसांत व्हिएन्नामध्ये एक स्पेसिफिक फायनान्शियल कॉन्फरन्स झाली होती."
शेडमध्ये शांतता पसरली.
कबीर लगेच पुढे आला. "योगायोग?"
"मलाही तसंच वाटलं," समीर म्हणाला. "पण पाच वेळा?"
मायाने पटकन काही रेकॉर्ड्स उघडले. काही मिनिटांनी ती म्हणाली, "तो बरोबर आहे. व्हिएन्ना रिपीटेड अँकर पॉईंट आहे."
आरव विचारात पडला. "म्हणजे व्हिएन्ना हे शहर नाही."
विनायकराव हलकेच हसले. "शेवटी योग्य दिशेने विचार सुरू झालाय."
"व्हिएन्ना म्हणजे?" कबीरने विचारलं.
"प्रोटोकॉल," विनायकराव म्हणाले.
विनायकराव पुढे म्हणाले, "कोल्ड वॉर काळात अनेक इंटेलिजन्स नेटवर्क्स प्रत्यक्ष नावाऐवजी शहरांची नावं वापरायचे. लोकेशन म्हणून नाही, तर रेफरन्स म्हणून."
मायाने लगेच नोंद घेतली. "म्हणजे व्हिएन्ना हा डेस्टिनेशन नसून ट्रिगर असू शकतो."
"किंवा व्हेरिफिकेशन फ्रेज," विनायकराव म्हणाले.
आरवच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. त्याने लगेच मेसेज पुन्हा उघडला. Vienna. 72 Hours.
तो काही क्षण त्या शब्दांकडे पाहत राहिला. मग म्हणाला, "जर व्हिएन्ना कीवर्ड असेल, तर बहात्तर तास हा टायमर नाही."
समीरच्या डोळ्यात चमक आली. "तो ऑब्झर्व्हेशन विंडो असू शकतो."
आता सगळे एकदम सतर्क झाले. कबीर म्हणाला, "म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला तीन दिवस ऑब्झर्व्ह करणार आहे?"
"कदाचित," माया उत्तरली. "आणि आपण काय करतो हे पाहणार."
त्याच क्षणी मायाच्या स्क्रीनवर नवीन अॅक्टिव्हिटी दिसली. आर्काइव्हमध्ये काहीही नवीन उघडलं नव्हतं. पण सिस्टमने एक नवीन इव्हेंट नोंदवला होता.
VERIFICATION WINDOW ACTIVE
सगळे काही क्षण स्तब्ध राहिले.
समीर हळू आवाजात म्हणाला, "ती आपल्याला पाहतेय."
"नाही," विनायकराव शांतपणे म्हणाले. "ती आपल्याला तपासतेय."
************************************************************************************************************************
फ्रँकफर्ट.
व्हेरिफिकेशन विंडो सुरू झाल्याचा अलर्ट एलेना व्होल्कोव्हला मिळाला होता. तिने कोणताही नवीन संदेश पाठवला नव्हता, ना कोणताही निर्देश दिला होता. कारण पुढचा टप्पा प्रोटोकॉल स्वतःच पार पाडत होता.
ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. पंचवीस वर्षांपूर्वी दुष्यंतने तिला एकच गोष्ट सांगितली होती.
"जर तो योग्य व्यक्ती असेल, तर त्याला उत्तर देण्याची गरज पडणार नाही. तो स्वतःच योग्य प्रश्न विचारेल."
************************************************************************************************************************
मुंबई.
आरव अजूनही स्क्रीनकडे पाहत होता.
VERIFICATION WINDOW ACTIVE
तो संदेश साधा होता, पण त्याचा अर्थ खूप मोठा होता. पहिल्यांदाच कोणीतरी त्याचं मूल्यांकन करत होतं. व्हेरिफिकेशन विंडो सुरू होऊन चोवीस तास झाले होते, पण काहीच बदललं नव्हतं. कोणताही नवीन संदेश नाही, कोणतीही नवीन फाईल नाही, ना कोणताही नवीन निर्देश.
समीर चिडून म्हणाला, "ही टेस्ट आहे की वेळेचा अपव्यय?"
"दोन्ही असू शकतात," कबीर शांतपणे म्हणाला.
माया अजूनही लॉग्स तपासत होती, पण तिलाही काही नवीन सापडत नव्हतं. आरव मात्र शांत होता. त्याचं लक्ष स्क्रीनवर नव्हतं; तो दुष्यंतच्या जुन्या रेकॉर्डिंग्स पुन्हा ऐकत होता. एकाच गोष्टीने त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. दुष्यंतने अनेकदा 'संरक्षण' हा शब्द वापरला होता, पण 'गुपित' हा शब्द जवळजवळ कधीच वापरला नव्हता.
आरव अचानक उठला. "आपण चुकीच्या दिशेने विचार करतोय."
सगळे त्याच्याकडे वळले.
"कसं?" मायाने विचारलं.
आरव काही क्षण शांत राहिला. "आपण सतत विचारतोय की फॅमिली कंपार्टमेंटमध्ये काय आहे."
कोणी काही बोललं नाही.
"प्रश्न 'काय' हा नाही," आरव म्हणाला. "'कोण' हाही नाही."
तो स्क्रीनकडे पाहत म्हणाला, "प्रश्न आहे, का?"
शेडमध्ये शांतता पसरली.
तेवढ्यात मायाच्या स्क्रीनवर अॅक्टिव्हिटी दिसली. कोणी कमांड दिली नव्हती, कोणी अॅक्सेस रिक्वेस्ट केली नव्हती, तरीही सिस्टममध्ये एक नवीन एंट्री झाली.
QUERY ACCEPTED
सगळे स्तब्ध झाले.
"आपण काहीच टाईप केलं नाही," समीर म्हणाला.
"माहितीय," माया हळू आवाजात म्हणाली.
त्या एंट्रीखाली दुसरी ओळ उमटली:
PROCEED
आरव काही क्षण त्या शब्दांकडे पाहत राहिला. त्याच्या अंगावर काटा आला. व्हिएन्ना प्रोटोकॉलने प्रतिक्रिया दिली होती.
************************************************************************************************************************
फ्रँकफर्ट.
एलेनाच्या लॅपटॉपवर एक नोटिफिकेशन चमकलं.
PHASE ONE COMPLETE
ती काही क्षण डोळे मिटून बसली. सिस्टमने नक्की काय पडताळून पाहिलं, हे तिला माहीत नव्हतं; कारण प्रोटोकॉलची संपूर्ण रचना दुष्यंतने केली होती. पण तिला एक गोष्ट पक्की ठाऊक होती.
पहिला टप्पा कधीच टेक्निकल नव्हता. तो नेहमीच मानवी होता.
************************************************************************************************************************
मुंबई.
स्क्रीनवर आता नवीन संदेश दिसत होता.
IF THE OBJECTIVE IS DISCLOSURE, TERMINATE ACCESS.
खाली दुसरी ओळ हळूहळू प्रकट झाली.
IF THE OBJECTIVE IS PROTECTION, CONTINUE.
कबीरने तो संदेश दोनदा वाचला, समीरने तिसऱ्यांदा आणि मायाने चौथ्यांदा. कारण त्या दोन वाक्यांनी संपूर्ण खेळ बदलून टाकला होता.
आतापर्यंत त्यांना वाटत होतं की ते एखादं रहस्य उघडण्याच्या मागे आहेत. पण आता पहिल्यांदाच त्यांना जाणवलं की कदाचित हे रहस्य उघडण्यासाठी तयारच केलेलं नव्हतं. ते जपण्यासाठी तयार केलं गेलं होतं. व्हिएन्ना टेस्टचा खरा प्रश्न आता त्यांच्या समोर उभा होता.
तुम्हाला सत्य हवं आहे की त्या सत्याचं संरक्षण?
कोणीच काही बोलत नव्हतं. कारण त्या दोन वाक्यांनी त्यांना अशा ठिकाणी आणून उभं केलं होतं, जिथे कोणतंही तांत्रिक उत्तर उपयोगी पडणार नव्हतं.
शेवटी समीर म्हणाला, "मला अजूनही समजत नाहीये."
कबीर त्याच्याकडे वळला. "काय?"
"प्रोटेक्शन म्हणजे नेमकं काय?" समीर म्हणाला. "जर सत्य धोकादायक असेल, तर ते जगासमोर आणणं जास्त योग्य नाही का?"
कोणी लगेच उत्तर दिलं नाही.
विनायकराव शांतपणे म्हणाले, "प्रत्येक सत्य सार्वजनिक असायलाच हवं असं नसतं."
"पण मग हा निर्णय कोण घेणार?" समीरने विचारलं.
या वेळी आरव बोलला. "ज्याला परिणामांना सामोरं जावं लागणार आहे, तो."
सगळे त्याच्याकडे पाहू लागले.
आरव स्क्रीनकडे पाहत म्हणाला, "आपण इतका वेळ फॅमिली कंपार्टमेंटमध्ये काय आहे, हेच शोधत होतो." तो काही क्षण थांबला. "पण जर ते उघडल्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर?"
शेडमध्ये पुन्हा शांतता पसरली.
माया हळू आवाजात म्हणाली, "म्हणजे तुला असं म्हणायचंय..."
"मला असं म्हणायचंय," आरवने उत्तर दिलं, "की आपल्याला आत काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की नाही, हा प्रश्न आधी सोडवला पाहिजे."
कोणीच काही बोललं नाही. कारण पहिल्यांदाच कोणी अॅक्सेसबद्दल नाही, तर जबाबदारीबद्दल बोलत होतं.
काही सेकंद गेले आणि स्क्रीन चमकली. एक नवीन मेसेज तिथे दिसला.
PRIMARY RESPONSE RECORDED
त्याखाली दुसरी ओळ उमटली:
SECONDARY AUTHORIZATION REQUESTED
माया ताठ बसली. "हे काहीतरी नवीन आहे."
कबीरने मेसेज पुन्हा वाचला. "म्हणजे आता दुसऱ्या ऑथरायझेशन होल्डरचा निर्णय लागणार."
************************************************************************************************************************
फ्रँकफर्ट.
एलेनाच्या लॅपटॉपवर नोटिफिकेशन आलं.
PRIMARY RESPONSE RECORDED
ती बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली. पंचवीस वर्षांपूर्वीचा कॉन्फरन्स रूम तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. दुष्यंत समोर बसला होता, टेबलावर काही डॉक्युमेंट्स होती आणि त्या दिवसाचा विषय फक्त एकच होता.
"जर तो दिवस आला तर?" तिने त्याला विचारलं होतं.
दुष्यंत काही क्षण शांत राहिला होता. मग म्हणाला होता, "मग निर्णय तू घेशील."
वर्तमानात परत येत एलेनाने डोळे उघडले. तिच्यासमोर एकच प्रश्न होता; प्रोटोकॉल योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला होता का?
तिने पुन्हा आरवचा रिस्पॉन्स वाचला. काही मिनिटं गेली. मग तिने कीबोर्ड पुढे ओढला आणि अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिने प्रोटोकॉलमध्ये स्वतःहून हस्तक्षेप केला.
************************************************************************************************************************
मुंबई.
स्क्रीनवर नवीन अॅक्टिव्हिटी दिसली.
SECONDARY AUTHORIZATION RECEIVED
सगळे उत्सुकतेने पुढे झुकले. त्याखाली एक एन्क्रिप्टेड मेसेज उघडला. त्यात फक्त एकच वाक्य होतं:
Access is approved. Family Compartment remains sealed.
समीर गोंधळला. "म्हणजे नक्की काय?"
मायाने तो मेसेज पुन्हा वाचला आणि तिचे डोळे मोठे झाले. "हे फक्त अप्रूव्हल नाहीये. हे इन्व्हिटेशन आहे."
त्याखाली शेवटची ओळ हळूहळू दिसू लागली:
Vienna. 48 Hours. Come alone.
शेडमध्ये एकदम शांतता पसरली. या वेळी व्हिएन्ना हा संकेत नव्हता, व्हेरिफिकेशन नव्हती, ना कोणती टेस्ट होती. तो थेट निर्णय होता.
व्हिएन्ना प्रोटोकॉल पूर्ण झाला होता. आणि आता पहिल्यांदाच फॅमिली कंपार्टमेंटच्या दुसऱ्या किल्लीची मालकी असलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली होती.
************************************************************************************************************************
व्हिएन्ना.
पाऊस नुकताच थांबला होता. जुन्या शहराच्या रस्त्यांवर अजूनही ओलसर चमक दिसत होती. आरव एकटाच चालत होता. त्याच्या कानात अजूनही त्या संदेशाचे शब्द घुमत होते.
Come alone.
त्याने कुणालाही सोबत आणलं नव्हतं. माया, समीर, कबीर आणि विनायकराव जवळच्या सुरक्षित ठिकाणी थांबले होते. तो एकटाच पुढे गेला.
त्याच्या हातात एकच गोष्ट होती. दुष्यंतच्या आर्काइव्हमधून मिळालेला ऑथरायझेशन टोकन.
समोर एक लहानसं जुन्या पुस्तकांचं दुकान दिसलं. बाहेरून पाहिलं तर अगदी सामान्य, पण संदेशात दिलेला रेफरन्स याच ठिकाणाशी जुळत होता. आरव आत गेला. दुकान जवळजवळ रिकामं होतं. काही शेल्व्हज, जुनी पुस्तकं आणि खिडकीजवळ बसलेली एक स्त्री. ती शांतपणे पुस्तक वाचत होती. जणू ती कोणाची वाटच पाहत नव्हती.
आरव काही क्षण थांबला. त्या स्त्रीने पुस्तक बंद केलं आणि त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत ओळखीची वाट पाहिल्यासारखी शांतता होती.
"तू आलास," ती म्हणाली.
आरव स्तब्ध झाला. त्याने नाव सांगितलं नव्हतं, कोणतीही ओळख दिली नव्हती.
"तुम्ही कोण?"
स्त्रीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. "तोच प्रश्न मी तुला विचारू शकते."
आरव काही बोलला नाही. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली.
मग ती म्हणाली, "ऑथरायझेशन टोकन."
आरव सावध झाला. "काय?"
"तो खिशातून बाहेर काढ."
आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हळूहळू टोकन टेबलावर ठेवला.
त्या स्त्रीने त्याला स्पर्शही केला नाही, फक्त त्याच्याकडे पाहिलं. आणि मग शांतपणे म्हणाली, "दुष्यंत अजूनही अपेक्षेपेक्षा जास्त सावध होता."
आरवचा श्वास क्षणभर थांबला. हे नाव त्याने उच्चारलंही नव्हतं.
"तुम्हाला दुष्यंत माहीत होता?"
स्त्रीने त्याच्याकडे पाहिलं. "हो." काही क्षण शांतता पसरली. "खूप जवळून."
पहिल्यांदाच तिच्या आवाजात दुःख जाणवलं.
आरव खुर्चीत बसला. "मग तुम्ही कोण?"
स्त्रीने खिडकीबाहेर पाहिलं, जणू ती उत्तर द्यायचं की नाही याचा विचार करत होती. मग ती म्हणाली, "ज्या गोष्टींबद्दल तुला सांगितलं गेलं, त्यातलं बरंच काही अपूर्ण होतं. 'ब्लॅक एम्बर', 'डायरेक्टर', 'गार्डियन', 'फॅमिली कंपार्टमेंट'..." ती प्रत्येक शब्द सावकाश उच्चारत होती. "तू त्यांच्या मागे धावत होतास."
ती आरवकडे पाहत म्हणाली, "पण एक प्रश्न तू अजून विचारलाच नाहीस."
आरव शांत बसला. "कोणता प्रश्न?"
स्त्री काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग म्हणाली, "दुष्यंतला एवढं सगळं जपण्याची गरज का पडली?"
दुकानात पुन्हा शांतता पसरली. कारण आरवकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि कदाचित त्याने तो प्रश्न कधी स्वतःला विचारलाच नव्हता.
ती स्त्री उठली. तिने टेबलावर एक लहानसं सीलबंद पाकीट ठेवलं.
"हे उघड. आत्ता नाही, मी गेल्यावर."
आरव काही बोलण्याआधीच ती वळली.
"थांबा," तो म्हणाला.
ती थांबली.
"तुमचं नाव तरी सांगा."
काही क्षण शांतता. मग प्रथमच तिच्या चेहऱ्यावर वेदनायुक्त स्मित उमटलं. "योग्य वेळी," ती म्हणाली. "आधी तुला दुष्यंतचं सत्य समजणं गरजेचं आहे."
आणि ती निघून गेली.
आरव बराच वेळ तिथेच बसून राहिला. त्याच्यासमोर ते सीलबंद पाकीट पडलेलं होतं. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती:
FOR THE DAY YOU FINALLY ASK THE RIGHT QUESTION
आरवचा हात हळूहळू त्या पाकिटाकडे गेला. आणि त्याच क्षणी त्याला जाणवलं की व्हिएन्नामध्ये त्याला उत्तर मिळालं नव्हतं. त्याला पुढचा प्रश्न मिळाला होता.
त्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात आता आरव एकटाच बसला होता. टेबलावर ते सीलबंद पाकीट पडलेलं होतं. काही क्षण तो त्याकडे फक्त पाहत राहिला. मग त्याने ते उघडलं.
आत एकच कागद होता आणि एक जुना फोटोग्राफ. आरवने आधी तो फोटोग्राफ हातात घेतला. तो सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीचा दिसत होता. एका कॉन्फरन्स हॉलमधला. काही लोक एका टेबलाभोवती उभे होते. त्याने लगेच दुष्यंतला ओळखलं. तो थोडा तरुण दिसत होता, पण तोच होता. त्याच्या बाजूला एड्रियन केलर उभा होता. हसतमुख, आत्मविश्वासाने भरलेला. जगाला ओळखीचा असलेला तोच चेहरा. पण आरवचं लक्ष तिथे थांबलं नाही. फोटोत अजून एक स्त्री होती. ती कॅमेऱ्याकडे पाहत नव्हती, तर काहीतरी दस्तऐवज वाचत होती. तिचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता, पण ती काही मिनिटांपूर्वी भेटलेल्या स्त्रीसारखीच दिसत होती. आरवचा श्वास मंदावला.
त्याने तो कागद उघडला. त्यावर दुष्यंतच्या हस्ताक्षरात काही ओळी होत्या.
जर तू हे वाचत असशील, तर व्हिएन्ना प्रोटोकॉल पूर्ण झाला आहे. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट समजून घे. 'ब्लॅक एम्बर'ची सुरुवात गुन्हेगारांनी केली नव्हती; ती आदर्शवादी लोकांनी केली होती.
आरव पुन्हा ते वाक्य वाचू लागला. 'ती आदर्शवादी लोकांनी केली होती.' त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
दुष्यंतच्या नोटमध्ये पुढे लिहिलं होतं:
आम्हाला वाटत होतं की जगातील मोठ्या संकटांना सरकारं उत्तर देऊ शकत नाहीत. आम्हाला वाटत होतं की माहिती, पैसा आणि प्रभाव योग्य दिशेने वापरला तर जग बदलता येईल. आम्ही चुकलो.
आरवच्या मनात केलरचा चेहरा चमकून गेला. पुढच्या ओळींनी त्याचा धक्का आणखी वाढवला.
एड्रियन केलर शत्रू म्हणून जन्माला आला नव्हता. तो आमच्यातलाच होता.
दुकानात अचानक खूप शांतता जाणवू लागली. आरवने पुढचा मजकूर वाचला.
सुरुवातीला आमचं ध्येय नियंत्रण नव्हतं, संरक्षण होतं. नंतर संरक्षणाचं रूपांतर प्रभावात झालं, प्रभावाचं रूपांतर नियंत्रणात झालं आणि नियंत्रणाचं रूपांतर भीतीत.
आरवला अचानक दुष्यंतचं एक जुनं वाक्य आठवलं, “'मी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती.”
आता त्याचा खरा अर्थ समजू लागला होता. हा फक्त वैयक्तिक विश्वासघात नव्हता, तर तो एका संपूर्ण विचारसरणीचा विश्वासघात होता.
तेवढ्यात दुकानाच्या बाहेर काहीतरी हालचाल झाली. आरवने पटकन तो कागद दुमडून खिशात ठेवला. खिडकीबाहेर त्याला माया दिसली. ती आत आली नाही, तिने फक्त दूरून एक इशारा केला. धोका नव्हता, पण काहीतरी घडलं होतं. आरव दुकानाबाहेर आला. मायाचा चेहरा गंभीर होता.
"काय झालं?"
ती काही क्षण काहीच बोलली नाही. मग म्हणाली, "आपल्याला वाटत होतं केलर मागे पडतोय."
"हो."
"तो मागे पडत नाहीये."
आरवचा चेहरा गंभीर झाला. मायाने टॅब्लेट पुढे केला. त्यावर एक एन्क्रिप्टेड रिपोर्ट उघडलेला होता. 'ब्लॅक एम्बर'चे काही अॅसेट्स गोठवले गेले होते, काही शेल नेटवर्क्स बंद पडली होती; पण त्याच वेळी एक नवीन नेटवर्क उभं राहत होतं. अधिक लहान, अधिक गुप्त आणि अधिक विकेंद्रित.
आरव काही क्षण त्या रिपोर्टकडे पाहत राहिला. मग त्याला जाणवलं की केलर पराभूत होत नव्हता, तो परिस्थितीशी जुळवून घेत होता.
त्याच क्षणी आरवच्या फोनवर एक नवीन संदेश आला. Unknown sender. फक्त एकच ओळ होती:
The first mistake was trusting Keller. The second was believing he worked alone.
आरवने मान वर करून समोर पाहिलं. रस्त्याच्या पलीकडे तीच स्त्री उभी होती. या वेळी ती थेट त्याच्याकडेच पाहत होती. काही क्षण गेले आणि ती गर्दीत नाहीशी झाली. आरवच्या हातात अजूनही दुष्यंतची ती नोट होती. पण आता त्याला जाणवत होतं की केलर हा शेवटचा शत्रू नव्हता; कदाचित तो फक्त सर्वांना सहज दिसणारा शत्रू होता.
************************************************************************************************************************
संध्याकाळ उतरू लागली होती. आरव पुन्हा त्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात आला. या वेळी कोणतंही इन्व्हिटेशन नव्हतं, ना कोणताही मेसेज. पण त्याला माहीत होतं की ती तिथेच असेल. आणि ती तिथेच होती खिडकीजवळ, त्याच जागी, त्याच शांततेने बसलेली. आरव तिच्यासमोर जाऊन बसला. काही क्षण दोघेही काही बोलले नाहीत. शेवटी आरवने दुष्यंतची ती नोट टेबलावर ठेवली.
"मी हे वाचलं."
स्त्रीने मान डोलावली. "मग तुला आता काही गोष्टी समजल्या असतील."
"नाही," आरव शांतपणे म्हणाला.
ती पहिल्यांदाच त्याच्याकडे इतक्या लक्षपूर्वक पाहू लागली.
"मला अजूनही एक गोष्ट समजत नाहीये," आरव म्हणाला.
"कोणती?"
"फॅमिली कंपार्टमेंट."
दुकानात पुन्हा शांतता पसरली.
"दुष्यंतने तो कंपार्टमेंट का तयार केला?"
त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पहिल्यांदाच. जणू ती अनेक वर्षांपासून टाळत असलेला प्रश्न अखेर समोर आला होता. ती काही वेळ खिडकीबाहेर पाहत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, "कारण केलर बदलला."
आरव काही बोलला नाही.
"सुरुवातीला आम्ही संकटं थांबवण्याचा प्रयत्न करत होतो," ती पुढे म्हणाली.
"मग?"
"मग केलरला जाणवलं की संकटं नियंत्रित करता येतात." तिने पुढचं वाक्य खूप सावकाश उच्चारलं, "आणि जे नियंत्रित करता येतं, त्यातून सत्ता निर्माण करता येते."
आरवला आधीच्या घडामोडींमधलं सगळं आठवू लागलं. "दुष्यंतने त्याला थांबवायचा प्रयत्न केला."
"हो."
"आणि तो अपयशी ठरला."
तिने मान डोलावली.
"मग फॅमिली कंपार्टमेंट?" आरवने विचारलं.
या वेळी ती बराच वेळ शांत राहिली. मग तिने टेबलावरून एक जुना फोटोग्राफ पुढे सरकवला. आरवने तो उचलला. हा फोटो त्याने आधी कधीच पाहिलेला नव्हता. त्यात दुष्यंत होता, ती स्त्री होती आणि त्यांच्यामध्ये एक लहान मूल होतं. फोटो जुना असल्यामुळे चेहरे फारसे स्पष्ट नव्हते, पण तो एक कौटुंबिक फोटो होता. आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"हे कोण आहे?"
स्त्रीने उत्तर देण्यासाठी काही क्षण घेतले. "ज्याचं संरक्षण करण्यासाठी फॅमिली कंपार्टमेंट तयार करण्यात आला, ते मूल."
आरवचा श्वास मंदावला. तो पुन्हा त्या फोटोकडे पाहू लागला.
"का?" त्याच्या तोंडून नकळत हा शब्द बाहेर पडला.
"कारण केलरला फक्त आर्काइव्ह नको होतं," ती म्हणाली, "त्याला भविष्यातील धोके नष्ट करायचे होते. पण दुष्यंतला सर्वात जास्त भीती आर्काइव्हची नव्हती."
"मग कशाची होती?"
स्त्रीने थेट त्याच्या डोळ्यांत पाहिलं. "त्याला भीती होती की केलर एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल."
दुकानात पुन्हा शांतता पसरली. आरवच्या हातातला तो फोटो थरथरला. कारण आता सगळा गोळाबेरीज हिशोब स्पष्ट झाला होता. फॅमिली कंपार्टमेंट कोणत्याही डॉक्युमेंटसाठी नव्हता, तो एका जिवंत व्यक्तीसाठी होता.
अचानक आरवला काही जुने तुकडे आठवले. 'गार्डियन'. 'प्रोटेक्शन'. 'आयडेंटिटी सील्ड'. 'सब्जेक्ट अनअवेअर'. त्याचा श्वास अडकला. त्याने हळूहळू मान वर करून पाहिलं. ती स्त्री अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांत ती सुरुवातीची शांतता नव्हती; तिथे कमालीची वेदना होती आणि अनेक वर्षांचं ओझं होतं.
"तुम्ही कोण आहात?" आरवचा आवाज आता केवळ कुजबुजण्याइतकाच राहिला होता.
बराच वेळ खोलीत फक्त शांतता राहिली. मग ती म्हणाली, "माझं नाव एलेना व्होल्कोव्ह आहे."
हे नाव आरवने आधी ऐकलं होतं, पण आज ते ऐकताना पूर्णपणे वेगळं वाटत होतं.
एलेना पुढे म्हणाली, "दुष्यंतने फॅमिली कंपार्टमेंट तयार केला. मी त्याला तो सील करण्यात मदत केली. आणि गेली पंचवीस वर्षं..." तिचा आवाज क्षणभर थांबला, "...मी त्याचं रक्षण करत होते."
आरव काहीच बोलू शकला नाही. सत्य अगदी समोर उभं होतं, पण अजूनही ते पूर्ण उघडलं नव्हतं.
एलेना हळू आवाजात म्हणाली, "फॅमिली कंपार्टमेंट उघडण्यापूर्वी तुला दुष्यंतबद्दल अजून एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. कारण पुढचं सत्य तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकेल."
दुकानाच्या बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला. आणि अनेक वर्षांपासून बंद असलेलं ते दार पहिल्यांदाच उघडण्याच्या अगदी जवळ पोहोचलं.
भारी सुरुय
भारी सुरुय
मस्त . उत्सुकता वाढलीय. पुढचे
मस्त . उत्सुकता वाढलीय. पुढचे भाग येऊं दे लवकर
जबरदस्त
जबरदस्त
एड्रियन केलर तयार करून दे असे
एड्रियन केलर तयार करून दे असे म्हणल्यावर गुगल जेमिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेली ही छबी.
धन्यवाद झकासराव, सामी,
धन्यवाद झकासराव, सामी, Sharadg आणि जेम्स वांड.