भिती

Submitted by विजय देशमुख on 1 July, 2026 - 12:19

मला ना असं फाड फाड इंग्रजी बोलता यायला पाहिजे!"
"हं..."
"अरे, मी काय म्हणतेय, मला मदत करणार आहेस का?"
"ठीक आहे, मग बोल इंग्रजीत"
"पण सुरुवात कशी करायची, हेच मला कळत नाही."
"सुरुवात? बोलायला सुरुवात कर. बस! बाकी काही नाही."
"म्हणणं सोपं आहे रे."
"का ?"
"मी जेव्हा इंग्रजी बोलते ना, तेव्हा मला बोलता येत नाही असं नाही. पण मी बोलले की लोक माझ्याकडे अगदी विचित्र नजरेने बघतात."
"अरे, लोकांचं काय आहे!"
"अरे, लोक माझ्याकडे असे विचित्रासारखे बघतात. म्हणजे त्यांना असं वाटतं, 'ही फारच शहाणी झालीय. चार लोकांमध्ये इंग्रजी काय बोलते! आपल्याला काय बोलता येत नाही का?'"
"अच्छा..."
"अरे, 'अच्छा' काय? तू थोडं सिरियसली घे ना, यार."
"अरे, मी सिरियसलीच बोलतोय. बरं, तुला कसं कळलं की लोक तुझ्याबद्दल असंच विचार करतात?"
"मला माहीत आहे ना, ते माझ्याबद्दल काय विचार करतात."
"अच्छा... म्हणजे तू मनकवडी झालीयेस? तुला लोकांच्या मनातलं कळतं?"
"नाही... हे बघ, तू सिरियसली घे."
"अरे, मी मगापासून सिरियसलीच बोलतोय. बघ, तुला जर लोकांच्या मनातलं कळत असेल ना, तर यावर्षी बॉस तुला इन्क्रिमेंट देणार आहे की नाही, हेही कळत असेल ना?"
"तू सिरियसली घेणार आहेस का?"
"बघ, मी अतिशय सिरियसली सांगतोय. तुला इंग्रजी बोलता येत नाही, हा प्रॉब्लेमच नाहीये. लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात, हाच तुझा खरा प्रॉब्लेम आहे. बरोबर?"
"कदाचित तू बरोबर बोलतोयस. म्हणजे, इंग्रजी बोलायची मला तेवढी भीती वाटत नाही. पण लोक काय बोलतील, लोकांना काय वाटेल, माझं चुकलं तर काय होईल... कदाचित हीच भीती वाटत असावी."
"बघ, लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहिलं, तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, लोक तुझ्याबद्दल असाच विचार करत असतील, हेही कदाचित खरं नसेल. उलट, त्यांना कदाचित असं वाटत असेल, 'अरे, ही जशी इंग्रजी बोलतेय ना, तसं आपल्यालाही बोलता आलं पाहिजे. पण आपल्यात तसा कॉन्फिडन्स नाही. तो कसा आणायचा?' असाही विचार ते करत असतील."
"कदाचित ते खरं असेल. पण मग मला सांग, आता लोकांबद्दल जी भीती वाटते, ती कशी घालवायची?"
"भीती तीन प्रकारची असते. एक म्हणजे एखादं काम करण्याआधी वाटणारी भीती, दुसरी म्हणजे काम करताना वाटणारी भीती आणि तिसरी म्हणजे काम झाल्यानंतर वाटणारी भीती."
"हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना?"
"हो. हे आपले एनएसए, अजित डोवाल यांचं वाक्य आहे. मी फक्त ते मराठीत सांगितलं."
"अच्छा! कॉपी पेस्ट. बरं, सांग ना मग. यापैकी माझी कोणती परिस्थिती आहे?"
"मला वाटतं पहिली. तू इंग्रजी बोलायच्या आधीच 'आपल्यात कॉन्फिडन्स नाही' किंवा 'लोक काय म्हणतील' असा विचार करतेस. असा विचार करूच नको. एकदाच बोलून टाकायचं. नंतर जे होईल, ते होईल."
"हो... पण मला एक सांग. आपण एकटंच इंग्रजी बोलत असतो आणि दहा लोक आपल्याकडे विचित्रासारखे बघत असतात. तुला कसं वाटेल?"
"त्यात काय वाटायचं?"
"तू असं कधी केलंय का? म्हणजे तू इंग्रजीत बोलतोयस आणि बाकीचे सगळे तुझ्याकडे नुसते स्तब्ध होऊन पाहतायत."
"हे मी बऱ्याचदा केलंय. मी एका छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालो. माझा मित्र शंतनू पांडे आणि मी, आम्ही दोघंही बिनधास्त मराठी साहित्यावर, मराठी लेखकांवर, अगदी मराठीच्या धड्यांवरसुद्धा इंग्रजीत डिस्कस करायचो. आणि तेही रस्त्याने, बाजारातून चालतानासुद्धा.
"वॉव यार"
"लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहायचे. पण आम्ही कधी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. पाच-सहा दिवसांनी त्यांनाही सवय झाली असावी. 'हे दोन विचित्र मुलं आहेत. इंग्रजीत काहीतरी बडबड करत जातात,' एवढंच त्यांना वाटत असेल."
".."
"लोकांना सुरुवातीला सवय नसते. एकदा सवय झाली की मग त्यांना त्याचं काहीच वाटत नाही."
"ठीक आहे. मी प्रयत्न करून बघते. पण खरंच हे मला जमेल का?"
"न जमायला काय झालं? माणसाला ज्या गोष्टीची भीती वाटते ना, ती भीती घालवायची असेल, तर तेच ते काम पुन्हा पुन्हा केलं पाहिजे."
"खरंच? त्याच्या फायदा होतो?"
"तुला माहिती आहे, यूट्यूबर्स किंवा सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स... त्यांचे सुरुवातीचे व्हिडिओ पाहिले, तर 'हे काय मूर्खपणा करतायत!' असंच वाटेल. पण आता बघ. आज त्यांच्यामागे किती लोकं फॉलोअर्स आहेत."
"खरंय"
"आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. थोडंसं निर्भय होणं आवश्यक आहे."
"हूं, पटतंय मला. पण काही लोक रीलच्या नादात काहीच्या काही करतात."
" हो, त्यासाठीच श्री समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे, 'काहीतरी लिहीत जावं, पण काहीच्या काही नाही. एवढी एक मर्यादा आपण सांभाळली, तर बस! बाकी काहीच नाही."
"हा .."
"आणि हळूहळू लोकच आपल्याला फीडबॅक देतात. काही फीडबॅकमुळे तुला चांगलं वाटेल, काहीमुळे नाही वाटणार. जे चांगलं वाटलं, ते घ्यायचं; जे नाही वाटलं, ते सोडून द्यायचं."
"ओके"
"कोणी काय फीडबॅक द्यावा, हे आपल्या हातात नसतं. आणि प्रत्येकालाच आपली गोष्ट आवडली पाहिजे, असंही नाही. राईट?"
"असं भीती घालवण्यासाठी तू काही करतो आहेस का?"
"हो, मलाही लेख लिहिताना, लोकांना काय वाटेल, असं वाटतच. पण त्याही पेक्षा मी "#३० दिवसांत ३० लिहू शकेन का याची भीती वाटत होती. रोजच एखादं काम करायच इतकही सोपं नसतं. पण मी घेतलं चॅलेंज. बघू जे होईल ते होईल."
"Absolutely Right. मी इंग्रजीसाठी प्रयत्न करते, तू लिखाणासाठी कर"
"That's the spirit! बघ, इंग्रजी बोलायला शिकायचं असेल, तर एकच नियम लक्षात ठेव—बोलत राहायचं."
"आणि भीती घालवायची असेल, तर करून पाहायचं"

#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६

Group content visibility: 
Use group defaults