धक्कादायक, मर्मभेदक आणि भयावह कथांच्या अफाट दालनात

Submitted by हेमंतकुमार on 29 June, 2026 - 02:12

गेल्या पंधरा-वीस वर्षात कथावाचनापासून मनाने बराच लांब गेलो होतो. एकंदरीतच काल्पनिक साहित्याची गोडी झपाट्याने ओसरली होती. याउलट वास्तवदर्शी, माहितीपर आणि टीकाटिपणीयुक्त लेखन वाचायला अधिक आवडू लागले होते. नाही म्हणायला कोविडच्या प्रथम पर्वात या आवडीत काहीसा बदल झाला होता. तेव्हा सर्वांनाच घरात कोंडलेल्या अवस्थेत बराच काळ काढायचा होता. त्यामुळे वाचनाचे प्रमाण आपोआप वाढले. अधिक वाचन करायचे तर त्यात विविधतेची गरज भासते. म्हणून जरा कात टाकून जरा वेगळा विचार केला. कित्येक वर्षात आपण इंग्रजी ललित साहित्याकडे काहीशी पाठ फिरवलेली होती हे जाणवले. मग सणक आल्यागत काही जुन्या गाजलेल्या इंग्रजी साहित्यिकांच्या कथा जालावर वाचल्या. त्यातून एका वेगळ्या लेखनालाही स्फूर्ती मिळाली. परिणामी ‘विदेशी कथा परिचय’ या प्रकारची लेखमाला इथे सादर केली होती.

परंतु 2022 नंतर पुन्हा एकदा वाचनाचे काटे उलटे फिरले आणि कथावाचन परत मागे पडले. गेल्या एक-दोन वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास अफाट वेगाने होताना आपण पाहतोय. त्यास अनुसरून त्याच्या फायद्यातोट्यांवर मतांतरे व्यक्त करणारे बरेच लेखन वाचण्यात येऊ लागले. अशाच एका इंग्लिश लेखातून सन 1954च्या ‘The Great Automatic Grammatizator’ या अफलातून कथेचा उल्लेख आढळला. त्या कथालेखकाचे नाव कधीच ऐकलेले नव्हते आणि म्हणून कुतूहल खूप चाळवले. जालावर एक-दोन टिचक्या मारताच लक्षात आले की ती प्रसिद्ध कथा वाचनासाठी मुक्त आहे. त्या कथेत संगणक माणसाप्रमाणेच विचार करू शकतो आणि त्यातून किमयाच किमया घडवू शकतो, हा विज्ञान-विचार एका प्रभावी विडंबनाच्या रूपाने आलेला आहे. या भन्नाट कथेच्या अक्षरशः प्रेमात पडलो आणि अर्थातच Roald Dahl या तिच्या लेखकाच्या देखील. त्या कथेतील बारकावे समजून घेण्याच्या उद्देशाने ती आतापर्यंत चारदा वाचून झालीय आणि निज वाचनखुणेतही स्थान पटकावून बसली आहे !

प्रौढांबरोबरच मुलांसाठीही स्वतंत्र साहित्यनिर्मिती केलेले Dahl हे विसाव्या शतकातील नावाजलेले आणि कमालीचे लोकप्रिय ब्रिटिश कथाकार होते. त्यांच्या पुस्तकविक्रीचे भले मोठे आकडे डोळे विस्फारून टाकतात. त्यांच्या सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह जालावर मिळाल्यानंतर एखादा खजिनाच गवसल्याचा आनंद झाला. गेले दोन महिने या कथांच्या वाचनात अखंड बुडून गेलेलो आहे. त्यापैकी काही निवडक कथांचा परामर्श आणि त्यातून भावलेले मानवी स्वभावाचे विविध पैलू या लेखाद्वारे सादर करतो.

कथांचे विषय, त्यातली वातावरणनिर्मिती, पात्रांचे सामाजिक व आर्थिक स्तर व स्वभाव आणि कथांच्या आशयात भरपूर विविधता आहे. काही कथा तत्कालीन उच्चवर्गीय पाश्चात्य समाजाच्या दिवाणखान्यात घडतात आणि तिथल्या शाही मेजवान्यांमध्ये मद्याचे अक्षरशः पाट वाहत असतात. तिथे जगातल्या उत्तमोत्तम वाईन्सची शौकीन असलेली माणसे आपल्याला भेटतात. तशा कथांमधून वाचकांसमोर जगातल्या दर्जेदार वाईन्सचा जणू समग्र माहितीपटच सादर होतो. काही कथा सामान्य कुटुंबात तर अन्य काही थेट माळरानावरही घडतात. कार अथवा जहाज प्रवासादरम्यान घडलेल्या कथा तर रोमांचक आहेत.

अनेक कथांतील पात्रांना दुसऱ्याशी पैज लावण्याचे भयंकर आकर्षण आहे. पैशांसाठी लावलेली पैज हरल्यास ही माणसे काय काय पणाला लावू शकतात हे वाचल्यावर आपण थरारून जातो. पैजेसाठी पैसे लावणे ही तर सामान्य गोष्ट झाली. परंतु एखादा माणूस स्वतःच्या मुलीचे समोरच्या थोराड माणसाशी लग्न करून द्यायलाही तयार आहे तर अजून एखादा आपल्या हाताची करंगळी देखील कापून द्यायची बोली कबूल करतो आणि अन्य एखादा आपल्या पाठीची त्वचा देखील; तर दुसरा एखादा माणूस जहाजप्रवास करीत असताना चक्क समुद्रात उडी मारून काही जीवघेणे धाडस करतो. अशा सर्व पैजकथांची वर्णने अत्यंत रसभरीत, कमालीची उत्कंठावर्धक व रहस्यमय आहेत. त्यातून माणसाचे लोभ, हाव आणि जिवावर उदार होऊन नियतीवर मात करू पाहण्याची तीव्र इच्छा दिसून येते. कथांमधील धक्कातंत्र, उलट्यापालट्या कलाटण्या आणि अनपेक्षित शेवट खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. हिंसाचाराच्या काही कथांमध्ये मात्र प्रत्यक्ष हिंसेचे वर्णन टाळून कथान्त काहीसे संदिग्ध केले आहेत. तिथे संबंधित व्यक्ती मारली गेली अथवा नाही याचा निर्णय लेखक वाचकावर सोडून मोकळा होतो. अर्थात त्यातून व्यक्त झालेली भयानकता आपल्याला नक्कीच सुन्न करते. अशा काही कथा आल्फ्रेड हिचकॉक (व अन्य काही) या समकालीन भयपट दिग्दर्शकांनी टीव्ही मालिकेसाठी निवडल्या होत्या यात नवल नाही.

या लेखकाच्या विपुल कथालेखनापैकी आतापर्यंत सुमारे वीस कथा मी वाचल्या. त्यापैकी सर्वाधिक आवडलेली म्हणजे अर्थातच उपरोल्लेखित ‘The Great A G’. तारताम्याविना केलेल्या विज्ञानवापराचे सुरेख विडंबन त्यात प्रसन्न शैलीत केलेले आहे. तिच्या खालोखाल भावलेली आणि जिच्याबद्दल वाचकांना सांगितले पाहिजे असे राहून वाटते ती कथा म्हणजे Genesis and Catastrophe: A True Story. शीर्षकावरूनच गांभीर्य जाणवून देणारी आणि एका ऐतिहासिक सत्याला समांतर जाणारी ही कथा आहे. निर्मिती आणि विनाश हे परस्परविरोधी शब्द एकत्र पाहिल्यानंतरच त्यातल्या घटनेचा किंचित अंदाज येतो. बाळंतपणाच्या दवाखान्यात घडलेली ही कथा खरीच ‘लघु’कथा आहे. कथेच्या पहिल्या 80% भागात ती सामान्य वळणाने जाते आणि शेवटाकडे येताना देखील वाचकाला अंतिम कलाटणी काय मिळणार आहे याचा नीटसा अंदाज येत नाही. मात्र जेव्हा त्या नवजात बालकाच्या नावाचा आणि पाठोपाठ त्याच्या कुटुंबाच्या आडनावाचा उल्लेख होतो त्या क्षणी आपल्या डोळ्यांसमोर एक काळाकुट्ट जागतिक इतिहास उभा राहतो. आता अधिक न ताणता कथेतील घटना सांगतो.

ऑस्ट्रियाच्या एक बाई त्यांच्या चौथ्या प्रसुतीसाठी दवाखान्यात आल्यात. ही प्रसूती व्यवस्थित होऊन त्यांना मुलगा होतो तरी त्या खूप चिंतेत असतात. डॉक्टरांनी त्याचे कारण विचारल्यावर त्या सांगतात की गेल्या 18 महिन्यांमध्ये त्यांची यापूर्वीची तीन बालके एक एक करून मरण पावलीत. बाईंचा नवरा दारुड्या आणि स्वभावाने कठोर आहे. या परिस्थितीत त्या बाईंना आपले चौथे मूल तरी जगेल का नाही या भीतीने ग्रासलेले आहे. आपल्यात काहीतरी आनुवंशिक दोष असल्यामुळेच आपली मुले जाताहेत असा त्यांचा ग्रह झालेला आहे. आता जन्मलेले मूल सुद्धा अशक्तच आहे अशी त्यांची समजूत आहे. परंतु डॉक्टर त्यांना वारंवार सांगतात की हा मुलगा खरोखरीच तब्येतीने चांगला आहे. डॉक्टर त्यांना धीर देत म्हणतात की आता काळजी सोडा आणि या छान मुलाचे नाव काय ठेवणार आहात ते मला सांगा. त्यावर त्या म्हणतात की, माझ्या नवऱ्याचे नाव Alois असल्याने आम्ही या मुलाचे नाव Adolfus असे ठेवू. नाव छान असल्याची प्रतिक्रिया देऊन डॉक्टर म्हणतात,
“म्हणजे त्याला घरी तुम्ही Adolf असे म्हणणार तर” ! यावर बाई अधिकच चिंतित होतात आणि म्हणतात की डॉक्टर कशाला तुम्ही नाव विचारलेत? आता मागच्या माझ्या मुलाप्रमाणेच हा पण मरून जाईल. दरम्यान नर्सने ते तान्हे मूल स्वच्छ करून त्याच्या आईला दाखवायला आणलेले असते. तरीसुद्धा त्या बाई अजून मुलाकडे बघायला तयारच नसतात. अखेर धाडस करून त्या बघतात आणि त्याला प्रेमाने कुरवाळतात. तेवढ्यात नर्स सांगते की बाळाचे बाबा बाहेर आलेले आहेत.

इथपर्यंत वाचकाला ही एका सामान्य कुटुंबातली बाळंतपणाची घटना वाटत असते. या क्षणी लेखक त्या वडिलांचे आडनाव सांगून मोठा रहस्यभेद करतो. डॉक्टर त्या माणसाला आत बोलवत असतानाच मोठ्याने विचारतात,
“कोण, Herr Hitler होय तुम्ही?”
त्यावर तो माणूस होय म्हणतो. या क्षणी वाचकांना समजते की, अशा प्रकारे अडॉल्फ हिटलरचा जन्म झालेला आहे आणि त्याचबरोबर या कथेच्या शीर्षकातला ‘ ए ट्रू स्टोरी’ या उत्तरार्धाचा उलगडा होतो !

आता कथा पुढे नेतो.
बाळाचे वडील बाळाला निरखून पाहतात आणि बायकोला उद्वेगाने म्हणतात की हे मूल तर आपल्या मागच्या मुलापेक्षाही छोटेसे दिसतंय. डॉक्टर त्यालाही धीर देतात. तरीसुद्धा त्या नवरा बायकोना हे मूल देखील मरणारच असेच वाटत असते. डॉक्टर आणि नर्सने वारंवार धीर देऊनही हे जोडपे काही पूर्वीच्या दुःखातून बाहेर यायला तयारच नसते. अखेर बाळाची आई कळवळून म्हणते,
“ तीन मुलांचा मृत्यू मी सहन केलाय हो, आता माझी सहनशक्ती संपलेली आहे. देवा ! काहीही कर आणि या चौथ्या मुलाला वाचव रे बाबा !”
बस्स ! इथे कथा संपते.

कथा संपल्याक्षणी विकिपीडियावर झडप घालून वास्तवातील हिटलरची कौटुंबिक माहिती वाचली तेव्हा लक्षात आले की, त्याच्या आई-वडिलांची आणि तीन मृत्यू झालेल्या भावंडांची नावे देखील या कथेत दिल्याप्रमाणेच जशीच्या तशी आहेत (पालक Alois- Klara आणि मृत भावंडे Gustav, Ida, & Otto). कथेतला ॲडॉल्फ जन्मानंतर जगेल की नाही याची आई वडिलांना शाश्वती नसताना वास्तवातील ॲडॉल्फ हिटलर मात्र चक्क ५६ वर्षे जगलेला आहे ! इथेच, एका बाळाच्या जन्मण्यातच मोठ्या जागतिक विनाशाची बीजे रोवली गेली होती, हा विचार वाचकाला अस्वस्थ करतो हे नक्की. कथेच्या समर्पक शीर्षकाबद्दल आणि त्यातल्या Catastrophe या चपखल शब्दाबद्दल लेखकाला 100% गुण द्यावेसे वाटतात.
. .
अशा एकाहून एक सरसकथा या लेखकाच्या भात्यात आहेत. एका कथासंग्रहाचे 'TALES OF THE UNEXPECTED' हे नाव देखील बोलके आहे. अनेक कथांमधून विसाव्या शतकातील ब्रिटिश समाजजीवनाचे केलेले चित्रण लोभसवाणे आहे.
काही मोजक्या कथांतील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा ओझरता उल्लेख करणे आवश्यक वाटते. ‘Dip in the Pool’ या कथेतील नायक मध्यमवर्गीय असून त्याने टीव्हीच्या बरोबरीनेच Encyclopædia Britannica या ज्ञानकोशाचे खंड देखील मासिक हप्त्यावर घेतलेले आहेत हे रोचक वाटले. या सर्व कर्जातून मुक्त होऊन छानपैकी जीवन जगता यावे या उद्देशाने तो एका जीवघेण्या पैजेलाही तयार होतो. ‘The bookseller’ ही कथा दुर्मिळ पुस्तके विकणाऱ्या दुकानाचा मालक आणि त्याची स्वीय सचिव असलेली प्रेयसी यांच्याबद्दल आहे. प्रत्यक्ष पुस्तके विकण्यापेक्षाही त्या दुकानाच्या बुरख्याआड त्यांचा धनाढय लोकांच्या फसवणुकीचा एक भन्नाट धंदा राजरोस चालू असतो. तो कसा उघडकीस येतो हे वाचणे रंजक आहे. फसवणूक ही बऱ्याच कथांची मध्यवर्ती कल्पना असून अगदी घरगुती पातळीवर सुद्धा पत्त्यांचा ब्रिज पैसे लावून खेळताना सुद्धा लोक सांकेतिक हालचालीतून कशा लांडयालबाड्या करत असतात हे ‘My lady love, my dove’ या कथेत पाहण्यासारखे आहे. The hitchhiker या कथेतल्या उच्चप्रतीच्या खिसेकापूसाठी वापरलेला ‘fingersmith’ हा अभिनव शब्ददेखील दाद देण्याजोगा आहे.

काही कथांमधून आलेल्या विचित्र आणि विक्षिप्त संकल्पना, त्यानुसार वागणारी सळसळती पात्रे आणि वाचकाला चकित करणाऱ्या कलाटण्या अशी अनेक कथावैशिष्ट्ये सांगता येतील. जालावरील कथासंग्रहाच्या परिचयात म्हटल्यानुसार या वाचनीय कथा खरोखरच ‘utterly addictive’ आहेत यात शंका नाही.
असो. विस्तारभयास्तव आता आवरते घेतो.

अखेरीस एका पत्रकारांना मला धन्यवाद द्यायला हवेत. ‘फर्स्ट पोस्ट’ मधील ‘AIचे परिणाम-दुष्परिणाम’ यावरील एका स्फुटलेखनात त्यांनी Dahl यांच्या ‘The great … ‘ या गाजलेल्या कथेचा उल्लेख केल्याने मला अज्ञात असलेले हे सशक्त कथाकार प्रथमच माहीत झाले आणि त्यांच्या एकाहून एक सुरस व उत्कंठावर्धक कथा वाचता आल्या. या वाचनातून रंजनाबरोबरच गेल्या शतकातील पाश्चात्य संस्कृतीच्या अंतरंगात डोकावून पाहता आल्याचेही समाधान वाटते.
*************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< असो. विस्तारभयास्तव आता आवरते घेतो.
>>>>

प्रतिसादात असले काही भय बाळगू नका. आणखी वाचायला आवडेल.
पुस्तकांची ओळख करून देणारे लेख वाचायला छान वाटतात. हा सुद्धा छान जमला आहे.

Roald Dahl ची माझी ओळख तीस वर्षांपूर्वी झाली. माझ्या मुलांसाठी मी Roald Dahl ने लहान मुलांसाठी लिहिलेली जवळ जवळ सगळी पुस्तके विकत घेतली. त्यात BFG, Charlie and the Chocolate Factory, Matilda, The Witches ही होती. पैकी Charlie and the Chocolate Factory, चा सिनेमा ही बघितला. त्यात माझा आवडाया Johney Depp हा होता,
पुढे Roald Dahl हे एक गूढ विचित्र आणि भयकथा लिहिणारे एक अग्रणी लेखक अशी ओळख झाली.
खरोखर एक महान लेखक आणि त्यांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

लेखक आणि कथा परिचय नेहमीप्रमाणे उत्तम. या लेखकाचं लेखन वाचलेलं नव्हतं. आता नक्की वाचणार. या लेखाबद्दल अनेक आभार.

* प्रतिसादात असले काही भय बाळगू नका. आणखी वाचायला आवडेल.
>>>>> वीस कथा वाचल्यामुळे प्रत्येकाबद्दल लिहायचे तर लेख फार मोठा होईल म्हणून नमुन्यादाखल काही कथांबद्दल लिहिले. तसेच अन्य कोणाला या कथा वाचाव्याशा वाटल्यास सगळाच रहस्यभेद नको असाही हेतू आहे.

काही कथांमधील विक्षिप्त पात्रे ही खरंच वल्ली आहेत. एका कथेतला माणूस झाडांना इजा झाल्यास त्याच्यावरही डेटॉलने मलमपट्टी करतो हे त्यातले एक उदाहरण !

"The nicer the man seems to be, the more suspicious you must become."
“You can always spot a gentleman by the shoes he wears,”
ही वचन रत्ने Dahl च्या "दि अम्ब्रेला मॅन" ह्या कथेतून वेचलेली आहेत. अत्यंत मजेदार तशीच मर्म भेदक. कथा मुळातून वाचावी अशी आहे.

धन्यवाद !
..
* ही वचन रत्ने
>>>वा, क्या बात है ! यातले पहिले वाक्य मी लिहून ठेवलेलेच निघाले . . .
तसेच 'द बुकसेलर' मधील मालकाच्या प्रेयसीच्या गळ्याखालील भागाचे जे वर्णन केलेले आहे ते जिज्ञासूंनी मुळातच वाचावे हे उत्तम ! मराठी भाषांतर करुन त्याची गंमत घालवण्यात अर्थ नाही. Happy

छान परिचय.
कथा संग्रहाची नावे काय आहेत.

वरील संग्रहातील The Surgeon ही कथा आज वाचली. अतिशय सुंदर.
निव्वळ कथा नव्हे, तर नाट्यमय घटनांनी भरलेला चलत् चित्रपटच जणू !

एक मौल्यवान वस्तू घरात लपवण्यासाठी जी भन्नाट जागा निवडली जाते ती वाचून आपण थक्क होतो.
जरूर वाचा.

वर दिलेल्या कथासंग्रहातील My lady love, my dove वाचली. तितकी काही धक्कादायक निघाली नाही. दोन जोडप्यांची गोष्ट आहे, एक वयस्क सुखवस्तू जोडपं एका तरूण जोडप्याला घरी ब्रिज खेळायला बोलावते. पुढे काय होते , हा सगळा एक बिझनेसच असतो याबद्दल.

दुसरी एखादी वाचून बघते. लिंक बद्दल धन्यवाद द्यायलाच पोस्ट लिहिली खरेतर. Happy

अस्मिता छान वाटले.
Neck
Skin
Man from the south
या तिन्हीमध्ये धक्का, भीती, हिंसा मिळेल.

छान परिचय.
लेखकाचं लेखन वाचलेलं नव्हतं. आता नक्की वाचणार.>>>>+१