झाकोळ

Submitted by मोहना on 19 June, 2026 - 08:12

"उठून जायचं नाही. बस इथे." रत्नाकर इतक्या जोरात ओरडले की चिडून उठलेला दत्ता घाबरून परत बसला. मुक्ता तर बाबांच्या आवाजाने रडकुंडीलाच आली. दोघांच्या चेहर्‍याकडे पाहताना रत्नाकरना आपण खूप मोठी चूक करतोय असं वाटलं. अजूनही निर्णय बदलावा असं वाटून गेलं. मुलांसमोर अखेर त्यांनी विषय काढला होता पण परिणाम काय होतील याचा अंदाज नव्हता. दत्ता ताडकन उठून निघून चाललेला पाहून ते चिडले.
"मी हे सुखासुखी ठरवलेलं नाही. तुमच्यासाठीच पुन्हा लग्न करतोय. मला एकट्याला नाही झेपणार तुम्ही दोघं. मुक्ता मोठी होतेय." कठोर स्वरात रत्नाकर म्हणाले.
"बाबा, नका ना करू तुम्ही लग्न. मुक्ताची काळजी करू नका. तिला सांभाळेन मी." दत्ता काकुळतीला येऊन म्हणाला.
"मी लहान नाही कुणी सांभाळायला." मुक्ताने दत्ताकडे रागारागाने पाहिलं. रत्नाकर काहीच बोलले नाहीत.
"तुम्हाला करायचंच असेल लग्न तर आम्ही हे घर सोडून गेलो की करा." धुसफुसत्या स्वरात दत्ता म्हणाला. त्याच्या मनात भावनांचं तुफान उसळलं होतं. राग, चीड, दु:ख काय नक्की वाटतंय तेच कळेनासं झालं होतं त्याला. तो चिडत होता, विनवणी करत होता, समजावल्यासारखं बोलत होता. रत्नाकरना मुलांना जवळ घेऊन शांतपणे बोलावंसं वाटत होतं. पण ते त्यांना जमत नव्हतं. निर्णय घेऊन अमलात आणण्याची त्यांना सवय होती. आतापर्यंत इतका वाद कुणीही घातला नव्हता त्यांच्याशी. आपल्या निर्णयाचं समर्थन अंगठ्या एवढ्या मुलांना देणं त्यांना जमेना. असा अवघड क्षण आयुष्यात येईल याची कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती. मुलांच्या हट्टीपणापुढे त्यांची सहनशक्ती संपली. समजावून सांगितलं तरी दोघांची वयं धड कळण्याची नव्हतीच. दत्ता आणि मुक्ता जेमतेम आठ आणि तेरा वर्षांचे. स्वत:ची भूमिका कितीही समजावून सांगितली तरी ती त्यांच्यापर्यंत पोचणार नाही हे त्यांना कळत होतं.
"हे लग्न मी तुमच्यासाठी करतोय. माझ्य़ासाठी नाही. सगळं ठरलंय. आता त्यात बदल होणार नाही. लग्नाची नोटीस दिली आहे महिन्याभरापूर्वी. पुढच्या आठवड्यात आहे लग्न. नोंदणी पद्धतीने. मी एकटाच जाऊन येईन. एका दिवसाचाच प्रश्न आहे. एक रात्र तुमच्या सोबतीसाठी शेजारच्या मावशी येतील." कठोर स्वरात ते म्हणाले आणि दत्ताला उठून जायचं नाही बजावता बजावता तेच चपला पायात सरकवून बाहेर पडले.

"मी पळून जाणार आहे बाबांची बायको आली की." शेजारच्या मावशी काही बोलल्या नाहीत. त्या वाचत होत्या ते वर्तमानपत्र त्यांनी त्याच्यासमोर धरलं.
"काय आहे?" दत्ताला कळेना.
"जिथे असशील तिथून परत ये. आम्ही तुला ओरडणार नाही. तुझी आई तू गेल्यापासून अंथरुणाला खिळली आहे." वर्तमानपत्रात कुणा पालकाने लिहिलेलं पत्र मावशींनी वाचून दाखवलं. "अशी अवस्था व्हायला हवी आहे का तुला?"
"आई अंथरुणाला खिळली आहे त्यातली. इथे बाबांना काही वाटणार नाही मी गेलो तर."
"असं कसं? वडील आहेत तुझे ते."
"मग आम्ही नको म्हणून सांगितलं होतं त्यांना लग्न. तरी का करतायत ते? हट्टी नुसते."
"आता नाही तुला समजणार ते बाळा. तू मोठा झालास की समजेल सारं. तुमची आबाळ व्हायला नको हाच हेतू आहे तुझ्या बाबांचा. आणि त्यांनी तरी का एकट्याने काढायचं आयुष्य?"
"आम्ही आहोत की. आणि आमचं आम्ही सांभाळू ना स्वत:ला. त्यासाठी बाबांनी पुन्हा लग्न कशाला करायला हवं?" दत्ताला त्याच्या बाबांनी लग्न करायचं ठरवलंय हेच मान्य नव्हतं. आणि त्याला ते मान्य नव्हतं म्हणून मुक्तालाही. दोन दिवस मावशी दोघांचीही समजूत घालत राहिल्या.

रत्नाकर लग्न करून यायच्या दिवशी दत्ता आणि मुक्ता दिवसभर भटकत राहिले. दोघांनाही घरी परत यायचं नव्हतं आणि कुणाच्या घरीही जायचं नव्हतं. मित्र - मैत्रिणींना तोंड दाखवायची लाज वाटत होती. त्यांच्या घरी गेलं तर बाबांच्या बायकोबद्दल सर्वांच्या आया प्रश्न विचारणार याची दोघांनाही खात्री होती. दोघं निरुद्देश भटकत राहिले. भुकेलेल्या, कोमेजलेल्या चेहर्‍याने अल्पशा आजारात अचानक गेलेल्या आईच्या आठवणीत रमले.
"आपलीच आई का नेली देवाने? आपण वाईट वागलो का? आई म्हणायची, ’वाईट वागलं की देव शिक्षा करतो.’" मुक्ताच्या शंकांचं निरसन दत्ता आपल्यापरीने करत होता.
"देव लहान मुलांना नाही करत शिक्षा."
"म्हणजे बाबांनाच केली त्याने शिक्षा. आईचं ऐकायचे नाहीत कधी ते." मुक्ताला तिच्या बाबाचा खरंच राग आला. "आईला नेलं म्हणून बाबांना देवाचा राग आलाय का? म्हणून दुसरी आई आणायचं ठरवलं असेल का त्यांनी आपल्याला?" मुक्ताचा गोंधळ उडाला.
"चक्रम आहेस. त्यांनाच हवी होती दुसरी बायको." दत्ताने तिरसटून उत्तर दिलं. दोघांना नविन आईचं तोंडही बघायचं नव्हतं. पण घर सोडून जायचं कुठे ही मोठी चिंता त्यांना छळत होती. आपोआप पावलं घराच्या दिशेनेच वळली. मुक्ताला बाबांची बायको कशी असेल ते खरं तर बघायची उत्सुकता होती. पण दत्ताच्या रागीट चेहर्‍याकडे तिचं लक्ष गेलं तसा तिनेही आपला चेहरा गंभीर केला. मुकाट्याने दोघं घरात शिरले. घरात शांतता होती. बाबा संतापणार याबद्दल दत्ता आणि मुक्ताला खात्री होती. पण समोर आली ती नविन आई. तिच्याकडे दोघं बघत उभे राहिले. बाजूला बाबा उभे होते. मुक्ता त्यांना जाऊन बिलगली. दत्ताने रागीट कटाक्ष टाकला तशी हळूच ती दत्ताच्या बाजूला परत येऊन उभी राहिली. आता काय करायचं ते दोघांना कळत नव्हतं. बाबांच्या रागाला तोंड द्यायच्या तयारीत दोघांनी पाऊल टाकलं होतं आणि समोर आली ती नविन आई. ती देखील हसतमुख.
"भूक लागली असेल ना. मी ताटं घेते." नविन आईच्या हातचं काही खायचं नाही हा दोघांचा निश्चय ढासळला. पोटात कावळे कोकलत होते. दोघं मुकाट्याने जेवायला बसली.
"मला काकू म्हटलंत तरी चालेल." दोघं क्षणभर काहीच बोलली नाहीत. खरं तर या विषयावर त्यांनी खूप चर्चा केली होती. नविन आई, बाबांची बायको किंवा नुसतंच अहो म्हणायचं का ते ठरत नव्हतं. पण तो प्रश्न परस्पर सोडवला गेला. दोघांनी माना डोलावल्या. तरी एकमेकांशी बोलताना बाबांची बायकोच म्हणायचं हेही त्यांनी मनातल्या मनात ठरवून टाकलं. जेवणं झाल्यावर डोळ्यावर झोप असूनही मुक्ताला राहवलं नाही. ती दत्ताच्या कानात कुजबुजली.
"बरी वाटतेय की बाबांची बायको. सावत्र आई नाही वाटत."
"लगेच हुरळून जाऊ नकोस. सावत्र आई वेगळी दिसत नाही पण तिचा जन्म छळ करण्यासाठीच झालेला असतो." दत्ताच्या माहितीत आत्तापर्यंत सावत्र आई एकही नव्हती. पण त्याने वाचलेल्या गोष्टींमधली सावत्र आई मुलांचा छळ करणारीच होती. सिंड्रेलाची आई तर जिवंत उदाहरण. बाबांची बायको तशीच असणार. तिने तसंच असायला हवं. मुक्ताने उगाचच तिच्यावर भाळलेलं दत्ताला अजिबात आवडलं नाही.

दमलेले दत्ता आणि मुक्ता गाढ झोपले. बाबा येऊन केसांवरून हात फिरवून, थोपटून गेले तेही त्यांना कळलं नाही. सकाळी जाग आली तेव्हा ते कामावर निघून गेले होते. काही न बोलता दोघांनी आपापलं आटोपलं. उन्हाळ्याची सुटी चालू होती त्यामुळे अख्खी सुटी बाबांच्या बायकोबरोबर काढायच्या कल्पनेने दोघांच्या अंगावर काटा आला. काकूंनी दूध समोर ठेवलं.
"मला बिस्किटं पाहिजेत. आमची आई रोज एक अख्खा बिस्किटाचा पुडा द्यायची." मुक्ताला रडावंसं वाटत होतं. काकूंनी बिस्किटांचा पुडा समोर ठेवला.
"मला अंडं द्यायची रोज. मी अशक्त आहे म्हणून." दत्ता कुरकुरला.
"पण तू माझी बिस्किटं पण खातोस." मुक्ताने दुधात बिस्किट बुडवत म्हटलं. काकू हसल्या.
"अंडं उकडते मी. तुमच्या बाबांना विचारलं होतं पण त्यांना काही सांगता आलं नाही. तुम्हीच सांगा तुमच्या आवडीनिवडी. तुमची आई करायची तसं करायला शिकवा मला. चालेल?" मुक्ता खुदकन हसली.
"तुम्हाला येत नाही? मोठ्या माणसांना शिकवावं नाही लागत. पण मी शिकवेन तुम्हाला."
"काकूला कुणी अहो काकू म्हणतं का? मला ए काकूच म्हणायचं."
"चालेल." मुक्ताला नविन आई आवडायला लागली होती. आईसारखीच होती. दत्ताला त्यांची जवळीक अस्वस्थ करत होती.
"अंडं." तो जोरात ओरडला. दोघी दचकल्याच. काकूंनी घाईघाईत उकडलेलं अंडं सोलून त्याच्यासमोर ठेवलं. पण ताटली बाजूला ढकलत, पाय आपटत दत्ता व्हरांड्यात जाऊन बसला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं.
"आई म्हणायची, ’दत्ता अगदी बाबासारखा आहे. शीघ्रकोपी’ " मुक्ताने दुसरं बिस्किट दुधात बुडवलं. काकू तिच्या मोहक आविर्भावाकडे पाहत राहिल्या. तिला जवळ घ्यावं असं वाटत असूनही त्यांनी तो मोह टाळला. उगाच घाई करायची नव्हती त्यांना. हळूहळू मुलांना आपली सवय होईल याची त्यांना खात्री होती. त्या उठून व्हरांड्यात गेल्या. कोपर्‍यातल्या बाकड्यावर बसलेला दत्ता त्यांना अगदी केविलवाणा वाटला. एकटक बघत बसला होता समोरच्या झाडांकडे. गुडघे पोटाशी घेऊन बाकड्यावर अस्वस्थपणे पाय वाजवत होता. त्याच्या सैरभैर मनावर फुंकर घालावीशी वाटत होती काकूंना. त्याला वाटतंय तशा त्या वाईट नाहीत हे सांगावंसं वाटत होतं. पण ही ती वेळ नव्हती हेही जाणून होत्या त्या. त्याच्या बाजूला जाऊन त्या बसल्या. अलगद त्यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला.बराचवेळ दत्ता गुडघ्यात डोकं खुपसून रडत राहिला आणि अचानक काकूंचा हात बाजूला ढकलून चालताही झाला. समोरच्या झाडांवर नजर खिळवून काकू तिथेच बसून राहिल्या.

वर्षभरात वरवर पाहता वातावरण निवळलं. मुक्ता काकूंच्या सहवासाला सरावली. सुरुवातीला ती दत्ताला धरून धरून असायची. पण तिला काकू आवडल्या होत्या. दत्ता मात्र काकूंना त्रास द्यायची, त्यांना नावं ठेवायची संधीच शोधत असायचा. नकळत मुक्ताचं दत्ताशी बोलणं, त्याच्या मागून मागून करणं कमी व्हायला लागलं. आणि त्याच वेगाने दत्ताचं वागणं बदलत गेलं. शेजार्‍यापाजार्‍यांकडून त्याच्याबद्दल सतत काही ना काही तक्रारी यायला लागल्या. घरातही तो सारखा चिडलेलाच असायचा. काकूंना, रत्नाकरना यात बदल कसा घडवायचा ते कळत नव्हतं. त्या दिवशी त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली. शाळेतून दत्ताच्या शिक्षकांची चिठ्ठी आली आणि रत्नाकर धास्तावले.
"चूक झाली माझी. वाटलं होतं मुलांना आई मिळेल. पण तो तुला आई मानायलाच तयार नाही."
"तुम्ही उगाच टोक गाठू नका. त्याला वेळ द्यायला हवा आपण. नकळत्या वयाचे परिणाम आहेत हे. शाळेत जाऊन भेटल्याशिवाय नक्की काय ते समजणार नाही." फार वाद न घालता रत्नाकरनी ते मान्य केलं. दोघं शाळेत गेले. प्रगतिपुस्तक सही न करताच दत्ताने परत केलं होतं. सगळ्या विषयात जेमतेम पास.
"दत्ता हुशार आहे आणि यापूर्वी इतके कमी गुण त्याला कधीच नव्हते. त्याने प्रगतिपुस्तक तुम्हाला न दाखवताच परत आणून दिलं. म्हणून मुद्दाम बोलावून घेतलं. वेळीच लक्ष घालावं लागेल. मी बोललो आहेच त्याच्याशी. तुम्हीही बोला. घरात काही प्रश्न असतील, बदल झाले असतील तर त्याला समजावून सांगा. बहकण्याचं वय आहे हे." दत्ताचे शिक्षक पोटतिडकीने सांगत होते." रत्नाकर आणि काकूंनी दत्ताशी बोलण्याचं आश्वासन दिलं. दत्ताचे गुण सुधारतील याची शाश्वती दिली.

घरी पोचल्यावर कितीही शांतपणे, समजुतीने बोलायचं ठरवलेलं असलं तरी रत्नाकरनी तोंडसुख घेतलंच. दत्ताने प्रगतिपुस्तक न दाखवल्याचा, शाळेत शिक्षकांना जाऊन भेटावं लागल्याचा राग त्यांच्या शब्दांशब्दांतून जाणवत होता.
"मी घेईन त्याचा अभ्यास. लग्नाआधी शिकवत होतेच मी." मध्येच काकू म्हणाल्या. ढिम्म बसलेल्या दत्ताने एकदम तोंड उघडलं.
"मला नाही शिकायचं तुमच्याकडून काही."
"नाही शिकायचं म्हणजे? शिकावं लागेल. ही चाचणी परीक्षा होती. वेळीच जागे व्हा. नाहीतर त्याच वर्गात बसायची वेळ येईल. झाली एवढी नाटकं पुरे झाली." रत्नाकरांचा आवाज चढला.
"पण मी यांच्याकडून काही शिकणार नाही." दत्ता हेकेखोरपणे म्हणाला.
"का नाही शिकायचं? उगाच राग धरून काहीतरी बोलायचं, नसते उद्योग करत राहायचे. शोभतं का तुला? मुक्ता तुझ्यापेक्षा लहान. तिचं आणि काकूचं कसं जमतंय? तू हेकेखोरपणा सोड दत्ता. त्यातच भलं आहे तुझं..." बाबा बराचवेळ उपदेश करत राहिले. दत्ता कंटाळत ऐकल्यासारखा बसून राहिला. नाईलाजाने दुसर्‍या दिवसापासून काकूंबरोबर अभ्यासाला बसायला लागला.

अभ्यासात प्रगती झाली तरी दत्ताच्या मनातली काकूंबद्दलची अढी काही जात नव्हती. कधी कुठल्या कारणांवरून तो चिडेल, रागावून बसेल त्याचा कुणालाच अंदाज यायचा नाही. शुल्लक गोष्टींत त्याचा अपमान व्हायला वेळ लागत नव्हता. काकू जपून वागत असल्या तरी दत्ताचं बिनसायला वेळ लागायचा नाही. त्या दिवशी तेच झालं. दोघं अभ्यास करत बसली होती. मुक्ताला भूक लागली म्हणून तिला लाडू द्यायला त्यांनी डबा उघडला. डबा रिकामा.
"मुक्ता तू संपवलेस का लाडू?" काकूंनी विचारलं.
"नाही." पुस्तकातलं डोकं वरही न काढता मुक्ता उत्तरली.
"दत्ता?" दत्ताने दुर्लक्ष केलं. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"तुम्ही केलेलं मी काही खात नाही. खोटा आळ घेऊ नका माझ्यावर." दत्ताच्या उद्धटपणावर प्रयत्न करूनही काकू शांत राहू शकल्या नाहीत.
"दत्ता, मी आळ घेतलेला नाही. फक्त विचारतेय तुला. आणि माझ्या हातचं खात नसशील तर घरी जेवतोस कशाला?"
"जेवणार, जेवणार, जेवणार." दत्ताने पुस्तक टेबलावर आपटलं.
"माझ्या हातचं खायचं नाही असा निर्धार आहे ना तुझा?"
"हे माझ्या बाबांचं घर आहे. इथे कुणीही केलेलं मी खाणार. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असतात. शाळेत शिकलोय मी. गरजेपुरतं खातो. खाऊ नाही खात तुम्ही केलेला."
"दत्ता, तू लाडू खाल्लेस. दोन. दुपारी खेळून आलास तेव्हा. काकू झोपली होती." मुक्ताने आठवण करून दिली. दत्ता खवळला. त्याने मुक्ताच्या पाठीत गुद्दा मारला. ती रडायला लागली. काकूंनी पुढे होऊन मुक्ताला जवळ घेतलं. दत्ताने मुक्ताला ओढलं.
"ती माझी बहीण आहे. तुम्ही नका हात लावू. तुम्ही सावत्रपणा करता." काही कळायच्या आत घरात आलेल्या रत्नाकरांची पाच बोटं दत्ताच्या गालावर उमटली. काकू हवालदिल होऊन पाहत राहिल्या.
"तुम्ही मारायला नको होतं." त्या कशाबश्या म्हणाल्या.
"मग काय हा तमाशा बघत बसायला हवा होता?" घरात आल्याआल्या होणारी कटकट आता रत्नाकरना सहन होईनाशी झाली होती.
"मी बोलले असते. त्याचा राग माझ्यावर आहे. तुम्ही तो तुमच्यावर ओढवून घेऊ नका."
"घाला काय घालायचा गोंधळ तो. करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं झालंय माझं." बडबडत रत्नाकर पाय धुवायला गेले. काकू दत्ताच्या मागोमाग बाहेर गेल्या. व्हरांड्यातलं बाकडं ही दत्ताची जागा होती. तो तिथेच असेल हे ठाऊक होतं त्यांना. त्याच्या बाजूला बसलेल्या मुक्ताकडे लक्ष गेल्यावर त्यांना अगदी भरून आलं. कधीतरी बोलायचं ते या क्षणाला व्हायला पाहिजे हे त्यांना अगदी आतून आतून जाणवलं. नाहीतर विस्कटलेलं घरकुल सांधणं शक्य नाही हे त्यांना दिसत होतं.
"बाळांनो, हे बघा मी तुमची आई नाही हे ठाऊक आहे मला. तुमच्या आईची जागा मला घ्यायची नाही. तुमच्या बाबांशी माझं लग्न झालं तेव्हा मला तुम्हाला आधी भेटायचं होतं. पण तुमच्या बाबांना ती कल्पनाच आवडली नाही. मुक्ता खूप लहान आहे, दत्ताचं वय गोष्टी अर्धवट कळण्याचं आहे असं वाटत होतं त्यांना. जशी तुमची आई हे जग सोडून गेली तसं माझा नवराही. मी एकटी होते. कुणीतरी तुमच्या बाबांना माझ्याबद्दल सांगितलं. ते मला भेटले तेव्हा त्यांनी तुमच्या दोघांबद्दल आधी सांगितलं. मुलांना आई पाहिजे यावर ते ठाम होते. आणि मी देखील मुलांच्याबाबतीत सावत्रपणा करणार नाही असा शब्द दिला. दत्ता, तुझ्या मनातल्या सावत्रपणाच्या कल्पना पुस्तकी आहेत. मला खरंच तुमच्याबद्दल माया वाटते. मुक्ता लहान असून तिला माझ्या मनातली माया जाणवली. तुला का नाही जाणवत बाळा? सतत असा स्वत:वर रागावलेला राहिलास तर त्या रागापलीकडे उभा असलेला आमच्या मनातला जिव्हाळा तुला दिसणारंच नाही. आज तुझ्या बाबांनी हात उगारला. असं व्हायला नको होतं. चुकलंच त्यांचं. लहान मुलांचा तोल गेला तर मोठ्यांनी सावरायचं, स्वत:चा तोल ढळू द्यायचा नाही हे विसरले ते. पण आता तू तुझ्या वागण्याने शिक्षा करू नकोस त्यांना. तुझी आई गेली. अचानक गेली. तिचा आजार लक्षात येण्याआधीच व्याधीने टोक गाठलं होतं. यात चूक कुणाचीच नाही. तिच्या जाण्याची तू स्वत:ला शिक्षा नको करून घेऊ." बराचवेळ काकू बोलत राहिल्या. दत्ताला आणि मुक्ताला किती समजत होतं त्यातलं तेही त्यांना कळत नव्हतं. पण त्या बोलत राहिल्या. आपलं मन मोकळं करत राहिल्या. मुक्ता त्यांना येऊन बिलगली. दोघी दत्ता काही बोलेल म्हणून वाट पाहत राहिल्या. दत्ताचा चेहरा निर्विकार होता. त्याच्या सवयीप्रमाणे तो समोरच्या झाडांकडे एकटक पाहत होता. बराचवेळ त्या ताटकळत उभ्या राहिल्या. अखेर दत्ताकडे पाठ फिरवीत मुक्ताचा हात धरून त्या पुन्हा घरात शिरल्या.

त्या प्रसंगाने दत्तात विलक्षण बदल झाला. त्याने रत्नाकरांशी बोलणं जवळजवळ सोडलं. बोलायची वेळ येई तेव्हा त्याच्या देहबोलीतून नकारात्मकता स्पष्ट जाणवायची. रत्नाकरनी त्याने मनमोकळं करावं, त्याची बाजू समजून घ्यावी म्हणून खूप प्रयत्न केले. पण तो घराबाहेरच राहायला लागला. जेवण्याखाण्यापुरतं घरात डोकावायचं. बाकी सारा वेळ अभ्यासाचं निमित्त करून बाहेर. आहे ती परिस्थिती प्रत्येकाने अखेर निमूटपणे स्वीकारली. निदान तो घरी परत येतोय यात समाधान मानायला शिकले रत्नाकर आणि काकू. मुक्ता पहिल्यापासून शांत होतीच त्यात समंजसपणाची भर पडली. ती दत्ताला समजावून सांगायचा प्रयत्न करायची. त्याने काकूंशी चांगलं वागावं म्हणून विनवायची. पण दत्ता कधी दुर्लक्ष करायचा तर कधी तिच्यावर चिडायचा. पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. अभ्यासाचं निमित्त करून सगळ्यांशीच बोलणं टाळायचा.

घरापासून दुरावत गेलेला दत्ता स्वत:ला अभ्यासात गुंतवत राहिला. त्याला स्वत:ला सिद्ध करावंसं वाटत होतं. त्याला कुणाची गरज नाही हे दाखवून द्यायचं होतं. त्याच ध्येयाने तो झपाटला होता. त्याच्या अथक प्रयत्नांना फळही आलं. दहावीत दत्ता केंद्रात पहिला आला. रत्नाकर, काकू आणि मुक्ताला आभाळ ठेंगणं झालं. त्यांच्या आनंदात दत्ता असून नसल्यासारखा सहभागी झाला. त्याचवेळी पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहायचंय हे त्याने सांगून टाकलं. त्याला या घरापासून, गावापासून, जवळच्यांपासून लांब जायचं होतं. कुणीच फारसा विरोध केला नाही. कोणत्याही महाविद्यालयात सहज प्रवेश मिळेल असेच त्याचे गुण होते. आणि तसंही त्याचे बेत आधीच ठरले असावेत. तो परवानगी मागत नव्हताच. फक्त सांगत होता. त्या क्षणाला रत्नाकरांना पराभूत झाल्यासारखं वाटलं. इतकी गुर्मी असेल तर पुढचं शिक्षणही स्वत:च्या बळावर कर असं बजावसं वाटलं. पण विरत चाललेलं नातं नामशेष करायचं धाडस त्यांना झालं नाही.

पाहता पाहता शिक्षण पूर्ण झालं; दत्ता नोकरीलाही लागला. स्थिरावला. अधूनमधून मुक्तासाठी तो घराची पायरी चढायचा. तेवढंच. घराशी नातं त्याने जेमतेमच ठेवलं. दर पंधरा दिवसांनी घरुन येणार्‍या फोनवर तो तिघांशी मोजकंच बोलायचा. कधीकधी बोलणं त्याच्याकडून जास्त रेंगाळतंय असं वाटलं की तटकन फोन बंद करायचा. दत्ताच्या नोकरीला वर्ष होण्याच्या दरम्यान मुक्ताचं लग्न ठरलं. लग्नाच्या तयारीत तो शरीराने उत्साहाने वावरला पण मनाने फार दूर होता. कितीतरी दिवसांनी तो सलग 15 दिवस घरी राहिला. बाबा आणि काकूंबरोबरचे मुक्ताचे बंध त्याला अस्वस्थ करत राहिले. मुक्ता रत्नाकरांचा निरोप घेताना जितकी गदगदली नसेल तेवढी काकूंना सोडून जायच्या कल्पनेने गहिवरली. त्या निरोपाच्या क्षणी त्याला जाणवलं. तो एकाकी आहे. सावत्र आई नाकारण्याच्या हट्टापायी त्याने स्वत:ला दूर लोटलंय सर्वांपासून. पार न करता येणारं अंतर पडलं आहे. ते मिटवणं अवघड आहे. त्या तिघांचं जग वेगळं आहे. त्यांच्या जगात तो असला तरी तिथे त्याला स्थान नाही. तो एकटा आहे, एकाकी आहे. का असं झालं? स्वत:मुळे? काकूंमुळे? परिस्थितीमुळे? अचानक तो थबकला. विचार करत राहिला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यालाच मिळालं होतं. पण उत्तर स्वीकारणं जड जात होतं, नाकारावंसं वाटत होतं. निदान त्या वेळी तरी.

द्विधा मन:स्थितीत तो घरी परतला. काहीतरी करायला हवं होतं. पण नक्की काय करायचं? पुलाखालून इतकं पाणी गेलं होतं की आता खरंच काही फरक पडेल? त्यापेक्षा आहे हे असंच चालू द्यावं? मुक्ताकडे बोलावं? का सरळ जाऊन बाबा आणि काकूंपुढे मनमोकळं करावं? त्याला ठरवता येत नव्हतं. अपराधी मन अनेक शंका निर्माण करत होतं. अखेर त्याने कागद हातात घेतला.

"बाबा आणि काकू,
काकू, आधी मी तुझी माफी मागतो. केलं ना तुझ्या मनासारखं अखेर? तुझा उल्लेख परक्यासारखा केला नाही. ’तू’ म्हटलंय. आनंद झाला ना? काकू मला खरंच माफ कर गं. फार फार चुकलंय माझं. शेजारच्या मावशींनी तू यायच्या दिवशी सांगितलं होतं की बाबांचा निर्णय योग्य होता हे तुला मोठा झालास की कळेल. ते किती खरं होतं हे या क्षणी जाणवतंय. खूप वर्ष फुकट घालवली मी. फार वेळ लावला मोठं व्हायला. मुक्ता फार लवकर मोठी झाली. तिला फार पटकन कळलं सारं आणि तिने ते स्वीकारलंही लगेच. तू एकदा कळवळून सांगितलं होतंस ’स्वत:वर रागावू नकोस. त्या पलीकडचा जिव्हाळा बघ.’ नाही जमलं मला ते. आज मुक्ताचं आणि तुझं नातं पाहताना आता आत काहीतरी तुटल्यासारखं वाटत राहतं. तुम्ही मला कधीच दूर लोटलं नव्हतं मीच वाहवत गेलो भावनेच्या, रागाच्या भरात. सावत्र आई नाकारता नाकारता मी बाबांना आणि मुक्तालाही माझ्या आयुष्यातून नाकारलं, वजा केलं. खूप विचार केला. मला हे प्रत्यक्ष सांगायला किंवा फोनवरही नसतं जमलं. इ मेल तुम्ही वाचत नाही आणि व्हॉट्सॲप वरून मनातलं कळविणं योग्यं नाही वाटलं. अखेर चक्क पत्र लिहितोय मी. कितीतरी वर्षांनी काळ्यावर पांढरं करतोय. मुक्ताच्या लग्नानंतर सतत मी विचार करतोय, पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधतोय. काही उत्तरं मला सापडली. काही तुमच्यासह शोधेन मी यापुढे.

काकू, माझा राग तुझ्यावर किती होता कुणास ठाऊक. माझा राग आईवर होता. ती आम्हाला अशी सोडून कशी जाऊ शकते हेच मला कळत नव्हतं त्या वयात. मुक्ताचं वय मोठे सांगतील ते ऐकण्याचं होतं. माझं वय गोष्टींची खातरजमा करण्याचं होतं. आई जितक्या अचानक गेली तितक्याच अचानक बाबांनी लग्नाचा निर्णय घेतला. मागे वळून बघताना लक्षात येतंय माझा खरा राग बाबांवरही होता. तोही त्यांच्या लग्न करण्यावर नसावाच. त्यांनी आम्हाला दोघांना विश्वासात घेतलं नाही, समजावून सांगितलं नाही याचा. आणि सावत्र आईबद्दल तू म्हणालीस तसं माझ्या मनाभोवती एक चित्र होतं. मी त्यातच गुरफटलो. तुला त्याच रूपात पाहण्याचा किंवा तू तशी असावीस असाच हट्ट धरला. त्याचदृष्टीकोनातून तुझ्याशी वागलो, तुला पाहिलं. मी तुम्हा तिघांनाही खूप त्रास दिलाय. मला माफ कराल? मुक्ताने कितीवेळा माझ्याशी बोलायचा प्रयत्न केलाय. ती, तू किती चांगली आहे हे सतत मला पटवून द्यायच्या प्रयत्नात असायची. आणि त्याचाच मला जास्त राग यायचा. माझ्या बरोबरीने तुला तिने त्रास द्यावा, नावं ठेवावीत असं वाटायचं मला. तिने तसं केलं नाही त्यामुळे मला तिचाही राग यायचा. तू माझ्याशी नेहमी चांगलीच वागलीस. तेही मला चालायचं नाही. कारण माझ्या वागण्याचं खापर मला तुझ्या सावत्रपणावर फोडता येत नव्हतं. मी त्यामुळे तुला आणखी आणखी त्रास द्यायचो, तुझ्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करायचो. शेवटी तुझा नाही पण बाबांचा तोल ढळला. त्यांची माझ्या गालावर उमटलेली बोटं मला खूप काही शिकवून गेली. मी शिक्षणासाठी बाहेर राहायचं ठरवलं तेव्हा मुक्ताने बाबांचीही बाजूही मांडली असती तर कदाचित लवकर डोळे उघडले असते. एकत्रच राहिलो असतो आपण. पण आपण सगळेच समजत होतो की माझा राग तुझ्यावर आहे. अगदी मलासुद्धा तसंच तर वाटत होतं. पण माझा खरा राग आई - बाबांवर होता. त्यांचंही यात काही चुकलेलं नाही हे आता जाणवतंय. आईच्या हातात तर काहीच नव्हतं. मृत्यूने अकाली झडप घातली तिच्यावर. त्यामुळे बाबांची अवस्था दोलायमान झाली असणार. आमच्यासमोर बोलणं अवघड वाटलं असणार त्यांना. सगळं कळतंय आता. खरंतर वेळोवेळी त्यांनी त्यांची बाजू सांगायचा प्रयत्न केला होता हेही लक्षात येतंय. मीच माझे कान बंद केले. स्वत:ला कोषात बंद करून टाकलं. तुम्ही दोघं मला माफ करा. कराल ना? करालच. माझं चुकत असलं तरी इतकी वर्ष सांभाळून घेतलंत मला. मी मात्र माझंच बालपण झाकोळून टाकलं आणि तुमच्या आयुष्यातला आनंद. आता तसं होणार नाही. ते दिवस परत नाही येणार. पण येणारे दिवस मी झाकोळू देणार नाही...

जे जे सुचेल ते ते, तो लिहीत होता. पत्र लिहून पूर्ण झालं आणि पुन्हा पुन्हा दत्ता ते वाचत राहिला. पोष्टाने पाठवायचं, स्वत: जाऊन हातात द्यायचं की बाबा - काकू आणि मुक्ताला समोर बसवून वाचून दाखवायचं? नक्की या पत्राचं काय करायचं हाच विचार दत्ताच्या मनात बराचवेळ घोळत राहिला.

"या क्षणाची वाट पाहत होते इतकी वर्ष." पत्रावर मायेने हात फिरवीत काकू म्हणाल्या.
"माझ्यावर, त्याच्या आईवर आणि मुक्तावर रागावला होता तर दत्ता. इतकी वर्ष आपण समजत होतो की त्याचा राग तुझ्यावर आहे. तू सावत्र म्हणून तुला तो स्वीकारू शकत नाही. पण तू सोडून सगळ्यांवर रागावलं होतं लेकरू." रत्नाकरनी चष्मा अलगद काढला. अश्रूंनी ओल्या झालेल्या चष्म्याच्या काचा ते पुन्हापुन्हा पुसत राहिले.
"ते त्याला आता कळतंय. त्यालाही त्याचा राग माझ्यावरच आहे असं वाटत होतं." काकू डोळे पुसत म्हणाल्या. "मला फार अपराधी वाटायचं. दत्ताच्या आईची मी मनातल्या मनात कितीतरी वेळा क्षमायाचना केली आहे. माझ्यामुळे दत्ता तुम्हाला, मुक्ताला दुरावला असं वाटायचं." काकूंना हुंदका फुटला. कितीतरी वेळ दोघं एकमेकांची समजूत घालत राहिले. दत्ताच्या पत्राने मनावरचं ओझं उतरलं होतं. झाकोळलेलं अवकाश मोकळं झालं होतं. दोघांनाही पुन्हा पुन्हा तेच बोलावंसं वाटत होतं. बर्‍याच वेळाने पत्राची घडी घालत काकूंनी बाजूला ठेवलं. रत्नाकरांनी पत्र उचललं.
"घे, एकदा वाच परत. वाट चुकलेलं कोकरू घरी परतलंय. संपली अखेर आपली प्रतिक्षा" काकूंनी त्या पत्राकडे अतीव मायेने पाहिलं आणि आतापर्यंत दहावेळा वाचलेलं पत्र पुन्हा वाचायला घेतलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

.

छान आहे कथा..
खूप दिवसांनी लिहिलेत तुम्ही.

छान लिहिली आहे. दत्ताला इतक्या उशिरा समजलं याचं मनात बरंच वाटलं. का कोण जाणे पण लवकर समजलं असतं तर मजा नसती आली, आणि प्रत्यक्ष जगात असं लवकर समजत नाहीच कुणाला!
>> कितीतरी वर्षांनी काळ्यावर पांढरं करतोय. >> पांढर्‍यावर काळं न म्हणता काळ्यावर पांढरं प्रयोग आवडला.

फार छान..!!

बर्‍याच दिवसांनी सुंदर कथा वाचायला मिळाली. शेवटी दत्ताचे पत्र ही मस्तच होते. त्याला आलेली समज तुम्ही मस्त शब्दात मांडली आहे.

छान आहे. आवडली.

दत्ता आणि मुक्ता जेमतेम आठ आणि तेरा वर्षांचे.>>>
दत्ता मुक्तापेक्षा मोठा ना? मग वयाची अदलाबदल झाली आहे का वरील वाक्यात?

कथा शेवटपर्यंत छान फुलत गेलीय !

दत्ताला उपरती येण्यासाठी काहीतरी ठोस घटना घडवून यायला हवी होती !