१९६५ मध्ये सलग दोन वर्षे देशात पडलेल्या भयंकर दुष्काळाने भारतातील जनतेवर उपासमारीची वेळ आणली. अन्नधान्य आयात करुन लोकांचा जीव जगवणे सरकारला भाग पडले.
परत अशी वेळ देशावर येऊ नये म्हणुन हरित क्रांती जन्माला आली. त्याखाली जास्त उत्पन्न देणारी संकरीत बियाणे भारतात झपाट्याने विकसित झाली व प्रसारीत झाली. त्याआधीची प्रचलीत पारंपारिक बियाणे मर्यादित उत्पन्न देत होती.
संकरीत बियाण्यांनी दुपटीने उत्पन्न द्यायला सुरवात केली. जमिनीत असलेल्या पोषक द्रव्यांवर पिकांचे पोषण व उत्पन्न अवलन्बुन असते. भरपुर उत्पन्न देणार्या संकरीत बियाण्यांनी जमिनीतील पोषक द्रव्ये झपाट्याने संपवायला सुरवात केल्यावर या बियाण्याला लागणारी भरपुर खते आणायची कुठुन हा प्रश्न निर्माण झाला. जैविक खते तयार व्हायला वेळ लागतो. तसेच ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसतात. तेव्हा बव्हंशी वापरात असलेले शेणखत कुजवुन वापरावे लागते त्यालाही वेळ लागतो. नेहमीची खते या नव्या सुधारित बियाण्यांसाठी वापरणे कठिण जायला लागले आणि त्यामुळे उत्पन्नही घसरायला लागले. तेव्हा रासायनिक खतांचा झटपट परिणाम करणारा, वापरण्यास सोपा, स्वस्त आणि भरपुर उपलब्धता असलेला पर्याय शेतकर्यांना देण्यात आला.
रासायनिक खतांनी पंजाबातल्या शेतकर्यांना बघताना डोळे फाटुन टाकणारे उत्पन्न दिले. एका हंगामात इतके उत्पन्न त्यांनी आधी कधीच पाहिले नव्हते. रासायनिक खते काय जादु करतात हे त्यांनी पाहिले आणि ते या खतांच्या प्रेमात पडले.
पण अनियंत्रित वापर केला तर हीच खते काय विध्वंस करु शकतात हे त्यांना कोणीही सांगितले नाही. अधिकस्य अधिक फलम या न्यायाने त्यांनी दे दणादण खतांचा वापर सुरु केला. जैविक खतानी इतके उत्पादन कधी दिलेच नव्हते, त्यामुळे रासायनिक खतांच्या तुलनेत त्यांचा वापर कमी होत गेला. या खतांचा जमिनीत काय रोल असतो हे शेतकर्यांना माहित करुन घ्यायची गरज वाटली नाही ना कोणी सांगितले. वाढत्या उत्पन्नासोबत शेतीत यांत्रिकीकरण वाढले ज्यामुळे शेतातली गुरेढोरे अनावश्यक ठरली आणि शेणखत तयार होणे कमी झाले.
आपण जरुरीपेक्षा जास्त खायला लागलो की ती जास्तीची उर्जा आपल्या शरीरात मेदाच्या रुपात साठवली जाते. तसेच वनस्पतींचेही आहे. खतांची मात्रा वाढली की त्यातल्या प्रामुख्याने नत्राचा साठा वनस्पतीच्या पेशींमध्ये केला जातो. ह्या अनावश्यक नत्राच्या साठ्यांवर किटक हल्ला करतात. रोपांची पाने, अन्नरस, फुले व फळे यावर हल्ला होतो. किटकांसोबत विषाणु व बुरश्या येतात आणि वनस्पतींवर रोगांचा हल्ला होतो. आवश्यकतेपेक्षा जास्त खते देणे किती धोकादायक आहे हे यावरुन लक्षात येते.
दुर्दैवाने भारतीय शेतकर्याला यातले काहीही माहित नव्हते. त्याला रासायनिक खते विकणार्या कंपन्या त्याच्यासाठी आता किटकनाशके व रोगनियंत्रक औषधे घेऊन उभ्या होत्याच.
उत्पन्न चांगले मिळावे म्हणुन खतांचा अमर्याद वापर, खतांच्या अमर्याद वापरामुळे पिकांवर किटक व रोगांचा हल्ला, त्याला तोंड द्यायला अमर्याद किटकनाशके व औषधे यांचा वापर, दरम्यान जमिनीतील जैविक घटक व सेंद्रिय कार्बन संपल्यामुळे पिकांना खते उचलण्यात अडथळा, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम, ते वाढण्यासाठी अजुन जास्त खतांचा वापर, त्यामुळे वाढलेला किटकनाशकांचा वापर व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम, बियाणे, खते व किटकनाशके यांच्या वाढत्या किंमतीमुळे बिघडलेले आर्थिक गणित या दुष्टचक्रात शेतकरी जो अडकला तो अजुनही अडकलेलाच आहे.
शेतकर्याला सद्यस्थितीत काय काय प्रश्न भेडसावताहेत याचा फाऊंडेशनने अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सध्या जमिनीचा कस शुन्याच्या जवळ आलेला आहे ( सेंद्रिय कार्बन सध्या ०.२ शिल्लक आहे जो निदान २.० तरी असावा असे पाच वर्षापुर्वी शास्त्रज्ञ म्हणत होते. आता ते म्हणताहेत निदान १.० पर्यंत घेऊन गेलो तरी गंगेत घोडे न्हाले), वातावरणातील बदलांमुळे हवामान अनिश्चित झालेले आहे आणि या दोन्ही गोष्टींना एकत्रित तोंड कसे द्यायचे याचे शिक्षण शेतकर्याजवळ नाही. शेतकरी आजही पारंपारिक पद्धतीने शेती करतोय जी आजच्या बदललेल्या परिस्थितीत फेल जातेय. जे काय पिकते त्या मालाचा दर ठरवायचा अधिकार त्याला नाही आणि जिथे विकणार ते मार्केटही त्याच्या हातात नाही. अशा परिस्थितीत शेती करायला शेतकरी अनुत्सुक आहे . मग वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातुन इतक्या परिश्रमाने वाढवलेल्या पाण्याचे करायचे काय?? 
जगभर वापरल्या जाणार्या नव्या शेतीतंत्रज्ञानाच्या माहितीचा अभाव, लोकसंख्येचा स्फोट झालेल्या या देशात शेतावर काम करायला मात्र मजुरांचा अभाव आणि त्यात नापिक जमिनी व वातावरणीय बदलाचे संकट या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्याला बाहेर काढण्यासाठी पानी फाउंडेशनने २०२२ मध्ये सत्यमेव जयते फार्मर कपची घोषणा केली.
गावात घरातली शेती सगळेजणच करतात. पण प्रत्येकजण आपापली शेती करतो. हंगामाच्या सुरवातीला प्रत्येक जण बाजारात फेर्या मारुन बियाणे, खते आणतो. मजुरांची मनधरणी करुन त्यांच्याकडुन कामे करुन घेतो. कित्येकदा अशी परिस्थिती येते की शेती करण्यापेक्षा मजुरी करणे जास्त फायदेशिर ठरते
प्रत्येकाने एकट्याने हे भोग भोगण्यापेक्षा गट करुन एकत्र शेतीकामे केली तर एकाच फेरीत सगळ्यांचे बियाणे व खते येतील, एकत्रित खरेदीमुळे भाव कमी करुन मागता येईल, एकमेकांच्या शेतावर जाऊन काम केले तर मजुरी वाचेल असा विचार करुन गटशेती करणे ही स्पर्धेत भाग घेण्याची अट ठेवली गेली. फक्त गटच स्पर्धेत भाग घेऊ शकतात, एकटा शेतकरी भाग घेऊ शकत नाही. शेतमालाचा भाव शेतकऱ्याच्या हातात नाही पण खर्च कमी करणे हे तर त्याच्या हातात आहे ना? वाचवलेला प्रत्येक रुपयाही ऊत्पन्नच आहे.
या शेतकर्यांना शिक्षण कसे देणार? आपल्या कृषी विद्यापिठांकडे उच्च शिक्षित शेतीशास्त्रज्ञ बसलेले आहेत. एकेका पिकावर संशोधन करण्यात आयुष्याचा महत्वाचा काळ त्यांनी घालवलेला आहे. पण सामान्य शेतकरी यांच्यापर्यंत आणि हे शेतकर्यापर्यंत पोचणार कसे? दर दिवशी शेतात पडणारे नवनविन प्रश्न घेऊन विद्यापिठ शोधत जायला शेतकर्याला फुरसत नाही आणि गावोगावी विखुरलेल्या शेतकर्यांपर्यंत पोहचायला विद्यापिठाकडे मजबुत यंत्रणा नाही.
पानी फाऊंडेशनने यावर उपाय शोधला डिजिटल शेतीशाळेचा.
स्मार्ट फोन आता सगळ्यांकडे आहेत, त्यावर झुम अॅप डाऊनलोड करायचे आणि वेळापत्रकाप्रमाणे शाळा अटेंड करायची. तिथे शेतीशास्त्रज्ञ, किटकशास्त्रज्ञ इत्यादी तज्ञ हजर असतात त्यांना आपले प्रश्न विचारायचे, पिकाचे फोटो दाखवायचे आणि शंकासमाधान करुन घ्यायचे इतके सोप्पे काम.
जिथे हे करता येणे शक्य नाही तिथे गावाचा कृषी सहाय्यक अधिकारी गटाला एकत्र बसवुन त्याच्या मोबाईलवर शेतीशाळेला सगळ्यांची हजेरी लावुन घेतो.
प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात परिस्थिती वेगळी असते व त्याप्रमाणे प्रश्न बदलतात. आंबोलीतील वातावरण खाली घाट उतरुन गेल्यावरच्या माडखोल गावापेक्षा खुप वेगळे आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या शेतकर्यांचे प्रश्नही वेगळे असणार. पण शेतीची पद्धत मात्र बदलायला नको.
पाऊस धबाधबा पडायला लागल्यानंतरही माझे भात जमिनीतुन डोके वर काढत नसेल आणि मी तो प्रश्न शेतीशाळेत तज्ञांना विचारला तर मी पेरणी, लावणी वगैरे कशी केली ज्यामुळे हा प्रश्न उद्भवला हा प्रश्न ते मला विचारणार. मी पेरणी लावणी चुकीच्या पद्धतीने केली हे मला तेव्हा कळले तर माझा हंगाम फुकटच गेला. कारण एकदा पावसाची संततधार सुरु झाली की भात परत पेरता येणार नाही.
मग सुरवातीपासुनच सगळे शेतकरी योग्य पद्धतीने पिक वाढवताहेत याची खात्री कशी करायची? तर त्यांना प्रत्येक पिकाची SOP म्हणजे Standard Operating Procedure द्यायची. ही वापरुन पिक वाढवले तर शेतात नक्की चुक कुठे झाली किंवा कुठे गॅप पडली हे शोधता येते व त्यानुसार उपाय सुचवता येतात. शास्त्रज्ञांनी प्रत्येक पिकाच्या तपशिलवार SOP तयार केल्या आणि स्पर्धेत भाग घेणार्या गटांना त्या वापरणे अनिवार्य केले.
तर थोडक्यात महाराष्ट्रातला शेतकरी आता एकत्रित येऊन, एसोपी वापरुन, शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने शास्त्रशुद्ध शेती करणार आहे.
या स्पर्धेत मुख्यत्वे भाजीपाला व इतर कमी कालावधीची धान्य
पिके घेण्यात आलेली आहे. फळशेतीमध्येही संत्रे मोसंबी लिंबु इत्यादी फळे असली तरी आपला लाडका आंबा यात अद्याप नाही.
२०२२, २३ व २४ ला ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातले काहीच तालुके, बहुतेक फक्त १२१ ग्रामीण तालुके, समाविष्ट झाले होते.
या वर्षी महाराष्ट्र सरकारने पानी फाउंडेशनला सर्व महाराष्ट्रात ही स्पर्धा घेण्याची विनंती केलीय. यंदा महाराष्ट्रातील ३५१ ग्रामीण तालुके यात भाग घेत आहेत. मुंबईसारखे पुर्ण शहरी तालुके जिथे शेती अजिबात नाही असे ५-६ तालुके यातुन वगळण्यात आलेत.
पानी फाऊंडेशनसोबत शेतकर्यांसाठी यंदा पुर्ण कृषी खाते, सगळी कृषी विद्यापिठे, नानाजी देशमुख फाऊंडेशन व उमेद अभियान ज्याखाली सर्व महिला बचत गट कार्यरत आहेत अशी भलीमोठी फौज उतरली आहे.
आणि ह्या फौजेच्या मदतीने महाराष्ट्रातला तमाम शेतकरी यंदा शक्य तितकी जैविक किटकनाशके वापरुन, जैविक व रासायनिक खतांची योग्य सांगड घालत, शास्त्रशुद्ध पद्धतीने, प्रत्येक पायरीवर तज्ज्ञांची मदत घेत आधुनिक शेती करणार आहे.
फाऊंडेशनच्या वेबसाईटवर माहिती मिळाली नसल्याने मला आधीचे विजेते माहित नाहीत. २०२४-२५ मध्ये सांगलीतील तासगाव तालुक्यातल्या तुर्ची गावाचा भाग्योदय शेतकरी गट व सातार्यातल्या खटाव तालुक्यातल्या भोसरे गावातला सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट या दोघांनी संयुक्तपणे बाजी मारुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसर्या क्रमांकावरही संभाजीनगर खुलताबाद तालुक्यातल्या
सोबळगावनिवासी ऊंच भरारी महिला शेतकरी गटाने संयुक्तरीत्या बाजी मारलीय.
ही स्पर्धा शेती व शेतकर्याना नवसंजीवन तर देतेच आहे पण यात महिला जे यश मिळवताहेत ते बघुन मला आश्चर्य वाटतेय व आनंद होतोय.
दोन बायका एकत्र सुखाने नांदत नाहीत हा आपला सार्वत्रिक (गैर) समज आहे आणि बायकांच्या मुर्खपणावर आधारीत विनोदांनी साहित्य भरलेले आहे. पण न बोलता शांतीत क्रांती करत एकेक क्षेत्र काबिज करत सुटलेल्या बायका आता शेतीचे क्षेत्रही काबिज करताहेत.
शेती ही पारंपारिकपणे पुरुषाचे क्षेत्र मानली गेलीय. जमिनीच्या सातबार्यात स्त्रियांची नावे हल्ली हल्ली यायला लागलीत. शेतात राबणारे हात बव्हंशी स्त्रियांचेच असले तरी जमिनीची मालकी व शेतासंबंधीचे निर्णय प्रामुख्याने पुरुषाच्या हातात राहिलेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने कित्येक स्त्रियांनी घरात भांडुन, प्रसंगी असहकाराचे शस्त्र उगारुन आपल्या स्वतंत्र कसण्यासाठी एकरभर का होईना पण तुकडा मिळवला आणि त्यावर शेती केली. ज्यांच्याकडे जमिन नव्हती त्यांनी भाड्याने जमिन घेऊन स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धा जिंकुन त्या पैश्यात गटाची जमिन विकत घ्यायची मनिषाही कित्येकींनी व्यक्त केली.
मी गेल्या वर्षापासुन शेतीशाळेला हजेरी लावतेय. यात असलेली कित्येक पिके मी आंबोलीत करु शकले नाही तरी ज्ञान कधीच वाया जात नाही म्हणत मी हजेरी लावते
झुम अॅप व मिटिंग मला नवीन नाही. मोबाईल टेक्नॉलॉजीशी फारसा संबंध नसलेल्या या ग्रामीण स्त्रियांना जेव्हा झुमवर पिकांचे फोटो व विडिओ दाखवुन शास्त्रज्ञांना प्रश्न विचारताना व शास्त्रज्ञांनी त्यावर विचारलेल्या उपप्रश्नांना उत्तरे देताना पाहिले तेव्हा मी अवाक झाले. जिथे विडिओ दाखवण्याइतपत मजबुत नेटवर्क नाही तिथे कृषी अधिकार्यांच्या मदतीने फाऊंडेशनपर्यंत विडिओ पाठवुन ते दाखवलेत.
मोबाईल डेटा पॅक वापरुन लोक टाईमपास करतात पण त्याच मोबाईलने शेतीसाठी एक नवे दालन आज उघडलेय आणि शेतीत त्याने जो बदल घडतोय तो मला खुप आनंददायी वाटतोय.
आणि फार्मर कपच्या निमित्ताने पानी फाऊण्डेशनचे कोकणात आगमन झाले ही गोष्ट मला सुखावह वाटतेय.
क्रमशः
हा पण लेख मस्त! पानी
हा पण लेख मस्त! पानी फाउण्डेशनचे कामही जबरी!
मस्त माहिती. कौतुकास्पद कार्य
मस्त माहिती. कौतुकास्पद कार्य आहे हे.
क्या बात है! हे वाचून मला
क्या बात है! हे वाचून मला खूप आनंद झालेला आहे. कुठेतरी आशेचा किरण, खरं तर तिरीप दिसत आहे.
खूप छान माहिती देता आहात
खूप छान माहिती देता आहात तुम्ही साधना.
काल मुक्तक जोशी यांची शेतीविषयक मुलाखत बघितली होती ती आवडली, त्याची लिंक इथे डकवत आहे.
https://youtu.be/6gqJ2O6iT60?si=AX5-t9vIXJwqk_zj
ही पाणी फाऊंडेशन संदर्भात नाही त्यामुळे अवांतर वाटल्यास क्षमस्व.
छान लेख. आवडला.
छान लेख. आवडला.
खूप छान माहिती. आता तरी
खूप छान माहिती. आता तरी रासायनिक खते सोडून सेंद्रिय आणि शाश्वत शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.
एस, अवांतर काहीच नाही. लिंक
एस, अवांतर काहीच नाही. लिंक बद्दल
आभार.
आता तरी रासायनिक खते सोडून
आता तरी रासायनिक खते सोडून सेंद्रिय आणि शाश्वत शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.>>>>
काळाची गरज तर आहेच पण सेंद्रिय शेतीकडे वळणे खुप कठिण आहे. लोकांचा माइंडसेट आणि जमिनीचे आरोग्य ह्या दोन गोष्टी चांगल्यासाठी बदलणे सोपे नाही. जमिनीचे आरोग्य सुधारणे म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कार्बन सुधरवणे. यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. परिणाम लगेच दिसेल ही अपेक्षा सोडुन द्यावी लागते. आणि परिणाम लगेच दिसत नाहीत त्यामुळे सेंद्रिय शेती पैसे देत नाही हा माईंडसेट बनतो. नेहमीची शेतीही पैसे देत नाही असे शेतकरी म्हणतो
पण नवे प्रयोग करुन पाहायला तो घाबरतो.
असो. नेहमीच्या शेतीतुनच शेतकर्याला सेंद्रिय शेतीत घेऊन जायचे कृषी विद्यापिठांचे प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात गेल्या वर्षी भातशेतीच्या एका शेतीशाळेत शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र काशिद यांनी खुप सुंदर उत्तर दिले होते. एका शेतकर्याने शाळेत विचारले की मला पुर्ण सेंद्रिय भातशेती करायचीय, मार्गदर्शन करा. तेव्हा काशिद सर म्हणाले की मी सुरवातीपासुन सगळे सेंद्रियच सांगतोय. भाताच्या रोपवाटिकेत तुस जाळुन टाका, हे सेंद्रिय आहे. जमिनीत ४५ दिवस आधी हिरवळीची खते लावा व जमिनीत गाडा, हे सेण्द्रिय आहे. चिखलणीत ग्लिरिसिडियाचा पाला टाका, हे सेंद्रिय आहे. उंदिर, खेकडे, किडे यांपासुन पिक वाचवण्यासाठी पक्षीथांबे, चिकट सापळे, चिंचोके, दशपर्णी अर्क वापरा, हे सेंद्रिय आहे. जमिनीचा कस बघुन सुफला वापरा आणि किड/रोग नियंत्रणाबाहेर जात असेल तर किटकनाशके वापरा हे जे सांगितले आहे तेवढेच रासायनिक आहे. तुम्हाला पुर्णच सेंद्रिय करायचेय तर ह्या ठिकाणी अग्निअस्त्र व जीवामृत वापरा.
आता तरी रासायनिक खते सोडून
आता तरी रासायनिक खते सोडून सेंद्रिय आणि शाश्वत शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.>>> कुणी यांच्याविषयी जाणतं का?
https://youtu.be/yAx9NtwPlyg?si=6cLpQ07zsSz-BD-1
मस्त माहिती. कौतुकास्पद !
मस्त माहिती. कौतुकास्पद !
वाचतोय.
वाचतोय.
लेखमाला लिहायला सुरू केले हे
लेखमाला लिहायला सुरू केले हे छानच झाले.
पाणी foundation चे काम सुरवातीला व्हिडीओ सहित documented आहे.
झी मराठीवर तासभर दाखवत असत तेव्हा पाहिले आहे.
मोठं काम आहे हे.
नियत आणि नियोजन , सोबत गावकऱ्यांना त्यात सहभागी करून घेतल्याने ownership ची भावना निर्माण होणे ही प्रमुख गोष्ट वाटलेली मलाही.
Btw,
शेतकरी आत्महत्यानंतर नाना आणि मकरंद ह्यांनी नाम foundation माध्यमातून देखील बरेच काम केलंय.
मस्त लेख. ह्याबद्दल काहीच
मस्त लेख. ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं.
आत्तापर्यंत झालेल्या प्रयत्नांचे रिझल्ट कुठे जाहीर झाले आहेत का ? म्हणजे स्पर्धेचे निकाल नाही, तर क्ष वर्ष SOP वापरून केलेल्या शेतीमुळे सेंद्रिय कार्बनचे प्रमाण आता अमुक टक्क्यांनी वाढले आहे वगैरे ?
तर क्ष वर्ष SOP वापरून
तर क्ष वर्ष SOP वापरून केलेल्या शेतीमुळे सेंद्रिय कार्बनचे प्रमाण आता अमुक टक्क्यांनी वाढले आहे वगैरे ?>>>>
असा निकाल अद्याप नाहीय कारण सेंद्रिय कार्बन वाढवणे हा स्पर्धेचा थेट उद्देश नाही.
एस ओ पी नियमीत वापरली तर से का वाढेल का? तर माझ्या मते हो वाढेल पण हळुहळू. कारण एस ओ पी मध्ये पिक लावण्याआधी त्यात सेंद्रिय घटक टाकण्याची शिफारिस आहे ज्यामुळे से का वाढतो. तणनिर्मुलनासाठी मल्चिण्ग किंवा तणनाशके वापरण्याची शिफारिस आहे. तणनाशके वाईट आहेत हे खरे आहे पण त्याचा एक फायदा हा आहे की वरचे रोप सुकुन जाते व मुळ जमिनीत तसेच राहते. से का वाढवायला याचा फायदा होतो.
हंगामापुर्वी माती परिक्षण करुन घ्या आणि त्याचा रिझल्ट पाहुन खते वापरा हा सल्लाही हल्ली सतत दिला जातोय.
से का वाढतोय का हे शेतकर्याला यातुन कळेल.
असा निकाल अद्याप नाहीय कारण
असा निकाल अद्याप नाहीय कारण सेंद्रिय कार्बन वाढवणे हा स्पर्धेचा थेट उद्देश नाही. >>>> स्पर्धेचा उद्देश्य म्हणून नाही. एकूण प्रयोग म्हणून.
हंगामापुर्वी माती परिक्षण करुन घ्या आणि त्याचा रिझल्ट पाहुन खते वापरा हा सल्लाही हल्ली सतत दिला जातोय.
से का वाढतोय का हे शेतकर्याला यातुन कळेल. >>> अच्छा. ह्याने फायदा होईल नक्की.
तणनाशके वाईट आहेत हे खरे आहे पण त्याचा एक फायदा हा आहे की वरचे रोप सुकुन जाते व मुळ जमिनीत तसेच राहते >>>> इथे आमच्या बॅकयार्डात डँडीलायन्स येतात खूप. त्यावर तणनाशक मारलं तर एका दिवसात अक्षरश: होरपळतं ते. म्हणजे ते तण म्हणून वाईट असलं तरी मला ते होरपळणं बघून तणनाशक किती जहाल असेल असं वाटतं. ह्या सिझन मध्ये मी बरीच मुळासकट उपटून काढायचा प्रयत्न करतो आहे. असो. अवांतर झालं.
हे सकारात्मक लिखाण वाचून छान
हे सकारात्मक लिखाण वाचून छान वाटलं.