ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १६

Submitted by नितनवे on 27 May, 2026 - 13:12

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १५
पूर्वभाग
कबीर आणि डॅनियल क्रॉस यांच्यात पहिल्यांदाच थेट संपर्क होतो, आणि “LAST_TIDE” हे फक्त डेटा आर्काइव्ह नसून विखुरलेले तुकडे एकत्र आणण्यासाठी तयार केलेलं गुप्त यंत्रणेचं नाव असल्याचं स्पष्ट होतं. कुर्ला फ्रेट यार्डमधील जुन्या कार्गो वॅगनमध्ये जमलेले सहाही जण दुष्यंत देशमुखांनी मागे ठेवलेल्या आर्थिक पॅटर्न्स, शेल कंपन्या, विमा व्यवहार आणि बाजारातील कृत्रिम घबराटीचा जागतिक नकाशा उलगडताना पाहतात.
लाईव्ह अ‍ॅडव्हायझरीज आणि ऐतिहासिक डेटाची तुलना करताना त्यांना समजतं की Black Ember प्रत्येक घटने आधी एक ठरावीक तीन-टप्प्यांची आर्थिक आणि लॉजिस्टिक साखळी सक्रिय करतं.
विनायकराव आणि डॅनियल यांना दुष्यंतचा खरा हेतू समजतो; स्वतंत्र पुरावे जमा करणं नव्हे, तर योग्य वेळी सगळे तुकडे एकत्र आणून Black Ember च्या संपूर्ण आर्थिक यंत्रणेला उघड करणारा synchronized counter-trap तयार करणं.
शेवटी सहाही जणांना जाणवतं की हा ट्रॅप पूर्ण होण्यासाठी प्रत्येक फ्रॅगमेंट आवश्यक आहे. आरवचा डेटा, मायाचं मीडिया नेटवर्क, कबीरची लॉजिस्टिक्स माहिती, समीरची फिल्ड अ‍ॅक्शन, विनायकरावांचं कायदेशीर ज्ञान आणि डॅनियलची सुरक्षा रणनीती.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १६ - सेकंड एस्कलेशन
त्या गंजलेल्या जुन्या निळ्या कार्गो वॅगनच्या अगदी जवळून अधूनमधून लोकल ट्रेन्स गर्जत जात होत्या. प्रत्येक वेळी एखादी लोकल पास झाली की त्या वेगाने आणि आवाजाने संपूर्ण वॅगन आतून हलून जात होता. पण वॅगनच्या आत बसलेल्या सहा जणांच्या मनातील वादळ त्या लोकलच्या आवाजापेक्षाही मोठं होतं. ते सगळे पूर्णपणे शांत बसले होते. कोणीच बोलत नव्हतं.

आता पहिल्यांदाच संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट दिसायला लागलं होतं. आरव देशमुखच्या समोर तो रग्ड लॅपटॉप उघडा होता. त्या स्क्रीनवर एकमेकांत गुंफलेले धागे स्पष्ट दिसत होते:
• इन्शुरन्स पोझिशनिंग
• मॅरिटाईम अ‍ॅडव्हायझरीज
• शेल राउटिंग ओव्हरलॅप्स
• कोऑर्डिनेट्स हेज टाइमिंग
हे सगळे तुकडे आता स्क्रीनवर वेगवेगळ्या विंडोजमध्ये नसून, एखाद्या विणलेल्या जाळ्यासारखे एकमेकांशी जोडलेले दिसत होते. पण आता प्रश्न हा होता की पुढची चाल कोण आधी खेळणार?

त्या दमट, कोंदट शांततेत समीर नायर शेवटी वैतागून म्हणाला, “ठीक आहे. समजा हे सगळं खरं आहे. दुष्यंतने रचलेले हे चक्रव्यूह आपण शोधून काढलं, हे मला मान्य आहे.” समीरने कपाळावरचा घाम पुसत विचारलं, “पण प्रॅक्टिकली आता करायचं काय? आपण या वॅगनमध्ये बसून जग बदलू शकत नाही.”
यावेळी कोणाकडूनच लगेच उत्तर आलं नाही. दूरवरून कुठेतरी एखाद्या मालगाडीचा हॉर्न घुमला. पावसाचे थेंब वॅगनच्या तुटक्या छतावरून गळत खाली लोखंडी जमिनीवर 'टप-टप' पडत होते.

त्यानंतर विनायकराव थोडे पुढे झुकले. त्यांच्या आवाजात जुन्या सरकारी 'थ्रेट-अ‍ॅसेसमेंट ब्रीफिंग'ची स्पष्टता परत आली होती.
“समीर, ब्लॅक एम्बरची खरी ताकद त्यांचा पैसा नाहीये. त्यांची खरी ताकद 'सिंक्रोनायझेशन' अचूक वेळ साधणं आहे.”

ते वॅगनच्या गंजलेल्या जमिनीवर पसरलेल्या रेल्वे मॅपकडे बोट दाखवत पुढे म्हणाले, “शिपिंग इन्शुरर्स, कमोडिटी फंड्स, इमर्जन्सी अ‍ॅडव्हायझरीज हे सगळं जेव्हा एकाच वेळी, मूव्ह होतं ना... तेव्हा बाजारात एक भयानक पॅनिक तयार होतो.”

माया सेनने स्क्रीनवरील डेटाचा आलेख पाहत हळूहळू, विचारपूर्वक पुस्ती जोडली, “आणि पॅनिक म्हणजे केवळ मार्केट कोलॅप्स नाही, पॅनिक म्हणजे सिस्टीमवरचा 'विश्वास तुटणं' आणि एकदा का विश्वास तुटला, की माणसांची बुद्धी चालणं बंद होतं.”

विनायकरावांनी होकारार्थी हलकी मान डोलावली. डॅनियल काही सेकंद शांत राहिला. रात्रभराच्या पळापळीने आणि मानसिक दबावाने तो खूपच थकलेला दिसत होता. त्यातच वॅगनच्या दाराला घासल्यामुळे त्याच्या हातावरची जुनी जखम पुन्हा ओली झाली होती आणि तिथून रक्त यायला लागलं होतं पण तरीही, त्याचा भारदस्त आवाज अजूनही तेवढाच स्थिर होता.

“माया बरोबर म्हणतेय,” डॅनियलने आपल्या जखमेवर रुमाल बांधत आरवच्या लॅपटॉपकडे पाहिले. “पण यात एक मोठी जोखीम आहे. जर आपण हा archive चुकीच्या वेळी, घाईघाईत बाहेर काढला ...तर नियमन करणाऱ्या संस्था स्वतः पॅनिक करतील. त्यांना वाटेल की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आहे आणि ते सगळं फ्रीझ करून टाकतील. आणि शेवटी ब्लॅक एम्बर त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळाचा फायदा घेऊन पुन्हा एकदा अब्जावधींचा नफा कमवेल.”

समीर चिडून आणि वैतागून म्हणाला, “म्हणजे आपण काहीच करायचं नाही? इतक्या लांब येऊन, एवढा जीव धोक्यात घालून फक्त इथे शांत बसून राहायचं?”

“नाही,” डॅनियल अत्यंत शांतपणे, पण तितक्याच ठाम आवाजात म्हणाला. “आपण शांत बसणार नाही आहोत, समीर. आपण त्यांच्या टायमिंगमध्ये व्यत्यय टाकायचा आहे.”

या वेळी आरव पहिल्यांदाच स्वतःहून सरळ पुढे झुकला. लॅपटॉपच्या स्क्रीनचा निळा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडत होता आणि त्याच्या डोक्यात दुष्यंत देशमुखांच्या जुन्या आठवणी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी एकामागून एक फिरत होत्या. त्या डायरीतील अनाकलनीय कंटेनर कोड्स , भिंतीवर टांगलेले जागतिक शिपिंग मॅप्स आणि एकाच गुन्ह्याचे पुन्हा पुन्हा दिसणारे पॅटर्न्स. या सगळ्याचा अर्थ आरवला आता पूर्णपणे समजला होता.

तो अत्यंत हळू, पण स्पष्ट आवाजात म्हणाला, “माझे बाबा फाईल्स कलेक्ट करत नव्हते, समीर. ते रिएक्शन्स ट्रॅक करत होते.”

डब्यातील सगळेच जण श्वास रोखून आरवकडे पाहू लागले. कबीरनेही आपली नजर त्याच्यावर स्थिरावली.

आरव लॅपटॉपच्या कीबोर्डवरून हात काढून पुढे म्हणाला, “बाबांना नीट ठाऊक होतं... ब्लॅक एम्बरला स्वतः घडवून आणलेल्या घटनांपेक्षा, त्या घटनेनंतर संपूर्ण मार्केट आणि सिस्टीम काय प्रतिसाद देते, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण त्या प्रतिसादावरच त्यांचा नफा अवलंबून असतो.”

डॅनियलचा चेहरा क्षणात बदलला. त्याच्या डोक्यात चक्रे वेगाने फिरली आणि त्याला अचानक एका मोठ्या धोक्याची जाणीव झाली. तो झटकन मायाकडे वळला आणि म्हणाला, “माया, इन्शुरन्स फीड्स पुन्हा उघड. आत्ताच्या आत्ता!”

मायाने पटकन टॅबलेट अ‍ॅक्टिव्हेट केला. लाईव्ह मॅरिटाईम अलर्ट्स स्क्रीनवर वेगाने स्क्रोल होऊ लागले. कबीर सरकून तिच्या अगदी शेजारी आला. त्याची तीक्ष्ण नजर स्क्रीनवर चमकणाऱ्या एका छोट्या अ‍ॅडव्हायझरी कोडवर स्थिर झाली. तो एकदम ताठ झाला.

“हे नवीन आहे,” कबीरच्या आवाजातली संथपणा निघून गेला होता.

स्क्रीनवर एक नवीन अपडेट लाल रंगात ब्लिंक होत होतं: WESTERN COAST TANKER REVIEW - PRIORITY SHIFT

समीर अजूनही गोंधळलेला होता. त्याने कपाळावर हात मारत विचारलं, “अरे पण, त्यात काय एवढं मोठं आहे? रोजच कसले ना कसले रिव्ह्यू कोड्स येत असतात ना?”

कबीर म्हणाला “समीर, प्रायोरिटी शिफ्ट म्हणजे सिस्टीमचा ऑटोमॅटिक जनरेटेड रिव्ह्यू नाही... तो मॅन्युअल इंटरव्हेन्शन माणसाने सिस्टीममध्ये घुसून केलेली ढवळाढवळ आहे.”

विनायकराव स्क्रीनवर डोळे बारीक करून पाहत पुढे झुकले, “म्हणजे... कोणीतरी मुद्दामहून समुद्रात जहाजांचा खोळंबा तयार करतंय?”

डॅनियलने नकारार्थी मान हलवली. त्याचे डोळे लॅपटॉपच्या स्क्रीनवरील 'LAST_TIDE' च्या जुन्या पॅटर्न्सशी ते मॅच करत होते, “नाही विनायकराव. परिस्थिती त्याहून भयानक आहे...”

“...कोणीतरी फोर्सड रीराउटिंग जहाजांना जबरदस्तीने मार्ग बदलायला पुश करतंय.”

त्या गंजलेल्या निळ्या वॅगनमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मग, अचानक माया म्हणाली, ““ओह गॉड... जर समुद्रातील इंधनाचे टँकर्स जबरदस्तीने रीराउट झाले, तर मुंबईच्या किनाऱ्यावर ते वेळेत पोहोचणार नाहीत...”
“...आणि ते पोहोचले नाहीत, तर मीडिया काही तासांतच इंधनाच्या तुटवड्याची भीती, म्हणजेच scarcity narrative चालवायला सुरुवात करेल!”

समीरच्या डोक्यात अचानक सगळे तुकडे जुळले. त्याने कबीर आणि डॅनियलकडे पाहिलं, आणि पुढचं वाक्य स्वतःच उच्चारलं, “आणि एकदा मीडियाने भीती पसरवली, की पेट्रोल पंपांवर आणि बाजारात लोक घाबरून साठेबाजी सुरू करतील!”

पहिल्यांदाच त्या गंजलेल्या डब्यात बसलेल्या सगळ्यांच्या डोक्यात ब्लॅक एम्बरची ती संपूर्ण साखळी एखाद्या भयानक चित्रपटासारखी स्पष्ट झाली.
एका संपूर्ण अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्याची ही एक अचूक, क्रूर टाईम-लाईन होती.

कबीर अतिशय मंद, खोल आवाजात म्हणाला, “सेकंड एस्केलेशन ऑलरेडी सुरू झाली आहे. टँकर्स मॅन्युअली रीराउट व्हायला लागलेत.”

त्याच क्षणी... अगदी त्याच सेकंदाला, बाहेर त्या विस्तीर्ण मेंटेनन्स कॉरिडॉरमधील ओल्या लोखंडी रुळांवर आणि धातूवर कुणाच्यातरी बुटांचे कडक आवाज घुमले. खट... खट...

डब्यातले सहाही जण क्षणात सुन्न झाले. समीरच्या हातातील पिस्तूल आपोआप ताठ झाली. डॅनियलने हातानेच सर्वांना खाली बसण्याचा सिग्नल दिला, नो मूव्हमेंट.

वॅगनच्या तुटक्या खिडकीच्या फटीतून बाहेर एक माणूस दिसला. त्याने रेल्वे कर्मचाऱ्यांसारखा भगवा रंगाचा रेनकोट घातला होता आणि तो एखाद्या सामान्य रेल्वे मेंटेनन्स वर्करसारखा कॉरिडॉरमधून चालला होता. पण त्याची चाल एका सामान्य रेल्वे कर्मचाऱ्याची नव्हती. त्याचे प्रत्येक पाऊल मोजून-मापून पडत होते. त्याची मान स्थिर असली, तरी त्याचे कान आणि डोळे अवतीभोवतीच्या प्रत्येक गोष्टीचा वेध घेत होते.

कबीर डॅनियलच्या कानाजवळ झुकत अगदी हळू आवाजात कुजबुजला , “व्हेरिफिकेशन कॉन्टॅक्ट.

समीर हल्ल्याचा अंदाज घेऊन जागेवरून झटकन उठला, पण डॅनियलने त्याचा हात घट्ट धरून त्याला जागीच थांबवलं. “नको, समीर...” डॅनियल अत्यंत धीम्या आवाजात म्हणाला.
“तो फक्त कन्फर्म करायला आलाय... आपण इथेच आहोत की नाही, याची खात्री करतोय तो.”

बाहेरचा तो रेनकोट घातलेला माणूस वॅगनच्या अगदी जवळून, न थांबता शांतपणे पुढे निघून गेला.
काही सेकंद... वॅगनमध्ये फक्त श्वासांचे आवाज येत राहिले. पूर्ण शांतता.
मग दूर, कॉरिडॉरच्या मुख्य तोंडाशी ती काळी एसयूव्ही पुन्हा एकदा हळूहळू पुढे सरकताना दिसली. पण या वेळी ती थांबली नाही. तिच्या काळ्या काचांमागून त्यांनी फक्त एकदा अख्खा कॉरिडॉर स्कॅन केला आणि ती गाडी चिखल उडवत पुढे निघून गेली.

मायाचा रोखलेला श्वास कोंडला होता, ती हलक्या आवाजात म्हणाली, “कबीर, ते गेले? आपण वाचलो?”

कबीरने नकारार्थी मान हलवली, त्याचे डोळे अधिक तीक्ष्ण झाले, “नाही, माया. ते गेले नाहीत.”

“आता ते हळूहळू पॅटर्न तयार करतायत. आपली जागा आणि आपण कशी प्रतिक्रिया देतो, हे दोन्ही ते निश्चित करून घेतायत.”

त्याच क्षणी, आरवने समोर असलेला लॅपटॉप पुन्हा आपल्याजवळ ओढला. कबीर आणि डॅनियलने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याने वडिलांच्या सिस्टीममधील शिपिंग ओव्हरलेज, अ‍ॅडव्हायझरी टायमिंग्स आणि हेज विंडोज एकाच पडद्यावर एकत्र मॅप करायला सुरुवात केली.
अल्गोरिदम वेगाने फिरला. ग्राफ्सचे धागे एकमेकांत गुंफले गेले... आणि अचानक आरव जागच्या जागी ताठ झाला. त्याचे बोट कीबोर्डवर गोठले.

“Wait...” आरव अत्यंत धापा टाकत म्हणाला.

डब्यातील सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. आरवचा श्वास आता प्रचंड वाढला होता, त्याचा चेहरा भीतीने फिकट पडला होता.

“हे... हे नेक्स्ट टार्गेट नाहीये कबीर... डॅनियल...”
“हे सगळं... हे टँकर्स रीराउट करणं, वेस्ट कोस्ट अ‍ॅडव्हायझरी... हे सगळं फक्त एक डायव्हर्जन आहे!”

डॅनियलचा चेहरा हे ऐकताच क्षणात काळजीत पडला, त्याच्या डोक्यातली जुनी ऑपरेशन्स जागी झाली, “काय? डायव्हर्जन?”

आरवने लॅपटॉपच्या मुख्य लाल विंडोकडे बोट दाखवलं, जिथे दुष्यंत देशमुख यांनी शेवटचा कोड लिहून ठेवला होता, “रिअल एस्केलेशन टँकरच्या रूटमध्ये नाहीये. ब्लॅक एम्बरला फक्त पेट्रोल डिझेल अडवायचं नाहीये...”

“ते मुंबईचे सगळे पोर्ट्स टेम्पररी फ्रीझ करणार आहेत! संपूर्ण सागरी वाहतूक एका झटक्यात ठप्प करणार आहेत!”

वॅगनमध्ये पुन्हा एकदा सुन्न करणारी शांतता पसरली. वरून पुन्हा एक लोकल ट्रेन प्रचंड गर्जना करत निघून गेली, पण या वेळी त्या आवाजाने कोणाचेही लक्ष विचलित झाले नाही. कारण पहिल्यांदाच... त्या वॅगनमध्ये बसलेल्या सहाही जणांना एकाच वेळी जाणवलं.
ब्लॅक एम्बरने अजून आपला मुख्य खेळ सुरूही केलेला नव्हता... ही तर फक्त वादळापूर्वीची शांतता होती.
************************************************************************************************************************
फ्रँकफर्ट.
संध्याकाळ.

फायनान्शियल डिस्ट्रिक्टवर हळूहळू काळोख दाटत होता. काचेच्या उंच, भव्य इमारती अजूनही दिव्यांनी उजळलेल्या होत्या. ट्रेडिंग फ्लोअर्स अधिकृतपणे बंद झाले होते, पण आतल्या प्रायव्हेट टर्मिनल्सवर अजूनही वेगाने हालचाली सुरू होत्या. कारण बाजार वरवर शांत दिसत असला…
तरी भीती आतल्या आत, अगदी नजरेआड वाढत होती.

फायनान्शियल डिस्ट्रिक्टच्या अठ्ठावीसाव्या मजल्यावरच्या एका शांत कॉन्फरन्स रूममध्ये एलेना व्होल्कोव्हा एकटी बसली होती. समोरच्या अनेक स्क्रीनच्या निळसर प्रकाशात तिची सावली भिंतीवर हलकेच थरथरत होती.

तिच्या समोर सतत बदलणारे डेटा फीड्स उघडे होते. टँकर रूटिंगच्या रांगा, विमा कंपन्यांच्या संकोचाचे अहवाल, पश्चिम किनाऱ्यावरील अ‍ॅडव्हायझरीज, कमोडिटी हेज फंड्सच्या हालचाली…आकडे हळूहळू बदलत होते. आलेख वरखाली होत होते. पण अपेक्षित पद्धतीने सगळं एकमेकांशी जुळत नव्हतं. आणि नेमकी तीच खरी समस्या होती. काहीतरी बिनसलं होतं.

तेवढ्यात टेबलावर ठेवलेला एन्क्रिप्टेड फोन पुन्हा एकदा हलकेच व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर एकच शब्द चमकला - DIRECTOR.
एलेनाने काही क्षण स्क्रीनकडे निर्विकार नजरेने पाहिलं. मग खोल श्वास घेत कॉल स्वीकारला.

सुरुवातीला पलीकडून काहीच आवाज आला नाही. आणि मग तोच थंड, भावनाशून्य पुरुषी आवाज शांतपणे कानात घुमला, ““Why are the insurers slowing down इन्शुरन्स कंपन्या मंद का पडतायत?”

डॅशबोर्डवरून फिरणारी एलेनाची नजर स्थिरावली. भारतीय सागरी विमा कंपन्यांनी अजूनही full exposure freeze लागू केला नव्हता, पण सिच्युएशन रूममधली शांतता खूप काही सांगून जात होती. काही ठराविक फर्म्स आता कमालीच्या सावध पाऊल टाकत होत्या. स्वतंत्र पडताळणीशिवाय त्या एक पाऊलही पुढे टाकायला तयार नव्हत्या. अ‍ॅडव्हायझरीच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचा wording क्रॉस-चेक केला जात होता. बंदरांवर खोळंबलेल्या जहाजांचे unloading delays मॅन्युअली तपासले जात होते.

एक अदृश्य भीती संपूर्ण सिस्टमला खिळवून ठेवत होती. आणि 'ब्लॅक एम्बर'च्या खेळाडूंसाठी हा वेळ गमावणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं.

एलेनाने फोन हातात घेतला आणि अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाली, “इंडियन रिव्ह्यू चेन्स अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने सक्रिय झाल्यात.” “इथल्या पोर्ट ऑथॉरिटीजनी अ‍ॅडव्हायझरीच्या सीक्वेन्सवर थेट प्रश्न उभे करायला सुरुवात केलीये.”

दुसऱ्या टोकाला फोनवर काही सेकंदांसाठी काळ गोठल्यासारखा झाला. त्यानंतर डायरेक्टरचा थंड आणि तितकाच निर्ढावलेला आवाज ऐकू आला, “Then we accelerate uncertainty.”

एलेनाचा चेहरा एकदम पडला, “पण सर, वेग वाढवला तर आपली visibility वाढेल... आपण उघडे पडू.”

“टेम्पररी...” डायरेक्टर थंडपणे म्हणाला.

“पण मार्केटची मेमरी परमनंट असेल!” एलेनाचा आवाज चढला.

फोन चालूच होता, पण दोघंही गप्प होते. तिला आता स्पष्ट दिसत होतं, डायरेक्टरच्या हातातून लगाम सुटला होता. तो आता परिस्थितीवर हुकूम चालवत नव्हता, तर फक्त विस्कटलेली सूत्रं कशीबशी एकत्र बांधून ठेवण्याचा synchronize करण्याचा शेवटचा प्रयत्न करत होता.
तितक्यात, स्क्रीनवर प्रकाश चमकला. एक नवीन अलर्ट स्क्रीनवर झळकला - WESTERN COAST PRIORITY REVIEW - LEVEL 2

एलेनाची नजर विस्फारली. ती थेट मुद्द्यावर आली, “लेव्हल २ मागे कोण आहे? कोणी पुश केलं हे?”

डायरेक्टर लगेच बोलला नाही. त्याच्या श्वासाचा आवाज फोनवरून येत राहिला. शेवटी तो अगदी शांतपणे म्हणाला, “झ्युरिकने पहिली चाल खेळलीये Zurich moved first.”.

एलेनाच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. या एका गोष्टीचा अर्थ काय होतो, हे तिचे चतुर डोकं ओळखून होतं.

'ब्लॅक एम्बर'चे अंतर्गत फंड्स आता एका वेगळ्याच दिशेने वाहत होते. ते थेट या संघर्षाच्या वाढीवर सट्टा लावत होते. संपूर्ण ऑपरेशन आता केंद्रीय पातळीवरून चालवलं जात नव्हतं. लोभाचं एक भयंकर जाळं संपूर्ण नेटवर्कमध्ये वेगाने पसरत होतं. प्रत्येकाला स्वतःचा फायदा ओरपायचा होता.

डायरेक्टरचा आवाज फोनमधून पुन्हा घुमला, “Prepare maritime cascade.”

एलेनाचा श्वास क्षणभर रोखला गेला. ती घाबरून म्हणाली, “पण सर, कॅसकेडच्या अंमलबजावणीला बोर्डाची कधीच अधिकृत मंजुरी नव्हती. आपण हे करू शकत नाही.”

“मंजुरी नव्हती... पण आता परिस्थितीचा तसा दबाव आहे,” डायरेक्टरने विषय संपवला.

आणि खटकन फोन कट झाला. त्या आलिशान कॉन्फरन्स रूममध्ये पुन्हा एकदा तीच संशयास्पद शांतता पसरली.

दूर कुठेतरी फायनान्शियल डिस्ट्रिक्टच्या गजबजलेल्या रस्त्यांवर अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन घुमत होता. एलेना काही सेकंद पूर्णपणे गोठल्यासारखी स्तब्ध बसून राहिली. तिची नजर स्क्रीनवर सतत बदलणाऱ्या shipping queue maps वर खिळली होती.

तिला चांगलं ठाऊक होतं, 'मॅरीटाईम कॅसकेड' म्हणजे काय असणार होतं. त्याचा अर्थ अगदी स्पष्ट होता, टँकर्सच्या तपासणीच्या नावाखाली वेळकाढूपणा करणे. इन्शुरन्स व्हेरीफिकेशनच्या चक्रव्यूहात कंपन्यांना अडकवणे. बंदरांवर जहाजांच्या मालाचे बॅकलॉग्स साठवून ठेवणे. ऐनवेळी जहाजांचे मार्ग बदलण्याचे अ‍ॅडव्हायझरी आदेश काढणे आणि मालाच्या गुणवत्तेवर संशय घेणाऱ्या अफवा हवेत पसरवणे.

या गोष्टी सुट्या-सुट्या पाहिल्या, तर बाजारात थेट दहशत निर्माण करू शकत नव्हत्या. पण त्यांचा एकत्रित परिणाम एकच होता, बाजारातल्या संभ्रमाची आणि अनिश्चिततेची तीव्रता वाढवणे. आणि एकदा का ही अनिश्चिततेची ठिणगी पडली, की पुढे, मार्केट स्वतःच्याच भीतीने त्या ठिणगीचा वणवा करतं.

एलेनाने थकल्यासारखे डोळे मिटून घेतले. तिच्या डोक्यात भूतकाळातील ऑस्ट्रेलिया, नोव्होरोसिस्क, मेडिटेरेनियन फ्रीझ या वादळी ऑपरेशन्सच्या आठवणी जाग्या झाल्या.

गेल्या अनेक वर्षांत खेळ बदलला होता, पण खेळाचा नियम तोच होता. पॅटर्न अगदी अचूक होता:; सुरुवातीला यंत्रणेची धडपड... त्यानंतर मीडियामधल्या रंगणाऱ्या कहाण्या... त्यावरून उसळणारा जनक्षोभ... आणि या सगळ्यानंतर पडद्यामागे पडणारा पैशांचा पाऊस.

नफा. फक्त नफा.

पण या वेळी... या वेळी काहीतरी वेगळं होतं. खूप वेगळं.
हा उशीर, हे सतत चाललेलं क्रॉस-चेकिंग, यंत्रणेचा हा संकोच हे सगळं आपोआप घडत नव्हतं. जणू काही एखादा अदृश्य हात या संपूर्ण synchronization च्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक अडथळे टाकत होता.

तिचा हात नकळत डेस्कच्या ड्रॉवरकडे गेला. ती काही सेकंद तशीच थांबली. तिचा हात तिथेच स्थिरावला. जणू काही ते ड्रॉवर उघडणं म्हणजेच... स्वतःचा पराभव स्वीकारण्यासारखं होतं. किंवा एका अशा सत्याला सामोरं जाणं होतं, जे तिला मान्य करायचं नव्हतं.
पण शेवटी तिने हळूहळू ते ड्रॉवर ओढलंच.

आत एका कोपऱ्यात ऐनवेळी पळून जाण्यासाठी लागणारे इमर्जन्सी पासपोर्ट्स, अत्यंत संवेदनशील डेटा असलेले कोल्ड स्टोरेज ड्राईव्ह्स, कोट्यवधींचे बेअरर बॉण्ड्स आणि... त्या सगळ्याच्या खाली लपवून ठेवलेला एक जुना फोटोग्राफ हे सगळं व्यवस्थित रचून ठेवलेलं होतं.
त्या एका जुन्या फोटोमध्ये दुष्यंत देशमुख, डॅनियल क्रॉस आणि ती स्वतः... एका जुन्या पोर्ट टर्मिनलवर एकत्र उभे होते.

त्या जुन्या दिवसांत गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा नफा मिळवण्यासाठी बाजारात अशी कृत्रिम घबराट पसरवावी लागत नव्हती.

एलेनाची नजर त्या जुन्या फोटोवर खिळून राहिली. त्या आठवणींमधून ती बाहेर येते न येते, तोच तिच्या समोरील एन्क्रिप्टेड टर्मिनलच्या स्क्रीनवर एक नवा अलर्ट फ्लॅश झाला. INDIAN PORT INSURANCE REVIEW CALL - REQUESTED
डेटा पाहताच एलेनाचा श्वास रोखला गेला.

हा वरून आलेला कोणताही आपत्कालीन सरकारी छापा नव्हता. ही फक्त सिस्टीममधून आलेली एक साधी, नेहमीची पडताळणीची मागणी होती. पण या मागणीची वेळ भयंकर होती. चुकीच्या वेळी अचूक चाल खेळली गेली होती. कारण गणित अगदी साधं होतं. जर विमा कंपन्यांनी या प्रक्रियेचा सखोल रिव्ह्यू मागितला... बंदरांवर जहाजांचा माल उतरवताना मॅन्युअल व्हेरिफिकेशन सुरू झालं...आणि अ‍ॅडव्हायझरीच्या प्रत्येक कडीची तपासणी झाली...तर 'ब्लॅक एम्बर'ने बाजारात पसरवलेल्या दहशतीचं जे synchronization होतं, त्याचा वेग पार मंदावला असता.

आणि खेळात पहिल्यांदाच एलेनाच्या मनात एका भीतीची ठिणगी पडली. तिला कळून चुकलं की... मुंबईच्या कुर्लाच्या कोणत्यातरी एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेली ती व्यक्ती फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपून बसलेली नाहीये.
ती व्यक्ती आता पलटवार करत होती... ती 'ब्लॅक एम्बर'च्या महाकाय यंत्रणेचं टायमिंग उद्ध्वस्त करायला लागली होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे!!! कथा कथा म्हणता म्हणता सत्य परिस्थिती वाटायला लागली आहे! कथा वाचतान जेएनपीटीवर संप सुरू झाल्याची बातमी वाचली! आणि अनेक जहाजांचे रूटस तर बदलले जात आहेतच!

शानदार! प्रचंड आवडतो आहे प्रत्येक भाग, काहीतरी नवीन आणि उत्कंठावर्धक सापडते आहे. एकंदरीत, जर्मनी अन् कुर्ला यार्ड सामोरे आले म्हणायचे !

च्यायला आता रोज लोकलमध्ये लटकत सीएसएमटीकडे जाताना डाव्या हाताला रेल्वेचे लोकमोटिव्स, वॅगन इत्यादी पाहून त्यात कोणी सहा लोक बसलेत का हे बघायची ईच्छा होत राहील इतके वास्तवदर्शी आहे हे सगळे.