जगण्या

Submitted by Meghvalli on 25 May, 2026 - 02:58

अरे जगण्या, कुठं आहेस रे,
किती दिस झालं दिसलाच नाहीस।
कसा असतोस, काय करतोस —
एवढं तरी सांग की, जगण्या।।

कधी हसण्याच्या गर्दीत लपतोस,
कधी डोळ्यांतून निथळत येतोस।
हात धरायला गेलो तर —
ओंजळीतून वाळूसारखा सरतोस, जगण्या।।

पैशामागं धावत शोधलं तुला,
माणसांत गुंतूनही पाहिलं।
सापडलास मात्र दुसरीकडे —
कधी उमलत्या कळीत, कधी कोसळत्या पावसात, जगण्या।।

देवळाच्या पायऱ्या झिजवल्या,
उंबरठ्यावर डोकं टेकवलं।
भेटलास त्या कापऱ्या हंबरड्यात —
गायीच्या डोळ्यांत कालवे शोधताना, जगण्या।।

दक्षिण ते उत्तर पालथं घातलं,
भेटलास — पण रूप बदलून, जगण्या।
कधी म्हाताऱ्याच्या सुरकुत्या हास्यात,
कधी शेतकऱ्याच्या टपोऱ्या घामात, जगण्या।।

तुझा थांगच लागत नाही, जगण्या,
भेटशील कधी — नेम नाही।
आत्ता भेटशील, उद्या नसशील —
कसा धरू तुला, जगण्या।।

आयुष्यभर बाहेर भटकलो,
तुझ्या पाऊलखुणा शोधत राहिलो।
तू आतच होतास — श्वासाएवढा जवळ —
मीच दूर पळत सुटलो होतो, जगण्या।।

सोमवार, २५/५/२०२६ , १२:१० PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users