ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १४

Submitted by नितनवे on 24 May, 2026 - 11:02

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १३
पूर्वभाग
आरव देशमुख आणि त्याच्या टीमला समुद्राखालच्या गुप्त चेंबरमध्ये दुष्यंत देशमुख यांनी लपवून ठेवलेला “LAST_TIDE” व्हॉईस रेकॉर्डर सापडतो. त्या रेकॉर्डिंगमधून दुष्यंत उघड करतात की त्या जुन्या रात्री Black Ember चं खरं लक्ष्य डॅनियल नव्हे, तर स्वतः ते होते, आणि त्यांनीच डॅनियलला मुद्दाम पळून जाण्यास भाग पाडलं होतं. रिकव्हरी टीम्स लोअर चेंबरपर्यंत पोहोचत असतानाच अचानक झालेला गोंधळ आणि लाल distress flare मुळे डॅनियल क्रॉस पुन्हा जिवंत असल्याचं समोर येतं.
डॅनियल त्यांना जुन्या monsoon evacuation ट्रॅककडे घेऊन जातो आणि चौघेही गंजलेल्या ट्रॉलीतून जमिनीखालच्या ड्रेनेज टनेलमध्ये पळ काढतात.
शेवटी शत्रूला त्यांचा escape route समजल्याचं स्पष्ट होतं, आणि रिकव्हरी टीम्स त्या अंधाऱ्या टनेलमध्ये त्यांच्या मागावर उतरतात.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १४ - The Beginning of Defragmentation
लोखंडी प्लॅटफॉर्म त्या अंधाऱ्या भुयारात वेगाने धावताना अचानक समोर एका मोठ्या 'फोर्क' जवळ (फाटा) पोहोचला. तिथे रेल्वेचे रूळ दोन वेगवेगळ्या दिशांना वळत होते. एक ट्रॅक डावीकडे थेट समुद्राच्या दिशेने खाली झुकत होता, तर दुसरा उजवीकडे, मुंबई शहराच्या भूगर्भाच्या दिशेने जात होता.

डॅनियलने क्षणाचाही विलंब न करता त्या गंजलेल्या लेव्हरवर ताकद लावून उजवीकडचा शहराचा रूट निवडला. ट्रॉली एका तीव्र झटक्यासह उजवीकडे वळली.

ते पाहून समीर पावसात आणि अंधारात ओरडला, “डॅनियल, सी-रूट जास्त शॉर्टर आहे! डावीकडे गेलो असतो तर समुद्रात लवकर पोहोचलो असतो!”

डॅनियलचा आवाज त्या इंजिनच्या घरघराटात कमालीचा कठोर आणि स्पष्ट घुमला, “शॉर्ट रूट्स नेहमी मॉनिटर्ड असतात, समीर. समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक बोगद्यावर ब्लॅक एम्बरची माणसं आधीच स्नायपर्स घेऊन बसली असतील.”

ती लोखंडी ट्रॉली आता त्या अधिकच अंधाऱ्या, दमट सिटी लाईनमध्ये घुसली. इथला बोगदा आधीपेक्षा खूपच अरुंद आणि गुदमरवून टाकणारा होता. पाण्याच्या टप-टप आवाजासोबतच, आता त्यांच्या अगदी वरच्या बाजूने जमिनीला हादरवून टाकणारी प्रचंड कंपनं जाणवायला लागली होती. जणू काही एखादी जड मालगाडी त्यांच्या डोक्यावरून जात होती. ती कंपनं जाणवताच विनायकराव अंधारात अचानक ताठ झाले. त्यांच्या डोळ्यांत ओळख पटल्याची चमक दिसली.

“कुर्ला फ्रेड कॉरिडॉर (Kurla freight corridor)...” विनायकराव थरथरत्या आवाजात कुजबुजले.

डॅनियलने ट्रॅकवरून नजर न हटवता पहिल्यांदाच मान वळवून विनायकरावांकडे पाहिलं, “तुला अजूनही आठवतंय?”

विनायकरावांच्या वृद्ध चेहऱ्यावर जुन्या, काळवंडलेल्या आठवणींची सावली उमटली. “१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतरचे आपत्कालीन फ्रेड टनेल्स - संकटसमयी मालवाहतुकीसाठी बनवलेले गुप्त बोगदे... मला वाटलं होतं पोर्ट ऑथॉरिटी आणि रेल्वेने हे बोगदे वर्षानुवर्षांपूर्वीच कायमचे सील करून टाकलेत.”

डॅनियलने अत्यंत शांतपणे, समोरच्या काळोखाचा वेध घेत उत्तर दिलं, “ऑफिशियली झाले, विनायक. कागदावर हे बोगदे अस्तित्वातच नाहीत. म्हणूनच दुष्यंतने 'LAST_TIDE' चा डेटा लपवण्यासाठी या मार्गाची निवड केली होती.”

धाऽऽड!

नेमक्या त्याच क्षणी, बोगद्याच्या पाठीमागच्या भागात धातूवर काहीतरी अवाढव्य आदळल्याचा प्रचंड आवाज घुमला. पाठोपाठ बंदुकीच्या गोळीचा प्रतिध्वनी भिंतींवर आदळत त्यांच्यापर्यंत पोहोचला. रिकव्हरी टीम्स आता जवळ येत होत्या. त्यांना समजलं होतं की शिकार शहराच्या खालच्या गुप्त जाळ्यात शिरली आहे, आणि आता ते त्यांचा वेग दुप्पट करून मागे धावत होते. आरवने रेकॉर्डर छातीशी आणखी घट्ट आवळला. वर रेल्वेचा गडगडाट चालू होता, आणि खाली त्यांच्या मृत्यूचा पाठलाग.
************************************************************************************************************************
मुंबई.

आकाशाचा रंग काळा बदलून आता हळूहळू धूसर, राखाडी होत चालला होता. पाऊस अजूनही थांबला नव्हता; तो एका संततधार लयीत मुंबईवर कोसळत होता. इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर साचलेल्या पाण्याच्या थरांवर रस्त्या कडेच्या दिव्यांचे पिवळे आणि पांढरे प्रकाश चमचमत होते. टॅक्सीच्या डॅशबोर्डवर असलेल्या मोबाईल स्क्रीनवर न्यूज चॅनेल्सच्या ब्रेकिंग हेडलाईन्स सतत फ्लॅश होत होत्या रिफायनरीमधील आग, इंधनाचा तुटवडा, आणि बंदरावरील संथ झालेली वाहतूक. संपूर्ण शहर एका अज्ञात भीतीच्या छायेखाली होतं.

नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या त्या जुन्या, ओसाड कार्गो अ‍ॅनेक्सवर एक पूर्णपणे वेगळी, सुन्न करणारी शांतता पसरली होती.
रनवेवर नुकतंच लँड झालेलं ते छोटं चार्टर एअरक्राफ्ट आता हळूहळू पूर्णपणे थांबत होतं. त्याच्या इंजिनचा तो जड, चक्रावून टाकणारा आवाज पहाटेच्या मुसळधार पावसात विरून जात होता.

केबिनमध्ये बसलेली माया सेन काचेवर साचलेले पाण्याचे थेंब पुसत खिडकीबाहेर मुंबईच्या धूसर लाईट्सकडे पाहत होती. तिच्या डोक्यात अजूनही सिंगापूरच्या रस्त्यांवर त्यांच्या पाठीमागे असलेल्या त्या 'ग्रे सिव्हिक' गाडीचं चित्र फिरत होतं.

तिच्या शेजारी बसलेला कबीर पूर्णपणे शांत होता. पण त्याची नजर खिडकीबाहेरच्या शहरावर नव्हती. तो केबिनच्या काचेवर पडणाऱ्या अंतर्गत रिफ्लेक्शन्सकडे पाहत होता. तो प्रत्येक रिफ्लेक्शन अत्यंत बारकाईने ऑब्झर्व्ह करत होता... जणू तो केबिन पाहत नव्हता, तर या केबिनमधून नक्की कोण-कोण आपल्याकडे चोरून पाहतंय, याचा वेध घेत होता.

एअरक्राफ्ट शेवटी थांबलं. सीटबेल्टचा साईन बंद झाला. पण कबीर जागेवरून उठला नाही. तो अतिशय मंद, आवाजात म्हणाला, “फ्लाईटमध्ये आपल्या मागे बसलेल्या त्या न्यूजपेपर वाचणाऱ्या माणसाच्या बाबतीत काही नोटीस केलंस?”

माया किंचित गोंधळली, तिने बॅग उचलत विचारलं, “काय?”

कबीर तिच्याकडे वळलाच नाही, त्याचे डोळे अजूनही काचेवरच खिळलेले होते. “तो संपूर्ण फ्लाईटमध्ये एकदाही झोपला नाही.”

मायाने काही क्षण विचार केला, मग म्हणाली, “कोणी बिझनेसमन असेल कदाचित. झोप नसेल आली.”

कबीर शांत राहिला. मग त्याचा आवाज अधिक धारदार झाला, “त्याने तीन तासांच्या प्रवासात न्यूजपेपरचं एकही पेज टर्न केलं नाही.”

ते ऐकताच मायाच्या अंगावर सरसरून काटा आला. ती घाबरून कुजबुजली, “तुला... तुला म्हणायचंय तो ब्लॅक एम्बरचा ऑब्झर्वर होता?”

कबीरने त्यावर थेट हो किंवा नाही असं उत्तर दिलं नाही. तो फक्त उभा राहत म्हणाला “त्याने खिडकीबाहेर रनवेकडे एकदाही पाहिलं नाही, माया. त्याचे डोळे फक्त समोरच्या काचेवर येणाऱ्या आपल्या रिफ्लेक्शन्सवर होते.”

एअरक्राफ्टचं मुख्य दार उघडलं. मुंबईची ती ओली, दमट आणि खाऱ्या वाऱ्याची हवा एका झटक्यात केबिनमध्ये शिरली. ते दोघे पायऱ्यांवरून खाली उतरले. रनवेवर पडणारे पावसाचे जाड थेंब लाईट्सच्या प्रकाशात हिऱ्यांसारखे चमकत होते. दूर कोपऱ्यात काही फ्युएल ट्रक्स उभे होते. ते अख्खं कार्गो अ‍ॅनेक्स जवळजवळ पूर्णपणे रिकामं होतं. ना तिथे मोठी इमिग्रेशनची रांग होती, ना नेहमीच्या टर्मिनल्ससारखी गर्दी. तिथे फक्त काही स्थानिक कार्गो वर्कर्स जड पेट्या हलवत होते. दोन कस्टम्स ऑफिसर्स आळस देत उभे होते आणि हवेत पसरलेला एव्हिएशन फ्युएलचा तो तीव्र वास होता.

माया आजूबाजूचा ओसाड परिसर पाहत कुजबुजली, “हे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे की एखादा घोस्ट कॉरिडॉर ?”

कबीर आपले पावले वेगात टाकत पुढे चालला, “आपलं मुख्य इमिग्रेशन क्लिअरन्स क्वालालंपूरमध्येच झालं होतं, माया. इथे फक्त मॅनिफेस्ट क्लिअरन्स आहे. कस्टम्सची औपचारिकता.”

ते त्या छोट्या, जुन्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये शिरले. आतले जुने फ्लुरोसेंट लाईट्स एका विचित्र आवाजासह सतत फ्लिकर होत होते. तिथल्या एका लाकडी डेस्कमागे बसलेल्या अधिकाऱ्याने त्यांचे पासपोर्ट्स केवळ नावापुरते पाहिले. त्याने आपल्या मॅनिफेस्ट शीटवर एक टिक मार्क केला आणि कोणत्याही चौकशीशिवाय बाहेर पडण्याच्या एक्झिट डोअरकडे बोट दाखवलं.

ते बिल्डिंगबाहेर आले. बाहेरची पार्किंग एरिया जवळजवळ पूर्णपणे रिकामी होती. एक डिलिव्हरी ट्रक, दोन जुन्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीज... आणि त्या सगळ्यांच्या मागे, अंधारात दूर उभी असलेली एक काळी अवाढव्य एसयूव्ही.

मायाचा श्वास एका सेकंदासाठी तिथेच अडकला. ती नकळत चालता चालता थांबली. त्या एसयूव्हीचे सगळे हेडलाईट्स आणि अंतर्गत लाईट्स पूर्णपणे बंद होते. पण ड्रायव्हर सीटवर कोणीतरी अत्यंत स्थिर बसलेलं स्पष्ट दिसत होतं. तिच्या डोक्यात सिंगापूरच्या त्या रात्रीची भयानक आठवण पुन्हा चमकली.

“कबीर... तीच... तीच एसयूव्ही,” माया कापत्या आवाजात म्हणाली.

कबीरने आपलं चालणं थांबवलं नाही, तो तसाच पुढे गेला. मग टॅक्सीच्या जवळ पोहोचताना मंद आवाजात म्हणाला, “नाही. ती तीच गाडी नाहीये.” तो क्षणभर थांबला, “...पण ती तीच पद्धत आहे.”

माया काही क्षण शांत राहिली, आणि मग अचानक तिच्या लक्षात आलं, ती काळी एसयूव्ही एअरपोर्टच्या एंट्रन्सकडे पाहत नव्हती. तिचं तोंड एक्झिट लेनच्या दिशेने होतं. जणू काही आतून बाहेर पडणाऱ्या लोकांपैकी कोण कोणासोबत बाहेर पडतंय, हे ती गाडी ऑब्झर्व्ह करत होती.

ती कुजबुजली, “ते... ते pairs ट्रॅक करतायत...”

कबीरने टॅक्सीचं दार उघडताना पहिल्यांदाच हलकी मान डोलावली. “ब्लॅक एम्बरला माहिती आहे की आपण दोघं आता एक युनिट आहोत.”

ते टॅक्सीच्या जवळ पोहोचले. टॅक्सीचा ड्रायव्हर नुकताच झोपेतून उठल्यासारखा डोळे चोळत होता. कबीरने टॅक्सीत बसताना रिअर मिररमधून मागे उभ्या असलेल्या त्या काळ्या एसयूव्हीकडे एकदा पाहिलं. मग अत्यंत सामान्य आणि कोरड्या आवाजात ड्रायव्हरला म्हणाला, “सायन.”
टॅक्सी एका झटक्यात सुरू झाली आणि मुख्य रस्त्याला लागली.

मायाने कबीरकडे वळत लगेच विचारलं, “कबीर, आपण आरव देशमुखकडे थेट का जात नाहीये? त्याच्या जीवाला धोका आहे!”

कबीर काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. टॅक्सी आता एअरपोर्ट रोड सोडून मुख्य हायवेला लागली होती. पावसामुळे हायवेवर अवाढव्य कंटेनर ट्रक्सची एक लांबच लांब रांग संथ गतीने पुढे सरकत होती.

कबीर खिडकीबाहेर पाहत मंद आवाजात म्हणाला, “माया, जर आरव देशमुख आधीपासूनच ब्लॅक एम्बरच्या पाळतीखाली असेल... तर आपण हे उरलेले तुकडे थेट त्याच्याकडे घेऊन जाऊ शकत नाही. तसं करणं म्हणजे त्याला मृत्यूच्या हवाली करण्यासारखं आहे.”

माया खिडकीबाहेर पाहत राहिली. मुंबई शहर आता हळूहळू जागी होत होती. पण या नेहमीच्या गजबजलेल्या शहराच्या पोटात आत्ता काहीतरी प्रचंड अस्वस्थ, हिंस्त्र हलत असल्यासारखं जाणवत होतं.

तेवढ्यात... मायाची नजर नकळत टॅक्सीच्या रिअर मिररवर गेली.

हायवेवरच्या त्या मुसळधार पावसात, लांब अंतरावरून... दोन काळ्या हेडलाईट्स अत्यंत शांतपणे, कोणताही हॉर्न न वाजवता अचूक त्यांच्याच लेनमध्ये शिरताना दिसल्या.

ती तीच काळी एसयूव्ही होती. आणि यावेळी... ती आधीपेक्षा खूपच जास्त जवळ होती.

माया सीटवर पूर्णपणे ताठ झाली, तिचे हात थरथरायला लागले. पण कबीरचा चेहरा नेहमीप्रमाणेच पूर्णपणे निर्विकार, दगडी राहिला. तो बाहेर पडणाऱ्या धूसर प्रकाशाकडे पाहत अत्यंत मंद आवाजात म्हणाला, “आता खरी समस्या ते डॉक्युमेंट्स किंवा पुरावे नाहीत, माया. आता खरी समस्या आहे टायमिंग आपली वेळ संपत चाललीये.”

टॅक्सी एअरपोर्ट रोडवरून वेगाने सायन हायवेच्या दिशेने वळली.

पाऊस आता आधीपेक्षाही जास्त जोरात कोसळू लागला होता. विजांच्या लखाट्यांनी अंधारलेलं आकाश काही क्षणांसाठी पांढरं पडत होतं. माया सेनचे डोळे टॅक्सीच्या रिअर मिररवर खिळले होते. मागच्या अंधुक प्रकाशात त्या दोन काळ्या हेडलाईट्स अजूनही सावलीसारख्या त्यांच्या मागे सरकत होत्या.

ती तीच काळी एसयूव्ही होती. आणि या वेळी... ती आधीपेक्षा खूपच जास्त जवळ आली होती. तिच्या अवाढव्य बोनेटचा आकार आता रिअर ग्लासमध्ये स्पष्ट दिसत होता.

माया सीटवर पूर्णपणे ताठ झाली, तिचा श्वास वेगवान झाला. ती कबीरच्या हाताला धरत म्हणाली, “ती... ती अजूनही मागेच आहे. कबीर, ती अंतर कमी करतेय.”

कबीरने लगेच मागे वळून पाहिलं नाही. त्याचा चेहरा शांत, निर्विकार होता. तो फक्त विंडशील्डवरून वाहणाऱ्या पावसाच्या जाड पाण्याच्या थरांकडे आणि वायपरच्या एकाच लयीत होणाऱ्या आवाजाकडे पाहत राहिला.

टॅक्सी सायन सिग्नलजवळ आली. समोर लाल दिवा चमकत होता. हायवेवर कंटेनर ट्रक्स, टँकर्स आणि गाड्यांची प्रचंड ट्रॅफिक कोंडी झाली होती. पावसात चिखलाने माखलेल्या रस्त्यावर समोरच्या गाड्यांचे लाल ब्रेक लाईट्स चमकत होते. आजूबाजूला फक्त हॉर्नचा कर्णकर्कश आवाज आणि इंजिन्सचा आवाज घुमत होता. टॅक्सी ट्रॅफिकमध्ये अडकणार, इतक्यात कबीर अचानक समोरच्या सीटच्या दिशेने झुकला.

त्याचे डोळे डाव्या बाजूला असलेल्या एका अरुंद गल्लीकडे गेले. तो ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “इथून लेफ्ट घे.”

ड्रायव्हर गोंधळला, त्याने मागे पाहत म्हटलं, “साहेब, सायन तर सरळ हायवेने जवळ आहे, इथून लेफ्ट घेतला तर”

“लेफ्ट.” कबीरने फक्त एका शब्दाचा उच्चार केला.

पण त्याच्या आवाजातला तो शांत, बर्फासारखा कठोरपणा ऐकून ड्रायव्हरची बोलायची हिंमत झाली नाही. त्याने एकही क्षण न गमावता स्टीअरिंग डावीकडे वळवलं. टॅक्सी मुख्य हायवे सोडून एका जुन्या सर्व्हिस रोडमध्ये शिरली.

हायवेची ती ट्रॅफिक मागे सुटली, पण रस्ता आता एकदम अरुंद आणि भयानक झाला.

टॅक्सी आता सायन आणि कुर्लाच्या सीमेवर असलेल्या अत्यंत जुन्या, पडक्या इंडस्ट्रियल लेन्स मधून पुढे जात होती. या भागात पहाटेच्या वेळी सामसूम होती. पावसामुळे रस्त्यांवर कचरा आणि पाण्याचे मोठे पाट वाहत होते. टॅक्सीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दोन्ही बाजूला फक्त लोखंडी शटर बंद असलेली जुनी वेअरहाउसेस, काही रिकामे, अंधारे ट्रक डेपो आणि रस्त्यावर पडलेले पावसाच्या पाण्याने काठोकाठ भरलेले मोठमोठे खड्डे दिसत होते, ज्यातून टॅक्सी आदळत-आपटत पुढे जात होती.

मायाचा जीव वरखाली होत होता. ती पुन्हा एकदा जीव मुठीत धरून रिअर मिररमध्ये पाहू लागली. एक सेकंद... दोन सेकंद... मागे फक्त काळाकुट्ट अंधार आणि पाऊस होता. काहीच दिसत नव्हतं. मायाला वाटलं कदाचित हायवेच्या ट्रॅफिकमध्ये ती एसयूव्ही मागे सुटली. तिच्या छातीवरचा दडपणाचा ताणकिंचित कमी झाला, पण...तिसऱ्याच सेकंदाला, त्या अंधाऱ्या वळणावर अचानक दोन शक्तिशाली पांढरे प्रकाशकिरण चमकले. त्या काळ्या एसयूव्हीने हायवे सोडून अचूक तोच शॉर्टकट, तोच टर्न घेतला होता. ती आता टॅक्सीच्या अगदी मागे, जुन्या वेअरहाउसच्या भिंतींना घासून वेगाने येत होती.

ते पाहताच माया प्रचंड घाबरली. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, “शिट... त्यांना आपली चूक समजलीये. ते पाठलाग करतायत.”

कबीरच्या चेहऱ्यावर भीतीची किंवा आश्चर्याची कोणतीही रिअ‍ॅक्शन उमटली नाही. त्याने फक्त डोके मागे टेकवले आणि अगदी संथ आवाजात म्हणाला, “आता आपल्याला खात्री पटली, माया. ते आपल्यावर पाळत ठेवून आहेत.
************************************************************************************************************************
लोखंडी प्लॅटफॉर्म एका तीव्र झटक्यासह पुढे सरकता सरकता अचानक मंदावला. त्याचा वेग पूर्णपणे कमी झाला.

समीर हातातलं पिस्तूल घट्ट पकडून शिवी देत जागेवरून उठला, “शिट! आता काय झालं? इंजिन बंद पडलं?”

समोर टनेलच्या अगदी शेवटी, अंधारात एक अवाढव्य, गंजलेलं स्टील गेट त्यांचा रस्ता अडवून उभं होतं. ते आपत्कालीन सुरक्षा गेट होतं. डॅनियलने प्लॅटफॉर्म पूर्ण थांबण्याची वाटही पाहिली नाही; त्याने चालत्या ट्रॉलीवरूनच खाली साचलेल्या पाण्यात उडी मारली. त्याच्या बुटांखाली पाणी छपाक करून उडालं. तो धावतच त्या गेटकडे गेला.

तिथे भिंतीला जोडलेलं एक मोठं, गंजलेलं इमर्जन्सी व्हील होतं. डॅनियलने दोन्ही हातांनी ते चाक पकडलं आणि आपला पूर्ण भार टाकून ते फिरवण्याचा जोर लावला. पण कित्येक वर्षांच्या गंज्यामुळे ते चाक जागेवरून हललंच नाही. नेमक्या त्याच क्षणी, बोगद्याच्या पाठीमागच्या काळोखातून कित्येक फ्लॅशलाईटच्या तीक्ष्ण बीम्स वेगाने पुढे चमकायला लागल्या. शत्रू आता अवघ्या काही मीटर अंतरावर होता.

समीर जिन्याकडे तोंड करून ओरडला, “डॅनियल! वेळ नाहीये, ते अगदी डोक्यावर आलेत!”

डॅनियलने दातओठ खाऊन जोर लावला, त्याच्या कपाळावरची जखम पुन्हा ठसठसली. त्याने स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावून, ओरडत ते चाक पुन्हा एकदा डावीकडे फिरवलं. या वेळी मात्र ते गंजलेलं स्टील जणू किंचाळल्यासारखा भयानक धातूचा आवाज करत अखेर हलायला लागलं.
क्रर्रर्र... धडधड...

ते अजस्त्र गेट हळूहळू वर उघडलं. आणि ते उघडताच, बोगद्याच्या त्या गुदमरवून टाकणाऱ्या काळोखात बाहेरचा पहाटेचा राखाडी, करडा प्रकाश एका झटक्यात आत शिरला. बाहेर मोकळ्या हवेत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा आवाज आता अचानक प्रचंड मोठा आणि जिवंत वाटायला लागला.

समोर... विस्तीर्ण असं कुर्ला फ्रेड यार्ड पसरलेलं होतं. गंजलेले जुने कार्गो वॅगन्स रुळांवर उभे होते. शिपिंग कंटेनर्सचे महाकाय ढीग चहूबाजूला रचलेले होते. ओले, चिखलमय रेल्वे ट्रॅक्स पहाटेच्या धूसर प्रकाशात चमकत होते आणि दूरवर, धुक्यात आणि पावसात हळूहळू जागी होणारी मुंबई दिसत होती.

“मूव्ह!” डॅनियलने आत पाहत ओरडला. ते चौघेही त्या लोखंडी प्लॅटफॉर्मवरून खाली उतरले आणि वेगाने बाहेरच्या मोकळ्या यार्डमध्ये आले. त्याच क्षणी, मागच्या टनेलमध्ये त्या फ्लॅशलाईटच्या बीम्स आता पूर्णपणे स्पष्ट दिसायला लागल्या होत्या. समीरने मागे वळून पाहिलं, बोगद्याच्या तोंडात किमान चार काळ्या आकृत्या अत्याधुनिक रायफल्स हातामध्ये घेऊन वेगाने त्यांच्याच दिशेने धावत येत होत्या.

डॅनियलने बाहेर येताच ते जड स्टील गेट पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने खाली ढकलायला सुरुवात केली.

आरव पाठीशी रेकॉर्डर धरून ताठ झाला, “डॅनियल, तुम्ही त्यांना आतच अडकवणार आहात?”

डॅनियलचा श्वास आता कमालीचा जड झाला होता, तो धापा टाकत म्हणाला, “फक्त काही मिनिटांसाठी, आरव. ब्लॅक एम्बरचे ऑपरेटिव्ह्ज हे गेट जास्त वेळ रोखू शकत नाहीत.”

विनायकराव अचानक पावसात डोळे बारीक करत डाव्या बाजूला पाहत ओरडले, “ट्रेन... डॅनियल, समोर बघा!”

दूरवरून एका अवाढव्य फ्रेड इंजिनचा प्रचंड, काळजाचा ठोका चुकवणारा हॉर्न संपूर्ण यार्डमध्ये घुमला. मुसळधार पावसात आणि धुक्यातून वाट काढत शिपिंग कंटेनर्सने भरलेली एक लांबच लांब मालगाडी अतिशय वेगाने त्यांच्याच ट्रॅकच्या दिशेने येत होती. ते पाहून डॅनियलच्या रक्ताळलेल्या आणि थकलेल्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक हलकंसं, समाधानाचं हसू उमटलं. तो कुजकुजला “Perfect.”

त्याने आपल्या शरीरात असेल नसेल ती ताकद एकवटली आणि ते स्टील गेट पूर्णपणे खाली पाडलं. गेट जमिनीला आदळताच त्याने बाजूची लोखंडी इमर्जन्सी लॅच वरून खाली खेचली.

क्लिक-खडक! तो टनेल आता पूर्णपणे सील झाला होता.

काही सेकंदांनंतर, गेटच्या दुसऱ्या बाजूने, म्हणजेच बोगद्याच्या आतून शत्रूने दरवाजा तोडण्यासाठी मारलेल्या जड धडकांचे आवाज घुमायला लागले. पण... अगदी त्याच क्षणी, ती अवाढव्य मालगाडी प्रचंड वेगाने डॅनियल आणि त्या टनेलच्या एक्झिटच्या मधून गर्जत निघून गेली.
धडधडधडधडधड!

संपूर्ण कुर्ला यार्ड त्या मालगाडीच्या वजनाने आणि वेगाने हादरून गेलं. विजांचा कडकडाट, पाऊस आणि ट्रेनचा तो प्रचंड आवाज एकत्र आला. रिकव्हरी टीम्स आता काही मिनिटांसाठी तरी त्यांच्यापासून पूर्णपणे कट ऑफ झाल्या होत्या. ट्रेनचे डबे त्यांच्या समोरून एका भिंतीसारखे जात होते.

त्याच क्षणी आरवच्या पाठीवर असलेल्या सॅकच्या आतून एक मंद, सलग थरथराट जाणवला. त्याच्या बॅगमध्ये ठेवलेला तो जुना, कचऱ्यासारखा वाटणारा बर्नर फोन अचानक व्हायब्रेट होत होता. समीरने लगेच आपली बंदूक समोर रोखली, तर डॅनियलने डोळे बारीक करून आरवकडे पाहिले. त्या फोनचा नंबर केवळ एकाच माणसाला माहिती होता, जो आता या जगात नव्हता किंवा मग दुसऱ्या अशा माणसाला, ज्याच्यावर ते आत्तापर्यंत संपूर्ण विश्वास ठेवून होते.

आरवने थरथरत्या हाताने बॅगची झिप उघडली आणि तो जुना, ब्लॅक-अँड-वाईट स्क्रीन असलेला फोन बाहेर काढला.

धुसर पावसात त्या फोनची छोटी स्क्रीन हिरव्या रंगात चमचमत होती. त्यावर कोणताही नंबर किंवा नाव नव्हतं. स्क्रीनवर फक्त एकच मेसेज ब्लिंक होत होता:
INCOMING CALL - PRIVATE ID
************************************************************************************************************************
टॅक्सी पुढे एका अरुंद, गजबजलेल्या मार्केट लेनमध्ये घुसली. बाहेर पाऊस कोसळतच होता, पण सकाळची मुंबई आता आपल्या नेहमीच्या वेगाने जागी होत होती. रस्त्याच्या कडेला गराडा घातलेले दूधवाले, ताजी भाजी घेऊन आलेले मोठमोठे ट्रक्स, लोकल पकडण्यासाठी डोक्यावर छत्र्या धरून पावसात धावणारे लोक...या सगळ्यांची रस्त्यावर एकच गर्दी उसळली होती.

मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे समोरची व्हिझिबिलिटी आता ऑलमोस्ट संपली होती. नेमका याच गर्दीचा आणि ट्रॅफिकचा फायदा त्यांना मिळाला. ती काळी एसयूव्ही मागच्या बाजूला काही अवजड गाड्यांच्या आणि भाजीच्या ट्रक्सच्या मागे अडकली.

कबीरने एक क्षणही वाया न घालवता ड्रायव्हरला सांगितलं, “पुढे त्या ब्रिजखाली गाडी थांबव.”

टॅक्सी एका जुन्या रेल्वे ब्रिजखाली थांबताच कबीरने नोटांची थप्पी ड्रायव्हरच्या सीटवर फेकली. ड्रायव्हरने काही विचारण्याआधीच कबीरने त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत बजावलं, “पुढचे दोन तास फोन वापरू नकोस. स्विच ऑफ करून ठेव.”

तो लगेच दरवाजा उघडून मुसळधार पावसात बाहेर उतरला. माया अजूनही प्रचंड गोंधळलेली होती, तिचे हात थरथरत होते, “कबीर, गाडी सोडली तर आपण अडकू. आता काय करायचं?”

कबीर आधीच पावसात भिजत पुढे चालायला लागला होता. त्याने मागे न पाहता फक्त एकच शब्द उच्चारला, “चल.”

ते दोघे रेल्वे ब्रिजखालील एका अरुंद, अंधाऱ्या सर्व्हिस पाथधून वेगाने पुढे जाऊ लागले. त्याच वेळी त्यांच्या अगदी वरून एक लोकल ट्रेन प्रचंड वेगाने आणि गर्जना करत निघून गेली. धडधडधडधड... त्या आवाजाने तो संपूर्ण लोखंडी पूल आणि खालची जमीन हादरली. पावसाचं गढूळ पाणी जिन्यांवरून एखाद्या धबधब्यासारखं वेगाने खाली धावत येत होतं.

माया धापा टाकत,स्वतःला सावरत म्हणाली, “कबीर, आपण त्यांच्या भीतीने पळतोय का?”

कबीरने चालता चालताच नकारार्थी मान हलवली, “नाही, माया.”

“आपण पळत नाही आहोत... आपण त्यांची ‘लाईन-ऑफ-साईट’ नजरेचा टप्पा तोडतोय.”

ते चालता चालता पुढे एका जुन्या, गंजलेल्या रेल्वे मेंटेनन्स गेटजवळ पोहोचले. त्या लोखंडी गेटवरचा पिवळा रंग आता पार उडाला होता. त्यावर काळ्या अक्षरांनी लिहिलं होतं CENTRAL MAINTENANCE ACCESS AUTHORIZED STAFF ONLY

कबीरने अत्यंत सावधपणे आसपास नजर फिरवली. कोणी पाहत नाहीये याची खात्री होताच त्याने आपल्या ओल्या जॅकेटच्या आतल्या खिशातून एक छोटं, कडा गंजलेलं कीकार्ड बाहेर काढलं. त्या जुन्या कीकार्डने त्या लॉकला स्पर्श केला.

क्लिक... खडक! गेटचा जड कप्पा उघडला. आत एक जुना, अंधारा रेल्वे मेंटेनन्स कॉरिडॉर पसरलेला होता. त्या विस्तीर्ण इनडोअर यार्डमध्ये दोन्ही बाजूला गंजलेले सिग्नल बॉक्सेस, वापरात नसलेले डार्क रेल्वे ट्रॅक, डेड सायडिंग्ज आणि बाजूला ओळीने उभ्या असलेल्या लोखंडी मेंटेनन्स ट्रॉलीज दिसत होत्या. तिथून दूरवर पाहिलं तर मालगाड्यांचे ट्रॅक्स बाहेरच्या मुसळधार पावसात कुठेतरी हरवताना दिसत होते.

कबीर आत शिरला. माया आता पूर्णपणे निशब्द होऊन त्याच्या मागे चालत राहिली. पण तिच्या डोक्यात आता एकच विचार भुंग्यासारखा घुमत होता, हा माणूस नेमका किती खोलवर ‘ब्लॅक एम्बर’ मध्ये गुंतलेला होता? याच्याकडे अशा जागांचे अ‍ॅक्सेस कुठून आले?

ते कॉरिडॉरमधून पुढे सरकत राहिले. वरून पुन्हा एक लोकल ट्रेन गर्जत गेली, ज्याच्या आवाजात त्यांचे बुटांचे आवाज लपून गेले. तेवढ्यात अचानक कबीर थांबला. त्याने मान फिरवून मागे पाहिले. दूर, त्या सर्व्हिस पाथच्या आणि ब्रिजच्या तोंडाशी ती काळी एसयूव्ही थांबलेली दिसत होती. तिचे पांढरे हेडलाईट्स चालू होते. पण ती गाडी आत आली नव्हती. ते लोक आत शिरले नव्हते... फक्त बाहेर उभे राहून लांबून वॉच ठेवत होते. जणू काहीतरी कन्फर्म करत होते.

मायाने ते पाहिले आणि ती कुजबुजली “ते आत का येत नाहीत? त्यांच्याकडे हत्यारं आहेत, मग ते थांबले का आहेत?”

कबीरचा चेहरा नेहमीसारखाच निर्विकार आणि शांत राहिला, “कारण त्यांना अजून खात्री नाहीये, माया...”

“की आपण फक्त विखुरलेले तुकडे आहोत... की त्यांना आत ओढण्यासाठी टाकलेलं एखादं आमिष.”

त्यांनी चालणं थांबवलं नाही. पाऊस आता कॉरिडॉरच्या तुटक्या, गंजलेल्या छतातून जागोजागी आत पडत होता. समोरच्या अंधारात त्यांना एक जुना, निळ्या रंगाचा मालगाडीचा डबा उभा असलेला दिसायला लागला.

आणि नेमक्या... अगदी त्याच क्षणी... कबीरच्या खिशातील तो बर्नर फोन अत्यंत तीव्रतेने व्हायब्रेट झाला. कबीरने फोन बाहेर काढला. तो काही सेकंद त्या छोट्या स्क्रीनकडे पाहत राहिला. आणि या संपूर्ण प्रवासात पहिल्यांदाच, कबीरच्या चेहऱ्यावर एका खऱ्या आणि अत्यंत सावध अशा 'ऑपरेटिव्ह'ची सावधगिरी उमटली. त्याचे स्नायू ताठ झाले.

मायाने त्याचा बदललेला चेहरा पाहून मंद आवाजात विचारलं, “काय झालं कबीर? कोणाचा मेसेज आहे?”

कबीरने काही न बोलता त्या फोनची हिरवी स्क्रीन मायाच्या दिशेने फिरवली.

त्या स्क्रीनवर कोणताही मजकूर नव्हता, कोणतंही नाव नव्हतं. त्यावर ब्लॅक एम्बरच्या एका गुप्त सिस्टिममधून आलेलं फक्त एकच लोकेशन सारखं ब्लिंक होत होतं: TRACK 17.

"माया, ते इथेच आहेत " कबीर म्हणाला.

"कोण, कबीर?" मायाने विचारले.

"आरव आणि डॅनियल" कबीरने उत्तर दिले.

माया आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "कसं शक्य आहे कबीर?"

कबीरने बर्नर फोन अनलॉक केला. स्क्रीनच्या फिकट हिरव्या प्रकाशात जुन्या, एन्क्रिप्टेड कॉन्टॅक्ट लिस्टची पानं उघडली. त्या यादीत आता फक्त तीन अ‍ॅक्टिव्ह एंट्रिज शिल्लक दिसत होत्या. पण त्यापैकी वरच्या दोन एंट्रिज पूर्णपणे ग्रे-आऊट झाल्या होत्या, म्हणजेच त्या सिस्टिममधून कायमच्या डिलीट किंवा ब्लॉक करण्यात आल्या होत्या. फक्त तिसरी एंट्री अजूनही जिवंत असल्यासारखी पांढऱ्या रंगात चमकत होती.
आणि त्या तिसऱ्या नंबरसमोर कोणतंही नाव नव्हतं, तिथे फक्त दोन इंग्रजी अक्षरे लिहिलेली होती- A.D.

ते पाहताच मायाचा श्वास एकदम मंद झाला. ती कबीरच्या अगदी जवळ येत घाबरलेल्या आवाजात म्हणाली, “ए. डी.? कबीर... हा आरव देशमुख आहे का?”

कबीरने तिच्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. त्याचे बोट त्या स्क्रीनवर थबकले होते. तो काही क्षण अत्यंत शांतपणे विचार करत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या अधिक गडद झाल्या. तो जणू तो कॉल कनेक्ट करण्यापेक्षा, त्या एका कॉलमुळे पुढे काय परिणाम होणार आणि कोणती नवी संकटं उभी ठाकणार, याचा अंदाज घेत होता. त्याच्या मनात दुष्यंत देशमुखांचा चेहरा आणि ब्लॅक एम्बरचे जुने नियम एकाच वेळी फिरून गेले. अखेर, त्याने एक मोठा श्वास घेतला आणि त्या 'A.D.' च्या नंबरवर क्लिक करून कॉल डायल केला.

रिंग... पहिली लांब रिंग झाली. वरून लोकल जाण्याचा खडखडाट ऐकू आला. रिंग... दुसरी रिंग. मायाने आपले ओठ घट्ट दाबून घेतले. रिंग... तिसरी. रिंग... चौथी.

कोणीच फोन उचलत नव्हतं. कबीरच्या कपाळावर एक आठी आली. समोरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे कबीर आता कॉल कट करणार, त्याचं बोट लाल बटणाकडे वळणार...

...इतक्यात अगदी शेवटच्या क्षणी ती लाईन जिवंत झाली.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users