ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १३

Submitted by नितनवे on 23 May, 2026 - 13:08

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १२

पूर्वभाग
डॅनियल क्रॉस रिकव्हरी टीमला थांबवत असताना आरव देशमुख, समीर नायर आणि विनायक राऊत एका गुप्त सर्व्हिस टनेलमधून डॉक परिसरात पोहोचतात.
इमारतीत अलार्म, अंधार आणि फायर सप्रेशन सिस्टम सक्रिय करून डॅनियल शत्रूला गोंधळात टाकतो आणि स्वतः मागे थांबून बाकी तिघांना पळून जाण्याची संधी देतो.
डॉक १४ वर पोहोचल्यावर त्यांना कळतं की शत्रू आधीच परिसराला वेढा घालत आहे, पण अचानक झालेला स्फोट आणि डायव्हर्शन त्यांना काही क्षणांची संधी मिळवून देतो.
जुन्या वेअरहाऊसमध्ये त्यांना “TW-14” आणि दुष्यंत देशमुखच्या हस्ताक्षरात लिहिलेलं “LOW TIDE ONLY” दिसतं, ज्यातून एका जुन्या स्मगलिंग मार्गाचा धागा सापडतो.
शेवटी समुद्राच्या पातळीखालील गुप्त चेंबरमध्ये ते पोहोचतात, जिथे एका जुन्या वॉटरप्रूफ लॉकरमध्ये दुष्यंतने मागे ठेवलेलं रहस्य त्यांची वाट पाहत असतं.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १३ - LAST_TIDE

आरवच्या छातीतली धडधड आता मर्यादेबाहेर वाढली होती. तो एक-एक पायरी उतरत खाली त्या काँक्रीट चेंबरमध्ये गेला. तिथल्या दमट हवेमुळे त्या जड वॉटरप्रूफ लॉकरवर समुद्री मिठाचा एक पांढरट, खडबडीत थर चढला होता. पण त्याचं मुख्य लॉक मात्र चकचकीत दिसत होतं.

समीर त्याच्या अगदी मागे उभा राहून कुजबुजला, “आरव, हीच ती चावी?”

आरवने खिशातून ती लहान, पितळी चावी बाहेर काढली. त्याच्या संपूर्ण बोटांमध्ये एक असह्य थरथर होती. वर बंदरामध्ये अजूनही सायरन्सचा तो भीषण आवाज घुमत होता आणि दूर समुद्रात कुठेतरी कोस्ट गार्डचा मोठा हॉर्न वाजला. शत्रूचा वेढा आता अधिकच आवळत चालला होता. आरवने ती चावी त्या लॉकच्या फटीमध्ये सरकवली. त्याने चावी उजवीकडे फिरवण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्यांदा ती अजिबात फिरली नाही. गंज आणि मिठाच्या थरामुळे लॉक जाम झाल्यासारखं वाटलं. आरवचा श्वास अडकला. त्याचे डोळे भीतीपोटी विस्फारले गेले.

“आरव, जोर लाव! वेळ नाहीये आपल्याकडे!” समीर दाराकडे पाहत ओरडला.

आरवने दोन्ही हातांनी चावी पकडली आणि पूर्ण ताकदीने डाव्या बाजूला पिळली.

क्लिक. एक जड, धातूचा आवाज चेंबरमध्ये घुमला आणि त्या वॉटरप्रूफ लॉकरचा जड दरवाजा आपोआप किंचित पुढे सरकला. आरवने तो दरवाजा पूर्ण उघडला.

त्या लॉकरच्या आत दोन सीलबंद हार्ड ड्राईव्ह्ज अत्यंत सुरक्षितपणे ठेवलेल्या होत्या. काही वॉटरप्रूफ पाकिटे होती, ज्यांवर वेगवेगळ्या जागतिक बँकांचे कोड्स होते. तीन हाय-कॅपेसिटी मेमरी कार्ड्स एका बाजूला व्यवस्थित रचून ठेवलेली होती आणि... त्या सगळ्या दस्तऐवजांच्या अगदी वर, एका व्हॅक्यूम-सीलबंद पारदर्शक पाकिटात दुष्यंत देशमुख यांचा तो जुना, छोटासा डिजिटल व्हाईस रेकॉर्डर ठेवलेला होता. त्या रेकॉर्डरच्या पांढऱ्या बॉडीवर काळ्या मार्करने अगदी ठळक अक्षरात लिहिलं होतं - LAST_TIDE.

त्या अंधाऱ्या, खाऱ्या पाण्याचा वास येणाऱ्या काँक्रीट चेंबरमध्ये पूर्ण शांतता पसरली.

आरवचे हात त्या डिजिटल रेकॉर्डरला धरताना कमालीचे थरथरत होते. विनायकरावांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींची आणि एका जुन्या कालखंडाची भीती स्पष्ट दिसत होती.

समीरने वरच्या लोखंडी जिन्याकडे पाहत हातातली बंदूक घट्ट आवळली, “आरव, विनायकराव... आपल्याकडे आता फार वेळ नाही. ते परत फिरतायत.”

आरवने प्लास्टिकचं व्हॅक्यूम पाउच वेगात फाडलं. त्याने रेकॉर्डरचं प्ले बटण दाबलं. पहिल्यांदा स्पिकरमधून फक्त एक कर्कश आवाज ऐकू आला. खर्र... खर्र... आणि मग... मुसळधार पावसाचा आवाज रेकॉर्डिंगमध्ये घुमला. दूर कुठेतरी समुद्रातील जहाजाचा हॉर्न. वेगाने धावताना फुफ्फुसांतून बाहेर पडणारा एक जड, दमलेला श्वास. आणि त्यानंतर... दुष्यंत देशमुख यांचा तो थरथरणारा, तुटक आवाज चेंबरच्या भिंतींवर आदळला.

“आरव... जर... तू हे ऐकत असशील...”
“...तर याचा अर्थ एकच आहे. विखुरलेले तुकडे... पुन्हा जोडले गेलेत.”

आरव जागेवरच गोठला. त्याच्या डोळ्यांच्या कडांमधून पाणी वेगाने बाहेर पडलं आणि ते गालावरून ओघळत थेट खाली साचलेल्या पाण्यात टप-टप पडलं. रेकॉर्डरमधून पुन्हा एकदा तो जड श्वास ऐकू आला. तो आवाज ऐकून स्पष्ट जाणवत होतं की, दुष्यंत हे रेकॉर्डिंग करताना कुठेतरी जीवाच्या अकांताने धावत होते.

“डॅनियल... अजून जिवंत असेल... अशी मला मनापासून आशा आहे.”

त्या आवाजाच्या मागे, रेकॉर्डिंगमध्ये कुठेतरी लांब एक जड धातूचा दरवाजा जोरात आदळल्याचा आवाज झाला. मग पुन्हा किंचित स्टॅटिक घुमलं. दुष्यंत पुन्हा बोलू लागले. त्यांचा आवाज आत्ता कमालीचा जड आणि हळवा झाला होता.

“डॅनियल... तो स्वतःला दोष देईल, आरव... त्या एका रात्रीसाठी तो स्वतःला आयुष्यभर अपराधी समजेल... त्याला तसं करू देऊ नकोस.”

ते ऐकताच विनायकरावांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. समीर पूर्णपणे शांत, स्तब्ध उभा होता.

रेकॉर्डरमधून आता पावसाचा आवाज आणखी वाढला. मागे कुठेतरी लांब माणसांच्या ओरडण्याचा आणि धावण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता.

“रिकव्हरी चेन त्या रात्रीच अ‍ॅक्टिव्हेट झाली होती... पण त्याला... डॅनियलला ते शेवटपर्यंत समजलंच नाही.”

आरवचा श्वास आता थबकायला लागला. त्याच्या डोक्यात काही वेळापूर्वी डॅनियलने कॉरिडॉरमध्ये म्हटलेले ते शब्द वेड्यासारखे आदळू लागले, “तुझ्या वडिलांनी एकदा माझ्यासाठी थांबायची सर्वात मोठी चूक केली होती... मी आज ती चूक पुन्हा रिपीट करणार नाही.”

नाही. डॅनियल चुकत होता. बाबांनी थांबण्याची चूक केली नव्हती.

रेकॉर्डरमधून अचानक जहाजाचा एक प्रचंड, काळजाचा ठोका चुकवणारा हॉर्न घुमला. मग लोखंडी पायऱ्यांवरून बुटांच्या वेगाने धावण्याचा आवाज आला. दुष्यंतचा आवाज आता आणखी मंद आणि खोल झाला होता.

“मी डॅनियलला तिथून पळवून लावलं... मी त्याला जाऊ दिलं... कारण त्या रात्री ब्लॅक एम्बरचं मुख्य टार्गेट फक्त आणि फक्त मी होतो.”

खोलीत पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली. आता फक्त रेकॉर्डरमधून येणाऱ्या त्या जुन्या पावसाचा आवाज उरला होता. आणि दुष्यंत देशमुख यांचा तो अंतिम, तुटक श्वास.

“आरव, जर मी या सगळ्यानंतर परत आलो नाही... तर समजून जा की 'टायमिंग' संपली.”

नेमक्या याच सेकंदाला, समीरने अचानक वरच्या लोखंडी जिन्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा अंधारात पूर्णपणे बदलला.

वर वेअरहाऊस लेव्हलवर कुठेतरी एका तीक्ष्ण फ्लॅशलाईटची बीम अंधारात संथपणे हलली. त्या रिकव्हरी टीम्स परत आल्या होत्या आणि त्यांनी आपला वेढा अधिक घट्ट आणि अरुंद करायला सुरुवात केली होती. पण अजूनही त्यांना या जमिनीखालच्या लोखंडी जिन्याचा आणि 'लोअर चेंबर'चा अचूक माग लागलेला नव्हता.

आरव त्या काळोखात गुडघ्यांवर बसून तो रेकॉर्डर दोन्ही हातांनी घट्ट पकडून होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.

आणि मग... रेकॉर्डरमधून दुष्यंत देशमुख यांचा तुटक आवाज ऐकू आला, “आरव... जर डॅनियल... यावेळी तुझ्यासोबत असेल...”
खर्र... खर्र...आणि मग अतिशय मंद, कुजबुजणारा आवाज, “...तर त्याला सांग... मी त्याला कधीच सोडलं नव्हतं.”

क्लिक. रेकॉर्डिंग संपलं.

आणि अगदी त्याच क्षणी, वर वेअरहाऊसच्या मजल्यावर धातूवर काहीतरी जड घासल्याचा एक मोठा आवाज घुमला.
पाठोपाठ शत्रूच्या टीमच्या रेडिओवर इंग्रजीत म्हणालं, “Lower chamber possible. Confirming access.”

लोअर चेंबरमध्ये काही सेकंद पूर्ण आणि भीषण शांतता पसरली होती. आता तिथे फक्त वरून जिन्याने खाली येणारे ते मंद, नियंत्रित पावलांचे आवाज, हार्बरवरचे ते सतत घुमणारे इमर्जन्सी सायरन्स आणि... नुकत्याच संपलेल्या रेकॉर्डरमधल्या स्टॅटिकची ती शेवटची किरकिर उरली होती.
आरव देशमुख अजूनही जमिनीवर गुडघ्यांवर बसून तो डिजिटल रेकॉर्डर दोन्ही मुठींत घट्ट पकडून होता.

त्याच्या डोक्यात अजूनही दुष्यंत देशमुखांचा तो थरथरणारा आवाज घुमत होता, “त्याला सांग... मी त्याला कधीच सोडलं नव्हतं. त्याला स्वतःला दोष देऊ नकोस...” आरवच्या डोळ्यांतील पाणी आता सुकलं होतं, पण छातीतली धडधड थांबत नव्हती.

तेवढ्यात... समीरने एका झटक्यात आपल्या हातातील फ्लॅशलाईट बंद केली. ती लहान खोली एका क्षणात गडद, जीवघेण्या काळोखात बुडाली.

विनायकराव अंधारात चाचपडत घाबरून कुजबुजले, “समीर? काय झालं?”

समीरने वरच्या लोखंडी स्टेअरकेसच्या दिशेने आपली बंदूक रोखत अत्यंत धीम्या आवाजात उत्तर दिले, “कोणीतरी खाली उतरतंय.”

त्या काळोखात, आता त्या गंजलेल्या लोखंडी पायऱ्यांवर पडणाऱ्या जड बुटांचा मंद आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
ठक... ठक... ठक.

वर उभा असलेला माणूस घाईत नव्हता, त्याला खात्री होती की शिकार याच बिळात अडकली आहे.

आरवचा श्वास छातीतच अडकला. समीरने अंधारात आपले पिस्तूल दोन्ही हातांनी घट्ट पकडले. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या आणि त्याच्या हाताला किंचित थरथराट सुटला होता. शत्रू किती जवळ आहे, हे त्याला अचूक समजत होतं.

“समीर... आपण इथून बाहेर पडायला दुसरा एक्झिट शोधूया,” आरव चाचपडत उभा राहत म्हणाला.

पण विनायकराव अंधारातच अत्यंत शांत आणि गंभीर आवाजात म्हणाले, “आरव... इथून दुसरा कोणताही मार्ग नाही. हा स्मगलिंग ट्रान्झिटचा शेवटचा कोपरा आहे. या चेंबरचा रस्ता थेट फक्त वर वेअरहाऊसमध्येच जातो.”

नेमक्या त्याच क्षणी... वरच्या अरुंद स्टेअरकेसमध्ये फ्लॅशलाईटची एक पांढरी तीक्ष्ण बीम हलकीच चमकली. तिने जिन्याचा वरचा भाग उजळला होता आणि ती हळूहळू खालच्या पायऱ्यांकडे सरकत होती.

आणि मग, त्या लोखंडी शाफ्टच्या पोकळीत शत्रूच्या रेडिओवरची एक मंद कुजबुज प्रतिध्वनित होऊन खाली पोहोचली: “Movement below.”

पण त्यानंतर लगेच कोणी खाली उतरले नाही. जणू वरची टीम आधी चेंबरचा पुरेपूर अंदाज घेत होती.

अंधारात बंदूक रोखून धरलेला समीर अत्यंत धीम्या आवाजात कुजबुजला, “ते थांबलेत…”

विनायकरावांचा आवाज गंजलेल्या काळोखात विरघळला, “व्हिझिबिलिटी, खाली पूर्ण अंधार असल्यामुळे ते थेट आत येण्याची रिस्क घेत नाहीयेत.”

आणि नेमक्या त्याच क्षणी... वर वेअरहाऊस लेव्हलवर अचानक एक प्रचंड, कानठळ्या बसवणारा धाडकन आवाज झाला! पाठोपाठ इमारतीचे बंद पडलेले इमर्जन्सी अलार्म्स पुन्हा एकदा एका भयानक लयीत ओरडायला लागले. वर कुठेतरी महाकाय मेटल शटर्स एकामागून एक कोसळल्याचा जड आवाज संपूर्ण बंदरावर घुमला. शत्रूचा तो शांत, व्यावसायिक रेडिओ चॅटर एका सेकंदात विस्कळीत झाला.

तिथून फक्त गोंधळलेले आणि धापा टाकणारे आवाज यायला लागले, “Upper section!”
“Check the west side!

लोखंडी पायऱ्यांवर उभी असलेली ती काळी आकृती क्षणाचाही विलंब न करता वरच्या दिशेने मागे फिरली.

समीर जागच्या जागी पूर्णपणे स्थिर झाला. त्याच्या डोक्यातली चक्रं वेगाने फिरली; त्याला लगेच समजलं होतं, कोणीतरी वर हार्बर सिक्युरिटीच्या आणि त्या आधी झालेल्या स्फोटाच्या गोंधळाचा अचूक फायदा उठवला होता. आणि मग... जिन्याच्या वरच्या तोंडाकडून वेअरहाऊस लेव्हलवरून एक दाट, जड धूर खाली भुयारात झिरपू लागला. लालसर. जड. तो एका Industrial distress flare धूर होता.

तो लाल धूर पाहताच आरवचा श्वास अडकला. तो ओरडला, “डॅनियल…”

समीरने आता एक सेकंदही न दवडता आरवला जिन्याच्या दिशेने वर ढकललं, “चल, आरव! विनायकराव, वेगात वर या!”

ते तिघेही त्या अरुंद, गंजलेल्या लोखंडी पायऱ्यांवरून वेगाने वर धावायला लागले. जसे ते जिन्याचे शेवटचे टोक पार करून वर पोहोचले, समोरचे वेअरहाऊस एखाद्या युद्धाच्या मैदानासारखे दिसत होते. संपूर्ण वास्तू लाल इमर्जन्सी ग्लोमध्ये चमकत होती. छताच्या तुटलेल्या भागातून मुसळधार पाऊस थेट आतपर्यंत उडत होता.

एका बाजूला अवाढव्य इंडस्ट्रियल ऑईल ड्रम्स अस्ताव्यस्त पडलेले होते आणि त्यांच्या उघड्या पडलेल्या वायर्समधून भयानक इलेक्ट्रिकल स्पार्क्स चमकत होते. जमिनीवर दोन रिकव्हरी ऑपरेटिव्ह्ज कव्हर घेत पडलेले होते; त्यांच्या हातातील बंदुका दूर उडाल्या होत्या. ते गोळी लागून जखमी झाले होते की फ्लेअरच्या तीक्ष्ण प्रकाशाने तात्पुरते अंध (blind) झाले होते, ते समजत नव्हते. पण ते अजूनही त्यांच्या कॉलरच्या रेडिओवर धापा टाकत बोलत होते.

याचा अर्थ स्पष्ट होता: डॅनियलने त्यांना पराभूत केले नव्हते... त्याने फक्त काही क्षणांसाठी त्यांना दिशाहीन केले होते.

आणि त्या अवाढव्य, पडक्या वेअरहाऊसच्या अगदी मधोमध...डॅनियल क्रॉस उभा होता.

पावसाच्या पाण्याने तो पूर्णपणे भिजला होता. त्याच्या कपाळावरून रक्ताची एक धार वाहून गालावर आली होती. त्याच्या एका हातात तीच जुनी रिव्हॉल्वर होती... आणि दुसऱ्या हातातून तो लाल, धगधगता फ्लेअर स्टिकचा धूर हवेत सोडत होता.

आरव काही सेकंद पूर्णपणे स्तब्ध, जागेवर खिळून उभा राहिला. काही वेळापूर्वी जेव्हा गोळीबाराचा आवाज घुमला होता, तेव्हा त्याला मनातून खरंच वाटलं होतं की डॅनियल मेला असेल. पण हा माणूस... हा मृत्यूच्या दारातून पुन्हा मागे फिरला होता.

डॅनियलने हलकी मान वळवून त्या लाल प्रकाशात आरवकडे पाहिले. त्याची तीक्ष्ण नजर एका क्षणात आरवच्या दोन्ही मुठींत घट्ट पकडलेल्या त्या डिजिटल व्हाईस रेकॉर्डरवर गेली. त्या खोलीत काही क्षण मुसळधार पावसाच्या आवाजाशिवाय पूर्ण शांतता पसरली.
मग... डॅनियल अत्यंत मंद, जड आवाजात स्वतःशीच कुजबुजला, “तो अजूनही... माझं संरक्षण करतोय.”

आरवच्या डोळ्यांत पुन्हा एकदा पाणी दाटलं. बाबांचा तो अंतिम निरोप आणि डॅनियलच्या चेहऱ्यावरचं ते दुःख पाहून त्याच्या गळ्यात आवंढा आला होता. तो डॅनियलला काहीतरी बोलणार... इतक्यात बाहेर हार्बरवरच्या महाकाय सर्चलाईट्स वेगाने फिरत थेट वेअरहाऊसच्या तुटलेल्या खिडक्यांवर आणि शटरवर येऊन स्थिरावल्या. पांढरा तीक्ष्ण प्रकाश आतल्या लाल धुरात मिसळला.

शत्रूचा रेडिओ चॅटर पुन्हा एकदा वेगाने वाढला. “Warehouse interior.”
“Possible contact.

डॅनियलचा चेहरा त्या प्रकाशात क्षणात 'ऑपरेशनल' झाला. त्याच्या डोळ्यांतली हळवी भावना गायब होऊन तिथे पुन्हा एकदा एक अनुभवी एजंट जागा झाला. तो अत्यंत शांतपणे म्हणाला, “ते मला पकडायला आले आहेत, आरव... मारायला नाही.”

समीर आपल्या हातातलं पिस्तूल रोखून धरत पुढे झाला. “का? त्यांनी तर बिल्डिंगमध्ये थेट गोळीबार केला होता!”

डॅनियलने त्याला लगेच उत्तर दिलं नाही. तो वेगाने वेअरहाऊसच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या, गंजलेल्या 'कार्गो रेल' कडे चालत गेला. तिथे दाट अंधारात एक अरुंद मेंटेनन्स प्लॅटफॉर्म उभा होता. गंजलेला, अर्धवट मोडलेला आणि ओसाड. तिथून गेलेले ते जुने ट्रॅक थेट हार्बरच्या जमिनीखालच्या ड्रेनेज टनेलकडे जात होते.

ते ट्रॅक पाहून समीर अविश्वासाने म्हणाला, “हे... हे जुनं ड्रेनेज ट्रॅक अजून चालतं?”

डॅनियल त्या प्लॅटफॉर्मवर चढत म्हणाला, “Monsoon flood evacuation line पावसाळ्यात बंदरात पाणी साचल्यास आपत्कालीन निचरा करणारी यंत्रणा. पोर्ट ऑथॉरिटी रेकॉर्डवर याला ऑफिशियली बंद म्हणते... आणि म्हणूनच ही जागा आमच्यासाठी सर्वात जास्त उपयोगी आहे.”

त्याने तिथे असलेल्या एका जुन्या, लोखंडी कंट्रोल लिव्हरवर पूर्ण ताकदीने जोर दिला. कित्येक वर्षांनंतर ते जुने इलेक्ट्रिक मोटर एका तीव्र घरघराटासह सुरू झाले. तो ट्रॅक खाली अंधारात, थेट मुंबई हार्बरच्या जमिनीखाली कुठेतरी हरवत चालला होता.

बाहेरून वेअरहाऊसच्या मुख्य शटर्सजवळ आता बूट आणि हत्यारांचा आवाज प्रचंड वाढला होता. रिकव्हरी टीम्स आता त्यांचा वेढा कमालीचा घट्ट करत होत्या. पण बाहेर हार्बर सिक्युरिटीच्या गाड्यांचे सायरन्स जवळ येत असल्यामुळे, त्या रिकव्हरी टीमला इथे उघडपणे गोळीबार करता येत नव्हता.

विनायकराव मागे पाहत अंधारात कुजबुजले, “त्यांना एक्सपोजर नकोय... पोलिसांच्या आणि मीडियाच्या नजरेत यायला ते घाबरतायत.”
डॅनियलने होकारार्थी हलकी मान डोलावली. “ब्लॅक एम्बर कधीच उघडपणे गोंधळ घालत नाही, विनायकराव. ते नेहमी शांतपणे घात करतात. ते अपघात घडवून आणणं जास्त पसंत करतात.

त्याच क्षणी वेअरहाऊसच्या बाहेरून रिकव्हरी टीमने मुख्य मेटल डोअर तोडण्यासाठी ताकद लावायला सुरुवात केली. लोखंडावर लोखंड आदळले.
समीर क्षणाचाही विचार न करता त्या ट्रॅकवर असलेल्या लोखंडी ट्रॉलीवर चढला. विनायकराव त्याच्या मागे चढले. आरव मात्र अजूनही खाली उभा राहून डॅनियलकडे पाहत होता. त्याच्या मनात भीती होती की डॅनियल पुन्हा मागे थांबेल.

“डॅनियल... तुम्ही येणार ना आमच्यासोबत?” आरवने विचारले.

डॅनियल काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. त्याने वेअरहाऊसच्या दरवाजाकडे पाहिले, मग आरवकडे. तो प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून त्या ट्रॉलीवर चढला आणि आरवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, “यावेळी... विखुरलेले तुकडे एकटे राहणार नाहीत, आरव. मी तुझ्यासोबत आहे.”

नेमक्या त्याच क्षणी वेअरहाऊसच्या दुसऱ्या टोकाचे शटर प्रचंड आवाजासह उडाले. शत्रूच्या फ्लॅशलाईट्सच्या तीक्ष्ण बीम्स लाल धुरातून थेट आत घुसल्या आणि थेट त्यांच्यावर येऊन थांबल्या.

अंधारात शत्रूचा थंड आवाज घुमला, “Contact confirmed.
धाड!

पहिली गोळी त्यांच्या अगदी जवळ असलेल्या एका अजस्त्र लोखंडी पिलरवर आदळली. लाल इमर्जन्सी लाईटच्या अंधारात पिवळ्या-पांढऱ्या ठिणग्या हवेत उडाल्या आणि तिचा तीक्ष्ण आवाज वेअरहाऊसच्या छताला धडकून घुमला.

“खाली व्हा!” समीरने आरवच्या पाठीवर हात ठेवून त्याला ट्रॉलीच्या लोखंडी तळाशी दाबले.

डॅनियलने एका सेकंदाचाही विचार न करता त्या गंजलेल्या कंट्रोल लेव्हरवर आपला पूर्ण भार टाकला आणि तो ताकदीने खाली खेचला. कित्येक वर्षांपासून जाम झालेली ती आपत्कालीन सिस्टीम एका तीव्र, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासह अ‍ॅक्टिव्हेट झाली.

खटखटखटखट- तो मेंटेनन्स प्लॅटफॉर्म एका मोठ्या झटक्यासह ट्रॅकवरून पुढे सरकू लागला. सुरुवातीला वेग मंद होता, पण पुढच्याच क्षणी लोखंडी चाके गंजलेल्या रुळांवर वेगाने फिरू लागली.

त्या महाकाय वेअरहाऊसच्या तुटलेल्या दरवाजातून रिकव्हरी टीमचे काही ऑपरेटिव्ह्ज रायफल्स रोखून पुढे धावले, पण तोपर्यंत डॅनियल, आरव, समीर आणि विनायकराव असलेली ती जड ट्रॉली जमिनीखालच्या त्या काळोख्या भुयारात वेगाने खाली घसरत गेली होती.

वरच्या बंदराचा तो लालसर अंधार, मुसळधार पावसाच्या उडणाऱ्या सरी आणि शत्रूच्या फ्लॅशलाईट्सचे तीक्ष्ण किरण... एका क्षणात त्यांच्या मागे हरवायला लागले. ट्रॉली आता पूर्णपणे जमिनीखालच्या त्या काळोख्या ड्रेनेज टनेलमध्ये घुसली होती. चहुबाजूला फक्त चाकांचा रुळांवर होणारा प्रचंड गतीचा आवाज आणि टनेलच्या भिंतींवरून वाहणाऱ्या पाण्याचा सुळसुळाट उरला होता.

आरवने अंधारात आपला श्वास रोखून धरला होता. एका हातात वडिलांचा तो डिजिटल रेकॉर्डर आणि दुसऱ्या हातात ती पितळी चावी त्याने छातीशी घट्ट आवळली होती. डॅनियल क्रॉस अजूनही त्या कंट्रोल लेव्हरला धरून उभा होता, त्याचे भिजलेले केस कपाळावर आले होते आणि डोळ्यांत एक वेगळीच हिंस्त्रता चमकत होती.

समीरने डोळे बारीक करून त्या अंधाऱ्या टनेलच्या पाठीमागच्या भागाकडे पाहिलं. पूर्ण काळोख होता, फक्त पाण्याचा टप-टप आवाज भिंतींवरून येत होता.
“ते... ते आपल्यामागे येतायत का?” समीरने विचारलं.

डॅनियलने काही सेकंद कोणतंही उत्तर दिलं नाही. तो फक्त समोरच्या काळोखाचा वेध घेत उभा होता. मग तो अतिशय मंद आवाजात म्हणाला, “हो.”

तो क्षणभर थांबला, “...पण अजून त्यांनी आपला नेमका रूट कन्फर्म केलेला नाही.”

विनायकराव ट्रॉलीच्या लोखंडी कडांना घट्ट पकडून अंधारातच कुजबुजले, “डॉक १४ पूर्णपणे कॉम्प्रमाईज्ड झालं, डॅनियल... शत्रूला आता ती जागा माहितीये.”

डॅनियलने त्या अंधारातच हलकी मान डोलावली. “आता दुष्यंतने तयार केलेले सगळे जुने ट्रान्झिट कॉरिडॉर्स एकामागून एक बर्न होतील. ब्लॅक एम्बर एका तासात ही अख्खी लाईन सील करेल.”

तेवढ्यात... तो चालणारा प्लॅटफॉर्म अचानक एका मोठ्या झटक्यासह जोरात हलला. ट्रॅकच्या खालच्या भागात पावसाचं आणि समुद्राचं तेलकट पाणी साचलेलं होतं, ज्यातून चाकं वाट काढत होती. जुनी इलेक्ट्रिक मोटर एका विचित्र आवाजात जोरात घरघरली.
समीरने एक तीव्र शिवी पुटपुटली, “शिट, हे इंजिन जर मध्येच बंद पडलं तर?”

डॅनियलने टनेलच्या पुढच्या टोकाकडे पाहत अत्यंत थंडपणे उत्तर दिलं, “तर मग आपण पोहू, समीर. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.”

आरवने त्या काळोखात पहिल्यांदाच वर डोके करून डॅनियलच्या चेहऱ्याकडे पाहिलं. या माणसाच्या कपाळावरून रक्त वाहत होतं, शत्रू डोक्यावर उभा होता, तरीही त्याच्या आवाजात एक अनाकलनीय शांतता होती. आरवने विचारलं, “तुम्ही... तुम्हाला खरंच कधी कशाचीच भीती वाटत नाही का?”

डॅनियल काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोरून दुष्यंत देशमुख यांच्यासोबत घालवलेली ती जुनी वर्षे एका सेकंदात सरकून गेली. मग तो आरवकडे पाहत अगदी हलकंसं हसला.

“भीती वाटणं फायदेशीर असतं, आरव. भीती आपल्याला अलर्ट ठेवते. पण पॅनिक मात्र पूर्णपणे युजलेस असतो.”

आणि डॅनियलचे ते शब्द संपतात ना संपतात... तोच त्या टनेलच्या पाठीमागच्या काळोखात, दूरवरून एका फ्लॅशलाईटची तीक्ष्ण पांढरी बीम एका सेकंदासाठी चमकली आणि भिंतीवर आदळली.

समीर क्षणात जागच्या जागी ताठ उभा राहिला. “शिट...”

ती बीम पुढच्याच सेकंदाला पुन्हा नाहीशी झाली. ते थेट त्यांच्यावर रोखलेले किरण नव्हते; जणू काही शत्रूच्या रिकव्हरी टीमचा कोणीतरी केवळ ती ड्रेनेज लाईन व्हेरिफाय करत होता की आत जाण्याचा मार्ग आहे का.

पण डॅनियलचा चेहरा क्षणात बदलला. त्याच्या कपाळावरची आठी अधिक घट्ट झाली. “त्यांनी लाईन शोधली. त्यांना समजलंय आपण खाली आहोत.”

समीरने आपल्या हातातलं पिस्तूल पुन्हा एकदा घट्ट आवळलं, “मग आता पुढे काय?”

डॅनियल समोरच्या ट्रॅककडे पाहत म्हणाला, “मग आता फक्त एकच गोष्ट मॅटर करते... स्पीड…वेग.”

त्याने त्या गंजलेल्या लोखंडी कंट्रोल लेव्हरवर आपला पूर्ण भार टाकला आणि तो पूर्णपणे पुढे ढकलला. जुनी मोटर एका तीव्र आवाजासह जोरात ओरडली आणि लोखंडी ट्रॉली एका प्रचंड झटक्यासह त्या साचलेल्या पाण्यातून वेगाने पुढे धावू लागली. टनेलच्या भिंतींवरून आता त्या वेगामुळे साचलेलं पाणी बाजूला उडू लागलं. टनेलच्या काही अंतरावर असलेल्या जुन्या लाल इमर्जन्सी लाईट्सचे रिफ्लेक्शन्स त्यांच्या चेहऱ्यावर चमकायला लागले.

आरवचा श्वास आता आणखी वाढला. कारण... आता त्या साचलेल्या पाण्याच्या आवाजातून, टनेलच्या पाठीमागच्या बाजूने वेगाने धावत येणाऱ्या बुटांचे अनेक अस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू यायला लागले होते.

रिकव्हरी टीम्स आता पूर्ण तयारीनिशी त्या अरुंद ड्रेनेज लाईनमध्ये उतरल्या होत्या.

ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीपासून नियमित वाचते आहे. सगळेच तपशील अगदी पूर्ण कळले नाहीत तरी वेगवान, थ्रिलिंग आहे कथानक.
तुमची लेखनशैली चित्रदर्शी आहे. दृश्य डोळ्यांसमोर उभे राहते.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.