खरडवही भाग ७ : बाप

Submitted by अतरंगी on 25 April, 2026 - 03:14

रोजच्या जगण्यात अनेक छोटे मोठे प्रसंग घडत असतात. त्यातले काही प्रसंग, तेव्हा मनात आलेली भावना कुठे तरी खोलवर रुतुन बसते. तसं बघायला गेलं तर त्यात फार काही विशेष नसते, पण त्यावर लिहावेसे वाटते. अगदी महत्वाचे नाही, फार काही उदात्त किंवा थोर नाही. तरी पण असेच आयुष्यात लक्षात राहिलेल्या छोट्या मोठ्या प्रसंगांची नोंद...... असंच, उगीचंच.....

भाग १
https://www.maayboli.com/node/70054
भाग२
https://www.maayboli.com/node/70210
भाग ३
https://www.maayboli.com/node/70399
भाग ४
https://www.maayboli.com/node/70835
भाग ५
https://www.maayboli.com/node/72986
भाग ६
https://www.maayboli.com/node/80801

१.
" अरे अंकल उधरसे मेडीसीन लेके आईये और रुकिये , मै आपका नाम बुलायेगी तब आईये"
पहिल्यांदाच आलेल्या त्या काकांनी वेगवेगळे प्रश्न विचारल्यावर ती नर्स वैतागली. मी ते काका आल्यापासून सगळं बघत होतो. त्यांच्या हातात मेहता की असेच काही तरी नॉर्थ ईंडियन नाव असलेली फाइल होती. मी त्या काकांना बाजूला नेऊन त्यांना केमोथेरपी साठी अ‍ॅड्मीट करायची आणि पुढची औषधं कशी घ्यायची, याची सगळी प्रोसिजर समजावून सांगितली. काही अडलं तर, परत मी कुठेही दिसलो तर परत विचारा, हे पण आवर्जुन सांगितलं.

पाच दहा मिनिटांनी त्या नर्सने त्यांचं नाव पुकारलं आणि पेशंटला घेऊन यायला सांगितलं. ते काका लगबगीने बाहेर गेले. परत आले तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा होता. मी हादरलोच. मला वाटलं की काका त्यांच्या आई किंवा बाबांना घेऊन आले असतील किंवा फार तर फार पत्नीला. मी परत त्यांच्या हातातल्या फाईल वर नजर टाकली. पेशंटचं वय ३४. चौतिसाव्या वर्षी कसला कॅन्सर असेल याला? केमोथेरपी दुसर्‍या पण कोणत्या आजारांवर वापरतात की काय? मुलाला आयव्ही सेट लावताना बाजूला ऊभे असलेले ते काका बघून मला एकदम कसेतरीच झाले.

त्या काकांच्या मनःस्थितीचा विचार पण करवत नव्हता. ज्या वयात निवांतपणे निवृत्त आयुष्य जगायचं, नातवंडांमधे रमायचं. संसारातल्या जबाबदार्‍या आपण उत्तमरित्या निभावल्या याचं समाधान मानून सगळ्या दोऱ्या पुढच्या पिढीकडे सोपवायच्या तेव्हाच असं काहीतरी व्हावं...... वयाच्या या टप्प्यावर येऊन परत एका नव्या लढाईसाठी सज्ज व्हायचं. जेव्हा मुलाकडे जबाबदार्‍या देत स्वतःवरचा भार कमी करायचा त्या वयात परत एका नव्या आव्हानाला तोंड द्यायचं. थकलेल्या शरीराला, मनाला नवीन ऊभारी द्यायची. काय अवघड असेल हे….
पण हे काका का आले? दुसरं कोणी नसेल त्या मुला सोबत यायला? त्याचा एखादा मित्र? त्यांची सून? दुसरा मुलगा? भाचा? पुतण्या? की सगळे लांब कुठेतरी गावी आणि हे दोघेच ईथे?

मी त्या काकांना म्हणालो होतो खरं की काही लगले तरी परत विचारा, पण आता मला त्यांच्याशी बोलण्याची हिंमत होत नाही. एरवी मी जाऊन बोललो असतो त्यांच्याशी, पण आता ते दिसले की मी लांबूनच ओळख देतो. त्यांच्याशी बोलायचे ठरवून पण बोलायला जाता येत नाही.

२.

एकेदिवशी असंच बिलिंग वरुन फाईल मेडिक्लेमला देऊन मी त्यांची प्रोसेस पुर्ण व्हायची वाट पहात बसलो होतो. सकाळपासून सगळ्या प्रोसेस लेट सुरु झाल्या होत्या. साडे नऊ की दहा वाजले तरी आम्ही अजून हॉस्पिटल मधेच होतो. कंटाळा आला म्हणून मी रुमच्या बाहेर येऊन असाच येरझार्‍या घालत बसलो होतो. व्हिजिटींग अवर्स संपल्याने सगळ्या रुम्स मधे फक्त पेशंट्स आणि एखादा रात्री सोबत राहणारा नातेवाईक दिसत होते. कॉरिडोर्स, लिफ्ट्स सगळे सुनसान..... कुठेतरी कोणी कोणी जनरल वॉर्ड मधे अ‍ॅड्मिट असणार्‍यांचे नातेवाईक चटया, चादरी अंथरुन पडले होते. काही काही जण रिकाम्या बाकड्यांवर पाय पसरुन मोबाईल वर टाईम पास करत बसले होते. दिवसभर डॉक्टर्सच्या, पेशंट्सच्या मागे धावपळ करून दमलेल्या नर्सेस जरा निवांत खुर्च्यावर विसावल्या होत्या. कोणत्याही हॉस्पिटल मधे रात्री ऊशिरा दिसणारे चित्र.

त्यात एक आई एका दिड की दोन वर्षाच्या अ‍ॅडमिट असलेल्या मुलाला कडेवर घेऊन फेर्‍या मारत होती. मुल चांगलच कंटाळलेलं असावं. सारखं कुरकुर करत होतं. आई हरेक प्रयत्न करुन त्याचं मन रमवायचा प्रयत्न करत होती. त्याला काहीच नको होतं. आईने काही दाखवलं/ बोललं तरी काही क्षण तिकडे पाहून तो परत रडतच होता. आईच्या चेहर्‍यावर दिवसभराचा शीण अगदी जाणवण्या ईतपत दिसत होता. त्यात त्याला खाली पण ऊतरायचं नव्हतं ती बिचारी त्याला एका हातावरुन दुसर्‍या हातावर घेत ईकडून तिकडे फिरवत होती. त्याला शांत करायचा आटोकाट प्रयत्न करत होती.

तशातच काही वेळाने तो आला. जिन्यावरून धापा टाकत. थ्री पीस सुट मधे. आल्या आल्या लगबगीने त्यांच्याकडे गेला. त्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या चेहर्‍यावरचा ताण हलका झाला. तो मुलगा तर बापाला बघून अगदी खुषच झाला. कुठ्ली तरी महत्वाची मिटिंग की प्रेझेंटेशन उरकून आलेल्या त्या बापाने हातातली बॅग आणि ब्लेझर तिथेच एका बाकड्यावर टाकून त्याला घेऊन खेळवायला सुरुवात केली. हळूहळू मुलाचा मूड पण नॉर्मलला आला. मुलाच्या कुरकुर करण्याची जागा हसण्याने आणि खिदळण्याने घेतली. आईच्या कपाळावरच्या बारीकश्या आठ्या जाऊन हलकं स्मित आलं. त्या मुलाला बापाकडे देऊन त्यांच्याकडे कौतुकाने बघत ती आई तिथेच एका बाकड्यावर वर टेकली. थोड्या वेळाने एक नवीन खेळ सुरु झाला, मुलाने आईच्या मागे लपायचा आणि त्याच्या बाबाने येऊन त्याला पकडायचा.
त्या मरगळलेल्या वातावरणात एक चैतन्य आलं. मोबाईल मधे घुसलेल्या माना वर झाल्या, डोक्यावरची पांघरुणं बाजूला झाली. सगळे जण त्या मुलाचं खिदळणं बघण्यात रमले. थोड्यावेळाने बाबा जरा दमून खाली बसला आईने परत मुलाला कडेवर घेतले. तरी त्या मुलाने परत ऊं ऊं करत बाबाला ऊठायला लावलेच. बाबाने रुसून दुर जाण्याची अ‍ॅक्टींग केली आणि परत पळत येऊन मुलाला भॉ केले, त्याचं खिदळंणं पाहून मग परत परत तो दिवसभर दमून आलेला बाबा लांब जात होता आणि त्याचं हसणं पाहून अजून उत्साहाने पळत पळत त्या मुलाकडे येत होता.
कितीतरी वेळ हो खेळ चालूच होता. नंतर असेच खेळ खेळत ते बाळ जेवले नी नंतर बापाच्या खांद्यावरच झोपले.

आज पण मला तो मुलाला हसवायला लांबून पळत येणारा आणि नंतर झोपलेल्या मुला शेजारी बसून लॅपटॉप वर काम करताना दिसलेला बाबा लख्ख आठवतो.

३.

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी एक बॅड पॅच येतो. काहीच आपल्या मनासारखे होतंय असे वाटत नाही. आपणच आपल्या स्वतःपासून दूर गेलेले असतो. आपली वागणूक बदललेली असते. काही काळानंतर मागे वळून बघितले तर असे वाटते की बापरे आपण त्या काळी असे वागत होतो? आपलाच आपल्यावर विश्वास बसत नाही.

माझ्या आयुष्यातल्या असाच एक बॅड पॅच. २००७ च्या सुमारास. तसे पहायला गेले तर सगळे सुरळीत होते. २६-२७ वर्षे वय, गल्फमधे नोकरी होती, स्वतःचा फ्लॅट घेतला होता, घरी सगळे व्यवस्थित होते, संपन्न आयुष्य होते. पण त्यातच मी पूर्णपणे दिशाहीन झालो होतो. सहा ते सात वर्षे ज्या मुली सोबत संसाराची व पुढच्या आयुष्याची स्वप्ने बघितली तिच्या घरच्यांनी लग्नाला ठार नकार दिला होता. तिच्या घरच्यांनी जवळ जवळ वर्ष दिड वर्ष अनेक मिनतवाऱ्या करून सुद्धा लग्नाला परवानगी दिलीच नाही. शेवटी आम्हीच हार मानली. त्यानंतर मी ज्या अवस्थेतून गेलो ती फारच विचित्र होती. त्यावेळेस counselling वगैरेंचा मार्ग माहितच नव्हता. रोज कामावर जायचो तिथे मन रमायचे, कामावरून आलो की रिकामी संध्याकाळ खायला उठायची, ती मी पिण्यात बुडवून टाकायचो. कामावरून आलो की कपडेही न बदलता मी आधी पेग भरायचो. याच नादात तिथे मित्रही तसेच जमा झाले. सगळेच संध्याकाळी रिकामे. हातात प्रचंड पैसे. रोज रात्री पार्ट्या व्हायच्या. नशेत आहे तिथेच झोपून जायचो. सकाळी उठून परत कामावर, संध्याकाळी परत पार्टी… आयुष्याला ना काही दिशा होती ना काही ताळतंत्र. माझा हा बॅड पॅच किती काळ चालू राहील याची काहीच कल्पना नव्हती. मी अशा एका गर्तेत सापडलो होतो की त्यातून बाहेर पडायची ना मला दिशा सापडत होती, ना ती शोधायची इच्छा होती.

रोज कामावर जाणे, आणि नंतर मित्रमंडळी जमवून भान हरपे पर्यंत पिणे एवढेच आयुष्य राहिले होते.

आमच्या या सगळ्या मित्रमंडळीच्या गृप मधे एक दोन जण होते जे न पिणारे होते. वेळ असेल तेव्हा आमच्या रूम वर यायचे, गप्पा मारायचे. त्यातलाच माझ्या पेक्षा थोडा मोठा एक मित्र विशाल, मुंबईतल्या एका उपनगरात राहणारा, शांत, थोडा अबोल, प्रचंड सुंदर स्वयंपाक करायचा. आम्हाला पिल्यावर आग्रहाने खाऊ पिऊ घालायचा. फार शांत व सज्जन माणूस. अगदी विचार करून बोलणार वागणार, कायम फक्त मुद्द्याचे व महत्वाचे तेवढेच कोणालाही न दुखावता मत मांडणार. मला तो आजही तसाच आठवतो, मला नाही माहिती की त्या फेज मधला मी त्याला कसा लक्षात आहे…. खरेतर लक्षात नसलेलाच बरा. मीच स्वतःच्या त्या फेज मधल्या मला विसरून जायचा कैक वेळा प्रयत्न करतो.

आमची ओळख झाल्याच्या दुसऱ्या वर्षी मला काही कामानिमित्त भारतात यायचे होते व त्याच वेळेस विशालची पण सुट्टी होती. आम्ही दोघेही एकाच फ्लाईट ने परत जात होतो. दोघांना सोडायला कंपनीची गाडी आली होती, आम्ही चेक इन करून immigration पर्यंत सोबत होतो, तिकडून तो duty free shop कडे वळाला आणि मी Bar कडे. मी त्या विमानतळावर प्यायलो, परत विमानातही प्यायलो. भारतात उतरेपर्यंत मी पूर्ण तर्र होतो. विशाल सोबत होताच. Airport सगळे सोपस्कार पार पाडून बाहेर येताना विशाल माझ्या पुढे होता व मी त्याच्या मागून येत होतो.

तेवढ्यात एका चिमुकलीची बाबा म्हणून जोरात हाक आली, एक तीन चार वर्षांची चिमुकली पळत येऊन विशाल ला बिलगली. मागोमाग त्याची पत्नी व आई वडील आले. त्याच्या पत्नीचा चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तो दिसल्यावर, जवळ जवळ वर्षभराने त्याला भेटल्यावर तिला झालेला आनंद, ते ओसंडून वाहणारे प्रेम, ती ज्या प्रकारे त्याच्याकडे बघत चालत आली ते मी कधीच विसरू शकणार नाही. नविशालने दोन क्षण मुलीला खाली ठेवले, आई वडिलांच्या पाया पडून परत तिला जवळ घेतले. हे असले प्रसंग चित्रपटातून अनेकदा पाहिले, कथा कादंबऱ्यांमधे अनेकदा वाचले. पण समोर पाहिले ते पहिल्यांदाच….

हे सगळे पाहून मी जागीच थबकलो. आपण आयुष्यात काय मिस करत आहोत व काय करणार आहोत याची त्या क्षणी लख्ख जाणीव झाली. आपण हे कसे वागत आहोत याची प्रचंड लाज वाटली. मी पटकन दिशा बदलून विरुद्ध दिशेला निघून गेलो.

काही क्षणापुरते दिसलेल्या त्या पूर्ण कुटुंबाच्या भेटीने माझे सगळे आयुष्य बदलले. मी काही महिन्यातच जॅाब व तो देश सोडला भारतात परत आलो. Post graduation ला प्रवेश घेतला. भारतातच एक छोटी नोकरी घेतली. परत आयुष्याचे नव्याने जगायला सज्ज झालो.

त्या चिमुरडीने पळत येऊन तिच्या बाबाला मारलेल्या मिठीने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मनापासून लिहिले आहे. +१

<<एरवीचा अतरंगी हाच का असा प्रश्न पडला शेवटचा अनुभव वाचून.....>> आणि मग खरच अतरंगी आहे असंही वाटले असेल, नाही?

फारच सुंदर!!! आय अ‍ॅम डॅडीज गर्ल. बाबांना आईने थोडे जरी बोलले तरी मला इतका राग यायचा. बाबाला काही कोणी बोलायचं नाही. बाबाच्या हातचा मार खूप खाल्लाय लहानपणी पण तरीही बाबावर फार प्रेम आहे.

छान लिहिले आहेत अतरंगी

१ मध्ये जे आहे ती वेळ कोणावर येऊ नये _/\_

२ मध्ये जो किस्सा आहे तो अनुभवला आहे. मुलगी लहान असताना ७ दिवस ऍडमिट होती. मी हॉस्पिटलच्या त्याच रूमवर राहायचो. ऑफिसचा कॉल येईल तसे तिथे जाऊन यायचो. अश्यात आणखी वेळ जाऊ नये म्हणून सात दिवस घरी गेलो नव्हतो. ऑफिस ते हॉस्पिटल वाऱ्या, मुलगी झोपली की आंघोळ करायला म्हणून फक्त हॉस्पिटल जवळ असलेल्या सासुरवाडीला जाऊन यायचो. त्याकाळी मी मुलीच्या छोट्या मोठ्या किस्स्यांचे फेसबुक स्टेटस टाकायचो. पण या दिवसाबद्दल कधी कुठे लिहिले नव्हते. नंतरही कधी ते आठवले नव्हते. आज ते दिवस झर्रकन डोळ्यासमोर आले Happy

३ मध्ये जे आहे त्यातून बाहेर आलात, दारूच्या दृष्ट चक्रात अडकला नाहीत हे छान झाले. ही सुद्धा माझ्या एका मित्राची स्टोरी वाटली. त्याचेही कित्येक वर्षाचे प्रेमप्रकरण पण लग्नाच्या वेळी जात आड आल्याने दोघांच्या घरून नकार मिळाला. त्याचवेळी सेम सिच्युएशन आणि जातीतील अगदी तोच फरक असलेले माझे लग्न मात्र झाले. त्यावेळी त्याचा सगळ्यात जवळचा आणि खास मित्र मीच होतो. पण सिच्युएशन अशी की मीच त्याला काय समजावू असे झाले होते. कारण जे माझ्या नशिबात आहे ते तुझ्या नाही हे स्वीकार असे मीच कसे सांगू...

काळ सर्वांत मोठे औषध असते हे खरे. पण तोपर्यंत तग धरून राहायला कोणीतरी लागते आयुष्यात. मुले ते काम करतात.

हे तुझ्या आय डी वरून इत्तर कुणी लिहिलंय का.
Jokes apart पण वाचताना अंगावर काटा आलाय आणि डोळे पाणावलेत. बाकी लिखाण अगदीच प्रामाणिक तुझ्या सारखेच. सेन्सिटिव्ह असणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे. अभिनंदन you are alive.
लिहीत राहा