सुपर एल निनो : इतिहास, विनाश आणि २०२६ चा धोका
सुपर एल निनो म्हणजे काय?
सामान्य एल निनो सर्वांना माहीतच आहे. एल निनो हा एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) चक्राचा भाग आहे. जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाणी असामान्यरित्या गरम होते, तेव्हा एल निनो उद्भवतो. तापमान वाढल्यामुळे वातावरणीय अभिसरणाचे नमुने बदलतात, मान्सून प्रणाली कमकुवत होते, उष्णतेच्या लाटा तीव्र होतात आणि खंडांवर पाऊस पुनर्वितरित होतो. (कंसात सोपे मराठी शब्द दिले तर काहींना ते एआय वाटतं
)
दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर अंटार्क्टिक समुद्रातून थंड पाण्याचे प्रवाह जमा होतात. हे तिथेच साठून राहिल्याने या किनारपट्टीला वाळवंटाचे प्रमाण जास्त आहे. थंड पाण्याच्या या रेट्याने इथून उष्ण पाण्याचे प्रवाह ऑस्ट्रेलियाकडे ढकलले जातात. ऑस्ट्रेलियाला वळसा घालून ते आसिआन देशांपासून भूमध्य रेषेवरच्या आफ्रिकन देशाला जाऊन धडकतात.
याच काळात भारतात तापमान वाढत असते. यामुळे उष्ण हवा वर जाऊन कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. आफ्रिकन देशांमधे उष्ण पाण्याचे प्रवाह जमा झाल्याने त्याचे बाष्प होते आणि ते बाष्प कमी दाबाच्या पट्ट्याकडे म्हणजे भारताकडे येऊन पाऊस पडतो ज्याला आपण मान्सून म्हणतो. जर हे चक्र रिव्हर्स झाले तर यामुळे अल निनो कार्यान्वित होतो. म्हणजे उष्ण पाणी पुन्हा रिव्हर्स जाऊ लागते.
सुपर एल निनो हा एक अत्यंत तीव्र प्रकार आहे, ज्यामध्ये ३.४ क्षेत्रातील समुद्र पृष्ठभागाचे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा किमान २°C अधिक वाढते. १९५० पासून असे केवळ काही मोजकेच प्रसंग नोंदवले गेले आहेत. १४ वेळा जेव्हां असे झाले त्यातल्या ९ वेळा भारतात दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या.
दीडशे वर्षांपूर्वीचा महाविनाशकारी एल निनो (१८७७-७८)
साधारणपणे १५० वर्षांपूर्वी, म्हणजे १८७७-७८ मध्ये, पृथ्वीने आजवर नोंदवलेल्या सर्वात टोकाच्या हवामान घटनांपैकी एक अनुभवली. या एल निनोने प्रदीर्घ दुष्काळ, अखंड उष्णतेच्या लाटा आणि पीकांचा विनाश उद्भवला. यातून हवामान संकटं निर्माण झाली, ती अनेक शास्त्रज्ञांच्या मते इतिहासातील सर्वात वाईट होती. जगभरात ३ ते ४ कोटी लोक मरण पावले, जे त्या वेळच्या जागतिक लोकसंख्येच्या ३-४% होते.
हा आजवरचा सर्वात तीव्र एल निनो होता. समुद्र पृष्ठभागाचे तापमान तब्बल १६ महिने उच्च राहिले. आपल्या स्मरणात असलेल्या १९९७-९८ आणि २०१५-१६ च्या प्रचंड एल निनोपेक्षाही ते मोठे होते.
१८७७ मध्ये एक दुसरे हवामान चक्र, इंडियन ओशन डायपोल (IOD,, देखील सक्रिय होते, ज्यामुळे पश्चिम हिंद महासागर पूर्वेपेक्षा अधिक उष्ण होता. हे आजवरचे सर्वात तीव्र इंडियन ओशन डायपोल होते, असे शास्त्रज्ञ सांगतात.
जगावर काय परिणाम झाले?
१८७७-७८ च्या घटनेत भारत, चीन, इंडोनेशिया, फिलीपिन्स, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भूमध्य सागरी प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला.
भारत, चीन, आफ्रिका आणि ब्राझीलसारख्या वेगवेगळ्या प्रदेशांत अनेक सलग वर्षे एकाच वेळी दुष्काळ पडला याला विनाशकारी दुष्काळ म्हटले जाते. पावसाच्या अभावामुळे अनेक खंडांवर एकाच वेळी पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे व्यापक दुष्काळ आणि सामाजिक संकटे निर्माण झाली.
चीनमध्ये दुष्काळ, अन्नटंचाई आणि रोगांच्या संयोगाने अनेक प्रांतांमध्ये लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले.
भारतावर काय परिणाम झाले?
भारतातील ग्रेट फेमाईन (महादुष्काळ) १८७६-७८ मध्ये आला. दख्खनच्या पठारावर तीव्र दुष्काळामुळे पिके जळाली. या दुष्काळाने एकूण ६,७०,००० चौ.कि.मी. क्षेत्र व्यापले आणि ५ कोटी ८५ लाख लोकांना फटका बसला. या दुष्काळात किमान ५६ लाख ते कमाल ९६ लाख लोक मृत्युमुखी पडले, आधुनिक लोकसंख्याशास्त्रीय अंदाजानुसार ८२ लाख मृत्यू झाले. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात अशाच दुष्काळाची वर्णने आहेत. पण डेटा नसल्याने हा सुपरनिनो होता किंवा कसे हे सांगणे कठीण आहे.)
त्या वेळी भारत ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन होता. ब्रिटिश धोरणांनी दुष्काळाचे परिणाम आणखी वाढवले. ब्रिटिशांनी नफ्यासाठी धान्य निर्यात सुरूच ठेवली, त्यामुळे स्थानिक लोकांसाठी खाण्यास काहीच उरले नाही.
दुष्काळाने भारतावर दीर्घकालीन राजकीय परिणाम केले. यातून उद्भवलेल्या अतिरिक्त मृत्यूंमुळे १८७१ ते १८८१ दरम्यानच्या जनगणनेत बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सींमधील नैसर्गिक लोकसंख्यावाढ खुंटली. महादुष्काळाने भारतातील घटनांवर दीर्घकालीन राजकीय परिणाम केला आणि थेट १८८० च्या दुष्काळ आयोगाची स्थापना आणि भारतीय दुष्काळ संहिता तयार करण्यास कारणीभूत ठरला.
दुष्काळानंतर, दक्षिण भारतातील कृषी मजूर आणि हातमाग विणकर मोठ्या संख्येने ब्रिटिश उष्णकटिबंधीय वसाहतींमध्ये मळ्यांवर गिरमिटिया मजूर म्हणून स्थलांतरित झाले.
२०२६ मध्ये सुपर एल निनोची भीती का?
NOAA च्या अंदाजानुसार, जून ते ऑगस्ट २०२६ दरम्यान एल निनो विकसित होण्याची ६०% पेक्षा अधिक शक्यता आहे आणि वर्षाच्या उत्तरार्धात ही शक्यता ८०% वर जाण्याची शक्यता आहे. अनेक हवामान मॉडेल असे सूचित करतात की हे २०२६ च्या उत्तरार्धात सुपर एल निनोमध्ये तीव्र होऊ शकते.
युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट्स (ECMWF) ने ऑक्टोबरपर्यंत २.५°C तापमान विसंगतीची ५०% शक्यता वर्तवली आहे. काही युरोपीय मॉडेल तर ३ डिग्रीपर्यंतची विसंगती अपेक्षित करत आहेत, जे आजवरचे सर्वात तीव्र एल निनो ठरवेल.
तज्ञांचा अंदाज आहे की २०२६-२७ चा सुपर एल निनो १९८२-८३, १९९७-९८ आणि २०१५-१६ या तीन आधीच्या सुपर एल निनो घटनांपेक्षा अधिक उष्णता पसरवेल.
भारतावर २०२६-२७ मध्ये काय परिणाम होतील?
भारतीय हवामान विभागाने (IMD) १३ एप्रिल रोजी जाहीर केले की नैऋत्य मान्सून २०२६ मध्ये सामान्यापेक्षा कमी, दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) ९२%, असेल. सन २०२३ नंतर प्रथमच भारताला सामान्यापेक्षा कमी एकूण मान्सून पाऊस मिळणार असल्याचे दर्शवते. सामान्य म्हणजे सरासरी जी दर वर्षी कमी होत चालली आहे.
ईशान्य, वायव्य आणि दक्षिणी द्वीपकल्प क्षेत्रातील काही भागांचा अपवाद वगळता भारताच्या बहुतेक भागांना सामान्यापेक्षा कमी पाऊस मिळण्याची शक्यता आहे. देशातील जवळपास ६०% शेतकरी पूर्णपणे मान्सून पावसावर खरीप पिकांसाठी अवलंबून आहेत.
भारतासाठी धोके विशेषतः महत्त्वाचे आहेत. उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात तीव्र आणि दीर्घ उष्णतेच्या लाटा येण्याची आणि मान्सून हंगामात सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. या संयोगाने पाण्याच्या साठ्यांवर परिणाम होणार आहे. पाणी पुरवठ्यावर ताण येणार आहे. पीक उत्पादन घटू शकते आणि अन्नधान्याचे भाव वाढू शकतात.
२०२३-२४ च्या एल निनोमुळे (जो सुपर एल निनो नव्हता) भारताच्या कृषी उत्पादनात ६.१% घट झाली होती.
तापमान बदलामुळे (Climate Change) आणखी काय गंभीर परिणाम?
जागतिक तापमानवाढीमुळे प्रशांत महासागराचे आधारभूत तापमान आधीच वाढलेले असल्याने आधुनिक एल निनो घटना इतिहासापेक्षा अधिक तीव्र दिसतात. जागतिक उष्मा वाढल्याने महासागर आणि वातावरणाचे तापमान वाढत आहे, ज्यामुळे एल निनोशी संबंधित टोकाच्या घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढू शकते. २०२७ हे वर्ष विक्रमी उष्ण ठरू शकते.
सुपर एल निनोमुळे रिलीज झालेली उष्णता वातावरणातील वाढत्या हरितगृह वायूंमुळे साठून राहते , त्यामुळे एल निनोचे प्रत्येक चक्र जागतिक तापमान वाढीला एक पायरी वर नेते. उष्ण वातावरणाची आर्द्रता धारण करण्याची क्षमता अधिक असल्याने डोंगराळ भागात अतिवृष्टी आणि मैदानी भागात वादळांचे प्रमाण वाढेल.
२०१५-१६ च्या एल निनोमुळे विक्रमी जागतिक उष्मा आणि प्रवाळ खडकांचे व्यापक विरंजन (coral bleaching) झाले होते. २०२६ मधील तत्सम किंवा अधिक तीव्र घटना जागतिक तापमान वाढीच्या चालू प्रवृत्तीला आणखी गती देऊ शकते.
पनामा कालव्याच्या गेटुन जलाशयावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. २०२३-२४ च्या एल निनोमुळे झालेल्या दुष्काळात तेथून जाणाऱ्या जहाजांची संख्या दिवसाला ३६ वरून २४ वर आली होती, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर व्यापक परिणाम झाला होता.
आता उपाययोजना काय हव्यात?
सरकारांनी जलाशयांतील पाणी जपण्यासाठी, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपाय करायला हवेत. सिंचन, आपत्ती व्यवस्थापन, अन्नसुरक्षा आणि शहरी पाणी पुरवठा यांची आगाऊ तयारी आवश्यक आहे.
आज आपल्याकडे पूर्व-चेतावणी प्रणाली, आंतरराष्ट्रीय मदत नेटवर्क आणि कृषी तंत्रज्ञान आहे जे १८७७ मध्ये नव्हते. त्यामुळे दुष्काळाचा अंदाज करून संसाधने आधीच एकत्रित करता येतात. सरकार आणि नागरी संस्था लोकसंख्येवर टोकाचे संकट येण्यापूर्वी अन्नवाटप करू शकतात.
सुपर एल निनो हा नैसर्गिक हवामान बदलाचा एक शक्तिशाली प्रकार आहे. १८७७-७८ मधील घटना ही मानवजातीने अनुभवलेल्या सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक होती. आता २०२६-२७ मध्ये अशाच प्रकारची परिस्थिती येण्याचे संकेत मिळत आहेत परंतु आधुनिक तंत्रज्ञान, सज्जता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने त्याचे परिणाम कमी करणे शक्य आहे.
उपभोगवादी राहणीमानामुळे पर्यावरणाचा नाश होतो. आता इशारे देण्याची वेळ सुद्धा टळत चालली आहे. चंगळवादाने परिस्थिती अजून भीषण होत जाणार आहे. हा फटका फक्त भारताला बसणार नसून जगाच्या मोठ्या भागाला बसणार आहे. निव्वळ निसर्ग आहे असे म्हणून चालत नाही. तालमान बदलाला फक्त आणि फक्त माणूस जबाबदार आहे. निसर्ग ओरबाडून घेतल्याने हे परिणाम जास्त गंभीर जाणवणार आहेत.
आपण काळजी घेऊ शकतो.
पाण्याचा जपून वापर.
दुपारच्या वेळेला कमी शारीरिक श्रम
दुपारी उन्हात जाणे टाळणे.
उपाशी पोटी उन्हात न जाणे
पाणी पीत राहणे.
डोळ्यांची काळजी घेणे.
लहान मुलांची काळजी घेणे.
प्रदूषण होईल अशा गोष्टी टाळणे.
पर्यावरणाची काळजी घेणे.
झाडांची कत्तल थांबवून झाडे लावणे.
गरज नसताना गाड्यांचा वापर टाळणे हे आता जास्तीत जास्त स्वयंचलित गाड्यांचा वापर थांबवण्यामधे बदलले पाहीजे. चालत जाणे, सायकल अशा गोष्टींना प्राधान्य देणे ही आता फॅशन नाही तर जिवंत राहण्याची लढाई झाली आहे.
एव्हढेच आपल्या हातात आहे.
सुदैवाने जर सुपर अल निनो इफेक्ट विरून गेला तर या वर्षी आपली सुटका होईल. पण त्याची भीती पुढच्या वर्षी असणारच आहे. निसर्ग तर आपल्याला थांबवता येत नाही. पण जी भर आपण घालतो ती थांबवणे आपल्या हातात आहे. आपल्याला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे.
दिल्लीसारख्या शहरात श्वास घेता येत नाही एव्हढे प्रदूषण वाहनांनी करून ठेवलेले आहे. पुण्यात प्रचंड प्रदूषण आहे. बाहेर जाऊन आले कि जळजळ होत राहते. त्यातून इमारतीला लावलेल्या काचेने उष्णतेची बेटं निर्माण झाली आहेत. जिथे झाडं आहेत तिथे थंडावा मिळतो. चार पाच अंशाचा परिणाम सहज जाणवतो.
जे लोक प्रदूषणाचे बळी आहेत त्यांना पर्यावरणाबद्द्लच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील वक्तव्याने किती त्रास होत असेल याची फिकीर बाळगली पाहीजे. किमान एव्हढे तरी माणूस म्हणून करता यायला हवे. सगळेच असंवेदनशील झाले तर माणूस जातच नामशेष होईल. हे इतर जीवसृष्टीसाठी चांगलेच आहे. किमान ते तरी पुढची लाखो वर्षे गुण्यागोविंदाने राहतील.
माहितीपूर्ण, अभ्यासनीय
माहितीपूर्ण, अभ्यासनीय उपयुक्त लेख. समारोप फार आवडला.
धन्यवाद!
माहितीपूर्ण लेख. गेल्या काही
माहितीपूर्ण लेख. गेल्या काही दिवसांत याबद्दल बातम्या बघत होतो पण नीट माहिती होत नव्हती. समारोप मलाही आवडला.
माहितीपूर्ण, अभ्यासनीय
माहितीपूर्ण, अभ्यासनीय उपयुक्त लेख. समारोप फार आवडला. >> +१
मी पण फार त्रोटक बातम्या ऐकल्या होत्या यावर. परत एकदा निवांत वाचेन.
एकूण भारतात सुका दुष्काळ
एकूण भारतात सुका दुष्काळ पडणार. गावातले लोंढे शहरात वाढणार.
येत्या काही दिवसात उष्णतेची
येत्या काही दिवसात उष्णतेची लाट अजून तीव्र होणार आहे. बरेच फॉरवर्डस येत आहेत. खातरजमा केलेली नाही, पण हे खरे असावेत.
१. तूम्हाला माहीत आहे का?

मुंबई गोवा महामार्गावर जी झाडे कापले गेली आणि कापलेली झाडे पैसे रूपात खिशात घातली त्यांची एकूण किंमत.
एका व्हाट्सअप गृपवर ,१ हे पासून, महामार्गावर झाडे लावा या मागणीसाठी, कंत्राटदारांविरूद्ध आमरण आमरण उपोषण करणारे शहनवाझ भाईंनी मांडलेला एकूण हिशोब.
*आपण आपली झाडे राष्ट्रीय महामार्गाला ला आपणच का लावायची? ही जबादारी त्यांची आहे. आपण त्यांना संबंधित एजन्सीला या कामाचे पैसे दिलेले आहेत व देत आहोत..*
*अगोदरच या संबंधित एजन्सी ने 106737 झाडे कागदावर आंबा जांभूळ ऐन किंजळ साग खैर अशी दाखवून ....प्रत्यक्षात ,वड पिंपळ उंबर ,पायर, कदंब अशी दीडशे दोनशे वर्षांपूर्वीची मोठमोठी एकूण चार लाखाचे वर तोडून तीन लाख झाडांचे पैसे ( कोणतीही झाड 25 घनफुटाच्या खाली नाही याचा अंदाजे दर 100/- घनफुट पकडू म्हणजे 300000 X 100 X 25 = 750000000/- (पंचांहत्तर कोटी ) रुपये या सर्वांनी मिळून कागदावर कोठेही न दाखवता अगदी आपापल्या खिशात घातलेले आहेत व साधा डकार ही दिलेला नाही.*
*या नंतर या रस्त्याचे काम करताना या रस्त्याच्या कामात बाजूला व मध्याना मध्ये इंडियन रोड काँग्रेस च्या मार्गदर्शक तत्वानुसार खड्डे मारून झाडे लावून त्यास खत पाणी देऊन त्याची जोपासना करणे त्याची देखरेख करणे वाढवणे ही सर्व रक्कम अंतर्भुत आहे. मग ही रक्कम देऊन सुद्धा ते काम करीत नाहीत म्हणून आपण ते स्वतः काम करणे हे कुठेतरी मनाला पटत नाही. तर माझे मत त्यांचे कडून हे काम करवून घेऊ या*
यासंदर्भात आज मिटींग आयोजीत केली आहे तरी पर्यावरण प्रेमींनी हजर रहावे
*उपोषणासंदर्भात महत्वाच्या बैठकीचे निमंत्रण*
*मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व गुहागर विजापूर रस्त्यावर इंडियन रोड काँग्रेस च्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्ष लागवड केली जावी या करीता दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 10.00 वाजले पासून करीत असलेल्या आमरण उपोषणासंदर्भात सर्व पर्यावरण प्रेमी प्रेमी, निसर्ग प्रेमी, प्रवासी नागरिक सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी एक बैठक आयोजित केलेली आहे तरी आपण या बैठकीस आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.*
*दिनांक :- 26 एप्रिल 2026*
*वेळ :- ठीक सायंकाळी 4.30 वाजता*
*ठिकाण :- काणे हॉटेल, पाहिला मजला स्वा. सावरकर सभागृह, चिपळूण नगर पालिके समोर चिपळूण*
दुसरा हा आहे.

https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/1AjukPWL3f/
हा व्हिडिओ आता पाहण्यात आला आणि हा धागा आठवला.
EL Nino येत आहे. तापमान वाढत आहे. वाढतच राहणार आहे.
काळजी घ्या. जपून राहा. पाणी पित राहा. उन्हात बाहेर पडू नका. आणि शक्य झाल्यास झाडे वाचवा. नाहीतर आपली पुढची पिढी फार वाईट पद्धतीने तडफडून मरेल..