पूर्वभाग
पवारचा ताफा कॅम्पमध्ये पोहोचताच ‘ऑपरेशन ऑल आऊट’ची अंतिम तयारी वेगाने सुरू झाली. पंचेचाळीस जवान पूर्ण शस्त्रसज्ज होऊन माधव आणि हिडमेच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या अंधारात जंगलातून नक्षल तळाकडे निघाले. कठीण चिखल, उतार, काटेरी झुडपं आणि नाल्यांतून मार्ग काढत त्यांनी शत्रूच्या तीन स्तरांच्या सुरक्षेला शांतपणे भेदलं. ड्रोन, नाईट व्हिजन आणि सायलेंट टेकडाऊन वापरून बाहेरील पहारेकरी निष्प्रभ करण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास जवानांनी तळाला चारी बाजूंनी वेढा घातला आणि आत शंभरहून अधिक नक्षली तसेच आझाद व इतर कमांडर दिसले. पहिला हल्ला गोळीबाराने नव्हे तर मानसिक धक्क्याने करण्यासाठी सायरन , लाल फ्लेअरचा व स्मोकचा वापर करण्यात आला. संपूर्ण तळ गोंधळात जागा झाला आणि जवानांनी शरण येण्याचा इशारा दिला.
************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग १६ - अंतिम द्वंद्व
मी लाऊडहेलर हातात घेतला. पूर्ण ताकदीने ओरडलो, “शरण या! तुम्हाला चारी बाजूंनी फौजेने वेढलं आहे! शस्त्रं खाली टाका!”
माझा आवाज टेकड्यांवर आदळून परतला. “...वेढलं आहे!... शस्त्रं खाली टाका!...”
पुन्हा.
पुन्हा.
पुन्हा.
त्यांना वाटत होतं, वेगवेगळ्या दिशांनी अनेक अधिकारी आदेश देत आहेत. क्षणार्धात तळात प्रचंड गोंधळ उडाला. कोण कुठे धावतोय हे कोणालाच समजेनासं झालं.
काही नक्षली झोपड्यांकडे धावले. काही रायफल उचलून अंदाजाने अंधारात नेम धरू लागले. काहीजण थेट जंगलाच्या दिशेने पळू लागले. काही अजूनही जागेवर उभे राहून सभोवती पाहत होते. त्यांना कळत नव्हतं कि इतकी मोठी फौज अचानक कुठून आली? आणि आत कशी शिरली?
मी हाताने खूण केली. क्षणात आमच्या जवानांनी तीन दिशांनी स्मोक कॅनिस्टर्स फेकले.
धप्प… धप्प… धप्प…
काही सेकंदांत दाट पांढरा धूर झोपड्यांभोवती फिरू लागला. मग तो संपूर्ण तळावर पसरला. एका क्षणात दृश्य नाहीसं झालं. दहा फुटांपुढे काही दिसेनासं झालं. धुरातून फक्त ओरडण्याचे आवाज. धावताना धडपडण्याचे आवाज. कोसळणाऱ्या भांड्यांचे आवाज. कोणीतरी चुकीने स्वतःच्याच माणसावर आदळल्याचा आवाज.
आझादचा संतप्त आवाज त्या सगळ्यावरून घुमत होता, “लाइन घ्या! लाइन घ्या! घाबरू नका!”
“डावीकडे जा!”
“फायर करा!”
पण त्याचे आदेश धुरात हरवत होते.
धुकं, लाल प्रकाश, सायरन, प्रतिध्वनी, धूर, वेगवेगळ्या दिशांनी ओरडणारे आदेश… त्यांना आता खात्री पटली होती कि समोर शेकडो जवान उतरले आहेत.
तेवढ्यात मागच्या बाजूने अचानक गोळीबाराचा पहिला आवाज घुमला.
धाड! धाड! धाड!
पवारच्या बाजूने. ओढ्याकडे पळणाऱ्यांवर त्याने फायरिंग केली होती.
एक किंकाळी उठली. मग दुसरी. आणि त्या एका क्षणी या अंतिम युद्धाची पहिली ठिणगी पडली.
आझादने क्षणार्धात परिस्थिती ओळखली. वेढा घट्ट होत चालला होता, माणसं गोंधळली होती आणि चारही बाजूंनी दबाव वाढत होता. त्याने आपल्या बाजूला उभ्या असलेल्या दोन अंगरक्षकांकडे वळून काहीतरी झपाट्याने आदेश दिले.
क्षणात दोघांनी बंदुका खाली टाकल्या. हात वर केले. आणि पवारच्या दिशेने सावकाश पुढे चालू लागले. असं वाटत होतं कि ते शरण येतायत.
पवारच्या तुकडीतील दोन जवानांनी तत्काळ त्यांच्यावर रायफल ताणली. पवार स्वतः एक पाऊल पुढे सरकला. काही क्षणांसाठी त्याचं पूर्ण लक्ष त्या दोघांवर गेलं. ते खरंच शरण येतायत की सापळा रचतायत, हे तपासणं भाग होतं.
आणि नेमकी तीच संधी आझादने साधली. धुराच्या त्या पांढऱ्या, दाट लोटांमधून तो अचानक वीजेसारखा उजवीकडे झेपावला आणि ओढ्याकडच्या पळवाटेने पळ काढू लागला.
गोंधळ, किंकाळ्या, शिट्ट्या आणि गोळीबाराच्या आवाजात बहुतेकांच्या नजरा अजूनही तळाकडेच खिळल्या होत्या.
पण माझं लक्ष सुरुवातीपासून त्याच्यावरच होतं. तो धुरातून बाहेर पडताच मीही विलंब न करता सावलीसारखा त्याच्या मागे सरकलो.
मला पूर्ण विश्वास होता की पाटील आणि माझी उरलेली टीम आताची परिस्थिती समर्थपणे सांभाळू शकतील. वेढा घट्ट ठेवणं, गोंधळलेल्या नक्षल्यांना नियंत्रणात घेणं, पळवाटा बंद करणं आणि तळ सुरक्षित करणं ही जबाबदारी त्यांच्या हातात सुरक्षित होती.
त्या क्षणापासून बाकीचं युद्ध माझ्यासाठी मागे राहिलं होतं. गोळीबाराचे आवाज, किंकाळ्या, आदेश, धूर, तळातील गोंधळ सगळं हळूहळू दूर जात होतं. माझ्यासमोर आता फक्त एकच लक्ष्य उरलं होतं...आझाद.
तो जखमी होता. एका पायावर तो हलकासा लंगडत होता. खांद्यावरची रायफल आता नीट धरली जात नव्हती. पण त्याचा वेग अजूनही एखाद्या जखमी वाघासारखा होता वेदनेतून दुखण्यातून संताप जन्माला आलेला, आणि पकड टाळण्यासाठी शेवटची झुंज देणारा.
ओढ्याकडे जाणारी पायवाट अरुंद होती. दोन्ही बाजूंना दाट झुडपं आणि ओलसर दगड. धुराचे लोट अजूनही मागून सरकत होते. आझाद पळताना कधी झुडपाला धडकत होता, कधी हात टेकून तोल सावरत होता, पण थांबत नव्हता.
मी त्याच्यामागचं अंतर हळूहळू कमी करत होतो. पावलांचा आवाज शक्य तितका दाबत पुढे सरकत होतो. रायफल तयार स्थितीत होती. बोट ट्रिगरजवळ.
नजर त्याच्या कमरेच्या हालचालीवर खिळलेली होती. तो कधी वळणार, कधी थांबणार, कधी गोळी झाडणार याचा पहिला संकेत तिथूनच मिळतो.
मी त्याचाच अंदाज घेत होतो. आणि नेमकं तेच झालं. अचानक तो एका तीव्र वळणावर थांबला.शरीर अर्धं फिरवलं. डोळ्याची पापणी लवायच्या आत त्याने AK-47 खांद्यावर चढवली. मग विचार न करता अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
धाड! धाड! धाड! धाड!
जंगलाच्या शांततेला चिरत आग ओकणारे आवाज नाल्यात घुमले.
मला प्रतिक्रिया देण्यासाठी विचार करावा लागला नाही, प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे शरीर स्वतःच हललं. मी झटकन उजवीकडे उडी मारत एका जांभळाच्या झाडाच्या जाड खोडामागे स्वतःला झोकून दिलं.
त्याच क्षणी गोळ्या झाडावर आदळल्या.
थड! थड! थड!
साल उडाली. लाकडाचे तुकडे चेहऱ्यावर झेपावले. एक गोळी खोडात इतक्या जोरात घुसली की संपूर्ण झाड हलल्यासारखं वाटलं.
जळलेल्या दारुगोळ्याचा उग्र, धातूसारखा वास क्षणार्धात हवेत पसरला. कानात आवाज घुमू लागला. मी गुडघ्यावर टेकून श्वास रोखला. माती, धूर, बारूद आणि ओलसर झाडाचा वास एकत्र मिसळला होता.
आझादने पुन्हा दोन गोळ्या झाडल्या. मग शांतता.
तो पळाला होता की पुन्हा नेम धरून थांबला होता हे अजून स्पष्ट नव्हतं.
मी रायफलची पकड घट्ट केली. “आझाद! आता वेळ संपली आहे! शस्त्र खाली टाक!”
मी झाडामागून गर्जलो. आवाज नाल्याच्या कडांवर आदळून परतला. काही क्षण मला वाटलं तो थांबेल. कदाचित जखम, वेढा आणि पळवाट बंद झाल्याची जाणीव त्याला झाली असेल.
पण उत्तर म्हणून पुन्हा गोळ्यांची एक जोरदार बरसात झाली.
धाडधाडधाडधाड!
गोळ्या झाडाच्या खोडावर आदळल्या. सालांचे तुकडे उडाले. एका गोळीने माझ्या कानाजवळून शीsss असा आवाज करत वाट कापली.
मी खालीच दबा धरून राहिलो. श्वास पूर्ण नियंत्रित होता. नजर समोरच्या प्रत्येक हालचालीवर खिळलेली होती. बोट ट्रिगरवर स्थिर, सज्ज आणि अचूक क्षणाची वाट पाहत होतं.
आझाद अनुभवी होता. तो अंधाधुंद गोळीबार करत असला, तरी प्रत्येक हल्ल्यानंतर जागा बदलत होता. मी त्याच्या पावलांचा अंदाज घेत होतो. चिखलात घसरण्याचा आवाज, झुडपं हलण्याची दिशा, श्वासाचा ताण-सगळं ऐकत होतो.
धूर हळूहळू विरळ होऊ लागला. वाऱ्याने पांढरे लोट बाजूला सारले. झुडपांच्या मधून एक सावली हलली. मग क्षणभर त्याचं डोकं आणि खांदा स्पष्ट दिसला. ती संधी सेकंदभराचीही नव्हती. मी रायफल खांद्याला घट्ट रोवली. नेम धरला. ट्रिगर दाबला.
धाड!
गोळी सरळ गेली. ती त्याच्या आधीच जखमी असलेल्या खांद्याला घासत गेली. आझाद जोरात पुढे ढकलला गेला. त्याच्या हातातून रायफल सुटली आणि चिखलात पडत घसरत बाजूला गेली.
तो वेदनेने विव्हळला, गुडघ्यावर कोसळला. क्षणभर मला वाटलं आता तो संपला. पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला झटकन सावरलं, उठला आणि नाल्याच्या बाजूच्या दाट झाडीत गडप झाला.
मी क्षणाचाही विलंब न करता रायफल पुढे रोखली आणि त्याच्या मागोमाग झाडीत झेपावलो. मी आता सावधपणे हळूहळू पुढे जाऊ लागलो.
दोन पावलं. तीन पावलं. मग अचानक सगळं शांत झालं. मी तिथेच स्थिर झालो. श्वास मंद केला. बोट पुन्हा ट्रिगरवर स्थिर केलं. कान पूर्ण ताणले.
प्रत्येक आवाज पकडण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता आझादचा कुठेच मागमूस नव्हता. जणू तो हवेत विरघळून गेला होता. ना पानांची सळसळ. ना धावपळीचा आवाज. ना झुडपं हलल्याची चाहूल. काहीच नाही.
जंगल पुन्हा एकदा भयानक शांत झालं होतं.
मी सावधपणे एक पाऊल पुढे टाकणार इतक्यात डाव्या बाजूच्या जाड झाडामागून काळी सावली विजेसारखी माझ्यावर तुटून पडली. आझाद!
त्याने पूर्ण जोराने माझ्या रायफलवर फटका मारला. रायफल माझ्या हातातून सुटली, हवेत फिरत दूर जाऊन चिखलात पडली. मी मागे ढकललो गेलो.
आझादचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. चेहऱ्यावर चिखल, खांद्यावरून रक्त वाहत होतं, पण त्याच्या नजरेत अजूनही हिंस्त्र जिवंतपणा होता.
तो गुरगुरला, “ऑफिसर… आज तू जिवंत परत जाणार नाहीस!”
आणि पुढच्याच क्षणी त्याने कमरेला लावलेला तो मोठा, वक्र खंजीर उपसला आणि माझ्यावर झेपावला.
आझाद माझ्यावर झेपावताच त्याच्या हातातला खंजिर विजेसारखा चमकला. पात्याचा थंड झोत माझ्या गळ्याच्या अगदी जवळून सरकला. माझ्याकडून एक इंच जरी चूक झाली असती, तर सगळं तिथेच संपलं असतं.
मी क्षणार्धात त्याचा हात पकडला. त्याचं मनगट पूर्ण ताकदीने वळवलं. आणि त्याला जोराचा धक्का दिला.
आम्ही दोघेही तोल जाऊन चिखलात आपटलो. ओलसर माती अंगावर उडाली. रायफल दूर पडलेली. आणि मध्ये आम्ही दोघे.
आझादने त्याच्या जखमी खांद्याचा विचारही केला नाही. गुरगुरत त्याने दुसऱ्या हाताने माझ्या चेहऱ्यावर जबरदस्त ठोसा लगावला.
डोळ्यांसमोर ठिणग्या उडाल्या. क्षणभर सगळं काळं झालं. तोंडाला गरम रक्ताची चव लागली. ओठ फुटला होता. पण मी त्याला सोडलं नाही. त्याचं मनगट अजूनही माझ्या पकडीत होतं.
तो पुन्हा खंजिरा फिरवण्याआधी मी माझा डावा हात त्याच्या जखमी खांद्यावर रोवला आणि अंगठा जखमेच्या आतल्या भागावर पूर्ण जोराने दाबला.
आझादच्या तोंडून पहिल्यांदाच वेदनेची किंकाळी बाहेर पडली. त्याचं शरीर क्षणभर सैल पडलं. पकड ढिली झाली आणि त्याच्या हातातून खंजिर निसटून चिखलात दूर जाऊन पडला.
आम्ही दोघेही आता पूर्णपणे चिखलाने माखलो होतो. अंगावरचा गणवेश ओळखू येत नव्हता. नावाची पट्टी, रँकची खूण, युनिटचं चिन्ह सगळं चिखलाखाली लपलं गेलं होतं. त्या क्षणी आम्ही अधिकारी, कमांडर किंवा बंडखोर उरलो नव्हतो.
उरले होते फक्त दोन कट्टर शत्रू. दोन वेगवेगळ्या विचारांचे प्रतिनिधी. जिवंत राहण्यासाठी झगडणारी दोन माणसं.
आझादने अचानक माझ्यावर उलटत झेप घेतली आणि दोन्ही हातांनी माझा गळा पकडला. त्याची पकड पोलादासारखी मजबूत होती. बोटं मानेत रुतत होती.
त्याने पूर्ण ताकदीने दाबायला सुरुवात केली. मी त्याचे मनगट दूर सारण्याचा प्रयत्न केला, पण तो अजूनही रानटी शक्तीने झुंज देत होता.
माझा श्वास अडकू लागला. छाती ताणली गेली. फुफ्फुसं हवेसाठी तडफडू लागली. कानात घरघर सुरू झाली. डोळ्यांसमोर अंधुक वर्तुळं फिरू लागली. शरीर जड होऊ लागलं. चिखलात पाठ रुतली होती.
आणि त्या धूसर होत जाणाऱ्या क्षणी काही चेहरे डोळ्यांसमोर चमकले...कदमचा छिन्नविछिन्न देह, डोळ्यांत वर्षानुवर्षांची भीती घेऊनही जगण्याची आस धरून उभी असलेली रेश्मा, झाडाआडून माझ्याकडे पाहणारी कोमल, मातीत गाडलेला बाबूचा चेहरा आणि त्याचा हतबल बाप.
गावकऱ्यांचे थरथरणारे प्रश्न. आणि त्या सगळ्यांच्या मागे या जंगलाला भीतीतून मुक्त करण्याची शपथ.
माझ्या आत काहीतरी पेटलं. शरीर थकत होतं. पण मन अजूनही तग धरून होतं.
कुठूनतरी नव्या शक्तीचा झटका अंगात संचारला. मी उरलेली सारी ताकद एकवटली. मान मागे खेचली. आणि पुढच्याच क्षणी माझं डोकं जोराने आझादच्या नाकावर आदळलं.
त्याच्या तोंडून वेदनेचा दबलेला आवाज बाहेर पडला. नाकाची हाडं मोडल्यासारखा आवाज झाला आणि क्षणार्धात त्याच्या नाकातून रक्ताची धार वाहू लागली. गरम रक्त चिखलात मिसळत खाली झिरपू लागलं.
त्याची पकड सैल झाली. माझ्या मानेभोवतीचे हात क्षणभर ढिले पडले.
मी हवेसाठी मोठा श्वास घेतला. छाती जळत होती. पण वेळ नव्हता. मी त्याला पूर्ण जोराने ढकललं आणि उठण्यासाठी कंबर वळवली. एक गुडघा टेकवला. हात जमिनीवर रोवला. उभा राहण्याच्या तयारीत होतो. इतक्यात आझादने अजून हार मानली नव्हती.
रक्ताळलेल्या चेहऱ्याने, अर्धवट अंध झालेल्या डोळ्यांनी त्याने चिखलातून माझा पाय पकडला आणि जोरात ओढला. माझा तोल गेला. मी पुन्हा खाली आपटलो. चिखल, दगड आणि पानांचा सडा अंगावर उडाला.
आता आम्ही दोघेही झटापट करत करत नाल्याच्या कड्याच्या अगदी टोकापर्यंत घसरत आलो होतो.
मी हात टेकवत थांबण्याचा प्रयत्न केला. बोटाखाली माती सैल झाली. कडा तुटून खाली कोसळली. मी खाली पाहिलं...अंदाजे शंभर फूट खोल काळोखी दरी. तळाशी वेगाने उसळत वाहणारा पावसाळी नाला. पांढरं फेसाळ पाणी दगडांवर आदळत गर्जत होतं.
एका चुकीच्या हालचालीत आम्ही दोघंही खाली जाणार होतो. पण त्या टोकावरही आझादच्या डोळ्यांत अजून शत्रुत्वाचीच आग जळत होती. त्याने चिखलात पडलेला खंजीर पुन्हा उचलला. हात थरथरत होता, पण पकड घट्ट होती.
तो गुरगुरला आणि वेड्यासारखा ओरडत माझ्यावर झेपावला. मी क्षणाचाही विलंब न करता शरीर बाजूला झुकवलं. खंजिराचं पातं माझ्या बरगडीजवळून शीss असा आवाज करत गेलं. वार चुकला.
पण त्याच क्षणी त्याचा तोल गेला. कड्याच्या टोकावरची ओली, सैल माती अचानक खचली. त्याचा पुढचा पाय रिकाम्या हवेत पडला. आझादचं शरीर पुढे झुकलं. त्याने दुसऱ्या पायाने आधार शोधायचा प्रयत्न केला, पण चिखलाखाली पकड नव्हती.
क्षणभर वेळ थांबला.
मी आणि तो दोघेही कड्याच्या टोकावर गोठल्यासारखे उभे होतो. आमचे डोळे एकमेकांत भिडले.
त्याच्या डोळ्यांत मी पहिल्यांदाच काहीतरी वेगळं पाहिलं. राग नव्हता. द्वेष नव्हता. आदेश देणारा अहंकार नव्हता. तिथे होती मृत्यूची खरी भीती आणि पराभव.
वर्षानुवर्षं इतरांच्या मनात भीती पेरणारा माणूस स्वतः पहिल्यांदा भीतीने भरला होता. तो हवेत झेपावत खाली जाऊ लागला. शेवटच्या प्रयत्नाने त्याने माझ्याकडे हात झेपावला. माझं मनगट पकडण्याचा प्रयत्न केला.
मी नकळत झटकन पुढे झेपावलो आणि त्याचा हात पकडला. क्षणात माझं पूर्ण शरीर कड्याच्या टोकावर आडवं पडलं. दोन्ही कोपर मातीमध्ये रुतले. छाती कड्याच्या कडेला टेकली. खाली खोल दरीत फेसाळ पाणी गर्जत होतं.
आणि आझाद माझ्या हाताला लोंबकळत होता. त्याचं पूर्ण वजन माझ्या खांद्यावर आणि मनगटावर आलं.
त्याचा दुसरा हात हवेत झटपत होता. पाय खाली दगडांना धडकत होते, पण पकड मिळत नव्हती.
मी दात घट्ट आवळले. मनगट दुखत होतं. माती हळूहळू सरकत होती. त्या क्षणी माझ्या मनात एकच वादळ उठलं.
माझ्या हाताचा आधार घेणारा हा तोच राक्षस होता ज्याने कित्येक संसार उद्ध्वस्त केले होते. किती जवान मारले. किती गावकऱ्यांना धमकावले.किती मुलांचं बालपण हिरावलं.
अशा नराधमाला वाचवायचं? की हात सैल करून मृत्यूच्या दरीत ढकलायचं?
एका क्षणासाठी माझ्या मनात त्याचा हात सोडण्याचा विचार चमकून गेला. आणि त्याच क्षणी मला माझा दीक्षांत समारंभ आठवला.
तप्त उन्हात उभा असलेला परेड ग्राउंड. उंचावलेला तिरंगा. छाती ताठ पुढे करून घेतलेली शपथ. मी मनातच शब्द पुन्हा ऐकू लागलो.
“मी अर्जुन सर्जेराव देशमुख, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, मी भारताच्या संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगीन. मी भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचे रक्षण करीन. माझ्यावर सोपवलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे, निःपक्षपातीपणे आणि पूर्ण निष्ठेने पार पाडीन. आवश्यकता भासल्यास देशसेवेसाठी माझे प्राणही अर्पण करीन.”
त्या शब्दांनी मनातलं धुकं साफ केलं. माझं कर्तव्य स्पष्ट होतं. हा शत्रू होता.पण या क्षणी तो निशस्त्र होता. माझ्या जीवाला तत्काळ धोका नव्हता. त्याला देशाच्या न्यायव्यवस्थेसमोर उभं करणं माझं काम होतं, शिक्षा देणं माझं काम नव्हतं. कायद्याला त्याचं काम करू द्यायचं होतं.
मी पकड आणखी घट्ट केली. दुसरा हातही पुढे नेला. दात ओठ खात जोर लावला. मनगट फाटल्यासारखं दुखत होतं. खांदा अवघडला होता.
तरीही मी आझादला हळूहळू वर ओढू लागलो. तो कड्याच्या जवळ येत होता. आणखी काही सेकंद. आणखी एक झटका.
तेवढ्यात-
धाड!
गोळीचा आवाज दरीत घुमला. माझ्या हातावरचं वजन अचानक हलकं झालं. मी क्षणभर स्तब्ध झालो. काय झालं हेच मला समजलं नाही.
मी झटकन नजर वर वळवली. कड्याच्या टोकावर माधव उभा होता. त्याच्या हातात आझादची रायफल होती. नळीमधून अजून धूर निघत होता.
त्याच्या डोळ्यांत वर्षानुवर्षं जळत आलेल्या सूडाला अखेर शांतता मिळाल्याचं समाधान होतं आणि डोळ्यात कोमलच्या विरहाचे अश्रू.
माधवने रायफल बाजूला फेकली आणि क्षणाचाही विलंब न करता माझ्याकडे हात पुढे केला. माझा हात अजूनही मातीने माखलेला, मनगट दुखऱ्या वेदनेने थरथरत होता. त्याने घट्ट पकड घेतली आणि मला कड्याच्या टोकावरून वर ओढलं.
मी वर आलो तेव्हा काही क्षण तिथेच गुडघ्यावर बसलो. छाती धडधडत होती. श्वास अजूनही विस्कळीत होता.
खाली दरीत पावसाळी नाला गर्जत वाहत होता. आणि वर दिवस उगवला होता.
माधव काही बोलला नाही. मीही नाही. काही गोष्टी शब्दांशिवाय समजतात.
आम्ही दोघे परत तळाच्या दिशेने चालू लागलो.
जंगलातून बाहेर येईपर्यंत धुके जवळजवळ विरळ झालं होतं. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात नाल्याचा तो परिसर आता एखाद्या रणांगणासारखा दिसत होता.
काही झोपड्या अर्धवट जळालेल्या होत्या. शेकोट्यांची राख हवेत उडत होती. चिखलात पायांचे ठसे, उलटलेली भांडी, पडलेली शस्त्रं आणि पकडलेल्या माणसांच्या रांगा दिसत होत्या. धुराचा वास अजून हवेत रेंगाळत होता.
आम्हाला पाहताच पाटील सर्वात आधी धावत आला. त्याच्या मागोमाग पवार, शिर्के आणि सावंत. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण आता सुटला होता. आणि त्याजागी विजयाचा अविश्वासमिश्रित आनंद झळकत होता.
पाटीलने माझ्याकडे पाहून विचारलं, “सर…?”
मी फक्त मान हलवली.
त्याला समजलं. आझाद परत येणार नव्हता. काही क्षण कुणीच बोललं नाही. मग सावंतच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हलकंसं हसू उमटलं.
कारण आम्हा सगळ्यांना ठाऊक होतं आज जे घडलं होतं, त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आमचा प्लॅन एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, अशी कल्पना कुणीच केली नव्हती.
आजवर जंगलातील साध्या चकमकीतसुद्धा कित्येक जवानांचा बळी जायचा. एका चुकीच्या हालचालीची किंमत जीव असायची. कदमचा जीव असाच हकनाक गेला होता.
पण आज इतकं मोठं ऑपरेशन...शंभराहून अधिक सशस्त्र नक्षल्यांचा तळ, उच्चस्तरीय कमांडर्स उपस्थित, चारी बाजूंनी वेढलेला संघर्ष.
आणि तरीही एकही जवानाचा बळी गेला नव्हता.
सत्तरहून अधिक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करली होती. पंधरा नक्षलवादी चकमकीत ठार झाले होते. आंध्र आणि ओडिशाचे दोन्ही कमांडर्स आमच्या ताब्यात होते.बाकीचे काही जण जंगलात पसार झाले होते.
पवारने आजूबाजूला पाहत हळू आवाजात म्हटलं,“सर… आज जंगलाने पहिल्यांदाच आपल्याला साथ दिली.”
मी उत्तर दिलं नाही. मी फक्त समोर उगवणाऱ्या प्रकाशाकडे पाहत राहिलो.
या जंगलातली दहशतीची, भीतीची, रक्ताची लाल रेषा आज धूसर झाली होती कारण अनेक वर्षांनी या जंगलात भीतीऐवजी आशेचा दिवस उगवत होता.
***समाप्त***
लेखकाची विशेष टीप:
'लाल रेषा' ही केवळ एक काल्पनिक कथा नाही, तर ती त्या हजारो अनामिक जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला वाहिलेली एक आदरांजली आहे, जे आपल्या भविष्यासाठी स्वतःचा वर्तमान आनंदाने कुर्बान करतात. या कथेच्या शेवटी जेव्हा विजयाचा सूर्योदय होतो, तेव्हा त्या प्रकाशामागे अनेक जवानांच्या रक्ताचा सडा पडलेला असतो. युद्धाच्या मैदानात जेव्हा एखादा जवान शहीद होतो, तेव्हा केवळ एक सैनिक जात नाही, तर एका आईचा आधार, एका पत्नीचं कुंकू आणि एका मुलाच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं जातं.
या कथेतील मेजर, पाटील, सावंत, शिर्के, पवार, जाधव, शिंदे आणि कदम ही पात्रं त्या जिद्दीचं प्रतीक आहेत, जी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मागे हटायला शिकलेली नाहीत. दुर्गम जंगले, जीवघेणी थंडी, अंगावर येणारा पाऊस आणि घरापासून मैलोन्मैल दूर राहूनही, हे वीर जवान केवळ एका कर्तव्यापोटी उभे असतात ते म्हणजे 'देशहित'. त्यांच्यासाठी 'लाल रेषा' ही केवळ नकाशावरची सीमा नसते, तर ती त्यांच्या प्राणांची मर्यादा असते, जी ओलांडण्याची हिंमत शत्रूने कधीच करू नये.
नक्षलवादासारख्या अंतर्गत शत्रूशी लढताना जवानांना केवळ शस्त्रांशीच नाही, तर आपल्याच लोकांच्या गैरसमजांशी आणि अविश्वासू डोंगरांशीही लढावं लागतं. कोमलसारख्या निष्पाप जीवांचं बलिदान आणि रेश्मासारख्या अनाथ मुलांचे अश्रू पुसण्यासाठी हे जवान स्वतःच्या रक्ताची आहुती देतात. विजय मिळतो तेव्हा जल्लोष होतो, पण त्या जल्लोषात शहीद जवानांच्या रिकाम्या खुर्च्या आणि त्यांच्या बंद पेटीत आलेल्या तिरंग्याची आठवण नेहमीच सलत राहते.
ही कथा आपल्याला हेच सांगते की, आपण ज्या शांततेत श्वास घेतो, ती शांतता विनामूल्य नाही; तिची किंमत कोणीतरी आपल्या रक्ताने मोजलेली असते. या शौर्यगाथेच्या निमित्ताने, त्या सर्व ज्ञात-अज्ञात जवानांना आणि त्यांच्या वीर माता-पित्यांना मानाचा मुजरा, ज्यांच्या बलिदानामुळे आजही आपल्या देशाच्या नकाशावरचा स्वाभिमान आणि सुरक्षिततेची 'रेषा' अभेद्य आहे आणि आचंद्रसूर्य ती अशीच अभेद्य राहील.
जय हिंद! जय भारत!
खुप् सुंदर…
खुप् सुंदर…
ही कथा आपल्याला हेच सांगते की, आपण ज्या शांततेत श्वास घेतो, ती शांतता विनामूल्य नाही; तिची किंमत कोणीतरी आपल्या रक्ताने मोजलेली असते. या शौर्यगाथेच्या निमित्ताने, त्या सर्व ज्ञात-अज्ञात जवानांना आणि त्यांच्या वीर माता-पित्यांना मानाचा मुजरा, ज्यांच्या बलिदानामुळे आजही आपल्या देशाच्या नकाशावरचा स्वाभिमान आणि सुरक्षिततेची 'रेषा' अभेद्य आहे आणि आचंद्रसूर्य ती अशीच अभेद्य राहील.>>>>
+*११११११
अतिशय ओघवती आणि उत्तम
अतिशय ओघवती आणि उत्तम बांधलेली कथा...
एक पण loose एंड नाही.
खूप धन्यवाद ही कथा इथे इतक्या झपाट्याने पूर्ण केल्याबद्दल.
लेखकाच्या विशेष टिपा खरेच खूप विशेष आहेत.
अप्रतिम..
अप्रतिम..
ओहह!!!!! फार फार सुंदर शेवट!
ओहह!!!!! फार फार सुंदर शेवट! शेवटची टीप विशेष आवडली!! खूप सुंदर आणि प्रवाही लिहीलंत! ह्या एका कथेसाठी अनेक जण इथे येत असावेत! खूप वेगळा अनुभव दिलात. तुमची मांडणी, चित्रण आणि कल्पनाशीलता बघून सेवन्थ सीक्रेटमधल्या कल्पनाविस्ताराची आठवण झाली! फार भन्नाट! एक एक भाग सुरू केला की थांबवता न येणारा!
एक प्रतिक्रिया मनात आली होती. माधव कँपवरून परत जातो आणि परत येतो, त्यावेळी नक्की तो कसा निसटतो, काय काय सहन करून येतो ह्याबद्दल उत्सुकता मनात होती. ते वर्णन आलं असतं तर अजून छान वाटलं असतं.
तुम्ही लिहीलंत की, रोज ५ तास प्रवास करताना तुम्ही रूप"रेषा" बनवत होता! कमाल आहे!
धन्यवाद! पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत
भन्नाट!!!
भन्नाट!!!
ही कथा आपल्याला हेच सांगते की
ही कथा आपल्याला हेच सांगते की, आपण ज्या शांततेत श्वास घेतो, ती शांतता विनामूल्य नाही; तिची किंमत कोणीतरी आपल्या रक्ताने मोजलेली असते. या शौर्यगाथेच्या निमित्ताने, त्या सर्व ज्ञात-अज्ञात जवानांना आणि त्यांच्या वीर माता-पित्यांना मानाचा मुजरा, ज्यांच्या बलिदानामुळे आजही आपल्या देशाच्या नकाशावरचा स्वाभिमान आणि सुरक्षिततेची 'रेषा' अभेद्य आहे आणि आचंद्रसूर्य ती अशीच अभेद्य राहील.> खरंय .
खूप छान वर्णन आणि डिटेलिंग. डोळ्यासमोर जंगलाचा संपूर्ण परिसर उभा केलात तुम्ही. रोज सकाळी मी नवीन भागाची वाट पहात असायचे . गोष्ट संपली याचे वाईट वाटले . विशेष टीप मधील वाक्य न वाक्य खरंय .
एवढी छान कथा वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद! पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद साधना, धनवन्ती, TI,
धन्यवाद साधना, धनवन्ती, TI, मार्गी, चिन्मय कामत, सामी! तुमच्यासारख्या वाचकांचं प्रेम, प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळालं की आणखी जोमाने लिहिण्याची प्रेरणा मिळते.
एका वेगळ्या विषयावरची,
एका वेगळ्या विषयावरची, उत्कंठावर्धक कथामाला. मानवी भावनांचं वैविध्य, निसर्गाची ताकद, युद्धतंत्र सगळ्याचा उत्तम मेळ घालून वाचकांना मायबोलीवर परत परत खेचून आणणारी मालिका!
पुलेशु
धन्यवाद Abuva!
धन्यवाद Abuva!
खुप छान!
खुप छान!
अप्रतिम कथा. वेळेत पुर्ण केल्या बद्दल धन्यवाद.
सगळे भाग एका मागोमाग वाचले.
सगळे भाग एका मागोमाग वाचले.
कथा छान जमली आहे बऱ्यापैकी डिटेलिंग पण आहे.
आवडली.
प्रचंड आवडली.
प्रचंड आवडली.
सगळं डिटेलिंग, सचित्र वर्णन करण्याची हातोटी, थरार सगळंच बेस्ट होतं.
टिपा विशेष आवडल्या.
लिहीत राहा.
एकदम सुंदर जमली ही कथा मालिका
एकदम सुंदर जमली ही कथा मालिका.
मस्तच.
संपली का?
संपली का?
वाचते निवांत विकांताला
अतिशय छान मांडणी. सुंदर कथा.
अतिशय छान मांडणी. सुंदर कथा.
धन्यवाद ekujadhav, झकासराव
धन्यवाद ekujadhav, झकासराव अतरंगी, sharadg, urmilas!
@किल्ली वाचून झाल्यावर आपला अभिप्राय द्या.
@मार्गी मला तर सेवेन्थ
@मार्गी मला तर सेवेन्थ सीक्रेट वाचल्यानंतर कित्येक दिवस (20-22 वर्षांनी अजूनही?) असं ठाम वाटत राहिलं की हिटलरने आत्महत्या केली नव्हती; तो त्या वेळी तिथून निसटला होता. इतक्या प्रभावी पद्धतीने लेखकाने कथानक विणलं आहे!
आवडली ही कथा मालिका. फार
आवडली ही कथा मालिका. फार सुंदर आहे वर्णन. असे वाटते की जणू तुम्ही या सैनिकी क्षेत्रात काम करता म्हणून इतके माहितीपूर्ण लिहिले आहे.
धन्यवाद sneha1!
धन्यवाद sneha1!
मागचे ३ आठवडे तुम्ही लाल रेषा
मागचे ३ आठवडे तुम्ही लाल रेषा वाचायची सवयच लावली बुआ. आज चुकल्यासारखं वाटतंय.
सुरेख !! खूप दिवसांनी एक
सुरेख !! खूप दिवसांनी एक लेखमालिका पुढचा भाग कधी येतोय याची वाट बघत वाचली. खूप आवडली. असेच लिहित रहा!!
कथाविषय, ओघवते आणि
कथाविषय, ओघवते आणि प्रत्ययकारीवर्णन आणि खिळवून ठेवणारी भाषा यामुळे कधी सगळे भाग वाचून संपले हे कळलेच नाही. लिखाण आवडले हेवेसांनल
हल्ली मायबोलीवर कमी वेळा येणे होते
त्यात अजून भर म्हणजे (अनेकदा अनेकजणांनी कथामालीका अर्धवट सोडल्यामुळे) हल्ली शेवटचा भाग आल्याशिवाय वाचायला सुरुच करत नाही. अंतिम भाग आल्याचे धनवन्ती यांनी कळवल्यामुळे कथामाला वाचायला घेतली.
धनवन्ती, मनापासून आभार अन्यथा चांगले लिखाण वाचायचे हुकले असते.
धन्यवाद urmilas, अश्विनी११,
धन्यवाद urmilas, अश्विनी११, हर्पेन!
<<अनेकदा अनेकजणांनी कथामालीका अर्धवट सोडल्यामुळे>> लेखक / लेखिका कथामालीका अर्धवट का सोडतात हे एक कोडंच आहे.
हर्पेन _/\_
हर्पेन _/\_
खूप वेगवान आणि थ्रिलिंग झाली
खूप वेगवान आणि थ्रिलिंग झाली आहे दीर्घकथा.
सलग भाग टाकल्याने वाचायला मजा आली.
विषय, जंगलाचे सैन्याचे वर्णन अगदी माहितीपूर्ण लिहिले आहे.
पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत.
@ नितनवे जी! हो, सेवन्थ
@ नितनवे जी! हो, सेवन्थ सीक्रेटमध्ये आलेले अनेक सूक्ष्म तपशील खरे आहेत. डिटेलिंग बरचसं खरंच आहे. आणि दाट शक्यता आहे की, त्यात जे सांगितलंय ते सत्याच्या जवळ असू शकेल! We may never know! We only know truth projections!
कथेचा शेवटचा भाग पण खूपच छान.
कथेचा शेवटचा भाग पण खूपच छान...
आप तो छा गये मेजर नितीन!
खुप खुप धन्यवाद, एका सुंदर कथेसाठी
धन्यवाद सावली आणि आबा!
धन्यवाद सावली आणि आबा!