जीवनाचे सौंदर्य

Submitted by Meghvalli on 22 April, 2026 - 02:33

हिरव्या गवताच्या पात्यांवर स्फटिकांचे दवबिंदू टपोरे,
सोनेरी तिरीप उन्हांची त्यावर महिरप पसरली रे,
हलकेच वार्‍याच्या स्पर्शाने ते मोती थरथरले,
क्षणभरात त्या सौंदर्याचे स्वप्न गवतात विरघळले।

क्षितिजावर उमलल्या किरणांच्या नव्या ओळी,
मनाच्या कप्प्यात पसरली त्यांची लाली,
हातात गवसले म्हणता सगळेच दूर सरकते,
डोळ्यांना जे दिसते सुंदर, ते दृश्य क्षणोक्षणी बदलते।

भासाभासांच्या या खेळात मन हळूच हरवते,
सापडल्याच्या आनंदातही काहीतरी निसटते,
कळत असूनही का हा मोह सुटत नाही?
क्षणांच्या मागे धावताना मन स्वतःच हरवत जाई।

श्वासांच्या लयीत एक आगगाडी डोंगरातून चालते,
धूर सोडत मागे ती स्वप्नांच्या दुनियेत पळते,
कधी घट्ट धुक्यातून, कधी कृष्णमेघांतून वाट काढत धावते,
विचार करता कळते एक साधीशी गोष्ट —
क्षणभंगुरतेतच जगण्यात जीवनाचे सौंदर्य जास्त।

बुधवार, २२/४/२६ ११:२५ AM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users