लाल रेषा - भाग १५

Submitted by नितनवे on 21 April, 2026 - 13:39

लाल रेषा - भाग १४

पूर्वभाग
कॅम्पमध्ये तणावपूर्ण शांतता असताना माधव जीव धोक्यात घालून परत आला आणि नक्षलवाद्यांच्या मोठ्या हल्ल्याचा कट उघड केला. शंभराहून अधिक सशस्त्र नक्षली एकत्र येऊन कॅम्प, शाळा, सरकारी कार्यालये आणि पोलीस ठाण्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. अधिकाऱ्यांनी तातडीने मुख्यालयाकडे मदत मागितली, पण पुरावा नसल्याने अतिरिक्त फौज नाकारण्यात आली. फक्त पंचेचाळीस जवान उपलब्ध असुनसुद्धा थेट बचावाऐवजी आक्रमक योजना आखण्यात आली. पहाटेपूर्वी नक्षल तळाला वेढा घालून त्यांच्या मनोबलावर हल्ला करण्याची रणनीती ठरली. ड्रोन, स्मोक कॅनिस्टर्स, नाईट व्हिजन आणि ताफ्यातील दारुगोळा यांचा वापर करून मोठं सैन्य आल्याचा भास निर्माण करायचा होता. तेवढ्यात पवारचा ताफा कॅम्पमध्ये पोहोचला आणि अंतिम कारवाईसाठी तयारी सुरू झाली.

*****************************************************************************************************************

लाल रेषा - भाग १५ - ऑपरेशन ऑल आऊट

पवारचा ताफा गेटच्या आत शिरला आणि धूळ खाली बसण्याआधीच ‘ऑपरेशन ऑल आऊट’ च्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली. ट्रकचे दरवाजे एकामागोमाग उघडले. लोखंडी पेट्या खाली उतरू लागल्या. दारुगोळ्याचे खोके एका सरळ रेषेत मांडले गेले. अतिरिक्त रायफल्स, मेडिकल किट्स, ड्रोन केस आणि संचार उपकरणं क्षणात आपल्या ठरलेल्या जागी पोहोचली.

कुणी नाईट व्हिजन गॉगल्स डोळ्यांवर बसवत होतं. कुणी बॅलिस्टिक हेल्मेटचे पट्टे घट्ट आवळत होतं. कुणी मॅगझिन भरत होतं. कुणी शेवटच्या वेळेस रायफलचा स्लाइड ओढून तपासणी करत होतं. काही जवान चेहऱ्यावर काळा रंग चढवत होते, तर काही रेडिओ सेट्सची फ्रिक्वेन्सी जुळवत होते.

कोणताही गोंधळ, आरडाओरड नव्हती. फक्त प्रशिक्षित हालचाली. दबक्या आदेशांचा आवाज. लोखंडावर लोखंड आदळण्याची मंद खणखण. आणि युद्धापूर्वीची ती जबरदस्त शिस्त.

प्रत्येक माणसाला आपलं काम माहीत होतं. प्रत्येक सेकंदाची किंमत माहीत होती. मृत्यूची भीती मागे पडली होती; आता फक्त कर्तव्य आणि प्रतिकार उरला होता.

पहाटेचे साडेतीन वाजले होते. रात्र संपायला अजून वेळ होता, पण काळोख मात्र अधिकच गडद झाला होता. आकाश ढगांनी भरलेलं होतं. चंद्र कुठेच दिसत नव्हता. झाडांच्या माथ्यावरून जाणारा वारा सुद्धा आज काहीसा जड वाटत होता जणू निसर्गही या होणाऱ्या रणसंग्रामाची साक्ष देण्यासाठी श्वास रोखून उभा होता.

मी शेवटची नजर कॅम्पवर टाकली. कदाचित परत येऊ. कदाचित नाही. मग मी हाताने खुण केली. आणि आम्ही पंचेचाळीस जण सावल्यांसारखे कॅम्पच्या बाहेर पडलो.

सर्वात पुढे माधव होता. त्याच्या मागे हिडमे. दोघांनी दाखवलेला मार्गच आता आमचा एकमेव विश्वास होता. हिडमेने मान हलवून दिशा पुष्टी केली, आणि आम्ही त्यांच्यामागोमाग दाट जंगलाच्या कुशीत शिरलो.

पायाखाली वाळलेली पानं, तुटक्या फांद्या, चिखल होता. काही ठिकाणी निसरडी माती होती. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत गवत होतं. पण आवाज नव्हता. प्रत्येक जवान पाऊल ठेवण्याआधी जमिनीला पाहत होता. वजन टाकण्याआधी माती तपासत होता.फांदी मोडणार नाही, पानं चरचर करणार नाहीत, दगड घसरणार नाही याची खबरदारी घेत होता. फक्त अधूनमधून हातवारे. कधीतरी रेडिओवर हलकी कुजबुज. आणि मधूनच दूरवर एखाद्या रातकिड्याचा आवाज.

जंगलात आणखी आत शिरताच अंधार जणू एखाद्या काळ्या भिंतीसारखा आमच्याभोवती उभा राहिला. झाडांच्या फांद्या इतक्या दाट एकमेकांत गुंतल्या होत्या की वरचं आकाश पूर्णपणे नाहीसं झालं. चंद्र तर आधीच ढगांआड होता; आता फक्त काळोख… आणि त्यात हलणाऱ्या सावल्या.

हवा ओलसर झाली होती. मातीचा, पानगळलेल्या पानांचा आणि जुन्या लाकडाचा गंध सतत नाकात भरत होता. श्वास घेतानाही वाटत होतं, आपण जंगलाच्या पोटात खोल उतरतोय.

काही ठिकाणी फांद्या इतक्या खाली झुकल्या होत्या की आम्हाला पूर्ण वाकून, जवळजवळ रांगत पुढे जावं लागलं. रायफल छातीशी धरून, डोकं खाली झुकवून, आवाज न करता आम्ही त्या झुडपाखालून सरकत होतो.

काही ठिकाणी जमीन दलदलीसारखी झाली होती. गुडघ्यापर्यंत चिखलात पाय रुतत होता. एक पाय बाहेर काढताना दुसरा आत शिरत होता. बूट ओढताना मंद चप-चप आवाज होत होता, आणि प्रत्येक वेळी आम्ही थांबून खात्री करत होतो की तो आवाज फार दूर गेला नाही.

काही ठिकाणी नाल्याच्या कडेला जागाच नव्हती. एका बाजूला खोल उतार, दुसऱ्या बाजूला काटेरी झुडपं. तिथे आम्हाला हात टेकवत, शरीराचं वजन पुढे ढकलत, सावकाश सरकावं लागत होतं. एखादं पाऊल चुकलं असतं, तर माणूस थेट खाली कोसळला असता.

पवारच्या मागचा एक जवान क्षणभर घसरला. त्याने वेळेवर झाडाची मुळं पकडली. मागच्याने तत्काळ त्याची कॉलर धरली. एकही शब्द न बोलता त्याला वर ओढलं गेलं. रांग पुन्हा चालू झाली.

माधव अधूनमधून थांबत होता. खाली बसून जमिनीवरील खूणा पाहत होता. कधी मोडलेली फांदी, कधी चिखलातलं जुनं पाऊल, कधी बिडीचा अर्धवट तुकडा त्याच्यासाठी त्या सगळ्या खुणा नकाश्यापेक्षा स्पष्ट होत्या.

हिडमे मागे वळून हाताने दिशा दाखवत होता. डावा उतार टाळा. उजवीकडचा भाग सैल आहे. पुढे काटेरी झुडपांचा पट्टा. त्याच्या खुणा आता आमच्या आदेशांइतक्याच महत्त्वाच्या झाल्या होत्या.

घड्याळ पुढे सरकत होतं आणि त्याबरोबर आम्हीही.

थकलो होतो. ओले झालो होतो. शरीरावर काटे ओरबाडत होते. पण कुणी थांबत नव्हतं.

कारण आम्हाला माहीत होतं जंगल जितकं कठीण होत होतं, लक्ष्य तितकंच जवळ येत होतं. आणि जितका वेग…तितकी जास्त संधी आम्हाला मिळणार होती.

एका ठिकाणी माधव थांबला. खाली बसून त्याने जमिनीवरची खूण दाखवली. ताजी पावलांची चिन्हं, काही तासांपूर्वी गेलेल्या गटाची.

मी पाटीलकडे पाहिलं. तो कुजबुजला, “आपण बरोबर चाललोय.”

मी मान हलवली.

आम्ही नाल्याच्या तळापासून सुमारे सातशे मीटर अंतरावर आलो, तेव्हा खऱ्या आव्हानाची सुरुवात झाली. आतापर्यंत आम्ही जंगलातून पुढे सरकत होतो; आता जंगल स्वतः शत्रूच्या बाजूने उभं राहिलं होतं.

माधवने हात वर करून थांबायची खूण केली. क्षणात संपूर्ण तुकडी जागच्या जागी गोठली. कोणी पाऊल पुढे टाकलं नाही.कोणी श्वासही मोठ्याने घेतला नाही. फक्त जंगलातील दूरवरचे किर्र आवाज आणि नाल्याकडून येणारा मंद वारा.

मी अलगद खाली बसलो. समोर काळोखात नाल्याची खोलगट रेषा दिसत होती. झाडांच्या मधून काळी सावलीसारखी ती वळणं घेत पुढे गेली होती. तिथून येणारा वारा थंड होता, पण त्या वार्‍यात आता वेगळाच गंध मिसळला होता. ओलसर माती, धुराचा मंद वास आणि धोक्याची चाहूल.

माधव माझ्याजवळ सरकला. त्याचा आवाज कुजबुजीपेक्षाही कमी होता. “सर… इथून पुढे त्यांचा बाहेरचा सुरक्षा पट्टा सुरू होतो.”

मी पाटीलकडे पाहिलं. त्याने समोर नजर रोखूनच उत्तर दिलं, “म्हणजे आता खरी सीमा.”

त्या एका वाक्यानंतर सगळ्यांच्या शरीरातला ताण अजून वाढला. आतापर्यंतचा प्रवास कठीण होता पण आता पुढचं प्रत्येक पाऊल घातक असणार होतं.

माधव खाली बसला आणि ओलसर जमिनीवर बोट फिरवत समोरचा आराखडा काढू लागला. त्याने तीन वर्तुळे रेखाटली आणि मंद आवाजात म्हणाला, “तीन टप्पे.”

मी समोर लक्ष केंद्रित केलं. नक्षल्यांची बाह्य सुरक्षा ही साधी पहारेदारी नव्हती. ती अत्यंत विचारपूर्वक उभी केलेली थ्री-लेयर सिक्युरिटी होती.

पहिली लेयर नक्षली पहारेकरांची होती. जंगलात पूर्णपणे मिसळून बसलेले पहारेकरी झाडांच्या बुंध्यामागे, दगडांच्या सावलीत आणि काटेरी झुडपांच्या आड दबा धरून बसले होते. ते हलत नव्हते, बोलत नव्हते, पण त्यांचे कान जंगलातील प्रत्येक आवाजावर होते. पानांची साधी सळसळही त्यांना सावध करण्यासाठी पुरेशी होती.

दुसरी लेयर नैसर्गिक सापळ्यांची होती. अतिशय बारीक आणि जवळजवळ न दिसणाऱ्या तारांनी बनवलेल्या ट्रिप-लाइन विविध ठिकाणी लावल्या होत्या. एखाद्या फांदीला स्पर्श झाला तर इशारा वाजणार, एखादी तार ताणली गेली तर घंटा खणखणणार किंवा छोटा स्फोटक तुकडा उडणार. काही ठिकाणी काटेरी खड्डे होते, तर काही ठिकाणी मुद्दाम तयार केलेले खोटे मार्ग होते, जे थेट पहारेकऱ्यांच्या नजरेसमोर नेत होते. जंगलाचा प्रत्येक भाग त्यांनी शस्त्रासारखा वापरला होता.

तिसरी लेयर म्हणजे साक्षात मृत्यू होती. जमिनीखाली गाडलेले प्रेशर आयईडी वेगवेगळ्या ठिकाणी पेरलेले होते. काही पानांच्या थराखाली लपवलेले, काही मातीने झाकलेले, तर काही दगडांच्या बाजूला ठेवलेले. काही लहान होते, पाय उडवण्यासाठी. काही मोठे होते, संपूर्ण तुकडीचा नाश करण्यासाठी.

एक चुकीचं पाऊल. एक चुकीचा अंदाज. एक क्षणाचं दुर्लक्ष आणि अख्खं मिशन रक्ताच्या थारोळ्यात संपलं असतं.

मी हळूच हात वर केला. सर्वजण खाली बसले.

“शिर्के.”

तो पुढे सरकला. त्याने बॅग उघडून छोटासा नॅनो-ड्रोन बाहेर काढला. हाताच्या तळव्यात मावेल इतका. पंख्याचा आवाज जवळजवळ नव्हताच. त्याने थर्मल मोड सुरू केला, स्क्रीन जोडली आणि ड्रोन अतिशय कमी उंचीवर झाडांच्या रेषेखालून हवेत सोडला. तो अंधारात अदृश्य झाला.

आम्ही स्क्रीनभोवती वाकलो. काळ्या पार्श्वभूमीवर गरम ठिपके दिसू लागले. एक… दोन… चार…झाडांच्या बुंध्यामागे बसलेले शरीरांचे आकार. काही पोटावर आडवे. काही गुडघ्यावर टेकून. काहींनी रायफल पुढे रोखलेली. ते स्टॅटिक पोझिशनमध्ये होते...हलत नव्हते, पण जागे होते.

शिर्के कुजबुजला,“डावीकडे दोन. उजवीकडे तीन. मध्ये ट्रिप वायर.”

मी स्क्रीनवर बारीक रेषा पाहिल्या.

खरंच...झाडापासून झाडापर्यंत बांधलेली तार. चुकून पाय लागला असता, तर आपण इथंच संपलो असतो.

मी पाटीलकडे पाहिलं. “वेळ?”

“चारच्या आसपास.”

मी मान हलवली.

पहाट जवळ येत होती. अजून थांबलो, तर आतले पहारेकरी बदलतील.

मी सावंत आणि पवारला खुणावलं. दोघं सरकत माझ्याजवळ आले. मी त्यांच्या डोळ्यांत पाहिलं. “सायलेंट टेकडाऊन.”

दोघांनी एकाच वेळी मान हलवली.

सावंतने चाकूची मूठ घट्ट पकडली.

माधवने समोरचा मार्ग दाखवला. सावंत डावीकडे झाडीत शिरला. पवार उजवीकडे विरघळला. त्यांच्या मागे दोन-दोन जवान. आणि आम्ही बाकीचे अंधारात थांबलो.

जंगल पुन्हा शांत झालं. इतकं शांत की स्वतःच्या हृदयाचा ठोका ऐकू येत होता.

मी पाटीलकडे मान हलवली. त्याने लगेच दोन जवानांना खूण केली. त्यांच्या बॅगमधून छोटे सिग्नल जॅमर्स बाहेर आले. दिशात्मक अँटेना उघडले गेले, फ्रिक्वेन्सी सेट झाली आणि उपकरणं कमी शक्तीवर सुरू करण्यात आली. उद्देश मोठा आवाज निर्माण करणं नव्हतं फक्त त्यांच्या स्थानिक संपर्क जाळ्याला गुदमरवणं होतं.

काही क्षणांत परिणाम दिसू लागला. थर्मल स्क्रीनवर डावीकडचा एक नक्षली उठून बसला. त्याने वॉकी-टॉकी कानाशी नेला. काही बोलला. उत्तर नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला. तरीही शांतता.

उजवीकडचा दुसरा पहारेकरीही सेट हलवताना दिसला. अँटेना फिरवला. बॅटरी काढून पुन्हा बसवली. काहीच नाही.

पाटील हळूच कुजबुजला, “त्यांचे कान बंद झाले.”

आता ते जंगलात एकटे पडले होते. त्याच क्षणी आमच्या जवानांची खरी हालचाल सुरू झाली. सावंतचा गट जमिनीला चिकटून पुढे सरकत होता. कोपरांवर आणि गुडघ्यांवर वजन टाकत, इंचा-इंचाने. काळा रंग चोपडलेल्या चेहऱ्यांमुळे ते झाडांच्या सावल्यांत विरघळले होते.

पवारचा गट उजव्या बाजूने अर्धवर्तुळात फिरत होता. एखादा नक्षली टॉर्चची मंद बॅटरी फिरवायचा, प्रकाश झाडांवरून फिरायचा… आणि आमचे जवान त्याच क्षणी बुंध्याला चिकटून निश्चल व्हायचे. प्रकाश गेला की पुन्हा सरपटणं सुरू.

एकदा डावीकडचा पहारेकरी अचानक उभा राहिला. माझ्या हाताची पकड बंदुकीवर घट्ट झाली. तो दोन पावलं पुढे आला. आजूबाजूला पाहिलं. मग झाडाकडे पाठ टेकवून पुन्हा बसला. सावंत त्याच्यापासून फक्त दहा फुटांवर होता. वेळ हळूहळू ताणली जात होती. तेवढ्यात वाऱ्याचा जोर अचानक वाढला. वरच्या फांद्या एकमेकांवर आदळल्या. पानांची मोठी सळसळ उठली.

मी कुजबुजलो,“आत्ता.”

क्षणात चार सावल्या जिवंत झाल्या. सावंत मागून झेपावला. एका हाताने पहारेकऱ्याचं तोंड दाबलं, दुसऱ्या हाताने मानेला लॉक लावला. दोन सेकंदांची झुंज… आणि शरीर शिथिल झालं.

उजवीकडे पवारने दुसऱ्याला जमिनीवर खेचलं. त्याच्या हातातून वॉकी-टॉकी दूर फेकला गेला. तिसऱ्या जवानाने गुडघा छातीवर रोवला. आवाज बाहेर पडण्याआधीच तो बेशुद्ध झाला.

मधल्या बुंध्यामागचा पहारेकरी उठण्याआधीच त्याच्या मानेभोवती दोर आवळला गेला. ना गोळीबार, ना किंकाळी, ना गोंधळ. थर्मल स्क्रीनवर लाल ठिपके एकामागून एक खाली स्थिर होत गेले.

शिर्के कुजबुजला, “पहिला वेढा शांत.”

मी खोल श्वास घेतला. नक्षल्यांचा बाह्य सुरक्षा पट्टा आम्ही आवाज न करता मोडला होता.पण खरी कसोटी अजून बाकी होती.

माधवने हाताने खाली खूण केली. समोर दिसत होती एक अरुंद पायवाट, नाल्याच्या दिशेने जाणारी मुख्य हालचालीची वाट. वरवर पाहता साधी मातीची रेषा. पण जंगलात सरळ वाट कधीच निष्पाप नसते.

मी गुडघ्यावर बसलो. काळजीपूर्वक निरीक्षण केलं. काही ठिकाणी माती थोडी हलकी दिसत होती. काही ठिकाणी पानं मुद्दाम पसरवलेली होती.

माधव कुजबुजला, “सर… दुसरा टप्पा.”

मी मान हलवली.

नक्षल्यांनी त्या वाटेवर प्रेशर ट्रिपवायर्स आणि लपवलेले सापळे उभे केले होते. साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या, अतिशय बारीक मासेमारीच्या तारा एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत ताणलेल्या होत्या. काही गुडघ्याच्या उंचीवर. काही टाचेजवळ. काही तर पानाखाली दडवलेल्या. त्या तारांचा संपर्क पुढे बांधलेल्या ग्रेनेड्सशी, स्फोटक कॅनिस्टर्सशी किंवा आवाज निर्माण करणाऱ्या इशारा यंत्रणेशी होता.

चुकीचं पाऊल, एक चुकीची हालचाल आणि संपूर्ण तळ जागा झाला असता.

मी शिर्केला खुणावलं. तो पुढे आला. नाईट व्हिजन गॉगल्स डोळ्यांवर घट्ट बसवले. मग त्याने इन्फ्रारेड मोड सुरू केला. काही क्षण तो स्थिर उभा राहिला.

मग मंद आवाजात म्हणाला, “दिसतायत.” त्याने हाताने दिशा दाखवली.

गॉगल्सच्या स्क्रीनवर बारीक चमकणाऱ्या रेषा दिसत होत्या. वातावरणातील ओलावा आणि कोनात पडणाऱ्या इन्फ्रारेड प्रकाशामुळे त्या तारांनी हलकी चमक घेतली होती.

पाटील कुजबुजला, “कमाल आहे…”

शिर्केने पुढे मोजायला सुरुवात केली. “डावीकडे दोन. मध्ये एक. उजवीकडे तीन… एक डबल लिंक.”

याचा अर्थ एका तारेला धक्का लागला, तरी दोन दिशांनी प्रतिक्रिया होऊ शकत होती. मी लगेच निर्णय घेतला. “मुख्य वाट वापरायची नाही.”

माधव माझ्याकडे पाहू लागला. मी उजवीकडच्या काटेरी झुडपांकडे बोट दाखवलं. “नवीन वाट.”

क्षणात दोन जवान पुढे आले. हातात मल्टी-टूल किट्स, लहान फोल्डिंग कटर आणि कापडी आवरण.

त्यांनी काट्याकुट्यातून आवाज न करता जागा बनवायला सुरुवात केली. फांद्या तोडल्या नाहीत हळूच वाकवल्या. काटे कापले नाहीत मुळाशी दाबून बाजूला केले. पानं हलक्या हाताने हटवली. आवाज जवळजवळ शून्य.

दरम्यान शिर्के आणि सावंत मूळ वाटेवरील तारा निष्प्रभ करत होते. एका जवानाने तारेला दोन ठिकाणी पकडलं. दुसऱ्याने कापडी क्लॅम्प लावून ताण स्थिर केला.तिसऱ्याने बारीक कटरने हळूच ती तार कापली. पुढची. मग आणखी पुढची.

काही तारा थेट ग्रेनेड पिनला जोडलेल्या होत्या. त्या वेळी श्वासही रोखावा लागत होता.

पवार एक तार पाहून कुजबुजला, “ही हलली असती, तर आपण सगळे संपलो असतो.”

दहा मिनिटांत मृत्यूची ती पायवाट निष्प्रभ झाली. आम्ही त्यांच्या रस्त्याने गेलो नाही. आम्ही स्वतःचा रस्ता बनवला. नक्षल्यांनी पेरलेल्या मृत्यूला आम्ही चकवा दिला होता.

पहाटेच्या साधारण पाचच्या सुमारास आम्ही त्यांच्या सर्वात कठीण ‘इनर सर्कल’ पर्यंत पोहोचलो होतो. बाहेरचे नक्षली शांत झाले होते. ट्रिपवायर्स निष्प्रभ झाले होते. पायवाटांवरील मृत्यू मागे टाकला होता. आता आमच्या आणि आझादच्या मुख्य तळाच्या मध्ये कोणताही सुरक्षा टप्पा उरला नव्हता. फक्त अंतिम अंतर. आणि अंतिम क्षण.

आम्ही नाल्याच्या तळापासून अंदाजे तीनशे मीटर अंतरावर येऊन थांबलो. इथून पुढे प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक हालचाल निर्णायक ठरणार होती. त्या वेळेला संपूर्ण जंगलावर धुक्याची एक जाड, पांढरी चादर पसरली होती. जमिनीपासून कंबरभर उंचीपर्यंत ते धूसर आवरण हळूहळू सरकत होतं. झाडांचे बुंधे अर्धे दिसत होते, अर्धे त्या धुक्याने गिळून टाकले होते. काही झाडं तर हवेत तरंगत असल्यासारखी भासत होती.

मी अलगद नाईट व्हिजन गॉगल्स डोळ्यांवर घट्ट बसवले. क्षणभर सगळं हिरवट धूसर दिसलं. मग चित्र स्थिर झालं. आणि समोरचं दृश्य हळूहळू स्पष्ट होत गेलं.

काही क्षण मी काहीच बोललो नाही. कारण आम्ही ज्या गोष्टीचा अंदाज घेत होतो, ती वस्तुस्थिती त्याहून मोठी होती. समोर एक विस्तीर्ण तात्पुरता तळ उभा होता.

ताडपत्री, बांबू आणि लाकडांनी उभारलेल्या झोपड्या एका अर्धवर्तुळात उभ्या होत्या. काही मोठ्या, काही लहान. काहींवर हिरव्या पानांच्या फांद्या टाकून छुपं आवरण दिलेलं होतं. मधोमध मोकळी जागा होती.

काही ठिकाणी अर्धवट विझलेल्या शेकोट्या अजून धुमसत होत्या. दोरींवर वाळत टाकलेले कपडे मंद वार्‍यात हालत होते. झाडांना टेकवलेल्या रायफल्स दिसत होत्या. काही ठिकाणी दारुगोळ्याची पोती, काही ठिकाणी अन्नधान्याच्या बॅगा, तर काही ठिकाणी वायर आणि लोखंडी पेट्या विखुरलेल्या होत्या.

आणि त्या सगळ्यात पसरलेले शंभरहून अधिक नक्षली. काही अजून झोपेत होते. काही शेकोटीभोवती गुडघे टेकून बसले होते. काही चहा उकळत होते. काही बंदूक बाजूला ठेवून अंग ताणत होते. काही दोन-दोन, तीन-तीन जण कुजबुजत उभे होते.

त्यांच्या चेहऱ्यावर निर्धास्तपणा होता. रात्र सुरक्षित गेली, असा त्यांना पूर्ण विश्वास होता.

मधोमध सर्वात मोठ्या झोपडीबाहेर तीन आकृत्या उभ्या होत्या. मी फोकस वाढवला. पहिली आकृती स्पष्ट झाली.

आझाद.

त्याच्या खांद्यावर रायफल सहज टांगलेली होती. एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हाताने तो समोर पसरलेल्या नकाशावर काहीतरी दाखवत होता. त्याच्या उभं राहण्यात अधिकार होता. चेहऱ्यावर कठोरपणा आणि हालचालीत सरावलेला आत्मविश्वास.

त्याच्या उजवीकडे उभा असलेला उंच, सडपातळ माणूस बहुधा आंध्रचा कमांडर...स्फोटतज्ज्ञ. त्याच्या जवळ लोखंडी बॉक्स आणि काही नकाशे पडलेले होते. डावीकडे जाड दाढी असलेला, सतत आसपास नजर फिरवणारा माणूस उभा होता...ओडिशाचा जंगल ऑप्स प्रमुख असावा.

तिघांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. ही साधी चर्चा नव्हती. ही पुढच्या रक्तपाताची आखणी होती. त्यांच्या नकाशावर कदाचित आमचा कॅम्प असेल. कदाचित गावं. कदाचित शाळा. कदाचित पोलीस ठाणी.

मी गॉगल्समधून ते दृश्य पाहत राहिलो. आणि मनात एकच विचार आला...आता ते योजना आखत होते. काही मिनिटांत त्यांना स्वतःच्या बचावाचीही संधी उरणार नव्हती.

मी पाटीलकडे पाहिलं.

तो कुजबुजला, “देवानेच तिघांना एका जागी आणून उभं केलंय.”

मी काही बोललो नाही. मी हात वर केला. आणि हवेत शांत खुणा केल्या.

क्षणात सावंत डावीकडे निसटला. त्याची तुकडी मुख्य वाट बंद करायला सरकली.

शिर्के उजव्या उंच उताराच्या दिशेने निघाला. त्याच्या स्नायपर जोडीने टेकडीवर स्थान घ्यायचं होतं.

पवार मागच्या कोरड्या ओढ्याकडे सरकला. त्या वाटेने कोणी निसटलं, तर ते पुन्हा कधी दिसणार नव्हते.

तीन सावल्या तीन दिशांनी विरघळल्या. काही मिनिटांत आम्ही त्यांना चारी बाजूंनी वेढलं होतं.

मी खाली बसलो. रायफल पुढे घेतली. माझी हृदयाची धडधड इतकी जोरात होती की ती मलाच ऐकू येत होती. पण हात मात्र ट्रिगरवर पूर्ण स्थिर होते. श्वास संथ आणि नियंत्रित होता. नजर लक्ष्यावर खिळलेली होती. मन पूर्णपणे थंड, शांत आणि निर्विकार झालं होतं.

पाटील अलगद माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने माझ्याकडे पाहिलं. एक शब्दही उच्चारला नाही. फक्त शांतपणे मान डोलावली. तो प्रश्न नव्हता. तो संकेत होता.

मीही परत मान हलवली.

क्षणात पाटीलने बॅग हळूच उघडली. आतून छोटा ड्रोन बाहेर काढला. त्याचे ब्लेड्स दुमडलेले होते. बॅटरी आधीच बसवलेली होती. पुढच्या भागाला लहान स्पीकर मॉड्यूल जोडलेलं होतं. तो आमच्या पहिल्या हल्ल्याचं शस्त्र होता.

आज पहिली गोळी बंदुकीतून सुटणार नव्हती. पहिला हल्ला त्यांच्या शरीरावर नव्हे त्यांच्या मनावर होणार होता.

मी मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं.

५:०२

पहाट दाराशी उभी होती.

मी पाटीलकडे वळून अगदी मंद आवाजात कुजबुजलो, “सुरू करा.”

पाटीलने ड्रोन हवेत सोडला. तो धुक्यात विरघळत पुढे सरकला. आणि पुढच्याच क्षणी एका सेकंदात संपूर्ण शांततेचा भंग करत सायरनचा भीषण आवाज जंगलभर घुमला.

तो आवाज इतका अनपेक्षित, इतका तीव्र होता की धुक्याने झाकलेल्या दरीतल्या प्रत्येक झाडाने जणू दचकून मागे हटावं. कपारीतून तो परत परत आदळत होता. नाल्यात, उतारावर, झोपड्यांच्या मधोमध, तंबूंवर - सगळीकडे तोच कर्कश सायरन घुमू लागला.

नक्षली तळ क्षणात जागा झाला. काही जण झोपेतून दचकून उठले. काहींनी बंदूक कुठे ठेवलीय हेच विसरून इकडे तिकडे हात मारायला सुरुवात केली. काहींनी डोकं वर करून आकाशाकडे पाहिलं.

आणि त्याच क्षणी मी फ्लेअर गन आकाशात डागली.

धाड!

एक लाल अग्निबाण सरळ काळ्या आकाशात झेपावला. दोन क्षण काळोख फाटला. मग संपूर्ण आसमंत रक्तासारख्या लाल प्रकाशात न्हाऊन निघाला. धुक्याच्या थरावर त्या प्रकाशाची लाल छाया पसरली. झाडांच्या बुंध्यांना लाल किनार आली.

तंबू, शेकोट्या, धावणाऱ्या सावल्या, उचलल्या जाणाऱ्या रायफल्स सगळं जणू त्या लाल उजेडात उघडं पडलं.

मी लाऊडहेलर हातात घेतला. पूर्ण ताकदीने ओरडलो, “शरण या! तुम्हाला चारी बाजूंनी फौजेने वेढलं आहे! शस्त्रं खाली टाका!”

माझा आवाज टेकड्यांवर आदळून परतला. “...वेढलं आहे!... शस्त्रं खाली टाका!...”

लाल रेषा - भाग १६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबा यांच्याशी सहमत...
एकदम भारी जमलेय ही कथा..
लेखकाला इतके मिलिटरी मधले बारकावे कसे माहीत? पूर्वी अशा सर्विसेस मधे होता का ?

धन्यवाद आबा, धनवन्ती!

<<लेखकाला इतके मिलिटरी मधले बारकावे कसे माहीत? पूर्वी अशा सर्विसेस मधे होता का ?>> नाही हो, लेखक तर एक साधा IT Manager आहे. तो रोजच्या पाच तासांच्या प्रवासात मोबाईलवर कथेचा प्राथमिक आराखडा तयार करतो आणि घरी गेल्यावर त्याला योग्य स्वरूप देतो. Happy

मिलिटरी आणि ऑपरेशन्समधील बारकावे समजून घेण्यासाठी Bastar: The Naxal Story, Tango Charlie असे चित्रपट, तसेच Rainbow Six आणि The Afghan यांसारख्या पुस्तकांची खूप मदत होते.

अमेझिंग ...मस्त वर्णन ...संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
कमाल लिहिताय तुम्ही .
तुमचे कौतुक म्हणजे वाट बघायला ना लावता पटपट भाग टाकत आहात . लवकर पुढचे भाग टाका उत्सुकता वाढलीय Happy

बापरे, वाचताना श्वास रोखला गेला.. खूपच जबरदस्त चालू आहे कथा..पुढचा भाग कधी येईल असं होतंय प्रत्येक भाग वाचला की..मस्त!

^^लेखक तर एक साधा IT Manager आहे. तो रोजच्या पाच तासांच्या प्रवासात मोबाईलवर कथेचा प्राथमिक आराखडा तयार करतो आणि घरी गेल्यावर त्याला योग्य स्वरूप देतो. Happy^^

एकदम भारी

लेखक तर एक साधा IT Manager आहे. तो रोजच्या पाच तासांच्या प्रवासात मोबाईलवर कथेचा प्राथमिक आराखडा तयार करतो आणि घरी गेल्यावर त्याला योग्य स्वरूप देतो. > ग्रेट