पूर्वभाग
रेश्माला वाचवून टीम कॅम्पमध्ये परतते, पण विजयाच्या आनंदाऐवजी वातावरणात भीती, थकवा आणि पुढच्या संकटाची चाहूल पसरलेली असते. चौकशीत रेश्मा सुरुवातीला गप्प राहते, पण हिडमे तिच्या जुन्या जखमा उघड करताच ती तुटते आणि नक्षलवाद्यांच्या क्रौर्याची कहाणी समोर येते. शेवटी ती सांगते की आंध्र-ओडिशातील मोठे कमांडर जंगलात जमले असून सकाळी येणाऱ्या ताफ्यावर मोठा हल्ला होणार आहे. ही माहिती ऐकताच अधिकारी तातडीने समजून घेतात की कॅम्पमध्येच कुणीतरी फितूर आहे. रात्रीच्या अंधारातच नकाशा उघडला जातो आणि ‘ऑपरेशन चक्रव्यूह’ची तयारी सुरू होते.
************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग १२ - ऑपरेशन चक्रव्यूह-२
विश्वास हीच आमची खरी ताकद होती. जंगलात गोळ्या, सापळे, अंधार हे सगळं परतवता येतं. पण आपल्या वर्तुळातला फितूर… तो सगळ्यात धोकादायक असतो कारण तो वेळ, ठिकाण आणि माहिती विकतो. गोळी झाडली तर एखादाच जीव जातो पण फितुरीमुळे कधी कधी सत्ता, सरकार आणि पूर्ण व्यवस्था नामशेष होऊ शकते.
मी टेबलावर दोन्ही हात टेकवले. पुढे झुकलो. “म्हणूनच,” मी आवाजातील जरब वाढवत म्हणालो, “आपण आता सरळ खेळ खेळणार नाही.”
सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. “आपण ‘डबल गेम’ खेळणार आहोत.”
मी थोडा थांबलो. “ही योजना… या खोलीबाहेर जाणार नाही. फक्त आपल्या पाच जणांत राहील.”
क्षणभर कोणीच काही बोललं नाही. त्या वाक्याचा अर्थ सगळ्यांना समजला होता.
आता आम्ही शत्रूला फसवणार होतो पण त्यासाठी आधी आपल्या माणसांनाच कसोटीवर लावणार होतो.
मी पेन्सिल उचलली आणि नकाशावर एका अरुंद रेषेवर टकटक केलं, “पहिली चाल - फितुरासाठी आमिष.”
“पाटील, आत्ताच्या आत्ता सगळ्या जवानांचे वायरलेस सेट आणि मोबाईल जमा करा. कारण विचारलं तर सांगा, सिग्नलमध्ये अडथळे येत आहेत, म्हणून तपासणी आणि अपडेट करायचं आहे.”
पाटीलने लगेच मान हलवली. मी मग सावंत आणि शिर्केकडे पाहिलं.
“तुम्ही दोघं मेसमध्ये जा. निवांतपणे बसा. आणि अशी बातमी पसरवा की उद्याचा मुख्य ताफा रद्द झाला आहे.”
दोघेही लक्ष देऊन ऐकत होते. मी पुढे म्हणालो, “आणि महत्त्वाचा साठा आज मध्यरात्री चिंचोलीच्या रस्त्याने गुपचूप हलवला जाणार आहे.”
पवार लगेच म्हणाला, “पण सर, चिंचोलीचा रस्ता तर खूप धोकादायक आहे. अरुंद, निसरडा… तिथून माल हलवणं कठीण जाईल.”
मी त्याच्याकडे पाहून हलकंसं हसलो.
“म्हणूनच ही बातमी खरी वाटेल.”
सगळे शांत झाले.
मी पुढे सांगितलं, “शत्रूला वाटेल की आपण मुख्य रस्ता टाळलाय आणि सुरक्षिततेसाठी दुर्गम मार्ग निवडलाय. जो आपल्यातला फितूर असेल, तो ही बातमी लगेच पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.”
“आणि मग?” पाटीलने विचारलं.
मी सरळ उत्तर दिलं. “मग आपण फितुर काय करतोय त्याची वाट पाहू.”
मी नकाशावर मुख्य रस्त्याची रेघ पुन्हा एकदा दाखवली आणि सगळ्यांकडे पाहत म्हणालो, “उद्या सकाळी मुख्यालयातून जो ताफा निघेल… तो खरा ताफा नसेल.”
क्षणभर सगळे गोंधळले. पाटीलच्या कपाळावर आठ्या दिसल्या, पवार थोडा पुढे झुकला.
मी शांतपणे पुढे बोललो, “मी आधीच कोडेड सिग्नलने मुख्यालयाला सूचना पाठवल्या आहेत. पहिल्या ट्रकच्या ताडपत्रीखाली जवान बसलेले नसतील. तिथे असतील वाळूची पोती… आणि स्मोक ग्रेनेड्स.”
खोलीत काही क्षण शांतता पसरली. सावंतच्या चेहऱ्यावर हलकंसं आश्चर्य उमटलं. शिर्केने नकळत मान हलवली.
“म्हणजे…” पाटील हळू आवाजात म्हणाला, “आपण त्यांना रिकाम्या ताफ्यावर हल्ला करायला भाग पाडणार”
मी नकाशावर पुढचं वळण दाखवलं.
“त्यांना वाटेल आपली माहिती खरी होती. त्यांना खात्री वाटेल की त्यांनी पुन्हा आपल्याला गाठलं आहे. ते हल्ला करतील. कदाचित IED, कदाचित अॅम्बुश, कदाचित थेट गोळीबार.”
मी थोडा थांबलो. “पण या वेळी त्यांना जवानांचं रक्त मिळणार नाही.”
“ताडपत्री फाटेल… आणि बाहेर पडतील वाळूची पोती.” मी शांत आवाजात म्हणालो.
पवारच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकं स्मित आलं.
मी पुढे म्हणालो, “आणि ज्या क्षणी त्यांना कळेल की ते फसलेत… त्याच क्षणी स्मोक ग्रेनेड्स उडतील. रस्ता धुराने भरून जाईल. त्यांची ठरलेली योजना विस्कटेल.”
पाटीलने लगेच विचारलं, “आणि आपण?”
मी त्याच्याकडे पाहिलं. “आपण दिसणार नाही… पण आधीच तिथे असू.”
मी नकाशाच्या दोन्ही बाजूंना दोन बोटं ठेवली. “उंच टेकड्यांवर, झाडाझुडपांच्या आडोशात, त्यांच्या नजरेआड आपण आधीच आपापल्या जागा घेऊन बसणार आहोत.”
आता सगळ्यांना डाव समजू लागला होता. “आजवर ते आपल्या माहितीवर हल्ला करत होते… उद्या आपण त्यांच्या आत्मविश्वासावर हल्ला करणार आहोत.”
मी नकाशावर मुख्य रस्त्यापासून दूर जाणारी एक फिकी, जुनी रेघ दाखवली. बहुतेकांच्या नजरेतून सुटणारी ती वाट वर्षानुवर्षं वापरात नव्हती. पावसात चिखलाने भरून जाणारी, काट्याकुट्यात हरवलेली, आणि म्हणूनच सुरक्षित.
“खरी साधनसामग्री,” मी शांतपणे म्हणालो, “आणि आपले जवान… या रस्त्याने येतील.” सगळ्यांच्या नजरा नकाशावर खिळल्या.
"त्यांना सही सलामत घेऊन यायची जबाबदारी तुमची" मी पवारकडे बघत म्हणालो.
“इथून?” पवारने विचारलं.
“हो,” मी म्हणालो. “पाच किलोमीटर लांब असलेल्या जुन्या फॉरेस्ट ट्रॅकने. तो मार्ग कठीण आहे, पण दिसत नाही. आणि आज आपल्याला वेगापेक्षा अदृश्य राहणं महत्त्वाचं आहे.”
मी सावंतकडे वळलो. “सावंत, तुमची टीम पुलाच्या अलीकडच्या झाडीत दबा धरून बसेल. कोणतीही हालचाल नाही. कोणताही आवाज नाही. ते पूर्णपणे उघड्यावर येईपर्यंत थांबायचं.”
सावंतने मान हलवली. त्याच्या डोळ्यांत आता स्पष्ट तयारी दिसत होती.
मी पुढे सांगितलं, “जेव्हा नक्षली त्या डमी ताफ्यावर तुटून पडण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा त्यांचं लक्ष समोर असेल. त्यांना वाटेल त्यांनी पुन्हा आपल्याला गाठलं.”
मी पेन्सिलने नकाशावर मागची बाजू दाखवली. “आणि नेमक्या त्याच क्षणी आपण त्यांच्या पाठीमागून वेढा टाकू.”
पाटीलने हलक्या आवाजात विचारलं, “म्हणजे दोन्ही बाजूंनी कात्री?”
“अगदी तसंच,” मी उत्तर दिलं. “समोर आमिष. मागून वेढा. पळायचा रस्ता नाही, सावरायची उसंत नाही.”
खोलीतला ताण आता वेगळा झाला होता. संशयाचं ओझं अजून होतं, पण त्याजागी दिशा आली होती.
शिर्केने विचारलं, “सर… जर ते उघड्यावर आलेच नाहीत तर?”
मी त्याच्याकडे पाहिलं. “मग आपल्याला दोन गोष्टी कळतील एकतर त्यांना खबर मिळाली नाही… किंवा त्यांच्यातला कमांडर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त हुशार आहे.”
क्षणभर शांतता पसरली. मी सगळ्यांकडे पाहिलं. “आता नकाशावरची वेळ संपली.”
मी पेन्सिल खाली ठेवली. “आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आहे.”
************************************************************************************************************************
रात्रीचे पावणेदोन वाजत आले होते. कॅम्पवर एक विचित्र, दडपलेली शांतता उतरली होती.
मी आणि हिडमे वॉच टॉवरच्या सावलीत उभे होतो. अंधार इतका दाट होता की काही पावलं पुढचंही स्पष्ट दिसत नव्हतं. बारीक पाऊस सतत पडत होता. थेंब कपाळावरून ओघळत होते, पण त्याची जाणीवही होत नव्हती. आमचं पूर्ण लक्ष कॅम्पच्या मागच्या कुंपणावर खिळलं होतं. हिडमेचा श्वास मंद पण वेगवान होता. त्याला या क्षणाचं महत्व समजत होतं. मलाही.
वेळ जणू पुढे सरकत नव्हती.
मग मेसच्या मागच्या बाजूला एक हलकी हालचाल झाली.मी हाताने हिडमेला स्थिर राहण्याचा इशारा केला.
अंधारातून एक आकृती बाहेर आली. ती सावकाश चालत होती. पावलं इतकी जपून टाकत होती की आवाजच होत नव्हता. तो माणूस थांबत, ऐकत, मागे वळून पाहत पुढे येत होता. जणू ही हालचाल त्याने आधीही अनेकदा केली होती.
तो कुंपणाजवळ पोहोचला. काही क्षण थांबला. मग खिशातून एक छोटासा टॉर्च बाहेर काढला. त्याने जंगलाच्या दिशेने प्रकाश टाकला. एकदा. क्षणभर थांबला. दुसऱ्यांदा. पुन्हा थांबला. आणि तिसऱ्यांदा.
हा सिग्नल होता. फितुरीचा. म्हणजे माहिती बाहेर पोहोचली होती. आमचं आमिष गळाला लागलं होतं.
मी जोरात ओरडलो, “पाटील, आता!”
क्षणात कॅम्पच्या चारही बाजूंनी प्रखर हॅलोजन दिवे एकदम पेटले. सगळा परिसर लख्ख उजळून निघाला. काही क्षणांपूर्वी सावलीत लपलेला प्रत्येक कोपरा उघडा पडला.
ती आकृती जागच्या जागी थबकली. त्याने डोळे झाकले. उजेडाचा अंदाजच नव्हता त्याला.
मागे वळून पळायचा प्रयत्न करण्याआधीच सावंत डावीकडून झेपावला. त्याच वेळी शिर्के उजवीकडून धावत आला. दोघांनी त्याला कुंपणाजवळच दाबून धरलं.
तो झटापट करू लागला. “सोडा! सोडा मला!” तो हिसडत ओरडला.
पण पकड घट्ट होती. पाटीलही धावत तिथे पोहोचला. दोन जवानांनी त्याचे हात मागे वाकवले.
मी पुढे चालत गेलो. पावसाचे थेंब अजून पडत होते. उजेडात त्याचा चेहरा वर ओढला गेला.
आणि त्या चेहऱ्याकडे पाहताच, माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो कुठलातरी नवखा जवान नव्हता. तो असा माणूस होता, ज्याच्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता.
तो शिपाई विनायक होता. गेल्या पाच वर्षांपासून कॅम्पमध्ये राहिलेला. रात्रीच्या गस्तीत सोबत चाललेला. गोळीबारात पाठीशी उभा राहिलेला. अनेक वेळा जीव धोक्यात घालून काम केलेला.
कॅम्पमध्ये तो सावलीसारखा असायचा. शांत, वक्तशीर, विश्वासू.
आणि म्हणूनच त्याचा चेहरा उजेडात दिसताच, त्या क्षणी धक्का अधिक खोलवर बसला.
“विनायक…?” पाटीलच्या आवाजात अविश्वास होता. क्षणात तो संतापात बदलला.
तो पुढे झेपावला आणि विनायकचा कॉलर पकडून त्याला कुंपणावर दाबलं. “का रे? का केलंस हे?” पाटील गुरगुरला.
“बोल,” मी म्हणालो. “कोणाला सिग्नल दिलास?”
तो माझ्याकडे पाहत राहिला. डोळ्यांत हट्ट होता. “कुणालाच नाही,” तो म्हणाला. “मी फक्त धूम्रपानाला आलो होतो.”
पाटीलचा राग उसळला. त्याने पुन्हा त्याला हिसडलं. “मग टॉर्चने तीनदा जंगलात काय दाखवत होतास?”
विनायक गप्प. मी पाटीलला बाजूला केलं. रागाने माहिती मिळत नाही विशेषतः ज्याने आधीच विश्वास विकला आहे, त्याच्याकडून.
मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिलो. “पहिल्यांदा कधी संपर्क झाला?”
तो काही बोलला नाही. मी हिडमेकडे पाहिलं. तो सावलीत उभा होता. त्याने विनायककडे एकटक पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, “हा माणूस मी पाहिलाय बाजारात. दोनदा. एकटा नव्हता.”
विनायकच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
“कुठे?” मी विचारलं.
हिडमे म्हणाला, “धानोराच्या बाजूला. साध्या कपड्यांत.”
विनायकची मान हळूहळू खाली झुकली. चेहऱ्यावरचा उरलेला आव आणखी काही क्षण टिकला, पण डोळ्यांतील घाबरलेपणा सगळं उघड करत होता. आता त्याला समजलं होतं की खोट्याचा आधार जास्त वेळ टिकणार नाही.
मी पुन्हा विचारलं, “सुरुवात कधी केली?”
काही क्षणांनी तो पुटपुटला, “दोन वर्षांपूर्वी.”
पाटील अवाक् झाला. “दोन वर्षं?”
विनायक हसला. ते हसू थकल्यासारखं होतं. “पहिल्यांदा फक्त पैशासाठी नाही केलं,” तो म्हणाला. “मुलगा आजारी होता. शहरात ऑपरेशन करायचं होतं. कर्ज कोणी दिलं नाही. त्यांनी दिलं.”
तो थांबला.
“मग?” मी विचारलं.
“मग फोटो काढले. भेटीचे. पैशाचे. म्हणाले आता काम कर. नाहीतर सगळ्यांना सांगू, किंवा घरच्यांना उचलू.”
खोलीत शांतता पसरली. फितुरीचा जन्म लोभातून झाला होता की भीतीतून आता त्याला अर्थ उरला नव्हता.
“आजचा सिग्नल?” मी थेट विचारलं.
तो म्हणाला, “तुम्ही पसरवलेली बातमी खरी आहे का, ते कन्फर्म करायला.”
मी आणि पाटील आम्ही एकमेकांकडे पाहिलं. म्हणजे आमिष कामाला लागलं होतं.
त्याने तुटक शब्दांत बोलायला सुरुवात केली. “साहेब… तुम्ही ज्या पुलाचा विचार करताय…तिथे फक्त स्फोटकं नाहीत.”
मी एक पाऊल मागे झालो. “मग?”
“पुलाजवळ खालच्या बाजूला अशी घातक जागा तयार केली आहे की जिथे आत शिरणारा माणूस चारही बाजूंनी गोळीबाराच्या आणि स्फोटांच्या टप्प्यात अडकून सुटण्याची कोणतीही संधी उरणार नाही. रस्त्यावर IED आहेत. बाजूच्या झाडीत दोन LMG पोझिशन्स. मागे हटायला लागलात तर पश्चिमेकडच्या उतारावर sniper pair.” विनायक पुढे म्हणाला, “आणि पुलाच्या वरच्या टेकडीवर, पूर्वेकडच्या रांगेत, तिथून नक्षल कमांडर आझाद सगळं नियंत्रित करणार आहे कारण तिथून सगळं दिसतं.
माझ्या मनात नकाशा विजेसारखा चमकला.
मी त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं, “आम्ही त्यांच्यावर उलट सापळा रचणार आहोत, याची चाहूल त्यांना कशी लागली?”
तो म्हणाला, “त्यांना संशय आला.”
“कसा?”
"कारण ताफ्याची नेहमीची हालचाल कुठेच दिसत नव्हती. तुमच्या कॅम्पमध्येही अपेक्षेइतकी धावपळ नव्हती. रात्रीची शांततासुद्धा काहीशी वेगळी, जाणीवपूर्वक राखलेली वाटत होती. तेव्हा त्यांना संशय आला की तुम्हीही काहीतरी डाव आखत आहात.”
म्हणजे समोरचा शत्रू काही बावळट नव्हता. तो प्रत्येक हालचाल निरखून पाहत होता, प्रत्येक चूक लक्षात ठेवत होता, अनुभवातून शिकत होता आणि परिस्थितीनुसार आपला डाव क्षणाक्षणाला बदलत होता.
मी घड्याळाकडे नजर टाकली. रात्रीचे दोन वाजून सात मिनिटं झाली होती. मुख्यालयातून निघणारा बनावट ताफा जास्तीत जास्त साडेतीनपर्यंत मार्गस्थ होऊ शकत होता. पुलाजवळ पोहोचायला अजून थोडा अवधी होता, पण निर्णय घेण्यासाठी हातात फारसा वेळ उरला नव्हता.
“खरा ताफा?” पाटीलने विचारलं.
“फॉरेस्ट ट्रॅकवर असेल,” मी म्हणालो. “आता लगेच route change पाठवावा लागेल.”
मी वायरलेस उचलला. कोडमध्ये संदेश दिला. मुख्य ताफा थांबवणे. जुना मार्ग रद्द. दुसरी योजना सुरू.
विनायकला दोन जवानांनी उचलून आत नेलं. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता. फक्त हरलेला माणूस दिसत होता.
पाटील काही क्षण गप्प राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, “आपण याच्यावर विश्वास ठेवला होता.”
मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. तेच सर्वात मोठं आणि कटू सत्य होतं. जंगलात गोळी लागली, तर जखम शरीरावर उमटते; पण विश्वासघाताची जखम कुठेच दिसत नाही ती थेट माणसाच्या मनात खोलवर रुजत जाते.
मी टेबलावर ठेवलेली रायफल उचलली. “सगळ्यांना उठवा,” मी म्हणालो. “पाच मिनिटांत निघायचंय .”
************************************************************************************************************************
पहाटेचे चार वाजत आले होते. रात्र अजून पूर्ण ओसरली नव्हती, पण आकाशाच्या कडेवर फिकट राखाडी उजेड हलकेच चढू लागला होता. जंगलावर दाट धुक्याची चादर पसरली होती. झाडांचे आकार धूसर दिसत होते, आणि रस्ता काही ठिकाणी तर पूर्णपणे अदृश्य झाला होता.
हवा थंडगार होती. माती ओलसर होती. प्रत्येक पानावर पावसाचे थेंब अडकून बसले होते.
मी टेकडीच्या वरच्या कडेला पोटाशी रायफल घेऊन पडून होतो. माझ्या डावीकडे शिर्के स्नायपर दुर्बिणीतून रस्ता पाहत होता. उजवीकडे पवारची टीम LMG सह तयार होती. खाली उताराच्या बाजूला सावंतची टीम मागचा मार्ग बंद करण्यासाठी पसरली होती. पाटील माझ्या जवळ बसला होता, वायरलेस हातात घट्ट पकडून.
आम्ही सगळे थांबलो होतो. फक्त योग्य क्षणासाठी.
दूरवरून मंद घरघर आवाज ऐकू आला.
धुक्यातून दोन पिवळे दिवे हळूहळू पुढे येताना दिसले. डमी ताफा नियोजनाप्रमाणे रस्त्यावर आला होता. बाहेरून तो अगदी खरा वाटत होता. मळलेली ताडपत्री, गार्ड बसल्यासारख्या छाया, नियमित गती.
मी दुर्बिणीतून रस्त्याच्या दोन्ही बाजू तपासत होतो. मग झुडपांच्या आत हलकी हालचाल दिसली. एका खडकामागे मान खाली गेलेली सावली. उजव्या बाजूच्या नाल्यात चमकलेली बंदुकीची नळी. ते जागेवर होते.
पुलापासून साधारण शंभर मीटर अंतरावर येताच, ठरल्याप्रमाणे चालकाने योग्य क्षण साधला, चालत्या वाहनातून झेप घेतली आणि रस्त्याच्या डाव्या बाजूच्या खोल खंदकात जाऊन लपला.
ट्रक कमी वेगाने पुढे घसरत गेला आणि पुलाजवळ पोहोचला. एक सेकंद. दोन. आणि मग, धडाऽऽऽम!
पुलाखालून जबरदस्त स्फोट झाला. पुढचा भाग हवेत उचलला गेला. ट्रकचा पुढचा axle मोडून तो बाजूला वळला. लाकूड, माती, दगड आणि धुराचा प्रचंड ढग हवेत उडाला. संपूर्ण दरी हादरली.
पण ट्रक पूर्ण उद्ध्वस्त झाला नव्हता. नेमकं तसंच आम्ही गृहीत धरलं होतं. पुढचा भाग फाटला होता, पण मागचं reinforced compartment जागेवर होतं.
स्फोट होताच झाडीतून काही शिट्ट्या ऐकू आल्या. कोड सिग्नल. मग नक्षली गट बाहेर पडू लागले. पण सगळे एकदम धावत नव्हते. आधी दोन जण कव्हर घेत पुढे सरकले. त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बारकाईने नजर फिरवली, धुराची दिशा पाहिली आणि अजून कुठूनही हालचाल दिसत नाही, याची खात्री करून घेतली.
मागून तीन-चार जण पुढे सरकले. त्यांना वाटलं यावेळीही काम झालं. त्यांनी ट्रकभोवती वर्तुळ करायला सुरुवात केली. त्याच क्षणी मी पाटीलकडे पाहिलं. तो तयार होता.
मी कुजबुजलो, “आता.”
पाटीलने ड्राइव्हरला वायरलेसवर हळू आवाजात सिग्नल दिला. ड्रायव्हरने रिमोट ट्रिगर दाबला. ट्रकच्या मागच्या compartment मधून सलग स्मोक कॅनिस्टर्स बाहेर फुटले.
फट्! फट्! फट्!
दाट पांढरा धूर क्षणार्धात चारही बाजूंना पसरला. समोर आलेले नक्षली दोन पावलं मागे सरकले. त्याच वेळी compartment च्या दोन्ही बाजूंच्या steel slits उघडल्या.
आत लपवून बसवलेल्या दोन नियंत्रित LMG mounts मधून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला.
टकटकटकटक!
पहिल्या रेषेतले दोघे जागच्या जागी कोसळले. उरलेले खाली झेपावले, झाडीत पळाले, काहींनी प्रत्युत्तरादाखल गोळ्या झाडायला सुरुवात केली.
तोच क्षण आमचा होता. “फायर!” माझा आदेश वायरलेसवर गेला.
शिर्केने पहिली गोळी झाडली. उजव्या बाजूला हातवारे करत माणसं हलवत असलेला एक कमांडरवजा व्यक्ती छातीत गोळी लागून मागे कोसळला.
पवारच्या LMG ने उजव्या उतारावर दाबून ठेवणारा मारा सुरू केला.
सावंतची टीम खालील नाल्याच्या वाटेवर उतरली आणि त्यांचा मागचा मार्ग बंद केला. सावंतकडे मर्यादित जवान होते फक्त तीन-चार माणसं. त्या प्रचंड, घनदाट परिसरात प्रत्येक इंचावर माणूस उभा करणं अशक्य होतं. दोन माणसं नाल्याकडच्या उतारावर, एक दगडी कड्याजवळ, आणि स्वतः सावंत मधल्या झाडीत तैनात होता. वरवर रिंग तयार झाली होती, पण त्या रिंगमध्ये एक बारीक फट राहिली होती जिथे झुडपं इतकी दाट होती की हालचाल दिसत नव्हती.
आता ते खऱ्या अर्थाने सापळ्यात अडकले होते. समोर दाट धूर पसरला होता आणि रस्त्यात आडवा झालेला ट्रक त्यांचा मार्ग रोखून उभा होता. वरच्या टेकड्यांवरून आमचा अचूक मारा सुरू होता, तर मागच्या बाजूचे मार्ग आधीच बंद झाले होते.
झाडीतून त्यांच्या बाजूनेही गोळीबार सुरू झाला, पण तो संघटित नव्हता. कुणी कुठून गोळ्या झाडत होतं, तर कुणी आडोशासाठी धावत होतं. आदेश देणारा कुणीतरी सतत ओरडत होता, पण गोंधळात त्याचा आवाजही हरवत होता.
तेवढ्यात माझी नजर डाव्या टेकडीकडे गेली. धुक्याच्या पडद्याआड एक सावली हलल्यासारखी दिसली.
मी दुर्बीण डोळ्यांशी लावली. क्षणभर दृश्य स्पष्ट झालं. उंच बांधा. अंगावर लांब झगा. खांद्याला रेडिओ सेट. दोन्ही बाजूंना दोन सशस्त्र अंगरक्षक.
तो साधा लढवय्या नव्हता, ना frontline fighter. तो मागून संपूर्ण डाव नियंत्रित करत उभा होता.
“आझाद,” मी पुटपुटलो.
तो लगेच मागच्या उताराकडे सरकू लागला.
“शिर्के, डावी ridge!”
गोळी सुटली, त्यांच्या खांद्याला लागली तो खाली कोसळला पण परत उठून चपळाईने उडी मारून नाल्याच्या उताराकडील बाजूच्या दाट झाडीत घुसला.
तो परत बचावला होता. "काय नशीब आहे याचं" मी मनात चडफडलो.
आझाद पुन्हा एकदा निसटल्याचा मला खूप संताप आला होता पण आता त्याला माघार घ्यावी लागत होती. युद्धाचा तोल बदलला होता. पहाटेच्या धुक्यात, त्यांच्या आत्मविश्वासावर आम्ही हल्ला केला होता आणि नुसता हल्ला नाही तर जवळ जवळ आझादचा खात्मा झाला होता.
आणि त्या जंगलात पहिल्यांदाच शिकारी शिकार झाला होता.
बापरे....
बापरे....
सहीच ....
सहीच ....
सॉलिड आहे हा भागही!!
सॉलिड आहे हा भागही!!
धन्यवाद धनवन्ती, अश्विनी११,
धन्यवाद धनवन्ती, अश्विनी११, साधना!
खुप थरारक!
खुप थरारक!
खुप थरारक!
खुप थरारक!
खुप थरारक! मस्त
खुप थरारक! मस्त
धन्यवाद आबा, सामी!.
धन्यवाद आबा, सामी!.
फारच थरारक आणि बारकाव्यानिशी
फारच थरारक आणि बारकाव्यानिशी लिहिलेली दीर्घ कथा.
आज सलग वाचली. सुरुवातीला काही भागात शांतता आणि अंधाराबद्दल तीच तीच वाक्ये आहेत असं वाटायला लागलं होतं. पण नंतर कथेने खूपच पकड घेतली.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
तुमच्या प्रामाणिक
तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सावली!