धर्म
अनिता आणी आई चहाचे कप घेऊन बसल्या होत्या. आई आत्ताच झोपेतून उठली होती, त्यामुळे आज दुपारच्या चहाला पार संध्याकाळ झाली होती. आईची पेन किलरची गुंगी आता ओसरत होती.
“दुखंतय अजून?” आईने डाव्या हातातला कप पुढ्यातल्या स्टूलावर ठेवला, तसं अनिताने विचारलं.
“थोडं थोडं.. आता दुखणारच काही दिवस.. उगाच आपलं नसतं दुखणं होऊन बसलं..” आईच्या चेहऱ्यावर अजून थोडी वेदना दिसत होती.
“तरी बरं नं .. थोडक्यात निभावलं.. हात बित फ्रॅक्चर नाही झाला... थोडी सूज आहे फक्त.. दोन दिवसांनी हे क्रेप बॅंडेज पण काढता येईल म्हणाले डॉक्टर.. पण नंतरही थोडा आरामच दे हाताला. आणी उगाच धडपडू नकोस कुठे.. तू जरा शांतीने घेत जा नं आई... ”
सकाळी आई घरातच पाय घसरून पडली होती, वरच्या फळीवरचा डब्बा काढतांना. हाताच्या भारावर पडल्यामुळे उजव्या हाताला सूज आली होती. अनिता घरीच होती म्हणून बरं. लगेच दोघी डॉक्टरांकडे गेल्या. नशिबाने फार काही लागलं नव्हतं, पण तिचा हात सुजला होता आणि दुखतही होता.
“उद्या नेमकी नागपंचमी आहे.. नेवेद्याचं सगळं करायला हवंय.. आणी मी अशी हात धरून बसलेय..” आई काळजीने म्हणाली.
“मी करीन की.. त्यात काय..? सगळं सोप्पं तर असतं....” अनिता म्हणाली.
“हो. ते आहेच म्हणा.. पण पूरणा-वरणाचा स्वयंपाक आहे.. बाबांचा आणि माझा उद्या गुरवारचा उपास आहे.., आम्ही संध्याकाळी जेवू .. पण नेवेद्य सकाळीच कर तू. तू आणि मंगेशच आहात सकाळी जेवायला..”
इतक्यात बाहेर दारासमोर, रिक्शा थांबल्याचा आवाज आला, म्हणून अनिताने डोकावून बघितलं. तर लिसा रिक्षेतून उतरत होती. “अय्या! लिसा आली..” अनिता पळतच अंगणात गेली.
अनिता आणी लिसा कॉलेज मधल्या जिवाभावाच्या मैत्रिणी. दोघींचंही नुकतंच ग्रॅजुएशन झालं होतं आणि आता ‘पुढे काय..’ च्या मोड मध्ये होत्या दोघीही.
इथे कॉलेजला असतांना लिसा हॉस्टेलला रहायची. बरेचदा ती रविवारी तिच्या गावी जायची. पण जेव्हा गावी जाणार नसेल तेव्हा कधीमधी एखाद्या रविवारी ती अनिता कडे यायची दिवसभराकरता. त्यामुळे अनिताच्या घरच्या संगळ्यांशीच तिची छान ओळख होती.
“काय काकू..? कशा आहात..? आणी हे काय..? हाताला काय झालं..?” लिसाने आल्या आल्या प्रश्नांचा भडिमार सुरू केला.
“सांगते.. सांगते.. पण तू कशी आज अचानक..? अनिता काही बोलली नाही, तू येणार असल्याचं..”
“अचानकच ठरलं माझं. यूनीवरसिटीतून मायग्रेशन सर्टिफिकेट घ्यायचं होतं. मग दुपारी आले ती डायरेक्ट तिकडेच गेले.. काम होता होता संध्याकाळ व्हायला आली. मग म्हंटलं, आता स्टँड वर गेले तर बस मिळायला किती वेळ लागतो माहीत नाही.. म्हणून मग इकडेच आले.. आता उद्या सकाळी जाईन परत.” लिसाने सांगितलं.
“बरं केलसं. रात्रीचा प्रवास कशाला.., मैत्रिणीचं घर असतांना? बरं झालं, अनिताला कंपनी मिळाली आज. आता उद्या जेवून वगैरे आरामात निघ. उद्या नागपंचमी आहे बरं का.. सणाचा दिवस.. आमच्याकडे पोळ्या चालत नाहीत बरं का उद्या.. पोळ्या भाजणं.. काही चिरणं-कापण पण नसतं चालत नागपंचमीला.. ” आई म्हणाली.
“अरे व्वा! मज्जाच की.. काहीतरी वेगळं मिळणार खायला.. अने.., करायला लागलीस ना आता स्वयंपाक..?” लिसाने हसत अनिताला विचारलं
“तू आहेस की.., मला नाही जमलं तर..” अनिता तिच्या पाठीवर बुक्का देत म्हणाली.
खूप दिवसांनी भेटल्यामुळे अनिता लिसाचा चिवचिवाट सुरू झाला. त्यांच्या गप्पांच्या नादात आईही आपलं दुखणं विसरली. मुलींना बोलायला तर विषयांची कमी कधीच पडत नाही. त्यात आता बरेच दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणी.. ’तू काय करणार.. मी काय करणार... अमकीच्या लग्नाचं चालू आहे.. आणि तमुकला नोकरी लागली पण..’ असं काहीतरी अखंड चालूच होतं त्यांच.
त्याच बोलण्याच्या नादात अनिताने साधासा कढी-खिचडीचा बेत केला. लिसा होतीच तिच्या अवती भोवती.. लसूण सोल.. कांदा काप करायला.. संध्याकाळी मंगेश आला बाहेरून.. बाबा आले ऑफिसमधून.. त्यांनाही बरं वाटलं, लिसाला बघून. सर्वांची एकत्र जेवणं होऊन दोघी झोपायला गेल्या तरी रात्री बराच वेळ त्यांची खुसपुस चालूच होती.
सकाळी अनिता जरा लवकरच उठली. कुठे जायचं नसलं, अन् स्वयंपाकाची तशी घाई नसली, तरी आता काही दिवस आईचं आवरायला तिला मदत करायला लागणार होती.. शिवाय नागपंचमीची आई करते तशी, देवपूजा.. मग स्वयंपाक.. आईला एरवी स्वयंपाकात मदत करणं वेगळं.. आणि आज पूर्ण स्वयंपाक स्वत: करणं वेगळं.. शिवाय तोही रोजचा नाही तर सणाचा.
आंघोळ करून अनिता कामाला लागली. लिसा पण आंघोळ करून आलीच मदतीला. पण तिची मदत जेमतेमच होणार होती. कारण काय करायचं, तिला माहीत नाही, शिवाय चिरणं कापण नाही.. तरी लिसा जवळपासच घोटाळत होती.. जरा पूरण घाटायला मदत कर वगैरे..
अनिताने सकाळीच कणिक अगदी घट्ट भिजवून ठेवली होती, आईने सांगितली तशी. आज पुरणाची दिंड करायची होती. एकीकडे गप्पा चालूच होत्या. दिंड भरून ती वाफवायला ठेवल्यावर अनिताने शिरा करायला घेतला.
“अय्या! अना.. तू गॅस वर कढई ठेवलीस.. काकूंना विचारलं का..? आज भाजणं नाही म्हंटल्या होत्या त्या..” लिसाने काळजीने अनिताला विचारलं.
“माहिती आहे गं राणी.. बरोबर आहे तुझं .. भाजणं नाही चालत.. पण त्याला एवढा शिरा अपवाद आहे..”
“म्हणजे.. ते कसं काय..”
“अगं आमची एक काकी होती नं.. तिनं नवस बोलला होता, माझ्या चुलत भावाकरता.. नागोंबाला दर नागपंचमीला कढईचा नैवेद्य दाखविन म्हणून.. आता काकी नाहीत.. म्हणून मग त्यांचे देव आमच्याकडे आले. मग आता आई तो नवस फेडते.. शिरा झाला की अख्ख्या कढईचाच नेवेद्य दाखवायचा असतो देवाला.. ” अनिताने स्पष्टीकरण दिलं.
स्वयंपाक होता होता जेवणाची वेळ होतंच आली होती. मंगेशही आज जेमतेम दोन तास कॉलेजला जाऊन आला होता.
“गरम आहे तोवर जेवून घ्या तुम्ही. म्हणजे लिसाला फार उशीर नको व्हायला. बस पकडायची आहे तिला...” आई म्हणाली.
अनिता, मंगेश आणी लिसा तिघंही जेवायला बसले. आईला अनिताने कॉफी करून दिली होती. तीही मग तिथेच बसली. अनिताने नेवेद्याचं ताट मंगेशला दिलं. बाबा घरी असते, तर त्यांना दिलं असतं. सहजपणे पडलेली पद्धत होती ती. पहिलं वाढणं घरातल्या पुरुषाला द्यायचं.
वरण भात, गरम गरम दिंड पानात पडली. त्यावर साजूक तुपाची धार आली. शिरा वाढतांना मात्र लिसाने पानावर आडवा हात धरला.
“का गं..? पाहिल्यालाच नको म्हणतेयस?” अनिताने विचारलं.
“प्रसादाचा आहे नं तो? मी प्रसाद खात नाही.. आमच्या धर्मात चालत नाही प्रसाद..” लिसा उत्तरली.
अनिता आश्चर्याने एकदम थबकली. हे ‘आमचं तुमचं कधी सुरू झालं..?’ मंगेशचा घासही त्याच्या हातातच राहिला. वातावरणात एकदम अवघडलेपण आलं. ‘लिसाला प्रसाद चालत नाही..’ असा कुणी कधी विचारच केला नव्हता.., इतकी वर्ष बरोबर राहून..
“अगं.. दिंडा वर अजून तूप वाढ तिला..” आईने विषय बदलला.
तिघंही निमूटपणे जेवायला लागले, तरी काहीतरी खुपलेलं जाणवतच होतं.
जेवणं झाल्यावर लिसा पण आवरा आवरीला मदत करायला लागली, तशी आई तिला म्हणाली,
“तू तुझी तयारी कर आता.. हे राहू देत. अनिता करेल. मंगेश रिक्शा आणून देईल. अंधार पडायच्या आधी घरी पोहोचलेली बरी..”
मंगेशने रिक्शा आणली. सर्वांचा निरोप घेऊन लिसा रिक्षेत बसली.
“ह्या तुझ्या मैत्रिणीला आपलं घर बरं चालतं रहायला..?” इतका वेळ दाबून ठेवलेला मंगेशचा राग उफाळून आलाच बाहेर.
अनिताला आधीच कानकोंड्या सारखं वाटत होतं. लिसा तिच्यामुळे तर ह्या घरात येत होती नं..!
“जाऊन देत नं मंगेश.. तिचं तिच्यापाशी..” आई शांतपणे म्हणाली.
“जाऊ दे काय आई..? आपल्या नेवेद्याच्या स्वयंपाकात तिची लुडबूड चालली नं आपल्याला? आपण तिला म्हटलं का.., बाई गं.. जरा लांब.. आमच्या बाप्पाचा नेवेद्य आहे.. तुझ्या हातचं नाही चालणार त्याला.. आपल्या तर डोक्यातही असं काही आलं नव्हतं.. तिने जाणवून दिलं, तेव्हा लक्षात आलं, तिचा धर्म वेगळा आहे.. असा कसा ती आपल्या प्रसाद नाकारू शकते? हा आपल्या देवाचा.., धर्माचा अपमान नाही?” मंगेश चिडलेलाच होता.
“मंगेश, कुणी काय करावं, आणी करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. तिला वाटत असेल.. आपला प्रसाद घेतल्यामुळे तिच्या धर्मात बाधा येते.. तिचा समज तिच्या जवळ. कदाचित तिचा अभ्यास कमी पडत असेल.. अन् चार लोकं बोलतात तशी ती वागत असेल.. आपल्याला काय माहीत..? आणी आपला देव धर्म इतका लहान आहे का रे, कुणी प्रसाद घेतला नाही म्हणून मानापमान वाटून घ्यायला?
“आणी ही अनिता बघ.. कित्येक रविवारी चर्च मध्ये गेलीय.. तेव्हा तिने नाही म्हटलं, आमच्या धर्मात नाही चालत असं..”
“मी जायचे ते तिला सोबत हवी असायची म्हणून. हॉस्टेल एका टोकाला अन् चर्च दुसऱ्या टोकाला.. एक दोन वेळेला मी आत पण बसले.., ऐकलं सगळं.. पण नंतर मला आत बसण्यापेक्षा बाहेर लॉन वर वाचत बसायला आवडायला लागलं.. खूप छान शांत असतं तिथे.. ”
“पण तिथे जायचीस हे तर खरंय नं..?” अनिताला मध्येच तोडत मंगेश म्हणाला.
“अरे.. ती जायची, ते मैत्रिणीला सोबत म्हणून.. आणी आत बसायचा तिला कंटाळा यायला लागला म्हणून ती बाहेर बसायला लागली.. पण जे काय ठरवलं, ते तिने स्वत: बघून.. ऐकून.. अनुभवून ठरवलं. ‘आमच्यात असं चालत नाही..’, असं म्हणून नाही. असा स्वत:च्या अनुभावावर आधारित निर्णय घेणं चांगलं नं..? आणी वेगळा अनुभव घेऊन ती समृद्ध झाली हा फायदाच की..”
“पण तुला पटलं, लिसा आज अशी वागली ते..?”
“अरे.. ते जाऊ दे ना.. तू अजून लहान आहेस.. गरम डोक्याचा आहेस.. म्हणून तुला राग आला.. वाईट वाटलं. पण कुठलाच धर्म दुसऱ्या धर्माचा अनादर करा, असं नाही सांगत.. आपण माणसंच आपला आपला अर्थ लावत असतो.. म्हणूनच म्हटलं नं .. तिचं वागणं तिच्या जवळ.. आपल्याला नाही आवडलं नं.. मग निदान आपल्याकडून तरी कधी कुणी असं दुखवणार नाही ही काळजी घेणं आपल्या हातात आहे..”
मंगेशला ते पटत होतं आणी नव्हतही.. तो विचारात पडला.. अनिताला मात्र लिसाचं ‘आमच्यात’ असं ऐकल्या पासून तिच्यापासून खूप गेल्या सारखं वाटत होतं..
*****
इंटरेस्टिंग आहे.
इंटरेस्टिंग आहे.
आमच्या कंपनीत देवादिकांचं जे काही चालतं त्याची जबाबदारी युसुफवर असते. आणि त्याला किंवा कोणालाच काही गैर वाटत नाही. प्रसाद वाटायलाही तोच असतो. ॲडमिन म्हणून त्याची खंडे नवमीची पूजाही होते. रोजे असतानाही तो प्रसाद घेतो कारण तो 'देवाचा' असतो!
हा प्रसादाचा विषय एका वेगळ्या अंगानं मी अनुभवला. कधी तरी पूर्वीच्या कंपनीची दहा वर्ष झाली म्हणून एका धनत्रयोदशीला मोठी पूजा घातली. एक येहोव्हाचा विटनेस आमचा सिनीअर मॅनेजर होता. तो पूजेच्या ठिकाणी आला देखील नाही. आमच्या पंथात चालत नाही म्हणाला. आणि तयारी कोण करत होता? आमचा एच आर - डेरेक, तो कॅथॉलिक होता! बरं देवीची पूजा कोणी केली? ती एक सगळ्यात जुनी टीम मेंबर होती. धर्माचा विचार केला तर ती बौद्ध होती!
व्यक्ती तितक्या प्रकृती...
धन्यवाद Abuva.
धन्यवाद Abuva.
व्यक्ती तितक्या प्रकृती.
आमच्या कॉलनीत दरवर्षी गणपती बसतो. पहिल्या दिवशी अथर्वशीर्ष पठण असतं. पूर्वी कॉलनीत डिसुझा कुटूंब रहायचं. Mrs. डिसुझा पण पठणाला येऊन बसायची. अथर्वशीर्ष तिला येत नव्हतं, आमच्यापैकी बऱ्याच जणांना नव्हतं येत. समोर पुस्तकं असायची. ती पण त्यात डोकं खुपसून म्हणायचा प्रयत्न करायची.
छान लिहिले आहेस शर्मिला.
छान लिहिले आहेस शर्मिला.
आधी कथेचे नाव वाचून वाचू की नको असे वाटले होते.
काही वर्षापूर्वी एका ख्रिश्चन टीम मेंबर ने तिळगुळ घेतले नव्हते हे आठवले. तिला तो प्रसाद वाटला होता. सांगून पण पटले नव्हतेच तिला
छान कथा!
छान कथा!
आमचा एक स्वीस कलिग गणपती प्रसाद नको म्हणालेला.
This is not my god बोललेला.
मुंबईतील एक ख्रिश्चन मैत्रीण सांगत होती की तिच्या चर्चमध्ये नॉन कॅथलिक लोकांना प्रसाद पण देत नाहीत.
याउलट, एक सप्लायर आहे मुस्लीमधर्मीय जो पुण्यातील मंगळवार पेठेतील गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे.
छान कथा शर्मिला. आमचा
छान कथा शर्मिला. आमचा फायनान्स डायरेक्टर मुस्लिम असूनही दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाचं दर्शन घेतो.
>>चर्चमध्ये नॉन कॅथलिक
>>चर्चमध्ये नॉन कॅथलिक लोकांना प्रसाद पण देत नाहीत.>>
होली कम्युनियन हे आपल्या प्रसादापेक्षा वेगळे प्रकरण आहे. कम्युनियन वेफर आणि वाईन ही प्रतिकं आहेत. साहाजिकच ते घेताना फेथचा सर्वाथाने स्विकार, पूर्णपणे एक रुपता अपेक्षित असते, त्याशिवाय कम्युनियन वेफर देत नाहीत. आपल्याकडे हिंदु घरात जन्म झाला की बास बाकी काही विशेष करावे लागत नाही तसे त्यांचे नसते. दीड-दोन वर्ष शिक्षण(क्लास असतो), पहिले कन्फेशन वगैरे करुन मूल ७-८ वर्षाचे असताना पहिले कम्युनिअन असे असते.
कथेचा उत्तरार्ध-
कथेचा उत्तरार्ध-
काही दिवसांनी अनिता आणि मंगेश लिसाकडे जेवायला गेले. लिसाने एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ बनवले होते. ती आग्रह करकरून दोघांना वाढत होती. अचानक मंगेशने पानावर हात धरला.
"हे काय आहे?"
"ही केरळ स्टाईल बीफ करी"
"इइइइ, बीफ!... मला नको. आमच्यात असलं काही खात नाहीत"
"अरे खरंच की! सॉरी हं, मी विसरलेच" असे म्हणून लिसाने माफी मागितली. तिला आपला अपमान झाल्यासारखे अजिबात वाटले नाही.
छान कथा. विचार करायला लावणारी
छान कथा. विचार करायला लावणारी..
लिसा मला तिच्या जागी योग्य वाटली.
उद्या एखादा हिंदू आपल्या मुसलमान मित्राकडे जेवायला गेला आणि गोमांस खायला नकार दिला किंवा मुसलमान आपल्या हिंदू मित्राकडे जेवायला गेला पण डुक्कर खायला नकार दिला तर त्यात आणि लेखातील घटनेत काही फरक नाही.
फक्त इथे नकार दिलेला पदार्थ हा प्रसादाचा आहे म्हणून भावना दुखावल्या असे झाले आहे. पण याला जबाबदार लिसा नाही. तर अनिताच्या घरच्यांनी प्रसादासोबत आपल्या भावना जोडल्या होत्या म्हणून त्या दुखावल्या गेल्या. इतर पदार्थाला किंवा दुसरे काही करायला नाही म्हटले असते तर दुखावल्या नसत्या.
जर लिसाच्या धर्मात इतर देवांचा प्रसाद खायचा नाही असे असेल किंवा तसे तिला कोणी धर्माचा दाखला देत सांगितले असेल आणि त्यावर तिची श्रद्धा असेल तर तिने त्यानुसार वागण्यात काही वावगे नाही.
अनिता आणि तिच्या घरचे सुद्धा आजच्या दिवशी कापाकापी चिरणे वगैरे नाही चालणार म्हणत आपला देव धर्म पाळत होतेच ना. आणि त्यातही शिरा अपवाद वगैरे म्हणत सोयीने धर्म पाळत होते. सगळेच असे करतात. दर दुसऱ्या घरात आमच्याकडे असे असते म्हणत धर्माचे नियम बदलतात आणि बहुतांश लोकं त्यांना पटेल ते श्रद्धेने पाळतात. मग तिने तिच्या श्रद्धेनुसार प्रसाद खायला विनम्रपणे नकार दिला तर इट्स ओके.
मी स्वतः प्रसादात केळी दिसली की विनम्रपणे नकार देतो

समोरचा माणूस जो मला ओळखत नाही तोही मग हट्टाने प्रसाद आहे म्हणत माझ्या हातात कोंबायला बघतो. मी त्याला सांगतो, अरे बाबा मला केळे आवडत नाही. तरी त्याला कोणी प्रसादाला नाही म्हणतेय हेच मुळात पटत नाही.
अशावेळी मग नाईलाजाने घेतो आणि न खाता दुसऱ्या कोणालातरी देतो. या नादात हात तेवढा चिकट होतो
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद लोकहो.
लिसा चूक नसेल पण तिने जाणवून देईपर्यंत ती वेगळ्या धर्माची आहे हे अनिताच्या लक्षातच आलं नव्हतं. त्यामुळे तिला वाईट वाटल असणार.
नेवेद्याच्या स्वयंपाकाला बऱ्याच लोकांकडे सोवळे पाळतात. पण ह्या घरात लिसा स्वयंपाक घरात सहजपणे वावरली. आम्ही चार पावलं पुढे आलो तर तुम्ही दोन पावलं पुढे या असं बऱ्याच जणांना वाटत असतं.
मंगेश ला समजावताना लिसा चं बरोबर आहे असं आईने समजावलं नाही तर तिचं वागणं तिच्याजवळ असं म्हटलं.
ह्या वरून मला एक किस्सा आठवला-
त्यावेळी माझे वडील परगावी रहात होते. तिथल्या त्यांच्या ऑफिस मधल्या माणसाला शहरात काम होतं म्हणून त्यांनी त्याला आमच्या घरी पाठवलं.
तो घरी आला तेव्हा त्याची नमाज ची वेळ झाली होती. त्याने सतरंजी मागितली. ती दिल्यावर त्याने जागेकरता इकडे तिकडे बघितलं. घर लहान होतं. तो सतरंजी घेऊन बाहेर अंगणात गेला आणि तिथे घराच्या सावलीत त्याने नमाज पढला.
आमच्याकडे जेवून तो त्याच्या कामाला गेला.
त्याचं त्या दिवशी काम झालंच नाही म्हणून रात्री तो आमच्याकडेच राहणार होता.
रात्री परत नमाज ची वेळ झाली. परत सतरंजी घेतली. आता पाऊस पडायला लागला होता. त्याला अंगणात शक्य नव्हतं म्हणून बाहेरच्या लहान खोलीतच इकडे तिकडे पाहिलं. भिंतीवर गणपतीचं कॅलेंडर होतं. (त्या काळी अशी देवांची कॅलेंडर असायची भिंतींवर) त्याने ते कॅलेंडर उलट केलं आणि त्याचं नमाज पठण केलं.
आई खूप चिडली होती. त्याला काहीच बोलली नाही पण नंतर बाबा आल्यानंतर सगळा राग निघाला तिचा.
त्याला आमचं घर चालत, इथलं जेवण चालतं अन आमच्या गणपतीला का उलट फिरवलं म्हणून.....
त्याला मूर्तिपूजा चालत नाही वगैरे तिच्या गावीही नव्हतं.
>>त्याला मूर्तिपूजा चालत नाही
>>त्याला मूर्तिपूजा चालत नाही वगैरे तिच्या गावीही नव्हतं.>>
नसेल चालत पण इथे गेस्ट म्हणून आलेले असताना त्या व्यक्तीनेही मर्यादा भंग केला जो अयोग्य. असे न विचारता हक्क असल्यासारखे कॅलेंडर उलटे फिरवणे हे एक प्रकारे अॅग्रेशन. एवढी फेथ आहे तर डोळे मिटा, नमाज पढा. तो भिंतीवरचा गणपती आपोआप नजरेआड .
तुमची श्रद्धा पाळताना दुसर्याच्या श्रद्धास्थानाला धक्का लावणे कशासाठी?
कथेतील किस्सा वाचून दीवार
कथेतील किस्सा वाचून दीवार मधले "भाई, माँ प्रशाद समझके दे रही है, तुम मिठाई समझके खा लेना" आठवले.
कथा चांगली आहे. त्यातील लिसाच्या वागण्यातही काही खटकत नाही. कारण धार्मिक भावना रॅशनल लेव्हलला समजावून घेता येत नाहीत. प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. आणि तिने तिला इतरांनी दिलेला पदार्थ न खाणे हा तिचा चॉईस आहे.
पण आताच्या वरच्या पोस्टमधले गणपतीचे कॅलेण्डर उलट फिरवणे मात्र तसे नाही. ज्या देवाला तुम्ही मानतच नाही, त्याचा फोटो तेथे असल्याने तुम्हाला काही फरक पडतो की नाही ही पुन्हा वैयक्तिक धारणा आहे. त्याबद्दल वाद पॉईण्टलेस आहेत. पण हे तेवढ्यापुरते नाही. ज्या घरात तुम्हाला तुमच्या पद्धतीने प्रार्थना करण्याची परवानगी दिली गेली आहे, त्यांच्याच घरात तुम्ही बदल करणे म्हणजे आपले समज दुसर्यावर लादणे आहे. तुमच्या आईंचा राग स्वाभाविक आहे. निव्वळ मुर्तिपूजा न चालणे इतकेच यात नाही. (मी हे पोस्ट करेपर्यंत आलेल्या स्वाती२ यांच्या पोस्टमधला "मर्यादाभंग" हा शब्द जास्त चपखल आहे)
पण कुठलाच धर्म दुसऱ्या धर्माचा अनादर करा, असं नाही सांगत >>> हे खूपदा वाचले आहे. मी ही बराच काळ या समजूतीत होतो. पण प्रत्यक्ष जुन्या धार्मिक पुस्तकांतले दाखले वाचले तर जवळजवळ सर्वच धर्मांनी त्याचे पालन करणारे काही "एलिट" लोक सोडले तर बाकीच्यांना तुच्छ लेखण्यापासून ते कानात शिसे ओतणे, ते पार मारून टाकण्याच्या आज्ञा देण्यापर्यंत यथेच्छ काय काय सांगितले आहे. आता बहुतांश लोक ते कालबाह्य झाले आहे हे समजून घेतात म्हणून ठीक आहे
सगळेच नाही घेत, हे ही उघड आहे. पण लोक सुजाण होणे आणि या आज्ञांप्रमाणे वागायला गेले तर शिक्षा होईल म्हणून गप्प बसणे अशा अनेक गोष्टींमुळे याचे प्रमाण कमी आहे.
एकूण इतिहास पाहिला तर "सर्व माणसांना सारखेच हक्क व स्वातंत्र्ये आहेत" हे आत्ताही परफेक्ट नाही. पण पूर्वीपेक्षा कितीतरी चांगले आहे. पूर्वी लोकांनी कितीही वैश्विक स्तरावरच्या गोष्टी केल्या तरी त्यात काही implied exclusions होती. ते चित्र आता लोकशाही देशांततरी राज्यघटनांद्वारे बदलले आहे.
कॅलेन्डर उलटे पालटे करणे -
कॅलेन्डर उलटे पालटे करणे - महामूर्खपणा आहे. मर्यादेचे उल्लंघन आहे. देअर इज नो एक्स्क्युज टु धिस बिहेव्हिअर.
-------
मुस्लिम लोक जनरली कडवेच असतात असा अनुभव आहे. इथे अमेरिकेत आहे. याबद्दल मी कुणालाही जस्टिफिकेशन देत बसणार नाहीये कारण हा सर्वस्वी माझा सब्जेक्टिव्ह अनुभव आहे.
प्रसाद नाकारला किंवा
प्रसाद नाकारला किंवा मूर्तीच्या पाया पडायला नकार दिला यात त्या व्यक्तीने आपली धार्मिक श्रद्धा जपली असे याकडे बघावे.
भिंतीवरचे कॅलेंडर पलटले हे समोरच्याच्या धार्मिक श्रद्धेत अतिक्रमण करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे झाले. आणि ते चुकच आहे.
प्रत्येक केस वेगळी बघता यायला हवी आणि आपल्या डोळ्यावर कुठलाही पूर्वग्रहदूषित चष्मा न चढवता बघता यायला हवे.
लिसाने आज प्रसाद नाकारला. म्हणजे उद्या जाऊन ती सुद्धा कॅलेंडर पलटेल या निष्कर्षावर जायची घाई करू नये. (इथे ती कोणी करतेय असे म्हणत नाहीये)
मुस्लिम धार्मिक बाबतीत तुलनेत जास्त कट्टर असतात असा माझाही अनुभव असला तरीही सारेच मुद्दाम समोरच्याच्या भावना दुखावणारे नसतात हे सुद्धा डोक्यात ठेवतो. प्रत्येक व्यक्तीबद्दलचे मत स्वतंत्र ठेवतो.
माझा आजवरचा सर्वात आवडता हिरो शाहरुख आहे. जो त्याच्या चित्रपटात मंदीर, चर्च, गुरुद्वारा सगळीकडे त्या त्या पारंपारिक पोशाखात जाऊन देवाची प्रार्थना करतो, चित्रपटात आपले नाव राम ठेवतो, रामाचे गुणगान गाणारे गाणे बोलतो.
प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा हिंदू मुलीशी लग्न करून आपल्या मुलाचे नाव आर्यन ठेवतो आणि मुलाना दोन्ही धर्मांची शिकवण देतो.
पण तो असे करतो म्हणून त्यावर कुठल्या इस्लामिक संघटनेने फतवा जारी केला नाही. किंवा केलाही असेल पण कोणी भाव दिला नसेल. मुसलमानांसाठी सुद्धा तो त्यांचा आवडता हिरो आहे. म्हणजे सर्वसामान्य मुसलमान कट्टर असो वा नसो, पण असे सहिष्णू आणि सेक्युलर वागणाऱ्या मुसलमानाचा राग करत नाही हे ही एक आहे. यात सलमानच्या घरी येणारा गणपतीसुद्धा जोडा.
फेमस उदाहरणे म्हणून दिली. अन्यथा माझ्या समोरच्या घरात राहणाऱ्या मुसलमान मुलाना मी माझ्या मुलांसोबत सार्वजनिक गणपती दाखवायला नेले आहे बरेचदा.
तुम्ही जिथे राहता तिथले हिंदू मुस्लिम कल्चर कसे आहे यावर तुमचे अनुभव तुमची मते ठरतात.. आणि जिथे मिक्स अनुभव असतात तिथे काय वेचायचे हे शेवटी आपणच ठरवायचे असते. मलाही चांगले वाईट दोन्ही अनुभव आहेत. आणि हे सर्व धर्मियांकडून आहेत. पण जगात द्वेष पसरवणारे आधीच खूप झाले आहेत. म्हणून मी माझ्या परीने सकारात्मकता पसरवायचा पर्याय निवडला आहे.
सारेच मुद्दाम समोरच्याच्या
सारेच मुद्दाम समोरच्याच्या भावना दुखावणारे नसतात >>> १००%
लोक प्रत्यक्षात वागताना एकमेकांच्या भावना जपतात. हिंदू, मुस्लिम वगैरे पेक्षा समोरची व्यक्ती कशी आहे यावर त्यांचे वागणे स्वाभाविकरीत्या ठरते. एकमेकांच्या सणांमधे सामील होणे हे खूप कॉमन आहे - त्याची "बातमी" पूर्वी होत नसे किंवा आवर्जून सांगावेही लागत नसे. आजकाल धृवीकरण झाल्याने आणि बहुधा एकसारख्या लोकांच्या सोसायट्या झाल्याने तो मिश्र अनुभव कमी झाला आहे, आणि सोमिवरून येणार्या बागुलबुवा पोस्ट्स लगेच लोक पिक अप करत असावेत. इव्हन यातले लोक प्रत्यक्ष संपर्कात आले की वेगळे वागतात आणि "हे तसे नाहीत" वगैरे स्वतःपुरते रॅशनलायझेशन करतात.
पुण्यातील अनेक सोसायट्यांमधे कोणाच्या घरी जाताना आधी खाली नाव लिहावे लागते. माणूस अनोळखी असेल तर वॉचमन वर इंटरकॉमवर खात्री करतो. परवा मध्यंतरी आमच्या सोसायटीत आमच्याकडे कुरियर येणार होते. आधी वॉचमन कडून काहीच ऐकले नाही. थेट बेल वाजल्यावर दार उघडले तर भरघोस दाढी व मुस्लिम वेष घातलेला एक मध्यमवयीन "चाचा" टाइप माणूस. त्यांच्या अंगावर कुरियर कंपनीची काहीच खूण नव्हती. त्यांचा मुलगा कुरियर डीलीव्हर करतो व हे त्याच्याबरोबर फिरतात असे त्यांनी मला सांगितले. हे चाचा नंतर २-३दा सोसायटीत दिसले. हसून हात करत.
तेव्हा वॉचमनने एका अनोळखी व्यक्तीला चेक न करता घरी पाठवले म्हणून चिंता करावी, की सध्याच्या वातावरणात एक पारंपारिक दिसणारी मुस्लिम व्यक्ती अजूनही थेट कोथरूड मधल्या सोसायटीत शिरू शकते याचा आनंद मानावा असा प्रश्न पडला होता
गाणे बोलतो की गाणे म्हणतो?
गाणे बोलतो की गाणे म्हणतो?
कथा आवडली. आयुष्यातील अनेक
कथा आवडली. आयुष्यातील अनेक रंगांपैकी एका रंगाचा छान स्नॅपशॉट घेतला आहे.
ऋन्मेष यांचा प्रतिसाद आवडला.
ऋन्मेष यांचा प्रतिसाद आवडला. कधी नव्हे ते शाखाचे नाव योग्य संदर्भात गुंफले आहे
जस्ट किडिंग.
कथेतल्या प्रसंगाबद्दल आणि
कथेतल्या प्रसंगाबद्दल आणि व्यक्तींबद्दल मला काही मत ठरवता येत नाहीए.
यावरून एक प्रसंग आठवला.
मी इंदूरला होतो, तिथे ऑफिसात पॅसेजमध्ये शोभेसाठी गणपतीची एक तीन चार फूट उंच लाकडी मूर्ती चौकटीत बसवलेली होती. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत तिची पूजा अर्चना केली जायची. आरत्या म्हणत आणि स्टाफ पैकी एकेक जण आळीपाळीने प्रसाद आणत.
इंदूरमध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा होत असला आणि सार्वजनिक गणेशोत्सो व असले तरी मुंबईच्या गणेशोत्सवाची सर त्याला नाही असे वाटायचे. थोडी हुरहूरच वाटायची.
.
माझा मुंबईचा एक सहकारीही माझ्यामागे एक दोन वर्षांनी इंदूरला बदली होऊन आला व तिथे येऊन त्याने बामसेफ जॉइन केलं. तोही आरतीला उभा राहत असे. प्रसादही घेत असे. उद्या तू प्रसाद आणशील का , असे विचारल्यावर त्याने नाही म्हणून सांगितले. बाबांना सांगून अनंत आठवलेंचे काजू मोदक मी कुरियरने मागवले होते. त्या दिवशी प्रसाद वाटताना, ही मिठाई नाही, प्रसाद आहे, असे माझ्या तोंडून निघून गेले.
ही २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आज मला माझे ते वागणे बरोबर वाटत नाही.
पुढे आमचा ब्रँच मॅनेजर बदलला आणि नवा आलेला ब्रँच मॅनेजर नास्तिक होता. तो आरतीसाठी येऊन उभा राहत असे. त्याने प्रसाद कधी आणला होता का माहीत नाही.
आता माझ्यासाठी गणपती आणि गणेशोत्सव हे सांस्कृतिक वारसा आहेत, हे विधान कितीही भोंगळ वाटलं तरी खरं आहे.
वर प्रतिसादांत तिळगुळाचा उल्लेख आला आहे. मुंबईच्या ऑफिसात सेक्शनमधल्या लोकांत , लंचग्रुपमध्ये तिळगूळ वाटणे चालायचे. एका सेक्शनची ऑफिसर SC होती. तिने दिलेला तिळगूळ एका उच्च जातीय असिस्टंट महिलेने डस्टबिनमध्ये टाकला.
आता पुन्हा कथेकडे
वैगेरेवगैरेआणीआणिमी ( (जोवर कोणी मुद्रित शोधनाला ये असं आवताण देत नाही तोवर) शुद्धलेखनाच्या चुका काढणं सोडून दिलंय. पण शर्मिला यांचं लिखाण आवडतं. त्यातली सेन्सिटिव्हिटी आणि प्रां जळपणा आवडतो. त्यांचं लेखन वाचताना हे शब्द खटकले म्हणून लिहितोय.
त्यांनी प्रतिसादात लिहिलंय - लिसा चूक नसेल पण तिने जाणवून देईपर्यंत ती वेगळ्या धर्माची आहे हे अनिताच्या लक्षातच आलं नव्हतं. त्यामुळे तिला वाईट वाटल असणार.
पण कथेत अनिता लिसाला सोबत म्हणून चर्चमध्ये जायची असा उल्लेख आहे.
तसंच कथेत अनीता आहे आणि प्रतिसादात अनिता.
अवांतर - आरती चे बहुवचन
अवांतर - आरती चे बहुवचन आरत्या की आरती? जसे सुट्टी चे सुट्टी की सुट्ट्या.
माझा नेहमी गोंधळ होतो. आरत्या बरोबर वाटते पण सुट्टी बरोबर वाटते. असो.
अनीता मलाही खटकले. पण विशेषनाम चालून जावे.
@भरत,
@भरत,
धन्यवाद चुकलेले शब्द सांगितल्याबद्दल.
माझ्या लिखाणात खरंच खूप चुका असतात. प्रयत्न करते सुधारण्याच्या.
इंग्लिश मधे तर स्पेलिंग च्या खूपच चुका होतात. Computer नसता तर मला नोकरी करण अवघड होतं.
दोन ओळी लिहायला पण मी कॉम्प्युटर+ प्रिंटर वापरायचे.
लहानपणापासून प्रचंड घाई घाईत वाचन करण्याची सवय असल्यामुळे हे होत असावे.
पण करतेय प्रयत्न....
अनिता चर्च मधे जात होती, तिला अर्थातच लिसाचा धर्म माहित होता. पण एरवी कधी वेगळं असं वागणं (तुमचं आमचं) झालं नसावं त्यामुळे तिला ते पटकन लक्षात आलं नाही. स्वयंपाक घरापर्यंत येणारी व्यक्ती ही आपल्या घरातलीच वाटते.
यावरून आणखी एक प्रसंग आठवला.
यावरून आणखी एक प्रसंग आठवला.
आमच्याकडे गणेशचतुर्थी हा एकच धार्मिक सण साग्रसंगीत साजरा होई. हार, दुर्वा. पूजा, आरती, नैवेद्य सगळं. मूर्ती आणत नसू. ती गावी काकांकडे. एके वर्षी बाबांना शेजार्यांनाही आरतीला बोलवायची हुक्की आली. शेजारच्या काकी आल्या. पण काका आले नाहीत. कारण त्यांनी कोण्या बाबांचा पंथ जॉइन केला होता. आणि त्या पंथात तुम्ही फक्त गुरूला ( तेच बाबा) पुजायचं. आपले पारंपरिक देव पुजायचे नाहीत, असं सांगितलं जातं. त्यांच्या सुनेने आपल्यासाठी बेडरूममध्ये देव ठेवले होते.
आता हे काका कागदोपत्री हिंदूच होते. काकींचे व त्यांचे अन्त्यसंस्कारही रीतिरिवाजांनुसार झाले .
तेव्हा धर्माची प्रत्येक व्यक्तीची कल्पना, समज आणि इंटरप्रिटेशन वेगवेगळं असतं. ते कोणासमोर सांगायचं , त्यानुसार वागायचं की नाही हे व्यक्तिपरत्वे बदलतं. वर लिसा आपल्या किचनमध्ये आलेली, तिने प्रसाद केलेला आपल्याला चालला नसता असं अनिताचा भाऊ म्हणतो , तेही व्यक्तिपरत्वे बदलतं.
एकाच घरात एक व्यक्ती आस्तिक आणि एक नास्तिक. तरी नास्तिक व्यक्ती आस्तिक व्यक्तीला पूजेसाठी फुलं आणून देते, हे पाहिलं आहे. विंदा करंदीकर नास्तिक. त्यांची पत्नी सुमा करंदीकर आस्तिक. विंदांना सुतारकामाची आवड . त्यांनी बायको आणि तिच्या देवांसाठी स्वतः देव्हारा बनवला होता. तो सुमा यांना व त्यांच्या देवांना चालला.
@भरत,
@भरत,
जोवर कोणी मुद्रित शोधनाला ये असं आवताण देत नाही तोवर) शुद्धलेखनाच्या चुका काढणं सोडून दिलंय>> माझ्या कायम काढा. मला आवडेल.
कथा वाचली. मी एका पाकिस्तानी
कथा वाचली. मी एका पाकिस्तानी बाईला प्रसादाला नको म्हणताना पाहिलेय, नवरा बायको दोघेही इंजिनिअर. उच्चशिक्षित. तेच एका जवळच्या कॅथलिक मैत्रिणीने मला माझ्या सोबत रेस्टॉरंट मधे नॉनव्हेज खाताना तुझ्यासोबत खाल्ले तर तुला चालेल ना? असे अगदी आपुलकीने विचारले होते. मी म्हंटले - माझ्या घरी येऊन बघ.
हाकानाका.
प्रत्येकाच्या आस्था, समज आणि वैचारिक खोली वेगवेगळी असते. कधीकधी आपण ताणतोय पाहून समोरच्याला पण ताणायला हवं असं काही तरी होत असतं. आपण बोलताना disarming हातोटी ठेवली तर लोकही उगाच आक्रमक होत नाहीत. हे सगळ्या बाबतीत खरं आहे.
काहीजण दुसऱ्याच्या स्पेसमधे न जाता त्या जपतात काही जण अतिक्रमण करतात. ती कॅथलिक मैत्रिणी अजूनही अतिशय क्लोज आहे. ती ऑस्ट्रेलियाला मूव्ह झाली व मी टेक्सासला. तरीही. तिने माझ्या मुलांचे इतके लाड केलेत. आता हे कॅथलिक वगैरे येथे लिहावे लागले एवढंच. मनात काही येत नाही. तिच्यामुळे मला त्यांच्यातल्या बऱ्याच गोष्टी कळाल्या व मी तिला विचारायचे सुद्धा. तिच्या ख्रिसमस ट्री वरचा एन्जेल माझ्या लेकीच्या हातून लावला होता. गणपतीला दरवेळी यायची व प्रसादही खायची. आता हे आवर्जून लिहिताना विचित्र वाटत आहे. तिच्यामुळे माझ्या मुलांवर चांगले संस्कार झाले.
तिच्या वाढदिवसाला मी कितीदातरी एखादी डिश करून नेली आहे. तिच्या आईने तिला माझ्या कडून पोळ्या शिकून घे म्हंटले होते. ते राहून गेले. आता ब्रिस्बेनला जाईन तिच्याकडे.
तिच्या मुलांच्या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत माझा पूर्ण सहभाग होता. तिची मुलं बहुतेक हिंदू होती, तिने त्यांचं हिंदू नाव ( first name) बदलले नाही. दोन भावांची ताटातूट होऊ नये म्हणून एकदाच दोन मुलं दत्तक घेतली. त्यावरून आमचा फार खल झाला होता, भारतात मुभा नव्हती परदेशात मुलं दत्तक देण्याची. मी म्हंटले सरळ गोरं मुलं घेऊन टाक. लेकरू लेकरूच आहे शेवटी. पण तिला एकाच वंशाचे हवं होतं. लांबलचक प्रोसेस होती, शेवटी भारतातील नियम बदलला अचानक आणि तिला मिळाली मॅचिंग मुलं. मला इतका आनंद झाला तेव्हा. आता मी त्यांना फेसबुकवर मोठं होताना पाहतेय. येथे टेक्सासला माझ्या घरी आठवडाभर राहून गेली आहे. त्यावरून मी येथे एक कथाही लिहिली आहे. हृता नावाची. ते त्यावेळीच घडले होते. मी वरून सुपर फ्रेंडली वाटते पण लवकर मैत्री करत नाही कुणाशी, मला जनरलीच सुपरफिशियल, कृत्रिम आणि आग्रही लोक असह्य होतात. हिने स्वतःहून इंटरेस्ट घेतला व आमची चांगली मैत्री झाली.
माझ्या ऑफिसातील एका
माझ्या ऑफिसातील एका बान्ग्लादेशी मुस्लिम, कलीगला (माझी मैत्रिण) दत्तक घ्यायचे आहे. ती मुस्लिम आहे. पण तिने मला दिलेल्या माहीतीनुसार - ती दत्तक मूलास, तिचे आडनाव देउ शकणार नाही.
मला ते फार विचित्र वाटले पण ती म्हणते आमच्या धर्मात तसाच नियम आहे.
ती आत्ता आत्ता मदिन्याला जाउन आली. तिथून आणलेले खजूर तिने सर्वांपाशी येउन आवर्जुन दिले. मी तर घेतले. पण इतरांनी घेतले अथवा नाहीत ते माहीत नाही.
मदिन्याला जाउन आल्यानंतर काही दिवस डोक्यावरुन ओढणी घेउनच वावरत होती.
https://youtu.be/mjP6xroP5A0
https://youtu.be/mjP6xroP5A0?si=JhUQSWb8kQEKFXsS
मला खूप आवडली ही लघू फिल्म.
निरागसतेत देव सर्वत्र दिसतो.
Submitted by दत्तात्रय
Submitted by दत्तात्रय साळुंके on 20 April, 2026 - 21:03>>> There is a reason that comments are off on that film..
आवडली लघू फिल्म.
आवडली लघु फिल्म.
लघु की लघू?
लघु की लघू?
शेवटी उकार आल्यास लघू
शेवटी उकार आल्यास लघू
अपवाद तत्सम शब्द
उदा. मधु, परंतु
छान जमली आहे कथा.
छान जमली आहे कथा.
Pages