लाल रेषा - भाग ११

Submitted by नितनवे on 16 April, 2026 - 12:30

लाल रेषा - भाग १०

मागील भागात तणावपूर्ण ऑपरेशनमध्ये टीमने अचूक समन्वय साधत हिडमेला वाचवलं आणि शत्रूला मागे हटायला भाग पाडलं . हिडमेने दोन्ही बाजूंमधील संघर्षात स्वतःची निवड स्पष्ट करत नाल्याच्या पलीकडे मोठा नक्षल तळ असल्याची महत्त्वाची माहिती दिली. टीमने अत्यंत जोखमीचा निर्णय घेत पुढे सरकत त्या तळात प्रवेश केला आणि मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू असल्याचं पाहिलं . तिथे रेश्मा सापडली, जिला नक्षलवादी त्यांच्या चळवळीचं प्रतीक बनवण्याच्या तयारीत होते . अखेरीस जीवावरचा हल्ला करत तिला वाचवण्यात यश आलं, पण शत्रूने स्पष्ट इशारा देत संघर्ष अजून संपलेला नाही हे दाखवून दिलं
************************************************************************************************************************

लाल रेषा - भाग ११ - ऑपरेशन चक्रव्यूह

परतीचा मार्ग शांत नव्हता. तो थकव्याने, रक्ताच्या उग्र वासाने आणि नुकत्याच सोसलेल्या जीवघेण्या संघर्षाच्या जडत्वाने भरलेला होता. रात्रीचा काळोख अधिकच गडद झाला होता आणि त्यातून वाट काढताना पडणारे प्रत्येक पाऊल जणू मणाचे ओझे झाल्यासारखे वाटत होते. चिखलाने माखलेले बूट आणि ओलेचिंब झालेले गणवेश ते ओझे आणखीनच वाढवत होते.

आम्ही तो निसरडा उतार मोठ्या कष्टाने चढून वर आलो, तेव्हा समोरच्या कड्यावर काही आकृत्यांची हालचाल दिसली. जवानांच्या रायफल्स क्षणार्धात रोखल्या गेल्या, काळजाची धडधड वाढली, पण पुढच्याच क्षणी एका परिचयाचा आवाज कानावर पडला, “सर! आम्ही आहोत!”

पाटील आणि त्याची टीम समोरच्या झाडीतून सावकाश बाहेर आली. त्यांच्या हालचालींमध्ये ती लष्करी चपळाईही कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. एका जवानाला दोन सहकाऱ्यांनी आपल्या खांद्याला आधार देऊन सावरले होते. त्याच्या डाव्या खांद्यापासून खाली शर्टवर रक्ताची एक काळपट, जाड रेघ ओघळली होती.

“काय झालं, पाटील?” मी जवळ जात काळजीत विचारले.

पाटीलचा चेहरा रागाने लाल झाला होता, तो दात ओठ खात म्हणाला, “सर, गोळी जवळच्याच एका दगडाला लागून तिचा तुकडा (Splinter) खांद्यात खोल घुसलाय. आमचा बॅकअप येण्याआधीच त्यांनी वेढा तोडला आणि ते पसार झाले.”

तो जखमी जवान वेदनेचा एक शब्दही न काढता मुकाट चालत होता. आम्ही एका मुलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते खरे, पण त्याची किंमत जवानांच्या रक्ताने मोजावी लागली होती.

“सगळे एकत्र व्हा. कॅम्पच्या दिशेने कूच करा... कोणीही पाठलाग करायचा नाही!” मी आदेश दिला. शत्रू आता आम्हाला उघड्यावर गाठण्याची वाट पाहत दबा धरून बसला असेल, याची मला पूर्ण कल्पना होती.

पाटीलने माझ्या बाजूला उभ्या असलेल्या त्या मुलीकडे...रेश्माकडे एक तीक्ष्ण नजर टाकली. त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते, पण आता ते विचारण्याची ही वेळ नव्हती. रेश्मा आमच्यापासून काही अंतरावर चालू होती; ती शरीराने आमच्यासोबत असली, तरी मनाने या 'वर्दीवाल्या' गटाचा भाग व्हायला अजूनही तयार नव्हती.

दूरवर कॅम्पचे दिवे लुकलुकताना दिसायला लागले, तेव्हा कुठे आमचा जीव भांड्यात पडला. आत पोहोचताच मेडिकल टीमने तातडीने जखमी जवानाचा ताबा घेतला. रेश्मा आत येताना क्षणभर रेंगाळली, तिने कोणाचाही स्पर्श होऊ दिला नाही.

पाटील रेश्माकडे वळून म्हणाला, “आता तू इथे सुरक्षित आहेस.”

ती काही बोलली नाही, फक्त शून्यात बघत राहिली.

कॅम्पमध्ये परतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वातावरण बदललं होतं. बाहेरच्या जंगलात जी एक भयाण शांतता होती, तिचं रूपांतर आता कॅम्पच्या भिंतींच्या आत एका तणावात झालं होतं. प्रत्येक जवानाच्या नजरेत एकच प्रश्न होता...आज जे झालं, ती केवळ एक चकमक होती की येणाऱ्या मोठ्या वादळाची ही पहिली ठिणगी?

रेश्माला मुख्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या खोलीत बसवलं होतं. खोलीचा लोखंडी दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, जणू त्या अर्ध्या उघड्या दारातून आतलं आणि बाहेरचं जग यात एक स्पष्ट सीमारेषा ओढली गेली होती. मेडिकल टीममधील एका महिलेने तिच्या जखमांवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला, पण रेश्मा प्रत्येक वेळी एखाद्या जखमी प्राण्यासारखी मागे सरकत होती. कोणाचाही स्पर्श तिला नको वाटत होता.

मी आणि पाटील आत गेलो, तेव्हा ती लाकडी बाकावर आकसून बसली होती. तिचे हात एकमेकांत घट्ट गुंफलेले होते. तिची नजर जमिनीवर खिळली होती, जणू तिथे ती स्वतःचं हरवलेलं अस्तित्व शोधत होती.

नाव?” पाटीलने धारदार आवाजात विचारलं. त्याच्या आवाजात जवानांच्या रक्ताचा बदला घेण्याची एक अघोषित घाई होती.

ती काहीच बोलली नाही. तिची नजर हललीही नाही.

“रेश्मा,” मी अत्यंत संथ आणि शांत स्वरात म्हटलं. त्या नावाने तिची पकड अधिकच घट्ट झाली. तिने एकदा नजर वर केली आणि पुन्हा खाली घेतली. “ते नाव इथे वापरायचं नाही,” ती थंड स्वरात कुजबुजली.

खोलीत काही क्षण एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली. पाटीलने वेळ न घालवता थेट मुख्य मुद्द्याला हात घातला, “ते कुठे आहेत? किती लोक आहेत आणि पुढचा प्लॅन काय आहे?”

ती गप्पच राहिली.

“रेश्मा, आज तू जे काही पाहिलंस, ती फक्त सुरुवात आहे,” पाटील टेबलावर झुकत पुढे म्हणाला. “उद्या या जंगलात काय तांडव होणार आहे, हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुझं गप्प राहणं अनेकांचा जीव घेऊ शकतं.”

तिने फक्त नकारार्थी मान हलवली. “मला काही माहित नाही,” ती म्हणाली. तिचा आवाज सपाट होता, पण त्या आवाजातील रिकामेपणा सांगत होता की तिला बरंच काही ठाऊक आहे, पण ते शब्दांत मांडण्याची तिची हिंमत होत नाहीये.

मी पाटीलला हाताने खुणावून थांबवलं. “ठीक आहे,” मी म्हणालो. “आत्ताच सगळं बोललं पाहिजे असं काही नाही.” पाटीलने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं, त्याला वाटलं होतं की मी तिची कसून चौकशी सुरू करेन.

पण मी फक्त इतकंच म्हटलं, “आत्ता नको. तिला वेळ दे.”

आम्ही बाहेर आलो तेव्हा पाटीलचा पारा चढला होता. “ती काहीतरी खूप महत्वाचं लपवतेय, सर. आपण वेळ वाया घालवतोय!”

“हो, पाटील, ती लपवतेय,” मी पायऱ्या उतरताना शांतपणे उत्तर दिलं. “पण कधी कधी प्रश्नांच्या भडिमारा पेक्षा शांतताच जास्त मोठं सत्य बाहेर काढते. तिला स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री पटू दे.”

रात्र जशी सरत होती, तसा कॅम्पमधील वावर कमी झाला. पण प्रत्येक पोस्टवरचे जवान डोळ्यांत तेल घालून अंधाराचा वेध घेत होते. हिडमे बॅरेकच्या बाहेर एका अंधाऱ्या कोपऱ्यात एकटाच बसला होता. मी त्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो.

"मी प्रयत्न करून बघतो साहेब, कदाचित काही सांगेल." हिडमे म्हणाला.

रात्रीचा प्रहर जसा वाढत गेला, तशी कॅम्पमधील शांतता अधिकच गडद झाली. हिडमे तिच्या खोलीत शिरला. त्याने तिला पाणी दिले आणि तिच्या समोर जमिनीवर बसला.

“अजून किती काळ गप्प राहणार आहेस?” हिडमेचा आवाज शांत होता.

तिने नजर वर केली नाही. हिडमे पुढे बोलू लागला, “तुला वाटतंय की त्या दिवशी चकमकीत साहेबांनी तुझ्या बहिणीवर गोळी झाडून गुन्हा केला? पण खरं काय होतं हे तुलाही ठाऊक आहे. ती बंदूक घेऊन साहेबांच्या समोर उभी होती. जर त्यांनी ट्रिगर दाबला नसता, तर आज ते जिवंत नसते. हा खेळ त्यांनी सुरू केला नव्हता, तो तुझ्या बहिणीने निवडला होता.”

रेश्माच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

हिडमे थांबला नाही, तो जखमेवरचं खपली काढल्यासारखं बोलत होता, “आणि ज्यांच्यासाठी ती लढली, त्यांनी काय केलं? जेव्हा गोळीबाराचा धूर विरला, तेव्हा ते नक्षली तिचा मृतदेह तिथेच सोडून पळाले. तिला शेवटचा खांदा द्यायलाही ते आले नाहीत. शेवटी याच पोलिसांनी, ज्यांना तू शत्रू मानतेस, तिचा मृतदेह सन्मानाने तुझ्या आईपर्यंत पोहोचवला.”

रेश्मा आता हुंदके देऊन रडू लागली होती. हिडमेने तिच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेतला.

“विसरलीस का तो दिवस? जेव्हा ते नक्षली तुझ्या घरात घुसले होते? तुझ्या मोठ्या बहिणीला चळवळीत भरती करण्यासाठी त्यांनी तुझ्या आईला आणि तुला ठार मारण्याची धमकी दिली होती. गावातल्या त्या पोराने बाबूने भरती होण्यास नकार दिला म्हणून त्याला सगळ्यांसमोर मारून टाकले."

हिडमेचे शब्द एखाद्या शस्त्रासारखे काम करत होते. रेश्माच्या मनात चाललेले द्वंद्व आता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

“रेश्मा,” हिडमे अधिक गंभीर झाला, “जंगलात एवढे नक्षली कमांडर एकत्र आलेत म्हणजे ते काहीतरी खूप मोठं आणि भयानक करणार आहेत. जर तू आता माहिती दिली नाहीस, तर तुझ्यासारख्या कितीतरी निष्पाप पोरींचे बळी जातील. ऑफिसर साहेबांना सत्य सांगण्याची हीच वेळ आहे. जर आता उशीर झाला, तर उद्याचं जंगल फक्त रक्ताने माखलेलं असेल आणि त्याला जबाबदार तू असशील.” एव्हढे बोलून हिडमे तिथून निघून गेला.

ती हिडमे गेला त्या दिशेकडे बघत राहिली.

तिला आपले जुने दिवस पुन्हा पुन्हा आठवू लागले जणू काळ मागे फिरत होता आणि ती पुन्हा त्या जगात प्रवेश करत होती.

गडचिरोलीच्या दाट, हिरव्यागार जंगलात लपलेलं त्यांचं छोटंसं गाव… आणि त्या गावाच्या कडेला उभं असलेलं त्यांचं मातीचं घर. ती तेव्हा फक्त तेरा वर्षांची होती. आता त्या सगळ्याला तीन वर्षं झाली होती… पण त्या आठवणींवर वेळेची धूळ बसली नव्हती. प्रत्येक क्षण अजूनही तितकाच जिवंत होता. ताजा, स्पष्ट, आणि वेदनादायक.

घर मोठं नव्हतं, पण उबदार होतं. आई रोज पहाटे उठायची. चुल पेटवताना लाकडांच्या चुरचुरीत आवाजासोबत धुराचा हलका वास घरभर पसरायचा. त्या धुरात एक ओळखीचं आपलेपण असायचं. भात शिजताना येणारा सुगंध… भाकरी भाजताना येणारी उष्णता… ते सगळं अजूनही तिच्या मनात कुठेतरी जिवंत होतं.

ताई… सतराची. ती फक्त मोठी बहीण नव्हती ती अर्धी आईच होती. दर सकाळी ती तिचे केस विंचरायची, वेण्या घालायची, शाळेचा डबा बांधून द्यायची. तिच्या हातात एक मायेची सवय होती जणू ती स्पर्शानेच सगळं नीट करत होती.

दोघी रोज शाळेत जायच्या. ताईचं ते शेवटचं वर्ष होतं. तिच्या डोळ्यांत स्वप्नं होती मोठी, रंगीत. तिला शिकायचं होतं, शहरात जायचं होतं, काहीतरी बनायचं होतं. पण त्या स्वप्नांच्या पुढे गरिबी उभी होती… आणि त्याहून उंच ते जंगल. त्या जंगलाच्या मर्यादा ओलांडणं इतकं सोपं नव्हतं.

ते शाळेत जाताना वाटेत झाडांवरून कच्ची फळं तोडायचे, कधी नदीकाठी थांबायचे आणि त्यांच्यासोबत असायचा शेजारचा बाबू … १२ वर्षांचा. त्याची आई नव्हती, म्हणून तो त्यांच्याच घरी जास्त वेळ असायचा. आई त्याला पण तितकंच प्रेम द्यायची. ते तिघं मिळून खूप खेळायचे, कधी जंगलात धावत सुटायचे.

आणि ताईचं ते गुपित... त्याचं नाव निघालं की ताईच्या गालावर गुलाबासारखी लाली उतरायची. शाळेतल्या एका मुलावर तिचं जीवापाड प्रेम होतं. दुपारी शाळा सुटली की नदीकाठच्या त्या जुन्या, पडक्या मंदिरात ते तासनतास एकमेकांच्या हातांत हात धरून बसायचे. त्या घनदाट झाडीत, जिथे फक्त पानांची सळसळ ऐकू यायची, तिथे त्यांनी आपलं एक छोटंसं जग वसवंलं होतं. त्या कोवळ्या वयातील तो प्रेमाचा ओलावा, एकमेकांच्या स्पर्शातून मिळणारी ती अनामिक ओढ आणि भविष्याची ती रंगीत स्वप्नं... ताईसाठी तेच तिचं सर्वस्व होतं.

बाबू, ती आणि ताई तिघं मिळून रानात फिरायचे. बाबू नेहमी म्हणायचा, "ताई, तू लग्न करून गेली की आम्ही कोणाशी खेळणार?" तेव्हा ताई फक्त हसायची आणि तिचं डोकं कुरवाळायची. त्यांची दिनचर्या किती साधी होती. सकाळी शाळेत जाणं, दुपारी ओढ्यावर पाय सोडून बसणं आणि संध्याकाळी आईने चुलीवर केलेल्या गरम भाकरीचा आस्वाद घेणं.

आणि मग… एक दिवस सगळं बदललं.

तो बदल अचानक झाला नाही तो हळूहळू येत होता, पण त्यांना कळलं नाही. त्या रात्री मात्र तो स्पष्ट दिसला.

गावात अनोळखी लोक आले. त्यांच्या पावलांचा आवाज आधी दूरून ऐकू आला… मग तो जवळ येत गेला. दारावरची थाप झाली तेव्हा आईचे हात थरथरले. ताईने तिचा हात घट्ट धरला, इतका की अजूनही कधी कधी त्या पकडीची आठवण होते.

दार उघडलं. त्यांच्या हातात बंदुका होत्या. आवाज थंड होते.

“घरात कोण कोण आहे?”

आई काही बोलायच्या आधीच ताई पुढे सरसावली. ती ताईच्या मागे लपली होती. त्या माणसांच्या नजरा घरभर फिरत होत्या. भिंती, कोपरे, आमच्यावरून… जणू आम्ही माणसं नव्हतो, फक्त मोजण्यासारख्या गोष्टी होतो.

ते निघून गेले. पण त्यांच्यासोबत घरातली शांतता घेऊन गेले.

काही दिवसांनी ते पुन्हा आले. यावेळी ते थेट ताईकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत निर्णय आधीच झाला होता. “चल आमच्यासोबत,” त्यांनी सांगितलं.

आईने ताबडतोब नकार दिला. आवाज कापत होता, पण शब्द ठाम होते. ताईनेही नकार दिला. ती मागे हटली नाही.

क्षणभर सगळं स्थिर झालं. मग त्यांचा आवाज बदलला. “नाही आली तर… तुझ्या आईला आणि बहिणीला जिवंत ठेवणार नाही.”

त्या एका वाक्याने ताईचं सगळं अवसान गळालं.

त्या रात्री कुणीच झोपलं नाही. चुल विझली होती. घरात अंधार होता.

ताई शांत बसली होती. ती रडत नव्हती. काही बोलत नव्हती. पण तिच्या डोळ्यांतलं वादळ तिला दिसत होतं. भीती, राग, आणि एक निर्णय… जो ती स्वतःसाठी घेत नव्हती.

ती ताईजवळ बसली होती. काही बोलावंसं वाटत होतं… पण शब्द सापडत नव्हते.

आणि मग…एक दिवस ताई गेली. एक शांत क्षण… आणि त्यात घेतलेला एक कायमचा निर्णय.

ती निघताना मागे वळली. हसण्याचा प्रयत्न केला, “तू आईची काळजी घे… आणि अभ्यास कर,” ती म्हणाली.

तिने ताईचा हात धरून ठेवला होता. घट्ट. जणू तिने सोडलं नाही तर ताई जाणार नाही. पण हात सुटला. आणि ताई निघून गेली.

घर तसंच आहे आजही. भिंती तशाच. चुल तशीच. आई अजूनही रोज चुल पेटवते.

पण तिच्या डोळ्यांत नेहमी एकच गोष्ट असते, वाट पाहणं.

ती मोठी झालेय. लोक म्हणतात, समजूतदार झालेय. पण आतून…ती अजूनही तीच तेरा वर्षांची मुलगी आहे, दाराकडे पाहत बसलेली. ताई परत येईल म्हणून.

संध्याकाळी जेव्हा जंगलातून वारा येतो…पानं हलतात…कधी कधी वाटतं ताईचा आवाज आहे. ती हाक मारतेय. पण लगेच कळतं, ती… ती आता परत येणं शक्य नाही.

रेश्मा दाट काळोखाकडे बघत विचार करत होती कि आपलं ते हसतं-खेळतं आयुष्य खरंच होतं का?
की ते फक्त एक सुंदर स्वप्न होतं…?

पण नाही… ते स्वप्न नव्हतं. ते आमचं खरं आयुष्य होतं.

…आणि तेच आयुष्य… एका दिवसात हिरावून घेतलं गेलं.

तिने डोळे पुसले, तिच्या नजरेतील भीती आता जाऊन तिथे एक जिद्द निर्माण झाली होती.

त्या रात्री उशिरा, मी पुन्हा रेश्माच्या खोलीत गेलो. ती अजूनही तशीच जागी होती. तिची नजर समोरच्या भिंतीवर असलेल्या एका भेगेवर स्थिर होती.

“तुला झोप येत नाही?” मी विचारलं.

ती काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, “इथे खूप शांत आहे. तिकडे… तिकडे कधीच शांत नसतं. सतत कसली तरी टांगती तलवार असते.”

काही क्षण शांततेत गेले. मग ती स्वतःहून बोलू लागली, “मला सगळं माहित नाही, साहेब…” ती म्हणाली. “कोणी सगळं सांगत नाही तिथे. पण काही गोष्टी… कानावर येतात.”

मी सावध झालो. “काय?”

ती थोडीशी हलली. पहिल्यांदाच तिची नजर त्या भेगेवरून सुटली. “बाहेरून मोठे लोक आलेत,” ती म्हणाली.

मी काही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त ऐकत राहिलो.

“आंध्र… ओडिशातून,” ती हळू आवाजात म्हणाली. “कमांडर आहेत. मोठे.” त्या शब्दात एक वेगळंच वजन होतं.

“त्यांच्यावर लाखोंची इनामं आहेत,” ती पुढे म्हणाली. “सगळे इथे जमलेत… काहीतरी मोठं करायला.”

मी शांतपणे विचारलं, “कशासाठी?”

ती काही क्षण गप्प राहिली. मग माझ्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच. त्या नजरेत भीती होती आणि खात्रीही.

“धक्का द्यायला,” ती म्हणाली. “मोठा.”

ती पुढे म्हणाली, “ते कॅम्पबद्दल बोलत होते… तुमच्या हालचालींबद्दल… आणि त्या तुकडीबद्दल, जी उद्या सकाळी इथे येणार आहे.”

त्या एका वाक्याने सगळं थिजलं. क्षणभर फक्त एकच विचार डोक्यात ठसठसू लागला, ही माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली?

याचा अर्थ स्पष्ट होता. आपला अंतर्गत संवाद… आपला मार्ग… आपली योजना… कुठेतरी तुटली होती किंवा कुठेतरी कुणीतरी बोललं होतं.

मी क्षणात उभा राहिलो. खुर्ची मागे सरकली, हलकासा आवाज झाला. “पाटील!” मी जोरात हाक मारली.

बाहेर उभा असलेला पाटील ताबडतोब आत आला. त्याच्या चेहऱ्यावरचं लक्ष एकदम माझ्याकडे खिळलं.

“सर?”

मी एक सेकंदही न घालवता स्पष्ट सांगितलं, “हे तात्काळ मुख्यालयाला कळवा. आपला रस्ता लीक झालाय.”

तो क्षणभर स्तब्ध झाला. “सर… confirm आहे का?”

मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं. “माहिती अपूर्ण आहे,” मी शांत पण ठाम आवाजात म्हणालो, “पण खरी आहे. आणि आपण चुकलो तर… किंमत खूप मोठी असेल.”

पाटीलने मान हलवली. त्याला पुढचं काही विचारायची गरज नव्हती. तो लगेच बाहेर वळला.

खोलीत पुन्हा शांतता पसरली.

मी खिडकीबाहेर पाहिलं. अंधार अजूनही दाट होता. जंगल तसंच स्थिर दिसत होतं. पण आता त्या अंधाराच्या पाठीमागे हालचाल होती याची खात्री होती.
************************************************************************************************************************

कॅम्पच्या मध्यभागी ठेवलेल्या त्या जुन्या लाकडी टेबलावर नकाशा पसरलेला होता. त्याच्या कडा थोड्या वाकलेल्या, काही ठिकाणी डाग… पण त्या क्षणी तो फक्त कागद नव्हता तो आमच्या जगण्यामरणाचा आराखडा झाला होता.

दिव्याचा मंद, तुटक प्रकाश टेबलावर पडत होता. पिवळसर उजेडात रेषा जास्त तीक्ष्ण दिसत होत्या जणू त्या फक्त रेषा नव्हत्या, तर प्रत्येकाच्या मागे एखादी शक्यता, एखादा धोका लपलेला होता.

मी, पाटील, पवार, सावंत आणि शिर्के आम्ही पाच जण त्या टेबलाभोवती उभे होतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकाग्रता होती, पण त्या एकाग्रतेखाली एक दडपण होतं. सगळ्यांना माहीत होतं, आजचा निर्णय चुकला, तर किंमत खूप मोठी असेल.

मी पेन्सिल हातात घेतली. ती नकाशावर फिरू लागली. टेकड्या, नाले, पायवाटा, संभाव्य मार्ग… प्रत्येक ठिकाणी थांबत, मोजत, जोडत. मग मी वर पाहिलं. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे होत्या.

मी एक दीर्घ श्वास घेतला. “परिस्थिती स्पष्ट आहे,” मी शांत पण ठाम आवाजात बोलायला सुरुवात केली. “हि लढाई सोपी नाही.”

मी पेन्सिलने नकाशावर दोन वेगवेगळ्या भागांवर ठिपके मारले. “आपल्याला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढायचं आहे,” मी पुढे म्हणालो. “पहिली कॅम्पचा बचाव आणि दुसरी उद्याच्या ताफ्याचं संरक्षण.”

पाटीलने मान हलवली. पवारचा जबडा घट्ट झाला. सावंत नकाशाकडे बारकाईने पाहत होता. शिर्केने हलकासा श्वास सोडला.

मी थोडा पुढे झुकलो. “पण…” मी थांबलो. त्या एका शब्दाने सगळ्यांचं लक्ष अजून केंद्रित झालं.

“त्याआधी,” मी हळू आवाजात म्हणालो, “आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल.”

मी पेन्सिल टेबलावर ठेवली. हात छातीसमोर घेतले. नजर एकेकावर फिरवली. “आपल्यात कुणीतरी आहे,” मी स्पष्ट उच्चारलं, “जो आपली प्रत्येक हालचाल बाहेर पोहोचवतोय.”

खोलीत एकदम शांतता पसरली. कोणीही हललं नाही. कोणी काही बोललं नाही. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट उमटली...संशय.

मी पुढे म्हणालो, “जोपर्यंत तो फितूर आपल्या आत आहे, तोपर्यंत आपण कुठलीही योजना आखली, तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार. आणि मग…” मी वाक्य पूर्ण केलं नाही. गरज नव्हती. सगळ्यांना पुढचं कळलं होतं.

“म्हणून,” मी ठामपणे म्हणालो, “ही लढाई बाहेर सुरू होण्याआधी… आपल्याला आतली लढाई जिंकावी लागेल.”

दिव्याचा त्या मंद उजेडात प्रत्येक चेहऱ्यावरची ती एकच भावना स्पष्ट दिसली, आता शत्रू फक्त जंगलात नव्हता.

लाल रेषा - भाग १२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
नवीन प्रतिसाद लिहा