शतायुषींचे ‘नील’प्रदेश

Submitted by हेमंतकुमार on 11 April, 2026 - 22:17

मानवी जीवनातील दोन मूलभूत टप्पे म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोहोंदरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. आयुष्याचा कालावधी अत्यंत भिन्न असू शकतो. एका टोकाला पाहता, जन्मताच मृत होणाऱ्या बालकाच्या बाबतीत आयुष्य अक्षरशः क्षणभंगुर ठरते तर दुसऱ्या टोकाला तब्बल 122 वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले एखाददुसरे विक्रमी उदाहरण मानवी इतिहासात नोंदलेले दिसते. सरासरी आयुर्मान हा देखील जागतिक भिन्नतेचा विषय असून आजच्या घडीला त्याची व्याप्ती 55 ते 85 वर्षांपर्यंत दिसून येते. आज जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत शतायुषी असलेल्या माणसांचे प्रमाण अत्यल्प (0.007% ते 0.01%) आहे. त्यामुळे वयाची शंभरी पार केलेला माणूस हा सामाजिक कौतुकाचा विषय ठरतो यात नवल नाही.

दीर्घायुष्याचे रहस्य काय असावे याचे कुतूहन वैज्ञानिकांसह इतर अनेकांनाही असते. या संदर्भात अनेक संशोधने होत असतात. सन १९९६मध्ये डेन्मार्कमधील जुळ्यांच्या एका संशोधनातून एक सत्य समोर आले की, माणसाच्या आयुष्याच्या कालावधीमागे त्याच्या जनुकांचा वाटा फक्त 20% असून त्याच्या जीवनशैली व पर्यावरणाचा वाटा मात्र 80% आहे. पुढील अधिक संशोधनांमधून देखील या निष्कर्षाला पुष्टी मिळाली. संगणकीय भाषेत सांगायचे झाल्यास, माणसाची जनुकीय रचना ही दीर्घायुष्याचे ‘हार्डवेअर’ आहे तर त्याचे पर्यावरण आणि जीवनशैली हे ‘सॉफ्टवेअर’ आहे ! संशोधनाच्या पुढील टप्प्यात जगभरातील शतायु माणसांच्या संकलनाचे काम काही संशोधकांनी हाती घेतले. तेव्हा त्यांना असे दिसून आले की, शतायुषी माणसे जरी जगभर विखुरलेली असली तरी देखील जागतिक पटलावर काही विशिष्ट प्रदेशांमध्ये त्यांचे प्राबल्य दिसते. अशा पाच प्रदेशांना नीलप्रदेश अर्थात Blue Zones असे गोंडस परंतु अशास्त्रीय नाव दिले गेलेले आहे. संबंधित पाच प्रदेश खाली दिलेल्या जागतिक नकाशात दाखवलेत. त्यावरून लक्षात येईल की अमेरिका, कोस्टा रिका, इटली, ग्रीस आणि जपान या देशांमध्ये प्रत्येकी एक नीलप्रदेश आहे. यापैकी अमेरिकेतील लोमा लिंडा हा उपनगरी प्रदेश वगळता बाकीचे चारही प्रदेश ग्रामीण आणि शेती अथवा मासेमारी-प्रधान आहेत.

blue zones.png

(चित्र सौजन्य : dreamstime)

या लेखातून आपण या कुतूहलजनक प्रदेशातील शतायुषी लोकांच्या जीवनशैलीत थोडेसे डोकावून पाहणार आहोत. तत्पूर्वी या ‘शतायुषी संशोधना’ची सुरुवात कशी झाली ते पाहणे रोचक ठरेल. सन 1999मध्ये Gianni Pes हे इटलीचे डॉक्टर आणि Michel Poulain हे बेल्जियमचे लोकसंख्याशास्त्रज्ञ मानवी शतायुष्यावर संशोधन करीत होते. त्यासाठी त्यांनी इटलीतील Sardinia प्रांतातील काही खेडी निवडली होती. त्या पर्वतराजीतील खेड्यांमध्ये त्यांना असे दिसले की इथल्या शतायुषी लोकांचे प्रमाण दर लाख लोकसंख्येमागे सुमारे 13 ते 16 माणसे एवढे लक्षणीय आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याची नकाशावर नोंद करण्यासाठी त्यांनी निळ्या शाईच्या पेनाने त्या प्रदेशांवर गोल काढले. याच सामान्य कारणास्तव त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशांना कालौघात ‘नीलप्रदेश’ हे नाव पडले.

इटलीमधील वरील निरीक्षणानंतर नॅशनल जिओग्राफिक या प्रसिद्ध संस्थेच्या सहकार्याने संशोधकांनी शतायुष्याच्या अभ्यासाची व्याप्ती वाढवली. जगातील विविध भागातील लोकसंख्येसंबंधित सर्व डेटा गोळा करण्यात आला आणि त्यातून उपरोल्लेखित नीलप्रदेशांचा शोध लागला. हे प्रदेश निश्चित करताना एक महत्त्वाचे संख्याशास्त्रीय सूत्र वापरले होते. या प्रदेशातील शतायुषींची तुलना सर्वसाधारण अमेरिकेशी करताना हे पाहिले गेले की, या प्रदेशांमधले शतायुषींचे प्रमाण हे अमेरिकेच्या तुलनेत दहापट अधिक आहे. याची कारणे शोधण्यासाठी आता नीलप्रदेशातील शतायुषींच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले. या अभ्यासातून लक्षात आले की या सर्व प्रदेशांतील संबंधितांच्या जीवनशैलीतील साधारण 9 घटक एकमेकांशी मिळतेजुळते होते. त्या घटकांना Power 9 असे नाव देण्यात आले.

दीर्घायुषींची ‘ताकद’ असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा आता हा आढावा :
१. नैसर्गिक हालचालीतूनच व्यायाम : हे लोक यंत्रांची मदत न घेता स्वतःची रोजची स्वयंपाकादी घरकामे आणि बागकाम इत्यादी स्वतःच करतात. या कामांच्या दरम्यान नकळतच शारीरिक हालचाल भरपूर होते. इटलीच्या सारडिनियातील बरेचसे शतायुषी मेंढपाळ आहेत आणि त्यांच्या कामानिमित्तानेच त्यांचे दिवसाकाठी पर्वतराजीतून सात-आठ किलोमीटर आपोआप चालणे होते. नैसर्गिक हालचालींवर भर असल्याने या लोकांना कधी मुद्दामून व्यायामशाळेत जाण्याची अथवा मैदानावर पळत बसण्याची गरज वाटलेली नसावी. या समूहांत तंत्रज्ञानावर आधारित विविध सुखसोयींच्या उपकरणांचा वापर अन्य जनतेच्या तुलनेत बऱ्यापैकी कमीच असल्याने त्यांचे शारीरिक चापल्यही चांगल्यापैकी आहे.

२. जीवनाचा निश्चित उद्देश : हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसाधारण समाजात वयाची 75-80 ओलांडलेल्या वृद्धांचे निरीक्षण केले असता असे दिसते की अनेक लोक वयाच्या या टप्प्यानंतर ‘आला दिवस, ढकलला’ यासारखे निराशेचे सूर काढताना दिसतात. कित्येकांमध्ये तर “मरण येत नाही म्हणून जगतोय आपलं” अशी भावनाही वाढीस लागलेली दिसते. इथली शतायुषी मंडळी मात्र अशा विचारांपासून कोसो दूर आहेत. रोज सकाळी उठल्यानंतर त्यांचे दिवसभराच्या कामाचे निश्चित असे वेळापत्रक ठरलेले असते आणि त्याबरहुकूम ते शिस्तीत जगत असतात. याचे एक उदाहरण म्हणून जपानचे ‘ओकिनावकर’ काय करतात ते पाहू. त्यांच्या जीवनशैलीला Ikigai (=जीवनाचा अर्थ) असे छानसे नाव दिलेले आहे. या जीवनशैलीचे चार महत्त्वाचे पैलू असे :

  • आयुष्यात एखाद्या गोष्टीची असोशी
  • सामाजिक गरजेचे भान
  • अर्थार्जन होईल असा कामधंदा आणि
  • आपल्या बलस्थानाची जाणीव असणे.

वरील चाऱ्हींच्या संगमातूनच अर्थपूर्ण जीवन जगता येते.

३. ताणतणावाचे व्यवस्थापन : मानसिक ताणतणाव हा सर्वांच्या जीवनाचा एक अटळ भाग असतो. तो हलका करण्यासाठी इथल्या लोकांनी विभिन्न उपाय योजलेले आहेत. त्यांपैकी कोणी दुपारच्या वामकुक्षीला महत्त्व देतो तर अन्य कोणी संध्याकाळच्या वेळात ठरवून कुटुंबीय आणि शेजारीपाजाऱ्यांशी हास्यविनोद करत गप्पा मारतात. रात्रीची शांत झोप हा मुद्दा त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्यावर अमुक इतक्या वाजताच झोपले किंवा उठले पाहिजे असे बंधन बिलकुल नाही. त्यामुळे झोपण्याचे एकंदरीत तास आणि वेळा या बऱ्याचशा अनिश्चित असून शरीराच्या दैनंदिन गरजेनुसार त्यात लवचिकता आहे. याखेरीज ध्यानधारणा, भक्तीमार्ग आणि पूर्वजांचे स्मरण करण्याचे विशेष कार्यक्रम असे मार्गही अवलंबले जातात.

४ व ५. आहाराचे स्वरूप आणि प्रमाण : जेवणात मुख्यतः विविध भाज्या, डाळी आणि विविध प्रकारच्या बीन्सवर भर दिला जातो. स्वयंपाकासाठी ऑलिव्हचे तेल वापरले जाते. मांसाहाराचे प्रमाण अत्यंत मर्यादित ठेवलेले आहे आणि अधिकतर मासे खाल्ले जातात. तसेच रिफाइंड साखरेवरही निर्बंध आहेत. एका वेळेस किती खायचे यासाठी त्यांनी 80 टक्क्यांचा नियम केलेला आहे. म्हणजेच, कुठलेही जेवण पोटभर न घेता साधारणपणे पाऊणपोटीच समाप्ती केली जाते. संध्याकाळचे जेवण किरकोळ असून ते लवकरात लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी उरकले जाते.

६. धर्माचरण : काही अल्प अपवाद वगळता हे बहुसंख्य लोक धार्मिक श्रद्धा बाळगून आहेत आणि ते कुठल्या तरी धर्मपंथाचे सदस्य आहेत. अशा समूहांतर्फे कुठली ना कुठली धार्मिक कृत्ये नियमित स्वरूपात केली जातात. ही समूहभावना महत्त्वाची मानली जाते.

७. एकत्र कुटुंबपद्धती : हा मुद्दा तर विशेष महत्त्वाचा आहे. शतायुषींच्या बाबतीत बऱ्याचदा एका घरात चार पिढ्या एकत्र नांदताना दिसतात. काहींच्या बाबतीत कुटुंबातील ज्येष्ठांचे घर हे तरुणांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच घेतलेले असते. या सहनिवासातून घट्ट अशी कौटुंबिक वीण तयार होते. पती-पत्नी एकमेकांशी एकनिष्ठ असून आयुष्यभर लग्न टिकवण्याकडेच कल राहतो. घरातील लहान मुलांना आजी-आजोबांचा सहवास तर मिळतोच पण काहींच्या बाबतीत पणजी-पणजोबा देखील हयात असू शकतात. या कुटुंब पद्धतीतून घरातील ज्येष्ठांचे आरोग्य तर चांगले राहिलेलेच आहे व त्याचबरोबर लहान मुलांचे आरोग्य देखील अधिक चांगले राहिलेले दिसते आणि बालमृत्यूंचे प्रमाणही अत्यल्प राहते.

८. आरोग्यस्नेही मित्रपरिवार : वरील ७ मुद्द्यांवरून लक्षात आले असेलच की हे लोक आरोग्य रक्षणाबाबत कमालीचे जागरूक आहेत. त्या दृष्टिकोनातून ते अशा समविचारी लोकांशी जाणीवपूर्वक मैत्री करतात. त्यातून चांगल्या सवयी जोपासणारे गट तयार होतात. माणसाच्या चांगल्या अथवा वाईट सवयी या भलत्याच संसर्गजन्य असतात. मानवी स्वभावानुसार वाईट सवयींचे अनुकरण तर पटकन होत असते. जीवनशैली संबंधित अशा अनेक चुकीच्या सवयींचे भरपूर नमुने आपण शहरी आणि महानगरी जीवनशैलीत पाहतोय. इथल्या गटनीतीनुसार चांगल्या सवयींचा आग्रह सर्वांनीच धरला की तो नकळत सर्वांवर बंधनकारक होतो.

९. रेड वाईनचे सेवन : हा मुद्दा आरोग्यदृष्ट्या बराच वादग्रस्त असल्यामुळे या यादीच्या शेवटी घेतलेला आहे. या लोकांपैकी कट्टर धार्मिक लोक वगळता इतर जण माफक प्रमाणात रेड वाइनचे नियमित सेवन करतात. विशिष्ट प्रकारच्या द्राक्षांपासून बनवलेल्या अशा वाईनमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पेशींचा डीएनए दीर्घकाळ उत्तम राहतो असे त्या मागचे शास्त्र आहे. वाईन आणि आरोग्य यासंबंधी अनेक संशोधनांचे निष्कर्ष उलटसुलट असल्याने हा विषय एकंदरीतच घोळदार व वादग्रस्त होऊन बसलेला आहे. शतायुषींच्या बाबतीत वरील सर्व मुद्दे एकत्रितपणे अभ्यासल्यास निव्वळ वाईन सेवनातून दीर्घायुष्य मिळते असे काही म्हणता येत नाही. किंबहुना या सर्व घटकांपैकी कोणत्याही एका घटकाचा सुटा विचार करता येत नाही. त्या सर्वांच्या एकत्रित परिणामातूनच त्यांना दीर्घायुष्याचा लाभ झालेला दिसतो.

BZP.png

वरील सर्व वर्णनावरून या लोकांच्या एकंदरीत आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंदाज येईल. त्यातील बऱ्याच घटकांवर नजर टाकता लक्षात येते की या लोकांनी आपल्या दोन पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांची जीवनशैली बऱ्याच प्रमाणात टिकवून ठेवलेली आहे. अलीकडे त्या प्रदेशांमध्ये आधुनिक जीवनशैलीचा थोडाफार शिरकाव झालेला असला तरीही त्या लोकांनी नव्या व जुन्या जीवनशैलीचा सुरेख समतोल साधलेला दिसतो. हे धोरण त्यांच्यासाठी उपकारक ठरले आहे. परिणामी इथल्या समाजात मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि कर्करोग या महत्त्वाच्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाण अन्य जनतेशी तुलना करता बऱ्यापैकी कमी असल्याचे आढळते. एखाद्या समूहात या कारणांमुळे होणारे अकाली मृत्यू कमी राहिल्यास आपोआपच दीर्घायुष्याच्या दिशेने वाटचाल होते. अजून एक मुद्दा. शतायुष्य ओलांडलेल्या या समूहांमध्ये फक्त मोठे वय या एकाच मुद्याभोवती वैज्ञानिक संशोधन मर्यादित झालेले नाही. वयाच्या बरोबरीनेच या लोकांमध्ये वृद्धापकाळच्या न दिसणाऱ्या खुणा देखील आढळल्या आहेत. त्याचे मूळ शरीरपेशींचा डीएनए एक प्रकारे ‘चिरतरुण’ राहण्याशी निगडित आहे. परिणामी या लोकांना प्रतिकारशक्ती, काटकपणा आणि बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता हे गुण चांगल्यापैकी प्राप्त झाले आहेत.

गेल्या पंचवीस वर्षांत नीलप्रदेश या विषयावरील संशोधन अधिकाधिक प्रगत टप्प्यांमधून जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये त्यावर अशी टीकाही झाली की संबंधित प्रदेशांमधील ( विशेषतः जपान) लोकांच्या जन्मतारखेचे पुरावे खरोखर उपलब्ध आहेत का? हा मुद्दा ध्यानात घेऊन संशोधकांनी अनेक प्रकारे त्या लोकांची वय पडताळणी करून पाहिली. तसेच या प्रदेशांमध्ये शतायुषींचे प्रमाण अन्य जनतेपेक्षा खरोखर जास्त आहे ना याची खातरजमा अधिक कडक संख्याशास्त्रीय निकष लावून करण्यात आली. त्यातून हे प्रदेश शतायुषी लोकांचे आहेत हे निश्चित झाले. परंतु जगभरातील शतायुषी व शतकोत्तर वयाचे लोक कायम फक्त याच पाच पट्ट्यांमध्ये आढळतील असे मात्र नाही. अलीकडील काही वर्षांमध्ये अन्य काही देशांमध्ये देखील विशिष्ट प्रांतात शतायुषींचे प्रमाण वाढताना दिसते. या देशांमध्ये सिंगापूर आणि ब्राझीलचा विशेष उल्लेख करावा लागेल. सिंगापूरच्या बाबतीत तिथली उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि देशाचे द्रष्टे आरोग्यधोरण या गोष्टी नागरिकांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या बाबतीत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. भविष्यात नीलप्रदेशांचे मानांकन वाढवायचे ठरल्यास त्यात सिंगापूर प्रतिक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हणण्यास हरकत नाही (सहावा नीलप्रदेश?). तर ब्राझीलच्या बाबतीत तिथे मोठ्या प्रमाणात आलेल्या जागतिक स्थलांतरितांमुळे निर्माण झालेली कमालीची मानवी जनुकीय विविधता हा घटक अधिक महत्त्वाचा आहे. या विषयावर तेथील संशोधन सध्या जोमाने होत आहे. जनुकीय साम्य (homogeneity) आणि भरपूर विविधता(heterogeneity) असलेल्या भिन्न समूहांमधील दीर्घायुष्याची कारणे वेगवेगळी असतील का, या मुद्द्यावर त्यातून प्रकाश पडेल. दीर्घायुष्यास कारणीभूत असणाऱ्या अशा काही वेगळ्या घटकांचे विवेचन या लेखाच्या मर्यादेबाहेर आहे.

नीलप्रदेशी जीवनशैलीचे अनुकरण समाजातील अन्य प्रदेशांमध्ये करता येईल का याचीही चाचणी पाश्चात्य देशांमध्ये अलीकडे होत आहे. त्या दृष्टिकोनातून ‘नीलप्रदेश विज्ञान’ नावाची नवी अभ्यासशाखा उदयास आलेली आहे. तिचा केंद्रबिंदू निरोगी म्हातारपण आणि त्यामुळे प्राप्त होणारे दीर्घायुष्य हा आहे. अमेरिकेत ‘नीलप्रदेश संस्था’ अशी एक कंपनी ( LLC) स्थापन करण्यात आलेली असून तिच्यातर्फे काही प्रमुख शहरांमध्ये नीलप्रदेशी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये विविध नागरिकांचे समूह करून त्यांना आरोग्यपूर्ण जीवनशैली जगण्यासाठी प्रवृत्त केले जाते. युरोपात नेदरलँड्सने या संदर्भात आघाडी घेतलेली असून या प्रकारचे उपक्रम तिथेही राबवले जातात. या सगळ्यातून समाजात आरोग्यपूर्ण जीवन जगणारे ‘मानवनिर्मित नीलप्रदेश’ निर्माण व्हावेत अशी धारणा आहे. सदर उपक्रमाच्या यशाबद्दल साशंकता दर्शवणारे आणि टीका करणारे गटही तिकडे निर्माण झालेले दिसतात. अर्थात चर्चा, वादविवाद आणि टीका या गोष्टी कोणत्याही सामाजिक उपक्रमाच्या विकासासाठी आवश्यक असून अंतिमतः त्या पूरक ठरतात.

अखेरीस एका व्यक्तीसापेक्ष मुद्द्यावर थोडे चिंतन. ‘आपण शतायुषी व्हावेच असे प्रत्येकाला वाटते का?” बहुधा नसावे. आयुष्याची निव्वळ लांबी हा काही आनंदी व समाधानी जीवन जगण्याचा एकमेव निकष नक्कीच नाही. दैनंदिन जीवनात उठसूट बंधने पाळण्यापेक्षा, “हवं ते खा, प्या आणि मजा करा; आजचा क्षण आनंदात घालवा, उद्याचे कोणी पाहिले आहे” असाही आयुष्याकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन असतो. अत्याधुनिक शहरी जीवनशैलीला सरावलेल्या बहुसंख्य लोकांना एकदम तिचा त्याग करून ‘नीलप्रदेशी’ व्हावे असे वाटणे तर असंभव. मात्र दीर्घकालीन गंभीर आजार आपल्या वाट्याला येऊ नयेत असे मात्र प्रत्येक सुजाण माणसाला जरूर वाटते. पण वर उल्लेख केलेल्या अशा चार प्रमुख आजारांचा तर जीवनशैलीशी निकटचा संबंध आहे. मग हा तिढा कसा सुटणार? आपली धकाधकीची जीवनशैली आणि नीलप्रदेशांची निवांत, सुशेगात जीवनशैली यांच्यातील काही मध्यममार्ग मात्र जरूर काढता येईल. तो मार्ग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काढावा हे उत्तम !
*************************************************************************************

संदर्भ :
१. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6125071/

२.https://www.health.harvard.edu/healthy-aging-and-longevity/living-in-the....

३.https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC12119521/#:~:text=The%20concept....

४.https://www.eurekalert.org/news-releases/1111381#:~:text=The%20study's%20findings%20include:%20*%20Supercentenarians%20maintain,in%202020%2C%20before%20any%20vaccination%20was%20available

* मुखपृष्ठचित्र आणि चित्र क्र. 2, सौजन्य : National Geographic

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. आवडला. सोप्या भाषेत छान मांडणी केली आहे.
एकंदरीत आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्य हे मुद्दे दीर्घायुष्यासाठी महत्वाचे आहेत असे दिसते. जनुकांचा वाटा फक्त 20% याचे आश्चर्य वाटले. मी ते जास्त असेल असे समजत होतो.
मेंढपाळांच्या उल्लेखावरून शुद्ध व भरपूर प्राणवायूचा सुद्धा काही संबंध असेल का, हा विचार मनात आला.
बाकी हे शतायुषी लोक आजारपणासाठी कोणती औषधे, लसी घेतात, त्यांचा आयुर्मानावर काय परिणाम होतो हा प्रश्न पडला.
बाकी शंभर हा आकडा आयुष्याच्या लांबीसाठी विशिष्ट असू नये असे मला वाटते. म्हणजे आपण दशमान पद्धती वापरतो म्हणून शंभरचे महत्व. बाकी निसर्गाला त्या आकड्याचे काय देणे घेणे.

लेख छान आणि मुद्दे पटेबल. दीर्घायुषी असण्यात जनुकांचा वाटा फक्त 20% याचे मलाही आश्चर्य वाटले.

आसपासच्या जेष्ठांचे आयुष्य बघून दीर्घायु असणे हे “वरदान” आहे असे वाटत नाही.

स्वत:ला १०० वर्ष जगण्याची इच्छा अजिबात नसल्याने चांगली झोप + चांगले अन्न मिळवणे यापलिकडे काही प्रयत्न करत नाही.

लेख छान झालाय. नेटफ्लिक्सवर Live to 100 - Secretes of Blue Zones ही मालिका मागे बघितली.
या लेखात त्यातील सर्व महत्वाची माहिती आली आहे.

वैयक्तिकरित्या मला शक्य तेवढे निरोगी आयुष्य असावे असे वाटते. ८० म्हणजे डोक्यावरून पाणी असे वाटते. ७५ आसपास (राउंड फिगरचे आकर्षण नाहीय.) कुणावर अवलंबून न राहता जगलो तरी खूप. (हे जसजसे वय वाढते तस तसे बदलत रहाते. कॉलेज मध्ये असताना ५० म्हणजे खूप वाटत असे. )
त्यादृष्टीने डिमेन्शिया टाळणे (याची काही ठोस अशी माहिती नाही फक्त ज्यामुळे होण्याची शक्यता वाढते ते टाळणे) आणि सांधे, स्नायू धडधाकट ठेवणे याचे प्रयत्न करतो. आहारदक्ष आधीपासून आहे.

<<<हवं ते खा, प्या आणि मजा करा; आजचा क्षण आनंदात घालवा, उद्याचे कोणी पाहिले आहे” असाही आयुष्याकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन असतो.>>> हो. फक्त तो दृष्टीकोन मनापासून असावा, हतबलतेतून नव्हे हेमावैम.

या संशोधनाचा केवळ दीर्घायुष्यासाठी तर क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यास, चांगली ठेवण्यास उपयोग होईल. (मालिका बघितल्यास हे अधिक जाणवेल.)

रोचक लेख. वरच्या नऊ घटकांपैकी काही सयुक्तिक तर काही मजेशीर वाटले. म्हणजे त्यांत काही कार्यकारण भाव आहे की नुसते ट्रेट्स आहेत ही शंका आली. तुम्ही दिलेले व्यक्तिसापेक्ष चिंतन उल्लेखनीय!

उत्साहाने प्रतिसाद दिलेल्या आपणा सर्वांना शतशः धन्यवाद !
वरील प्रतिसादांमधून अनेक चांगले आणि अभ्यासपूर्ण मुद्दे आलेले असल्याने त्याचा टप्प्याटप्प्याने परामर्श घेतो.

* जनुकांचा वाटा फक्त 20% याचे आश्चर्य वाटले.
>>> या संदर्भातील हे एक महत्त्वाचे संशोधन आहे : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/8786073/

अर्थात हे काही या प्रदीर्घ संशोधनातील अंतिम मत असणार नाही. लेखात म्हटल्यानुसार ब्राझीलमधील भावी संशोधनातून या मुद्द्यावर अधिक प्रकाश पडू शकेल.

* शुद्ध व भरपूर प्राणवायूचा सुद्धा काही संबंध असेल का?
>>> चांगला मुद्दा.
स्वच्छ आणि शुद्ध हवा हा चांगल्या आरोग्यासाठीचा एक मूलभूत घटक नक्की आहे. या शतायुषींच्या बाबतीत या घटकाचा वाटा काही अंशी निश्चित असतो परंतु या घटकासह इतर अनेक घटकांचा एकत्रित परिणाम अधिक महत्त्वाचा ठरतो.
. .
* दीर्घायु असणे हे “वरदान” आहे असे वाटत नाही.
>>> अगदी बरोबर. हे व्यक्तीसापेक्ष आहेच.
विशेषतः एकट्याने जीवन कंठणाऱ्या बऱ्याच वृद्धांच्या बाबतीत असे जाणवत नाही, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलेले आहे.

* Live to 100 - Secretes of Blue Zones ही मालिका >>>> चांगली पूरक माहिती परंतु मी NF चा सभासद नसल्यामुळे बघू शकत नाही.
* फक्त तो दृष्टीकोन मनापासून असावा, हतबलतेतून नव्हे >>>> +१०००००

..
* त्यांत काही कार्यकारण भाव आहे की नुसते >>>
अतिशय चांगला प्रश्न.
सध्या तरी ते ‘पॉवर 9’ घटक हे संशोधकांच्या निरीक्षणातून मांडलेले दिसतात. त्यांचा कार्यकारण भाव सिद्ध करायचा झाल्यास त्यासाठी अनेक दशके चालणारे prospective clinical trials या प्रकारचे अभ्यास करावे लागतील. परंतु ते नऊ घटक आणि या लोकांचे शतायुष्य हा निव्वळ योगायोग नसावा असे एकंदरीत अभ्यासावरून वाटते. त्यातील बरेचसे घटक हे शास्त्रीयदृष्ट्या आरोग्यपूर्ण आहेतच.

फार छान लेख. सोपी व सुटसुटीत, ओघवती मांडणी. फार आवडला.
मला खूप जगायचय परंतु फायनॅन्शिअली अजिबात अवलंबित्व नकोय. त्यामुळे - अर्थार्जन होईल असा कामधंदा ........ या मुद्द्याकडेच लक्ष वेधले गेले. काहीतरी पॅसिव्ह इन्कम हवे खरं तर.

सुंदर लेख...
माझे वडील १०२ वर्षं जगले. त्यांच्या शंभरीला गावात मोठा किर्तन कार्यक्रम ठेवला होता. आजूबाजूच्या गावातील लोक आलेले.लाडवाचे गावजेवन होते.
वडील वारकरी होते. गळ्यात जन्मतः तुळशीमाळा घातली होती. संपूर्ण शाकाहारी. कधी कुठलं मोठं आजारपण नाही. नो शुगर, बिपी. बालपणापासून आहारात दूध नित्याचेच. रात्री तुपात भिजलेल्या खारका रोज सकाळी खात लहानपणी.
सुशिक्षित, धार्मिक ग्रंथ वाचन. त्यावर चर्चा करत. श्रावणात कुठल्यातरी ग्रंथाचे वाचन करून श्रोत्यांना अर्थ सांगत.
शेतकरी, त्यामुळे वेगळा व्यायाम नसे. जेवणाच्या वेळा ठरलेल्या. आहारात भाज्या,डाळी, ज्वारी अथवा बाजरीची भाकरी, लोणचे, पापड, कुर्ड‌ई, शेवया आदी सर्व काही घरचे. चहा दोन वेळा. सकाळी .अर्धा,पाऊण तास नेमाने पांडुरंग पुजा. ती झाल्यावर चहा. कामानिमित्त भरपूर फिरत. तेव्हा सायकलवर आजूबाजूच्या गावी जात. आजूबाजूच्या चार गावातल्या लोकांशी मैत्री. बाजारात लग्नकार्यात गाठीभेटी झाल्या की शिळोप्याच्या गप्पा होत. स्वभाव सरळमार्गी कधी कोणाला त्रास होईल असे काही केले नाही.
नैसर्गिक जीवनशैली. इकेगाईच आपली.

शेवटपर्यंत स्वावलंबी. पण शेवटी १-२ वर्षं कधी तरी म्हणत आता बस झालं पांडुरंगा.

* खूप जगायचय परंतु फायनॅन्शिअली अजिबात अवलंबित्व नकोय.
>>>> योग्य मुद्दा.
. .
* वडील १०२ वर्षं जगले. . . स्वभाव सरळमार्गी कधी कोणाला त्रास होईल असे काही केले नाही.
नैसर्गिक जीवनशैली. इकेगाईच आपली. . .
>>> वा ! सुंदरच. कृतार्थ जीवन.

* the concept of blue zones is commonly challenged as unproven.(१)(२)
>>> नीलप्रदेशांच्या संकल्पनेवर गेले दशकभर वैज्ञानिक वाद चालू आहेच. त्याचा उल्लेख लेखात केलेला आहे.

.(१)(२) >>> हे दोन संदर्भ अनुक्रमे 2024 व 2021 चे आहेत.
2025 मधील दोन संदर्भ जरूर पाहण्यासारखे :
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC12119521/#:~:text=The%20concept...
याचा सारांश :
"The results of age validation based on methodology described above, and the exceptionally high number of people reaching 100 years of age in BZs allow us to conclude with reasonable confidence that these BZs of exceptional longevity do indeed exist, even if there are indications that this exceptionality is transient and may be transitory".
आणि
* https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC13061570/?utm_source=chatgpt.com
याचा सारांश :
". . . While regions such as Okinawa, Ogliastra and Nicoya are well-characterized as Blue Zones, others remain under investigation . . . "
. . .
तूर्त या संशोधनाकडे आतापर्यंतचा निरीक्षणात्मक अभ्यास म्हणून पाहता येईल.