चाहूल

Submitted by Amolondhe on 11 April, 2026 - 15:43

रात्री साधारण दोन-अडीज वाजलेले. डाव्या कुशीवर खिडकीकडे तोंड करून झोपलेलो मी. थंडीचे दिवस. अंगावर रजई ओढलेली. कुशी बदलण्यापुरती जाग आली. या कुशीवरचा त्या कुशीवर झालो. उबदार रजईत अंग आकसून पुन्हा झोपायच्या बेतात आणि कानावर काहीतरी खसखसल्याचा आवाज. आंतरमनाला जाग आली. ‘हे काये?,’ असं मनातच म्हटलं पण डोळे अजून मिटलेलेच. कपाळाखालच्या खोबणीत रुतलेले डोळे सैल करत कसेबसे पण अर्धवटच उघडले. बाहेरचा पुरेल असा अंधूक प्रकाश खिडकीतून आत येऊन पसरलेला. डोळ्यासमोर पलंगाचा विस्तार संपताच पडद्याने अर्धी झाकलेली खिडकी आणि तिच्या काचेतून बाहेर पाहता येईल असा नजरेचा टप्पा. मिटायला आतुर असलेल्या डोळ्यांवर थोडा जोर देतच खिडकीतून बाहेर टाकलेला कटाक्ष. वाऱ्यात झुलणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि नेहमीचं, ओळखीचं दृश्य. पण आवाज कशाचा? असं अजून डोक्यात सुरू असलेलं कॅल्क्युलेशन. काही क्षणांच्या झोपमोडीनं बऱ्यापैकी सावध झालेलं मन. असं अचानक आणि एवढ्याशा आवाजाने जागं होणं आपल्यासाठी अशक्य गोष्टये, असा विचार चमकून अंगाच्या मागची बाजू असुरक्षित असल्यासारखी पुसटशी जाणीव. मनाला चाहूल देऊन गेलेली बेचैनी आता काही केल्या झोपू देणार नाही हे आपोआपच उमगलेलं. नाईलाजाने पुन्हा एकदा अंगाला वळसा देऊन कुशी बदलायला शरीराने घेतलेलं कष्ट. कुशी बदलताच ‘आता पुन्हा कशाला इकडं?’ असा सवाल करणारी शरीराची दबलेली बाजू. डोळे एव्हाना बऱ्यापैकी उघडलेले. समोर बेडरूमच्या दरवाज्याबाहेर अंधारातच शोधणारी नजर. आकारावरून गोष्टी ओळखता येतील इतका अंधुक प्रकाश. अचानक बेडरूमच्या दरवाज्याबाहेर डावीकडच्या भिंतीआड कशानेतरी अंग चोरल्याची जाणीव आणि धस्स झालेलं मन. मूठ आवळलेली. अंगाचं पाणी-पाणी. हृदयाची अचानक जाणवेल अशी धडधड. अडकलेला श्वास. खडबडून जागं झालेलं अंग. पलंगावर पडलेल्या अवस्थेतच सज्ज झालेलो मी. शरीर दबा धरून बसल्यासारखं स्तब्धच पण सतर्क. हळूच डावा पाय पुढच्या दिशेला अलगद सरकवलेला. डोक्याखाली दुमडलेला हात मागे घेऊन जोर देत हळूवार पण नजर त्याच दिशेला रोखून ठेवलेली. आता दोन्ही पाय पलंगाखाली फरशीवर घट्ट रोवलेले. जीवावर बेतलेल्या धास्तीनेच पण अचूक अंदाज घेत कसलाही आवज न करता टेबलावरचा टॉर्च हळूच उचलून घातात धरलेला. अचानक अंगावर आलेल्या आकृतीला जोरदार आघात करायच्या बेतानं टॉर्च हाताने उगारून हवेत उचललेला. नजर किंचितही न हालवता दुसऱ्‍या हातात धरलेली आडवी उशी. पुन्हा खसऽऽऽ खसऽऽऽ असा आवाज . . . अंगावर शहाऱ्यांचा उन्माद! मनात भीतीची लाट. शरीर पलंगाला टेकून मागं रेटलेलं. काहीतरी अघटित घडणार अशी मनात बेरीज करूनच पाय पुढे सरकवलेले. दरवाज्याच्या भिंतीलाच थोडं अलिकडच्या बाजूला असलेला स्विचबोर्ड. लाईटीचं बटन दाबायच्या हेतूनं हळूवार फरशीला लागूनच पुढे सरकणारे माझे पाय. दरवाज्यापासून आता फक्त एका पावलाचंच अंतर. थरथरत्या हाताने स्वीचवर धरलेलं बोट. अचानक लाईट आणि धस्स करणारं काहीतरी समोर अवतरेल अशा विचाराने मनात उठलेलं वादळ. अंधारातच सुरक्षित आहोत अशी अनामिक जाणीव मनाची समजूत घालत असतानाच, कुठल्यातरी अबोध धाडसाने बळावलेलं बोट स्वीचवर रुतलेलं. फक्क करून अंधाराला चिरून जाणारा, पण जणू अंगावरच धावून आलाय की काय असा लख्ख प्रकाश! प्रकाशाने दिपलेले डोळे. काहीतरी घडलंयच अशा हातवाऱ्यांनी धडपडून पुढे सरसावलेले माझे हात. . . आता काहीतरी येईलच अशा तयारीत वटारलेले डोळे आणि खिळलेलो मी. काळजाचं पाणी-पाणी करणारा तो क्षणांचा अवधी. हृदयाचे चुकलेले ठोके आणि त्याच वेळी दबलेल्या घशातून येणारा बारीकच पण शिरशिरी आणणारा आवाज पुन्हा कानावर. पोटात भीतीचा गोळा. आयुष्याचे शेवटचे क्षण मोजतोय या अनुभूतीनं आणि मरणाच्या शेवटच्या पायरीवर येणाऱ्‍या गूढ धाडसानं, बुबुळं पापण्यांच्या डाव्या खाचेवर पुरती रेटून मी हळूच दरवाजाबाहेर. आवाज खालच्या दिशेनीए हे समजताच पाय खसकन मागे ओढत खाली झुकलेली नजर. पहिल्या क्षणालाच अक्राळ-विक्राळ असं काहीतरी भयंकर पाहिल्याची जाणीव. पण दुसऱ्‍याच क्षणाला ‘हे ओळखीचं वाटतंय’ असं सांगणारी गोंधळात गुंग झालेली मती. घाबरलेल्या जीवाने कसंबसं मेंदूचं उरलंसुरलं सर्किट जोडत ‘ते कायये?,’ यासाठी केलेली गणितं. आणि ते मांजरीचं पिल्लूये असा बुद्धीने काढलेला निष्कर्ष. एकूनच थरथरणारं आख्खं शरीर घेऊन, ते मांजरीचं पिल्लूये हे मानायला अजिबात तयार नसणाऱ्या मनाला साथ देत माझी झपाझप इकडं-तिकडं फिरणारी नजर. मग काही क्षणांचा अवधी आणि माझं अवसान ढळलेलं. . . . कानाच्या दोन्ही बाजूने, कपाळावरून घामाची ओंघळ. भीतीने गारठलेले हात-पाय. ओल्या हातातून आता सटकूनच पडणार अशा बेतात टॉर्च. खाली वळलेली नजर. हाताने बेडकडे भिरकवलेली उशी. इवलेशे डोळे विस्फारून खसऽऽ खसऽऽ करत मला भीती घालणारा तिचा दबका आवाज. आपोआपच हूश्श असा निःश्वास. आणि थरथरतच त्या पिल्लाकडे सरसावलेले हात. त्याच वेळी ‘पण ही आत आली कुठून?’ या प्रश्नाने कपाळाला आलेलं टेंगूळ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users