'डॅड्स जोक्स', अर्थात दमलेल्या बाबाचे विनोदी विनोद

Submitted by साजिरा on 11 April, 2026 - 10:44

अर्थातच आईही तितकीच दमते. पण इथं दमण्याचा विषय वेगळाच आहे.

हा एक खास फिनॉमिनॉन लक्षात आला, आणि मी याच्या प्रेमात पडलो. नंतर लक्षात आलं, की हे मीच नाही, अनेक मित्र आणि आजुबाजूचे अनेक बाबा करतात. नंतर लक्षात आलं, हे भयंकर व्यापक आहे. याला देश, सीमा, धर्म, प्रदेश, भाषा- अशा काहीही बाऊंडरीज नाहीत. सगळे बाबा घरी आले की बारक्याशी आणि बारकीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. (आईइतका) संवाद साधणं नीट जमत नाही हे सार्वत्रिक कारण. दुसरं म्हणजे काम, तिथला ताण, ताणेबाणे, येऊ घातलेली संकटं, आणि तिथला भवताल विसरण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी काहीतरी ऐकलेलं बिनार्थाचं किंवा विनोद निर्माण करण्याचा करुण प्रयत्न करतात. हे विनोद शाब्दिक, एका शब्दाचे किंवा ओळीचे, प्रश्नार्थ, नाटकी उद्गारवाचक, आंगिक अभिनयातून आलेले, अतिशयोक्तीतले, द्व्यर्थी, बादरायण संबंध जोडलेले, जरा बदमाष किंवा सरळसरळ मुर्ख- अस कसेही असतात. यात गंमत अशी, की हा प्रयत्न यशस्वी झाला काय, किंवा अयशस्वी- बाबा लोकांना फरक पडत नाही. ते दोन्ही केसेसमध्ये तितकेच खुश होऊन ते कपडे बदलुन वॉश घ्यायला निघतात. म्हणजे असं की बारका किंवा बारकी खरं हसली, खोटं हसली (हॉ हॉ! झालं समाधान?), रागावुन बघितलं, करुण नजरेने बघितलं, बुद्धाच्या दया क्षमा शांती नजरेने बघितलं, 'यक्स बाबा' म्हणाली, 'वॉव बाबा' म्हणाली, 'यु आर जिनियस बाबा' असं तुसडेपणाने म्हणाली, 'माझ्या फ्रेंड्ससमोर असलं काही बोलु नका हा' असं बोलली आणि इतर शेकडो शक्यता प्रत्यक्षात आल्या तरी बाबाला फरक पडत नाही. शिवाय एक-दोन आधीच लावलेले असले तर तो आणखी खुष होतो. नंतर एक दोन लावण्याचा कार्यक्रम असला तर तो आणखी नव्याने तयारी करून येतो बाथरूममधुन.
--
हे माझ्यासाठी स्ट्रेसब्र्स्टिंग असतं. बारकीच्या मग वाढत्या वयाचा विचार न करता मी ऐकलेले आणि स्वतः तयार केलेले जोक घेऊन सज्ज होतो. कधीकधी प्रयत्नपुर्वक आठवतो, आणि मग बाथरुममधुन बाहेर पडतो. हे अक्षरशः मुठभर, सुरवंटासारखं होतं एकेकाळी आणि आता नाहीतर नंतर केव्हातरी उडणार आहे, हे सतत छळत असतं. हे दिवस, फालतु विनोद, तिचं बिलगणं, नाटकी ढंग, लाड करवून घेणं फ्रीज करवुन घ्यायचं असतं. मग आणखी विनोद सुचतात. काहीतर हॉरिबल करूण असतात. मग तीही नाटकीपणे च्च च्च करते. मला मग मजा येते.
--
बाबा लोक विसरतात, पण काही बारक्यांना हे डॅड्स जोक्स आयुष्यभर आठवतात. मी सांगितलेले शेकडो हजारो मी विसरलो, मात्र बाबांनी सांगितलेले लक्षात आहेत. हे चांगलंच आहे. मला माझेच आठवून काय फायदा. बारक्याच्या बारक्यांना बारक्याच्या आजोबांच्या बारक्याने सांगितलेले जोक्स आठवतीलच की. गुड.
--
याची अनेक सायकॉलॉजिकल, सोशल आणि कौटुंबिक अंगं असतील, परस्प्रेक्टिव्ह असतील, तर तुम्ही लिहा. शिवाय जोक्सही लिहा. त्यासाठीच तर हा प्रपंच. काय ते मुंगी हत्ती उंट फ्रीजमधुन काढण्याचे, केळी सोलण्याचे आणि अनंत विनोद ते सारे लिहा. ज्यांना माहिती नसतील, त्यांना आणखी नीट चांगले छान गोड बाबा होऊ द्या.
--
मागच्या आठवड्यात बारकीचा स्कुल व्हॅन ड्रायव्हर बदलला. मी त्याचा नंबर सेव्ह करताना तिला त्याचं नाव विचारलं. मग सेव्ह करता करता तिला विचारलं, 'आमच्या स्कुल व्हॅनच्या ड्रायव्हर काकांचं नाव काय असेल ओळख!'
हा असा ओळखाओळखीचा खेळ आणखी त्यांना चिडवतो, आणि आपल्याला मजा येते. ती इरिटेट होऊन म्हणाली, 'पटकन सांग, मला अभ्यास आहे'. मी म्हणालो-' व्हॅन गॉग'.
यावेळी तिने करुण, दयार्द्र, खुनशी, हॉहॉ वगैरे नजरेने न बघता फुगा फुटल्यासारखं ती हसली. ते नाव तिला (माझ्यामुळेच) आधीच माहिती होतं. तिने हा जोक तिच्या मित्रमंडळीत व्हायरल केला. मी मात्र कर्मफल सिद्धांतानुसार नंतर त्यापासून वेगळा झालो. नवीन जोक तयार करायचे असतात ना. एकात अडकुन कसं चालेल?
--
तर सांगायचा मुद्दा असा, की तुम्हीही लिहा.
--

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमिन, हा धागा योग्य ग्रुपात हलवा कृपया. धागे काढण्याची सवय य वर्षांपुर्वीच गेली.

अरे! बेस्ट!!
डॅड जोक्स ना हसण्याचे बंधन नसते. आयरोल, पोरांना न आवडणे ही तर उत्तम जमलेल्या जोकची पावती. आणखी एक म्हणजे नव्या पिढीची भाषा सढळ हस्ते आणि चुकीची वापरणे. त्याच्या मित्र परिवासासमोर वापरण्याची संधी मिळाली तर सोन्याहून पिवळे.
असा धागा आल्यावर लिहिण्यासारखा एकही आठवत नाही पण आता केले ऐकले समजले की इथे लिहित जाईन.

आवडलं लिहिलेलं.
मुली जास्त संवाद ( वाद ) साधत असाव्यात.
मुलगे मोठे होउ लागतात तसे जरा अंतर राखून राहिल्यासारखे वागतात की काय न कळे.

मस्त धागा.

माझे बाबा असे विनोद मारण्यात अत्यंत पटाईत आहेत. वय वाढत चाललेय तसं त्यांच्या विनोदबुद्धिला अजून धार येत चाललीय. आम्ही लहान असताना ते फार तापट, कडक वगिरे होते तरी मधूनच असे पीजे टाईप विनोद करून ’हेच का ते आपले बाबा?’ असं आम्हाला वारंवार वाटायला लावायचे.

बाबांना डायबेटेस डिटेक्ट झाल्यावर आईनं त्यांच्यावर कारलं, दुधी, भेंडी वगैरे कसल्या कसल्या रसा-काढ्यांचा भडीमार सुरू केलेला. तेंव्हा एकदा मी त्यांना विचारलं काय बाबा, आईच्या उपचारांनी तब्येत सुधारलीय की नाही? तर म्हणाले - हो मग! ती बघ आपल्या बागेतली झाडं कसली तरतरीत दिसू लागलीयत!
मी मेले हसून. Lol

घरात इडलीचं पीठ एकदा भिजवलं की खूप व्हायचं आणि आठवडाभर मग इडली-डोसा-उतप्पा-आप्पे हेच व्हायचं. बाबा म्हणायचे - सद्ध्या आमच्या घरी ’इडेली सोप’ सुरू आहे. Happy

असले अनंत विनोद.

There are three kinds of people in this world: those who can count and those who can't.

I really love the word “plethora.” It means a lot to me.

I only know 25 letters of the alphabet; I just don't know y.

Shopping centers are so boring, because if you've seen one, you've seen the mall.

RIP, boiling water. You will be mist.

I'm reading an anti-gravity book, and I just can't put it down!

I got a new pen that can write underwater. It can write other words, too.

Did you hear that laughing too loudly is illegal in Hawaii? They only permit a-low-ha.

Justice is a dish best served cold. If it were served warm, it would be justwater.

साजिरा, धाकटी पाती आयरोल देण्याएवढी मोठी झाली काय!!!!
आमच्याकडे आईच (म्हणजे मीच) डॅड जोक्स करत असते सतत. बाबाला संत्रं सोलून द्यावं लागतं बरेचदा.

आयरोल, पोरांना न आवडणे ही तर उत्तम जमलेल्या जोकची पावती. आणखी एक म्हणजे नव्या पिढीची भाषा सढळ हस्ते आणि चुकीची वापरणे. त्याच्या मित्र परिवासासमोर वापरण्याची संधी मिळाली तर सोन्याहून पिवळे.>>>> +१००

(डॅड जोक्सलाच मराठीत फाको म्हणतात का?)

#FF

आयरोल, पोरांना न आवडणे ही तर उत्तम जमलेल्या जोकची पावती. आणखी एक म्हणजे नव्या पिढीची भाषा सढळ हस्ते आणि चुकीची वापरणे. त्याच्या मित्र परिवासासमोर वापरण्याची संधी मिळाली तर सोन्याहून पिवळे
:हाहा :