बापूची अंगठी

Submitted by पराग र. लोणकर on 11 April, 2026 - 00:22

बापूची अंगठी

सकाळी लवकरच एक्याला जाग आली. त्याला उठलेलं बघून सखूनं लगबगीनं गरमागरम चहाचा एक प्याला त्याच्यासमोर ठेवला. विचारात मग्न झालेल्या एक्याने तो दोन-तीन घोटात संपवला आणि सखूशी काही न बोलता तो घराबाहेर पडला. सखूनंही त्याला हटकलं नाही. तो कोणत्या विवंचनेत आहे, याची तिला कल्पना होती.

एक्याला आज रविवारचं काम काहीच नव्हतं, पण त्याला त्याच्या त्या घरात; म्हणजे खरंतर खोलीत बसणं शक्यच नव्हतं. कमालीची बेचैनी त्याच्या मनात व्यापून राहिली होती. त्या बेचैनीतच आपल्या बोटातील सोन्याची अंगठी दुसऱ्या हाताने फिरवत फिरवत तो पुढे पुढे चालत होता. तसं त्याला कुठेही जायचं नव्हतं; फक्त काही वेळ त्याला एकट्यानं राहायचं होतं, त्याच्या त्या बोटातील अंगठीबरोबर! ती अंगठी म्हणजे त्याच्या वडिलांची- त्याच्या लाडक्या बापूची शेवटची आठवण आणि त्यांच्याकडून त्याला मिळालेली एकमेव भेट होती. अर्थात तसं एकमेव म्हणता येणार नाही त्या भेटीला. एक्या आणि त्याचा सख्खा भाऊ किसन जन्मापासून ज्या चाळीतील खोलीमध्ये राहिले होते, ती बदलापूरची भाड्याची खोलीदेखील त्यांच्या वडिलांकडून म्हणजे बापूंकडून त्या दोघांना मिळालेली होती. पण त्या खोलीत आता किसन त्याच्या कुटुंबासहित राहत होता आणि एक्या म्हणजे एकनाथ- कल्याणला पोटापाण्यासाठी येऊन, इथल्या एका चाळीतल्या एका खोलीमध्ये आपल्या बायकोबरोबर राहत होता. आपल्या शेवटच्या आजारपणात ती बदलापूरची खोली या दोघांच्या ताब्यात देतानाच वडिलांनी त्यांच्याकडील- कदाचित वडिलोपार्जितच असलेल्या- दोन सोन्याच्या अंगठ्याही या दोन भावांना दिल्या होत्या; ज्या या दोन्ही भावांनी जिवापाड जपून ठेवल्या होत्या. रोजच्या कामावर आपलं पोट असलेल्या या दोघांसाठीही या अंगठ्या म्हणजे अगदीच टोकाची गरज पडली तर विकून पैसा उभा करण्यासाठी आधार होत्या. आणि आज एक्यापुढे तशीच परिस्थिती आलेली होती. एक्याचा मुलगा बाळ्या पुण्याला शिकायला होता आणि निदान आपल्या समाजात तरी आपल्या मुलाला भविष्यात ‘बाळ्या’ न म्हणता ‘बाळासाहेब’ म्हटलं जावो ही एक्याची एकमेव इच्छा होती. त्यासाठी बाळ्यानं जास्त शिकणं आवश्यक होतं आणि अर्थातच त्याला शिकवण्याची संपूर्ण जबाबदारी एक्यावर होती. आज त्याचा तो बाळ्या पुण्यावरून येणार होता आणि संध्याकाळच्या एसटीने पुण्याला परत जाणार होता. तो आल्यावर पुण्यातील त्याच्या विविध फिया, होस्टेल आणि इतर खर्च इत्यादीसाठी तब्बल साठ हजार रुपयांची रक्कम एक्याला त्याच्या हातात ठेवायची होती. अर्थात बाळ्याने इतक्या रकमेची ही गरज अचानक सांगितलेली नव्हती. गेल्या सहा महिन्यापासूनच आजचा दिवस उगवणार आहे हे एक्याला माहीत होतं आणि त्याने हे साठ हजार रुपये गोळा करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. पण अतोनात प्रयत्न करूनही तो वीस-बावीस हजारांची रक्कमच जमा करू शकला होता आणि त्यामुळे आज ही अंगठी सोनाराला विकून पैसे उभे करण्याशिवाय एक्याकडे कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणूनच कधीही ही अंगठी बोटात न घातलेला एक्या काल रात्रीपासूनच ही अंगठी आपल्या बोटात घालून होता आणि आज तसाच तो घराबाहेर पडला होता. आपल्या वडिलांची एकमेव आठवण असलेली ही अंगठी विकण्याची एक्याची अजिबात इच्छा नव्हती, पण आता इलाज नव्हता. आणि त्यामुळेच ती अंगठी सोनाराच्या ताब्यात जाण्यापूर्वी तिचा जास्तीत जास्त सहवास एक्याला घ्यायचा होता.

साधारण हाच सगळा विचार एक्याच्या मनात चालू होता आणि अचानक तो कमालीचा चपापला. तो राहत असलेला आणि आत्ता चालत असलेला भाग तसा शांत शांतच होता, आणि या भागात महिलांची मंगळसूत्रं वगैरे ओढणारी टोळी आपलं काम नित्यनेमानं करत होती, असं त्यानं ऐकलं होतं. सध्या तर या गोष्टी जास्तच वाढलेल्या त्यानं ऐकल्या होत्या. हा विचार डोक्यात येताच एक्या कमालीचा घाबरला. कारण आज त्याच्या एरवी रिकाम्या असणाऱ्या बोटामध्ये सोन्याची चकाकणारी अंगठी होती. हा विचार डोक्यात येतात एक्या पुढच्याच क्षणी आपल्या घराकडे जाण्यासाठी वळला आणि समोर, अगदी थोड्याच अंतरावर दोन आडदांड व्यक्ती फुटपाथवर उभ्या असलेल्या त्याला दिसल्या. बाजूलाच रस्त्यावर दोन मोटरसायकलस्वार- तसेच टगे- उभे असलेले त्याला दिसले. आज ही जिवापाड जपलेली अंगठी, इच्छा नसतानाही विकून जी आर्थिक समस्या त्याला सोडवायची होती, ती आता- ही अंगठी या लोकांनी त्याच्याकडून काढून घेतल्यास अजिबात सोडवता येणार नव्हती. अंगठीही जाणार होती, आणि समस्याही सुटणार नव्हती. या विचाराने एक्याला दरदरून घाम फुटला. या चार लोकांसमोरून पळून जाणेही शक्य नव्हते. काही क्षणात त्यांनी त्याला पकडलं असतं. आजूबाजूला मदतीला कुणीही दिसत नव्हतं. आणि कुणी असतं, तरी या चौघा जणांची तब्येत पाहता त्याच्या मदतीला धावून आलं नसतंच. हा सगळा विचार चालू असतानाच ही चारही मंडळी त्याच्या अगदी जवळ येऊन ठेपली. यांना विरोध करणं, या मंडळींचा सामना करणं आपल्याला अशक्य आहे हे लक्षात आल्यामुळे एक्याने आता या गुंडांना आपली समस्या सांगून, आपल्याला जाऊ देण्याची विनवणी करण्याची, गयावया करण्याची मनाची तयारी केली. तो काही बोलणार इतक्यात त्यातला एक माणूस त्याच्या अगदी समोर येऊन विचारता झाला, “भाऊ, येथे पंक्चरचे दुकान कुठे आहे हो?”

डोक्यात विचारांचा कल्लोळ माजलेला असल्यामुळे एक्याला क्षणभर काहीच कळलं नाही. मग अचानक भानावर येऊन त्यानं त्या दोन्ही मोटरसायकलच्या टायरवरती नजर टाकली. त्यातील एकाचं टायर पंक्चर झालं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. किंचित आठवून त्यानं पंक्चर काढणाऱ्या जवळच्या एका दुकानाचा पत्ता या मंडळींना सांगितला आणि ते ताबडतोब ‘धन्यवाद’ म्हणून मार्गस्थ झाले.

एक्याने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि झपझप पावले टाकत तो आपल्या घराकडे परतू लागला. घराचा दरवाजा लोटून तो घरात शिरला तो त्याला समोरच्या खाटेवर किसन बसलेला दिसला. हातात चहाचा कप घेऊन बसलेल्या किसनने हसून त्याला आपल्या शेजारी बसायची खूण केली.

किसनच्या शेजारी एक्या बसताच किसनने त्याच्या हातावर एक प्लास्टिकचं पुडकं ठेवलं. आत काय असेल, याचा एक्याला अजिबात अंदाज नव्हता. त्यामुळे त्यानं प्रश्नार्थक नजरेने किसनकडे बघितलं.

“दादा..” किसननं बोलायला सुरुवात केली. “हे एक लाख रुपये हायेत.”

एक्या डोळे विस्फारून किसनकडे पाहू लागला.

“दादाs तुला आज बाळ्याला पैसं द्यायचं आहेत हे मला माहीत आहे. हे पैसं उभं करण्यासाठी तुझे जसे प्रयत्न चालू होते तसेच माझेही चालू होते, पण फारसं काहीच जमलं नाही. म्हनून गेलं दोन महिने बदलापूरची जागा सोडण्याबद्दल मालक काही देतो का, यासाठी मी प्रयत्न करत व्हतो. मालक लाखभर द्यायला तयार व्हता आन मी तीन लाख रुपयांना ठाम होतो. शेवटी काल तो दोन लाख रुपये द्यायला तयार झाला आणि मीही लगेच राजी झालो. काल रातीच पैसं मी माझ्या ताब्यात घेतलं आणि आज हे एक लाख रुपये तुला देतोय. ती जागा आपली दोघांची असूनसुद्धा तू किती बड्या दिलानं मला एकट्याला ती देऊन हिकडं कल्याणला आलास. त्या जागंबद्दल कंदीबी माझ्याकडून कसलीही अपेक्षा धरली न्हाईस. आनी ह्ये बघ.... माझ्यासाठी जागेचं टेनसन घेऊ नकोस. म्या इथल्या तुमच्या गण्या दादाशीबी बोललो हाये. या यक तारखंपासून याच चाळीत त्ये मला एक खोली मिळवून देणार आहेत. आता आपण संमदी आनंदाने राहू एकमेकांजवळ.”

एक्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. त्यानं आपल्या बोटाकडे पाहिलं. दाराच्या फटीतून सोन्याची किरणं त्याच्या त्या बोटावरील अंगठीवर पडली होती आणि त्याच्या ‘बापूची’ ती अंगठी आज विलक्षण तेजाने चमकत होती...

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप सुंदर…..

सगळी मुल्ये धडाक्याने मातीमोल होताना आजुबाजुला पाहतेय, असे काही वाचले की बरे वाटते.

खुप सुंदर!

वडिलांच्या काही आठवणी झर्रकन डोळ्यांसमोरून गेल्या!

धन्यवाद आबा
धन्यवाद मनीमोहोर
@मनीमोहोर - ओ हे हेनरींच्या त्या प्रसिद्ध गोष्टीचे नाव सांगू शकाल? मला वाचायला आवडेल.

अहो, तुमची गोष्ट वेगळी आहेच. पण त्याग, चांगुलपणा वगैरे वाचून आठवण आली एवढच.
ती गोष्ट ओ हेनरीच्या क्लासिक पैकी एक आहे , नाव लक्षात नाही कारण अनेक वर्षापूर्वी वाचली होती. त्यामुळे एवढे डिटेल्स लक्षात नाहीयेत पण साधारण गोषवारा असा आहे.
एक गरीब जोडपं असतं. . नाताळसाठी त्यांना एकमेकांना भेट घ्यायची असते पण त्यांच्याकडे पैसे नसतात. तिच्याकडे एकच मौल्यवान गोष्ट असते ती म्हणजे तिचे लांबसडक सोनेरी केस, ते विकून ती त्याच्या कडे असणाऱ्या घड्याळासाठी एक चेन घेते आणि तो त्याच दिवशी तिचे लांब सडक केस विंचरण्यासाठी ते घड्याळ विकून छान कंगवे घेऊन येतो.

"The Gift of the Magi,"
gutenberg वर वाचायला मिळेल.