लाल रेषा - भाग ९
मोहिमेच्या सुरुवातीला जवानांनी सात संशयितांना ताब्यात घेतले, पण आनंद साजरा करण्यापूर्वीच वायरलेसवर 'पोस्ट दोन'कडून धोक्याची सूचना आली. ताब्यात घेतलेले सात जण केवळ लक्ष भरकटवण्यासाठी सोडलेले 'डिस्ट्रेक्शन' होते. शत्रूचे मुख्य दल पूर्वेकडून मोठ्या संख्येने मुसंडी मारत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी तातडीने दिशा बदलली. त्यांनी शत्रूला एका अरुंद दरीमध्ये, ज्याला लष्करी भाषेत 'किलिंग ग्राऊंड' म्हणतात, तिथे गाठले. नक्षलवाद्यांची एक मोठी तुकडी 'टॅक्टिकल फॉर्मेशन'मध्ये तिथे शिरली. जवानांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले, परंतु समोरून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. लढाई सुरू असतानाच कळाले की शत्रू केवळ दरीत नव्हता, तर ते जवानांना वेढा घालण्याच्या प्रयत्नात होते. टेकडीच्या वरच्या बाजूनेही शत्रूची हालचाल सुरू झाली. याच दरम्यान बॅकअप टीमशी असलेला रेडिओ संपर्क पूर्णपणे तुटला. जवानांची टीम आता जंगलात विलग झाली होती. शत्रूचा पाठलाग करत असताना जवान एका उंच कड्यापाशी पोहोचले. तिथे त्यांना खाली एक 'हाय-लेव्हल बैठक' सुरू असलेली दिसली. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा त्यांना तिथे हिडमे दिसला. हिडमे हा जवानांचा खबऱ्या होता, पण तो तिथे नक्षल कमांडरशी संवाद साधत होता. तो कैदी वाटत नव्हता, तर त्या बैठकीचा एक भाग वाटत होता. "मी अजून कोणाचीच निवड केली नाही," हे हिडमेचे वाक्य त्याच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे होते.
************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग १० - तिची सावली
“डावीकडून कव्हर,” मी अत्यंत धीम्या पण स्पष्ट आवाजात आदेश दिला. “लक्ष्य थेट माणसावर नाही, त्यांच्या हत्यारावर.”
पाटील आणि त्याची तुकडी खाली दरीच्या तोंडाशी झुंजत होती, पण माझ्यासोबत असलेल्या दोन जवानांना आता वेगळ्या सूचनांची गरज नव्हती. दोन सावल्या डावीकडून काटकोनात सरकल्या. आमचं ध्येय स्पष्ट होतं शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करायचा, पण त्या गडबडीत हिडमे किंवा आजूबाजूच्या कोणत्याही निष्पापावर गोळी चालणार नाही याची खबरदारी घ्यायची.
खाली तो कमांडर पुन्हा गर्जला. त्याच्या आवाजात आता मृत्यूची टांगती तलवार होती. “जो स्वतः निवडत नाही,” तो हिडमेच्या डोळ्यांत पाहत म्हणाला, “त्याच्यासाठी आम्ही निवड करतो. आणि ती निवड तुला आवडणार नाही.”
त्याने हाताने अंतिम खुण केली. शत्रूच्या बंदुका हिडमेच्या दिशेने रोखल्या गेल्या. त्याच सेकंदाला ,
धाड!
आमच्या स्नायपरची पहिली गोळी सुटली. हिडमेला पकडून ठेवणाऱ्या नक्षलवाद्याच्या हातातील इन्सास रायफल चिखलात आदळली. त्याने कळवळून आपला हात मागे घेतला. दुसरा काही क्षण चक्रावून गेला. तोच तो 'गोल्डन मोमेंट' होता.
“आता! हल्ला!” मी कड्यावरून झेप घेत ओरडलो.
आम्ही आडोसा सोडून डोंगराच्या उतारावरून वेगाने खाली उतरलो. “हत्यारं खाली! सरेंडर!” माझा आवाज त्या मोकळ्या मैदानात धडकेसारखा बसला.
खाली उभे असलेले नक्षल काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्याकडे संख्याबळ होतं, पण आमची अचानक झालेली एन्ट्री आणि उंचीचा फायदा यामुळे ते गोंधळले. त्यांनी वर पाहिलं, त्यांना आमची दिशा समजली पण त्यांना हेही कळलं की आता आम्ही थेट त्यांच्या 'किलिंग झोन'मध्ये उतरलो आहोत.
मात्र, या वेळी त्यांची प्रतिक्रिया अनपेक्षित होती. त्यांनी लगेच गोळीबार करून आमचा सामना केला नाही. त्या कमांडरने एक शिट्टी वाजवली आणि त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मागे सरकायला सुरुवात केली.
हिडमे त्यांच्या मधोमध उभा होता. तो पळाला नाही, की घाबरून खाली बसला नाही. तो फक्त संथ पावलांनी एका बाजूला झाला. जणू त्याने त्या क्षणी स्वतःला या दोन्ही बाजूंमधील हिंसक संघर्षातून मानसिकरित्या बाहेर काढलं होतं.
मी खाली मैदानात पोहोचलो. पाटील सोबत नसल्यामुळे माझ्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारचा अतिसावधपणा होता. टीम माझ्या पाठीशी ढाल बनून उभी होती.
समोरचा तो नक्षल नेता अजूनही तिथेच स्थिर होता. त्याने सावकाश माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना पराभवाची छटा. तो एखाद्या कुशल बुद्धीबळ खेळाडूसारखं माझं निरीक्षण करत होता.
“तुम्ही पुन्हा उशीर केलात, ऑफिसर,” तो कमांडर शांतपणे म्हणाला.
मी त्याची नजर ओलांडून हिडमेकडे पाहिलं आणि म्हणालो, “आता नाही. या वेळी आम्ही योग्य वेळी पोहोचलो आहोत.”
त्या कमांडरने हलकंसं स्मित केलं. मग तो एका लयीत मागे वळला. त्याच्या मागचे सर्व सशस्त्र नक्षल एखाद्या सावलीसारखे दाट झाडीत विरून गेले. काही सेकंदातच तिथे फक्त आम्ही आणि शांतता उरली.
गोळीबार झाला नव्हता. रक्ताचा एक थेंबही सांडला नव्हता. पण तरीही, तिथे काहीतरी खूप मोठं तुटलं होतं.
मी हिडमेकडे चालत गेलो. तो तिथेच, त्या ओल्या मातीवर उभा होता. त्याने नजर वर केली. त्या नजरेत आता भीतीचा अंशही नव्हता. तिथे फक्त एक 'स्वीकार' होता.
“का, हिडमे? तू त्यांच्याकडे का चालला होतास?” मी विचारलं.
तो काही क्षण शांत राहिला. त्याच्या भोवतीचं जंगल पुन्हा एकदा आपल्या जुन्या आवाजांत जिवंत होऊ लागलं होतं. मग तो खोल आवाजात म्हणाला , “कारण एकाच वेळी दोन्ही बाजूंच्या होडीत पाय ठेवून जगणं शक्य नाही, साहेब.”
मी निरुत्तर झालो.
तो पुढे म्हणाला “आणि निवड करायला जर जास्त उशीर केला, तर मग ती निवड आपली राहत नाही. ती वेळ ठरवते. मी आज माझी निवड केली आहे.”
त्याच्या त्या एका वाक्याने सगळं चित्र स्पष्ट झालं. हिडमेने आपल्याला मदत केली होती, पण आज त्याने या युद्धाला कायमचा पूर्णविराम दिला होता.
मी मागे वळून पाहिलं. माझी टीम रायफल्स रोखून उभी होती. जंगल पुन्हा एकदा शांत झालं होतं.
नक्षल मागे हटले होते, हिडमे वाचला होता, पण या निर्णयाचा खरा परिणाम आता पुढच्या काही तासांत समोर येणार होता. कारण जंगलातली शांतता कधीच विनामूल्य नसते.
हिडमेचं ते वाक्य अजूनही माझ्या कानात घुमत होतं “उशीर केला, तर निवड आपली राहत नाही.”
त्या शब्दांमध्ये केवळ सावधगिरी नव्हती, तर एक प्रकारची जीवघेणी हतबलता होती. हे एका अशा माणसाचे बोल होते ज्याने गडचिरोलीच्या या रक्तरंजित संघर्षात खूप काही गमावलं होतं. मी त्याच्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिलो. तो आता प्रत्यक्ष माझ्या समोर उभा होता, पण त्याचं मन नक्की कोणत्या बाजूला झुकलंय, हे धुक्यासारखं अस्पष्ट होतं. तो आम्हाला विजयाकडे नेतोय की थेट मृत्यूच्या जबड्यात, याचा फैसला आता काही तासांतच होणार होता.
“ते कुठे जात आहेत, हिडमे?” मी माझा आवाज इतका खाली ठेवला की तो केवळ त्यालाच ऐकू जाईल.
हिडमेने थोडा वेळ घेतला. त्याने मान फिरवून आजूबाजूला पाहिलं. रात्रीच्या त्या भयाण शांततेत झाडांच्या पानांची होणारी सळसळही एखाद्या संशयास्पद हालचालीसारखी भासत होती. त्याला खात्री करून घ्यायची होती की अंधारात एखादा नक्षली लपून आमचं संभाषण तर ऐकत नाहीये ना.
“ते इथे थांबणार नाहीत, साहेब,” तो अखेर म्हणाला. “ही जागा फक्त मार्गातला एक छोटा थांबा आहे. त्यांचं खरं ठिकाण अजून पुढे आहे.”
माझा संशय आता खरा ठरला होता. नक्षलवादी कधीच एका जागी जास्त वेळ मुक्काम करत नाहीत, पण त्यांची ही हालचाल एखाद्या मोठ्या कटाची तयारी असल्यासारखी वाटत होती.
“मग त्यांचं मुख्य ठिकाण कुठे आहे?” मी विचारलं.
तो थोडा जवळ आला, त्याचा घामाचा वास आणि गनपावडरचा दर्प माझ्या नाकात शिरला. तो दबल्या आवाजात म्हणाला “नाल्याच्या पलीकडे… जिथे दाट पट्टा सुरू होतो ना, तिथे एका खोल दरीत त्यांचा मुख्य तळ आहे.”
माझ्या टीममधील दोघा जवानांनी एकमेकांकडे सूचक नजरेने पाहिलं. हा तोच 'डेड झोन' होता, जो आम्ही हेडक्वार्टरमधील नकाशावर लाल शाईने मार्क केला होता. आजवर तिथे जाण्याची हिंमत कोणीच केली नव्हती, कारण तिथली भौगोलिक रचना म्हणजे नैसर्गिक मृत्यूचा सापळाच होती.
“किती जण आहेत तिथे?” मी विचारलं.
“संख्या सांगणं कठीण आहे, साहेब,” हिडमेच्या आवाजात आता भीती स्पष्ट जाणवत होती. “ते मुंग्यांसारखे विखुरलेले असतात. पण एका गोष्टीची खात्री ठेवा... तुम्ही आजवर जितके नक्षल पाहिलेत, त्याच्या किमान दुप्पट तरी तिथे सध्या जमा झाले आहेत.”
त्या उत्तराने वातावरणातला तणाव एकदम वाढला. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. बॅकअपसाठी पाटीलला बोलवावं तर संपर्क तुटलेला होता. मागे फिरावं तर हातात आलेली ही सुवर्णसंधी कायमची निसटणार होती.
“आपण पुढे जाणार,” मी ठामपणे म्हणालो. माझ्या आवाजातला निर्धार पाहून जवानांच्या हाताची पकड आपल्या रायफल्सवर घट्ट झाली.
हिडमेने साशंकतेने माझ्याकडे पाहिलं. “तुम्ही तिथे गेलात, तर ते आधीच तयारीत असतील साहेब.”
मी शांतपणे उत्तर दिलं “म्हणूनच आपण त्यांच्या कल्पनेपेक्षा आधी तिथे पोहोचायचं.”
आम्ही पुढची वाट धरली. रस्ता एखाद्या दुस्वप्नासारखा कठीण होता. नाल्याच्या दिशेने उतरताना जमीन चिखलमय आणि कमालीची निसरडी होती. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट झाडी. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं.
काही अंतरावर नाल्याचा झुळझुळ आवाज ऐकू येऊ लागला. मी हाताने 'होल्ड'ची खूण केली. आम्ही सगळे जागच्या जागी खिळलो. मी नाईट-व्हिजन दुर्बिणीतून समोरचा भाग 'स्कॅन' केला. पहिल्या नजरेला तिथे फक्त झाडं आणि अंधारच दिसत होता.
पण मग हिडमेने माझ्या कानाजवळ कुजबुजत म्हटलं “इथेच, साहेब. त्या मोठ्या मोहाच्या झाडाच्या खाली नीट बघा.”
मी पुन्हा लक्ष केंद्रित केलं. आणि मग तो थरार दिसला. पाण्याच्या काठाजवळ, झाडांच्या लांबट सावलीत एक मानवी सावली हलली. तो एक नक्षल पहारेकरी होता, खांद्याला एस.एल.आर. लावून तो पूर्णपणे सावध उभा होता. आता आम्ही त्यांच्या मुख्य वर्तुळात शिरलो होतो.
आम्ही पोटावर सरपटत पुढे सरकलो. नाल्यातील पाण्याचा खळखळाट आमच्या बुटांच्या आवाजाला लपवून टाकत होता, जे आमच्या पथ्यावरच पडलं होतं. दुसऱ्या बाजूला पोहोचलो आणि अचानक जंगल एखाद्या पडद्यासारखं बाजूला झालं. समोर एक विस्तीर्ण मोकळी जागा होती, जिथे नैसर्गिकरीत्या खडकांनी एक तटबंदी तयार केली होती.
आणि तिथे जे दृश्य दिसलं, त्याने माझे डोळे विस्फारले गेले. तिथे किमान ४० ते ५० सशस्त्र नक्षलवादी होते. कोणी शस्त्रं साफ करत होतं, तर कोणी कंदिलाच्या उजेडात कसल्यातरी नकाशावर चर्चा करत होतं. हे एखाद्या छोट्या तुकडीचं काम नव्हतं, ही त्यांची 'मेन स्ट्राईक फोर्स' होती.
मी श्वास रोखून धरला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. या वेळी नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं.
तेवढ्यात, त्या गर्दीतून एक आकृती उठली. कंदिलाचा फिकट पिवळसर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि माझ्या शरीरातून एक विजेची लहर गेल्यासारखा तीव्र झटका बसला. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मेंदूने विचार करणं थांबवलं होतं.
ती… तीच होती. क्षणभर माझ्या मनाने पुन्हा तोच जुना, चुकीचा निष्कर्ष काढला तीच! तीच मुलगी जिचा मृतदेह मी पाहिला होता.
पण जशी माझी नजर एखाद्या कॅमेऱ्याच्या लेन्ससारखी स्थिर झाली, तसं लक्षात आलं की ती ती नव्हती. चेहरा हुबेहूब तसाच होता, डोळ्यांची ठेवण आणि हालचालीही सारख्याच होत्या, पण या मुलीच्या डोळ्यांत अजून तो जुना, हिंस्त्र कठोरपणा आला नव्हता. त्या डोळ्यांत अजूनही निरागसता आणि कमालीची भीती शिल्लक होती. ती मुलगी वयाने खूपच लहान होती.
“ती कोण आहे, हिडमे?” मी दबल्या आवाजात विचारलं.
हिडमेचे हात थरथरत होते. त्याने घोकून सांगितल्यासारखं उत्तर दिलं, “ती तिची धाकटी बहीण... रेश्मा. हुतात्मा झालेल्या मुलीची बहीण.”
त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. नक्षलवाद्यांना आपल्या चळवळीसाठी नवीन 'ब्रँड' आणि नवीन 'रक्ता'ची गरज होती. एका मेलेल्या मुलीच्या बहिणीला शस्त्र हाती द्यायला लावून तिला न्यायाचं प्रतीक म्हणून उभं करण्यापेक्षा चांगलं हत्यार त्यांच्याकडे दुसरं नव्हतंच. ही पुन्हा एकदा एका नवीन विनाशाची सुरुवात होतीएका नवीन वहीची आणि एका निष्पाप आयुष्याच्या अंत होण्याची.
नाल्याच्या पलीकडचा तो विस्तीर्ण पट्टा बाहेरून शांत आणि साधा दिसत होता, पण जसा मी आत पाऊल टाकलं, तसं तिथल्या रचनेमागचा एक क्रूर 'मिलिटरी माइंड' मला जाणवला. तिथे झाडांची नैसर्गिक तटबंदी अशा प्रकारे वापरली होती की बाहेरून येणाऱ्याला आतलं काहीच दिसू नये, पण आतून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येईल. मधल्या मोकळ्या भागाभोवती तयार झालेली ती अभेद्य वर्तुळं म्हणजे शत्रूसाठी एक सुरक्षित किल्लाच होता. इथे सावल्यांच्या आडोशाने हालचाल करणं सोपं होतं, पण अनोळखी व्यक्तीसाठी इथला एकही अडथळा पार करणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं.
मी हाताने जमिनीला समांतर इशारा केला आणि माझी टीम जागीच खिळली. हिडमे माझ्या अगदी जवळ होता, त्याचा श्वास जड झाला होतातो भीतीमुळे होता की त्याच्या डोळ्यांसमोरून जात असलेल्या जुन्या आठवणींमुळे, हे सांगणं कठीण होतं. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते.
“बाहेरच्या सीमेला पहारेकरी असतील, साहेब,” तो माझ्या कानाजवळ कुजबुजला. “हे लोक जमिनीपेक्षा जास्त झाडांच्या शेंड्यावर किंवा खडकांच्या कपारीत लपलेले असतात. एकाने शिट्टी वाजवली की आख्खा तळ सावध होतो.”
आम्ही सरळ जाण्याचा आत्मघातकी मार्ग पत्करण्याऐवजी वळसा घेण्याचं ठरवलं. रात्र चढली होती. झाडांच्या घनदाट आणि काळपट सावल्यांचा आडोसा घेत आम्ही संथपणे, एखाद्या शिकारी प्राण्यासारखे पुढे सरकलो. काही अंतरावर एका जुन्या, काटेरी बाभळीच्या झाडामागे हालचाल दिसलीएक सडपातळ माणूस, हातात रशियन बनावटीची एस.के.एस. रायफल घेऊन बाहेरच्या दिशेने नजर रोखून होता. तो खूपच सावध होता, पण आम्ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असल्याने त्याला आमचा गंध लागला नाही.
मी फक्त हाताने सांकेतिक खूण केली. डावीकडचा माझा सर्वात भरवशाचा जवान, पवार, एखाद्या बिबट्यासारखा अलगद पुढे सरकला. वाळलेल्या पानांचा एकही आवाज न होऊ देता त्याने त्या पहारेकऱ्याला मागून गाठलं. पवारच्या हालचालीत एक वेगळीच 'एफिशियन्सी' होती. त्याने एका हाताने त्याचं तोंड दाबून दुसऱ्या हाताने मानेचा एक ठराविक 'नर्व्ह पॉईंट' इतक्या जोरात दाबला की कोणताही आवाज न होता तो पहारेकरी जागीच कोलमडला.
आता मुख्य तळाचा मार्ग आमच्यासाठी तांत्रिकदृष्ट्या खुला होता.
आम्ही पोटावर सरपटत पुढे सरकलो आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मधल्या त्या मोकळ्या जागेत नक्षलवाद्यांचे वेगवेगळे गट जमा झाले होते. कोणाच्या पाठीवर जड किट-बॅग्स होत्या, तर कोणी शस्त्रं तपासत होतं; जणू काही ते एखाद्या लांबच्या प्रवासाची किंवा मोठ्या हल्ल्याची तयारी करत होते. पण माझं लक्ष खिळलं होतं त्या वर्तुळाच्या अगदी मध्यभागी उभी असलेल्या एका आकृतीवर.
तळावर हालचाल वाढली. तो नक्षल नेता, जो मगाशी दरीत आपल्या क्रूरतेचा परिचय देऊन गेला होता, तो पुन्हा एकदा समोर आला. त्याचं चालणं शांत पण जरब बसवणारं होतं. तो रेश्मासमोर जाऊन थांबला. कंदिलाचा थरथरणारा उजेड तिच्या सावळ्या चेहऱ्यावर भीतीचं एक वेगळंच जाळं विणत होता.
“इथून मागे फिरायचा रस्ता नसतो, पोरी,” तो अत्यंत थंड आणि निर्विकार आवाजात म्हणाला. त्याचा आवाज रात्रीच्या शांततेत एखाद्या चाबकाच्या फटक्यासारखा बसला.
रेश्मा गप्प राहिली, तिची नजर मातीने माखलेल्या जमिनीकडे खिळली होती. तिच्या अंगाचा थरकाप मला दुरूनही जाणवत होता.
“एकदा या जंगलात पाऊल ठेवलंस की बाहेर पडायचा निर्णय तुझा राहत नाही... तो या शस्त्राचा असतो,” असं म्हणत त्याने एक छोटी, काळ्या रंगाची पिस्तूल तिच्यासमोर धरली.
मी माझ्या टीमकडे पाहिलं. प्रत्येकाच्या नजरेत आता एकच भावना होती. हा आता केवळ एखादा 'इंटेलिजन्स रिपोर्ट' गोळा करण्याचा क्षण नव्हता. हा एक निष्पाप जीव वाचवण्याचा अंतिम क्षण होता. जर आता आम्ही हल्ला केला नाही, तर काही दिवसांत ही मुलगी एका 'कोल्ड ब्लडेड' नक्षलवाद्यात रूपांतरित होणार होती आणि मग तिला परत आणणं अशक्य होतं.
मी माझ्या रायफलचा सेफ्टी कॅच हळूच, कोणताही आवाज न करता खाली केला.
पाटीलची टीम मागे कुठेतरी अडकली होती, वायरलेस संपर्क तुटलेला होता आणि आमच्या समोर शत्रूची संख्या आमच्या पाचपट होती. पण त्या मुलीच्या डोळ्यांतील ती अगतिकता पाहून एक गोष्ट स्पष्ट होती मागे फिरणं आता आमच्या रक्तात नव्हतं.
झाडांच्या फांद्यांतून गाळणी होऊन येणारं फिकट चांदणं रेश्माच्या चेहऱ्यावर पडलं होतं. तिचे डोळे विस्फारलेले होते, त्यात भीतीपेक्षा जास्त 'अगतिकता' होती. आपल्याच माणसांनी आपल्याला अशा मृत्यूच्या उंबरठ्यावर आणून उभं करावं, याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
हिडमे माझ्या अगदी जवळ होता. त्याच्या हाताची पकड एका झाडाच्या मुळावर इतकी घट्ट होती की त्याच्या नसा फुगल्या होत्या. “साहेब, आता जे करायचंय ते लवकर करा,” तो रडवेल्या स्वरात कुजबुजला.
मी माझ्या रायफलची 'बट' खांद्याला घट्ट लावली. माझ्या टीममधले दोन जवान, सावंत आणि शिर्के, डावीकडून सरपटत अशा जागी पोहोचले होते जिथून त्यांना शत्रूचा 'साईड व्ह्यू' मिळणार होता.
मी श्वास रोखला आणि ओरडलो, “कव्हरिंग फायर... सुरू करा!”
'टॅssक-टॅssक-टॅssक!'
आमच्या पहिल्या तुकडीने शत्रूच्या पहरेकऱ्यांवर अचूक मारा केला. पण कमांडरच्या जवळ असलेल्या नक्षलवाद्यांनी तात्काळ 'बॅटल पोझिशन्स' घेतल्या. ते काही साधे गावकरी नव्हते; त्यांच्या हालचालीत लष्करी शिस्त होती. त्यांनी रेश्माला मध्यभागी ठेवून तिच्याभोवती एक मानवी भिंत तयार केली.
“शस्त्रं खाली टाका! तुम्हाला चारही बाजूंनी घेरलं आहे!” मी आडोशातून जोरात ओरडलो. हा केवळ एक मानसिक बनाव होता. मला माहित होतं की पाटीलची टीम अजून पोहोचलेली नाही, पण शत्रूच्या मनात शंका निर्माण करणं गरजेचं होतं.
तो नेता ज्याला हे लोक 'मास्टर' म्हणत होते तो अजिबात डगमगला नाही. त्याने एक हात रेश्माच्या खांद्यावर ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर हसू काळजात धडकी भरवणारं होतं.
“तुम्ही वर्दीवाले नेहमीच उशिरा पोहोचता,” तो ओरडला. त्याचा आवाज गोळीबाराच्या आवाजाला चिरून माझ्यापर्यंत पोहोचला. “आज ही मुलगी आमच्यासाठी हुतात्मा होईल, आणि उद्या अख्खं गडचिरोली तुमच्या रक्ताने माखेल!”
त्याच्या या वाक्याने रेश्माच्या शरीरात एक थरकाप सुटला. तिला समजलं होतं की तिचे 'रक्षक'च आता तिचे 'भक्षक' बनले आहेत.
मी पाहिलं, कमांडरने रेश्माला जोरात समोर ढकललं. तो तिला आमच्या गोळीबाराच्या रेषेत (Line of Fire) आणत होता. “सावंत, सीझ फायर! फायर थांबवा!” मी ओरडलो. आमची बोटं ट्रिगरवर थबकली. हीच त्या कमांडरची चाल होती. आम्ही गोळीबार थांबवताच त्यांनी 'काऊंटर अटॅक' सुरू केला.
अंधारात 'मझल फ्लॅश' चमकू लागले. गोळ्या झाडांच्या खोडांना लागून ठिणग्या उडवत होत्या. मातीचा आणि गनपावडरचा वास हवेत भरला होता.
“हिडमे, इथून उजवीकडे एक जुनी पायवाट जाते ना?” मी ओरडून विचारलं.
“हो साहेब, पण ती पूर्णपणे झाडांनी झाकलेली आहे,” हिडमे म्हणाला.
“तिथून जा आणि तिला आवाज दे. तुझा आवाज ती ओळखते. तिला कसंही करून डाव्या बाजूच्या खडकांकडे खेच!”
हिडमेने एक क्षण माझ्याकडे पाहिलं आणि अंधारात एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखा अदृश्य झाला.
मैदानात आता विचित्र परिस्थिती होती. शत्रू मागे सरकत होता, पण रेश्माला त्यांनी एका 'शिल्ड'सारखं वापरलं होतं. ती मुलगी रडत होती, ओरडत होती, पण गोळ्यांच्या आवाजात तिचं अस्तित्व पुसलं जात होतं.
अचानक, दाट झाडीतून हिडमेचा ओरडण्याचा आवाज आला. तो त्याच्या स्थानिक बोलीत (गोंडीत) काहीतरी ओरडत होता. रेश्मा दचकली. तिने डोकं वर काढलं. तिची नजर हिडमे लपला होता त्या दिशेला वळली.
कमांडरचं लक्ष विचलित झालं. त्याने आपली पिस्तूल रेश्माच्या डोक्याला लावली. “हलू नकोस!” तो गरजला.
नेमका तोच क्षण होता. मी आडोसा सोडला आणि एका बाजूने धावत रेश्माच्या दिशेने झेपावलो. माझ्या टीमने बेछूट गोळीबार करून शत्रूला खाली मान घालायला लावली.
तो ट्रिगर दाबणार, तितक्यात एक गोळी त्याच्या हाताला चाटून गेली. त्याचा नेम चुकला. रेश्माने संधी साधली आणि तिने त्याच्या हाताला जोरात चावा घेतला. तो कळवळला.
मी तिच्या जवळ पोहोचलो आणि तिला जोरात पकडून जमिनीवर लोळवलं. “खाली राहा!” मी तिच्या अंगावर स्वतःला झोकून दिलं.
आमच्या डोक्यावरून गोळ्यांचा पाऊस पडत होता. शत्रू आता बिथरला होता. त्या कमांडरला समजलं होतं की त्याचं 'सावज' आता त्याच्या हातातून निसटलं आहे. त्याने संतापाने एक शेवटचा फायर केला आणि तो आपल्या उरलेल्या सहकाऱ्यांसह जंगलाच्या अशा भागात गायब झाला, जिथे पाठलाग करणं आत्मघातकी होतं.
जंगल पुन्हा एकदा शांत झालं. रेश्मा माझ्या कुशीत थरथरत होती. तिचे कपडे फाटले होते, चेहरा चिखलाने माखला होता, पण ती जिवंत होती.
मी तिला उभं केलं. हिडमे धावत बाहेर आला. त्याने रेश्माला पाहिलं आणि त्याचे डोळे भरून आले.
पण खेळ अजून संपला नव्हता. कारण पळून जाताना त्या कमांडरने मागे वळून माझ्याकडे पाहिलं होतं. त्या नजरेत एक स्पष्ट निरोप होता 'हा शेवट नाही, ही तर केवळ सुरुवात आहे.'
आम्ही चालायला सुरुवात केली. टीमने रेश्माला मध्यभागी ठेवून एक सुरक्षित मानवी कवच तयार केलं होतं. जंगल मागे सरकत होतं, पण रेश्माच्या चेहऱ्यावरचा तो प्रश्न अजूनही तसाच होता. ती खरोखर बाहेर आली होती, की आम्ही तिला एका चक्रव्यूहातून काढून दुसऱ्या, अधिक भयंकर चक्रव्यूहात नेत होतो?
जंगल आम्हाला जाताना पाहत होतं. तिथे आता एकही शत्रू दिसत नव्हता, पण प्रत्येक झाडाच्या पाठीमागे एक डोळा असल्याचा भास होत होता.
आम्ही तिला वाचवलं होतं खरं, पण या सुटकेची किंमत काय असणार, हे फक्त येणारा काळच सांगणार होता.
हा अधिकारी संधी मिळून सुद्धा
हा अधिकारी संधी मिळून सुद्धा त्या कमांडरला मारत का नाही? दोन तीन वेळा ते आमनेसामने आले होते.
कारण ही फक्त एका माणसाला
कारण ही फक्त एका माणसाला संपवण्याची लढाई नव्हती.
तो कमांडर म्हणजे संपूर्ण जाळ्याचा एक भाग होता. त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या क्षणी समोर फक्त शत्रू नव्हता.
गावकरी होते, एक मुलगी होती, आणि चुकीचा निर्णय घेतला असता
तर निरपराध लोक मेले असते.
खुपच उत्कंठावर्धक. छान
खुपच उत्कंठावर्धक. छान लिहिलेय.
धन्यवाद साधना!
धन्यवाद साधना!