पूर्वभाग
कॅम्पमधून तातडीने बाहेर पडल्यानंतर पथक गावाच्या वेशीवर पोहोचले. तिथे नेहमीचा राबता नसून गाव पूर्णपणे रिकामे वाटत होते. शोध घेतला असता, गावकरी दहशतीखाली एका मैदानात गोळा झाले होते आणि नक्षल कमांडर त्यांना धमकावत होता. नकार देणाऱ्या मुलाचे (ज्याचा मृतदेह जवानांनी शोधला होता ) उदाहरण देऊन शत्रू गावकऱ्यांचा उरला-सुरला प्रतिकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत होता. गावकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जवानांनी थेट गोळीबाराऐवजी 'सर्जिकल' अचूकतेचा वापर केला. स्नायपरच्या एका अचूक गोळीने नक्षल कमांडरच्या हातातील शस्त्र उडवले, ज्यामुळे नक्षल गोंधळले. या संधीचा फायदा घेऊन जवानांनी झडप घातली, परंतु मुख्य नक्षल कमांडर जंगलाच्या अंधारात विरून गेला. कॅम्पमध्ये परतल्यानंतर जवानांनी नक्षलींच्या हालचालींचा नकाशावरून अभ्यास केला. ते आपल्याला विशिष्ट जाळ्यात ओढत असल्याचे लक्षात आल्यावर, जवानांनी उलट सापळा रचला. नक्षल ज्या मार्गाने एकत्र येणार होते (कॅम्पच्या मागची टेकडी), तिथे जवानांनी आधीच मोर्चेबांधणी केली. मध्यरात्री नक्षल तुकड्या-तुकड्यांनी ठरलेल्या ठिकाणी एकत्र आले. जसे ते मोकळ्या जागी पोहोचले, जवानांनी त्यांना तिन्ही बाजूंनी वेढले. कोणत्याही गोळीबाराशिवाय, पूर्णपणे कोंडीत पकडल्या गेल्याचे लक्षात येताच नक्षल्यांना शरणागती पत्करावी लागली. जवानांनी शत्रूच्याच चालीचा वापर करून हा मानसिक आणि लष्करी विजय मिळवला. पण हा विजय खरंच विजय होता कि प्रतिसापळा?
************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग ९ - निवडीचे स्वातंत्र्य
पकडलेल्या त्या सात जणांना ताब्यात घेत असतानाच, वायरलेस खरखरला आणि शांतता भंग पावली.
“पोस्ट दोन, हालचाल दिसतेय. संख्या जास्त आहे, सर. रिपीट, संख्या खूप जास्त आहे!”
मी तत्काळ रेडिओ कानाला लावला. “दिशा सांग, पवार ?”
“पूर्वेकडून, सर. अगदी वेगाने... ते 'पॅरलल' हालचाल करतायत!”
माझ्या डोक्यात विखुरलेले सगळे तुकडे एका क्षणात जोडले गेले आणि क्षणभर छातीत धस्स झालं. हे समोर उभे असलेले सात जण... हे मुख्य शिकारी नव्हतेच मुळी. हे तर आमचं लक्ष भरकटवण्यासाठी फेकलेलं 'डिस्ट्रेक्शन' होतं! मुख्य तुकडी दुसऱ्या बाजूने मुसंडी मारत होती.
मी जीवाच्या आकांताने ओरडून आदेश दिला, “पाटील हे पहिलं पथक फक्त आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी होतं. मुख्य दल पूर्वेकडून आत शिरतंय!”
पाटीलने एक क्षणही न घालवता परिस्थिती ताडली. “तुम्ही दोघं इथेच थांबा, या सात जणांना बांधून ठेवा. बाकीचे माझ्यासोबत येतील, 'फास्ट मूव्ह'!”
आम्ही लगेच दिशा बदलली. पकडलेले ते सात जण आता गौण झाले होते. त्या घनदाट जंगलात आता हालचाल कमालीची वाढली होती. काही क्षणांपूर्वी जिथे श्वास रोखणारी शांतता होती, तिथे आता सूक्ष्म पण ठाम आवाज घुमू लागले होते सुक्या पानांचा चुरचुर आवाज आणि फांद्या तुटण्याचे विशिष्ट संकेत. त्यांचा समन्वय अचूक होता.
आम्ही एक उतार वेगाने पार केला. समोर एक अरुंद दरीसारखा भाग होता दोन्ही बाजूंनी उंच पाषाणी कडे आणि मध्ये मोकळी, सखल जमीन. लष्करी भाषेत याला 'किलिंग ग्राऊंड' म्हणतात. अशा जागेत जो आधी पोझिशन घेतो, तोच जिवंत राहतो.
मी हाताने 'होल्ड'चा इशारा केला. “इथंच... याच कड्याच्या आडोशाला!” मी दबल्या आवाजात म्हणालो.
आता आम्ही त्यांची वाट पाहत नव्हतो, आम्ही त्यांना जाणीवपूर्वक या मृत्यूच्या दरीत खेचून आणलं होतं. काही सेकंद एखाद्या युगासारखे भासले. मग पहिली काळी सावली अंधारातून बाहेर आली. ती थांबली नाही, तिला स्वतःच्या वेगावर खात्री होती. तिच्या मागोमाग दुसरी, तिसरी, चौथी...
या वेळी संख्या मोठी होती. ते धावत नव्हते, तर एका विशिष्ट 'टॅक्टिकल फॉर्मेशन'मध्ये जलद गतीने पुढे सरकत होते. त्यांना खात्री होती की पुढचा मार्ग मोकळा आहे आणि जवान सात जणांच्या तुकडीत अडकले आहेत.
मी श्वास रोखून माझ्या रायफलच्या 'साईट्स'मधून त्या हालचाली टिपत होतो. त्यांचा म्होरक्या दरीच्या बरोबर मध्यभागी आला. त्याच्या मागे संपूर्ण रांग उघड्यावर आली.
मी पाटीलकडे पाहिलं. त्याच्या बोटांनी ट्रिगरवरची पकड घट्ट केली होती. मी हलकीच मान हलवली.
आणि पुढच्या क्षणी, त्या शांत जंगलात आमचा आवाज वीज कोसळल्यासारखा घुमला “हॉल्ट! शस्त्रं खाली ठेवा!”
पण यावेळी समोरचं चित्र मगासारखं नव्हतं. हे लोक घाबरणारे नव्हते. त्यांनी क्षणात प्रतिक्रिया दिली. पहिल्या माणसाने डावीकडे झेप घेतली, दुसऱ्याने आपली स्वयंचलित बंदूक खांद्याला लावली.
'टॅssक... टॅssक!' पहिली गोळी आमच्या दिशेने झाडली गेली आणि त्यासोबतच संपूर्ण दरी गोळीबाराच्या आवाजाने हादरली. जंगल पुन्हा एकदा जिवंत झालं. पानं छिन्नविछिन्न झाली, दगडांवरून ठिणग्या उडाल्या आणि अंधारात केवळ 'मझल फ्लॅश' (बंदुकीच्या नळीतून निघणारा प्रकाश) दिसू लागला.
मी एका मोठ्या खडकाचा आडोसा घेतला. गोळ्या माझ्या डोक्यावरून शिट्ट्या वाजवत जात होत्या. पाटील माझ्या बाजूलाच पोझिशन घेऊन होता.
“सर, ते अपेक्षेपेक्षा जास्त आहेत! ते 'फ्लँकिंग' (बाजूने वेढा घालणे) करतायत!” तो ओरडून सांगत होता.
मी उत्तर दिलं नाही. कारण आता शत्रू मोजण्याची वेळ संपली होती. समोरच्या काळोखात शत्रूच्या हालचाली थांबत नव्हत्या. ते गोळीबार करतच स्वतःला पुढे रेटत होते.
त्या क्षणी एक गोष्ट लख्ख झाली हा सापळा आम्ही लावला होता खरा, पण शत्रूच्या वाढत्या संख्येमुळे आता त्या सापळ्यात आम्हीसुद्धा तितकेच अडकलो होतो. ही लढाई आता केवळ रणनीतीची उरली नव्हती... ती आता आमचा जगण्यासाठीचा संघर्ष झाली होती.
“ते विखुरलेत, सर! 'ओपन फॉर्मेशन' घेत आहेत!” पाटील ओरडला.
मी डोकं खाली ठेवून समोरचा अंदाज घेतला. दरीत अडकलेले ते नक्षल आता थेट भिडत नव्हते; ते बाजूच्या उतारांकडे सरकत होते. याचा अर्थ स्पष्ट होता ते आपल्याला एका जागी खिळवून ठेवण्याचा (Pinning down) प्रयत्न करत होते, जेणेकरून त्यांचं मुख्य पथक बाजूने वळसा घालून आम्हाला कात्रीत पकडेल.
क्षणभरात चित्र स्पष्ट झालं. आपण जाळं टाकलं होतं खरं, पण त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचे 'एक्झिट रूट्स' आधीच आखले होते.
“पवार , डावा उतार सील करा! त्यांना वर चढू देऊ नका!” मी ओरडून आदेश दिला.
दोन जवान लगेच सावलीसारखे सरकले. त्यांची हालचाल वेगवान होती, पण बेफिकीर नव्हती. त्या अंधारात प्रत्येक पाऊल मृत्यूला स्पर्श करून टाकावं लागत होतं. गोळीबार कधी कमी व्हायचा, तर कधी अचानक तीव्र व्हायचा. पण तो थांबत नव्हता. समोरचे केवळ वेळ खेचत होते. आणि वेळ म्हणजे त्यांच्यासाठी सुटकेची संधी.
मी रेडिओ उचलला, बटन दाबून विचारलं, “पोस्ट तीन, स्थिती सांगा. बॅकअप कुठे आहे?”
काही सेकंद फक्त 'स्टॅटिक' खरखर ऐकू आली. मग तुटक, भेदरलेले शब्द कानावर पडले “हालचाल… वरच्या बाजूने… टेकडीवर… संख्या… स्पष्ट नाही… खुss… खुss…”
आणि अचानक सिग्नल पूर्णपणे गेला.
मी पाटीलकडे पाहिलं. त्यानेही तेच ऐकलं होतं. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या.
“ते वरून येतायत, सर,” तो पुटपुटला.
माझ्या डोक्यात आता सगळं गणित वेगाने सुटू लागलं. समोरचा गट आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी होता. बाजूचा उतार निसटण्यासाठी होता. आणि वरचा मार्ग
“घेराव (Encirclement)!” मी हळू आवाजात म्हणालो.
पाटीलने चटकन परिस्थिती ताडली. “आपण 'डेथ झोन'च्या मधोमध आहोत. इथून निघालं पाहिजे.”
त्या एका क्षणात मृत्यूशी झुंज देणारा निर्णय घ्यायचा होता. इथेच थांबून लढायचं की जागा बदलायची? दरीत थांबलो तर आपण 'सिटिंग डक' (सोपं लक्ष्य) होणार होतो, पण बाहेर पडताना आपण उघड्यावर येणार होतो.
“माघारी फिरायचं नाही,” मी ठामपणे म्हणालो. “आपण त्यांच्यावरच उलट चढाई करायची. वरच्या बाजूला सरका!”
पाटीलने एक सेकंदही न घालवता कडक आदेश दिले. “लाईन बदल उजवीकडून 'कव्हरिंग फायर' देत वर चला!”
जवानांनी तात्काळ हालचाल केली. गोळीबाराच्या आडून, एकमेकांना कव्हर देत ते जागा बदलू लागले. तो समन्वय अफलातून होता. मी शेवटचा सरकलो. पाठीमागे अजूनही गोळ्या झाडल्या जात होत्या, पण आता त्यांचा हेतू केवळ आम्हाला एका जागी थांबवून ठेवणं हाच होता.
उतार चढताना पाय घसरत होते, माती सैल होती आणि अंधारात झाडांच्या मुळांना पकड मिळवणं कठीण होतं. पण थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं. काही अंतरावर पोहोचल्यावर आम्ही एका सुरक्षित आडोशापाशी थांबलो. इथून खालचं दृश्य वेगळं होतं. दरीत अजूनही गोळीबार सुरू होता, पण समोरच्या बाजूने पुन्हा नवी हालचाल दिसली. ते अजूनही येत होते. पण त्यांची दिशा आता आमचा गट नव्हती.
पाटीलने कुजबुजत विचारलं, “सर… संख्या खूपच जास्त आहे. ते आपल्यावर हल्ला का करत नाहीत?”
मी उत्तर दिलं नाही, फक्त दुर्बिणीतून तो अंधार पिंजून काढत होतो. मग एक गोष्ट स्पष्ट झाली हा 'अटॅक' नव्हता. ही 'मूव्हमेंट' होती. ते आमच्याशी लढण्यासाठी थांबलेच नव्हते... ते कुठेतरी महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.
मी नकाशा डोळ्यांसमोर आणला. तीन मार्ग. तीन शक्यता. आणि अचानक... मला एका गोष्टीची खूप भीती वाटू लागली.
“ते इथे थांबणार नाहीत, पाटील,” मी म्हणालो.
“मग?”
मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं. “ते पुढे जात आहेत. आपण जिथे अजून पोहोचलो नाही, तिथे!”
आम्ही जिथे प्राणपणाने लढत होतो, तो त्यांचा उद्देशच नव्हता. तो तर फक्त त्यांचा जाण्याचा 'कॉरिडॉर' होता. त्यांचा खरा टार्गेट दुसरीकडेच होतं कदाचित आमचा मुख्य सप्लाय बेस किंवा ते गाव!
मी तातडीने रेडिओवर ओरडलो, “टीम टू, टीम टू! रिप्लाय! आतला मार्ग बंद करा! ते तुमच्या दिशेने येत आहेत!”
पाटीलने रेडिओ पुन्हा पुन्हा चेक केला, पण फक्त भयाण शांतता आणि खरखर होती. तो हताशपणे म्हणाला, “सर… संपर्क पूर्णपणे तुटलाय. आपण जाम झालो आहोत.”
त्या एका वाक्याने हवेतला ताण शंभर पटीने वाढला. आता आम्ही फक्त अंधारात नव्हतो आम्ही आपल्या स्वतःच्या टीमपासून 'विलग' झालो होतो.
खाली दरीत शत्रूची हालचाल सुरूच होती. ते मुंग्यांसारखे वेगाने पुढे जात होते. आणि त्यांना थांबवायला आता आमच्याकडे ना वेळ होता, ना संदेश पाठवण्याचं साधन. आम्ही पूर्णपणे एकटे पडलो होतो.
पाटीलच्या हातातील तो वायरलेस एखाद्या निष्प्राण वस्तूगत पडून होता. काही क्षण तो त्या स्क्रीनकडे डोळे लावून पाहत राहिला, जणू पुढच्याच सेकंदात एखादी खरखर ऐकू येईल आणि संपर्क पूर्ववत होईल. पण जंगलाच्या त्या भयाण शांततेने उत्तर दिलं होतं आम्ही आता अधिकृतपणे 'आउट ऑफ कव्हर' होतो. बॅकअप नाही, संपर्क नाही, फक्त आम्ही आणि समोरचा अंधार.
मी खालच्या दरीकडे पुन्हा नजर वळवली. शत्रूच्या हालचाली आता अधिक गतिमान झाल्या होत्या. ते दिशाहीन नव्हतेच मुळी; प्रत्येक तुकडी एखाद्या यंत्राच्या भागासारखी ठरलेल्या रेषेत पुढे सरकत होती. याचा अर्थ स्पष्ट होता आमच्याशी नडणं हे त्यांचं मूळ उद्दिष्ट नव्हतं, ती फक्त एक 'डिले टॅक्टिक' (वेळकाढूपणा) होती.
“ते आपल्याला इथे गुंतवून ठेवतायत, सर,” पाटील दबल्या आवाजात म्हणाला.
मी मान हलवली. “आणि आपण इथे गुंतलोय, तोपर्यंत मुख्य तुकडी आत घुसतेय. पाटील, आपल्याला विभागलं पाहिजे.”
पाटीलचा चेहरा धास्तावला. “सर अशा स्थितीत टीम स्प्लिट करणं खूप डेंजरस आहे. आपण आधीच संख्येने कमी आहोत.”
“माहित आहे,” मी शांतपणे पण ठामपणे म्हणालो, “पण आपण सगळे इथेच राहिलो, तर त्यांचा दुसरा गट रोखायला तिथे कोणीच नसेल. आपण टीम विभागल्याशिवाय गत्यंतर नाही.”
काही सेकंदांत रणनीती ठरली. पाटील तीन जणांसह दरीच्या मुखाशीच थांबणार होता शत्रूला तिथेच रोखून धरण्यासाठी. मी उरलेल्या दोन जणांसह वरच्या चढणीने जाणार होतो जिथून शत्रूची मुख्य 'मूव्हमेंट' सुरू होती.
“सर, संपर्क नाहीये... कसं करणार?” पाटीलने विचारलं.
“वेळेवर आणि नशिबावर विसंबून राहू. 'पोईंट बी' वर भेटू,” मी उत्तर दिलं.
त्याने हलकीच मान डोलावली. त्या एका कटाक्षात खूप काही होतं मैत्री, निष्ठा आणि कदाचित शेवटची भेट असण्याची भीतीही. शब्दांची गरज उरली नव्हती.
आम्ही तो निसरडा उतार चढायला सुरुवात केली. गडचिरोलीचं हे जंगल रात्रीच्या वेळी अधिकच क्रूर वाटतं. झाडांच्या अजस्त्र मुळांमध्ये पाय अडकत होते, सैल मातीमुळे तोल जात होता आणि डोळ्यांसमोर फक्त काळाकुट्ट काळोखाचा पडदा होता. पण खाली सुरू असलेल्या त्या सूक्ष्म आवाजांनी आम्हाला दिशा दाखवली.
काही अंतर कापल्यानंतर आम्ही एका मोठ्या कड्यापाशी पोहोचलो. मी हाताने जवानांना 'डाऊन' होण्याचा इशारा केला.
समोर एक अरुंद कडा होती आणि तिच्या पलीकडे एक छोटा मोकळा भाग होता. दरीपेक्षा हा भाग उंचीवर होता आणि रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता कारण इथून पुढे जाणारे मार्ग मर्यादित होते. मी पोटावर सरपटत कड्याच्या टोकापर्यंत गेलो आणि खाली पाहिलं.
आणि त्या क्षणी... माझ्या मेंदूत विचारांचं चक्र फिरलं.
खाली एकत्र येणारे छोटे गट आता एका मोठ्या वर्तुळात जमा होत होते. वेगवेगळ्या दिशांनी आलेले नक्षल तिथे शांतपणे उभे होते. ही केवळ 'मूव्हमेंट' नव्हती ही एक 'हाय-लेव्हल बैठक' होती.
मी सावकाश मागे सरकलो. पाटील सोबत असता, तर त्याने याचं गांभीर्य लगेच ओळखलं असतं. पण आता निर्णय घेणारा मी एकटाच होतो. मी माझ्या टीमकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत भीती नव्हती, फक्त 'आदेश' मिळण्याची प्रतीक्षा होती.
“आपण इथूनच 'इंटरसेप्ट' करणार,” मी हळू आवाजात सांगितलं.
“सर, त्यांची संख्या आपल्या तुलनेत दहापट आहे,” एका जवानाने वास्तव मांडलं.
“म्हणूनच ही जागा योग्य आहे. इथून त्यांना आपण 'बॉटलनेक'मध्ये पकडू शकतो,” मी उत्तर दिलं.
खाली आता हालचाल आणि आवाज दोन्ही वाढत होते. कुजबुज, शस्त्रांचे खटके आणि पावलांचा आवाज आता स्पष्ट येत होता. त्यांना आमच्या उपस्थितीचा सुगावा लागला नव्हता. मी माझ्या रायफलचा 'सेफ्टी कॅच' हळूच खाली केला. श्वास स्थिर केला. हीच ती वेळ होती.
पण नेमक्या त्याच क्षणी, कंदिलाच्या एका फिकट उजेडात खाली एक ओळखीची आकृती दिसली. मी डोळे विस्फारून पुन्हा एकदा पाहिलं. चूक नव्हती. तो हिडमे होता.
क्षणभर माझ्या हाताचा थरकाप उडाला. हिडमे त्यांच्या मध्यभागी उभा होता. त्याच्या अंगावर नक्षल गणवेश नव्हता, पण तो तिथे 'कैदी' म्हणूनही उभा नव्हता. तो त्यांच्याशी संवाद साधत होता. त्याच्या हालचालींत कुठेही भीती नव्हती. तो तिथे स्वतःच्या इच्छेने चालत आला होता.
माझ्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं. हिडमे नक्की कोणाच्या बाजूने होता? त्याने गावात जो 'बदला' घेतला, ती केवळ एक नाटकी खेळी होती का? की तो आपल्याला इथपर्यंत खेचून आणण्यासाठी वापरलेला एक 'ट्रोजन हॉर्स' होता?
तो पकडला गेला नव्हता... तो त्या बैठकीचा भाग होता.
मी हात वर केला. माझी टीम ट्रिगरवर बोट ठेवून आदेशाची वाट पाहत होती. पण गोळी झाडण्याआधी मला एक गोष्ट समजून घ्यायची होती. हिडमे आपला खबऱ्या होता, की शत्रूचा सर्वात मोठा डाव?
त्या रात्रीच्या गडद अंधारात, आता फक्त शत्रूशीच नाही, तर स्वतःच्या विश्वासाशी आमची लढाई सुरू झाली होती.
हिडमे खाली त्या मृत्युचक्रात उभा होता, पण तो बळीचा बकरा नव्हता. त्याची नजर त्या गर्दीतून आरपार जात होती, जणू तो तिथे शरीराने असला तरी त्याचं मन कुठेतरी दूर, त्या गावाच्या शिवेवर किंवा कदाचित आमच्या कॅम्पच्या वेशीवर रेंगाळत होतं.
मी माझा उगारलेला हात सावकाश खाली घेतला. माझ्या टीमने एकमेकांकडे पाहिलं; आदेशाची वाट पाहून त्यांचे डोळे ताणले गेले होते, पण परिस्थितीचं गांभीर्य त्यांनाही कळत होतं. हा क्षण 'पॅराडोक्स' (Paradox) होता. जर आम्ही आता गोळीबार केला असता, तर आम्ही कदाचित काही शत्रू टिपले असते, पण हिडमेच्या मनात दडलेला तो अंतिम सत्याचा तुकडा कायमचा मातीत गाडला गेला असता.
खाली हालचाल थांबली होती. त्या मोठ्या माणसाच्या जो नक्षल कमांडर असावा शब्दांनी हवेतला ऑक्सिजन कमी केल्यासारखा ताण निर्माण केला होता.
“फरक इतकाच कि ते सांगतात काम झाल्यावर ते जातील. तुम्ही सांगत नाही.”
हिडमेचं हे वाक्य त्या दरीत एखाद्या मंत्रासारखं घुमत राहिलं. हे वाक्य केवळ नक्षलवाद्यांसाठी नव्हतं, ते आमच्यासारख्या 'बाहेरच्या' वर्दीवाल्यांसाठीही होतं. तो एका अशा माणसाचा आवाज होता ज्याने दोन्ही बाजूंच्या 'सिस्टम' जवळून पाहिल्या होत्या आणि दोन्हीकडून फक्त आश्वासनं पदरात पाडून घेतली होती.
तो कमांडर हिडमेच्या इतक्या जवळ गेला की त्यांच्यात आता फक्त श्वासाचं अंतर उरलं होतं. त्याचा हात हिडमेच्या खांद्यावर विसावला होता, पण ती माया नव्हती ती पकड होती.
“तू काय निवडलंस?” कमांडरचा आवाज आता अधिक खोल आणि धोकादायक झाला होता.
हिडमेने उत्तर दिलं, “मी अजून कोणाचीच निवड केली नाही.”
त्या एका वाक्यातली तटस्थता पाहून मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार पडला. हिडमेने आपल्याला मदत केली होती, पण ती निष्ठेतून होती की हतबलतेतून? तो आपल्याशी एकनिष्ठ होता की त्यांच्याशी ? की त्याची निष्ठा केवळ स्वतःच्या मातीशी होती ?
कमांडरने सावकाश हात वर केला. हा त्या नक्षली लष्करी भाषेतला सर्वात भीषण सिग्नल होता. त्याच्या मागचे दोन सशस्त्र तरुण पुढे आले. त्यांनी हिडमेच्या दोन्ही दंडांना अशी पकड दिली की एखाद्याची हाडं मोडली असती. पण हिडमेच्या चेहऱ्यावरची एकही रेष हलली नाही. त्याने प्रतिकार केला नाही, जणू त्याला माहीत होतं की हा प्रवास इथेच कुठेतरी थांबणार आहे.
मी कड्याच्या टोकावरून खाली झुकलो. माझी 'पॉइंट २२' रायफल आता त्या कमांडरच्या कपाळावर स्थिरावली होती. पाटील खाली दरीच्या तोंडाशी होता, तिथेही हालचाल वाढली असावी. आम्हाला निर्णय घ्यावाच लागणार होता.
जर मी आता 'फायर'चा आदेश दिला, तर हिडमे त्या गोंधळात मारला जाण्याची १००% शक्यता होती. पण जर मी थांबलो, तर ते लोक हिडमेला जंगलाच्या अशा भागात घेऊन जातील जिथून परत येण्याचा रस्ता कधीच सापडणार नाही.
हिडमेला ओढलं जात असताना त्याची नजर अचानक वर वळली. ती थेट माझ्या लपलेल्या जागी स्थिर झाली. त्याला माहीत होतं की मी तिथे आहे. त्याच्या रिकाम्या डोळ्यांत आता भीती नव्हती, पण एक प्रकारची 'विनंती' होती कदाचित सुटकेची, किंवा कदाचित न्यायाची.
मी खोल श्वास घेतला. थंड हवेने माझे फुफ्फुस भरले. माझ्या टीमने 'सेफ्टी कॅच' उघडल्याचे सूक्ष्म आवाज मला ऐकू आले.
मी माझा हात पुढे केला. पाच बोटं उघडली. एक... दोन... आणि...
पुढच्या क्षणी दरीचा काळोख आगीच्या लोळानी आणि गोळ्यांच्या आवाजाने उजळून निघणार होता. ही केवळ लष्करी कारवाई नव्हती; ही हिडमेला त्याच्या 'निवडी'चा अधिकार मिळवून देण्यासाठी दिलेली किंमत होती.
“ॲल्फा, ॲल्फा! फायर!” मी रेडिओशिवाय ओरडलो.
आणि त्यासोबतच, गडचिरोलीच्या त्या जंगलात न्यायाचा आणि संघर्षाचा एक नवीन अध्याय सुरू झाला.
भागागणीत थरार वाढतो आहे...
भागागणीत थरार वाढतो आहे...
जबरदस्त लिहिताय...
जबरदस्त लिहिताय...
जबरदस्त
जबरदस्त
धन्यवाद धनवन्ती, TI, झकासराव
धन्यवाद धनवन्ती, TI, झकासराव!
जबरदस्त
जबरदस्त