लाल रेषा - भाग ८

Submitted by नितनवे on 7 April, 2026 - 13:15

लाल रेषा - भाग ७

पूर्वभाग

एका भीषण चकमकीनंतर जवानांनी शिंदेला मृत्यूच्या दारातून सुखरूप वाचवून कॅम्पमध्ये आणले. मिशन यशस्वी झाले असले तरी, कॅम्पमध्ये विजयाचा आनंद नव्हता, तर एका अदृश्य धोक्याची आणि अस्वस्थतेची जाणीव होती. धक्क्यातून सावरलेल्या शिंदेने खुलासा केला की, नक्षल्यांनी त्याला मारले नाही तर जाणीवपूर्वक जिवंत सोडले. शत्रूने रचलेला तो एक भीषण 'मानसिक खेळ' होता, ज्याद्वारे त्यांना जवानांच्या मनात दहशत निर्माण करायची होती. त्याच रात्री आपल्या मुलाचा मृतदेह शोधणाऱ्या एका हतबल बापाने कॅम्पमध्ये येऊन सत्य मांडले. नक्षल्यांनी त्याच्या मुलाला सोबत येण्यासाठी धमकावले होते, परंतु त्याने नकार दिल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. वहीतील गुपिते आणि गावकऱ्याशी झालेली चर्चा यातून शत्रूची क्रूर रणनीती स्पष्ट झाली. संशयास्पद हालचालींची वर्दी मिळताच, हा लढा आता केवळ जंगलापुरता मर्यादित नसून लोकांच्या घरापर्यंत पोहोचल्याची जाणीव झाली आणि एका नव्या संघर्षाची नांदी झाली.
************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग ८ - अदृश्य जाळे

वायरलेसवरच्या त्या संदेशानंतर कॅम्पमध्ये हालचाल सुरू झाली. प्रत्येकाला आपली जागा आणि भूमिका माहीत होती. गोंधळ नव्हता, पण ताण स्पष्ट जाणवत होता.

मी बाहेर आलो तेव्हा पाटील 'क्विक रिस्पॉन्स टीम' (QRT) तयार करत होता. बाजूला मेडिकल रूममध्ये जाधव पडलेला दिसला. त्याच्या छातीवरची पट्टी अजून ताजी होती, पांढऱ्या कपड्यावर रक्ताचा एक छोटा डाग उमटला होता. श्वास सावकाश पण स्थिर होता.

थोड्याच अंतरावर, दुसऱ्या खाटेवर शिंदे बसलेला दिसला. अंगावर जखमा कमी होत्या, पण त्याचा चेहरा वेगळंच काही सांगत होता. तो सरळ समोर पाहत होता जणू अजूनही त्या अंधारातून बाहेर आलेला नव्हता. आजूबाजूला काय चाललं आहे, याची त्याला जाणीव होती, पण तो त्यात नव्हता… तो अजूनही तिथेच अडकलेला होता.

त्याने डोळे उघडले आणि मला पाहिलं. मी मागे वळलो आणि पाटीलला खुणेने जवळ बोलावलं. "मेडिकल टीम आणि दोन जवानांचं 'गार्ड' यांच्यासोबत ठेवा,” मी आदेश दिला.

आम्ही कॅम्प सोडला. मागे जनरेटरची धडधड कमी होत गेली आणि समोर दंडकारण्याच्या जंगलाचं अथांग काळोखं साम्राज्य सुरू झालं. गावाच्या दिशेने जाताना आज हवा वेगळी वाटत होती. पानांची सळसळही थांबली होती. अशी शांतता सापळ्याने भरल्यासारखी वाटली.

गावाच्या वेशीवर पोहोचल्यावर पहिली गोष्ट खटकली, दिवे लागलेले होते. घराघरांतून कंदिलाचा उजेड बाहेर येत होता, पण गावातला नेहमीचा मानवी कोलाहल गायब होता. कुत्र्यांचं भुंकणंही ऐकू येत नव्हतं.

मी हात उंचावून टीमला 'होल्ड' करायला सांगितलं. सगळे जागच्या जागी स्थिर झाले.

“काहीतरी गडबड आहे, सर,” पाटील माझ्या कानात पुटपुटला. त्याची बोटं रायफलच्या ट्रिगर गार्डवर स्थिर होती.

आम्ही सावकाश, सावल्यांचा आडोसा घेत पुढे सरकलो. पहिलं घर, दार सताड उघडं. आत कोणी नाही. दुसरं घर तसंच, जेवणाची ताटं वाढलेली, पण माणसं गायब. गाव रिकामं नव्हतं; गाव 'हलवण्यात' आलं होतं.

तेवढ्यात मागून पवारचा दबलेला आवाज आला, “सर… इकडे.”

त्याच्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही गावाच्या शेवटच्या टोकाकडे सरकलो, जिथून घनदाट झाडी पुन्हा सुरू व्हायची. जमिनीवरचे ठसे स्पष्ट होते. चिखलात रुतलेल्या पावलांच्या खुणा ओरडून सांगत होत्या की लोकांना बळजबरीने तिथे नेलं गेलंय.

काही अंतरावर गेल्यावर जे दृश्य समोर आलं, त्याने काळजाचा ठोका चुकला.

गावाच्या वेशीवरच्या त्या मोकळ्या मैदानात अख्खं गाव उभं होतं. पुरुष, स्त्रिया आणि काही मुलं सगळे थंडीने नाही, तर दहशतीने थरथरत होते. त्यांच्या समोर चार नक्षल उभे होते, त्यांच्या हातातल्या 'इन्सास' आणि 'AK' रायफल्स गावकऱ्यांच्या दिशेने रोखलेल्या होत्या.

आणि त्यांच्या मध्यभागी हिडमे उभा होता. त्याचा चेहरा ताणलेला होता. तो गावकऱ्यांच्या बाजूला उभा होता, पण त्याची नजर जमिनीकडे होती. तो त्यांच्या सोबत असूनही 'एकाकी' वाटत होता.

“तो…?” पाटीलने डोळ्यांनीच विचारलं.

“हो. तोच...हिडमे.,” मी पुटपुटलो.

समोर उभा असलेला एक नक्षल कमांडर बोलत होता. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात धमकी स्पष्ट होती.

“कोणीही गाव सोडणार नाही. आणि कोणीही बाहेरच्या वर्दीवाल्यांशी बोलणार नाही,” तो ओरडून सांगत होता.

कमांडर पुढे सरकला आणि हिडमेकडे बघून म्हणाला, “एकाने नकार दिला… म्हणून आज आम्ही इथे आहोत.”

हिडमेने डोकं अजूनच खाली झुकवलं. नकार देणारा तो 'मुलगा' होता, ज्याचा मृतदेह आम्हाला सापडला होता.

“पुढच्या वेळी कोणी नकार देणार नाही,” कमांडरने आपली बंदूक उगारली. गावकऱ्यांच्या मनातला उरला-सुरला प्रतिकार संपवण्याचा हा प्रयत्न होता.

मी पोझिशन घेतली. आम्ही योग्य जागी होतो, शत्रूच्या 'ब्लाइंड स्पॉट'मध्ये. पण हिडमे… तो जाणता होता. त्याला वासावरूनही धोक्याची जाणीव व्हायची. क्षणभर त्याची नजर वर आली आणि थेट आमच्या लपलेल्या झाडापाशी स्थिर झाली.

तो काही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव उमटले नाहीत. पण त्या रिकाम्या डोळ्यांत एकच अस्वस्थ प्रश्न होता “आता काय?”

मी पाटीलच्या खांद्यावर हात ठेवला. "आपण 'एन्गेज' करणार. पण गोळीबार शेवटचा पर्याय असेल,” मी हळू आवाजात म्हणालो.

समोर गावकरी होते, त्यांच्या मागे काळोखं जंगल होतं आणि मध्ये केवळ 'भीती' उभी होती. ही केवळ लष्करी कारवाई नव्हती. ही आमच्या आणि शत्रूच्या 'विचारसरणीची' निवड होती. आणि या वेळी, आम्हाला उशीर करण्याची मुळीच परवानगी नव्हती.

समोरचं दृश्य काही क्षण माझ्या डोळ्यांत एखाद्या गोठलेल्या चित्रासारखं स्थिर राहिलं. गावकरी एखाद्या पुतळ्यासारखे एकत्र उभे होते न बोलता, न हालता. जणू कुणीतरी त्यांच्याकडून केवळ आवाजच नाही, तर श्वास घेण्याचा हक्कही काढून घेतला होता. त्यांच्या चेहऱ्यांवरची भीती अनेक वर्षांच्या सवयीने 'मान्य केलेली' भीती होती.

त्या सगळ्यांच्या पुढे उभा असलेला तो नक्षल कमांडर बोलत होता. त्याचा प्रत्येक शब्द त्या थंड हवेत शिशासारखा जड होऊन बसत होता. तो ओरडत नव्हता, पण त्याच्या आवाजातला शांत हिंस्त्रपणा कोणत्याही किंकाळीपेक्षा जास्त प्रभावी होता.

हिडमे गावकऱ्यांच्या रांगेत उभा होता. त्याची नजर अजूनही जमिनीकडे होती, पण त्याचे खांदे झुकलेले नव्हते. तो ऐकत होता, परिस्थिती ताडत होता आणि कदाचित स्वतःच्या आतल्या निष्ठांशी संघर्ष करत होता.

मी पाटीलकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते. त्याला परिस्थितीची दाहकता कळली होती हा क्षण केवळ लष्करी कारवाईचा नव्हता. जर इथे आमची एकही चूक झाली, तर या गावकऱ्यांचा उरला-सुरला विश्वास कायमचा तुटणार होता.

मी पुन्हा एकदा सभोवतालचा 'पेरिमीटर' तपासला. आमची जागा 'टॅक्टिकल' दृष्ट्या योग्य होती. आम्ही अंधारात होतो आणि त्यांच्या सगळ्या नजरा गावकऱ्यांवर खिळल्या होत्या. हा आमचा सर्वात मोठा फायदा होता, पण तो वाळूच्या घड्याळासारखा झपाट्याने निसटत होता.

त्या कमांडरने पुन्हा बोलायला सुरुवात केली, त्याचा आवाज आता अधिक उपरोधिक झाला होता. “तुमच्यापैकी कुणालाही वाटत असेल की बाहेरचे वर्दीवाले तुम्हाला वाचवायला येतील तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे.”

काही गावकऱ्यांनी नकळत माना खाली घातल्या. “ते येतात,” तो पुढे पावलावर पाऊल टाकत म्हणाला, “आणि निघून जातात. आम्ही मात्र इथेच असतो.”

त्या क्षणी मला वाटलं कि तो फक्त गावकऱ्यांना धमकावत नव्हता, तो आडोशाला लपलेल्या आम्हाला 'प्रोव्होक' करत होता. कदाचित त्याला आमचं अस्तित्व जाणवलं होतं.

मी रेडिओवर अत्यंत हळू आवाजात पाटीलला सूचना दिली, “डावीकडून पवार आणि एका जवानाला पुढे सरकवा. थेट नाही घड्याळाच्या काट्याप्रमाणे वळसा घेऊन 'फ्लॅंकिंग' (Flanking) करा.”

पाटीलने हातानेच इशारा केला. दोन सावल्या झाडांच्या आडून अत्यंत संथपणे पुढे सरकल्या. त्यांच्या हालचाली इतक्या 'सायलेंट' होत्या की त्या रात्रीच्या काळोखात विरून गेल्या.

तो कमांडर अजूनही बोलत होता. त्याच्या मागे उभे असलेले बाकीचे नक्षल सावध होते, पण त्यांचं लक्ष पाखरासारखं विखुरलेलं होतं. त्यांना खात्री होती की समोर गावकरी उभे असताना पोलीस किंवा जवान गोळीबार करण्याची हिंमत करणार नाहीत.

मी अंतिम निर्णय घेतला. “स्मोक ग्रेनेड्स वापरायचे नाहीत,” मी पाटीलला दबल्या आवाजात सांगितलं.

“सर? अंधाराचा फायदा मिळेल,” पाटीलने साशंकतेने विचारलं.

“नाही. स्मोक टाकला तर गोंधळ उडेल. गावकरी सैरावैरा पळायला लागले तर क्रॉसफायरमध्ये त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या जातील. आपल्याला 'सर्जिकल' अचूकता हवी आहे.”

पाटीलला मुद्दा पटला. “मग काय करायचं?”

मी समोरच्या त्या कमांडरच्या रायफलकडे नजर रोखत म्हणालो “त्याचं बोलणं कायमचं बंद करायचं.”

काही सेकंद एखाद्या युगासारखे वाटले. डावीकडे गेलेले जवान आता योग्य 'अँगल'वर पोहोचले होते. मी रेडिओवर शेवटचा आदेश दिला “फर्स्ट शॉट वेपनवर.”

त्या क्षणी वेळ जणू मंदावला, तो कमांडर अजूनही हात उंचावून बोलत होता “तुम्ही कोणाच्या बाजूला उभे आहात, हे आत्ताच ठरवा ”

धाड!

एका गोळीचा आवाज झाला. स्नायपरच्या गोळीने कमांडरच्या हातातील रायफलचा 'बट' अचूक उडवला. त्याच्या हातातलं शस्त्र धूळ उडवत खाली आदळलं. तो कमांडर क्षणभर सुन्न होऊन आपल्या रिकाम्या हाताकडे पाहत राहिला. बाकीचे नक्षल गोंधळले, त्यांची नजर शस्त्राकडे गेली.

नेमक्या त्याच क्षणी मी आडोसा सोडून पुढे सरकलो. “हत्यारं खाली टाका! सरेंडर!” माझा आवाज त्या शांत मैदानात घुमला.

गावकरी दचकले, काही जण जमिनीवर बसले. पाटील आणि उर्वरित टीम लगेच झाडांच्या आडून बाहेर आली आणि त्यांनी एका नक्षलीवर झडप घालून त्याला जखडून ठेवले.

तो कमांडर आता स्थिर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, संतापही नव्हता. तो फक्त माझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहत होता. “तू उशीर केलास, ऑफिसर,” तो शांतपणे म्हणाला.

मी उत्तर दिलं नाही. माझी बंदूक त्याच्या छातीवर स्थिर होती.

“तुला वाटतं तू यांना वाचवलंस?” तो उपरोधिकपणे हसला. “दहशत गोळीने संपत नसते, ती रक्ताने अजून गडद होते.”

मी त्याला त्याचं बोलणं पूर्ण करू दिलं नाही. “शस्त्रं खाली, आत्ता!” मी पुन्हा ठामपणे ओरडलो.

बाकीच्या नक्षलांनी परिस्थिती ताडली. आमची पोझिशन वरचढ होती पण गावकऱ्यांच्या मध्ये असल्याने गोळीबार करणं जिकिरीचं होतं. त्यांनी हळूहळू, नजर आमच्यावर रोखूनच, पाठीमागे सरकायला सुरुवात केली. ते जंगलाच्या दाट सावल्यांमध्ये विरून गेले.

मैदानात पुन्हा हालचाल सुरू झाली. कुणीतरी हुंदका दिला, कुणीतरी मोकळा श्वास सोडला. भीती अजूनही तिथेच होती, पण त्या भीतीचा जो अभेद्य गड होता, त्याला आता तडा गेला होता.

मी हिडमेकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच उभा होता. आता त्याने संथपणे नजर वर केली. या वेळी तो खाली पाहत नव्हता. त्याच्या नजरेत एक वेगळीच ओळख होती.

त्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट झाली आम्ही आज कोणतीही मोठी चकमक जिंकली नव्हती. आम्ही केवळ त्यांच्या नियंत्रणातला एक क्षण हिरावून घेतला होता.

पण याचा अर्थ एकच होता पुढच्या वेळी ते अधिक तयारीनिशी येणार होते. आणि ती वेळ 'चुकीला माफी' देणारी नसणार होती.

गावातून कॅम्पमध्ये परत येईपर्यंत रात्रीने रान आणि रस्ते दोन्ही गिळले होते. कॅम्पचे हाय-मास्ट दिवे लांबून एखाद्या दीपगृहासारखे लुकलुकत होते, पण त्यांचा प्रकाश कुंपणाच्या काठावर येऊन हतबल होत होता. त्यापुढे पुन्हा तेच आदिकाळापासूनचं अंधाराचं साम्राज्य सुरू होत होतं जिथे प्रत्येक सळसळ ही केवळ वारा नसते आणि प्रत्येक सावलीत एक न उघडलेलं गुपित लपलेलं असतं.

आम्ही आत आलो तेव्हा कॅम्पमध्ये स्मशानशांतता होती. ऑपरेशन यशस्वी झालं होतं, पण कुणाच्याही चेहऱ्यावर विजयाचा उन्माद नव्हता. गावकरी आत्तापुरते सुरक्षित होते, पण त्या नक्षल कमांडरचे शब्द माझ्या कानात घुमत होते: “तू उशीर केलास, ऑफिसर!”

मी सरळ ऑफिसमध्ये आलो आणि बुटांचे बंद न सोडताच खुर्चीत विसावलो. पाटील मागोमाग आला आणि त्याने टेबलावरचा तो जुना नकाशा पुन्हा पसरला. आता तो नकाशा कागदाचा तुकडा उरला नव्हता; तो एक जिवंत रणभूमी झाला होता. प्रत्येक लाल ठिपका आता रक्तासारखा भासत होता.

“सर,” पाटील हळू आवाजात म्हणाला, त्याचा हात रायफलच्या पट्ट्यावर अजूनही आवळलेला होता, “आज त्यांनी माघार घेतली, पण ही माघार नाहीये... ही पुढच्या मोठ्या वादळाआधीची शांतता आहे.”

मी संथपणे मान हलवली. “हो, पाटील. आणि पुढच्या वेळी ते आपल्याला 'चॉइस' देणार नाहीत. ते आपल्याला थेट कोंडीत पकडणार.”

तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. मघाशी पकडलेला तो नक्षल दोन जवानांच्या पहाऱ्यात आत आणला गेला.

त्याचे हात पाठीमागे प्लास्टिक झिप-टाईजने बांधलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना पश्चात्ताप. उलट एक प्रकारचं थंड, क्रूर हास्य त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात रेंगाळत होतं जणू त्याला माहिती होतं की आम्ही ज्या पत्त्यांचा खेळ खेळतोय, त्यातले हुकमी एक्के त्याच्याच मालकांकडे आहेत.

मी काही क्षण त्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिलं. “नाव?” मी विचारलं.

तो किंचित हसला, त्या हसण्यात उपरोध होता. “नावाने काय होणार, साहेब? माणसं मरतात, नाव उरतं... आणि कधी कधी नावही पुसलं जातं.”

मी त्याच्या उत्तराने विचलित झालो नाही. “आज गावात काय सुरू होतं? हिडमे तिथे कशासाठी आला होता?”

तो गप्प राहिला. त्याच्या नजरेतली स्थिरता अस्वस्थ करणारी होती.

पाटील एक पाऊल पुढे सरकला, त्याचा आवाज आता थंड आणि धारदार होता, “आमचा वेळ वाया घालवू नकोस. तुझं मोठं 'दलम' (पथक) कुठे एकत्र येतंय?”

तो खबऱ्या पुन्हा हसला. “तुम्हाला वाटतं तुम्ही आम्हाला शोधताय? नाही... तुम्ही फक्त आमच्या जाळ्यात पाय टाकताय.”

खोलीतला ताण एका क्षणात शिगेला पोहोचला. मी खुर्ची थोडी पुढे ओढली आणि थेट त्याच्या डोळ्यांसमोर गेलो. “मला तुझं लोकेशन नकोय. तू फक्त एवढं सांग आम्ही तुमच्या जवळ आहोत की दूर?”

तो काही क्षण थबकला. माझ्या प्रश्नातली अनपेक्षितता त्याला जाणवली असावी. त्याने डोकं किंचित तिरकं केलं आणि म्हणाला, “तुम्ही नेहमीच जवळ असता, साहेब... पण कधीच 'योग्य' ठिकाणी नसता.”

त्या वाक्याने माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ते आपल्याला चुकवत नव्हते, ते आपल्याला एका विशिष्ट दिशेने 'वळवत' होते.

मी खुर्चीत मागे रेललो आणि नकाशावर नजर फिरवली. “पाटील, ते कुठे लपलेत हे शोधणं आता बंद करा,” मी म्हणालो.

पाटील गोंधळून माझ्याकडे पाहू लागला.

“ते कुठे 'येणार' आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे,” मी पुढे म्हणालो आणि नकाशावरच्या तीन विशिष्ट जागांवर जोरात बोट ठेवलं. “इथे, इथे आणि इथे. जर त्यांना मोठं काहीतरी करायचं असेल, तर या तिन्ही मार्गांचा संगम एकाच ठिकाणी होतो आपल्या कॅम्पच्या मागच्या टेकडीवर.”

पाटीलने नकाशा नीट पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. “मग आपण काय करणार? आपण त्यांना रोखायचं?”

“नाही,” मी ठामपणे म्हणालो, “आपण त्यांना आत येऊ देणार. पण एकदा का ते 'किलिंग झोन'मध्ये आले, की आपण त्यांची वाट बंद करून टाकायची.”

बाहेर रात्र अधिक गडद आणि थंड झाली होती. कॅम्पमध्ये गुप्तपणे हालचाली सुरू झाल्या. पथकं सावल्यांसारखी हलू लागली. शस्त्रांच्या आवाजाऐवजी केवळ खुणांचा वापर सुरू झाला.

मी एकटाच कुंपणापाशी आलो. समोरचं जंगल एखाद्या अक्राळविक्राळ प्राण्यासारखं शांत उभं होतं. पण आता त्या शांततेत मला एक विशिष्ट लय जाणवत होती. काहीतरी हालचाल सुरू होती.

आणि यावेळी... आम्ही केवळ तयार नव्हतो, तर आम्ही सावज बनून शिकाऱ्याची वाट पाहत होतो.

रात्रीच्या त्या गडद अंधारात खेळ पुन्हा सुरू झाला होता... आणि या वेळी फासे आम्ही टाकले होते.

रात्रीचा अंधार पूर्णपणे पसरल्यानंतर कॅम्पमध्ये सुरू झालेली तयारी हळूहळू आकार घेत होती. बाहेरून पाहिलं असतं तर काहीच वेगळं जाणवलं नसतं तेच बंकर, तेच पिवळसर दिवे, तेच संथ पहारे. पण कुंपणाच्या आत प्रत्येक हालचाल एखाद्या घड्याळाच्या काट्यासारखी अचूक आणि नियोजित होती. आवाज किमान, शब्द मोजके आणि डोळ्यांत निर्धार.

मी नकाश्यासमोर उभा होतो. पाटील माझ्या शेजारी. कंदिलाच्या थरथरत्या प्रकाशात आम्ही आधी ठरवलेल्या तीन मार्गांवर पुन्हा एकदा नजर फिरवत होतो. त्या तिन्ही दिशा भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या होत्या, पण त्यांचा शेवट एकाच अरुंद पट्ट्यात येऊन मिळत होता दाट जंगलाच्या आतला एक भाग, जिथे हालचाल लपवणं सोपं होतं आणि बाहेर पडणारे मार्ग मर्यादित होते.

“जर ते खरोखरच मोठं काहीतरी करणार असतील,” मी आवाजातली धार कमी न करता म्हणालो, “तर ते याच मार्गाने येतील. उघडपणे एका मोठ्या घोळक्याने येण्याची चूक ते करणार नाहीत ते तुकड्यांत येतील.”

पाटीलने सावधपणे मान हलवली. “म्हणजे 'स्मॉल ग्रुप इन्फिल्ट्रेशन'... एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी.”

“हो,” मी म्हणालो. “आणि म्हणूनच आपण त्यांना येऊ द्यायचं आहे. एकदा ते त्या खोऱ्यात शिरले, की मग त्यांना एकत्र बाहेर पडण्याची संधी द्यायची नाही.”

बाहेर पथकं हलायला लागली होती. प्रत्येक टीमला आपला मार्ग, आपली मर्यादा (Sector) आणि रेडिओ सायलेन्स पाळण्याची वेळ स्पष्ट केली होती. या वेळी आमचा उद्देश समोरासमोरची धडक देणं नव्हता; उद्देश होता अदृश्य जाळं विणणं.

कॅम्प मागे राहिला आणि आम्ही काळोखाच्या गर्भात शिरलो. झाडांच्या दाटीत काही अंतर गेल्यावर प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला. आता फक्त सवय आणि लष्करी अंदाज यावर पावलं टाकायची होती. पायाखालील ओल्या मातीचा स्पर्श, पानांची सूक्ष्म सळसळ आणि अधूनमधून येणारे रात्रीच्या पक्ष्यांचे आवाज हेच आमचे दिशादर्शक होते.

आम्ही ठरलेल्या जागी पोहोचलो तेव्हा घड्याळाने मध्यरात्र ओलांडली होती. समोर एक अरुंद पट्टा होता दोन्ही बाजूंनी पाषाणी कडे आणि दाट झाडी, मध्ये एक मोकळा उतार. जो कोणी या भागातून आत येईल, तो काही क्षणांसाठी पूर्णपणे उघडा (Exposed) पडणार होता.

मी हाताने इशारा केला. पाचही जवान क्षणात सावल्यांसारखे जमिनीला टेकले.

वेळ तासाभरासारखी संथ पुढे सरकत होती. कुणी बोलत नव्हतं, श्वासाचा आवाजही आवरलेला होता. कान प्रत्येक संशयास्पद आवाजाकडे जागे होते. काही क्षण असे आले की वाटलं कदाचित आज शत्रू येणारच नाही. पण 'जंगल वॉरफेअर'मध्ये अशा शांत वेळीच सर्वात मोठी चूक होते, हे आम्हा सगळ्यांना ठाऊक होतं.

तेवढ्यात पाटीलने माझ्या खांद्याला हलकासा स्पर्श केला. मी त्याच्या नजरेचा पाठलाग केला. समोरच्या झाडीतल्या अंधारात एक आकृती किंचित हलली. ती एकटी नव्हती. थोड्याच वेळात दुसरी, मग तिसरी सावली उमटली. ते सरळ चालत नव्हते दोन पावलं टाकणं, थांबणं, कानोसा घेणं आणि पुन्हा पुढे सरकणं. त्यांच्या हालचालींत कमालीचा सराव होता.

मी हाताने 'होल्ड'चा इशारा केला. कुणीही हललं नाही.

त्या सावल्या हळूहळू त्या मोकळ्या पट्ट्याकडे येत होत्या. त्यांचा वेग कमी होता, पण दिशा ठाम होती. ते विखुरलेले नव्हते ते एकमेकांपासून ठराविक अंतरावर होते.

पाटील माझ्या कानाजवळ कुजबुजला, “हे पहिले आहेत.”

मी मान हलवली. “घाई नाही,” मी ओठ हलवून उत्तर दिलं.

ते आता स्पष्ट दिसत होते. चार जण. खांद्याला लटकवलेली स्वयंचलित हत्यारं. त्यांच्या हालचालींमध्ये एक प्रकारची आत्मविश्वासाची निवांतता होती जणू त्यांना वाटत होतं की हा भाग पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे.

ते मोकळ्या पट्ट्यात आले. तोच क्षण होता हल्ला करण्याचा, पण मी माझा हात वरच ठेवला. थांबा.

पाटीलने माझ्याकडे साशंकतेने पाहिलं, पण शिस्तीमुळे तो काही बोलला नाही. मी अजून थांबायचं ठरवलं होतं. कारण मला माहित होतं की ही फक्त 'सुरुवात' आहे. मुख्य शिकार अजून मागे होती.

काही मिनिटांनी पुन्हा हालचाल दिसली. या वेळी अगदी विरुद्ध दिशेने. आणखी तीन जण सावकाश बाहेर आले. आता चित्र स्पष्ट होत होतं. ते खरोखरच वेगवेगळ्या मार्गांनी एकाच ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते.

जेव्हा ते सातही जण त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी आले, तेव्हा त्यांच्यात कसलीतरी खुणांची देवाणघेवाण झाली. तोच क्षण होता जेव्हा त्यांचा 'बॅरियर' सर्वात कमकुवत होता.

मी रेडिओवर हलका 'डबल क्लिक' केला. तो सिग्नल होता.

मी माझा हात खाली झटकला आणि हळू आवाजात म्हणालो, “आता!”

एकाच वेळी तीन दिशांनी हालचाल झाली. आमचे जवान सावल्यांमधून ताडकन बाहेर आले आणि त्यांनी तो पट्टा पूर्णपणे सील केला. लेझर पॉईंटर्स शत्रूच्या छातीवर स्थिर झाले.

“हत्यारं खाली ठेवा! सरेंडर!” पाटीलचा पहाडी आवाज एखाद्या विजेसारखा कोसळला.

क्षणभर सगळं जग थांबलं. समोरचे सातही नक्षल जागेवर खिळले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. त्यांना कळून चुकलं होतं की ज्या जागेला ते सुरक्षित समजत होते, ती आता त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरली आहे. ते पूर्णपणे वेढलेले होते.

त्या काही सेकंदांत त्यांच्या डोळ्यांत अनेक विचार फिरले. गोळीबार करायचा की शरणागती पत्करायची? आमच्या रायफल्सचे सेफ्टी कॅच उघडल्याचा आवाज त्या शांततेत स्पष्ट ऐकू आला.

त्यातला एक जो कदाचित लीडर असावा, तो एक पाऊल पुढे सरकला. त्याने अत्यंत संथ हालचाली करत आपली बंदूक जमिनीवर ठेवली. बाकीच्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग हळूहळू, पराभव मान्य करत त्यांनीही आपली शस्त्रं खाली ठेवली.

जंगल पुन्हा शांत झालं. मी नक्षल कमांडरच्या जवळ गेलो. त्याच्या चेहऱ्यावर रागापेक्षा एक वेगळंच आश्चर्य होतं.

“तुम्ही आमची वाट बघत होतात?” त्याने दबल्या आवाजात विचारलं.

मी त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणालो, “आम्ही तुमच्या 'योग्य' ठिकाणी येण्याची वाट बघत होतो.”

लाल रेषा - भाग ९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त..
छोटी छोटी वाक्ये अजून जास्त परिणाम करत आहेत.
जंगल आणि गावाकडची माणसे अशीच तुटक बोलतात, एखादा शब्द, मग शांत, पुन्हा एखादा शब्द...

फार अफाट आणि विलक्षण लिहीताय!!! उघडला की वाचावीच लागते कथा! किंबहुना माबो पेजवर येण्याचं एक कारण ही मालिका आहे! लिहीत राहा!

थरारक... !
पुढील भाग पण वाचतो आता Happy