चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन चिकवा आला आणि माझा अजून बॅकलॉग चालू आहे Proud

आत्ता मात्र ६४ वर असलेल्या फा च्या फासले रिव्ह्यू ला लगेच हसून घेते. पिक्चर बघताना रडायची वेळ आली होती त्याची जराशी भरपाई होऊदेत. पिक्चर खरोखरच रानोमाळ आहे. त्यात कुठल्याही कॅरॅक्टरची काय गरज होती हा प्रश्न विचारायला लागल्यावर अख्ख्या पिक्चरची काय गरज आहे इथवर आपण येतो. रेखाचे पात्र का आहे याचा खरोखरच शेवटपर्यंत उलगडा झाला नव्हता. मात्र अगदी शेवटी ' हमारे बीच के फासले शायद कभी नहीं मिटेंगे ' असा सुनील दत्तचा डायलॉग ऐकल्यावर युरेका मोमेंट झाली Proud पिक्चरचं नाव फासले का ठेवलं हे सांगायला रेखाची योजना होती होय?

सिनेमात असलेल्या राजकिरणचा नेमका काय problem आहे हे मात्र शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजे फराह तशी दिसायला बरी असते, तरुण सुद्धा. तरीही लग्न झाल्या क्षणापासून तो तिच्यापासून दूर राहतो ( फक्त तिच्या मुस्काटात मारायला तेवढा रूम मध्ये येत असतो Proud ). मात्र ती तिच्या बाबांच्या घरी राहायला गेल्यावर मात्र तिच्या बॉयफ्रेंड वरून तिच्यावर शंका घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो. Seriously?

बाकी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. पण पिक्चर बघून फार दिवस झाल्याने आठवायला वेळ लागतोय. एकूण पिक्चर मधे काय दाखवायचं आहे हे न समजल्याने नुसताच कॅमेरा चालू करून ' करा तुम्हाला काय करायचं ते ' असं म्हटलं असावं अशी शंका आहे.

तरीही लग्न झाल्या क्षणापासून तो तिच्यापासून दूर राहतो >>> म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम नसतो. त्याची वेगळी ठेवलेली बाई असते. त्यामुळे सगळेच अनाकलनीय आहे.

कुठे तरी नुरीचा उल्लेख आला आहे. त्यात एक सुधारणा - नुरी तसा yrf चा चित्रपट असला तरी त्याचा डायरेक्टर मनमोहन कृष्ण / किशन आहे. यश काका नाहीत. त्यामुळे हा त्यांचा पिक्चर नाही म्हणता येणार. नंतरच्या काळातले दिल तो पागल है, जब तक है जान वगैरे खरेच प्रेमपट आहेत.

मी बघितला प्रोजेक्ट हेल मेरी. पण मला अगदीच झेपला नाही. इतरांना आवडू शकतो. आजूबाजूला एन्जॉय करणारी बरीच लोकं होती.

प्रोजेक्ट हेल मेरी -
चित्रपट मला अंडरव्हेल्मिंग वाटला. मी पुस्तक वाचलेले नाही, आणि त्यामुळे तसं वाटलं असण्याची शक्यता आहे. मला साधारण कथावस्तू माहित होती, पण जे काही घडत आहे त्यात सायन्स पेक्षा फिक्शनच जास्त दिसत होतं. मूळ पुस्तकात सायन्सचं नीट पाठबळ असावं आणि ते चित्रपटात रश झालं असेल, नीट दिसलं नसेल पण मला अनेक अनुत्तरित प्रश्न पडले.
एकतर खूप मोठा सिनेमा आहे, तितका मोठा करुनही ठाशीव असा काही ठसा मनावर उमटला नाही. अनेक शॉट परत परत परत परत दाखवून नक्की काय साधलं समजलं नाही. कनविनियंट प्रकार ही खूप झाले. थोडक्यात सिनेमा म्हणून मला ही फार आवडला नाही.
पण मी पुस्तक आणुन वाचणारे.

आम्ही बघितला काल. मी पुस्तक नुकतंच वाचलं. त्यामुळे मला चित्रपटात सगळं घाईघाईने घडल्यासारखं वाटलं. पण नवऱ्याला आणि मुलाला आवडला. त्यांनी पुस्तक वाचलेलं नाही. मलाही आवडला नाही असं नाही. चांगला प्रयत्न केलेला आहे. अमुक एक गोष्ट आवडली नाही असं नाहीये काही. पण पुस्तकातलं सगळं आणणंही शक्य नाही.
पुस्तक नक्की वाच अमित. एकदम भारी आहे!

बुद्धिबळ विषयावर दोन डॉक्यु पाहिल्या.

पहिली, जुडिथ पोल्गार हिच्याबद्दल द क्वीन ऑफ चेस नावाची नितांत सुंदर डॉक्यु आहे. स्त्रिया आमची बरोबरी कधीच साधू शकत नाहीत असं मानणार्‍या मोठमोठ्या चेस खेळाडूंच्या विश्वा त जुडिथ कशी विपरित परिस्थिती वर मात करून पुढे आली आणि त्यावेळची जगातील सर्वात लहान ग्रँडमास्टर (केवळ महिला म्हणून नाही, ओव्हर ऑल) झाली, कित्येक स्पर्धा जिंकून जगातील सर्वोच्च दहात आली आणि कास्पारोव्हला टक्कर देण्यापर्यंत धडक मारली याची सत्यकथा. ती पहायला बुद्धिबळ माहिती असण्याची पूर्व गरज नाही. अनेक बाबी कथेच्या ओघात सोप्या शब्दात सांगित्ल्या आहेत. ज्या बाबी उलगडून सांगितल्या नाहीत त्या कथेत आडकाठी करत नाहीत, पण त्या तुम्हाला कळत असतील तर आणखी मजा येते.

दुसरी - मॅग्नस कार्ल्सन विरुद्ध हान्स नीमन प्रकरणावर एक डॉक्यु आहे. मी चेस फारसा फॉलो करत नसल्याने हे प्रकरण माहीत नव्हते. जास्त काही सांगत नाही. सर्वांना आवडेल अशी नाही. पण मला तरी ह्या सर्व प्रकरणात चेस डॉट कॉम वाले सगळ्यात जास्त चाप्टर वाटले. दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना चोरी, बदनामी, कोर्ट कचेर्‍या वगैरे करायला लावून त्यांनी आपली पोळी भाजून घेतली असं माझं स्पष्ट मत झालं आहे ते बग्गून. कुणाला ह्याबद्दल माहिती असेल तर चर्चा करायला आवडेल.

ओ रोमिओ - महाभंगार. विशाल भारद्वाजने आणि बाकीच्यांनी (शाहीद, नाना, राहुल ई.) पाट्या टाकल्यात.

ओ रोमिओबद्दल इथे विचारणारच होते.
ट्रेलर आवडला नाही. अति, रक्तरंजित हिंसाचार. नको इतके स्पेशल इफेक्ट्स.
पण विशाल भारद्वाज नाव वाचून रेंगाळले होते.

नेटफ्लिक्स वर तु या मै बघितला. कलाकार कोणी ओळखीचे नव्हते पण असंच ट्रेलर बघून सुरू केला.
पहिला हाफ एंगेजिंग वाटला. दोन कंटेंट क्रिएटर असतात - एक नालासोपार्‍याचा गली बॉय आणि एक हाय प्रोफाईल मिस व्हॅनिटी. दोघांची लव्हस्टोरी सुरू होते. ती चांगली वाटली. गली बॉय रॅप्स आठवले.

नंतर ते एका getaway साठी ठिकाणी गेले असता काही नाट्यमय घडना घडून २० फुट रिकाम्या पुलमधे पडतात, मगरीशी सामना करावा लागतो, इथे सगळं अचाट आणि अतर्क्य सुरू झालं. शेवटी त्या पुल मधून ते कसे बाहेर पडतात याची २ तासाची स्टोरी. खेचलाय नंतर नंतर सिनेमा अगदी. पिसे काढायला बघू शकता Wink

मी पण तो सुरुवातीचा भाग बघितला. त्या हॉलेट मध्ये ते आलेत तिकडे सोडला. तिकडे पुढे काय होणार थोडं प्रेडिक्ट करत ते होईल की काय वाटू लागल्याने. सुरुवातीचा अमृता खानविलकरचा सीन काही करुन जोडणे हाच हेतू असणार.
पण जो बघितला तो बरा वाटला.

तू या मैं मी पण पळवत पळवत पाहिला. अडीच तासांचा वीस मिनिटात. अस्मिता, फा साठी उत्तम खाद्य आहे. Proud नंतर IMDb रेटिंग पाहिले ते वट्ट ७.२ निघाले.
क्रांतीज्योती बघितला एकदम बेगडी वाटला. अजिबात नाही आवडला.

हो का. ती शनाया कपूर पाहून टाळत होते. Happy

हर्पा, "क्वीन्स गॅंबिट" मुळे यावरही उत्सुकता निर्माण झाली आहे. अगदी बुद्धिबळमय होऊन गेले होते तेव्हा. सारखं खेळींचाच विचार करत होते. सिसिलियन डिफेन्स वगैरे. फारच इंटेलेक्च्युअली डिमान्डिंग आहे क्वीन्स गॅंबिट सुद्धा. लिहिताना आव्हानात्मक वाटले होते. ज्युडिथ अगदी बेथसारखी वाटतेय पोस्टीवरून.

उल्लोळुक पाहिला आणि आवडला.

सगळ्यांची कामे छान झालीत. सासु-सुन दोघांचीही घुसमट खरी वाटते.

तिचा लव्हर मला लुझर वाटला नाही. पैसे कमवायचे स्किल त्याच्याकडे नाहीय पण तो तिच्या बाबतीत प्रामाणिक आहे. मित्रांच्या शिव्या खाऊनही तो तिच्यापासुन दुर राहु शकत नाही. ती म्हणते तसे त्याचे तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. तिचे मात्र तेवढे नाहीय.

ती परत का जाते हे आधी लक्षात आले नाही. थोडा विचार केला तेव्हा असे वाटले की शेवटी सासु तिला व स्वतःला माफ करुन तिच्या मुलासाठी सोने देते, स्वतः बनबलेले कपडे देते, प्रॉपर्टी द्यायला तयार होते व घर तुझेच आहे सांगते. यावरुन तिला वाटते की सगळे रागलोभ संपल्यावर केवळ एका निस्वार्थ प्रेमाची भावना सासुच्या मनात शिल्लक राहिली . त्याआधी सासुही इतकी वर्षे स्वतः तयार केलेल्या खोट्या स्वप्नात रमलेली. आता सुन तिच्या सोबत राहिली तर ती आनंदी आयुष्य जगु शकेल आणि सुनही.

सुन नंतर लव्हरलाही तिकडे बोलावेल आणि सासुलाही आक्षेप नसेल. लव्हर रागाने बोलला कारण हीचे धरसोड तरी कुठे थांबतेय. तो माफी मागतो लगेच. त्यामुळे त्याला माफ करुन and they lived happily after… करायचे. Happy

तु या मैं मध्ये अमृता खानविलकर च्या सिन चा काय संबंध आहे... कोणाला समजले तर मला सुद्धा सांगा

Lol मगर म्हंटले की "खून भरी मांग" आणि "गंगा जमुना सरस्वती" आठवतात. पहिली मगर रेखाचा एक्स्ट्रीम मेकओव्हर करून तिला डोक्यावर अननस ठेवल्यासारख्या टोप्या घालणारी सुपर मॉडेल करते. दुसरी मगर बॅकपॅक सारखी पाठीवरून वाहवून आणून अमरिश पुरीवर सोडली आहे. मगरीने कानून हातात घेतले आहे. पिक्चर संपवायला मगरीला यावे लागले.

शनाया कपूर संजय कपूरची कन्यका आहे. फारच नेपो व्हाईब देते म्हणून तिला पाहिले नाही. संजय कपूर सुद्धा आउट ऑफ लीग हिरोईन्स सोबत "आती नहीं" गायचा. कशाला येईल ती? तू कुठे ती कुठे! "दिलबर, दिलबर" गाण्यात जो धबधबा आहे, तो मी येथे ह्युस्टनला पाहिला. मला संकुला एवढ्या लांब तिकीट खर्चून आणणाऱ्यांचे कौतुक वाटले. पण व्हिलन त्यातही अब्युझिव नवरा म्हणून बरा वाटतो.

गुस्ताख इश्क-
नसिरुद्दीन शाह, विजय वर्मा, सना शेख.
हा फक्त शेरोशायरी, मुस्लिम पार्श्वभूमी, शुद्ध उर्दू आणि एकुणच ambiance साठी पाहिला. तेवढं आहे यात पण पिक्चर मधे दम नाही. नसिरुद्दीन शाह आणि विजय वर्मा यांचा अभिनय, शागिर्द -मुर्शिद नातं, भरपूर चांगले शेर, गुलजारची गीतं, विशाल भारद्वाजचे संगीत आहे. ते सगळं चांगलं आहे पण सिनेमा शेवटाला पिळत जातो.

उर्दू कुणी वाचत नाही, ती अस्तंगत होत आहे आणि म्हणून प्रिंटिंग प्रेस बंद होत असताना विजय वर्मा जुन्या शायरचे काही तरी छापावे म्हणून नसिरकडे जाऊन त्याला खोटेच मुर्शिद बनवतो. कारण नसिरला मुळी काही छापायचेच नसते. जी कला छापली जाते, ती मरते. माझी शायरी फक्त माझ्यासाठी - असं काही तरी आडमुठं तत्त्व असतं. घरची परिस्थिती मात्र बेताची. घरी एक तलाख झालेली मुलगी, कसंबसं घर चालवत असते. सना शेख सेमी बत्थड आहे आणि सेमी सुंदर आहे. ती पूर्ण दोन्ही वाटत नाही. काही तरी गडबड आहे. तिचं याचं लोणी जमतं पण म्हातारा सेल्फ ॲबझॉर्ब्ड व आपल्या तरुणपणीच्या नॉस्टॅल्जियात रममाण असल्याने व त्याला वर्तमानाची काहीही पडलेली नसल्याने या लोण्याचे तूप होता होत नाही. त्याच्या तरूणपणीच्या चुका आणि प्रतारणा. वेगवेगळ्या स्त्रियांसोबत संबंध ही आधीची गोष्ट. मग तो जुन्या आयुष्यापासून दूर आला आहे म्हणून आता छापायचे नाही. कारण ह्या सगळ्या स्खलनशीलते मागे प्रसिद्धी व कौतुक हेच कारण होतं. म्हातारा मरतो व हे एकत्र येतात. तो पहिला एकमेकांना शेरोशायरी शिकवण्याचा भाग एकदम आवडला, नंतर कंटाळा आला.

तुकड्या तुकड्यात सिनेमा चांगला आहे. पण नाही पाहिला तरी चालेल. दोन गाणी बरी आहेत. ऊल जलूल इश्क आणि विसरले दुसरं. Happy विस्मरणीय आहे मी काय करू!

इथे कुठल्या तरी धाग्यावर हिंदी आणि उर्दू बद्दल प्रतिसाद लिहीला होता. आता तो सापडत नाही. पण त्यातल्या त्रुटी लक्षात राहिल्या आहेत. आता नाईलाजाने इथे लिहीतो.

ज्याला उर्दू समजले जाते ती मूळची रेख्ता किंवा हिंदुस्तानी आणि हिंदी म्हणजे एकच भाषा आहे. खडी बोली/ हिंदुस्थानी. रामचरितमानस खडी बोलीत लिहीले आहे. खडी बोली १३ / १४ व्या शतकात विकसित होऊ लागली होती. दिल्ली, मेरठ या भागात ती लोकप्रिय होती. त्या आधीही ती होती. पण अवधी, मगधी इत्यादी भाषातून ती विकसित होत होती.

खडी बोली आणि संस्कृत अशा मिश्रणातून एक भाषा पुढे बोलली जाऊ लागली आणि खडी बोली व फारसी यांच्या मिश्रनातून दुसरी. मुघल राज्यकर्त्ते सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी या भाषेचा वापर करत तर हिंदू धार्मिक नेते पहिल्या भाषेचा.

या दोन्ही भाषांचं क्लासिक व्याकरण ब्रिटीशांना या भाषा शिकवताना विकसित झालं. यातून शुद्ध हिंदी आणि शुद्ध उर्दू बनल्या.
मुघल दरबाराच्या उत्तरार्धात खडी बोलीत फारसी +अरबी शब्द मिसळून एक साहित्यिक भाषा तयार झाली. नस्तालिक लिपी वापरली गेली
१८३७ मध्ये ब्रिटीशांनी व्याकरण तयार करून उर्दूला उत्तर भारतातील सरकारी भाषा केली.

१८०० मध्ये फोर्ट विल्यम कॉलेज, कलकत्ता इथे ब्रिटीश अधिकारी जॉन गिलख्रिस्ट यांनी खडी बोलीवर आधारित एक वेगळी भाषा तयार करायला सुरुवात केली. यातून अरबी + फारसी शब्द काढून संस्कृत शब्द घातले गेले. देवनागरी लिपी वापरली गेली.
१८६० - १८८० च्या दशकात हिंदू सामाजिक राजकीय चळवळींनी या भाषेला हिंदूंची भाषा (हिंदी) म्हणून पुढे आणले.

हा सर्च करताना ब्रिटीशांनी या दोन भाषा झोडा आणि फोडा नीती म्हणून डेव्हलप केल्या अशाही काही लेखांच्या लिंक्स सापडल्या. पण त्या फारच अधांतरी वाटल्या. जर त्याला इतिहासाची जोड नसेल तर त्या फारच विद्वत्तापूर्ण आणि इतिहासाची पोलखोल करणार्‍या वाटतात.

सबब - हिंदी किंवा उर्दू भाषेचा कढ आळेला नायक आणि त्यातून उभे राहणारे कथानक फारच तकलादू आणि अधांतरी वाटते. पुढे त्यात काय बघायचे? पडदे, कालीन, तख्त, तख्तपोशी, मीना बाजार , अभिनय इत्यादी. पण मूळ जर भाषेचे कढ असेल तर कथा पटवून घेणं जड जातं.

( कुठल्या धाग्यावर लिहीले होते हे लक्षात नाही, पण त्यात बहुधा या भाषा दोन वेगवेगळ्या भाषेतून विकसित झाल्या या आधीच्या माझ्या समजाचा प्रभाव होता. या दोन्हीही एकाच भाषेतून विकसित झाल्या आहेत हे आता पटले आहे. दोन्ही भाषेची शुद्ध रूपं एकोणिसाव्या शतकातली असल्याने या भाषांमधे दोनशे वर्षांपूर्वीचं साहीत्य सापडत नाही, कारण त्या भाषा या स्वरूपात उपलब्ध नव्हत्या. खडी बोलीलाच उर्दू किंवा हिंदी म्हणणे ही हातचलाखी आहे. )

दो दिवाने शहर मे - नेटफ्लिक्स
न्यूनगंडाने पछाडलेल्या दोन जीवांची प्रेमकहाणी.
छान चित्रपट आहे. हलका फुलका.. झोपण्याआधी मूड चांगला झाला.

दो दिवाने सेहर मे - नेटफ्लिक्स
अजिबात आवडला नाही. सिद्धांत चतुर्वेदि गर्ली वाटतोय. मुंबईत सूट बूट घालून ट्रेनने प्रवास करतो. हिरोईनचे प्रोफेशन, तिचे कपडे, घरचे वातावरण आणि स्थळ शोधायची पद्धत, काहीच मेळ बसत नाही. मुलाचे आई वडील अगदी टिपिकल, खानदानी हवेली वगैरे. मुलगा हो म्हणाला लग्नाला म्हणून लगेच मुलीला पसंती न विचारता पुढच्या गोष्टीची चर्चा सुरु करणारे दोन्ही घरचे वाटत नाहीत. मुळात बघायच्या कार्यक्रमात हे असे लगेच पसंती विचारत नाहीत, घरी जाऊन विचार विनिमय करून कळवतात आणि नकार असेल तर कळवायची तसदीही कधी कधी घेत नाहीत. सिद्धांतच्या आधी ज्या मुलाला ती कॅफेमध्ये भेटते, तो छपरी वाटतो, महिना सहा लाख पगार असणारे असे वागत, बोलत आणि दिसत नाहीत. दाखवायचं म्हणून काहीही दाखवलंय. सिद्धांत तिला फोन करून म्हणतो, हमने छत पे कपडे उतारे थे, तिथेच मी बघायचा बंद केला, एवढा खानदानीपणा मला झेपणारा नाही.

गेल्या वीकेंडला भूत बंगला पाहिला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला अक्षय कुमारचा चित्रपट.
ऑफिसमध्ये शुक्रवारी कोणीतरी विषय काढला म्हणून चेक केले. अन्यथा नाव सुद्धा ऐकले नव्हते.

पब्लिक रिव्ह्यू संमिश्र दिसले. पण जॉनर हॉरर कॉमेडी आहे हे समजले म्हणून लेकीसोबत गेलो. तिला असले पिक्चर फार आवडतात. तिन्ही भूलभुलैया, दोन्ही स्त्रिया, सैतान आणि वश लेव्हल एक दोन, भेडीया, काकुडा, निकिता रॉय, नावही ऐकले नाहीत असे पिक्चर आणि दुनियाभरचे झोंबी, तिचे आणि तिच्यामुळे माझेही बघून झालेत. त्यात हा अक्षयकुमारचा पिक्चर म्हणजे हॉररपेक्षा कॉमेडीचीच अपेक्षा जास्त होती.

एकूण अंदाज चुकला नाही. मला पिक्चर ठीकठाक वाटला. पण तिने मात्र फुल एन्जॉय केला. ओवरऑल पब्लिक हसतानाच दिसत होती. आता काहीतरी कॉमेडी घडेल असा अंदाज आला तरी हसत होती. आणि त्यानंतर नाहीच घडली तरी हसत होती.

पण मला ठिकठाक वाटला कारण नावीन्य असे आढळले नाही. भूलभुलेया, हलचल, चुपके चुपके, भागमभाग वगैरे चित्रपटातून कॉमेडी उचललेली वाटली. आणि भूताच्या स्टोरीसाठी पुन्हा भूलभुलैयासारखी राजाची कहाणी, स्त्री चित्रपटातील एक अँगल, ते अगदी जानी दुश्मनमधील चलो रे डोली उठाव दुल्हन भगाव सगळी भेळ एकत्र केली होती.

अक्षय कुमार बाकी त्याच्या जुन्या फॉर्म आणि एनर्जीमध्ये दिसला. पण आमच्याकडे कार्तिक आर्यन ओरिजिनली हिट आहे. त्यामुळे त्याचा डुप्लिकेट म्हणून अक्षय सुद्धा आवडला Happy

वामिका गाबीला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिले त्यामुळे असेल पण छान वाटली. रोल कमीच आहे तिचा पण मी आणि मुलगी घरी पोहोचेपर्यंत तिच्यावरच चर्चा करत होतो असा आहे.

टोस्टर - नेटफ्लिक्स
राजकुमार राव - सान्या मल्होत्रा आणि अर्चना पुरणसिंगचा असह्य सिनेमा! का बघितला असे झाले.

Pages