पूर्वभाग
टीमला सापळ्यात ओढण्यासाठी नक्षलींनी वायरलेस सेटचा वापर करून एक किलिंग झोन तयार केला होता. तपासणी करताना जमिनीत लपवलेले अनेक ट्रिप-वायर्स आणि IEDs सापडतात, ज्यामुळे संपूर्ण परिसर एक नियोजित स्फोटक जाळं असल्याचं स्पष्ट होतं. वळसा घेत पुढे गेल्यावर टीमला एका मोकळ्या जागेत शिंदे कैद अवस्थेत दिसतो. त्याच्या पायाखाली प्रेशर प्लेट जोडलेली असते, जी हलताच साखळी स्फोट घडवू शकते. नक्षलींकडे स्नायपर्स, थर्मल व्हिजन आणि पूर्ण भूभागाचा अभ्यास असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होते. मात्र लेजर डिस्ट्रॅक्शन, स्मोक कव्हर आणि अचूक टायमिंग वापरून शिंदेला वाचवण्यात यश मिळते. स्फोट घडतो, पण टीम बचावते आणि सुरक्षित झोनमध्ये पोहोचते. तरीही, त्यानां जाणवतं की हा विजय अपूर्ण आहे. नक्षलींनी फक्त आपली क्षमता दाखवली आहे आणि खरी लढाई अजून सुरू व्हायची आहे.
*************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग ७ - भयाचं बीज
कॅम्पच्या मुख्य गेटपाशी पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सात-साडेसात वाजले असावेत. आकाशातली संधिप्रकाशाची शेवटची लाटही ओसरली होती आणि सह्याद्रीच्या त्या घनदाट जंगलाने काळी चादर ओढून घेतल्यासारखा अंधार पसरला होता. जनरेटरचा तो परिचयाचा धडधडणारा आवाज आज कुठेतरी अस्वस्थ करणारा वाटत होता जणू तो आमच्या येण्याची वर्दी संपूर्ण दरीला देत होता.
गेटजवळचा सर्चलाइट आमच्या दिशेने वळला आणि क्षणभर डोळे दिपले. त्या प्रकाशाच्या वर्तुळात आम्ही सगळे उभे होतो...मातीने माखलेले, धुराच्या वासाने भरलेले, आणि आतून कुठेतरी थकलेले.
आम्ही शिंदेला स्ट्रेचरवर टाकून तातडीने आत आणलं. मेडिकल टीम आधीच गेटपाशी तयार होती. वायरलेसवर आम्ही 'कॅज्युअल्टी' नाही, पण 'ट्रॉमा रिकव्हरी' असल्याचा सांकेतिक संदेश दिला होता.
कॅम्पच्या आत पाऊल टाकताच एक गोष्ट लगेच जाणवली, सगळं दिसायला नेहमीसारखंच होतं, पण काहीतरी मूलभूत बदललं होतं. दिवे तेच, पोस्ट त्या त्या जागी, वायरलेसवरचे नियमित कॉल्स, कुठेतरी चाललेली शस्त्रांची साफसफाई… सगळं तसंच. तरीही त्या सगळ्यांच्या मागे एक दाबलेली शांतता होती—जणू कुणीतरी संपूर्ण कॅम्पचा आवाज कमी करून ठेवला होता.
आज मिशन यशस्वी झालं होतं. आम्ही आमच्या एका जवानाला मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं. साधारण परिस्थितीत या क्षणी कॅम्पमध्ये हलकासा उत्साह असायला हवा होता. एकमेकांकडे पाहून दिलासा देणाऱ्या नजरा, थोडंसं हसणं, एखादं खांद्यावर थोपटणं. पण तसं काहीच नव्हतं.
जवान आपल्या-आपल्या कामात गुंतलेले होते, पण त्यांचं लक्ष कामात नव्हतं, ते सतत आमच्याकडे परत येत होतं.
कोणी थेट येऊन काही विचारलं नाही. पण नजरा बोलत होत्या. कुतूहल होतं कि नेमकं काय झालं? भीती होती आपण ज्या गोष्टीला सामोरं गेलो, ती नेमकी किती मोठी आहे?आणि एक अनामिक अस्वस्थता होती जी शब्दांत मांडता येत नव्हती.
एका कोपऱ्यात दोन जवान शांतपणे उभे होते. ते बोलत होते, पण आवाज इतका मंद होता की शब्द ऐकू येत नव्हते, फक्त त्यांच्या चेहऱ्यावरील ताण दिसत होता. दुसरीकडे कुणीतरी बंदूक साफ करत होता, पण त्याचे हात यांत्रिक होते, नजरा मात्र अधूनमधून आमच्याकडे येऊन थांबत होत्या. काहींनी आमच्या कपड्यांकडे पाहिलं...माती, धूर, रक्ताचे हलके डाग.
काहींनी शिंदेच्या स्ट्रेचरकडे पाहिलं जणू ते खात्री करून घेत होते की तो खरोखर परत आलाय. पण कुणीही आनंदाने हसला नाही. कुणी “वेल डन” म्हणालं नाही. कारण सगळ्यांना जाणवत होतं, आपण जिंकलो नव्हतो. आपण फक्त वाचलो होतो.
त्या क्षणी कॅम्पमध्ये विजयाचा उत्साह नव्हता तर एका अदृश्य धोक्याची जाणीव होती, जी अजून संपलेली नव्हती. आणि त्या सगळ्या नजरा एकच प्रश्न विचारत होत्या, पुढे काय?
मी माझ्या कपाळावरचा घाम आणि माती पुसत मेसच्या बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीपाशी गेलो. थंड पाण्याचा हबका तोंडावर मारला, पण मनावरची ती जळजळ कमी होत नव्हती.
डोळे मिटले...क्षणभर पुन्हा तोच धूर दिसला. तीच मोकळी जागा, शिंदे, आणि त्या सावल्या. मी डोळे उघडले.
"सर, पवार आणि पाटील पोस्टवर परतलेत. बॅकअप टीमलाही 'हाय-अलर्ट'वर ठेवलंय," एका जवानाने जवळ येऊन रिपोर्ट दिला.
मी फक्त मान डोलवली. माझं पूर्ण लक्ष मेडिकल युनिटच्या त्या पांढऱ्या दरवाजाकडे होतं, जिथे शिंदेला नेण्यात आलं होतं.
काही वेळाने मी आत गेलो. युनिटमध्ये औषधांचा आणि डिटॉलचा उग्र वास येत होता. शिंदेला सलाईन लावलं होतं. त्याचे डोळे छताकडे खिळले होते. तो तिथे होता, पण त्याचं मन अजूनही त्या प्रेशर प्लेटवर, त्या धुराच्या लोटात आणि त्या अदृश्य सावल्यांच्या कैदेत अडकलेलं होतं.
"शारीरिक जखमा फार गंभीर नाहीत, सर," डॉक्टर हळू आवाजात म्हणाले. "काही ओरखडे आहेत आणि मानसिक धक्का मोठा बसलाय. त्याचं बीपी अजूनही स्थिर होत नाहीये."
मी शिंदेच्या जवळ गेलो. त्याच्या मनगटावर अजूनही त्या झिप-टाईजचे खोल लाल वळ उमटलेले होते.
"शिंदे..." मी अत्यंत मृदू आवाजात हाक मारली.
त्याने संथपणे मान वळवली. त्याच्या डोळ्यांतली ती जिवंत चमक कुठेतरी हरवली होती. तिथे फक्त एक अथांग, रितं रिकामपण होतं.
"आपण सुरक्षित आहोत, शिंदे. तू कॅम्पमध्ये आहेस," मी त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
शिंदेचे ओठ थरथरले. त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण आवाज फुटला नाही. अचानक, त्याने माझ्या हाताला इतक्या घट्ट पकडलं की त्याच्या नखांच्या खुणा माझ्या त्वचेवर उमटल्या.
"सर... ते... ते माणसं नाहीत," तो शेवटी कसाबसा पुटपुटला. त्याचा आवाज एखाद्या जुन्या, गंजलेल्या दारासारखा करकरत बाहेर आला.
"कोण, शिंदे? नक्की काय पाहिलंस तू तिथे?" मी खुर्ची ओढून त्याच्या अगदी जवळ बसलो.
शिंदेने डोळे गच्च मिटून घेतले, जणू त्याला ते दृश्य पुन्हा पाहायचं नव्हतं. "त्यांनी मला मारलं नाही... त्यांनी मला फक्त तिथे उभं केलं. त्यांना माहीत होतं तुम्ही येणार. त्यांना सगळं माहीत असतं, सर. आपण काय विचार करतो, आपण कुठून येणार... सगळं."
नेमक्या त्याच वेळी बाहेर वाऱ्याचा एक जोरात झोत आला आणि खिडकीचं तावदान जोरात आदळलं. मी क्षणभर दचकलो. कॅम्पच्या ज्या भिंती आतापर्यंत सुरक्षित वाटत होत्या, त्या आता अचानक कागदासारख्या कमकुवत भासू लागल्या.
"त्यांनी तुला काही सांगितलं का? काही निरोप?" मी विचारलं.
शिंदेने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत आता भीतीशिवायदुसरं काहीच दिसत नव्हतं. "त्यांनी सांगितलं... की हा फक्त खेळ आहे. आपण शिकारी आहोत असं आपल्याला वाटतंय, पण आपण फक्त त्या जंगलात मुद्दाम सोडलेली 'सावजं' आहोत. सर, ते आपल्यावर लक्ष ठेवून आहेत... आत्ताही, या क्षणीही."
शिंदे खाटेला टेकून बसला होता. डोळे उघडे होते, पण नजर स्थिर नव्हती. तो समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत होता, जणू तिथे त्याला एखादा जुना चित्रपट दिसत होता किंवा तो काहीतरी विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
मी त्याच्या जवळच्या स्टूलवर बसलो. काही क्षण आम्ही दोघंही गप्प होतो. मग मी विचारलं, “शिंदे... काय झालं होतं नक्की?”
तो लगेच उत्तर देऊ शकला नाही. त्याचे ओठ थरथरले, घसा कोरडा पडला होता. दोन-तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याचा आवाज बाहेर आला, एखाद्या जुन्या, गंजलेल्या दाराच्या आवाजासारखा.
“ते… दिसत नव्हते, सर,” तो पुटपुटला.
मी शांत बसलो. त्याला बोलू देणं महत्त्वाचं होतं.
“सुरुवातीला वाटलं… आपण एकटेच आहोत. पाऊस पडत होता, पानं सळसळत होती. पण मग अचानक… मागून कुणीतरी पकडलं. कसलाही आवाज नाही, पावलांची चाट नाही... फक्त दोन पोलादी हात.”
त्याच्या हातांनी नकळत हालचाल केली जणू तो पुन्हा तीच जीवघेणी झटापट अनुभवत होता. त्याचा श्वास आता वेगाने चालू लागला.
“त्यांनी मला ओढत नेलं. ते आधी अजिबात बोलत नव्हते, सर. फक्त… बघत होते. त्यांच्या डोळ्यांत काहीच नव्हतं, ना राग, ना दया.”
“किती जण होते?” मी विचारलं.
त्याने अगतिकपणे डोकं हलवलं. “मोजता आले नाहीत… काळोखात सावल्यांसारखे विखुरलेले होते. पण त्या गर्दीत एक माणूस वेगळा होता.”
मी खुर्ची थोडी जवळ ओढली. “तो माणूस... तो बोलत होता?”
“हो,” शिंदेने डोळे मिटले, जणू तो आवाज त्याला अजूनही ऐकू येत होता. “बाकी सगळे यंत्रासारखे शांत होते, पण तो आदेश देत होता. त्याचा आवाज थंड होता, पण त्यात एक प्रकारची सत्ता होती. त्याने मला पहिल्यांदा पाहिलं आणि तो हसला. म्हणाला, "एका प्रेतापेक्षा, भीतीने थरथरणारा एक जिवंत माणूस आमचा निरोप जास्त प्रभावीपणे सांगेल.”
खोलीतली शांतता आता जड झाली होती.
“त्यांनी मला मारलं नाही, सर... पण त्यांनी जे दाखवलं, ते मृत्यूपेक्षा भयाण होतं.” शिंदेचा आवाज आता बसला होता.
“काय दाखवलं?”
“तो मुलगा…” शिंदेच्या डोळ्यांत आता भीतीचं पाणी उभं राहिलं. “तो जिवंत होता, सर. सुरुवातीला तो जिवंत होता.”
त्या एका वाक्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला.
“ते त्याला गावातून घेऊन आले होते. तो लहान होता, रडत होता… पण त्याचा आवाज बाहेर येत नव्हता, इतका तो धास्तावला होता. ते त्याच्याशी एक शब्दही बोलले नाहीत. ते फक्त माझ्याकडे पाहत होते आणि मग त्या माणसाने... माझ्यासमोरच...”
शिंदेने वाक्य पूर्ण केलं नाही. त्याने तोंड दाबून घेतलं. मला पुढचं ऐकायची गरज नव्हती.
मी बराच वेळ सुन्न होऊन बसलो. मग हळू आवाजात विचारलं, “का केलं त्यांनी हे? तुला का जिवंत ठेवलं?”
शिंदेने मान वर केली. त्याची नजर आता पूर्णपणे स्थिरावली होती, पण ती नजर भीतीदायक होती. “तोच माणूस पुन्हा बोलला, सर. म्हणाला, "एकाला संपवतो जेणेकरून तुम्हाला आमची ताकद दिसेल... आणि एकाला जिवंत ठेवतो, जेणेकरून तो आमची दहशत तुमच्यापर्यंत पोहोचवेल.”
त्या एका वाक्याने शत्रूची पूर्ण रणनीती स्पष्ट झाली. हा फक्त एक हल्ला नव्हता, हे मानसिक युद्ध होतं.
“आणि तो वायरलेस?” मी विचारलं.
“त्यांनीच दिला. म्हणाले, ‘बोल आता. तुझे साहेब ऐकतील. त्यांना इथे घेऊन ये.’ त्यांना माहीत होतं की तुम्ही मला वाचवायला येणार. तो सापळा, ते आयईडी (IED), ती मोकळी जागा... सगळं काही तुम्हाला तिथे खेचून आणण्यासाठी रचलं होतं.”
मी उठलो. माझं डोकं आता चक्रावत होतं. आम्ही ज्याला आमचं शौर्य समजत होतो, तो प्रत्यक्षात शत्रूने रचलेला एक खेळ होता.
मी दरवाजापाशी थांबलो आणि मागे वळून शिंदेकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच बसलेला होता, पण आता त्याची नजर बदलली होती. तो फक्त मृत्यूच्या दाढेतून वाचलेला जवान नव्हता... तो शत्रूचा 'संदेश' घेऊन आलेला दूत होता.
खोलीतली शांतता आता जीवघेणी झाली होती. मेडिकल युनिटच्या बाहेर उभ्या असलेल्या गार्डची सावली भिंतीवर एखाद्या राक्षसासारखी नाचत होती.
मी उठलो आणि बाहेर आलो. पाटील तिथेच उभा होता, त्याची रायफल अजूनही त्याच्या खांद्याला लटकलेली होती.
"सर, काही माहिती मिळाली?" त्याने विचारलं.
"पाटील, रात्रीची गस्त आत्तापासूनच दुप्पट करा. प्रत्येक पोस्टवर किमान तीन जवान ठेवा. कोणीही झोपणार नाही," मी आदेश दिला.
"पण सर, आपण तर त्याला सुखरूप वाचवून आणलंय ना? शत्रू तर मागे राहिलाय," पाटीलने विचारलं.
मी कॅम्पच्या कुंपणापलीकडे असलेल्या त्या अथांग आणि काळोख्या जंगलाकडे पाहिलं. तिथून कुठूनतरी एखादं रानटी जनावर ओरडल्याचा आवाज दरीतून घुमत आला.
"आपण त्याला वाचवून नाही आणलंय, पाटील," मी थंडपणे म्हणालो. "त्यांनी त्याला आपल्यासाठी एक जिवंत संदेश म्हणून पाठवलंय. आणि त्याने जो निरोप आणलाय... तो गोळीपेक्षा जास्त घातक आहे."
त्या रात्री कॅम्पमध्ये कोणीच शांतपणे झोपलं नाही. प्रत्येक जण त्या बाहेरच्या अंधाराकडे पाहत होता, हे ओळखून की तिथूनही कोणीतरी आपल्याकडे डोळे रोखून पाहतंय.
उत्कंठा आता शिखरावर होती. कारण शत्रूने आपली शस्त्रं उगारली नव्हती... त्यांनी आमच्या मनांत 'भयाची बीजे' पेरली होती.
*************************************************************************************************************************
त्या रात्री कॅम्पमध्ये कोणीही उघडपणे अस्वस्थ दिसत नव्हतं, पण तरीही काहीतरी बदललं आहे, ही जाणीव प्रत्येकाच्या हालचालीतून दिसत होती. नेहमीसारखेच पहारे, नेहमीसारखीच दिनचर्या, पण नजरा अधिक जागरूक झाल्या होत्या.
जणू प्रत्येक जवान शरीराने आपल्या पोस्टवर असला, तरी मनाने बाहेर त्या काळोख्या जंगलाकडे खिळून होता. मी ऑफिसमध्ये एकटाच बसलो होतो. टेबलावर ती जप्त केलेली वही उघडी होती. त्या मुलीची वळणदार अक्षरं कंदिलाच्या मंद प्रकाशात एखाद्या गुपितासारखी भासत होती. मी काही ओळी वाचल्या आणि माझे डोळे स्थिरावले.
“मागे वळून पाहायचं नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.”
ही ओळ वाचताना काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. हे केवळ लष्करी प्रशिक्षण नव्हतं; हा एखाद्याला त्याच्या मुळापासून, त्याच्या भूतकाळापासून तोडण्याचा प्रयत्न होता. कोण होतास, कुठून आलास, कोणाचं रक्ताचं नातं होतं हे सगळं पुसून टाकण्याची ती एक भयानक सुरुवात होती.
मी वही अलगद बंद केली. तेवढ्यात पाटील आत आला, त्याच्या चेहऱ्यावर सूक्ष्म ताण जाणवत होता.
“सर… गावातून एक माणूस आलाय,” तो म्हणाला.
मी त्याच्याकडे पाहिलं. “कोण आहे?”
“त्या मुलाचा बाप... ज्याचा मृतदेह आपल्याला सापडला.”
क्षणभर मी काहीच बोललो नाही. डोक्यात त्या हाताचं चित्र पुन्हा एकदा ठळक झालं, मातीखालून बाहेर आलेलं, निश्चल… थंड.
क्षणभर मी काहीच बोललो नाही. मग फक्त मान हलवली. “आत पाठव त्याला.”
दरवाजा अलगद उघडला.
तो माणूस आत आला.
तो चालत होता पण प्रत्येक पावलात जडपणा होता. जणू शरीर पुढे सरकत होतं, पण मन मागेच कुठेतरी अडकून राहिलं होतं. अंगावर साधे, मळकट कपडे. पायात चपला. केस विस्कटलेले. पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, की सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट दिसत होती त्याचे डोळे, ते रिकामे होते...रडून सुजलेले नाहीत, संतापाने लाल झालेले नाहीत, फक्त… रिकामे.
तो दाराजवळच थांबला. आत यायचं की नाही, याचाही निर्णय जणू त्याला होत नव्हता.
“बस,” मी शांतपणे म्हटलं.
तो बसला नाही. तसाच उभा राहिला. काही क्षण तो शून्यात पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, "तुम्ही… माझ्या पोराला शोधलंत.”
त्या आवाजात काहीच नव्हतं, ना आरोप, ना कृतज्ञता, ना दुःखाचा उद्रेक, फक्त एक थकलेली जाणीव.
मी मान हलवली. शब्द सापडले नाहीत. “आम्ही… प्रयत्न केला,” एवढंच म्हणालो. “पण—”
“ते दोनदा आले होते,” तो माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणाला.
मी ताठ झालो. आता माझं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे खिळलं.
“पहिल्यांदा आले तेव्हा… फक्त बोलायला आले होते,” तो पुढे म्हणाला. “गावात फिरले… कोण कुठे आहे ते पाहिलं.”
तो थोडा थांबला, ओठ कोरडे झालेले, त्याने जीभ फिरवली.
“दुसऱ्यांदा आले… तेव्हा त्याला न्यायला आले.”
खोलीत एकदम शांतता पसरली. ती शांतता साधी नव्हती ती जड होती. अंगावर येणारी.
पाटील स्वतःला थांबवू शकला नाही. “मग तुम्ही काहीच केलं नाही? अडवलं नाही?” त्याचा आवाज थोडा चढला.
तो माणूस हळूच पाटीलकडे वळला. त्या नजरेत राग नव्हता. पण जे होतं, ते त्याहून जास्त भयंकर होतं, स्वीकार. निर्लज्ज वास्तवाचा स्वीकार.
तो हळू आवाजात म्हणाला, “ते येतात तेव्हा… तुम्ही नसता.” क्षणभर थांबला. “आणि तुम्ही असता… तेव्हा ते नसतात.”
ते फक्त उत्तर नव्हतं, तो आरसा होता. त्या एका वाक्याने आमच्या संपूर्ण यंत्रणेवरचं अपयश अधोरेखित केलं.
मी काही क्षण शांत राहिलो. मग सावकाश विचारलं, “तुमचा मुलगा काय म्हणाला? तो त्यांच्यासोबत का गेला नाही?”
तो माणूस खाली पाहत उभा राहिला. त्याचे हात थरथरत नव्हते. तो रडत नव्हता. पण त्याच्या आत काहीतरी तुटलेलं स्पष्ट दिसत होतं.
“तो गेला नाही, साहेब,” तो म्हणाला. त्या वाक्यात अभिमान होता. आणि त्याचबरोबर… अपरिमित वेदना.
“त्याने नकार दिला.”
मी हळू आवाजात विचारलं, “म्हणजे त्याने त्यांचं ऐकायला नकार दिला?”
त्याने मान हलवली.
“हो. तो म्हणाला. क्षणभर त्याचा आवाज अडखळला. पहिल्यांदाच. “म्हणूनच त्यांनी त्याला संपवलं,” तो पुढे म्हणाला. “त्यांना वाकणारी माणसं हवी असतात, साहेब… उभी राहणारी नाही.”
खोलीत पुन्हा शांतता पसरली.
मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिलो. मग सावधपणे विचारलं, “तुमच्या गावातली एक मुलगी… काही वर्षांपूर्वी गायब झाली होती… आठवते का?”
तो क्षणभर स्तब्ध झाला. “ओळखतो,” तो म्हणाला. “आमच्याच शेजारची होती.”
पाटीलने माझ्याकडे पाहिलं. आपण जे तुकडे जोडत होतो, ते आता हळूहळू स्पष्ट होत होते.
मी पुढे विचारलं, “तिची आणि तुमच्या मुलाची ओळख होती?”
तो थोडा वेळ काही बोलला नाही. मग हळूच म्हणाला, “ओळख नव्हती… साहेब.”
त्याने वर पाहिले, त्या रिकाम्या डोळ्यांत आता एक वेगळीच वेदना होती.
“ते दोघं एकत्र मोठे झाले… भावंडांसारखे.”
त्या क्षणी सगळं चित्र लख्ख झालं. वहीतली अक्षरं, शिंदेचा थरकाप उडवणारा खुलासा आणि या बापाचं दुःख सगळं एकाच साखळीत गुंफलं गेलं होतं. एकाला त्यांनी आपल्या रंगात रंगवलं होतं, तर दुसऱ्याने नकार दिला म्हणून त्याला कायमचं संपवलं होतं.
तो माणूस निघून गेला.
तेवढ्यात वायरलेसवर खरखर झाली. “पोस्ट तीन गावाच्या बाजूने संशयास्पद हालचाल दिसतेय.”
मी ताडकन उभा राहिलो. “किती जण आहेत?”
“स्पष्ट दिसत नाहीये, सर… पण हालचाल वेगाने गावाच्या दिशेने आहे.”
मी क्षणाचाही विचार न करता म्हणालो, “ते कॅम्पकडे येत नाहीत, पाटील.”
“मग?”
“ते गावाकडे जात आहेत. त्यांना कळून चुकलंय की कुणीतरी आपल्याकडे येऊन तोंड उघडलंय.”
त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं. आतापर्यंत हा संघर्ष घनदाट जंगलात होता, पण आता तो थेट लोकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता. आणि या वेळी, आम्ही केवळ पाहणारे प्रेक्षक बनून राहू शकत नव्हतो.