गावं बदलत आहेत.
पूर्वीचं संथ वातावरण राहिलं नाही असं म्हणतात. लोक गावच्या पूर्वीच्या रूपाची चर्चा करतात. सगळे गुण्यागोविंदाने रहायचे असे म्हणतात.
पण खरंच असं आहे का?
सध्या गावागावात विविध पक्षात तरूण भरती होत आहेत. पूर्वी एकच पक्ष असायचा. त्यामुळं एक नेता असे. त्याचं घराणं असे. हे घराणं संस्थानिकाप्रमाणे असायचं. काही गावात पाटील आणि देशमुख असे प्रबळ गट असत. काही गावात तणाव असे. पण निवडणुका वगळता गावचं जीवन एरव्ही शांत असे.
आताच्या काळात राजकारण उगीचच तापवलं जातं. एखाद्या पक्षात संधी नसेल कि विविध पर्याय आहेत. पूर्वी एका आडनावाची एका गल्लीची माणसं एका पक्षाकडे असायची. आता तसे राहिलेले नाही. यातून शह काटशहाचं वातावरण आता गल्ली, आळी लेव्हलला आलेलं आहे.
छोट्या छोट्या कुरघोड्यातून एकमेकांवर जीवघेणे हल्ले वाढले आहेत.
राज़कारण खराब आहे कि लोकांनाच हे सर्व हवंय?
सामान्यांना अलिप्त राहणे शक्य नाही. अलिप्त असणे याचा अर्थ आपल्या गटाचा नाही असा काढला जातो. त्यामुळे कुणीच वाली नाही अशी परिस्थिती आहे. सर्वच गावची परिस्थिती अशी आहे असं नाही. पण हे बदललेलं वारं झपाट्याने पसरत चाललं आहे. एकाच पक्षाचे दोन गट जिथे आहेत तिथे संभ्रमाचं वातावरण आहे.
पूर्वी गावं शांत होती का?
पूर्वी गावं नेत्याच्या मागे असायचीच. गावाला दोन प्रकारचे नेते असत. एक सर्वांना घेऊन जाणारे आणि दुसरे धाक घालून आपल्या मागे यायला लावणारे.
धाक घालणार्यांना सुद्धा पाठिंबा असायचाच. पण जे सोबत नाहीत त्यांची अडवणूक, त्यांना दमदाटी हे चालायचेच. कधी कधी ती स्पष्ट नसायची. पण दबाव आणला जायचा.
जे नेते लोकप्रिय म्हणवले जात ते ही आपल्या शब्दाला मान आहे यामुळे सुखावत असत. मग ते स्थानिक वादात न्यायनिवाड्याचे काम करत. या कामात त्यांनी सुचवलेला पर्याय हा गावचा कायदाच असायचा. नेते गावात बहुसंख्य कोणत्या मताचे आहेत याचा कौल घेऊन न्याय देत.
आमच्या गावी आम्हाला जमीन नव्हती. होती ती ओढ्याच्या पलिकडे एखादा एकर होती. तिथे पाणी नव्हतं. पावसाळ्यात जे पाणी येई त्यावर शेती होत नसे. तसेच तिच्यात अनेकांचा हिस्सा असल्याने ती करण्यायोग्य नव्हती. गावाने त्यावर गायरान शिक्का मारला होता. म्हणजे आता ती सार्वजनिक झाली होती. त्यामुळं आजोबांनी रस्त्याच्या कडेला अडीच एकर जागा स्वखर्चाने घेतली.
याच जमिनीत गावाला देऊळ बांधायचं होतं. चार गुंठे जागा हवी होती.
चार गुंठ्यात देऊळ म्हणजे आजूबाजूला कट्टे येणार, जत्रा भरणार, देवळं येणार. त्याला नाही म्हणू शकत नाही.
जागा मागायला आलेल्यांमधे कमीत कमी चाळीस एकरचे मालक होते.
एक जण म्हणाला कि "मी दहा एकर दिली असती, पण् मंदीर माझ्या जागेत बांधून काय फायदा?"
मी म्हणालो," रस्त्याच्या कडेची अडीच एकर जागा आहे. तुम्ही दहा एकर द्या, त्या बदल्यात आमची जागा घ्या. मग तिच्यात काही पण करा."
वडलांनी मला बाजूला केलं. नम्रपणे नाही म्हणाले.
दोन दिवसांनी वडलांचा भाऊ तणतणत आला. म्हणाला,"दादा, ते आता आम्हाता राहू देतील का गावात?"
वाद नव्हताच पण वादाचं स्वरूप आलं.
नेत्यांच्या गावी बोलावणं आलं.
नेत्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. म्हणाले, " गावाच्या पुढं कुणी गेलंय का? आम्ही पण जात नाही. का गेलोय?"
त्यावर सगळे नाही नाही म्हणाले.
"जमीन आज आहे, उद्या नाही. काय वर घेऊन जायची का? पण गावच्या धार्मिक भावना दुखावून कसं चालंल? दादा माझ्या शब्दासाठी हो म्हणा"
यावर काहीही बोलणं हा गुन्हा असतो.
दादा काही बोलले नाहीत. याचा सोयीस्कर अर्थ काढत "आता गावच्या मनासारखं झालंय. सह्या करून मिटवून टाका"
हा न्याय झाला.
कोर्टात जाणे याचा अर्थ वेगळा होत असतो.
अडीच एकरातल्या चारच्या ऐवजी आठ गुंठ्यात मंदीर झालं. आजूबाजूला झाडं आली. रस्त्याच्या कडेला दुकानं झाली.
आमच्या जमिनीसोबतच आजूबाजूच्या जमिनींवर पण आक्रमणं झाली.
नेते महान आहेत. ते अजून महान झाले आहेत.
त्यांच्या शाळा आहेत. दूध संघ आहेत. कारखाने आहेत. लोकांना रोजगार आहे.
असे महान लोक गावोगावी आहेत.
आमच्या सारखे किरकिरे पण गावोगावी आहेत. विकासाला अडथळा ठरणारे.
महान लोकांच्या रस्त्यातले काटे.
तुम्ही कोण आहात काटे कि फूल?
गावोगावी असे प्रकार आहेत..
गावोगावी असे प्रकार आहेत..
बळी तो कान पिळी