पूर्वभाग
जाधव जखमी अवस्थेत परत आणल्यानंतर त्याच्याकडून कळतं की शिंदेला जिवंत पकडून नेलं आहे—जाणीवपूर्वक. टीमला लक्षात येतं की ही साधी चकमक नसून आखलेला सापळा आहे. जंगलातील खुणा, दिशाभूल करणारे मार्ग आणि पुसलेले पुरावे पाहून ते खात्री करतात की शत्रू त्यांना खेळवत आहे. शोधमोहीम दरम्यान एका गायब मुलाचा मृतदेह सापडतो जो स्पष्ट इशारा असतो. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते आणि टीम ठरवते की घाई न करता, शत्रूच्या नियमांवर न खेळता, अत्यंत सावधपणे पुढची चाल आखायची.
*************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग ५ - Bait
त्या जागेवरून मागे वळताना कोणीही अवाक्षर उच्चारलं नाही. पावलं पडत होती, पण प्रत्येक पावलागणिक मनावरचा विचार जड होत चालला होता.
काही क्षणांपूर्वी जे भयानक वास्तव डोळ्यांनी पाहिलं होतं, त्याला शब्द नव्हते आणि त्या क्षणी शब्दांची गरजही उरली नव्हती.
त्या मातीखालून बाहेर आलेल्या त्या हाताने जो संदेश दिला होता, तो प्रत्येकाच्या काळजात काळोखासारखा पसरला होता.
कॅम्पमध्ये परतलो तेव्हा सूर्य डोक्यावर चढला होता. मी थेट ऑफिसमध्ये गेलो आणि टेबलावरचा तो नकाशा पुन्हा उघडला.
सकाळी पाहिलेल्या त्या खुणा, दिशा, वळणं...सगळ्यांचा आता एक जीवघेणा आकृतिबंध तयार होत होता.
शिंदेला जिथून उचललं, ती जागा निव्वळ योगायोग नव्हती; ती त्यांनी विचारपूर्वक निवडली होती.
मग केलेला दिशाबदल, पुसलेल्या खुणा आणि मध्येच घेतलेला तो थांबा... हे सगळं घाईत झालेलं नव्हतं, तर एका थंड डोक्याने आखलेल्या योजनेचा भाग होता.
पाटील आत आला तेव्हा खोलीत आधीच एक दाट शांतता साचलेली होती. दरवाजा अलगद बंद झाला, आणि त्याच्यासोबत बाहेरचा हलका गोंगाटही थांबला.
तो काही क्षण तसाच उभा राहिला—न बोलता. जणू शब्द शोधत होता, किंवा ते बोलण्याची योग्य वेळ. मी नकाश्याकडून नजर हटवली नाही.
रेषा, वळणं, खुणा हे सगळं अजूनही मनात फिरत होतं.
“सर…” तो शेवटी म्हणाला. आवाज दबलेला होता. “त्या मुलाच्या बॉडीचं काय करायचं?”
मी काही क्षण उत्तर दिलं नाही. मग शांतपणे म्हणालो, “गावात पोहचवा.”
मी बोट नकाशावरून अलगद बाजूला घेतलं. “त्याच्या घरच्यांना निदान तेव्हढं तरी समाधान मिळेल.”
पाटीलने हळूच मान हलवली.
त्याने वळून पाऊल टाकलं, पण दाराशी घुटमळला. मागे वळून त्याने पुन्हा विचारलं, "गावकऱ्यांकडे चौकशी करतो, कदाचित काही माहिती मिळेल."
या वेळी मी नकाश्याकडून नजर काढून त्याच्याकडे पाहिलं. "गावकरी घाबलेत, मला नाही वाटत ते आपल्याशी बोलतील"
पाटील काही न बोलता बाहेर निघून गेला.
दुपारच्या सुमारास एक छोटं पथक त्या मुलाचं शरीर घेऊन गावाच्या दिशेने निघालं.
स्ट्रेचर उचलताना कोणाच्याही चेहऱ्यावर भाव नव्हते, पण पाऊल टाकताना ते जास्त जपून चालत होते, जणू आवाजही जास्त झाला तर काहीतरी तुटेल.
आम्ही कॅम्पमध्येच थांबलो. कोणताही उतावीळ निर्णय घ्यायचा नाही, हे ठरवलं होतं.
हालचाल मर्यादित ठेवली. वरवर सगळं स्थिर वाटत होतं, पण प्रत्येक पोस्टवरची नजर आता घारीसारखी तीक्ष्ण झाली होती.
*************************************************************************************************************************
संध्याकाळच्या सावल्या हळूहळू लांब होत होत्या. सूर्य खाली झुकत होता, आणि त्याचा प्रकाश झाडांच्या फांद्यांत अडकून तुटक तुकड्यांत जमिनीवर पडत होता.
त्या प्रकाशात कॅम्प थोडा शांत, थोडा थकलेला वाटत होता.
गेटजवळ हालचाल झाली. ते पथक परत आलं.
त्यांच्या चालण्यात थकवा होता, पण तो फक्त शरीराचा नव्हता.
एक जवान पुढे आला. “सर…” तो म्हणाला,“गावात कोणीच काही बोललं नाही.”
मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं. तो काही क्षण थांबला. मग हळू आवाजात पुढे म्हणाला, “पण… त्यांच्या एकूण वागण्यावरून असं वाटतंय कि त्यांना ठाऊक आहे.”
मी विचारलं, “काय ठाऊक आहे?”
तो क्षणभर रेंगाळला. जणू शब्द निवडत होता. “हे कोणी केलंय… ते.”
पाटीलने विचारलं, “कोणाचं नाव घेतलं का त्यांनी?”
जवानने हळूच नकारार्थी मान हलवली. “नाही, सर. कोणीच काही बोललं नाही.”
मी काही क्षण काहीच बोललो नाही. डोक्यात विचार एकमेकांना जोडले जात होते.
गाव शांत, सगळं माहिती असूनही लोक बोलायला घाबरतायत.
मी हळू आवाजात म्हणालो, “म्हणजे ते अजूनही इथंच आहेत.”
मी खिडकीबाहेर पाहिलं. संध्याकाळचा प्रकाश कमी होत चालला होता. झाडांच्या सावल्या एकमेकांत मिसळत होत्या. अंधार हळूहळू परत येत होता.
आणि त्या अंधारासोबत एक जाणीवही परत येत होती...ते दूर गेले नव्हते. ते लपले होते. पाहत होते आणि योग्य क्षणाची वाट बघत होते.
पाटील काही वेळाने हळूच माझ्याजवळ येऊन उभा राहिला. काही क्षण थांबून मग हळू आवाजात म्हणाला, “सर, आपण थांबलोय… हे त्यांना कळेल.”
मी खिडकीतून बाहेर पाहतच उत्तर दिलं, “कळू दे.”
तो माझ्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत प्रश्न होता... फक्त पुढचा नाही, तर त्यामागचा विचारही.
“मग ते पुढे सरसावतील?” त्याने विचारलं.
मी थोडा वेळ काही बोललो नाही. जंगल पुन्हा आपलं रूप बदलत होतं. दिवस मागे सरकत होता. आणि अंधार हळूहळू पुढे येत होता.
मी त्या सावल्यांकडे पाहत म्हणालो, “त्यांनी आपल्याला एक बाजू दाखवली आहे, आता त्यांना बघू दे… आपण काय करतो.”
रात्र जसजसी गडद होत गेली, तशी कॅम्पवरची शांतता अधिकच गूढ होत गेली. कुणीही झोपलं नव्हतं. टॉवरवरून सर्चलाईट फिरत होती.
मी कुंपणाच्या तारांजवळ उभा राहिलो. समोरचं जंगल आता फक्त झाडांचा समूह राहिला नव्हता—तो लपण्यासाठीचा एक प्रचंड व्यूह झाला होता.
पाटील शेजारी येऊन उभा राहिला. त्याने अंधाराकडे पाहत विचारलं, “सर… ते आपल्याला बघत असतील का?”
मी नजर न वळवता उत्तर दिलं, “नक्कीच.”
तो पुन्हा शांत झाला.
मी पुढे म्हणालो, “आणि आपणही त्यांच्याकडेच पाहतोय. फरक एवढाच की, ते सध्या काळोखाच्या पडद्याआड आहेत.”
रात्रीचा प्रहर पुढे सरकत होता, पण वेळेची जाणीव मात्र पूर्णपणे हरवली होती. प्रत्येक मिनिट एखाद्या तासासारखं लांबत चाललं होतं.
आतल्या बाजूला मात्र प्रत्येक आवाजावर जवानांची बोटं ट्रिगरला स्पर्श करून होती.
टॉवरवरचा जवान थोड्या-थोड्या वेळाने आपली दिशा बदलत होता. त्याची नजर एका ठिकाणी स्थिर राहणं धोक्याचं होतं.
वायरलेस सेटवरून येणारे मोजकेच आणि मोजून-मापून उच्चारलेले शब्द त्या रात्रीच्या गूढतेत अधिकच भर टाकत होते.
मी अजूनही त्याच कुंपणापाशी उभा होतो. समोरचा काळोख पूर्वीसारखाच दाट होता, पण आता त्यात हालचालींची कुणकुण जाणवू लागली होती.
डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं, तरीही तिथे कोणीतरी आहे, याची जाणीव मनाला टोचत होती.
पाटील शेजारीच होता. त्याने दबल्या आवाजात विचारलं, “सर… जर ते आज आलेच नाहीत तर?”
मी नजरेसमोरचा तो अथांग अंधार टिपत उत्तर दिलं, “त्यांचं येणं आता दुय्यम आहे, पाटील.”
तो थोडा गोंधळला. “मग?”
मी शांतपणे म्हणालो, “आपण त्यांना कधी आणि कुठे दिसतो हे आता महत्त्वाचं आहे. हा आता फक्त लपंडाव उरलेला नाही.”
काही वेळ असाच शून्यात गेला.
अचानक टॉवरवरून एक अत्यंत हलका, पण सावध इशारा आला. “डावीकडे… थोडी हालचाल.”
तो आवाज मोठा नव्हता, पण स्पष्ट होता. मी वर पाहिलं. त्या दिशेला केवळ झाडांच्या अवाढव्य सावल्या हलत होत्या.
पण अनुभव सांगत होता कि अशा रात्री नजर कधीच फसत नसते.
“नजर हटवू नका,” मी कुजबुजलो.
कुणीही घाई केली नाही. प्रत्येकाचा श्वास रोखला गेला होता. दोन-तीन मिनिटं तशीच सरकली.
मग पुन्हा तीच हलकी, सरपटणारी हालचाल.
या वेळी ती आधीपेक्षा थोडी पुढे आणि जास्त स्पष्ट होती. पाटीलने सज्ज होत विचारलं, “फायर करू?”
मी तात्काळ नकार दिला. “नको. तीच त्यांची इच्छा आहे.”
आम्ही सर्वजण त्या हालचालीचा वेध घेत राहिलो. आणखी काही क्षण श्वास रोखून धरले. मग...ती हालचाल अचानक थांबली. पूर्णपणे. जंगल पुन्हा एकदा त्या स्मशान शांततेत विरून गेलं.
पाटील पुटपुटला, “गेले वाटतं.”
मी सावधपणे म्हणालो, “नाही. ते तिथेच थांबले आहेत. आपली प्रतिक्रिया बघतायत.”
काही सेकंदांनंतर वायरलेसवर एक विसंगत, हलका आवाज उमटला.
तुटक. दीन. क्षीण.
“...स...सर…”
माझ्या अंगावर काटा आला. मी तात्काळ सेट हातात घेतला. “कोण? नाव सांगा!”
क्षणभर पलीकडून फक्त खरखर ऐकू आली. मग... “...शिं...दे…”
पाटीलने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आवाज पुन्हा घुमला, पण यावेळी त्यात एक भयानक कळवळ होती.
“...जी...वं...त आहे… पण…”
आणि तितक्यात संपर्क तुटला. वायरलेसवर पुन्हा एकदा तीच निर्जीव शांतता पसरली. काही क्षण कुणीच काही बोललं नाही.
पाटीलने घोगऱ्या आवाजात विचारलं, “सर… हा खरंच तोच होता का?”
मी काही काळ उत्तराचा शोध घेत राहिलो. मग म्हणालो, “हो. आवाज शिंदेचाच होता.”
तो पुन्हा काही विचारणार होता, पण मी त्याला मध्येच थांबवलं— “आणि त्यांनी आपल्याला मुद्दाम ऐकवलाय, पाटील.”
तो थोडा थबकला. “म्हणजे?”
मी शांतपणे समजावलं, “त्यांना ठाऊक आहे की आपण फ्रिक्वेन्सी टॅप करतोय. त्यांना हवं होतं की आपण त्याचा तो हतबल आवाज ऐकावा. आपल्याला उचकवण्यासाठी टाकलेली ही जाणीवपूर्वक खेळी आहे.”
मी त्या काळोखाकडे पाहत राहिलो. “आत्ता आपण लगेच कोणतीही हालचाल करणार नाही.”
तो चकित झाला. “पण सर—तो जिवंत आहे! आपण त्याला तिथे सोडू शकत नाही.”
मी त्याच्याकडे वळलो. “हो, तो जिवंत आहे. आणि म्हणूनच ते आत्ता शांत आहेत. जर आपण आत्ता बाहेर पडलो, तर आपण थेट त्यांच्या सापळ्यात पाय देऊ. आपण त्यांच्या हद्दीत आणि त्यांच्या वेळेत खेळायला सुरुवात करू. आणि तेच त्यांना हवंय.”
पाटीलने हतबल होऊन मान हलवली.
काही क्षण पुन्हा त्या गोठलेल्या शांततेत गेले. मग त्याने विचारलं, “म्हणजे आपण फक्त वाट बघायची?”
मी उत्तर दिलं, “केवळ वाट नाही... आपण त्यांचा पुढचा डाव रचण्याची संधी आणि जागा शोधतोय.”
त्या रात्री कॅम्प पुन्हा एकदा स्थिर झाला. पण आता एक मोठा फरक पडला होता.
आधी आपण अंधारात काय लपलंय, याचा शोध घेत होतो. आता अंधार आपल्याला पूर्णपणे ओळखून होता.
आणि त्या अथांग काळोखाच्या पोटात, कोणीतरी मरणाच्या दारात असूनही जिवंत होता. आणि कोणीतरी... त्याला केवळ एका मोहरा म्हणून जिवंत ठेवत होतं.
रात्रीचा उरलेला प्रहर तसाच सरला. डोळे मिटले गेले असतील, पण झोप कोणालाच लागली नव्हती. प्रत्येकजण आपल्या जागी पडून होता, तरी मन सतत जागं होतं.
अधूनमधून वायरलेसचा मंद आवाज, दूर कुठेतरी पानांची हलकी हालचाल… आणि त्या सगळ्याच्या मध्ये एक विचार ठामपणे फिरत होता.
“शिंदे जिवंत आहे.” ते फक्त शब्द नव्हते. तो एक संकेत होता. जाणीवपूर्वक सोडलेला.
कुणीतरी ते शब्द आमच्यापर्यंत पोहोचवले होते—मोजून, वेळ साधून. त्यात घाई नव्हती, भावनाही नव्हत्या. तो संदेश होता… आणि त्यामागे हेतू होता.
आपण त्या दिशेला जावं असं त्यांना वाटत होतं.
पहाट फुटायच्या आधीच मी ऑफिसमध्ये पोहोचलो. बाहेर अजूनही अंधुक उजेड होता...ना पूर्ण रात्र, ना पूर्ण दिवस. त्या अर्धवट प्रकाशात सगळं धूसर वाटत होतं.
मी टेबलावर नकाशा पसरला. कागदावरच्या रेषा पुन्हा जिवंत झाल्या.
काल जिथे खुणा पुसल्या गेल्या होत्या, जिथे माती उकरलेली सापडली होती, जिथून पुढे वाटा अचानक हरवल्या होत्या...त्या सगळ्या जागा मी एकामागोमाग जोडत गेलो.
हळूहळू एक आकृती तयार व्हायला लागली.
ती सरळ नव्हती. ती तुटक होती, वाकडी, गोंधळात टाकणारी.
त्या सगळ्या बिंदूंना जोडल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसत होती ही फक्त हालचाल नव्हती.
तर त्यामागे एक वेगळीच, घातक रचना दिसत होती.
पाटील आत आला. त्याने काही विचारलं नाही, फक्त माझ्या शेजारी उभा राहून त्या नकाशावर नजर फिरवली.
“ते आपल्याला बोलावतायत, पाटील,” मी शांतपणे म्हणालो.
तो काही न बोलता ऐकत राहिला. मी पुढे म्हणालो, “हे सरळ आमंत्रण नाहीये, पण आपण त्या विशिष्ट परिघातच यावं, अशी त्यांची खेळी आहे.”
“मग आपण जाणार?” पाटीलने विचारलं. त्याच्या आवाजात एक प्रकारची सिद्धता होती.
मी क्षणभर विचारात पडलो. मग ठामपणे म्हणालो, “जाणार. पण त्यांच्या तालावर नाही—आपल्या हिशोबाने आणि आपल्या वेळेत.”
*************************************************************************************************************************
सकाळ उजाडता उजाडता आमची तयारी पूर्ण झाली. मोठं पथक नाही, वाहनांचा आवाज नाही.
केवळ निवडक माणसं, ज्यांना काय करायचं आहे हे सांगण्याची गरज नव्हती.
प्रत्येकाने आपलं शस्त्र तपासलं, सामान नीट केलं, आणि न बोलताही एकमेकांकडे पाहून आपण तयार आहोत याची खात्री केली.
मी मेडिकल रूमकडे वळलो. आत हवा स्थिर होती. औषधांचा वास, मंद प्रकाश, आणि जखमींच्या श्वासांचा ताल.
जाधव अजूनही खाटेवर होता. शरीराने थकलेला. पण डोळे जागे. मी आत शिरताच त्याची नजर माझ्यावर स्थिर झाली.
त्या नजरेत एकच प्रश्न होता. “शिंदे?”
मी त्याच्या जवळ गेलो. काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिलो. मग शांतपणे म्हणालो, “तो जिवंत आहे आणि त्याला परत आणायचंय.”
जाधवने हळूच डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी हालचाल उमटली. वेदना नव्हती ती.
ती दिलासा होती. निशब्द. पण स्पष्ट.
सूर्य पूर्णपणे वर यायच्या आधीच आम्ही कॅम्पच्या सीमारेषा ओलांडल्या. सकाळचा प्रकाश अजून कोवळा होता, पण त्यातही एक ताण जाणवत होता.
जणू जंगल पूर्णपणे जागं होण्याआधीच आपण त्याच्या आत शिरलो होतो. हवा थंड होती, ओलसर होती, आणि प्रत्येक श्वासात मातीचा एक जड वास मिसळलेला होता.
आम्ही कालची वाट धरली नाही. ती वाट आता आपली राहिली नव्हती. ती वाट त्यांना माहीत होती.
म्हणून आम्ही वळसा घेतला. दुर्गम, कमी वापरलेली , आणि दिसायला अनिश्चित अशी वाट निवडली. झाडांच्या आडून, उतार चढत-उतरत, आम्ही त्यांच्या संभाव्य परिघाभोवती सावकाश फिरत होतो.
पाटील माझ्या जवळच चालत होता. काही वेळ शांत राहून तो कुजबुजला, “सर, आपण विरुद्ध दिशेने का जातोय?”
“कारण ते आपली वाट पाहत असतील तिथे आपण त्यांना सापडायचं नाहीये,” मी चालतच उत्तर दिलं.
तो काही बोलला नाही. पण त्याने पाऊल अजून सावध टाकायला सुरुवात केली.
आम्ही जंगलाच्या आत शिरत गेलो तसं प्रकाश कमी होत गेला. वरच्या फांद्या इतक्या दाट होत्या की सूर्यकिरण तुटक तुकड्यांतच खाली येत होते. काही ठिकाणी तर दिवस असूनही अंधारासारखं वाटत होतं.
प्रत्येक पाऊल आता अधिक जपून टाकलं जात होतं. मातीला स्पर्शही न करता चालत असल्यासारखं. पानं बाजूला सारताना आवाज येऊ नये, याची खबरदारी घेत.
कधी थांबून ऐकायचं. कधी थांबून पाहायचं. आणि पुन्हा पुढे सरकायचं असं करत करत साधारण तासाभराने आम्ही एका उंचवट्यावर थांबलो.
तिथून खाली एक उतार पसरला होता. मी हाताने इशारा केला आणि संपूर्ण टीम जागीच बसली. मी काही क्षण त्या भागाचं निरीक्षण केलं.
डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं, तरीही ती जागा 'शांत' वाटत नव्हती. तिथे कसलातरी दबाव जाणवत होता.
“इथून पुढे अत्यंत सावध,” मी सूचना दिली.
आम्ही उताराकडे सरकायला लागलो तेव्हा मी हाताने हलकासा इशारा केला. लगेच हालचाल बदलली.
दोन जवानांनी पुढच्या बाजूला कव्हर घेतलं. एकाने उजव्या कोनातून नजर रोखली, तर दुसऱ्याने वरच्या फांद्यांकडे लक्ष केंद्रित केलं.
मागचे दोन जण स्थिर राहिले. प्रत्येकाची बंदूक तयार होती, पण कोणीही घाई करत नव्हतं.
जंगल शांत होतं पण ते नैसर्गिक नव्हतं. जणू कुणीतरी जाणीवपूर्वक आवाज थांबवला होता.
आणि तेव्हाच समोरच्या झाडीत एक सूक्ष्म हालचाल झाली. इतकी सूक्ष्म की ती डोळ्यांचा भ्रमही वाटू शकली असती पण ती नव्हती.
त्या एका क्षणात सगळं थांबलं. कोणी आवाज केला नाही फक्त श्वास थांबले.
जंगल पुन्हा स्थिर झालं. जणू काहीच घडलं नव्हतं पण ते घडलं होतं.
सगळे जागच्या जागी थिजले. कोणीही फायर केलं नाही. कोणीही आवाज केला नाही.
फक्त नजर त्या दिशेला स्थिर झाली. मी हाताने खुण केली...थांबा. निरीक्षण करा. प्रतिक्रिया देऊ नका.
काही सेकंद गेले आणि समोरच्या झाडीतून काहीतरी अलगद खाली सरकल्यासारखं वाटलं. ते पडताना कोणताही आवाज झाला नाही. फक्त माती हलल्याचा एक संकेत.
ती वस्तू थोडी घसरत आमच्या दिशेने आली आणि काही अंतरावर येऊन थांबली.
माझ्या मागे उभ्या असलेल्या जवानाचा श्वास थोडा जोरात झाला. त्याने पकड घट्ट केली. मी हात मागे करून हलकासा इशारा केला...स्थिर राहा.
मी सावकाश पुढे सरकलो. रायफल पुढे ठेवून, शरीर शक्य तितकं स्थिर ठेवत, मी त्या वस्तूकडे जात होतो.
प्रत्येक पाऊल टाकताना मी तीन गोष्टी पाहत होतो...वस्तू, तिचा आलेला कोन, आणि तिच्याभोवतीचा परिसर.
जवळ गेल्यावर मी हलकासा वाकलो आणि ती वस्तू हातात घेतली. तो एक वायरलेस सेट होता.
जुना, मातीने माखलेला, आणि त्याची स्क्रीन तडे गेलेली जणू तो वापरून फेकून दिला गेला होता. हा आमचाच सेट होता, शिंदेचा.
त्याचा कॉलसाइन अजूनही अर्धवट दिसत होता. म्हणजे ते फक्त आपल्यावर नजर ठेवत नव्हते. ते आपली साधनंही वापरत होते.
मी क्षणभर आजूबाजूला पाहिलं. ओव्हरवॉचमध्ये उभे असलेले जवान अजूनही त्यांच्या जागी होते. दोन बंदुका त्या दिशेला स्थिर होत्या जिथून वस्तू आली होती.
मी तो हळूच कानाजवळ नेला. पहिल्यांदा फक्त static—हवेचा तुटक, अस्थिर आवाज.
मग त्या आवाजात हलकीशी हालचाल झाली. आणि त्यातून एक ओळखीचा स्वर बाहेर आला.
क्षीण, तुटक पण स्पष्ट.
“…सर…”
तो शिंदेच होता. आवाज तुटक होता, क्षीण होता पण ओळखायला चूक होण्याची शक्यता नव्हती. मात्र त्यात काहीतरी बदललं होतं.
त्या शब्दांमध्ये त्याचा स्वतःचा सूर कमी होता… आणि कुणाचातरी दबाव जास्त. जणू प्रत्येक अक्षर तो स्वतःहून बोलत नव्हता...त्याच्याकडून बोलवून घेतलं जात होतं.
कुणीतरी ऐकत होतं. कुणीतरी नियंत्रण ठेवत होतं. मी काही क्षण तो सेट कानाजवळच धरून ठेवला. मग हळूच तो परत मातीवर ठेवला.
पाटील माझ्याकडे व्याकूळ नजरेने पाहत होता. “सर… rescue?”
त्याच्या नजरेत अस्वस्थता होती, घाई होती पण त्याने स्वतःला रोखून धरलं होतं.
मी आजूबाजूला पाहिलं. झाडं स्थिर होती. पानं हलत नव्हती. पण त्या स्थिरतेतच काहीतरी जिवंत होतं.
मी त्याच्याकडे वळलो. आवाज खाली ठेवत, पण शब्द स्पष्ट उच्चारत म्हणालो, “आपण अजून त्यांच्या रेंजमध्ये आहोत, पाटील.”
“काल त्यांनी आपल्याला जाऊ दिलं…आणि आज ते आपल्याला बोलावतायत.”
ते आता लपलेले नव्हते. ते दिसत नव्हते पण स्पष्टपणे जाणवत होते.
“हे आमिष आहे, पाटील.” मी हळू आवाजात म्हणालो.
कोणीही काही बोललं नाही. पण सगळ्यांना कळलं होतं.
आपण त्यांच्या मागावर नाही आहोत. आपण त्यांच्या वर्तुळात शिरतो आहोत.
उत्सुकता वाढली आहे. पुढील
उत्सुकता वाढली आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत
थरारक...
थरारक...
खरेच हे नक्षलवादी प्रश्न दोन्हीबाजूनी समजूतदारीने सुटू शकत नाहीत का???
धन्यवाद जाई आणि धनवन्ती!
धन्यवाद जाई आणि धनवन्ती!
<<नक्षलवादी प्रश्न
<<नक्षलवादी प्रश्न दोन्हीबाजूनी समजूतदारीने सुटू शकत नाहीत का?>> सरकारने आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे, हे नाकारता येणार नाही. मागील 10 वर्षांपासून शासनाने नक्षलवादाविरोधात कडक उपाययोजना केल्या असून, अनेक भाग नक्षलमुक्त करण्यातही यश मिळाले आहे. तरीही नक्षलवादाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही, कारण काही नक्षलवादी स्वतःच्या फायद्यासाठी परिस्थिती तशीच ठेवू इच्छितात.
मध्य भारतात आदिवासी, तेंदूपत्ता आणि नक्षलवाद यांचा संबंध अत्यंत गुंतागुंतीचा आणि आर्थिक संघर्षाचा आहे. तेंदूपत्ता संकलन हे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असताना, या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्षलवादी हस्तक्षेप करतात. ते कंत्राटदारांकडून मजुरी वाढवून देण्याची मागणी करतात, पण त्याच वेळी ‘लेव्ही’ किंवा करही वसूल करतात.
यामुळे आदिवासी समाज शासन, कंत्राटदार आणि नक्षलवादी यांच्यातील संघर्षात भरडला जातो आणि विकासाऐवजी अस्थिरता वाढते.
त्याचप्रमाणे नक्षलवादाला अनेक राजकीय आणि भूराजकीय कंगोरे आहेत. हा प्रश्न केवळ अंतर्गत सुरक्षेपुरता मर्यादित नसून सत्ता, संसाधनांवर नियंत्रण, स्थानिक राजकारण आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रभाव यांच्याशीही जोडलेला आहे.
खरा बदल घडवायचा असेल, तर या सर्व पैलूंना समजून घेत शोषणाच्या चक्राला थांबवणे अत्यावश्यक आहे.
उत्सुकता वाढली आहे. पुढील
उत्सुकता वाढली आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत......
कोण सावज आणि कोण सावध
कोण सावज आणि कोण सावध
एक चूक आणि सावधचा सावज होणार.
हा भाग न छान... पुढील
हा भाग पण छान... पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
धन्यवाद सामी, झकासराव, आबा!
धन्यवाद सामी, झकासराव, आबा!
पुढील भाग आलाय का ?
पुढील भाग आलाय का ?