कथा: कोवळ्या सरी
प्रकरण १
पहिला दिवस: न झालेला अपघात !
नुकतीच थंडी पडू लागली होती, शनिवार, सकाळची शाळा म्हणून सगळे नेहमीपेक्षा उत्साहात होते. रोजच्याप्रमाणे सौरभ, सारंग, आणि गौरव शाळेत येऊन पोचले होते. वर्गात दप्तर ठेऊन कधी एकदा बाहेर इतर मित्रांमधे जाईन असं सगळ्यांना झालं होतं. सगळेच वर्गाबाहेर पडले. सगळ्यात शेवटी सौरभ होता; तो वर्गाबाहेर पडता पडता पायरीवर थोडा रेंगाळला आणि समोर असलेल्या गौरव ला म्हणाला “गौऱ्या मी दोन मिनिटात आलो, अबे हे माझं पेन खिशात राहील आहे तेवढं दप्तरात ठेऊन येतो, नाहीतर पिटी करताना पडायचं आणि घरी शिव्या खाव्या लागायच्या”. मागे न पाहता गौरव “लवकर ये बे, नाहीतर उशिरा आला म्हणून तुला इथे फक्त शिव्या नाही, तर शिक्षा होईल”. त्याला बाहेर जाण्याची घाई होती. सौरभ मागे वळला आणि भरभर पावले टाकत आपल्या बाकाकडे गेला. त्याने भरकन दप्तर उचलले आणि बाकावर आडवे ठेवले. समोरची चेन उघडून त्याने पेन आत ठेवले, चेन बंद केली आणि दप्तर जागेवर ठेवून तो पुन्हा वर्गाबाहेर पडण्यासाठी दोन बाकांच्या रांगेतून दरवाजाकडे वळला.
इतक्यात त्याला दरवाजातून एक मुलगी आत येताना दिसली. ती इतक्या झपाझप पावलं टाकत आत शिरली की तिला वर्गाबाहेर पडणाऱ्या सौरभची पुसटशीही कल्पनाही नव्हती. पण सौरभचे पूर्ण लक्ष होते, त्यामुळे तो बेंचला खेटून क्षणभर उभा राहिला आणि त्याने होणारी टक्कर टाळली. बाकाला खेटून उभा राहिल्यामुळे बाक थोडा आत सरकला आणि त्याचा आवाज झाला.
सौरभला त्या आत येणाऱ्या मुलीचा चेहरा नीट दिसला नाही, कारण तिने चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळला होता. चेहरा नीट दिसला नसला तरी, ही मुलगी आपल्या वर्गातली नव्हती याची त्याला खात्री होती. पण तिच्या परफ्युमचा किंवा पावडरचा एक मोहक दरवळ वर्गात पसरला आणि सौरभही त्यात पुरता गोंधळला होता. त्या बाकाच्या आवाजाने ती आत येणारी मुलगीही भानावर आली.
तिच्या लक्षात आलं होतं की चालताना तिचं लक्ष नव्हतं. स्कार्फ काढत, आपल्या काळ्याभोर केसांना सावरत आणि मागे वळत तिनं 'सॉरी' म्हटलं आणि ती शेवटच्या बेंचकडे गेली.
सौरभ फारसं काही झालं नाही अशा अविर्भावात वर्गातून बाहेर पडला. आधी या मुलीला त्याने कधीच वर्गात पाहिलं नव्हतं. 'ही मुलगी कोण?' असा प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होता. तिची ती चालण्याची लकब, ते स्कार्फ काढणं, सॉरी म्हणणं आणि तिचा तो सुगंध; का कुणास ठाऊक, पण हे सगळं सौरभच्या दृश्य स्मृतीत (व्हिज्युअल मेमरी) कोरलं गेलं .
पुढच्या पाचच मिनिटांत शाळेची घंटा वाजली. प्रार्थनेसाठी सारी मुलं रांगेत उभी राहिली. शनिवार असल्यामुळे प्रार्थनेनंतर लगेच ड्रिल किंवा पीटीची सुरुवात झाली.
सौरभ ज्या ओळीत उभा होता, त्याच्या पलीकडे मुलांची शेवटची रांग होती. त्या रांगेत कमी मुले असल्याने इतर रांगांच्या तुलनेत ती छोटी होती. त्या पलीकडेच मुलींची पहिली रांग होती आणि त्याच रांगेत शेवटी सावनी (जिला सौरभने मघाशी वर्गात पाहिले होते) उभी होती. थोडक्यात सांगायचे तर, सौरभ आणि सावनी वेगवेगळ्या रांगांमध्ये साधारणतः एकाच समांतर रेषेत उभे होते, पण याची त्या दोघांनाही पुसटशी कल्पना नव्हती.
ड्रिल सुरू होऊन 3-4 प्रकार झाले होते. तितक्यात पीटीच्या शिक्षकांनी प्रकार बदलण्याची सूचना दिली आणि नवीन प्रकाराला सुरुवात झाली होती. एक पाय समोर, दोन्ही हात समोर ताठ आणि कमरेतून एकदा उजवीकडे वळायचे आणि मग पुन्हा हात-पाय मूळ स्थितीत आणत दुसऱ्या पायाने डावीकडे वळायचे, अशी ती ड्रिल होती.
गम्मत अशी झाली की सौरभ ने उजवीकडे वळायच्या ऐवजी चुकून डावीकडे वळला. डावीकडे वळताच त्याच्या अगदी समोर त्याला सावनी दिसली. त्याचे लक्ष अचानक तिच्या गळ्यातल्या त्या लाल-निळ्या स्कार्फकडे गेले आणि त्याच्या लक्षात आले की, मघाशी वर्गात ज्या मुलीशी आपली टक्कर होणार होती, ती हीच! दोघांची नजरानजर झाली. क्षणभर सौरभ आपले भान हरपला. त्याचे लक्ष सावनीच्या केसांकडे गेले; मानेवर मोकळे असलेले तिचे केस हलक्याशा वाऱ्याने हलत होते. गोल डोळे, सरळ नाक, रेखीव भुवया आणि सावळा रंग... तिचे डोळे आणि नजर, सर्वच 'शार्प' होते! याआधी सौरभने कोणत्याही मुलीला इतक्या जवळून आणि अशा नजरेने पाहिले नव्हते.
सावनीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. अचानक असा सौरभ समोर दिसल्याने तीदेखील थोडी गोंधळली होती. त्याचा गोरा वर्ण, रुंद कपाळ, कपाळावर रुळणारे केस, टपोरे गोल डोळे, सरळ नाक आणि मजबूत बांधा; सावनी त्याच्याकडे पाहतच राहिली. दोघांचेही क्षणभर भान हरपले.
तितक्यात मुलींच्या ओळीत थोडी खसखस पिकली होती, सौरभ चुकीच्या बाजूला वळल्यामुळे काही मुलींना आपल हसू आवरता आलं नव्हतं. त्या हसण्याच्या आवाजाने सौरभ आणि सावनी भानावर आले होते. सावनीलाही थोडे हसू आले, पण न हसताही तिच्या भावना तिच्या डोळ्यातून स्पष्ट व्यक्त झाल्या होत्या. हे सर्व इतके अचानक आणि क्षणार्धात घडले की सौरभला सावरण्याची संधीच मिळाली नव्हती. मात्र, भानावर आल्यावर त्याने आपली चूक सुधारली आणि पटकन उडी मारून तो विरुद्ध बाजूला वळला.
या प्रकारामुळे दोघेही ओशाळले. संपूर्ण शाळेसमोर हा प्रसंग घडल्याने ते दोघेही सर्वांच्या नजरेत आले होते. दोघांच्याही अंगावर शहारे मात्र नक्कीच आले होते.
पहिला तास सहसा गणिताचा असायचा पण वर्गशिक्षक व गणिताच्या गंधे सरांबरोबर बायोलॉजी च्या देशपांडे मॅडम ही वर्गावर आल्या होत्या. दोघे शिक्षक वर्गावत आले तशी सगळी मुलं आपल्या जागेवर उठून उभी राहिली. गंधे सरांनी सगळ्यांना खाली बसण्यास खुणावले, पण वर्गात एकच कुजबुज होती…. सरांबरोबर देशपांडे मॅडम का आल्या आहेत?
मुलींच्या बाकावर सुद्धा एक वेगळीच कुजबुज सुरु होती, ही नवी मुलगी कोण आणि दिवाळी संपून शाळा सुरु झाली त्याला दोन आठवडे झाले, अर्ध वर्ष सरल्यावर मध्येच कोण आलं?
इतक्यात गंधे सरानी सगळ्यांना उद्देशुन म्हंटल “दोन सूचना आहेत…”
नंबर 1
“आज आपल्या वर्गात सावनी पिंगळे ही नवीन विद्यार्थिनी आली आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लवकरच नागपूर जवळ तीन-चार मोठाली काम होणार आहेत, जस गोसीखुर्द धरणाचं काम सुरू होतं आहे, पारडी नाक्याजवळ एक मोठा पूल होतो आहे व इतर अनेक छोटी मोठी काम होणार आहेत, या साठी तिच्या वडिलांची या सगळ्या कामांचे सर्वाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मंजू तू मॉनिटर आहेस मुलींची, सावनी वर्गात नवीन आहे तेव्हा तिला काय हव, नको ते पाहा. मंजू फारशी कोणाला आवडत नसे. एकतर ती फार फटकळ होती, हुशारही होती, वर्गातल्या पहिल्या ३ क्रमांकात तिचा नंबर असायचाच. पण सरांनी नाव घेऊन सांगितल्या मुळे तिला सावनीला मदत करण्या पलीकडे काही इलाज नव्हता. सर पुढे म्हणाले तिच्या वडिलांना मी स्वतः ओळखतो, त्यांचा सगळा परिवार शहरात नवीन आहे. तेव्हा सगळ्यांनी तिला समवून घ्या.
सावनी पटकन तुझी ओळख करून दे.
सावनी उठून उभी राहिली, “Hello everyone! My name is Savni Pringle, I was studying in St Thomas School Nashik. I used to learn Hindustani Classical while I was in Nashik. I like drawing & painting too. We came to Nagpur just the day before yesterday. We are putting up in Jai Prakash Nagar. Thank you!”
तिनी इंग्रजी तून ओळख करून दिल्यामुळे मुला-मुलींमध्ये बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता 87-88 साली नागपुरात मराठी वातावरणाच्या शाळेत इंग्रजीत कोणी ओळख करून दिली तर त्याची किंवा तिची गणना ‘आगाऊ’ म्हणून होई!
इकडे तिनी नाशिक म्हंटल्या बरोबर देशपांडे मॅडम चा चेहरा फारच खुलला!
सौरभ, मनात ‘अच्छा ती मघाशी वर्गात आलेली आणि मी ड्रिल करताना चुकलो तेव्हा दिसली ती सावनी काय!’
नंबर 2
“बर आता दुसर, देशपांडे मॅडम नी मला विनंती केली होती की त्यांच सिलॅबस थोड मागे आहे. तर आज पहिला तास आणि दुसराही तास जो देशपांडे मॅडमचाच असतो त्या घेतील. इतक बोलून सर बाजूला वळून देशपांडे मॅडमशी हळू आवाजात काहीतरी बोलले आणि वर्गाबाहेर पडले.
देशपांडे मॅडमनी वर्गाचा ताबा घेतला.
“सावनी, मीपण नाशिकची बरका! म्हणजे अगदी नाशिक नाही, त्र्यंबकची. पण आता त्र्यंबकला आमचं कोणी नाही. माझा भाऊ अजय बोरकर, गोविंद नगरला राहतो, नाशिकला.” देशपांडे मॅडम म्हणाल्या.
सावनीला खूपच आनंद झाला होता. सावनी म्हणाली “Madam, I used to live in Govind Nagar, I mean that's our home and we still have it. म्हणजे आमच घर आहे ते अजूनही.”
देशपांडे मॅडम “अरे व्वा, तू भेट मला क्लास नंतर, नाहीतर बाकीचे आता म्हणतील बर आहे, extra class ही घेतात आणि बोलत बसतात.”
वर्गात जरा खास करून मुलींमधे बहुदा सगळ्यांची तोंड वाकडी झाली. मुलींमधे कुणीतरी कमेंटही पास केली “English का फाकते आहे ही इतकी?”
सावनी साठी इंग्रजी खूप नैसर्गिक होत, ती लहानपणापासून convent शाळेत शिकली होती, तिथे सगळे शाळेत English मधे बोलायचे पण इथे सरस्वती विद्यामंदिरात सगळ मराठी वातावरण होत. सावनीला अजून थोडा त्रास सहन करावा लागणार होता, कुठल्याही शाळेत वर्गात कुणी नवीन आल की जो थोडा त्रास होतो तो तिलाही सहन करवा लागणार होता.
क्रमश:
अमोल दांडेकर
भाग दोन: https://www.maayboli.com/node/88058
चांगल चाललंय.. लिहा पुढे sss
चांगल चाललंय.. लिहा पुढे sss
so intense story.. .. अहाहा !
so intense story.. .. अहाहा ! किती सुंदर लिहिलंय . पुढचा भाग येऊद्या लवकर !
>>>>>>so intense story.. ..
>>>>>>so intense story.. .. अहाहा ! किती सुंदर लिहिलंय . पुढचा भाग येऊद्या लवकर !
अहाहा
अगदी अगदी किती इन्टेन्स आहे नाही
छान सुरुवात!
छान सुरुवात!
Thank you every one, trying
Thank you every one, trying to publish next part but website is throwing error.
Wrote to admin, waiting for solution.
छान.
छान.
छान सुरुवात. वाचतोय.....
छान सुरुवात.
वाचतोय.....