पूर्वभाग
चकमकीदरम्यान झालेल्या तीव्र गोळीबारानंतर टीम कसाबसा बचाव करून नाल्याकडे उतरत बाहेर पडते. या प्रक्रियेत दोन जवान मृत्युमुखी पडतात आणि काही जखमी होतात, ज्यामुळे परिस्थितीचा मानसिक आणि शारीरिक ताण स्पष्ट जाणवतो. कॅम्पमध्ये परतल्यानंतर जखमींची धावपळ सुरू होते, पण आतून एक जड शांतता पसरलेली असते. मृतदेह परत आणण्यासाठी पुन्हा त्या जागी जाण्याचा निर्णय घेतला जातो, ज्यातून जबाबदारी आणि अपूर्णतेची जाणीव ठळक होते. या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते—ही चकमक अचानक नव्हती, तर आधीच आखलेला सापळा होता.
*************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग ३ - न दिसणारा शत्रू
त्या रात्रीनंतर झोप ही फक्त शरीराची गरज उरली होती; मन मात्र कुठेच थांबत नव्हतं. डोळे मिटले की अंधार दिसायचा, पण त्या अंधाराला शांतता नव्हती...तो जिवंत होता. जणू आत कुठेतरी अजूनही गोळीबार सुरू होता. कधी स्फोटाचा आवाज, कधी पानांची सळसळ, कधी अचानक एखादं नाव...जे प्रत्यक्षात कुणी घेतलेलंच नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्पमध्ये नेहमीसारखी हालचाल सुरू झाली होती. कुणीतरी बंदुका स्वच्छ करत होता, कुणीतरी वायरलेस तपासत होता, कुणीतरी चहा पित उभा होता. वरवर सगळं पूर्वीसारखंच दिसत होतं, पण त्या सगळ्यांच्या मागे एक न बोललेली जाणीव होती. प्रत्येकाच्या नजरेत एक सावधपणा होता—जणू सगळे आपापल्या पद्धतीने कालचा दिवस अजूनही पचवत होते.
मी ऑफिसमध्ये बसून रिपोर्ट लिहायला घेतला. 'दिनांक… वेळ… ठिकाण…' इतपत सगळं सहज लिहिलं गेलं. पण पुढे हात थांबला. कागदावर उतरू शकत होतं ते फक्त बाहेरचं... घडलेली घटना, वेळा, आकडे. जे आत घडलं होतं, त्याला शब्द नव्हते. ते अजूनही डोक्यात फिरत होतं...अव्यवस्थित, तुटक, आणि सतत.
मी पेन टेबलावर ठेवलं, तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली.
पाटील आत आला. “सर,” तो म्हणाला, “एक माणूस आलाय. गावातून. पण सरळ गेटवर आला नाही… दोनदा चौकशी करून मगच आत आला. खूप घाबरलेला दिसतोय.”
मी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग शांतपणे म्हटलं, “आत पाठव.”
तो आत आला. दार ओलांडताच त्याने खोलीत नजर फिरवली—कोण ऐकतंय का, कोण बघतंय का, याची खात्री करून घेतली. अंगावर साधा शर्ट, पायात चप्पल, पण हालचालीत एक ताण होता. तो बसायला सांगितलं तरी उभाच राहिला.
“नाव?” मी विचारलं.
“हिडमे,” तो म्हणाला.
“काय सांगायचं आहे?”
तो लगेच बोलला नाही. काही क्षण तो शांत उभा राहिला. मग आवाज खाली करत म्हणाला, “काल जे झालं… ते अचानक नव्हतं.”
मी काही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त त्याच्याकडे पाहत राहिलो.
तो पुढे म्हणाला, “मी सगळं पाहिलेलं नाही… पण दोन दिवसांपासून हालचाल होती. रस्त्यावर लक्ष ठेवत होते. कोण येतं, कोण जातं… ते बघत होते.”
मी सरळ विचारलं, “तुला इथे येताना कुणी पाहिलं का?”
तो थोडा दचकला. “नाही… पण खात्री नाही.”
पाटीलची नजर त्याच्यावर स्थिर होती.
मी पुढचा प्रश्न टाकला—“माहिती कुणी दिली त्यांना?”
हिडमेने नजर खाली घेतली. काही क्षण काही बोलला नाही.
“कोण?” मी पुन्हा विचारलं.
तो हलकासा मान हलवून म्हणाला, “सांगता येत नाही, साहेब… पण आतून कोणीतरी सांगतंय. नाहीतर ते इतके तयार नसते.”
खोलीत शांतता पसरली. त्या शांततेत आता संशय मिसळला होता.
मी विचारलं, “आणखी काय?”
हिडमे थोडा पुढे झुकला. आवाज अजून कमी झाला.
“जंगलात आत हालचाल वाढली आहे. नेमका दिवस नाही सांगता येत… पण येत्या दोन-तीन दिवसात काहीतरी होणार आहे. वेगवेगळ्या तुकड्या येणार आहेत.”
तो थांबला. मग म्हणाला,“गावातला एक मुलगा कालपासून गायब आहे… त्याला त्यांनीच नेलं असं सगळे म्हणतायत.”
त्या एका वाक्याने वातावरण बदललं.
तो पुढे म्हणाला, “तो परत येणार नाही… असंच सगळ्यांना वाटतंय. म्हणून आलो. नाहीतर कोणी येत नाही इथे. गावातले सगळे घाबरलेले आहेत, साहेब.”
मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिलो. “तुला माहिती आहे, हे खोटंही असू शकतं?” मी विचारलं.
तो मान हलवत म्हणाला, “माहिती आहे.”
“मग का आलास?”
तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, “कारण… जर खरं असेल, तर वेळ निघून जाईल.”
तो गेला तेव्हा खोली पुन्हा शांत झाली.
पाटीलने विचारलं, “सर, काय वाटतं... विश्वास ठेवायचा?”
मी खुर्चीत मागे रेलून बसलो. काही क्षण डोळे मिटून विचार केला.
“विश्वास ठेवायचा की नाही हा मुद्दा नाही,” मी हळू आवाजात म्हणालो. “ही माहिती खरी असू शकते… किंवा आपल्याला तिकडे खेचण्यासाठी टाकलेला सापळा असू शकतो. दोन्ही शक्यता सारख्या आहेत.”
पाटीलने मान हलवली. “मग?”
मी स्पष्ट सांगितलं, “आपण लगेच हालचाल करायची नाही.”
तो थोडा गोंधळला. “म्हणजे?”
“आपण वाट बघूया,” मी म्हणालो. “पण हातावर हात ठेवून नाही. नजर ठेवायची. हालचाल कुठून सुरू होते ते आधी पकडायचं.”
संध्याकाळी मी पुन्हा ती वही उघडली. चिखल सुकला होता, पण पानांवर त्याचे डाग अजून होते.
अक्षरं साधी होती—सरळ, प्रामाणिक. “आज आम्हाला जंगलात कसं चालायचं ते शिकवलं. आवाज न करता. पानावर पाय कसा ठेवायचा…”
मी पुढचं पान उलटलं. “आई, तू असतीस तर मला परत बोलावलं असतंस का?”
त्या ओळी काही क्षण डोळ्यांसमोर स्थिर राहिल्या.
ही वही शत्रूची नव्हती. ती एका साधारण मुलीची होती.
*************************************************************************************************************************
रात्री बाहेर आलो तेव्हा कॅम्प शांत होता. तारांजवळ उभा राहून मी जंगलाकडे पाहिलं. अंधार दाट होता, पण त्यात हालचाल होती, नजर होती—जणू कुठेतरी कुणी दबा धरून बसलंय.
पाटील माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. “काय ठरवलं?” त्याने विचारलं.
मी काही क्षण काही बोललो नाही. नजर त्या अंधारातच ठेवली.
मग शांतपणे म्हणालो—“आपण त्यांना शोधायला जाणार नाही.”
तो थोडा गोंधळला. “मग?”
मी हळूहळू त्याच्याकडे वळलो.
“आपण वाट बघायची,” मी म्हणालो, “पण आंधळेपणाने नाही.”
मी पुन्हा जंगलाकडे पाहिलं.
“आपण त्यांना जाणवू द्यायचं की, त्यांनी ठरवल्याप्रमाणे सगळं घडतंय… आणि ते जिथून येतील—” मी थांबलो. “तिथे आपण आधीच तयार राहायचं.”
पाटीलने हळूच मान हलवली. त्याला समजलं होतं. मी पुन्हा अंधाराकडे पाहिलं. काल आपण वाचलो होतो. पण कदाचित त्यावेळी त्यांनी आपल्याला जाऊ दिलं होतं.
आणि जर तसं असेल तर पुढची चाल आपली नव्हतीच कधी. पण आता—पुढची चाल आपण ठरवणार होतो.
*********************************************************************************************************
हिडमे गेल्यावर खोलीत काही वेळ कुणीच हललं नाही. दरवाजा बंद झाला होता, पण त्याने आणलेली भावना अजूनही आतच अडकून राहिली होती...घाबरलेली, सावध, आणि काहीतरी न सांगितलेलं घेऊन.
मी टेबलावरच्या नकाश्याकडे पाहत राहिलो. लाल वर्तुळ तसंच होतं, पण आता ते वेगळं दिसत होतं. कालपर्यंत ते फक्त एक ठिकाण होतं, आज ते एखाद्या मोठ्या गोष्टीचा केंद्रबिंदू वाटत होतं. जणू बाकी सगळं त्याभोवती फिरत होतं.
“सर…” पाटीलने परत एकदा तो प्रश्न विचारला, “विश्वास ठेवायचा का याच्यावर?”
मी लगेच उत्तर दिलं नाही. मनात विचार सुरू झाले होते—हिडमेचा आवाज, त्याचे डोळे, त्याने टाळलेले प्रश्न.
“तो सगळं सांगत नव्हता,” मी शेवटी म्हणालो. “जे सांगितलं, त्यापेक्षा जास्त काहीतरी त्याने लपवलं.”
पाटीलने मान हलवली. “मलाही तसंच वाटलं.”
मी खुर्चीतून उठलो. वायरलेस उचलला. सिग्नल तुटक होता, पण संपर्क लागला.
“Possible regrouping input… not confirmed… area sensitive… request alert status.”
दुसऱ्या बाजूने उत्तर आलं... तुटक, अपूर्ण. पण टोन स्पष्ट होता, सावध राहा...पण खात्री होईपर्यंत मोठी हालचाल करू नका.
मी वायरलेस खाली ठेवला. जंगलातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे—अपूर्ण माहिती.
त्या संध्याकाळी आम्ही पुन्हा नकाशाभोवती बसलो. पण यावेळी चर्चा वेगळी होती. आधी आपण कुठे जाऊ, हे ठरवत होतो. आता—ते कुठे असू शकतात, आणि कुठून हालचाल करतील, हे शोधत होतो.
“जर ते खरोखर एकत्र जमणार असतील,” पाटील म्हणाला, “तर ती जागा दाट जंगलात असेल. इथून आत…” त्याने नकाशावर एक ओळ काढली, “इथे visibility जवळ जवळ शून्य आहे.”
मी त्याचं ऐकत होतो, पण डोक्यात दुसरंच विचारचक्र चालू होतं. ते खरंच जमले आहेत… की आपल्याला तसं वाटायला लावत आहेत?
“ते आपल्याला खेचत असतील,” मी शांतपणे म्हणालो.
पाटीलने माझ्याकडे पाहिलं. “म्हणजे?”
मी काही क्षण नकाश्याकडे पाहत राहिलो. “काल त्यांच्याकडे संधी होती,” मी म्हणालो. “आपण उघड्यावर होतो. पण फायरिंग अचानक थांबली. ते आपल्यामागे आले नाहीत.”
मी त्याच्याकडे पाहिलं. “आपण बाहेर पडलो म्हणून नाही… त्यांनी आपल्याला जाऊ दिलं म्हणून.”
खोलीत पुन्हा शांतता पसरली. तो विचार कोणी पूर्णपणे स्वीकारला नाही. पण कोणी नाकारलाही नाही.
रात्री उशिरा मी एकटाच बाहेर आलो. कॅम्पच्या बाहेरच्या तारांजवळ उभा राहिलो. समोर जंगल—अंधारात बुडालेलं.
हातात अजूनही ती वही होती. मी ती उघडली. “आज आम्हाला शिकवलं—कसं थांबायचं. कधीच पूर्ण थांबायचं नाही. फक्त आपलं दिसणं थांबवायचं.”
मी त्या वाक्याकडे पाहत राहिलो. ते फक्त ट्रेनिंग नव्हतं. ती पद्धत होती. लपण्याची नाही—भासवण्याची. मी डोकं वर केलं. जंगल शांत होतं. खूप शांत.
दुसऱ्या दिवशी सकाळी एक छोटं पथक गावाकडे पाठवलं. उघड गस्त नाही, फक्त निरीक्षणासाठी केलेली हालचाल. दुपारपर्यंत ते परत आले.
“सर,” शिंदे म्हणाला, “गावात काहीतरी वेगळंच वातावरण आहे.”
“काय?”
“लोक बोलत नाहीत. नजर टाळतात. आणि…” तो थोडा थांबला, “दोन घरं रिकामी आहेत. सामान तसंच आहे… पण माणसं नाहीत.”
मी आणि पाटील आम्ही एकमेकांकडे पाहिलं.
“काहीतरी मुव्हमेंट चालू आहे,” तो हळू आवाजात म्हणाला.
त्या रात्री आम्ही मोठं ऑपरेशन प्लॅन केलं नाही.
उलट—आम्ही काहीच केलं नाही… असं दिसू दिलं.
वायरलेसवर minimal communication. बाहेरून बघायला—कॅम्प शांत.
पण आत—observation पोस्ट्स सक्रिय होत्या. सगळ्यांच्या नजरा बाहेर रोखलेल्या. सगळ्यांचे हात शस्त्रांवर तयार.
मी पाटीलला हळू आवाजात सांगितलं, “जर ते आपल्याला बघत असतील… तर त्यांना दिसलं पाहिजे की आपण बेसावध आहोत.”
तो काही बोलला नाही. कारण त्यालाही तेच जाणवत होतं.
रात्री अकराच्या सुमारास अचानक एक आवाज आला. दूर. खूप हलका. जणू कुणीतरी लाकूड तोडलं.
कॅम्पमध्ये कुणी हललं नाही. पण सगळ्यांचे हात शस्त्रांवर घट्ट झाले.
दोन मिनिटांनी पुन्हा—टक. मी डोळे मिटले. तो नैसर्गिक आवाज नव्हता. त्यात ताल होता. मोजून दिलेला. संकेत.
मी हळू आवाजात म्हणालो, “ते जवळ आहेत.”
पुन्हा वही आठवली. “फक्त आपलं दिसणं थांबवायचं .”
मी अंधारात पाहत राहिलो. आणि पहिल्यांदाच मला स्पष्ट जाणवलं—आपण त्यांना शोधत नव्हतो. ते आपल्याला पाहत होते.
आणि कुठेतरी—त्या अंधाराच्या आत कोणीतरी ठरवत होतं...पुढची गोळी कधी झाडायची...आणि कोणावर.
*************************************************************************************************************************
त्या रात्रीनंतर कॅम्पमध्ये कोणीही पूर्णपणे झोपलं नाही. बाहेरून पाहिलं असतं तर सगळं नेहमीसारखंच वाटलं असतं—बंकरमध्ये दोन जवान, टॉवरवर एक, आत मंद प्रकाश. पण आत प्रत्येकजण जागा होता. डोळे मिटलेले असले तरी कान सतत ऐकत होते.
मी नकाश्यासमोर बसलो होतो. दिवा मुद्दाम कमी ठेवला होता. त्या पिवळसर प्रकाशात रेषा जास्त तीक्ष्ण दिसत होत्या. पाटील समोर उभा होता.
“जर ते खरंच जवळ असतील,” तो म्हणाला, “तर ते आपल्यावर लक्ष ठेवून असतील.”
मी मान हलवली. “आणि आपण त्यांच्यावर लक्ष ठेवतोय, हे त्यांना जाणवायला नको.”
तो काही क्षण विचारात पडला. “म्हणजे… आपण काहीच कळत नाही असं दाखवायचं?”
“हो,” मी शांतपणे म्हणालो, “पण फक्त वरवर.”
रात्री जवळजवळ बारा वाजले असतील. अचानक वायरलेसवर हलकासा आवाज आला. शब्द तुटक होते.
“OP-2 वरून… movement… north ridge… uncertain…”
मी लगेच सरळ बसलो. “Repeat करा.”
पण संपर्क तुटला. पाटील माझ्याकडे पाहत होता. “North ridge?”
मी नकाशावर बोट ठेवलं. कॅम्पच्या उत्तरेला एक उंच भाग होता—घनदाट झाडी, आत काय चाललंय ते सहज दिसणार नाही असा.
“जर ते तिथं असतील,” मी म्हणालो, “तर त्यांना सगळं दिसत असेल.”
मी लगेच निर्णय घेतला नाही. कधी पुढे जायचं, आणि कधी थांबायचं—हीच खरी कसोटी असते.
मी वायरलेसवर पुन्हा कॉल केला. “OP-2, respond.” उत्तर नाही.
टॉवरवरचा जवान खाली निरखून पाहत होता. त्यालाही काही स्पष्ट दिसत नव्हतं—फक्त हलणाऱ्या सावल्या.
इतक्यात बाहेर एक हलका आवाज झाला. टक.
मी स्थिर झालो. दोन सेकंदांनी पुन्हा—टक.
तो साधा आवाज नव्हता. तो एकाच अंतराने पुन्हा आला होता. तो संकेत होता.
मी पाटीलकडे पाहिलं. तो आधीच सावध झाला होता.
“माणसं पाठवू,” मी हळू आवाजात म्हणालो. “अंतर ठेवून. फक्त पाहून यायचं. चकमक करायची नाही.”
पाटीलने मान हलवली. “शिंदे, जाधव".
ते दोघे सावकाश बाहेर निघाले. एकमेकांच्या कव्हरमध्ये, थोड्या अंतरावर. कॅम्प पुन्हा शांत झाला.
पण आता ती शांतता वेगळी होती—ताणलेली. मी मनातच स्वतःला सांगत होतो—हा सापळा असू शकतो.
पाच मिनिटं गेली. दहा मिनिटं गेली. मी पुन्हा कॉल केला. “Team, status?”
काही क्षण काहीच नाही. मग तुटक आवाज—“सर… ridge clear नाही… काहीतरी आहे… पण दिसत नाही…”.
आवाजात ताण होता. “जिथे आहात तिथेच थांबा,” मी म्हणालो. “आणि—”
वाक्य पूर्ण होण्याआधी—धाड! एक गोळी.
मग पुन्हा शांतता.
“शिंदे!” मी जोरात म्हणालो.. उत्तर नाही. फक्त खरखर आवाज.
पाटील माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांत प्रश्न होता—आता काय?
मी काही क्षण काहीच बोललो नाही. डोक्यात सगळे पर्याय फिरत होते. आता लगेच जावं? की थांबावं? हा सापळा आहे का?
मी शांतपणे म्हणालो, “कोणीही बाहेर जाणार नाही.”
पाटील थोडा पुढे सरकला. “सर—”
“ते जखमी माणसाचा उपयोग करतायत,” मी ठामपणे म्हणालो. “आपल्याला बाहेर काढण्यासाठी.”
बाहेर पुन्हा शांतता पसरली. खूप जड. काही वेळाने दूरून एक आवाज आला. वजनदार वस्तू जमिनीवरून फरफटत नेल्याचा .
टॉवरवरचा जवान खाली बघत होता. “स्पष्ट दिसत नाही, सर… पण हालचाल आहे.”
माझ्या हातातली वही आठवली. “फक्त आपलं दिसणं थांबवायचं .”
मी मनातच पुटपुटलो—ते दिसत नाहीत, कारण ते दिसायचं टाळत आहेत.
थोड्या वेळाने पुन्हा वायरलेसवर आवाज आला. कमकुवत. तुटक.
“सर… जाधव… जखमी… शिंदे… दिसत नाही…”
माझ्या छातीत धस्स झालं.
“तुम्ही कुठे आहात?”
“…ridge खाली… cover मध्ये…”
आवाज पुन्हा तुटला. मी डोळे मिटले. निर्णय घ्यायची वेळ आली होती. आता थांबलो, तर माणूस गमावू.
गेलो, तर कदाचित अजून माणसं अडकतील. मी पाटीलकडे पाहिलं. तो तयार होता.
“आता?” त्याने विचारलं.
मी काही क्षण अंधाराकडे पाहत राहिलो. मी रायफल उचलली.
“Quick team. चार जण. बाकी hold. टॉवर कव्हर देईल.” पाटीलने लगेच आदेश दिले.
आम्ही बाहेर पडलो. जंगलात पाऊल टाकताच पुन्हा तीच भावना आली—आपण आत जात नाही आहोत. आपण आत ओढले जातोय.
रिजजवळ पोहोचलो तेव्हा माती हललेली दिसली.ताजी. ओढल्याच्या खुणा स्पष्ट होत्या.
थोडं पुढे—जाधव दिसला.तो जमिनीवर पडलेला होता. जखमी. पण जिवंत. श्वास चालू होता.
पण—शिंदे नव्हता.
“शिंदे कुठे आहे?” मी विचारलं.
जाधवने डोळे उघडले. आवाज क्षीण होता. “त्यांनी… त्याला मारलं नाही… ओढून नेलं…”
त्या एका वाक्याने सगळं स्पष्ट झालं. ही साधी चकमक नव्हती. त्यांनी निवड केली होती. गोळी नाही—माणूस.
मी आजूबाजूला पाहिलं. जंगल पुन्हा शांत होतं. पण आता ते आपल्याकडे पाहत होतं.
आणि त्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट झाली—ही सुरुवात होती. आणि आता खेळ त्यांनी सुरू केला होता.
फारच रोचक लिखाण.
फारच रोचक लिखाण.
फारच रोचक लिखाण.
फारच रोचक लिखाण.
खुप तणावपुर्ण ..
खुप तणावपुर्ण ..
छान लिहिलेय.
थरारक आहे
थरारक आहे
धन्यवाद urmilas, साधना,
धन्यवाद urmilas, साधना, झकासराव!
वाचत असताना पण श्वास रोखला
वाचत असताना पण श्वास रोखला जातो..
ही परिस्थिती अनुभवणारी माणसे कशी ताणाखाली जगत असतील याची कल्पना करवत नाही..
एका अतिशय वेगळ्या विषयावरची कथा...
सर्वांना माहिती असून कधीही न बोलले जाणारा विषय.
पश्चिम महाराष्ट्रात बसून तर जाणीव पण न होणारा विषय..
धन्यवाद धनवन्ती!
धन्यवाद धनवन्ती!
थरारक वर्णन... !
थरारक वर्णन... !
धन्यवाद आबा!
धन्यवाद आबा!