लाल रेषा - भाग १

Submitted by नितनवे on 27 March, 2026 - 11:23

लाल रेषा - भाग १ - पहिलं पोस्टिंग - गडचिरोली

रात्रीचे साधारण साडेतीन वाजले असतील. जीपचा आवाज मुद्दाम हळू ठेवला होता. इंजिनची ती अफाट ताकद जाणीवपूर्वक दाबून धरली होती; जणू ती यंत्रणाही या परिसराच्या अघोषित नियमांना मुकाट्याने मान देत होती. या निर्मनुष्य वाटेवर 'आवाज' म्हणजे केवळ ध्वनी नसतो; तो एक धोक्याचा संकेत असतो. अंधाराच्या काळजातून कुणीतरी तुमच्या अस्तित्वाचा मागोवा घेत असतं. तुम्ही कुठे आहात, किती जण आहात आणि तुमच्या हालचालींचा वेग किती आहे, हे सगळं त्या इंजिनच्या लयीतून उलगडत असतं.

पावसाचा हंगाम नुकताच ओसरला होता. माती वरून सुकलेली भासली तरी आतून अजूनही ओलसर होती. टायर खाली जाताच चिकटून राहत होती. जीपचं प्रत्येक चाक रस्त्यावर स्वतःची वेगळी ओळख उमटवत होतं...कधी घसरत, कधी अडखळत, तर कधी पुन्हा पकड घेत. चाकं मऊ चिखलात रुतताना आणि अचानक दगडावर आदळताना शरीराला बसणारे ते धक्के... त्या सगळ्यात एक विचित्र, अस्थिर लय होती.

थोड्या वेळाने हेडलाईट्स बंद झाले आणि एका क्षणात अवघा प्रकाश काळोखाने गिळंकृत केला. समोर आता काहीच उरलं नव्हतं ना रस्ता, ना झाडं, ना समोरचं वळण. फक्त एक अभेद्य भिंत उभी असल्यासारखा अंधार! पण जीपमध्ये कोणीही शब्द उच्चारला नाही. सगळ्यांनी तो काळोख सहज स्वीकारला. कारण इथलं पहिलं शिक्षण हेच असतं की, नेहमी डोळ्यांनी पाहूनच चालायचं नसतं. कधी कधी समोर काहीही दिसत नसतानाही पुढे जावं लागतं; आणि अशा वेळी नजरेपेक्षा स्वतःच्या सवयीवर आणि अचूक अंदाजावर जास्त विश्वास ठेवावा लागतो.

मी मागच्या सीटवर होतो. मांडीवर ठेवलेल्या रायफलचं वजन आता जबाबदारीचं ओझं वाटू लागलं होतं. हात नकळत तिच्या दस्तावर घट्ट झाले होते. बोटं ट्रिगरवर नव्हती, पण ती तिथेच सज्ज असल्याची जाणीव नसांनसांत होती. शरीर स्थिर होतं, पण मनाची तार मात्र एखाद्या धनुष्यासारखी पूर्ण ताणलेली होती.

'नक्षलप्रभावित क्षेत्र'.

कागदावरचे हे दोन शब्द म्हणजे केवळ प्रशासकीय खुणा. पण प्रत्यक्ष जमिनीवर? तिथे झाडांची पानंही संशयाने थरथरतात. घनघोर जंगलाच्या आडोशाला दडलेली ती टोकदार नजर आणि उद्याची खात्री नसलेलं ते जगणं... हे सगळं त्या दोन शब्दांनी ओढलेल्या पडद्यामागे कायमचं अदृश्य राहतं. अहवालातली आकडेवारी या 'भयाचा' अनुभव कधीच देऊ शकत नाही.

इंजिनचा तो दबलेला आवाज थांबला आणि त्याच क्षणी जंगलाचा आदिम आवाज पुन्हा स्पष्ट झाला. कॅम्प जवळ आला होता.

हळूहळू काळोखातून काही आकृत्या स्पष्ट होऊ लागल्या, काटेरी तारांचं कुंपण, जमिनीतून वर आलेले दोन बंकर आणि रात्रीच्या आभाळाला भिडलेला तो उंच वॉचटॉवर. तिथे कुठेही अनावश्यक हालचाल नव्हती. प्रत्येक वस्तू, प्रत्येक दगड आपल्या ठराविक जागी, एका विशिष्ट उद्देशाने उभा होता. शांतता इतकी होती की स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटत होता.

बाहेर तैनात असलेल्या जवानांनी अंधारातूनच हात उंचावून “जय हिंद” केलं. त्या दोन शब्दांत स्वागत कमी आणि इथल्या कठोर वास्तवाची ओळख जास्त होती.

मी जीपमधून खाली उतरलो. पायाखालील जमीन अजून ओलसर होती. बूट हलकेच मऊसर चिखलात रुतले.

तेवढ्यात पाटील माझ्यासमोर येऊन उभा ठाकला. त्याच्या चेहऱ्याच्या रेषांमधून काहीच वाचता येत नव्हतं. स्वरात किंवा वागण्यात कसलाच अभिनिवेश नव्हता; फक्त ती भेदक नजर माझ्यावर खिळली होती. त्याने हात पुढे केला, मीही हात मिळवला. त्या क्षणी मला जाणवलं की, या माणसानं इथलं 'वास्तव' खूप जवळून सोसलंय. त्याची पकड खूप घट्ट होती. जणू त्या एका हस्तांदोलनातून तो माझं मोजमाप करत होता. मी किती ठाम आहे, माझ्या मनगटात किती ताकद आहे, आणि माझ्या मनात किती थरकाप... हे सगळं तो त्या स्पर्शातून टिपत होता.

त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नाही.

बेड होता, अंग मोडून आलेला थकवा होता आणि शरीराला विश्रांतीची आत्यंतिक गरजही होती. पण डोळे मिटले तरी मेंदू एखाद्या रडारसारखा सतत जागा राहिला. प्रत्येक सूक्ष्म आवाजावर मन एकाग्र होत होतं. जंगलाचा आवाज शहरासारखा नसतो; तिथे कोलाहल नसतो, पण तिथली शांतता कधीच 'पूर्ण' नसते.

पानांची ती मंद सळसळ... कुठेतरी वारा अलगद सरकतोय. दूरून येणारा एखादा अनोळखी आवाज... काय आहे ते समजत नाही, पण तिथे 'काहीतरी' आहे याची जाणीव अस्वस्थ करते.

कधी फांदीची होणारी किरकिर, तर कधी अचानक काहीतरी सळसळल्याचा भास. हे सगळं मिळून एक निरंतर चालणारी 'बॅकग्राउंड लेव्हल' तयार होते. तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता, पण ही पार्श्वभूमी मनाला कधीच विसावू देत नाही.

आणि मग... एका क्षणी सगळं थांबतं. ना पानांची सळसळ, ना कीटकांचा आवाज. ना काहीच. ती अचानक निर्माण झालेली 'पोकळी' आवाजापेक्षा जास्त भयानक वाटते. कारण ती नैसर्गिक नसते.

त्या रात्री नेमकं तसंच झालं.

मी अर्धवट ग्लानीतून दचकून उठलो. डोळे उघडण्याआधीच शरीराला जाणीव झाली, काहीतरी बिनसलंय. काय ते शब्दबद्ध करता येत नव्हतं, पण शरीरातल्या संवेदना आधीच 'अलर्ट मोड'वर आल्या होत्या.

मी बाहेर आलो. अंधार तोच होता, पण वातावरण बदलल्यासारखं वाटत होतं.

पाटील तिथे आधीच तैनात होता, एखादा सर्चलाईट सारखा प्रत्येक हालचाल टिपत होता.

मी त्याच्या जवळ गेलो. माझा आवाज नकळत दबला गेला होता. “पाटील... हे असं अचानक इतकं शांत का वाटतंय?”

त्याने उत्तर द्यायला काही क्षण घेतले. त्याची नजर जंगलावरून ढळली नाही. तो काहीतरी ऐकण्याचा किंवा कदाचित त्या अंधारातल्या लहरी ओळखण्याचा प्रयत्न करत होता.

मग अगदी संथ, थंड आवाजात तो म्हणाला, “कारण जंगलात कुठेतरी movement होतेय, सर.”

त्या एका वाक्याने उरली-सुरली झोपही कापरासारखी उडाली. तो दाट अंधार आता अधिकच जवळ आल्यासारखा आणि श्वास कोंडल्यासारखा वाटू लागला.

पहाट सरत होती, तरीही काळोखाची पकड ढिली झाली नव्हती. हवेत गारवा आणि ओल्या मातीचा एक जड वास भरून राहिला होता. कॅम्पमध्ये हालचालींना वेग आला होता, पण त्यातून आवाज मात्र उमटत नव्हता.

जणू प्रत्येक जण एका अदृश्य नियमाने बांधलेला होता. कामं होत होती, पण शांततेचा भंग न करता.

आम्ही मोकळ्या जागेत जमलो. पाटील खाली बसला, त्याने हातानेच माती थोडी सपाट केली आणि त्यावर नकाशा पसरवला. त्या शांततेत कागदाचा तो करकरीत आवाजही मोठा वाटला.

पाटील काही क्षण नकाश्याकडे एकटक पाहत राहिला, जणू मनातली रणनीती तो शेवटच्या वेळी तपासून पाहत होता. मग त्याने आपलं राकट बोट एका विशिष्ट जागी टेकवलं.

“काल रात्रीची हालचाल कन्फर्म झाली आहे,” तो म्हणाला.

त्याच्या आवाजात कोणताही अभिनिवेश नव्हता. ना घाई, ना कोणताही आव्हानात्मक सूर.

“अंदाजे पंधरा ते वीस जणांचा गट आहे.” त्याने नकाशावरच्या एका अरुंद पट्ट्यावरून बोट फिरवलं.

“जंगल खूप दाट आहे... इथे ड्रोनचा काहीही उपयोग होणार नाही.”

तो क्षणभर थांबला. “QRT पाच किलोमीटर मागे स्टँडबाय असेल.”

त्याने हे शेवटचं वाक्य उच्चारल्यावर कुणीही प्रश्न विचारला नाही. त्या वाक्याचा अर्थ सगळ्यांना ठाऊक होता...मदत उपलब्ध आहे, पण ती वेळेवर पोहोचेलच याची शाश्वती नाही. मधल्या त्या जीवघेण्या वेळात जे काही घडेल, ते फक्त आमच्या मनगटातल्या ताकदीवर अवलंबून होतं.

मी त्या नकाश्याकडे पाहत राहिलो. मातीवर पसरलेला तो कागद, त्यावरच्या त्या वेड्यावाकड्या रेषा आणि खुणा... सगळं वरवर साधं वाटत होतं. पण त्या साधेपणामागे एक भयानक गुंतागुंत दडलेली होती. पाटीलने ज्या जागी लाल वर्तुळ केलं होतं, ते वर्तुळ सरळ नव्हतं; कुणीतरी घाईघाईत ओढल्यासारखं विस्कटलेलं होतं.

आणि तरीही... ते एखाद्या ताज्या जखमेसारखं भासत होतं. बाकीचं जग जणू पुसलं गेलं आणि फक्त ते लाल वर्तुळ माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागलं. मी खोल श्वास घेतला.

“तयारी करा. आपण आत शिरतोय,” मी म्हणालो.

माझा आवाज जेव्हा बाहेर पडला, तेव्हा माझ्या आतल्या मनात चाललेली ती प्रचंड खळबळ त्या आवाजातून चुकूनही बाहेर पडली नाही.

पाटीलने माझ्याकडे पाहिलं. मग त्याने हलकीच मान हलवली. बाकीचेही निमूटपणे हालले. कुणी रायफलची पट्टी घट्ट केली, कुणी आपले बूट नीट बांधले, तर कुणी त्या नकाश्याकडे शेवटची मूक नजर टाकली.

सगळ्यांना एक गोष्ट पक्की ठाऊक होती, हे काम सोपं नाही.
*****************************************************************************
दुपारची वेळ, पण सूर्याची किरणं जमिनीला स्पर्श करण्यासाठी धडपडत होती. कॅम्पच्या सुरक्षित मर्यादा ओलांडून जंगलात पाऊल टाकलं आणि अवघ्या काही क्षणांत विश्वाचंच रूप पालटलं. जंगलात शिरतानाची ती पहिली जाणीव नेहमीच अस्वस्थ करणारी असते, तुम्ही आत पाऊल टाकता आणि बाहेरचं जग कायमचं मागे सुटतं. जणू कुणीतरी पाठीशी एक अदृश्य, जड दरवाजा कायमचा बंद केलाय. तो मोकळेपणा, ती दूरवरची दृष्टी... सगळंच एका क्षणात हरवलं.

प्रकाश हळूहळू विरळ होत गेला. वर झाडांची दाट, एकमेकांत गुंतलेली छत्री होती. सूर्यकिरण त्यातून फटी शोधत खाली येत होते, पण त्यात उब नव्हती, फक्त एक निस्तेज पिवळसरपणा होता. हवा जड आणि दमट झाली होती. श्वास घेताना ओल्या मातीचा आणि कुजलेल्या पालापाचोळ्याचा संमिश्र, उग्र वास फुफ्फुसांत भरत होता.

प्रत्येक पाऊल म्हणजे एक 'परीक्षा' होती.

पायाखाली सुकलेली पानं, निसरडी माती किंवा लपलेली मुळं... एक चुकीचं पाऊल आणि झालेला आवाज म्हणजे शत्रूला दिलेलं निमंत्रण! आम्ही एका ठराविक 'फॉर्मेशन'मध्ये, सावलीसारखे सरकत होतो.

सर्वात पुढे शिंदे होता. तो केवळ चालत नव्हता, तो जमिनीवरचं 'अदृश्य पुस्तक' वाचत होता. वाकलेली गवताची काडी, तुटलेली फांदी, पानांची दिशा त्याच्यासाठी हे सगळे जीवघेणे संकेत होते. तो थांबला की आम्ही स्थिर व्हायचो, तो वळला की आमची दिशा बदलायची.

मी त्याच्या मागोमाग होतो. माझं पूर्ण लक्ष त्याच्या हालचालींवर आणि आजूबाजूच्या त्या गूढ झाडीवर होतं. रायफल तयार (Ready position) होती. बोट ट्रिगरवर नव्हतं, पण त्याच्या सावलीत सज्ज होतं. आजूबाजूचे जवान डावीकडे, उजवीकडे आणि वरच्या बाजूला सतत नजर फिरवत होते. कुठलाही कोन, कुठलीही 'डेड स्पेस' रिकामी सोडायची नव्हती.

आमच्यातलं ते ठराविक अंतर... दिसायला किरकोळ वाटतं, पण तेच आमचं कवच होतं. एकाच सापळ्यात (Ambush) सगळे अडकू नयेत, म्हणून राखलेलं ते अंतर!

सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं. पक्ष्यांची किलबिल सुरू होती. किड्यांची ती अखंड चालणारी किरकिर कानावर पडत होती.

वाऱ्याने किंवा एखाद्या खारीच्या हालचालीने पानांची सळसळ होत होती. हा निसर्गाचा आपला एक 'वाइट नॉईज' (नैसर्गिक गोंगाट) असतो, जो तुम्हाला सुरक्षित वाटायला लावतो.

पण मग...ते आवाज हळूहळू विरळ होऊ लागले. पहिल्यांदा ते लक्षातही आलं नाही, पण एक अस्वस्थ करणारी जाणीव मनाला शिवून गेली. काहीतरी बदललंय! एकामागून एक आवाज बंद झाले आणि काही सेकंदातच अवघं जंगल मुकं झालं. जणू निसर्गाने आपला श्वास रोखून धरला होता.

मी पाऊल थांबवलं. हात वर केला. सगळे जिथल्या तिथे गोठले. हालचाल पूर्णपणे थांबली, कुणाच्या श्वासाचाही आवाज झाला नाही.

मी कान देऊन ऐकलं. श्वास आपोआप मंदावला आणि डोळे एका बिंदूवर स्थिर झाले. पण तिथे काहीच नव्हतं. ना पक्ष्यांचा आवाज, ना कीटकांची गुणगुण, ना पानांची ती ओळखीची सळसळ.

ती 'काहीच नसलेली' शांतता खूप मोठी असते. ती कानांवर आदळत नाही, तर ती हळूहळू तुमच्या आत शिरते आणि मेंदू बधीर करते.

“हे नॉर्मल नाही,” मी कुजबुजलो. माझा आवाज इतका क्षीण होता की तो मलाच जेमतेम ऐकू गेला असता, पण अशा ठिकाणी प्रत्येक शब्दाला 'अस्तित्वाचं' वजन असतं.

त्याच भीषण शांततेत, डावीकडे अगदी हलकासा आवाज झाला. जणू कुणीतरी वाळलेली पानं अत्यंत सावधपणे बाजूला सारली असावीत. तो आवाज इतका सूक्ष्म होता की शहरात असतो, तर तो कोलाहलात विरून गेला असता. पण इथे... अशा ठिकाणी दुर्लक्ष करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं.

शिंदे तिथेच थबकला. त्याने खाली बोट दाखवलं. माती तिथे थोडी विसंगत वाटत होती. वरून पाहताना ती बाकीच्या जमिनीसारखीच भासली असती, पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात येत होतं, ती ताजी आणि भुसभुशीत होती. जणू नुकतीच कोणीतरी ती उकरून परत पूर्ववत केली होती.

मी खाली बसलो. हात जमिनीच्या जवळ नेला, पण स्पर्श करण्याचं धाडस केलं नाही. फक्त पाहिलं. तिथली पानं विस्कटलेली होती, मातीचा रंग बदलला होता. IED (Improvised Explosive Device) असण्याची शक्यता होती. त्या विचारानेच पाठीच्या कण्यावरून एक थंड लहर सळसळत गेली, पण हात मात्र काचेसारखा स्थिर राहिला.

मी हाताने खूण केली, मार्ग बदलायचा! एकही शब्द न वापरता सगळ्यांना संदेश पोहोचला. आम्ही उजवीकडे सरकलो. पाऊल न पाऊल मोजत. श्वास, हालचाल आणि नजर... सगळं काही जाणीवपूर्वक, तोलून-मापून चाललं होतं.

त्या काही सेकंदांत काळ जणू थबकला होता. मला वाटलं, आपण सापळा ओळखला... आपण वाचलो.

पण जंगलातले सगळेच सापळे दिसत नाहीत.

मागून कुणीतरी मला हाक मारली— “सर...!”

तो आवाज पूर्ण होण्याआधीच जमिनीने स्वतःला फाडून टाकलं. एकाएकी सगळं आकाश कोसळल्यासारखं झालं. माती, दगड, आणि माणसांचे तुकडे हवेत फेकले गेले.

तो स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की त्याने फक्त कानच नाही, तर मेंदूच्या नसाही सुन्न करून टाकल्या. एका क्षणासाठी डोळ्यांसमोर फक्त पांढरा प्रकाश चमकला.

मी हवेत उडालो आणि जोरात जमिनीवर फेकला गेलो. श्वास अडकला. कानात एकच तीव्र 'कानठळी' घुमत होती. हवेत फक्त धूर आणि मातीचा वास भरला होता.

डोकं गरगरत होतं, पण शरीर 'सर्व्हायव्हल मोड'वर आलं होतं. मी हातावर जोर देऊन उठलो आणि मागे वळून पाहिलं.

जिथे 'कदम' उभा होता, तिथे आता फक्त एक काळाभोर खड्डा होता. माती अजूनही हवेत तरंगत होती. त्या जागी आता 'कदम' नावाचं काहीच उरलं नव्हतं. फक्त रक्ताने माखलेली माती आणि अस्ताव्यस्त पसरलेले त्याच्या देहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे.

डोळे त्या भीषण दृश्यावर खिळून राहिले. मेंदूने ते स्वीकारायला काही क्षण चक्क नकार दिला. जणू आतून कुणीतरी ओरडून सांगत होतं 'हे शक्य नाही... हे जे तू पाहतोयस, ते खरं नाही... हे घडलंच नाहीये!' तो एक नकारार्थी सुन्नपणा होता.

पण मग अचानक एक तीक्ष्ण सुळकन गेलेला आवाज - 'गोळी!'

ती माझ्या डावीकडच्या झाडावर आदळली आणि खोडाची साल हवेत उडाली. पाठोपाठ दुसरी गोळी मातीवर आदळली, माझ्या अगदी जवळ; मातीचा एक छोटा तुकडा उडून माझ्या चेहऱ्यावर बसला. आणि तिसरी... तिसरी गोळी कुणाच्या तरी शरीराचा वेध घेऊन गेली. एक दाबलेला, तुटक असा विव्हळण्याचा आवाज आला आणि कुणीतरी जड वस्तू पडावी तसं खाली कोसळलं.

त्या आवाजाने माझा बधीर झालेला मेंदू झटकन भानावर आला. धुकं हटल्यासारखं सगळं लख्ख स्पष्ट झालं.

“कव्हर...!” मी ओरडलो.

त्या आदेशासरशी सगळे हालले. कुणी जमिनीवर झोकून दिलं, कुणी जवळच्या जाड खोडाचा आडोसा घेतला, तर कुणी प्रत्युत्तर देण्यासाठी रायफल सज्ज केली.

जंगल... जे काही क्षणांपूर्वी स्मशानासारखं शांत होतं, ते आता अचानक हिंस्त्रपणे जिवंत झालं होतं. गोळ्यांचे कानठळ्या बसवणारे आवाज, झाडांच्या पानांची होणारी चाळण, उडणारी माती चहुबाजूंनी मृत्यूचा वर्षाव होत होता आणि त्या तांडवाच्या केंद्रस्थानी आम्ही होतो.

मघाशी स्थिर वाटणारी प्रत्येक गोष्ट आता हालू लागली होती आवाजांनी, धक्क्यांनी आणि किंकाळ्यांनी. धाडकन होणारे आवाज, गोळ्यांची टक-टक, पालापाचोळ्याची सळसळ... सगळं मिसळून एक जीवघेणा कोलाहल तयार झाला होता.

प्रत्येकजण आपापल्या जागी आडोसाच्या शोधात झेपावला होता. कुणी झाडाच्या खोडाची जाडी मोजत होतं, कुणी दगडाच्या कोनाचा आडोसा घेत होतं, तर कुणी जमिनीच्या उताराचा फायदा घेत स्वतःला वाचवत होतं. रायफल्स उंचावल्या गेल्या, बोटं ट्रिगरवर स्थिरावली...

पण शत्रू कुठेच दिसत नव्हता!

युद्धाच्या मैदानात हेच सगळ्यात भयानक असतं. तुम्ही गोळ्या झाडत असता, पण नक्की कुणावर? कोणत्या दिशेला? किती अंतरावर? सगळं काही फक्त आवाजावर, फांद्यांच्या हालचालीवर आणि केवळ 'अंदाजावर' अवलंबून असतं. जंगल तुमच्याशी खेळत असतं.

प्रत्येक सळसळ संशयास्पद वाटते, प्रत्येक सावली जिवंत होऊन अंगावर येते आणि इथे एक चुकीचा अंदाज तुमचा शेवट ठरू शकतो.

मी श्वास रोखला. तो नकळत जोरात चालू होता, मी जाणीवपूर्वक तो संथ केला. डोळे स्थिर ठेवले, कारण घाई केली तर समोरचंही दिसत नाही.

तेवढ्यात, डावीकडे... एका क्षणापुरता! एक छोटासा प्रकाश चमकला-'मझल फ्लॅश' (Muzzle Flash).

तो इतका क्षणिक होता की नजर जरा जरी चुकली असती तरी दिसला नसता. पण तो माझ्या टप्प्यात आला. मी विचार न करता त्या दिशेने फायर केलं. ट्रिगर दाबताना हात काडीइतकाही थरथरला नाही. गोळी सुटली. त्या दिशेने काहीतरी हालल्यासारखं वाटलं, एक काळी सावली सरकली आणि गडप झाली.

पण खात्री नव्हती. इथे कशाचीच खात्री नसते.

पाच मिनिटं झाली असतील किंवा कदाचित फक्त तीस सेकंद... इथे वेळ वेगळ्याच लयीत चालतो. प्रत्येक क्षण ताणलेल्या रबरासारखा लांबतो, प्रत्येक हालचाल संथ वाटते, आणि तरीही... सगळं काही डोळ्यांच्या पापण्या मिटायच्या आत घडत असतं.

पाटीलचा आवाज आला

“सर, चारही बाजूंनी घेराव घालतायत!” त्याच्या आवाजात भीती नव्हती, पण परिस्थितीची भीषणता आणि तातडी स्पष्ट जाणवत होती. मी सुरक्षिततेची मर्यादा राखून डोकं किंचित वर केलं आणि सभोवतालचा वेध घेतला.

मागे फिरणं आता केवळ अशक्य होतं; जिथून आलो होतो, तिथेच मृत्यूचा सापळा रचला होता. उघड्या माळावर जाणं म्हणजे स्वतःहून गोळ्यांच्या स्वाधीन होण्यासारखं होतं. डावीकडे घनदाट झाडी होती, जिथे हालचाल करणं आणि पाहणं दोन्ही कठीण होतं. उजवीकडे मात्र एक हलका उतार होता, जो खाली नाल्याच्या दिशेने जात होता.

तोच एक धूसर मार्ग दिसत होता पण धोकादायक होता.

“उजवीकडे ब्रेक! लाईन सोडायची नाही” मी आदेश दिला. माझ्या आवाजात कोणतीही शंका नव्हती, फक्त एक कठोर निर्णय होता. “लाईन सोडायची नाही” या एका वाक्याचं महत्त्व सगळ्यांना माहीत होतं. एकत्र राहिलो तरच जगलो.

शिंदे एखाद्या सावलीसारखा झाडामागून बाहेर पडला, खाली वाकून कमालीच्या वेगाने तो उताराच्या दिशेने झेपावला. मी त्याच्या मागोमाग होतो आणि बाकीची टीम आमच्या पावलावर पाऊल ठेवून सरकत होती.

आता अंतर कमी झालं होतं. गोळ्या अगदी कानाजवळून सुळकन जात होत्या, त्यांच्या हवेचा तप्त झोत त्वचेला जाणवत होता. झाडांच्या साली उडून अंगावर पडत होत्या, मातीचे कारंजे हवेत उडत होते. प्रत्येक सेकंद हा आयुष्याचा शेवटचा सेकंद असू शकतो, याची जाणीव जिवंत होती.

आणि त्याच रणधुमाळीत... मला ती दिसली.

ती अचानक कुठून टपकली नव्हती, ती तिथेच होती; फक्त आता काळोखातून ती स्पष्ट झाली होती. एका जुन्या झाडाच्या जाड खोडामागे तिचा अर्धा देह लपलेला होता. हातातील बंदुकीवर तिची पकड वज्रमुठीसारखी घट्ट होती.

वय... कदाचित अठरा-एकोणीस, फार तर वीस. पण तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत कोमलता नव्हती. त्या डोळ्यांत एक भयानक पोक्तपणा आणि दाहकता होती.

क्षणभर... जणू अवघं जग थांबलं! गोळ्यांचे आवाज विरले, धूर थांबला, हालचाल थंडावली. त्या भीषण जंगलातल्या रणभूमीवर फक्त आम्ही दोघेच उरलो होतो. आमची नजर एकमेकांना भिडली.

तिच्या डोळ्यांत भीतीचा लवलेशही नव्हता.

ती शत्रू होती, हे मला ठाऊक होतं.

मी तिचा शत्रू होतो, हे तिलाही माहीत होतं.

त्या क्षणाला संवादाला जागा नव्हती, विचारांना थारा नव्हता आणि प्रश्नांना उत्तरं नव्हती.

उरली होती ती फक्त एक 'रिफ्लेक्स' - एक शेवटची जीवघेणी प्रतिक्रिया!

लाल रेषा - भाग २

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद punekarp, sneha1 !
@केशवकूल मी शोधायचा प्रयत्न केला त्यांच्या प्रोफाईलवर पण नाही सापडली.

थरारक वातावरण निर्मिती!

मी सहसा क्रमशः कथा पूर्ण झाल्यावरच वाचतो.
पण प्रतिसादात माझा उल्लेख दिसला म्हणून घुसलो Happy

तुम्ही छान लिहीत आहात. माझी कथा वेगळी आणि साधीशी होती. ती तुमचा अभिषेक आयडी मधून होती.

तुम्ही शोधून आलात म्हणून लिंक देतो.
माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव.
https://www.maayboli.com/node/33749

हे माझे कुठल्याही प्रकारचे पहिले लिखाण पहिले अपत्य होते. त्यामुळे केशवकूल तुम्हाला या कथेची आठवण झाली असेल तर ऐकून छान वाटले Happy