मन – पिशाच्च
Rahi Anil Barve यांनी AI tools वापरून (low budget experiment म्हणून) बनवलेला हा सिनेमा, एका पुरातत्त्व अधिकाऱ्याच्या म्हणजेच सदाशिवच्या अनुभवातून “अज्ञात”, “मन” आणि “भीती” यांचा शोध घेतो.
सदाशिव एका दुर्गम गावात हडमगाव येथे येतो. गावाबाहेर पावसाने उघड झालेला एक गूढ घुमट/मंदिर, आणि त्याभोवती फिरणारे विचित्र, अबोल गावकरी हे सगळं वातावरण स्वतःच एक पात्र बनून उभं राहतं.
आजवर शोले, कहानी, तुंबाड सारख्या सिनेमांमध्ये जसं स्थळ आणि वातावरण सुद्धा कथा सांगतात, तसंच इथेही घुमट ही फक्त जागा नाही तो “अज्ञाताचा” प्रतिनिधी आहे. गावाबाहेर असलेलं हे ठिकाण म्हणजे समाजाच्या चौकटीबाहेरचं, आणि कदाचित मनाच्या मर्यादेबाहेरचंही. गावकऱ्यांना त्याचं अस्तित्व ठाऊक आहे, पण ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात कारण काही गोष्टी न जाणणंच सुरक्षित वाटतं.
सदाशिव आश्रय घेतो एका विधवा स्त्रीकडे; सावित्रीकडे. जी समाजापासून वेगळी आणि एकटी आहे. तिचं घर म्हणजे जणू मनाचा अंधारलेला, दडपलेला भाग. आणि सदाशिव संपूर्णपणे "बाहेरचा" असल्यामुळे त्या जगात प्रवेश करू शकतो.
सावित्रीच्या वागण्यातलं द्वंद्व त्याला लगेच जाणवतं. स्वच्छतागृहात पडलेलं मंगळसूत्र ती सहज उचलते. जणू लग्नसंस्थेचं पावित्र्य तिच्यासाठी उरलेलं नाही. उलट, पुढे तीच सदाशिवला “लग्न कर” असा सल्ला देते. इथे तिच्या मनातला संघर्ष दिसतो. स्वतःला अमान्य असलेली गोष्टही समाजमान्य उपाय म्हणून स्वीकारण्याची तिची तयारी अस्वस्थ करणारी आहे.
घुमटात दिसणारी गांधीजींची तीन माकडं “वाईट पाहू नका, ऐकू नका, बोलू नका” इथे प्रतीकात्मकपणे गावकऱ्यांचंच प्रतिबिंब आहेत. सगळ्यांना काहीतरी चुकतंय हे माहीत आहे, पण कोणी बोलत नाही, कोणी विचारत नाही, कोणी उघड करत नाही. सदाशिव मात्र याच्या उलट आहे, तो प्रश्न विचारतो, पाहतो, आणि शोध घेतो. आणि म्हणूनच तो भयाच्या अधिक जवळ जातो.
सिनेमात एक कुत्रा दिसतो पण तो फक्त सदाशिवलाच दिसतो. तो प्रत्यक्ष कुत्रा नसून, “instinct” किंवा “आंतरिक सत्यशोधक प्रवृत्ती” याचं प्रतीक वाटतो. गावाच्या वेशीवर तो थबकतो , जणू त्या जागेतील दडपलेल्या ऊर्जेला तो ओळखतो. सावित्री त्याला घरात घेत नाही, कारण सत्याला सामोरं जाण्याची तिची तयारी नसते.
दुसऱ्या दिवशी त्याच कुत्र्याचा सांगाडा सदाशिवला सापडतो. जणू त्या instinct चं अस्तित्वच संपलं आहे. कदाचित तो सुरुवातीपासूनच वास्तव नव्हता, तर सदाशिवच्या मनाचं projection होता.
रात्री सातनंतर गावात एक वेगळंच जग उघडतं. एके दिवशी ती वेळ उलटूनही सदाशिव घरी येत नाही, येतो पण सावित्री त्याला घरात घेत नाही, वरून कानात बोळे घालून झोपते, ते आवाज टाळण्यासाठी नव्हे, तर जाणीवपूर्वक वास्तवापासून disconnect होण्यासाठी. तिच्या दारावर दिसणाऱ्या तिच्याच तरुणपणीच्या छबी तिच्या अपूर्ण राहिलेल्या आयुष्याच्या, दडपलेल्या इच्छा-आकांक्षांच्या सावल्या आहेत.
सिनेमातली अनेक दृश्यं अत्यंत प्रभावी प्रतीकात्मक आहेत.
दाराबाहेर ठेवलेलं अन्न, सकाळी रिकाम्या ताटल्या, त्यावरचे लाल-चिकट डाग हे सगळं जणू आपणच आपल्या दडपलेल्या इच्छा, वासना, भीती यांना पोसत असल्याचं रूपक आहे. त्या गोष्टी बाहेरून येत नाहीत, त्या आपल्या आतच वाढतात.
एकीकडे सगळं जग मातकट, कळकट रंगात दिसतं, तर हिरव्या साडीतली छोटी मुलगी वेगळीच भासते ,कदाचित निरागसतेचं, किंवा अजून न दूषित झालेल्या अस्तित्वाचं प्रतीक.
हा सिनेमा सरळ कथा सांगत नाही तो असंख्य प्रश्न विचारतो:
भीती ही दिसणाऱ्या गोष्टीत नसते… ती न समजणाऱ्या गोष्टीत असते.
AI visuals थोडे off, स्वप्नवत वाटतात पण नेमकं तेच या कथेला पूरक ठरतं. हा सिनेमा एक कथा म्हणून स्पष्ट दिसत नाही तो अनुभवावा लागतो आणि मनाने उलगडावा लागतो.
“माणूस बाहेरच्या अंधाराला घाबरतो… पण खरा अंधार त्याच्या आत असतो.”
हा सिनेमा म्हणजे गोष्ट नाही एक psychological Thrilling Experience आहे.
जरूर बघा.
***********************************************************************************************

हे चांगलं लिहिले आहे. अनेक
हे चांगलं लिहिले आहे. अनेक गोष्टींचा उलगडा झाला. धन्यवाद.
दक्षिणा, खूपच सुंदर लिहीलं
दक्षिणा, खूपच सुंदर लिहीलं आहे. असं अॅप्रिशिएट करता यायला पाहीजे. मी पाहिला सिनेमा. पण अजून बरेच जण पाहणार असतील म्हणून जास्त काही लिहीत नाही. मी पण तुंबाड फॅन.
एकीकडे सगळं जग मातकट, कळकट रंगात दिसतं, तर हिरव्या साडीतली छोटी मुलगी वेगळीच भासते ,कदाचित निरागसतेचं, किंवा अजून न दूषित झालेल्या अस्तित्वाचं प्रतीक. >>> हे फार आवडलं. या निरीक्षणाबद्दल काय गिफ्ट देऊ (आहेर नाही
) ? त्याचं इंटरप्रिटेशन सुद्धा आवडलं. प्रत्येकाचं वेगळं असेल.
भयपट म्हणजे भूतपट नव्हे. भयाचे वेगवेगळे अवतार असतात. भय कशाचे असते ? नारायण धारप सिद्धहस्त लेखक आहेत.
अज्ञाताचे भय असते. तीव्र इच्छेपोटी गमावण्याचे भय निर्माण होते, लालसेपोटी भय निर्माण होते तसेच तृप्तीचेही भय निर्माण होते. तृप्त न होण्याचे भय. इतकेच लिहीतो सध्या. सर्वांनी पाहून झाल्यावर चर्चेत भाग घ्यायला मजा येईल .
एक जाणकार प्रेक्षक म्हणून लिहीलेला हा रिव्ह्यू आवडला याची ही नोंद.
एले एकदम मस्त प्रतिक्रिया.
एले एकदम मस्त प्रतिक्रिया. सिनेमावर चर्चा किती होईल याची मला शंकाच वाटते. काल सिनेमा पाहिल्यावर मी आणि मैत्रीण एक तास बोलत होतो. नंतर सुद्धा ती फोन करून मला प्रश्न विचारतच होती. मला सुद्धा मंथन करायला फार मजा आली. अत्यंत क्लिष्ट बनवला आहे सिनेमा, पण पझल सोडवल्यासारखा सोडवताना, अर्थ लागले की फार छान वाटतं.
तसा या सिनेमातला प्रत्येक सीन डिकोड करण्यालायक आहे. मी ठळक लिहिलं आहे. सदाशिवचे लग्नं आणि त्याच्याभोवतीचे विचार, सावित्रीचं आंघोळ करताना लिंबू मिरची खाणं. सदाशिव नेमका कशा प्रकारचा माणूस आहे? यांची पण चर्चा व्हायला हवी. कारण तो सतत रंग बदलून समोर येतो.
फार इंट्रेस्टिंग बनवला आहे सिनेमा.
तुंबाड फॅन आहात त्याबद्दल आहेर नको, सध्या फक्त एक टाळी द्या. मी असंख्य वेळेला पाहिलाय तुंबाड.
मी आत्ता मघाशी पाहिला.
मी आत्ता मघाशी पाहिला.
अगदी नेमके पकडलं आहे दक्षिणा तुम्ही. अगदी मर्म सांगितले आहे.
तो प्रत्यक्ष कुत्रा नसून,
तो प्रत्यक्ष कुत्रा नसून, “instinct” किंवा “आंतरिक सत्यशोधक प्रवृत्ती” याचं प्रतीक वाटतो. >>>
मला तो कुत्रा म्हणजे स्वतःचा conscious awareness वाटतो. आणि प्रत्येक घर म्हणजे माणसाने स्वतःच्या मनाची समजूत घालून निर्माण केलेली आभासी secure मानसिक place... जिथे सर्व entrance काडी कुलूप लावून बंद केले आहेत, जेणे करून conscious awareness चा आत शिरकाव होऊ नये
एकटी विधवा बाई ही हतबलतेचा प्रतीक वाटली, आणि दुसऱ्या घरात राहणारे बायका + पुरुष म्हणजे कधी हतबल तर कधी ठाम राहणाऱ्या व्यक्ती, पण या दोहोंपैकी कोणीही conscious awareness ला स्वतःच्या घरात घेत नाही....तो आरडा ओरडा करून त्रास देईल असं वाटत त्यांना .
बाहेर ताटलीत ठेवलेलं सडक अन्न म्हणजे कधी काळी कुणाच्या ही कळात नकळत केलेल्या गलिच्छ, अनॆतिक, घृणास्पद गोष्टी/, विचार, प्रत्येक जण रोज रात्री(एकांतात) त्या गलिच्छ गोष्टींचे ताटलीवर राहिलेले डाग धुण्याचा प्रयत्न करतो , नाही जात म्हणून आभासी secure मानसिक place मध्ये असलेल्या conscious awareness च्या प्रतिमेवर (कुत्र्याची तसबीर ) राग काढतो.
तो गुम्बद म्हणजे पूर्ण conscious awareness असा आहे असं वाटत कारण जेंव्हा आभासी secure मानसिक place राहणार कुणीही कुणीही या गाडल्या गेलेल्या गुम्बदला excavate करतो तेंव्हा ते केवळ त्याच्या उन्मादाचे (mental collapse ) कारण ठरतो...
पुन्हा एक-दोनदा पाहावा लागेल असं वाटतंय.
फार्स विथ द डिफरंस
फार्स विथ द डिफरंस
हे पण interesting आहे,
कुणी तुंबाड २ बघितला आहे का?
अशा प्रतिमा शोधात गेलात तर देअर विल बी नो एंड!
आपण असे पण म्हणू शकू. कि सदाशिव आयष्यात समाधानी नाही. तेव्हा हा सगळा सिमेमा त्याला पडलेले स्वप्न आहे.
ती बाई त्याच्या मनाचे खेळ आहेत इत्यादी,
धारपांची अशी एक कथा मी वाचली आहे, त्यातला नायक आहे कि नाही असा प्रश्न पडतो. त्याला वाटत असते कि आपले लग्न झाले आहे आणि बायको रागावून माहेरी गेली आहे म्हणून तिची विनवणी करणारी पत्र लिहित असतो. तो ज्या पत्त्यावर पत्रे पाठवत असतो तो पत्ता पण भ्रम,
रानभुली, तुम्हाला आठवते आहे का ही कथा.
लॉंग on रूपके आणि शॉर्ट on content!
आता कुणीतरी बाबूराव अर्नाळकराब्च्या "तेहेतिसावा खून" ह्या कादंबरीचे असे विश्लेषण करा.
माफ करा पण हे कुणा आय डी वर टीका न्हाणून लिहिले नाहीये .
दक्षिणा किती सुंदर समिक्षा
दक्षिणा किती सुंदर समिक्षा आहे.
अगदी नेमकी, मोजून मापून. आपण म्हणतो ना तोलून मापून अगदी तशी. ग्रेसच्या कविता कशा डिकोड करतो तसंच झालंय. तुला दिसलेला सिनेमा मला भावला. मलाही त्या मुलीच्या ठळक आणि रंगीत कपड्यांचा ४ के टोन लक्षवेधक वाटला होता. कुत्रा सुद्धा मुद्दामून आहे असे वाटले पण काय ते समजले नव्हते.
खूप खूप छान लिहीलेय. आवडलं खूप. बेहद्द अगदी.
रात्री बाहेर ठेवलेल्या ताटलीत
रात्री बाहेर ठेवलेल्या ताटलीत जी कच्ची कणिक/सडक्या भाज्या म्हणजे माझ्यामते आपणच आपल्यातलं दडपलेलं वासनारूपी पिशाच्च पोसत असतो. लोक घराबाहेर त्यांच्याच स्वतच्या घाणेरड्या विचारांना खाद्य घालतात.
म्हणजे आपण कधीही त्या गोष्टीपासून सुटका करून घेत नाही. त्यांना पोसत राहतो.
रानभुली बिग thank you
रानभुली बिग thank you
इंटेरेस्टिंग लिहिलंय
इंटेरेस्टिंग लिहिलंय
चित्रपट बघून येतो इथे
वाचायला
रात्रभर झालेल्या उकरा उकरीत
रात्रभर झालेल्या उकरा उकरीत हा ताजा धागा खाली गेला होता. वर काढतोय.
ताजा असेपर्यंत तरी लोकांच्या नजरेला पडू द्यात.
दक्षिणा वेळ मिळाला तर इकडे नजर टाक.
https://www.maayboli.com/node/87985
अतिशय सुंदर समिक्षा आणि
अतिशय सुंदर समिक्षा आणि निरिक्षण
पहायला हवा!