आपण सिलेक्टीव संवेदनशील बनत चाललो आहोत का?

Submitted by प्रेमाच्या_पन्न... on 18 March, 2026 - 06:03

निमित्त झाले आहे परवाच पार पडलेल्या एका कौटुंबिक मेळाव्याचे.
सध्याचा सगळ्यात चर्चिला जाणारा विषय म्हणजे इराण युद्ध, त्यावर सगळ्यांचे बोलणे झाले, मग गाडी वळली गॅस टंचाईकडे. आलेले लोक वेगवेगळ्या शहरातील होते, त्यामुळे तुमच्याकडे काय? आमच्याकडे काय चे बोलणे झाले. बहुतेकाांनी काही प्रॉब्लेम नाही आहे असे सांगितले.
पण पेपर मध्ये तर फोटो बातम्या येत आहेत म्हटले तर हा सगळा ऑपोझीशन चा प्लान आहे, उगाच कोणत्यातरी कोपऱ्यात घडलेल्या गोष्टी ते बोंबलून सांगतात असे एक नातेवाईक म्हणाले.
दुसरे म्हणाले , फोटो नीट पाहिला का? सगळे कट*ल्ले दिसतात. (आपल्या सुनेसमोर हा शब्द उच्चारलेला पाहून मला शॉक बसला) काहीतरी इश्यु तयार करायला ते पुढेच असतात.

दुसरा प्रसंग, आमच्या कॉलेज मित्र मैत्रिणींचा एक ग्रुप आहे, त्यात तळेगाव मध्ये कुणीतरी कसा सिलेंडर बुक केला आणि दुसऱ्या दिवशी त्याला मिळून गेला या बद्दल वाचकांच्या पत्रव्यवहारात आलेल्या पत्राचा स्क्रीनशॉट टाकून सिलेंडर टंचाई हा राजकीय प्रोपोगांडा आहे अशी चर्चा चालू होती.

तिसरा प्रसंग A लायनर सेलिब्रिटींनी कसा इतके वाजता सिलेंडर बुक केला आणि इतके वाजता मिळाला, याचे ट्विट होते. 5 6 लोकांनी नेमका एकाचवेळी बुक केला हा निव्वळ योगायोग.

हे सगळे पाहून माझ्या मनात विचार आला
आपली sympathy , empathy वगैरे गोष्टी कमी झाल्या आहेत? की आपण त्या निवडक ठिकाणी वापरतो?

पहिली गोष्ट, त्या मेळाव्यात आलेले सगळेच उच्च मध्यमवर्गीय होते, म्हणजे घरी शेगडी साठी 2 सिलेंडर, गॅस गिझर असेल तर त्या साठी 2 सिलेंडर त्या व्यतिरिक्त, इंडक्शन, मायक्रोवेव, oven ya सगळ्याच गोष्टी घरी असतील, इतके सारी redundancy असताना त्यांना सिलेंडर बुक केल्यावर 3 दिवसानी आला की 30 दिवसांनी आला याचा फरक पडतो का?

याच्या उलट एकटे राहणारे लोक, घरगुती मदतनीस, विद्यार्थी जे एक बर्नरच्या गॅस वर अवलंबून असतात, त्यांना तो सिलेंडर संपल्यावर लगोलग भरून येणे गरजेचे असते त्यांना हा उशीर जीव घेणा वाटतो. उज्वला योजनेच्या लाभार्थी लोकांकडे 1 सिलेंडरच आहे.म्हणजे अमुक कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिले म्हणून पाठ थोपटायची, पण तितके कोटी लोक तातडीने गॅस मिळावा म्हणून लाइन लाऊन उभे राहिले तर त्यांना राजकीय हेतूने प्रेरित म्हणायचे??

कित्येक हॉटेल्स बंद पडली आहेत, व्यवस्थित following असणाऱ्या 2 उद्योजकांनी लिहिलेल्या पोस्ट वाचनात आल्या. त्यात त्यांनी सिलेंडर कसे दिले जातात, त्यात येणाऱ्या अडचणी वगैरे व्यवस्थित सांगितले आहे. दोघेही लोक सध्याच्या लोकप्रिय नेत्याचे पाठीराखे आहेत हे विशेष.
एक हॉटेल (खाणावळ म्हणू आपण) बंद होते, तेव्हा त्याच्यावर अवलंबून असणारे ग्राहक आणि त्याला पुरवठा करणारे पुरवठादार आणि काम करणारे कामगार या पूर्ण साखळीला त्रास होतो.

डोळ्यासमोर इतका विपुल पुरावा दिसत असताना आपण ही समस्या अस्तित्वातच नाही असे कसे म्हणू शकतो?

हीच गोष्ट काही वर्षापूर्वी झालेल्या निर्धाणीकरणाची.
घरी कार्ड, gpay हे सगळे असल्याने, ज्यांना त्रास झाला नाही, ते दुसऱ्यांना झालेला त्रास कसा खोटा, politically motivated आहे हे मोठ्याने सांगत होते.

करोना काळात लोकांची झालेली ससेहोळपट विविध लोकांनी सप्रमाण दाखवूनही आपण सरकारने ट्रेन्स चालवल्या, लोकांना खाणे दिले लोकांचे काही हाल झाले नाहीत यावर ठाम असतो.

भारतात केवळ 2% लोक income tax भरतात, आपण त्यात आहोत. आपल्या उरलेल्या 98% लोकांच्या परिस्थितीबद्दल काहीही माहिती नाही. (या 2 % लोकात सुद्धा जमीन अस्मानाचा फरक असू शकतो, पण त्यात आता जात नाही) We just don't know what they are going through. मग आपण त्यांना होणाऱ्या त्रासांना कशाच्या आधारावर नाकारतो?

वर सांगितलेला आर्थिक/लौकिक त्रास आहे. पण हेच लॉजिक आपण अस्पृश्यता त्यांना मिळणारी वागणूक यालाही लाऊ शकतो.
त्या ऐवजी आपण छे! आम्ही लहानपणापासून कधीच भेदभाव केला नाही, असे होतच नाही असे म्हणून हात झटकतो.

तुम्ही कदाचित त्याचा त्रास कमी करू शकणार नाही, पण कमीतकमी त्यांचा त्रास खोटा आहे म्हणून जखमेवर मीठ तरी चोळू नका.

And please don't get me wrong. ही सगळी माणसे वैयक्तीय वागण्याला खूप चांगली, ऋजू स्वभावाची आहेत, घरी काम करणारे मदतनीस, विविध सामाजिक उपक्रम यांना आवर्जून मदत करणारी आहेत. अतिशय संवेदनशील सुद्धा आहेत, एखादा भावनिक चित्रपट, गाणे, अनुभव ऐकून त्यांचे ही डोळे पाणावतात.....पण.... जेव्हा सामाजिक संकट असते आणि काही एका विशिष्ट दिशेला सुई वळते आहे असे वाटते, तेव्हा ते संकट नाकारण्याकडे यांचा कल असतो.

विशेष सूचना :- हे जागतिक संकट आहे हे मला माहित आहे, आपले सरकार जे जे शक्य आहे ते ते करते आहे हे सुधा माहित आहे. सरकार काय करतेय किंवा नाही यात मला रस नाही. समाज म्हणूून आपण ऑपरेस्ड आणि ग्रस्त लोकांबरोबर सिलेक्टीवेली उभे राहतो या बद्दल मला दुःख वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली सगळ्यांच्या हातात keyboard आलाय
लोक प्रत्यक्षात कसेही असले तरी सोमी वर असे विकृत वागतात की बस!
संवेदनशीलता कमी झालीये हे दिसून येतेच आहे.

सरकारने प्रथम गॅस सिलिंडरची किंमत वाढवली आणि तुटवडा नाही असे जाहीर केले. त्यानंतर सध्याच्या २१ दिवसावरून २५ दिवस केले नवीन गॅस नोंदणीकरता, जर त्याच वेळी ३० अथवा ४५ दिवस केले असते तर चालले असते. उज्वला आणि एकल गॅस सिलिंडर असणाऱ्यांना प्राधान्य क्रम, त्यानंतर इतर. व्यावसायिक उपयोगकरता देखील काही मर्यादा ठरवली असते तर त्यांचे पण नुकसान न होता जो काही गोंधळ उडाला आहे तो काही प्रमाणात कमी झाला असता. कित्येक डबे पुरवणाऱ्या मंडळींनी दर वाढवले आहेत.

आता जे प्रत्यक्ष पहिले त्याबद्दल, घरासमोरील बैठ्या घरामध्ये अजूनही गॅस सिलिंडर वापरला जातो. तिथे डिलिव्हरी करता जो माणूस आला होता, त्याच्याशी बोलताना असे जाणवले कि अजूनतरी इतका तुटवडा नाही आहे, पण त्याच्या मालकाने काही प्रमाणात वरचे पैसे घेऊन व्यावसायिक लोकांना सिलिंडर देणे सुरु केले आहे. आता यात नक्कीच ज्यांना गरज आहे ते भरडले जाणार. गॅसची नोंदणी करण्या करता हल्ली मिस कॉल पद्धत आहे काही एजंसीची, याचा अर्थ त्या मालकाकडे पूर्ण विदा आहे का कुठला गॅस धारक किती अंतराने ऑर्डर देतो, याचाच उपयोग करून तो वरकमाई करणार. पुणे, ठाणे आणि मुंबई मध्ये लोकं सकाळपासून रांगेत दिसले मागच्या आठवड्यात, कदाचित सुरुवातीचे दिवस असतील म्हणून पण लोकांनी साठा करायचा प्रयत्न केला असेल, पण तुटवडा नाहीच अशी परिस्थीती नक्कीच नाही. फक्त नेहेमीप्रमाणे प्रत्येकजण आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीप्रमाणे त्याचा वापर करत आहेत.

समाज माध्यमांमध्ये आणि न्यूज चॅनेल वर जर बातमी येत असेल सध्याच्या नियंत्रण काळात तर त्यात काही तथ्य जरूर आहे, कारण ही गोष्ट लोकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडित आहे.

कोणत्याही बातमीखाली ज्या कमेण्टस असतात त्या मधे लोक किती संवेदनशील आहेत हे सामजते.

एका पंधरा वर्षाच्या सायकलस्वार मुलाला डंपरस्वाराने चिरडले अशी बातमी होती. त्याखाली एका बाईने लिहीले होते मोठा होऊन नाहीतरी हा "त्यांची" लोकसंख्या वाढवायला कारणीभूत झाला असता. डंपरचालक मोबाईल वाचत चालवत होता हे लिहीले असताना अजून एका बाईने लिहीले कि "ब्लाईंड स्पॉटला होता मुलगा, चालकाची काय चूक ?"

या वानगीदाखल आहेत प्रतिक्रिया.

अशा प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा तिथेच हजारो प्रतिक्रिया कळकळ दाखवणार्‍या असतात, मदतीचा हात पुढे करणार्‍या असतात. पण ह्या उल्लेखाची बातमी कधीही येत नाही, बातमी येते ती मुठभर अविवेकी लोकांच्या प्रतिक्रियांबाबत.

आपण सगळ्याच बाबतीत सिलेक्टिव संवेदनशील झालो आहोत. आणि काही वाईट असेल तर ते जास्त हायलाईट करायची वृत्ती सोमिवर प्रचंड वाढली आहे. नशिबाने मी बातम्या टिवी वगैरे काही बघत वाचत नाही त्यामुळे काहीही माहित नाही.

धाग्यामधे व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आणि असे अनुभव वेळोवेळी आलेले आहेत. सामान्य लोकांच्या ज्वलंत प्रश्नांचे या लोकांना गांभिर्य नाही.

जो पर्यंत स्वत :च्या घरा पर्यंत झळ पोहोचत नाही तोपर्यंत असा टोकाचा दुटप्पीपणा सुरु राहिल.

लेखामागची कळकळ समजते, पण आपण समाज बदलायला जाऊ शकत नाही. मी अशांच्या तोंडीलागत नाही. माझी मनःशांती ढळते अश्याने मग.
जो पर्यंत स्वत :च्या घरा पर्यंत झळ पोहोचत नाही तोपर्यंत असा टोकाचा दुटप्पीपणा सुरु राहिल.>+१

खरं सांगायचं तर, आपण सगळेच थोडेसे biased झालो आहोत असं वाटतं. एखादी घटना घडली की लगेच डोळ्यासमोर येतात त्या काही विचित्र, टोकाच्या प्रतिक्रिया… आणि मग वाटायला लागतं की सगळेच असे आहेत. पण खरं चित्र तसं नसतं ना.

कितीतरी लोक शांतपणे मदत करत असतात, विचारपूस करत असतात, कुणासाठी तरी काहीतरी करत असतात… फक्त ते सोशल मीडियावर गाजत नाही. कारण त्यात drama नसतो.

आणि कदाचित आपणही नकळत तेच जास्त बघायला लागलोय—जे loud आहे, जे नकारात्मक आहे.

म्हणून कधी कधी स्वतःलाच आठवण करून द्यावी लागते… की सगळं इतकं वाईट नाही. अजूनही खूप लोक चांगले आहेत; फक्त ते बातम्यांचा विषय बनत नाहीत.

मी सध्या आमच्या शाळेच्या ग्रूपवर बहुसंख्य मित्रांचा रोष पत्करला आहे.

दोन तीन मित्र सतत धार्मिक तेढ वाढवणारे हिंदू खतरे मे व्हिडिओ शेअर करत असतात.

शेवटी मी वैतागून रोज सकारात्मक आणि ऐक्य दाखवणारे व्हिडिओ शेअर करू लागलो.

त्यामुळे वातावरण तापले. आधी ते दोन-तीन मित्र येऊन माझ्याशी वाद घालू लागले. शिवी दिल्यासारखे मला सेक्युलर म्हणू लागले. त्यात मी नास्तिक असल्याने आणखी वातावरण पेटले. मग त्यांच्या बाजूने अजून काही जण चर्चेत उतरले आणि मला भेंडीबाजार, मुंब्रा, मालेगाव, काश्मीर ते बांगलादेश आणि यूके अशी विविध उदाहरणे देऊ लागली. चर्चेत लव जिहाद सुद्धा आला. ओवेसी आणि MIM आली. केरळ बंगाल आले.

जिथे कोणावरही अत्याचार झाला तिथे सहवेदना होतीच पण जगभरातल्या नकारात्मक गोष्टी अश्या मारा केल्यासारख्या पसरवण्यापेक्षा आपण सकारात्मक गोष्टी का नाही पसरवत हा मुद्दा कोणालाच पटत नव्हता. माझ्या बाजूने फक्त एक जण होता.

कदाचित अजूनही असतील पण त्यांच्यात बहुमतासमोर या संवेदनशील विषयावर वाद घालायची किंवा समता आणि बंधुभाव ही बाजू उघडपणे घ्यायची हिंमत नसावी जे ते मूकवाचक बनून राहिले.

ऑर्कुट कम्युनिटी वर असताना माझा एक धागा होता. अमन की आशा. तिथे मी अश्या पोस्ट टाकायचो. मायबोलीवर सुद्धा असा एक धागा काढायला हवा. जग अजूनही खूप चांगले आहे फक्त ते जगासमोर सातत्याने यायला हवे म्हणजे जगाला त्याची जाणीव होईल.

<<सरकार काय करतेय किंवा नाही यात मला रस नाही. समाज म्हणूून आपण ऑपरेस्ड आणि ग्रस्त लोकांबरोबर सिलेक्टीवेली उभे राहतो या बद्दल मला दुःख वाटते.>>>

<<तुम्ही कदाचित त्याचा त्रास कमी करू शकणार नाही, पण कमीतकमी त्यांचा त्रास खोटा आहे म्हणून जखमेवर मीठ तरी चोळू नका>>

ही लेखातील निवडक वाक्ये सोयीस्कर आहेत म्हणुन उचलली नाहीत तर ते लेखाचे सार वाटल्याने कोट केले आहे.

सकारात्मक का बघत नाही नकारात्मकच का हा वेगळा विषय आहे असे मला वाटते.

लेखात कोव्हीडचा उल्लेख केलाय त्याबद्दल सिम्बा यांचा "ये दुःख काहे खतम् नही होता बे!" अशा शिर्षकाचा धागा आहे. ती वस्तुस्थिती होती हेच नाकारणे (कारण तशा बातम्या दाखवल्या नव्हत्या.) म्हणजे सकारात्मक विचार नाही. ती स्विकारुन, मान्य करून त्या लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करून, एकंदर परिस्थितीकडे पहाणे ही सुद्धा सकारात्मकताच आहे. लोक याबद्दल विचार करतात, जागृत आहेत यामुळे त्याची योग्य तेवढी दखल घेण्यास व पुरेशी उपाय योजना करण्यास संबंधित शासन यंत्रणा व एकंदरीतच पॉलिटिकल कम्युनिटीवर सकारात्मक दबाव येईल.

आपण बर्‍यापैकी सिलेक्टिक संवेदनशील होतोच मात्र त्या बद्दल मनात थोडी बोच तरी असायची. आता सोशल मेडीआच्या कृपेने एकमेकांना समर्थन दिले जाते आणि ती बोचही नाहीशी झालेय. त्यात अजून एक जाणवलेला बदल म्हणजे बदललेला मध्यम वर्ग. पूर्वीचा मध्यम वर्ग हा राजकीय दृष्ट्या बर्‍यापैकी इंडिपेंडंट (मराठीत तटस्थ?) होता. जी परीस्थिती असे त्यावर प्रामाणिक भाष्य असे, उगाच आंधळेपणाने अमुक एका विचारधारेची पाठराखण करायची म्हणून परीस्थितीच नाकारणे, व्हॉटअबाऊटरी करणे, ओढून ताणून बुद्धीला न पटणारे लॉजिक असला वेडेपणा नव्हता.

अशा प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा तिथेच हजारो प्रतिक्रिया कळकळ दाखवणार्‍या असतात, मदतीचा हात पुढे करणार्‍या असतात. पण ह्या उल्लेखाची बातमी कधीही येत नाही, बातमी येते ती मुठभर अविवेकी लोकांच्या प्रतिक्रियांबाबत. >>> बातमी आणि प्रतिक्रिया याबद्दल इथे माझाच प्रतिसाद आहे, त्यामुळे हे त्याबद्दल आहे असे समजून लिहीत आहे.

१. मी ज्या बातम्या आणि प्रतिक्रिया वाचल्या त्याच अन्य कुणी वाचल्या असतील याची शक्यता नाही. किंवा उलटे.
२. मी ज्या ज्या बातम्या आणि प्रतिक्रिया वाचल्या तिथे झुंडीने प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. समजावून सांगणार्‍यांना शिवीगाळ होते हे पाहिलेले आहे. हे लोक कोण आहेत हे न सांगताही समजते.
३. अशा जंजाळात मदतीचा हात माझ्या पाहण्यात नाही. मदतीचा हात देऊ केलेल्या बातम्या निराळ्या असतात. जिथे मदतीची गरज असते.
४. मुलीचे प्रेम प्रकरण समजले म्हणून बापाने ठार मारले या बातमीखाली चांगले झाले, तिला जगण्याचा अधिकार नव्हता अशा प्रतिक्रिया असतात. आणि अपवादानेच समजुतीच्या असतात.
५. मुलीचा प्रेमविवाह झाल्यावर जावयाचा खून केल्यावर शाब्बासकीचा उन्माद दिसतो. अशा कोणत्या बातमीत मदतीचा हात असतो ?
६. समजा जरी मदतीचा हात असलेल्या प्रतिक्रिया असल्या तरी अशा उन्मादी आणि संवेदनशील प्रतिक्रिया हा धक्का आहे. माणुसकी नसलेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे ही चिंताजनक गोष्ट आहे. माणुसकी असणे हे नॉर्मल असण्याच्या जमान्यात अधा गोष्टींकडे लक्ष जाणारच. त्यांच्याकडे काणाडोळा करून फक्त चांगलेच बघितले पाहीजे या अपेक्षा अनाठायी आणि अवास्तव आहेत. २०१४ पूर्वी असेल पण आता उलट परिस्थिती आहे. असंवेदनशील प्रतिक्रियांनी बातम्यांच्या पोर्टल्सचा ताबा घेतलेला आहे हे समज दिसणारे दृश्य आहे.

वर लिहिलेलं सगळं अनुभवतो, वाचतो आहेच.

मला धाग्याच्या शीर्षकावरून वेगळेच प्रसंग आठवले.

दिल्ली निर्भया आणि हैद्राबाद २०१९ पशुवैद्यक डॉक्टर - ज्यात आरोपींचा एनकाउंटर झाला.

वि. मणिपूर आणि बिल्किस बानोच्या बलात्कारी + तिच्या कुटुंबीयांच्या खुन्यांना स्वातंत्र्यदिनी मुक्त करणं आणि त्यांचं आरती ओवाळून स्वागत होणं.
--
एका न्युज पोर्टलने एक वडापाव सेंटर गॅसच्या तुटवड्यामुळे बंद पडल्याचा फोटो टाकला. तर एक प्रतिक्रिया - लं लोक थोडे दिवस घरचं खातील. त्या कर्मचार्‍यांना आराम मिळेल.

मग त्यांना शहरांत शिक्षण , नोकरीनिमित्त एकटे राहणार्‍या आणि अगदी वडापाव नाही पण उपाहारगृहे, क्लाउड कीचन्सवर अवलंबून असलेल्या हजारो लाखो तरुणांबद्दल सांगितलं. कर्मचार्‍यांना सुटी मिळाली तर ती भरपगारी असेल का? मालकाला तशी सुटी देणं परवडेल का? असे प्रश्न विचारले. त्यावर हे जागतिक संकट आहे. अशा स्थितीत झळ बसते. जबाबदार नागरिकाने जबाबदारीने वागलं पाहिजे असं उत्तर आलं

समजा जरी मदतीचा हात असलेल्या प्रतिक्रिया असल्या तरी अशा उन्मादी आणि संवेदनशील प्रतिक्रिया हा धक्का आहे. माणुसकी नसलेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे ही चिंताजनक गोष्ट>>>>

हे आधीही असेच होते. पण तेव्हा असल्यांना व्यक्त व्हायला काही मार्ग नव्हता. असले लोक तेव्हा समोर येऊन पिडीताला त्रास द्यायचे. तोंड दाखवणे कठिण करायचे. आता सोमि फुकट मिळालाय. त्यामुळे तुमच्यापासुन हजार किमीवर घडलेल्या घटनेची जितकी छापली गेली तितकीच माहिती असली तरी
त्यावर स्वतःचे मत छापता येते. सोमिने लोकांची खुपच सोय करुन दिलेली आहे.

माणुसकी आधी जितकी होती तितकीच आता आहे. सोमिमुळे माहितीतल्या नसलेल्या लोकांना पण पैश्यांची मदत करता येते. क्राऊड फंडिंग करुन कित्येकांची आजारपणे निभावुन गेलेली आहेत. सोमिचा हा फायदा आहे. तोटे आहेत तसे फायदेही.

रच्याकने, मी माझे निरिक्षण लिहीले होते. तुमच्या प्रतिसादाचा प्रतिवाद केला नव्हता. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. माझाच खरा व तुमचा खोटा असे काही नाहीय.

हे आधीही असेच होते. पण तेव्हा असल्यांना व्यक्त व्हायला काही मार्ग नव्हता. असले लोक तेव्हा समोर येऊन पिडीताला त्रास द्यायचे >>>
पटलं.
व्यक्त व्हायची माध्यमं कमी असल्याने तसेच बातम्या सर्वदूर पोहोचण्यात अडचण असल्याने लोक मतं व्यक्त करायचे नाहीत. पण आता देशाच्या कानाकोपऱ्यातील बातमी सर्वत्र पोहोचते. आणि जवळजवळ फुकट असल्याने आपल्याला काहीतरी बोललेच पाहिजे या थाटात लोक बोलतात. शिवाय आपल्याला सोयीस्कर बातमी गाजवण्यात राजकिय पक्ष, मिडिया हाऊसेस यांचा महत्वाचा हातभार असतो.
असं म्हणतात की एखाद्या गोष्टीचा सतत मारा केला की त्याविषयी संवेदना बोथट होत जाते. हेच होतं आहे.

हे आपण ज्या "लोकांबद्दल" लिहितोय, त्यातलेच आपणही आहोत. आपणही कधी तसेच वागत असू अशी शक्यता जाणवते का?
मला जाणवते. मान्यच आहे.

भारतात सोमीची सुरवात १९९५ आसपास झाली.
ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आणि मॉडेम आहे अशी बरीच तरुण मंडळी irc chat आणि इमेल ग्रुप्स बनवून एकत्र आली. गटग होऊ लागले.
यात २००० नंतर याहू, मायक्रोसॉफ्ट व इतर मेसजेंर्स यांची भर पडली. माहिती, विनोद, चित्रपट परीक्षण, बोधकथा, मोठ्या घडामोडीवरील मते व्यक्त होऊ लागली. पुढे ऑर्कुट आले. मग फेबु, स्मार्टफोन सगळ्यांकडे, कामगार वर्गाकडेही आले. सोमीची व्याप्ती खूप वाढली.

तर तेव्हा पासून ( म्हणजे ९८ पासून माझी अशी सोमीची सुरवात झाली)सोमीवर असलेली आणि त्यात भर पडत गेलेली मंडळी जी अजुन वेगवेगळ्या सोमीवर संपर्कात आहेत यांच्यातच मोठा बदल घडलेला दिसुन येतो असंवेदनशीलता / निवडक संवेदनशीलता असलेली वाढलेली दिसुन येते. भांडणे झाली, धर्मावरुन द्वेष पसरवाणाऱ्या पोस्ट्स(त्यातील बहुतेक फेक आहेत हे अनेकदा दाखवून दिल्यावरही)ला टोकण्याचे प्रमाण कमी झाले, न जुमानण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शाळा, कॉलेज मधले चांगले मित्र असणारे समुह सोडुन गेले आणि त्याचे वाईट वाटणारेही कमी झाले. अंगवळणी पडलं.

आता सोमीची व्याप्ती प्रचंड वाढली आणि सगळेच व्यक्त होऊ लागले हे बरोबर आहे, कुठल्याही बातमीवर कुणीही, कसेही आणि लगेच व्यक्त होऊ लागले हे पण बरोबर.
पण केवळ त्यामुळे आपल्याला असंवेदनशीलतेचे प्रमाण वाढल्याचा भास होतो प्रत्यक्षात आधीही तेवढे प्रमाण होते हे मला पटलेले नाही.

रच्याकने: ट्रोलिंगही सोमी येण्या पूर्वी पासुन होते. इंटरनेट यायच्या आधीच. समोरासमोर आणि वाचकांच्या पत्र व्यवहारातून ट्रोल केल्याची उदाहरणे आहेत. आता ट्रोलिंग प्रमाण वाढले यालाही फक्त सोमीची व्याप्ती वाढली हे कारण नाही. ध्रुवीकरणाचा चांगलाच हातभार आहे.

हा सो मि चाच प्रभाव आहे. कोणे एके काळी मी सगळे धर्म सारखेच असे म्हणायचे. धर्माची पुस्तके माणसाला चांगलेच सांगणार, धर्म थोडेच काही चुकीचे सांगणस्र, मानव व मानवेतरांवर दया प्रेम करायलाच सांगणार वगैरे वगैरे…. अशा बर्‍याच कल्पना मी मला माझ्या धर्माचे जे लिमिटेड स्वरुप अनुभवास येत होते त्यावरुन ठरवले होते. इतर धर्म
काय बोलतात हे कळायचा कुठलाही मार्ग माझ्याकडे नव्हता. हिंदी चित्रपटातुन जितके कळले तितकेच. बाकी माझ्या आजुबाजुची इतर धर्मीय माणसे माझ्यासारखीच होती.

इंटरनेट व सोमिमुळे इतर धर्म काय शिकवण देतात हे कळायला लागले. यात कुठल्या गोष्टी अतिरंजित व कुठल्या खर्‍या हेही
शोधता यायला लागले. माझा धर्म मला दिसतोय त्याबाहेर जाऊन माझ्याच धर्मातील इतरांना कसा दिसतोय् तेही कळायला लागले.

त्यामुळे मते बदलायला लागली. सर्वधर्मसमभाव ही सगळ्यात मोठी खोटी गोष्ट हे कळले. संस्थापकाने स्थापन केलेले धर्म आणि एखादा राजकिय पक्ष यात सुतरामही फरक नाही हे कळले. आपल्या सभासदांची संख्या वाढवायची आणि यासाठी सामदामदंडभेद जे शक्य ते वापरायचे हाच एकमेव अजेंडा दोघांचाही आहे. संस्थापकानीच सांगितलेय की दयाळु कनवाळु वगैरे गुण त्यांनाच दाखवायचे जे आपल्या पार्टीत येतात. जे सभासद नाहीयेत किंवा होऊ इच्छित नाहीत त्यांचे काय करायचे हे संस्थापकानेच व्यवस्थितरित्या सांगुन ठेवलेय वगैरे वगैरे इन्टरनेट मुळे कळले. नाहीतर मी मुद्दाम पुस्तके विकत घेऊन ज्ञानप्राप्ती केली नसती.

इतर धर्माचे रुप कळल्यावर इतर धर्मांबद्दलचा आदर कमी झाला. आकस निर्माण व्हावा इतका माझा व इतर धर्मियांचा संपर्क नाही. रोजच्या व्यवहारांसाठी भेटणार्‍या इतरधर्मिय लोकांबद्दल अजुन तरी मी न्युट्रल आहे. अजुनतरी मी धर्म बघुन व्यवहार करत नाही.

कोणा फलाण्याला आलेला वाईट अनुभव वाचुन मी माझी वर्तणुक बदलत नाही पण काही लोक बदलतात हे सोमिमुळे मला माहित आहे. धर्माबद्दल आदर कमी झाला की त्या धर्मातील लोकांबद्दल असंवेदनशिलता वाटते. इतर धर्मांबद्दलचे हे सगळे खोटे आहे, मी चुकीच्या साईट्स
पाहते असेही काहींचे मत असेल.

याला ध्रुवीकरण म्हणायचे तर ते प्रत्येकाचे झालेय. आजही भारतीय समाजात सर्व धर्माचे लोक राहताहेत. मला गाव किंवा तालुका पातळीवरही हे मिश्रण दिसते जे मुख्ततः नावांमुळे कळते. पण त्यात फक्त एका धर्माचे लोक पेहरावामुळे ओळखु येतात. माझ्या धर्मातले फार थोडे लोक धर्मओळख होईल असा पेहराव करतात, कित्येकदा त्याण्च्या व्यवसायामुळे ते तसा पेहराव करतात. पण काही धर्माचे लोक पेहरावावरुन अजीबातच ओळखता येत नाहीत. मग एकाच धर्माच्या लोकांना अशी वेगळी ओळख राखावी वाटणे हेही ध्रुवीकरण. तेही सोमिच्या वाढत्या प्रसाराचे बळी असावेत. कारण २५ वर्षांपुर्बी असे नव्हते.

हेच इतर बाबतीत आहे. सध्या अंग झाकण्यापेक्षा ते किती जास्त दिसेल याची काळजी घेत, अंतर्वस्त्रांचा वापर शक्यतो टाळत फोटो व रिल्स बनवुन फेमस होणार्‍या स्त्रिया सोमिवर दिसतात. ह्याने संस्कृती बुडतेय असे वाटणारे लोक आधीही होते व आताही आहेत. आधी असे फक्त एखाद्याच चित्रपटात पाहायला मिळायचे आता दिवसभर डोळ्यांवर रिल्स आपटत असतात. एखाद्या बलात्काराची बातमी येते तेव्हा त्यावर वाईट कमेंट करणारे असल्या रिल्स डोक्यात ठेऊन असंवेदनशील कमेंट करत असतात, प्रत्यक्षात काय घडले त्यांना माहित नसते. यांना कमेंट करायची संधी मिळते सोमिमुळेच. हेच इतर सर्वत्र आहे.

पहिल्यांदा मोबाईल डेटा लिमिटेड होता. लोक फोन करताना बॅलन्स संपणार नाही याची काळजी घेत तो वापरायचे. आता सगळेअनलिमिटे;ड. एकदा रिचार्ज मारला की निश्चिंती. मग सुटायचे खरडत.

मी नाही तासभर घालवला वरचे लिहिण्यात?? पण मी आता स्वत:च स्वतःला लिमिटेड कोटा दिलाय. आजचा कोटा संपला.

मानव +१.
हे मी शाळेच्या, कॉलेजच्या आणि नातलगांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अनुभवलं आहे. कॉलेजचा ग्रुप महिनाभरात सुटला. शाळेचा सहा महिन्यांत. नातलगांचा त्यापेक्षा जरा जास्त काळाने. म्हणजे तिथे दोन ग्रुप झाले. ज्यांना इतरांची मते मान्य नाहीत, त्यांनी वेगळा ग्रुप बनवला. त्याआधी एका भावाने दुसर्‍याला अँटी नॅशनल म्हणून घेतलं.

<त्यातील बहुतेक फेक आहेत हे अनेकदा दाखवून दिल्यावरही)> हे अगदी खरं आहे. फेक असलं तरी ते खरंच आहे. म्हणजे क्ष ही प्रसिद्ध व्यक्ती तसं म्हणाली नसेल, पण ते खरंच आहे.

ध्रुवीकरणाला सोशल मीडियामुळे गती मिळाली. याबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. पुस्तकं आहेत. पण हे सोशल मीडियामुळे सुरू झालेलं नाही. शाखांमध्ये मानव तितुका एकच आहे अशी शिकवण तर दिली जात नाही , एवढंच लिहितो.

लेखात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने. मध्यमवर्ग ही एक खास स्वार्थी आणि आत्मकेंद्री जमात आहे. जगात सगळ्यात भरडले जाणारे आपण आहोत. श्रीमंतांच्या आणि सरकार ज्यांना आपल्या जिवावर पोसतं त्या गरिबांच्या मध्ये आपण येतो आणि आपल्याला कोणी वाली नाही. गरिबांचं जे काही होतं त्याला तेच जबाबदार. ते ऐदी, आळशी , ऐतखाऊ असतात.

वर मी बलात्काराच्या प्रकरणांचा उल्लेख केला. त्यावर समाजशास्त्रज्ञांनीच केलेलं एक विश्लेषण वाचनात आलं होतं. मध्यमवर्गीय , विशेषतः मध्यमर्गीय स्त्रिया , निर्भया प्रकरणी रस्त्यावर आल्या , हैद्राबाद प्रकरणी व्यक्त झाल्या कारण त्यातील पीडिया या मध्यमवर्गातल्या, शिकलेल्या, व्हाइट कॉलर जॉब करणार्‍या होत्या. त्यांच्याबाबत झालं ते आपल्या बाबत होऊ शकतं असं वाटलं.
तेच उन्नाव, हाथरस, मणिपूर, खैरलांजी किंवा बिल्किस बानो बाबत झालं नाही कारण त्या स्त्रिया आपल्यातल्या नाहीत. आपण त्या जागी असण्याची शक्यता नाही.

सोमीच्या बाबतीत आता जास्त निब्बर झालो आहे.

कुणाकडूनही अपेक्षा नाहीत. आता फक्त उरलो टोमणे मारण्यापुरता आणि लबाडांचे दार घशात घालण्यापुरता. जे उघड उघड असंवेदनशील आहेत त्यांचं आता काहीही वाटत नाही. कितीही बनाव केले तरी ते एक्स्पोज होत राहणं हाच उपाय आहे. कितीही मीडीया हाऊसेस खरेदी करू देत, कितीही पैसा ओतू देत, एकदा एक्स्पोज झाल्यानंतर काहीही उपयोग नाही. उसनी संवेदनशीलता काही कामाची नाही. सिलेक्टिव्ह तर अजिबातच नाही. लोकांच्या लक्षात येत असतं, त्यांना व्यक्त होता येत नाही.

टिव्ही चॅनेल्स जाहीराती अभावी बंद पडत चालले आहेत. शंभरच्या वर मुख्य आणि प्रादेशिक न्यूज चॅनल्स बंद झालेत. काही चॅनेल्सनी डाउनलिंक फॅसिलिटीचे पैसे भरलेले नाहीत. कारण २४ तास पॅनेल डीबेटच्या कुस्त्या लावून संवेदनशीलतेची ऐशी तैशी केल्यानंतर आता प्रेक्षकांनीच पाठ फिरवली आहे. सगळ्या ड्ब्ल्यू डब्ल्यू एफ फाईटस आहेत हे किती काळ लपून राहणार ?

चिंता वाटते ती मित्र बनून पाठीत खंजीर खुपसणार्‍यांची. अमक्या तमक्याला सत्तेतून खुपसण्यासाठी आम्हाला साथ द्या नाहीतर तुम्ही नालायक असला रानटी अजेण्डा घेऊन फिरणार्‍या बदमाषांची. ज्यांना संधी असताना कधीही त्यांच्या चमच्यांच्या शिवाय कुणाचे भले करता आले नाही, मूठभरात सत्ता ठेवून मोठ्या संख्येला बाहेर ठेवले अशांचे प्रताप आता कॅप्टन प्रकरणात दिसताहेत. अनेकदा ते ही दिसलेलेच आहे. जनता फक्त एकाच बाजूने शहाणे होतेय असे नाही.

सोयीची संवेदनशीलता हे ही असेच. लोकांना सगळे दिसत असते. आपल्या बिळात सगळे शेर. तसे इथे नको असलेल्यांचे एण्काउंटर करणे, विपू धुंडाळत बसणे एव्हढा वेळ नसलेल्यांसाठी बिळातल्या शेरांच्या तंत्राने चालणे, त्यांच्या व्याख्येप्रमाणे, त्यांच्या जंगलातल्या कायद्याप्रमाणे वागणे शक्य नाही.

उकसवणारी भाषा वापरणार्‍या ड्युआयडीच्या लेखावर जाऊन प्रतिक्रिया का नाहीत असे गळे काढणे आणि आपल्याला न आवडणार्‍या आयडीच्या लेखावर जाऊन काहीतरी वाद उकरून काढणे ही संवेदनशीलता पण व्हिजिबलच असते की. सगळेच सिलेक्टीव्ह आहेत. फक्त आपण खूनी, बदमाष, दंगलकर्ते यांच्या बाबतीत सहानुभूतीदार नाहीत याचा अभिमान आहे. कुठल्याच बाजूच्या.

आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्याला नको असलेल्या वर्गाचं डिह्युमनायझेशन पद्धतशीरपणे होतं आहे. असे प्रकार नियमितपणे घडू लागले की त्याबद्दल काही वाटेनासं होतं. पहिल्या मॉब लिंचिं गनंतर गदारोळ झाला. आता आणखी एक मॉब लिंचिंग झालं का? बरं.
तसंच ती मॉब लिंचिंगची बातमी खोटीच आहे, त्याला तसंच काहीतरी कारण झालं असेल असं समर्थन मी इथे मायबोलीवरच वाचलं आहे.
हे सगळं फार पद्धतशीरपणे होतं आहे. मग इराणमध्ये शाळेतल्या दीडशे मुली मेल्या की नाहीतरी उद्या त्या जिहाद्यांनाच जन्म देणार होत्या असं म्हणता येतं.

<< आता आणखी एक मॉब लिंचिंग झालं का? बरं. >>

------ " त्याने काहीतरी आगळिक काढलेली असेल. चोरी करुन पळूत जात असेल मग लोकांनी पकडून मारल्यावर.... " असे पण एकायची तयारी ठेवायची .
काहीच नसेल तर गोमांस सापडले, गोमांस ने- आण करत होता, गोमांस फ्रिज मधे होते, पिण्याच्या पाण्याच्या नाल्यात ( sewer ) टाकले...

आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्याला नको असलेल्या वर्गाचं डिह्युमनायझेशन पद्धतशीरपणे होतं आहे. असे प्रकार नियमितपणे घडू लागले की त्याबद्दल काही वाटेनासं होतं.>>> या संदर्भातील एक सुंदर युट्यूब शॉर्ट पहाण्यात आलेला.

https://youtube.com/shorts/heQUd-DZOhc?si=eG1j8Fdh98nbK2mY