दुसरी संधी

Submitted by नितनवे on 17 March, 2026 - 14:05

काही कथा आपण लिहित नाही , त्या आपल्याकडे स्वतः चालत येतात.

एखाद्या आठवणीच्या वळणावर, एखाद्या शांत रात्रीत, किंवा एखाद्या गाण्याच्या शब्दांमध्ये.

ही कथा मला स्फुरली ती एका गझलेमुळे.

मुनीर नियाज़ी यांची एक प्रसिद्ध गझल आहे - *हमेशा देर कर देता हूँ*.

ती गझल मी एका शांत संध्याकाळी ऐकत होतो. शब्द साधे होते, पण त्यात एक खोल वेदना दडलेली होती, आयुष्यातील त्या क्षणांची वेदना, जेव्हा माणूस योग्य गोष्ट समजतो... पण थोड्या उशिरा.

त्या गझलेतील एक भावना मनात वारंवार घुमत राहिली,की आयुष्यातील अनेक नाती, अनेक शब्द, अनेक चुकांच्या कबुली... आपण योग्य वेळी बोलत नाही.

आपण थांबतो.
विचार करतो.
अहंकार धरतो.
किंवा मग फक्त वाट पाहतो.

आणि मग एक दिवस लक्षात येतं... आपल्याला जे बोलायचं होतं, जे करायचं होतं, जे जपायचं होतं त्यासाठी नेहमीच थोडा उशीर केला.

त्या भावनेतूनच अद्वैत आणि ईशाची ही कथा मनात आकार घेत गेली.

ही कथा फक्त दोन व्यक्तींच्या प्रेमाची नाही.

ही कथा त्या शांत अदृश्य दरीची आहे, जी दोन माणसांमध्ये नकळत वाढत जाते .

त्या न बोललेल्या शब्दांची आहे, जे योग्य वेळी बोलले गेले असते तर कदाचित कथा वेगळी झाली असती.

कधी कधी प्रेम संपत नाही. फक्त वेळ निघून जाते.

आणि मग आयुष्याच्या एखाद्या वळणावर, दोन माणसं पुन्हा समोर येतात...थोडी जास्त समजूतदार, थोडी जास्त थकलेले.

मनात एकच प्रश्न घेऊन:

*"जर आपण त्या वेळी थांबलो असतो तर?"*

ही कथा त्या प्रश्नाची आहे.

*******************************************************************************************************************************

पावसाच्या रात्री सुरू झालेली कथा

पुण्याबाहेरच्या हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या त्या आलिशान रिसॉर्टमध्ये समीर आणि अनघाच्या लग्नाचा सोहळा रंगात आला होता. संध्याकाळ हळूहळू रात्रीत मिसळत होती. संपूर्ण परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. रंगीबेरंगी ऑर्किड्स, झेंडू आणि मोगऱ्याच्या माळांनी प्रवेशद्वार सुगंधित झालं होतं. मंद वाऱ्याबरोबर त्या फुलांचा सुगंध हवेत दरवळत होता.

दूरवर ढोल-ताशांचा ठेका सुरू होता. लग्नाच्या मांडवाकडून येणाऱ्या मंत्रांच्या आवाजात आणि पाहुण्यांच्या हसण्यात एक वेगळंच उत्साहाचं संगीत मिसळलं होतं. रोषणाईच्या दिव्यांनी संपूर्ण रिसॉर्ट जणू एखाद्या स्वप्नातल्या राजवाड्यासारखं चमकत होतं.

पण अद्वैतसाठी त्या गोंधळातही एक वेगळी शांतता होती. तो या गजबजाटापासून मनाने फार दूर होता.

पाच वर्षं.
साठ महिने.
असं वाटत होतं जणू एका वेगळ्याच आयुष्याचा काळ.

अद्वैतने स्वतःला आरशात पाहिलं. त्याचे केस आता कानापाशी थोडे पांढरे झाले होते, नजर जास्त स्थिर आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा संयम होता. तो आता पूर्वीचा 'रागीट' अद्वैत नव्हता.

"अद्वैत!"

समीरचा उत्साही आवाज त्याच्या विचारांमधून त्याला बाहेर घेऊन आला. समीरने धावत येत त्याला घट्ट मिठी मारली.

"तू आलास यार! मला वाटलं तू शेवटच्या क्षणी कॅन्सल करशील."

अद्वैत हलकंसं हसला. "लग्न आहे तुझं. कसं नाही येणार?"

समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवत थोडं मिश्कील हसत म्हणाला, "ती पण आलीये."

अद्वैत काही क्षण गप्प राहिला. समीरने हळूच डोळ्यांनी इशारा केला.

"तिकडे… डाव्या बाजूच्या टेरेसवर."

अद्वैतने हळूहळू त्या दिशेने पाहिलं.

ईशा.

ती रेलिंगला हलकेच टेकून उभी होती.

निळ्या रंगाच्या पैठणीत. तिचे केस हलक्या वाऱ्याने भुरुभुरु उडत होते. हातात वाईनचा ग्लास नव्हता, फक्त साधी पाण्याची बाटली होती.

अद्वैतच्या मनात नकळत एक विचार चमकून गेला, ‘ॲसिडिटीमुळे तिने वाईन सोडली असावी.’

अद्वैत काही क्षण तिथेच थांबला.

पाच वर्षांपूर्वीचा तो दिवस त्याच्या मनात क्षणभर चमकून गेला-कोर्टरूम, कागद, शांत पण धारदार शब्द… आणि शेवटी दोघांनी केलेल्या त्या सह्या.

त्याने हळूच एक पाऊल पुढे टाकलं.

पावलांचा हलका आवाज ऐकून ईशा वळली.

दोघांचे डोळे भिडले.

त्या एका क्षणात पाच वर्षं अचानक जिवंत झाली.

पहिली भेट.
पहिला पाऊस.
पहिलं भांडणं.
पहिलं “सॉरी”.

पुण्यातला तो पावसाळ्याचा दिवस अजूनही अद्वैतच्या आठवणीत जिवंत होता.

कॉलेज संपून दोन वर्षं झाली होती. एका छोट्या टेक स्टार्टअपमध्ये तो काम करत होता. त्या दिवशी ऑफिस जवळजवळ रिकामं झालं होतं. स्क्रीनवर कोडच्या ओळी सरकत होत्या, पण लक्ष मात्र कुठेतरी भटकत होतं.

बाहेर पाऊस अखंड कोसळत होता.

रात्री साडेदहा.

तो उठून खिडकीपाशी आला. खाली रस्ता पावसाच्या पडद्याआड धूसर दिसत होता. क्वचित एखादी गाडी जात होती आणि पुन्हा सगळं शांत.

तेव्हाच त्याच्या नजरेला बसस्टॉप दिसला.

आणि तिथे एक मुलगी उभी. तिच्याकडे छत्री नव्हती.

ती सतत फोनकडे पाहत होती, मग रस्त्याकडे. पुन्हा फोन. जणू काहीतरी येण्याची वाट पाहत होती, पण ते येत नव्हतं.

अद्वैत काही क्षण तसाच उभा राहिला.

"कोण असेल एवढ्या पावसात?" विचार मनात आला… आणि लगेच त्याने तो झटकला.

तो परत खुर्चीत बसला.

स्क्रीनकडे पाहिलं.

दोन ओळी लिहिल्या.

पण लक्ष परत खिडकीकडेच गेलं.

मुलगी अजूनही तिथेच होती.

आता पावसाचा जोर वाढला होता.

त्याने हळूच श्वास घेतला, लॅपटॉप स्लीपवर टाकला आणि छत्री उचलली.

"काय गरज आहे?" मनातल्या आवाजाने विचारलं.

पण तो आधीच लिफ्टमध्ये शिरला होता.

बसस्टॉपजवळ पोहोचल्यावर तो थोडा थांबला.

ती मुलगी आता थोडी बेचैन दिसत होती. केस पूर्ण भिजलेले, चेहऱ्यावर हलकी चिडचिड.

तो थेट तिच्यासमोर न जाता, थोड्या अंतरावर उभा राहिला.

"बस उशिरा येते इथे?" त्याने सहज विचारल्यासारखं विचारलं.

ती क्षणभर दचकली. नजरेत सावधपणा आला.

"आज… बहुतेक येणारच नाही," ती म्हणाली.

"हम्म…" अद्वैतने मान हलवली.

पाऊस अजून वाढला.

काही सेकंद दोघेही शांत.

मग तिनेच फोनकडे पाहत म्हटलं,
"कॅब बुक केली होती… तीनदा कॅन्सल झाली."

अद्वैत हलकंसं हसला.

"आज सगळ्यांचीच तीच स्टोरी आहे बहुतेक."

ती थोडी रिलॅक्स झाली.

पाऊस इतका वाढला की छपराखालूनही थेंब आत येऊ लागले.

अद्वैतने छत्री थोडी पुढे केली, तिच्या बाजूला.

ती एक क्षण थांबली… मग एक पाऊल पुढे आली.

"Thanks…"

"मी अद्वैत."

ती हलकंसं हसली.

"ईशा."

ती म्हणाली.

त्या पावसाच्या रात्री सुरू झालेली ती ओळख हळूहळू आयुष्य बनली.

ईशा खूप बोलायची. अद्वैत खूप ऐकायचा.

कॅफेमध्ये बसून तासन्‌तास गप्पा व्हायच्या.

पहिला पाऊस आला की ते लांब ड्राईव्हला जायचे.

रात्री दोन वाजता अचानक चहा प्यायला बाहेर पडायचे.

ईशा नेहमी म्हणायची, "तू खूप शांत आहेस."

अद्वैत हसायचा. "आणि तू खूप बोलतेस."

"मग बरोबर आहे ना… आपण दोघे बॅलन्स होतो." ती म्हणायची.

लग्न झालं तेव्हा दोघांनाही वाटलं, हे आयुष्य कायम असंच राहील.

पण आयुष्य नेहमी तसं राहत नाही.

अद्वैतचा स्टार्टअप मोठा होत गेला. काम वाढत गेलं.

मीटिंग्स. प्रोजेक्ट्स. क्लायंट कॉल्स.

रात्री उशिरापर्यंत ऑफिस.

ईशा सुरुवातीला समजून घेत होती.

"ठीक आहे," ती म्हणायची. "तू तुझं स्वप्न पूर्ण कर."

पण हळूहळू ती एकटी पडू लागली.

रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर दोन प्लेट्स असायच्या.

एक रिकामी.

एक वापरलेली.

एकदा रात्री दीड वाजता अद्वैत घरी आला.

ईशा हॉलमध्ये झोपली होती.

टीव्ही चालू होता.

टेबलावर थंड झालेलं जेवण होतं.

त्याने तिला उठवलं.

"ईशा… बेडरूममध्ये झोप."

ती डोळे चोळत म्हणाली,

"आज आपली अ‍ॅनिव्हर्सरी होती."

अद्वैत चपापला.

त्याच्या लक्षातही नव्हतं.

त्या रात्री पहिल्यांदा दोघे खूप भांडले.

**************************************************************************

आणि पाच वर्षांनंतर…

आज ती पुन्हा त्याच्यासमोर उभी होती.

निळ्या पैठणीत.

शांत.

अद्वैतच्या मनात एक विचार आला, काही लोक आयुष्यातून निघून जातात पण मनातून कधीच जात नाहीत.

त्याच्या मनात एक जुना दिवस पुन्हा जिवंत झाला.

कोर्टरूम.

थंड, पांढऱ्या भिंती.

खिडकीतून आत येणारा निस्तेज सूर्यप्रकाश.

त्या खोलीत एक विचित्र शांतता होती, जणू कोणीही मोठ्याने बोलायला धजावत नव्हतं.

टेबलावर कागद ठेवले होते.

“Mutual Consent Divorce.”

त्या शब्दांकडे पाहताना अद्वैतच्या छातीत काहीतरी तुटत होतं.

वकिलाचा आवाज शांत होता.

“तुम्ही दोघेही या निर्णयासाठी तयार आहात?”

ईशा काही बोलली नाही.

तिने फक्त पेन उचललं.

क्षणभर तिचा हात हवेत थांबला.

अद्वैतला त्या क्षणी अचानक आठवलं...

पहिल्यांदा त्याने तिला अंगठी घातली होती.

तेव्हा तिचे हात थरथरत होते.

आज पुन्हा तेच हात थरथरत होते.

पण कारण वेगळं होतं.

ईशाने सही केली.

पेन टेबलावर ठेवताना तिचा श्वास थोडा जड झाला.

आता अद्वैतची पाळी होती.

त्याने पेन उचललं.

त्याला अचानक वाटलं, जर मी आत्ता सही केली नाही तर?

जर मी आत्ता म्हणालो, “ईशा, थांब. आपण अजून एकदा प्रयत्न करू.”

पण तो गप्प राहिला.

अहंकार.

राग.

थकवा.

या तिन्ही गोष्टी त्या क्षणी प्रेमापेक्षा मोठ्या ठरल्या.

त्याने सही केली.

त्या एका ओळीने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला.

कोर्टरूमच्या बाहेर आल्यावर दोघे काही क्षण शांत उभे होते.

लोक ये-जा करत होते.

पण त्यांच्यासाठी वेळ जणू थांबली होती.

ईशाने अचानक बॅगेतून एक छोटा लिफाफा काढला.

“हे नंतर वाच,” ती म्हणाली.

अद्वैतने लिफाफा घेतला.

त्याने काही बोलायचा प्रयत्न केला.

“ईशा… मी—”

पण शब्द घशातच अडकले.

ईशाने त्याच्याकडे पाहिलं.

त्या नजरेत राग नव्हता.

तक्रार नव्हती.

फक्त एक खोल थकवा होता.

दोघेही एक पाऊल पुढे टाकायला घाबरत होते.

काही सेकंद ते फक्त एकमेकांकडे पाहत उभे राहिले.

मग ईशाने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला.

“काळजी घे.”

ती वळली.

अद्वैत तिथेच उभा राहिला.

ती काही पावलं चालली.

अचानक थांबली.

पण मागे वळली नाही.

कदाचित ती वळली असती…

तर कदाचित दोघे पुन्हा एकत्र आले असते.

पण ती चालत राहिली.

आणि त्या दिवशी पहिल्यांदा अद्वैतला जाणवलं,

काही नात्यांचा शेवट मोठ्या भांडणाने होत नाही.

तो शांततेने होतो.

अशी शांतता…

जिथे शब्द संपतात.

आणि आठवणी आयुष्यभर राहतात.

अद्वैतने तो लिफाफा घरी येऊन टेबलावर ठेवला.

पण तो तीन महिने उघडला नाही.

एक रात्री अचानक त्याने तो लिफाफा उघडला.

त्यात ईशाने लिहिलं होतं,

"अद्वैत,

आपण एकमेकांवर प्रेम कमी केलं नाही. आपण फक्त एकमेकांसाठी वेळ देणं थांबवलं.

तुझी स्वप्नं मोठी होती. मला त्यांचा अभिमान होता. पण त्या स्वप्नांच्या सावलीत मी हळूहळू अदृश्य होत गेले.

एक दिवस असाही आला की तू मला गमावलं… आणि तुला कळलंच नाही.

कधीतरी तू हे पत्र वाचशील. कदाचित खूप उशिरा.

पण तेव्हा तुला समजेल,

आपण हरलो कारण आपण वाईट नव्हतो,

आपण हरलो कारण आपण खूप उशिर केला .

— ईशा"

त्या रात्री अद्वैत पहिल्यांदा खूप रडला.

"हॅलो, अद्वैत," ईशा म्हणाली.

तिचा आवाज शांत होता. पूर्वीची ती तीव्रता त्यात नव्हती.

"हाय , ईशा" अद्वैत भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आला.

दोघे काही क्षण गप्प राहिले.

कधी काळी तासन्‌तास बोलणाऱ्या त्या दोघांकडे आता शब्दच उरले नव्हते.

"कशी आहेस?" अद्वैतने विचारलं.

"ठीक आहे."

ती हलकंसं हसली.

"तू?"

"मीही ठीक."

ती म्हणाली,

"मी ऐकलंय तुझी कंपनी खूप मोठी झालीये."

अद्वैतने खांदे उडवले.

"हो, धावपळ असते. पण आता रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय मोडलीये मी. वेळेवर घरी जातो," अद्वैतने हसून उत्तर दिलं.

ईशा काही क्षण शांत राहिली.

हेच तर त्यांच्या भांडणाचं सर्वात मोठं कारण होतं.

ती घरी वाट पाहायची.

तो ऑफिसमध्ये.

कधी कधी पहाटेपर्यंत.

ती हलक्या आवाजात म्हणाली,

"चांगलं आहे. उशिरा सुचलेलं शहाणपण कधीकधी जास्त मौल्यवान असतं."

अद्वैत काही बोलला नाही.

तेवढ्यात वेटर ट्रे घेऊन आला. त्यात काही स्टार्टर्स होते.

अद्वैतने सहजपणे प्लेटमधून एक 'चिकन कबाब' उचलला आणि न विचारता त्यातील हिरव्या मिरचीचा तुकडा बाजूला काढून ईशाच्या प्लेटमध्ये ठेवला.

ईशाला तिखट मिरची खूप आवडायची आणि अद्वैत ती नेहमी तिच्यासाठी बाजूला काढून ठेवायचा. हे करताना दोघांचेही हात थबकले.

त्यांना जाणीव झाली की हातातून लग्नाची अंगठी निघून गेली असली, तरी मेंदूतील त्या 'स्मृतींच्या पेशी' अजूनही जुन्या सवयी विसरल्या नव्हत्या.

"सॉरी, सवय आहे जुनी," अद्वैत ओशाळून म्हणाला.

ईशा हलकंसं हसली.

"मी अजूनही कधीकधी सकाळी दोन कप चहा बनवते."

ती थोडी थांबली.

"मग लक्षात येतं… दुसरा पिणारा कुणी नाही."

दोघेही हसले, पण त्या हसण्यात एक प्रकारचा 'Bittersweetness' होता.

ते आता एकमेकांचे शत्रू नव्हते, पण मित्रही राहू शकत नव्हते. ते दोन अनोळखी लोक होते ज्यांना एकमेकांचे सर्व सिक्रेट्स माहीत होते.

दूरून लग्नाचे मंत्र ऐकू येत होते.

"आपण खूप बदललोय ना, ईशा?" अद्वैतने लांबवर पसरलेल्या शहराच्या दिव्यांकडे पाहत विचारलं.

"बदलावंच लागतं. जोपर्यंत आपण तुटत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला नेमकं काय जोडायचं होतं. पाच वर्षांपूर्वी आपण एकमेकांना बदलायचा प्रयत्न करत होतो, आज आपण स्वतःला बदलून इथे उभे आहोत," ईशा शांतपणे म्हणाली.

तिने तिच्या बॅगेतून एक औषधाची डबी काढली. गोळी काढताना तिची धडपड सुरू होती. अद्वैतने न बोलता तिच्या हातातून ती डबी घेतली, सराईतपणे टोपण उघडलं आणि गोळी तिच्या हातावर ठेवली. ही डबी उघडणं ईशाला नेहमीच जड जायचं.

दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले.

अद्वैत हलक्या आवाजात म्हणाला,

"ईशा…"

"तुला कधी वाटतं का… की जर आपण एकदा भेटलो असतो… तर कदाचित गोष्ट वेगळी असती?"

ईशाने त्याच्या डोळ्यांत पाहिलं.

“कदाचित… पण आज आपण जे आहोत, ते त्या तुटण्यामुळेच आहोत,” ती शांतपणे म्हणाली.

त्या वाक्यात कुठलाही आरोप नव्हता…फक्त एक स्वीकार होता, दुखाचा, वेळेचा, आणि स्वतःचा.

दूरून मंत्रांचा शेवटचा स्वर ऐकू आला. समीर आणि अनघाचे फेरे संपले होते.

टाळ्यांचा आवाज घुमला. एक नवीन नातं जन्माला आलं होतं.

आणि इथे… या टेरेसवर, मंद वाऱ्याच्या साक्षीने, एका जुन्या नात्याचा शेवटचा श्वास हळूवार विरघळत होता.

अद्वैतने तिच्याकडे शेवटचं एकदा पाहिलं.

कितीतरी आठवणी त्या एका नजरेत होत्या,

हसणं, भांडणं, रुसणं… आणि न सांगितलेलं प्रेम.

तो वळला. “निघतो मी… उशीर होतोय,” तो हलक्या आवाजात म्हणाला.

तो चालू लागला. एक… दोन पावलं.

पण पाय पुढे जात होते, आणि मन मागेच अडकलं होतं.

अचानक तो थांबला.

जणू कुणीतरी आतून त्याला थांबवलं.

त्याने हळूच मागे वळून पाहिलं.

ईशा अजूनही तिथेच उभी होती.

त्याच्याकडे पाहत.

तिच्या डोळ्यांत पाणी नव्हतं… पण निघून गेलेल्या वर्षांची एक खोल ओढ होती.

अद्वैतने डोळे क्षणभर मिटले.

एक दीर्घ श्वास घेतला.

आणि तो पुन्हा तिच्या दिशेने चालू लागला.

प्रत्येक पावलात एक निर्णय होता. एक धाडस होतं.

ईशाने त्याला परत येताना पाहिलं.

तिच्या ओठांवर नकळत एक हलकंसं स्मित उमटलं.

“काही विसरलास?” ती हसून म्हणाली.

अद्वैत तिच्यासमोर येऊन उभा राहिला.

काही क्षण तो काही बोललाच नाही.

जणू शब्द शोधत होता.

“हो…” तो शेवटी म्हणाला.

“तुला एक सांगायचं होतं.”

तो थोडा थांबला.

“या पाच वर्षांत… तू खूप लोकांना भेटली असशील.”

तो हलकंसं हसला, पण त्या हसण्यात वेदना होती.

“पण… कोणालाही तुझ्यासाठी ती मिरची बाजूला काढावीशी वाटली नसेल.”

"आणि कोणालाही माझी ती डबी उघडता आली नाही." ईशाच्या डोळ्यांत अश्रू चमकले.

"अद्वैत…"

ती म्हणाली, "कधी कधी आयुष्य आपल्याला दुसरी संधी देत नाही."

अद्वैत हसला.

"म्हणूनच आपण विचारायला हवं."

त्याने हात पुढे केला.

"हॅलो ईशा. मी अद्वैत. मला जुनी गाणी ऐकायला आणि लवकर झोपायला आवडतं. आपण कॉफी घेऊ शकतो का?"

ईशा खळखळून हसली.

तिने त्याचा हात हातात घेतला.

"हॅलो अद्वैत. मी ईशा. मला तिखट जेवण आवडतं… आणि मी अजूनही डब्यांची टोपणं उघडू शकत नाही."

ती मिश्कीलपणे म्हणाली,

"कॉफी चालेल… पण साखरेशिवाय."

दोघेही रिसॉर्टच्या बाहेर चालू लागले.

रिसॉर्टच्या बाहेर आल्यावर हवेत हलकी थंडी होती. रात्रीची शांतता हळूहळू पसरत होती. दूरवरून अजूनही लग्नातील ढोलाचा मंद आवाज येत होता.

अद्वैत आणि ईशा काही क्षण शांत चालत होते.

दोघांनाही माहिती होतं ही फक्त एक कॉफी नव्हती.

ही पाच वर्षांपासून न बोललेल्या हजारो शब्दांची भेट होती.

रिसॉर्टपासून थोडं पुढे एक छोटंसं कॅफे होतं. आत फारसे लोक नव्हते.

दोघे खिडकीजवळच्या टेबलावर बसले.

वेटर आला.

"दोन कॉफी?" अद्वैतने विचारलं.

ईशा हलकंसं हसली.

"आता मी साखरेशिवाय घेते."

"मला माहिती आहे," अद्वैत नकळत म्हणाला.

खिडकीतून बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता.

ईशा म्हणाली, "तुला अजूनही पाऊस आवडतो का?"

अद्वैत हसला. "तुझ्यामुळे आवडायला लागला."

दोघे काही क्षण त्या आठवणीत हरवले.

पहिला पाऊस. बसस्टॉप. ती छत्री.

कॉफी आली.

वेटर निघून गेला.

अद्वैतने कप हातात घेतला.

बाहेर पाऊस वाढत होता.

ईशा अचानक म्हणाली, “तुला माहिती आहे का… त्या दिवशी कोर्टरूममध्ये मी का थांबले होते?”

अद्वैतने तिच्याकडे पाहिलं.

त्या प्रश्नात काहीतरी होतं ज्याची उत्तरं तो कधीच ऐकायला तयार नव्हता… आणि कदाचित आजही नव्हता.

“का?” त्याने हलक्या आवाजात विचारलं.

ईशा क्षणभर हसली. पण ते हसू पूर्ण नव्हतं जणू अश्रूंना लपवण्यासाठी केलेला एक प्रयत्न.

ती हळू आवाजात म्हणाली, “मला वाटलं… तू मला थांबवशील.”

त्या शब्दांनी वेळ जणू थांबली.

अद्वैतच्या हातातला कॉफीचा कप हलकासा थरथरला. त्याच्या बोटांची पकड सैल झाली.

त्याने नजर खाली केली.

मग खूप हळू आवाजात म्हणाला, “मलाही वाटलं… तू मागे वळशील.”

दोघांमध्ये शांतता पसरली.

पण ही ती जुनी शांतता नव्हती, ही अशी शांतता होती, ज्यात सगळं काही ऐकू येत होतं.

न बोललेले शब्द.
थांबलेले क्षण.
गमावलेले निर्णय.

दोघे एकमेकांकडे पाहत राहिले.

त्या एका वाक्याने पाच वर्षांची भिंत तडा जाऊन कोसळली होती.

ईशाच्या डोळ्यांतून एक अश्रू हळूच ओघळला.

तिने तो पुसायचा प्रयत्नही केला नाही.

“आपण किती मूर्ख होतो ना?” ती हलकसं हसली.

त्या हसण्यात वेदना होती.

खंत होती.

आणि एक हरवलेलं आयुष्य होतं.

अद्वैतही हसला.

पण त्याच्याही डोळ्यांत आता ओल होती.

“हो…” तो म्हणाला.

तो थोडा थांबला.

मग हळू आवाजात पुढे म्हणाला, “आपण दोघेही एकमेकांची वाट पाहत होतो…”

तो तिच्याकडे पाहत राहिला.

“पण… दोघांनाही वाटत होतं की दुसरा आधी येईल.”

त्या क्षणी दोघांनाही जाणवलं,

ते हरले कारण त्यांनी प्रयत्न केला नाही म्हणून नाही…

ते हरले कारण त्यांनी एकाच वेळी एकमेकांची वाट पाहिली.

दोघे काही क्षण शांत बसले.

मग अद्वैतने हळू आवाजात विचारलं,

"ईशा… जर आयुष्य पुन्हा एक संधी देत असेल तर?"

ती त्याच्याकडे पाहत राहिली.

खिडकीबाहेर पाऊस पडत होता.

कॅफेमध्ये मंद संगीत वाजत होतं.

ईशाने कप खाली ठेवला.

ती हळू आवाजात म्हणाली "दुसरी संधी प्रेमाला द्यायची नसते."

अद्वैत शांत झाला.

ती पुढे म्हणाली "ती दोन लोकांना द्यायची असते… जे आधीच्या चुकांमधून सुधारले आहेत."

अद्वैतच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं.

बाहेर पाऊस अजूनही पडत होता.

पण त्या रात्री… पाच वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात भूतकाळाची वेदना नव्हती.

कॅफेमधून बाहेर पडताना पाऊस अजूनही हलकासा पडत होता. रस्त्यावर दिव्यांच्या प्रकाशात पाण्याचे थेंब चमकत होते. हवेत एक शांत थंडावा होता.

अद्वैत आणि ईशा कॅफेच्या बाहेर काही क्षण थांबले. दोघांनाही माहिती होतं ही रात्र साधी नव्हती.

ती पाच वर्षांच्या अंतरानंतर आलेली एक नाजूक संधी होती.

रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. दूरवरून एखादी कार जात होती, बाकी सगळीकडे शांतता होती.

ईशा हलक्या आवाजात म्हणाली, “अद्वैत… तुला कधी असं वाटलं का की आपण खूप जवळ येऊनही आयुष्यभरासाठी दूर गेलो?”

अद्वैत काही क्षण काही बोलला नाही.

तो पावसाकडे पाहत म्हणाला,

“हो.”

तो पुढे म्हणाला,

“पण मला अजून एक गोष्ट वाटते.”

ईशाने त्याच्याकडे पाहिलं.

“काय?”

अद्वैत हलकंसं हसला.

“काही लोक आयुष्यात उशिरा येत नाहीत… ते बरोबर वेळेला येतात, पण आपण त्यांना समजायला उशीर करतो.”

दोघेही शांत उभे राहिले. पावसाचे थेंब रस्त्यावर पडत होते.

अचानक ईशा हसली.

अद्वैत थोडा आश्चर्यचकित झाला.

“काय झालं?”

ती म्हणाली,

“तुला आठवतं का… तू मला पहिल्यांदा कुठे भेटलास?”

“बसस्टॉप.”

“आणि त्या दिवशीही पाऊस होता.”

अद्वैत हसला.

“हो.”

ईशा म्हणाली,

“मग बघ… कथा पुन्हा तिथेच आली आहे.”

ती थोडी गंभीर झाली.

“फरक एवढाच आहे… त्या वेळी आपण सुरुवात करत होतो.”

ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली,

“आता आपण समजूतदार झालो आहोत.”

अद्वैतने हळू आवाजात विचारलं,

“ईशा… तुला भीती वाटते का?”

ती हलकंसं हसली.

“खूप.”

“कशाची?”

ती काही क्षण शांत राहिली.

मग ती म्हणाली,

“पुन्हा तुटण्याची.”

अद्वैत काही क्षण काही बोलला नाही.

मग तो शांतपणे म्हणाला,

“मलाही.”

दोघेही काही क्षण पावसात उभे राहिले.

मग अद्वैतने हलक्या आवाजात विचारलं,

“पण एक प्रश्न विचारू?”

“विचार.”

“जर आपण पुन्हा प्रयत्न केला…

आणि यावेळी आपण खरंच एकमेकांना वेळ दिला…तर कदाचित?”

ईशाच्या डोळ्यांत हलकी चमक आली.

ती म्हणाली,

“कदाचित.”

मग ती थोडी पुढे आली.

“पण यावेळी एक अट आहे.”

अद्वैत हसला.

“काय?”

ती म्हणाली,

“जर आपण पुन्हा भांडलो…

आणि मी जायला निघाले तर तू मला जाऊ द्यायचं नाहीस, तू मला हक्काने अडवायचं.”

अद्वैतने हलकंसं मान हलवली.

“डील.”

ईशा हसली.

दोघेही हळूहळू रस्त्यावर चालू लागले.

आकाशात ढग हळूहळू विरत होते.

चंद्र हलकासा दिसू लागला.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा ते वेगळे झाले होते तेव्हा त्यांच्या आयुष्यात अमावस्या होती.

आज पौर्णिमा नव्हती.

पण अंधारही नव्हता.

फक्त हलकासा प्रकाश होता.

आशेचा.

भूतकाळातील अद्वैत आणि ईशा कदाचित तिथेच संपले होते, त्या कोर्टरूममध्ये.

पण आज… पावसाच्या त्या रात्री दोन नवीन माणसं जुन्या आठवणींसह पण नवीन मनाने एक नवीन कथा सुरू करत होती.

*समाप्त*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे, वातावरण निर्मिती मस्त आहे, क्लिशे कोठे जाणवले नाहीत. फक्त पाचच वर्षे झाली त्यामानाने शारिरिक बदल खूप जास्त वाटला दोघांमधेही. पण तरीही फ्लो छान आहे. आवडली!

डीडीएलजे मधले "देखा ना तू ने मुडके भी पीछे, कुछ देर तो मै रूका था,
जब दिल ने तुझको रोकना चाहा, दूर तू जा चुका था" - आठवले

किंवा आणखी जुने "उन्हे ये जिद थी के हम बुलाते, हमे ये उम्मीद वो पुकारे"

छान.

शैली चांगली आहे.
पण क्लिशेड वाटली. जबरदस्ती सुखान्त ,अर्थात हे वैयक्तिक मत आहे.

खरे तर
"तुला एक सांगायचे होते..." नोट वर,
Closure मिळवण्यासाठी कोर्ट रूम मध्ये असलेल्या भावना सांगून,
परिस्थितीचा समंजस स्वीकार करून दोघे आपापल्या आयुष्यात परत गेले असते, with no बिटरनेस तर जास्त खरे वाटले असते.