पुण्यसंचय / पूर्वसंचित

Posted
1 आठवडा ago
शेवटचा प्रतिसाद
1 आठवडा ago

मला तर पूर्वसंचित किंवा पुण्यसंचय ही गोष्ट भविष्यात आपण कधी काही करण्यास कमी पडलो तर माफी मिळावी किंवा सवलत मिळावी, या अपेक्षेने आधीच करून ठेवलेली चांगल्या कामांची तजवीज वाटते.

दहा वेळा आपण कोणासाठी तरी जीव ओतून काहीतरी करतो; आणि अकराव्या वेळेला जर थोडी कुचराई झाली, तर निदान हा माणूस मुद्दाम असे करणार नाही इतकी खातरी समोरच्याच्या मनात निर्माण होते ती फक्त आधी दहा वेळा जीव ओतून केलेल्या गोष्टींमुळे.

तशीही मानवी नाती पूर्णपणे transactional असतात, असे माझे स्पष्ट मत आहे.
“त्यांनी माझ्यासाठी खूप केले आहे, त्यामुळे आता त्यांच्या आजारपणात त्यांना मदत करणे मला भाग आहे,” ही भाषा मुळात परतफेडीचीच वाटते. निव्वळ प्रेमापोटी किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल असलेल्या जिव्हाळ्यापोटी काही करणारी नाती फार विरळ असतात.

रस्त्यात एखाद्याला दुखापत झाली, तरी थोडे प्रथमोपचार किंवा घरी सोडणे, या पुढे “माणुसकी” फार क्वचित दिसते. ज्याचे त्याचे नातेवाईक आले की आपण त्या जखमी व्यक्तीला त्यांच्या हवाली करून आपली वाट धरतोच.
दुःखद प्रसंग असो किंवा लग्न-मुंजीसारखे आनंदाचे सोहळे, कोण आले, कोण गेले, कोणी किती आहेर केला, याची यादी केली जाते. आणि पुढे त्यांच्या त्यांच्या सोहळ्याच्या निमंत्रणाला तितकीच परतफेड केली जाते.
“आम्ही त्यांच्या लग्नाला इतक्या लांब गेलो, एवढा वेळ खर्च केला, मोठ्ठा आहेर केला… आता त्यांनी आलंच पाहिजे.”
किंवा उलट.... “ते आले होते, त्यांनी अमुक केलं, आता आपल्याला करावंच लागेल.”

वाढत्या वयात उपयोगी पडलेले लोकही “मी तुमच्यासाठी खूप केलं आहे” या गोष्टीमुळे भाव खाऊन जातात आणि नकळत entitled होतात.

वेळप्रसंगी आई-वडील सुद्धा हिशेबाला मागे-पुढे पाहत नाहीत. “तुझ्यासाठी इतक्या रात्री जागलो, इतक्या खस्ता खाल्ल्या, टाचा झिजवल्या…” असे दाखले दिले जातात.

हे सगळे मला पूर्वसंचित किंवा पुण्यसंचय याचेच प्रकार वाटतात आणि तेही बऱ्याचदा भेसळयुक्त. आपण आज कोणासाठी काही केलं, तर उद्या हेच लोक आपल्या उपयोगी पडतील, आपल्या गरजेला धावून येतील, अशी भाबडी आशा. किंवा एखाद्याला मदत केली तर देव वरून पाहतो आहे, म्हणून तो त्याचे पुण्य आपल्या पदरात टाकेल, अशी अपेक्षा. (दुर्दैवाने याला मी सुद्धा अपवाद नाही कारण आपलं कंडिशनिंगच त्या पद्धतीने केलं गेलं आहे.)

पण खरी माणुसकी या हिशेबापलीकडे असायला हरकत नाही.

जेव्हा मदत करताना मनात ना देवाचा हिशेब असेल, ना परतफेडीची अपेक्षा. तेव्हा ती कृती पुण्यसंचय म्हणून साठत नाही; ती त्या क्षणीच माणुसकीच्या खात्यात जमा होते. आणि कदाचित तेच खरे पूर्वसंचित असते, जे कोणाच्या वहीत नाही, पण कोणाच्या तरी मनात कायमचे नोंदलेले असते.
************************************************************************************************************

प्रकार: 

निसर्गात परस्परावलंबन वा परस्परउपयुक्तता हा मुद्दा निसर्गचक्रात अंगीभूत आहे. तोच समाजातही आहे. त्यामुळे तुमच्या उपयुक्ततेचा गुणांक हा विचारात घ्यावा लागतो.उपद्रमूल्य आपण बाजूला ठेउ. निसर्गचक्रात त्याचाही संतुलनासाठी म्ह्णून विचार असतोच. तुम्ही लोकांच्या उपयोगी पडलात तर लोक तुमच्या उपयोगी पडतील हा व्यवहार वा अपेक्षा त्यात असते. त्याप्रमाणे प्रत्यक्षात घडतेच असे नाही. उपयुक्तता गुणांक हा आपण अशा तर्कशास्त्राच्या तारतम्यानेच ठरवतो. आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतो आहोत ही भावना संवेदनशील माणसाला सुखावून नेते. त्याच बरोबर आपण त्याला आत्ता मदत केली तर तो आपल्याला मदत करेल ही अपेक्षा असते. भविष्यात तसे घडेलच असे नाही. मानवी नातेसंबंधांचे मूल्यांकन अशा परस्परावलंबन वा परस्परउपयुक्ततेत आहे. निसर्ग क्रूर ही नसतो वा दयाळू ही नसतो. पण त्याचे आपल्या वाट्याला येणारे आविष्कार हे आपल्याला क्रूर वा दयाळू वाटू शकतात. माणसाच्या वाट्याला येणारा सुखद वा दारुण अंत हा असाच काही मला वाटतो. उपयुक्तता मूल्य महत्वाचे आहे केवळ गुणवत्ता मूल्य नाही.मार्केट एखाद्या गोष्टीची गुणवत्ता ही उपयुक्ततेच्या मूल्याशी संलग्न करते. भक्तीच्या मार्केटींग मधेही तेच आहे.
निर्गुण निराकार परमेश्वराचा आम्हाला काय उपयोग. तो असला काय अन नसला काय? म्हणून आम्ही त्याला सगुण साकार केला. मग जरा जवळचा वाटू लागला. तरीपण उपयोगी पडायला अडचण व्हायला लागली मग आम्ही त्याला भक्तवत्सल व करुणाघन केला. आता कसं! त्याल साकडं घालता येतं. शिव्याही देता येतात. सौदाही करता येतो.
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ll
ll त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ll
सगळी मानवी नाती चिकटवून आम्ही मोकळे झालो आहोत. आता तो तुमच्या आमच्यासारखाच आहे. मग त्याचे उपयुक्तता मूल्य आम्ही तपासू. परमेश्वराने कसं सुप्रिम असायला हव नाही का? नाही तर तोही भिकारी व आम्हीही भिकारी.
जोपर्यंत परस्परउपयुक्तता आहे तो पर्यंत नाती टिकतील ती संपली की नातीही संपायला लागतात हा नात्यांमधला व्यवहारवाद आहेच.पक्ष असो, संघटना असो, संस्था असो वा मानवी नातेसंबंध असो तुमचे उपयुक्तता मूल्य संपले कि तुम्ही अडगळीत पडता.राजकारणात कुणी कुणाचे कायमचे मित्र नसतात वा कायमचे शत्रू नसतात तसे समाजकारणात ही आहे. तुमचे त्यांच्यासाठी व त्यांचे तुमच्यासाठी उपयुक्तता मूल्य व उपद्रव मूल्य जसे बदलत रहाते तसे हे स्थान बदलत राहते.
मी कॉलेज होस्टेलला असताना भल्या पहाटे अमृततुल्य मध्ये चहा प्यायला जाई.आम्हीच त्याचे पहिले गिर्‍हाईक असे. तो पहिला चहा हा रस्त्यावर ओतून देत असे. मी त्याला विचारल अस का करतो? तो म्हणाला," पहिला चहा सैतानाला. त्याला खुष केलं पाहिजे. देव काय आपला नेहमीचाच् आहे. तो थोडच कुणाच वाईट करणार आहे."
म्हणजे देवाच्या उपयुक्तता मूल्या पेक्षा सैतानाचे उपद्रव मूल्य अधिक असते. म्हटलचं आहे कि दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनंतरं।
माझी मानवी नातेसंबंध हाताळण्याची क्षमता दुर्दैवाने अतिशय कमी आहे. त्यामुळे मला नातेसंबंधाचे नेहमीच भय वाटते.

तुमचं निरीक्षण पटण्यासारखं आहे. निसर्गात परस्परावलंबन आणि परस्परउपयुक्तता हा नियम आहेच, आणि मानवी समाज त्याला अपवाद असू शकत नाही. “उपयुक्तता मूल्य” हा घटक नात्यांमध्ये काही प्रमाणात असतो, हेही वास्तव आहे.

पण माझ्या लेखातला मुद्दा थोडा वेगळा आहे. व्यवहारात उपयुक्ततेचा अंश असतो हे मान्य; मात्र अनेकदा आपण त्याला “निर्भेळ प्रेम”, “निरपेक्ष नातं” किंवा “पुण्यसंचय” अशा मोठ्या शब्दांनी सजवतो. म्हणजे व्यवहाराला भावनेचा मुलामा देतो. मला त्या मुलाम्याबद्दल प्रश्न पडतो.

माणूस पूर्णपणे व्यवहारवादी आहे असंही नाही, आणि पूर्णपणे निरपेक्ष आहे असंही नाही. या दोन्ही टोकांच्या मधेच बहुतांश नाती घडत असतात. कधी उपयुक्तता जास्त असते, कधी जिव्हाळा जास्त असतो, आणि कधी दोन्हींचं मिश्रण असतं.

कदाचित म्हणूनच नाती इतकी गुंतागुंतीची आणि रोचक असतात.

पाप पुण्य म्हटले की मला जितेंद्र अभिषेकींच्या स्वरातील बा.भ.बोरकरांचे हे गाणे आठवते
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप

पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

या बरोबर अजून एक संस्कृत सुभाषित आठवते .
"अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्।
परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्।।"
पाप पुण्याची सोपी व्याख्या केलीय.
तुमच्या लेखात म्हटलय की
जेव्हा मदत करताना मनात ना देवाचा हिशेब असेल, ना परतफेडीची अपेक्षा. तेव्हा ती कृती पुण्यसंचय म्हणून साठत नाही; ती त्या क्षणीच माणुसकीच्या खात्यात जमा होते. आणि कदाचित तेच खरे पूर्वसंचित असते, जे कोणाच्या वहीत नाही, पण कोणाच्या तरी मनात कायमचे नोंदलेले असते.
मी याला फील गुड फॅक्टर म्हणतो. अशा मुळे बरे वाटते हे खरेच आहे.

कसलीही अपेक्षा न बाळगता, नि:स्वार्थ कुणी मदत केली हे कसे ओळखणार, कळणार हे सांगा आधी.
प्रेमापोटी यातील प्रेम/माया म्हणजे काय? शुद्ध प्रेम म्हणजे काय? आई -मुल शुद्ध प्रेम तर मग त्यात असं नातं का असावं लागतं?
आणि असं शुद्ध प्रेम /निःस्वार्थ माणुसकी असावी ही अपेक्षा कशासाठी? त्या अपेक्षेत स्वार्थ नाही का?

मानव निस्वार्थी मदत 100% खातरीने कधीच ओळखता येत नाही. कारण समोरचा विचार कसा करतो ही आपल्याला कसं कळणार? पण काही लक्षणांवरून आपण तर्क करू शकतो ना? जसं की मदत करताना स्वतःच्या फायद्याचा हिशेब पाहिला जात नाही. परिस्थिती संपल्यानंतर नातं किंवा वागणूक बदलत नाही.
आई आणि मुलांचं प्रेम विशुद्ध मानतात कारण आई मुलांसाठी खूप त्याग करते, आणि त्या बदल्यात तिला कोणत्याच अपेक्षा नसतात. पण हे उदा आदर्श नाहीये कारण सगळीच आई मुलाची नाती अशी नसतात.

निःस्वार्थ माणुसकी या अपेक्षेत सुद्धा स्वार्थ आहे नक्कीच. मला वाटतं जगात निस्वार्थी असं काहीच नाहीये.
पण तरीही काही करताना (दुसऱ्यासाठी) यातून मला काहीतरी मिळेल, या पेक्षा मी केल्यावर समोरच्याला मदत होईल या गोष्टीला/भावनेला प्राधान्य द्यावे.

या बाबतीत कदाचित जी माणसे 'परमेश्वर' आणि 'Just World' या संकल्पनांना मनात नाहीत, अशी माणसे जेंव्हा केंव्हा कुण्या अनोळखी व्यक्तीला, मुक्या प्राण्यांना मदतीचा हात देतात तेंव्हा ती निस्वार्थ मदत असते असा मनात विचार येतोय, बाकी सगळं Transactional हेच खरं.

सगळ्या जगाकडे बुद्धाच्या अर्धोन्मिलनीत नेत्रातल्या करुणेने पाहण्याची ताकद खूप थोड्या माणसांकडे असते.
तरीही आपण कधी कधी हा प्रकाशाचा तुकडा घेऊन परतफेडीची अपेक्षा ना ठेवता मदत करतो, अगदीच नाही असे नाही. विशुद्ध प्रेम देखील माणूस कधी कधी तुकड्या तुकड्यात होईना करतो अगदीच नाही असे नाही.

मात्र तू अगदी नेमके पकडले आहेस दक्षिणा. बहुतकेदा व्यवहार म्हणूनच मदत केली जाते. प्रेमाला देखील नेहमीच उदात्तता असत नाही. त्यातही अगदी थंड व्यवहार मायेची स्नेहल चरबी लेऊन दडून बसलेला असू शकतो.

सतत सावध पणे या सगळ्यांचे कॅलक्युलेशन्स करत बसण्यात सगळी हयात जाते. (व पु होण्याचा मोह आवरून घेतो)

<<आई आणि मुलांचं प्रेम विशुद्ध मानतात कारण आई मुलांसाठी खूप त्याग करते, आणि त्या बदल्यात तिला कोणत्याच अपेक्षा नसतात>> आणि पोटचं मूळ नसेल, थोडक्यात असं नातं नसेल तर?
कारण तिथेही स्वार्थ आहे, "आपलं" मुलं आहे ते जगलं पाहिले संतती वाढली पाहिजे, मुलांनी असं करावं तसं करू नये इत्यादि. तो संसार गाडा चालला पाहिजे. मानव सोडून इतर प्राणी पाहिले तर मुद्दा आणखी क्लिअर होईल. त्यांच्यात पिल्लांनी भरारी घेतली की काम संपलं. पण तिथेही आपली संतती वाढली पाहिजे या भावनेपोटी तो पर्यंत पिल्लांना जपणे ही उर्मी आहे.

<<पण तरीही काही करताना (दुसऱ्यासाठी) यातून मला काहीतरी मिळेल, या पेक्षा मी केल्यावर समोरच्याला मदत होईल या गोष्टीला/भावनेला प्राधान्य द्यावे.>> पण मग त्यात मला पुढल्या जन्मी पुण्य मिळेल अथवा पाप लागणार नाही या उधारीवर किंवा आपला तर पाप-पुण्यावर, पुनर्जन्म, कर्माच्या फंडावर विश्वास नाहीये, आपण अशी मदत केली हे पाहुन पुढे हीच व्यक्ती नव्हे तर इतर कुणी इतर कुणाला आणि अजून इतर कुणी आपल्याला किंवा आल्या लव्ह्ड-वन्सना (न्स वर अनुस्वार नाही तेव्हा वचकांनी कोटी आवरावी Wink )मदत करेल अशी अपेक्षा , स्वार्थ असेल तर कुठे बिघडलं? अशी कितीतरी मदत मिळत असते, मिळाली आहे.

(बरेच लोक असंवेदनशील होत आहेत, फोटो, व्हिडीओ काढतील पण मदत करणार नाही हे आहे पण विषय तो नाही असे मी समजतोय. जे मदत करत आहेत ते कुठल्या कारणाने करतात असा विषय आहे.)

@ फाविद: तिथे आपण चांगले आहोत हे स्वतःला समजवण्यास अथवा आपल्याला चांगले म्हणावे अशी सुप्त इच्छा असु शकते.

आणि मदतीलाही फार मर्यादा असतात. एकाला मदत दुसऱ्यावर अन्याय होऊ शकते.
परमेश्वर, पाप-पुण्य, जस्ट-वर्ल्ड संकल्पना न मानणाऱ्या व्यक्तीला मांसाहारी प्राणी पायाला मुका मार लागल्याने जायबंदी होऊन भूकेने तडफडताना दिसला. त्याचा जीव वाचण्यास त्याने एखादे बेकरीचे पिल्लु आणुन त्याच्या पुढ्यात घालावे किंवा कसे? अपघाताने मृत झालेला प्राणी शोधुन देणे हा एक पर्याय, पण सापडत नाहीये. मग जाऊ दे आपल्याला काय, त्याचे नशीब म्हणुन तो सोडून देतो ते योग्य की अयोग्य?
सांगण्याचे तात्पर्य एवढंच की हे निःस्वार्थ मदत डिफाईन करणे कठीण किंवा अशक्य. आयसोलेटेड उदाहरणे तेवढी असु शकतील.

मला वाटते या अशा विषयावर प्राचीन काळापासून खूप विचार झाला आहे. निःस्वार्थ अथवा लगेच , लौकरच मोबदला मिळणार नाही याची जाणीव ठेवून मदत करावी यासाठी पाप-पुण्य, कर्म-सिद्धांत वगैरेवरआधारीत कथा रचल्या आहेत.
एक अतिथी देवो भव कथा आहे. दोन पक्षी झाडावर असतात, एका पावसाळी रात्री एक वाटसरू त्या झाडाखाली मुक्कामाला येतो आणि त्याचे अतिथ्य करण्यासाठी पक्षी आपले सुके घरटे खाली टाकवून, पेटवून त्या अग्नीत झोकून देतो - खा मला अतिथी देवा, उपाशी राहु नकोस. निःस्वार्थ सेवा.
अशा कथा याच विचारांमधुन जन्माला आल्या असाव्यात.

सहजीवन आहे, समाजात एकमेकांना एकमेकांची गरज आहे , आज आपण कुणाला उपयोगी पडु तर उद्या अजुन कोणी आपल्या मदतीला येईल, मी - माझे मुल, आपण-आपले कुटूंब यांना प्राधान्य या स्वार्थापोटीच समाज टिकुन राहील.

@ फाविद: तिथे आपण चांगले आहोत हे स्वतःला समजवण्यास अथवा आपल्याला चांगले म्हणावे अशी सुप्त इच्छा असु शकते.>>> नाही वाटत, कारण 'Just World' च्या तर्काशीच डिफर करणाऱ्यासाठी चांगलं असणं काय आणि वाईट असणं काय दोन्हीही सारखंच.

आणि आपण सामान्य माणसांबद्दलच बोलत आहोत ना? कि योगी-महात्म्यांबद्दल?? कारण इतक्या गाळण्या लावून कदाचित आपण केवळ क्लिष्ट वैचारिक क्षमता आहे म्हणून माणसाकडून माणूस म्हणून जगण्याचा हक्क तर हिरावून घेत नाही आहोत ना? याचा ही विचार करणे तितकाच आवश्यक आहे.

<नाही वाटत, कारण 'Just World' च्या तर्काशीच डिफर करणाऱ्यासाठी चांगलं असणं काय आणि वाईट असणं काय दोन्हीही सारखंच.>>
अच्छा. मी स्वतःचा असा अहंकार सुखावणे हे त्यापेक्षा वेगळे समजलो. पण मी वाईट की चांगला याचा विचारही न करणे या दृष्टीने तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.

<<आणि आपण सामान्य माणसांबद्दलच बोलत आहोत ना? कि योगी-महात्म्यांबद्दल?? कारण इतक्या गाळण्या लावून कदाचित आपण केवळ क्लिष्ट वैचारिक क्षमता आहे म्हणून माणसाकडून माणूस म्हणून जगण्याचा हक्क तर हिरावून घेत नाही आहोत ना? याचा ही विचार करणे तितकाच आवश्यक आहे.>> स्पॉट ऑन.
लोक मदत करत आहेत करून घ्यावी. (अर्थात वाजवीपेक्षा भलत्या अपेक्षा ठेवून नाही वगैरे लागु.) आपणही एकमेकांना मदत केल्याने पुढे आपला, आपल्या माणसांचा फायदा होईल अशी आशा, अपेक्षा ठेवून केल्यास हरकत नाही. ती निर्भेळ निरपेक्ष आहे का वगैरे उहापोह करण्यात अर्थ नाही.

@रॉय -

तुम्ही म्हणता तसे कधी कधी माणसाच्या मनात करुणेचा आणि विशुद्ध प्रेमाचा एखादा किरण डोकावतोही. पण बहुतेक वेळा त्या भावनांवर व्यवहाराची हलकीशी छाया असते, हेच मला त्या लेखात मांडायचे होते. धन्यवाद!

मानव आणि फाविदडी किती छान चर्चा सुरू आहे. तुमचे विचार आवडले.
पुन्हा पुन्हा वाचून आकलन करून घेते आहे.

काही लोकांमध्ये आपणहून मदत करण्याची प्रव्रुत्ती असते. पण सल्ला देताना व मदत करताना त्या व्यक्तिच्या आयुष्याचा ताबा नकळत आपल्याकडे घेउ लागतात. आपण मदत केली तर ती उपकाराच्या भावनेने करु नये. मदत करणे शक्य होते त्यामुळे आपल्याला बरे वाटते या भूमिकेतून करावी. पण समोरच्याला मदत केली म्हणजे त्याने जणु उपकाराच्या ओझ्याखाली कायम राहावे ही सुप्त इच्छा मनात बाळगून असाल तर तो निव्वळ स्वार्थी विचार ठरतो.