कल्चरल बिल्चरल शॉक

Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 March, 2026 - 10:07

आमच्या शेतात संकरित गायी आल्या त्या काळाची आठवण झाली. त्यांना आम्ही इंजेक्शनच्या गायी म्हणायचो. एकदा आईने वसुबारसेला इंजेक्शनच्या गायीचे पूजन केले. मला प्रश्न पडला की या गायी काही आपल्या भारतीय नाहीत. हे तर परदेशी प्रकरण आहे. मग या असल्या गायीची पूजा केलेली धर्माला कशी चालते? माझ्यासाठी तो सांस्कृतिक धक्का होता. पुढे पुढे बाजरी ज्वारी गहू उस सगळच संकरित बियाण सर्रास यायला लागल अन त्यानंतर तर जीवनच संकरित झाले. तसेच या मीम्सच्या म्हणजे अभिव्यक्तिच्या संकारातून निर्माण झालेल्या गोष्टी काहींसाठी सांस्कृतिक धक्का असू शकतो. हे मी स्वानुभवावरुन सांगतो.
मी लहानपणी शाम वाचले. शामची आई हे नंतर. शाम मधे थोर मनाचा मजूर शिवराम हे प्रकरण मला फार हृद्य वाटले. आमच्या उत्पल या मित्राने श्याम व श्यामची आई हे मीम्सद्वारे काल सुसंगत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी श्यामच्या आईबद्दल फार संवेदनशील आहेत. त्यामुळे मीम कर्त्यांचा श्याम व श्यामची आईला काल सुसंगत करण्याचा उत्पल यांचा प्र्यत्न त्यांच्यासाठी कल्चरल शॉक होता. वर्तमानपत्रात त्यांचे वाद विवाद झाले होते.
माझी मुलगी मला अरे बाबा म्हणताना काही लोकांना असाच कल्चरल शॉक बसायचा. आमचे गावाकडील एक हितचिंतक आल्यावर मोठ्या माणसांना असे म्हणू नये असा संस्कार करण्याचा प्रयत्न केला.
पुणे हे माझे आजोळ त्यामुळे इथे जेव्हा गावाकडून लहानपणी येत असे. त्यावेळी मामा रेडिओवर विविध भारती लावून पूजा करत असताना दिसे. माझ्यासाठी तो कल्चरल शॉक होता. देवाला पिक्चर मधील हिंदी गाणी कशी चालतात? आमच्या घरी रोजची पूजा हा मोठा कार्यक्रम असे. मी स्वत: सोवळ्याची चड्डी घालून सागर संगित पूजा करीत असे. ती उरकून टाकायची बाब नसे. शिवाय घरात विविधभारती ऐकणे म्हणजे पापच. हॉटेल मधे जेवणे हा तर अधर्मच. त्यात इथे हॉटेल मधे उपवासाची खिचडी मिळते आणि लोक ती खातात हा ही एक कल्चरल शॉक
मी गावाकडे असताना सदरा व पायजमा वापरत असे. जरी कॉलेज च्या होस्टेल वरुन सुटीला घरी गेलो तरी गावाकडे गेल्यावर त्याप्रमाणे पोशाख असे. मला कुणाची तशी सक्ती नव्हती पण सर्वांशी मिळून रहाताना ते सोयीचे जायचे. शहरात जाउन लईच शहरावानी झाला असे ऐकायला लागू नये म्हणुनही एक दबाव असायचा. थोडी बंडखोरी म्हणुन मी सदरा लेंग्यावर गांधी टोपी घालत नसे. हायस्कूल संपे पर्यंत खाकी हाफ चड्डी, पांढरा सदरा व गांधी टोपी हा गणवेशाचा अपरिहार्य भाग होता. ग्रामीण भागातही हळु हळु शर्टपॅन्टला समाज मान्यता मिळाली.
शांताबाई शेळक्यांना डोईवर पदर असण्याची सक्ती होती काय? कधी कधी आपल्याच प्रतिमेचा आपल्यावर दबाव असतो तो आपण राजीखुशीने मान्य केलेला असतो. समाजात कुठलाही बदल स्वीकारण्याचा वेग हळूच असतो.
सध्या मी कपडे घालतो ते स्वत:चे उन थंडी वारा पाउस वगैरें पासून संरक्शण व इतरांचे लज्जारक्षण यासाठी. Lol
ही चर्चा पुढे ड्रेसकोड या मुद्द्याशी नक्की येईल. उद्या जर कॉलेज मधे शिकवायला प्राध्यापिका बिकिनी घालून आली तर? प्राध्यापिका म्हणून तीची गुणवत्ता वादातीत आहे. किंवा अध्यात्मिक विषयावर प्रवचन द्यायला जर एखादी महंतीण उत्तान पोशाख करुन आली तर?संस्कारी व चारित्र्यवान हे शब्द फार गुळगुळीत आहेत. अशी कल्पना करा की नवरात्रीच्या रंगांचे जे जीआर बाहेर पडलेत त्यानुसार एखाद्या स्त्रीने त्या रंगाची बिकीनी घातली तर ते लोकांना पचनी पडणार नाही. त्यांच्यासाठी तो कल्चरल शॉक असेल. हेच एखाद्या मॉडेल ने केले तर तसा कल्चरल शॉक बसणार नाही. कारण मेंदुशी काही गृहीतके कोरलेली असतात.
मी गावाकडून जेव्हा पुण्यात येत असे त्यावेळी इथल्या स्रियांचा पोशाख मला वेगळा वाटत असे. एकदा कॅम्प मधे गेलो होतो तिथे फ्रॉक घातलेली म्हातारी पाहिली. यवढ्या मोठ्या बाया कशा काय फ्रॉक घालतात? असा प्रश्न मला पडला. पण इतिहासाताल्या पुस्तकात ॲनी बेझंटचा फोटो पाहिला होता त्यामुळे मला अजून काही इंग्रज स्त्रिया पुण्यात आहेत असे वाटत असे.मला पुण्यात यायला का आवडायचे तर इथे डांबरी रस्ते आहेत, नळाची तोटी फिरवली की इथे भरपुर पाणी येत, रंगी बेरंगी लाईट आहेत, सिमेंट च्या उंच इमारती आहेत, इथले लोक पॅन्ट शर्ट घालतात, आईसक्रीम , केक व पाव इथे खायला मिळतो. पण एकदा केक मधे अंडे असते हे ऐकल्यावर एके काळी माझ्यातल्या संस्कारी शामला एक सांस्कृतीक धक्का बसला होता.
मध्ये मी भूतान ट्रिप ला गेलो होतो त्यात काही शेतकरी कुटुंबातील स्त्रिया होत्या. एक आजी अतिशय उत्साही होत्या वीणा वर्ल्ड बरोबर त्यानी काही टू केल्या होत्या. पारंपारिक पोशाखात कॅटवॉक ही भारी केला होता. त्यांना म्हटले," आता इथे ट्रिपला आला आहात तर एकदा पंजाबी ड्रेस घालून पहा की कोण येतय इथे बघायला?"
आजी म्हणाल्या अजून तेवढ डेअरिंग होत नाही. आपल आपल्यालाच बरं वाटत नाही. मग कशाला घालायचा?
पेईंग गेस्ट हा प्रकार माझ्यासाठी दीर्घकाळ कल्चरल शॉक होता. घरी येणार्‍या पाहुण्याकडून जेवणाखाणाचे राहायचे पैसे घ्यायचे? काही च्या काही. असे कसे असू शकते? अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि पाहुण्यांकडून पैसे घ्यायचे म्हणजे पापच. पेईंग गेस्ट नावाचा एक सिनेमा पण ऐकला आहे. अजून पाहिला नाही.
तुमचेही काही कल्चरल बिल्चरल शॉक असतील ते मांडा कदाचित माझा धागाच काहींसाठी कल्चरल शॉक असू शकतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत क्वचित काही देवळे सोडता, अन्यत्र सर्व देवळात, झाडुन सगळे देव असतात. मग जो आवडतो त्याला पूजा. दुर्गा, शंकर, कृष्ण राधा, गणपती, कार्तिकेय, साईबाबा, कामाक्षी, राम - सीता, नवग्रहांपासून ते क्वचित दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ सुद्धा हजर असतात.
मला हे फारसे आवडलेले नव्हते.
-------------------------
अजुन एक वेस्टर्न टॉयलेट म्हणजे अगदी नकोसे वाटे पूर्वी नंतर मग फ्लशेबल वाईप्सचा शोध लागला व आता इंडियन जमणार नाही असो. टी एम आय.

मी पहिल्यांदा सॅम्टा बार्बाराला मुली कडे गेलो तेव्हा ती मला दुपारी बीच वर ङेऊन गेली.... मीच हाफ बॅन्ट आणि बनियन मध्ये मोस्ट कव्हर्ड होतो... आजूबाजूला नथिंग लेफ्ट टु इमॅजिनेशन असा प्रकार होता...... मी ओशाळलेला पाहून मुलगी म्हणाली... इट्स ओके पा
......