पूर्वभाग
मीडिया आणि वरिष्ठांचा वाढता दबाव पाहता देशमुख इरावर कडक चौकशी करण्याचा निर्णय घेतात. इरा काहीही कबूल करत नाही, पण तिची भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसू लागते. तिचं मौनच पोलिसांना खात्री देतं की तपास योग्य दिशेने चालला आहे आणि लपलेलं सत्य आता उघड होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तपास पुढे जात असताना देशमुखांना रियाच्या लॅपटॉपमधून मोईत्रा कुटुंबाच्या ट्रस्ट आणि मोठ्या मालमत्तेबद्दल महत्त्वाचे दस्तऐवज सापडतात. या ट्रस्टनुसार संपूर्ण संपत्तीचा कायदेशीर वारसा रियाकडे जाणार होता आणि इराला त्यातून काहीही मिळणार नव्हतं. रियाला हे सत्य समजल्यावर ती वकिलाशी संपर्क करून ट्रस्टवर नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत होती. त्यामुळे स्पष्ट होतं की कारमध्ये झालेलं भांडण केवळ नातेसंबंधांमुळे नव्हतं, तर संपत्ती, प्रतिष्ठा आणि नियंत्रणाच्या संघर्षातून खुनामागचा खरा हेतू उघड झाला होता.रियासोबत झालेल्या झटापटीत अपघात घडल्यानंतर घाबरलेल्या इराने मदत करण्याऐवजी गुन्हा लपवण्याचा निर्णय घेतल्याचं ती मान्य करते. या कबुलीजबाबामुळे तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचतो आणि प्रकरण न्यायालयीन लढाईकडे वळतं.
*************************************************************************************************************************
भाग १३ - न्यायालयातील सामना
मुंबई सत्र न्यायालयाची ती जुनाट दगडी इमारत त्या सकाळी नेहमीपेक्षा वेगळीच भासत होती. ब्रिटिशकालीन वास्तुशैलीत बांधलेली ती इमारत नेहमीच गंभीर आणि शांत दिसायची; पण आज तिच्या पायऱ्यांवर असामान्य हालचाल होती. न्यायालयाच्या उंच कमानीखाली येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या पावलांचा आवाज, पोलिसांच्या वर्दीची हालचाल, आणि पत्रकारांच्या गडबडीने संपूर्ण परिसर एका अदृश्य ताणाने भरून गेला होता.
सकाळचे साडेनऊ वाजले होते. साधारणपणे या वेळी न्यायालयाचा परिसर हळूहळू जागा होऊ लागतो—वकील फाईल्स हातात घेऊन येतात, क्लर्क कागदपत्रे नीट लावत बसतात, आणि चहाच्या टपरीवर पहिल्या गप्पा रंगायला लागतात. पण आज वातावरण वेगळंच होतं. न्यायालयाच्या पायऱ्यांवर आधीच पत्रकारांची गर्दी जमली होती. काहीजण कॅमेऱ्यांसमोर उभे राहून आपापल्या चॅनेलसाठी थेट प्रसारण करत होते, तर काहीजण मोबाईलवरून संपादकांशी घाईघाईने बोलत होते.
रस्त्याच्या कडेला न्यूज चॅनेलच्या मोठ्या ओबी व्हॅन्सची रांग लागली होती. त्यांच्या छतावर उंच अँटेना उभारलेले होते. त्या व्हॅन्समधून बाहेर आलेल्या जाडजूड केबल्स पायऱ्यांपर्यंत ओढलेल्या होत्या. प्रत्येक चॅनेल आपापल्या जागेवरून सर्वोत्तम फ्रेम मिळवण्यासाठी धडपडत होतं. मायक्रोफोनवर वेगवेगळ्या चॅनेलची रंगीत चिन्हं चमकत होती—कुणाचं लाल, कुणाचं निळं, कुणाचं पिवळं. कॅमेऱ्यांच्या लेन्सेस न्यायालयाच्या मुख्य दरवाज्याकडे रोखलेल्या होत्या.
“रिया मोईत्रा केसचा आज निर्णायक दिवस…”एका रिपोर्टरचा आवाज थेट प्रसारणात घुमत होता.
“आरोपी इरा मोईत्रा आज न्यायालयात हजर होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे…”
त्याच्या बाजूला उभा असलेला कॅमेरामन फ्रेम नीट करत होता. दुसऱ्या चॅनेलची रिपोर्टर थोड्या अंतरावर उभी राहून मोबाईलवर नोट्स तपासत होती. तिने पटकन केसचे मुद्दे पुन्हा एकदा डोळ्यांखालून घातले—बेपत्ता तक्रार, जंगलात सापडलेले अवशेष, नातेसंबंधातील धक्कादायक सत्य, आणि अखेर आरोपीचा कबुलीजबाब.
काही पत्रकार नोटपॅडवर मुद्दे लिहून ठेवत होते. कोणीतरी आधीच हेडलाईन तयार करून ठेवली होती—
“बहिण की खुनी?”
तर दुसऱ्याच्या वहीत मोठ्या अक्षरात लिहिलं होतं—
“मोईत्रा केस: आज सत्यावर शिक्कामोर्तब?”
न्यायालयाच्या गेटजवळ पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला होता. काही पोलीस गर्दीला मागे ठेवण्याचा प्रयत्न करत होते, तर काहींची नजर सतत रस्त्याकडे होती—कारण आरोपीला घेऊन येणारी गाडी कधीही येऊ शकत होती.
संपूर्ण परिसरात एकच भावना पसरली होती—उत्सुकता आणि ताण यांचं विचित्र मिश्रण.
या केसने गेल्या काही आठवड्यांत शहराचं लक्ष वेधलं होतं.
एक उच्चभ्रू कुटुंब.
एक लपवलेलं नातं.
एक मृतदेह.
आणि एक आई… जी प्रत्यक्षात बहिण होती.
लोकांना सत्यापेक्षा कथा जास्त रोचक वाटत होती.
तेवढ्यात न्यायालयाच्या गेटबाहेर हलकासा गोंधळ झाला.
काही पत्रकारांनी एकदम आपले कॅमेरे उचलले. काहीजण पायऱ्यांवरून खाली उतरले. सगळ्यांची नजर रस्त्याकडे वळली.
एक पांढरी पोलिसांची गाडी हळूहळू न्यायालयाच्या गेटमधून आत शिरत होती.
गाडीचा वेग जाणीवपूर्वक कमी ठेवलेला होता. जणू त्या काही सेकंदांतच सगळं लक्ष त्या गाडीभोवती एकवटलं होतं. कॅमेऱ्यांच्या लेन्सेस एकामागोमाग त्या दिशेने वळल्या.
गाडी पायऱ्यांपाशी येऊन थांबली. क्षणभर वातावरणात ताण निर्माण झाला.
मग पुढचा दरवाजा उघडला. एक पोलीस अधिकारी खाली उतरला. त्याने सभोवतालची परिस्थिती एकदा पाहिली. पत्रकारांची गर्दी आधीच पुढे सरकू लागली होती.
मग मागचा दरवाजा उघडला. आतून इरा मोईत्रा बाहेर आली.
तिच्या दोन्ही बाजूंनी दोन पोलीस उभे राहिले.
ती गाडीतून खाली उतरताच कॅमेऱ्यांचे फ्लॅश एकामागोमाग चमकू लागले. त्या तेजस्वी प्रकाशामुळे काही क्षण तिच्या चेहऱ्यावर झगमगाट पसरला.
“मॅडम! मॅडम! एक मिनिट—”
“तुम्ही गुन्हा मान्य करता का?”
“रिया मोईत्राच्या मृत्यूबद्दल काही सांगाल का?”
“तो अपघात होता का खून?”
प्रश्न एकमेकांवर आदळत हवेत झेपावत होते.
काही पत्रकार मायक्रोफोन पुढे करत होते. काहीजण जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांना थोडं मागे ढकलत मार्ग मोकळा करावा लागत होता.
त्या गोंधळात इरा मात्र पूर्ण शांत दिसत होती.
तिने एकदाही पत्रकारांकडे पाहिलं नाही.
तिचा चेहरा निर्विकार होता.
ना राग.
ना घाबरलेपणा.
ना बचाव करण्याची धडपड.
जणू ती आधीच ठरवून आली होती की या सगळ्या आवाजांना उत्तर देण्याची आता गरज उरलेली नाही.
ती फक्त हळूहळू पायऱ्या चढू लागली.
पोलिस तिच्या भोवती होते. पत्रकार अजूनही प्रश्न विचारत होते. कॅमेरे अजूनही तिच्यावर रोखलेले होते.
पण त्या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी ती एकटीच शांत वाटत होती.
तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र निर्विकार शांतता होती.
कोर्टरूम क्रमांक ३.
न्यायालयाच्या जुन्या कॉरिडॉरमधून चालत आत येताच त्या खोलीतलं वातावरण लगेच जाणवत होतं. आत आधीच बरीच गर्दी झाली होती. लाकडी दरवाजातून आत येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा एक क्षण आरोपींच्या बाकाकडे वळत होत्या, जणू सगळेच त्या क्षणाची वाट पाहत होते ज्या क्षणी सुनावणी सुरू होईल.
जुन्या लाकडी बाकांवर पत्रकार, वकील आणि काही उत्सुक प्रेक्षक बसले होते. काही पत्रकारांनी आधीच आपले नोटपॅड उघडले होते. काही मोबाईलवर मागील बातम्या पुन्हा तपासत होते. कुणीतरी हळू आवाजात सहकाऱ्याशी केसचे तपशील पुन्हा सांगत होता—बेपत्ता तक्रार, जंगलात सापडलेले अवशेष, आणि त्या नातेसंबंधामागचं धक्कादायक सत्य.
छतावर मोठे लोखंडी पंखे फिरत होते. त्यांच्या सततच्या घरघर आवाजाने खोलीत एक मंद लय निर्माण झाली होती. जुन्या कागदांचा आणि पॉलिश केलेल्या लाकडाचा विशिष्ट वास हवेत पसरला होता—तो वास न्यायालयाच्या इमारतीचा अविभाज्य भाग वाटत होता, जणू या भिंतींनी असंख्य प्रकरणांची साक्ष दिली होती.
समोर उंच व्यासपीठावर न्यायाधीशांची मोठी खुर्ची ठेवलेली होती. तिच्या मागे राष्ट्रीय चिन्ह कोरलेलं होतं, आणि त्या चिन्हाखाली बसणाऱ्या न्यायाधीशांच्या निर्णयावरच आजच्या दिवसाचा शेवट अवलंबून होता.
डाव्या बाजूला सरकारी वकिलांची टेबलं लावलेली होती. त्यावर नीट रचलेल्या फाईल्स, नोट्स आणि कागदांचा ढीग दिसत होता. सरकारी वकील आपल्या कागदांवर शेवटची नजर टाकत होते. त्यांचा चेहरा शांत होता, पण त्यांची बोटं फाईलच्या कडांवर हलकेच टकटक करत होती—जणू मनात युक्तिवादांची मांडणी चालू होती.
उजव्या बाजूला बचाव पक्षाचा वकील बसला होता. तो थोडा मागे रेलून बसला होता, पण त्याच्या नजरा सतत कोर्टरूममधल्या प्रत्येक हालचालीवर होत्या. त्याच्या समोरही कागदांचा ढीग होता—पण त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं, जणू तो एखाद्या खेळाची पुढची चाल विचार करत होता.
बाजूला आरोपींचा बाक होता.
तिथे इरा मोईत्रा शांत बसली होती.
तिचे हात मांडीवर स्थिर होते. तिची नजर समोर कुठेतरी स्थिरावलेली होती. जणू त्या खोलीतल्या आवाजांशी तिचा काही संबंधच उरला नव्हता.
कोर्टरूमच्या मागच्या बाजूला, प्रेक्षकांच्या बाकांजवळ, इन्स्पेक्टर देशमुख उभे होते.
त्यांच्या शेजारी कदम उभा होता.
दोघेही शांतपणे संपूर्ण दृश्य पाहत होते.
कदमने हलक्या आवाजात विचारलं—“सर… ताण वाटतोय का?”
देशमुखांनी त्याच्याकडे पाहिलं.
त्यांच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं.
“तपास करताना वाटला नाही… आता कशाला वाटेल?”
कदमही हलकंसं हसला.
पण देशमुखांची नजर पुन्हा कोर्टरूमकडे वळली.
त्या नजरेत गंभीरता होती. कारण त्यांना माहिती होतं—आज फक्त एका केसची सुनावणी नव्हती.
आज त्या तपासाची कसोटी होती ज्यासाठी त्यांनी गेल्या अनेक आठवड्यांत प्रत्येक धागा जोडला होता.
आज न्यायालयात सत्य उभं राहणार होतं. आणि त्या सत्याला पुराव्यांच्या आधारावर टिकून राहावं लागणार होतं.
ऑर्डर!” कोर्टातील शिपायाचा आवाज अचानक खोलीत घुमला.
त्या एका शब्दाने कोर्टरूममधील कुजबुज क्षणात थांबली. मागच्या बाकांवर हलक्या आवाजात बोलणारे पत्रकारही एकदम शांत झाले. काहीजण घाईघाईने आपापल्या वही बंद करत उभे राहिले.
लाकडी दरवाजा हलकासा उघडला.
न्यायाधीश आत आले.
त्यांच्या येण्याबरोबर सगळे उभे राहिले. काही क्षण कोर्टरूममध्ये फक्त पंख्यांचा मंद आवाज ऐकू येत होता. न्यायाधीश आपल्या उंच खुर्चीकडे चालत गेले, बसले, आणि समोर पसरलेल्या फाईल्सकडे एक नजर टाकली.
“बी सीटेड.”
सगळे पुन्हा बसले.
कोर्टरूममध्ये पुन्हा एकदा ताणलेली शांतता पसरली.
सरकारी वकील हळूहळू उभे राहिले.
त्यांनी आपल्या समोरच्या फाईलचा एक कागद सरकवला, चष्मा नीट केला, आणि न्यायाधीशांकडे पाहत म्हणाले— “माय लॉर्ड, आज आपण एका अत्यंत गंभीर प्रकरणाची सुनावणी करत आहोत.”
त्यांचा आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्द स्पष्ट ऐकू येत होता.
“या प्रकरणात आरोपी इरा मोईत्रावर तिच्या बहिणीच्या मृत्यूशी संबंधित महत्त्वाचे पुरावे लपवण्याचा, आणि त्या घटनेनंतर खुनाचा गुन्हा झाकण्याचा आरोप आहे.”
कोर्टरूममधील अनेकांच्या नजरा आरोपींच्या बाकाकडे वळल्या.
इरा मोईत्रा शांत बसली होती.
सरकारी वकील पुढे म्हणाले—“आणि या न्यायालयासमोर आम्ही ते ठोस पुराव्यांच्या आधारे सिद्ध करू.”
कोर्टरूममध्ये पुन्हा हलकी कुजबुज झाली.
तेवढ्यात बचाव पक्षाचा वकील हळूहळू उठला.
त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं.
“माय लॉर्ड,” तो म्हणाला,“सरकारी वकिलांना असं वाटतं की या प्रकरणात खून झाला आहे.”
त्याने एक कटाक्ष इराकडे टाकला.
मग तो शांतपणे पुढे म्हणाला— “पण आम्ही या न्यायालयासमोर सिद्ध करू की ही घटना एक दुर्दैवी अपघात होती.”
कोर्टरूममध्ये पुन्हा कुजबुज उठली.
काही पत्रकारांनी लगेच आपल्या वहीत नोंदी लिहायला सुरुवात केली.
सरकारी वकील पुन्हा पुढे आले.
“माय लॉर्ड, मी पहिला साक्षीदार बोलावतो.”
त्यांनी कोर्टाच्या दरवाज्याकडे पाहत आवाज दिला—
“रमेश शेट्टी.”
दरवाजा उघडला. रमेश आत आला.
तो हळूहळू चालत साक्षीदारांच्या पिंजऱ्याकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट ताण दिसत होता. हात एकमेकांत घट्ट पकडलेले होते. जणू या सगळ्या नजरा त्याच्यावर रोखल्या गेल्या आहेत याची त्याला पूर्ण जाणीव होती.
तो साक्षीदारांच्या पिंजऱ्यात उभा राहिला.
सरकारी वकील पुढे आले.
“तुम्ही आरोपीला ओळखता?” त्यांनी विचारलं.
रमेशने क्षणभर इराकडे पाहिलं.
“…हो.”
“तुम्ही तिचे ड्रायव्हर होता?”
“हो.”
सरकारी वकील शांतपणे पुढचा प्रश्न विचारतात—
“त्या रात्री आरोपीने तुम्हाला फोन केला होता का?”
रमेशने मान हलवली.
“हो.”
कोर्टरूममध्ये काही पत्रकारांनी लगेच हे वाक्य लिहून घेतलं.
सरकारी वकील पुढे झुकले.
“तुम्ही तिथे पोहोचलात तेव्हा काय पाहिलंत?”
रमेश काही क्षण गप्प राहिला.
ओठावरून जीभ फिरवली. जणू तो आठवणींना शब्द देण्याचा प्रयत्न करत होता.
मग तो म्हणाला—“…रिया मॅडम कारमध्ये पडल्या होत्या.”
कोर्टरूममध्ये अचानक शांतता पसरली.
पंख्यांचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागला.
सरकारी वकील पुढचा प्रश्न विचारतात—
“त्या जिवंत होत्या का?”
रमेश थोडा थांबला.
त्याने आवंढा गिळला.
“…हो.”
कोर्टरूममध्ये लगेच कुजबुज सुरू झाली.
काही पत्रकारांनी एकमेकांकडे पाहिलं.
तोच क्षण बचाव पक्षाच्या वकिलाने पकडला.
तो लगेच उठला.
“क्रॉस-एग्झॅमिनेशन, माय लॉर्ड.”
न्यायाधीशांनी मान हलवली.
वकील शांतपणे रमेशकडे चालत गेला.
त्याने काही क्षण त्याच्याकडे निरखून पाहिलं.
मग अचानक विचारलं— “तुम्ही डॉक्टर आहात का?”
रमेश दचकला.
“नाही.”
वकील लगेच पुढे म्हणाला—
“म्हणजे तुम्हाला वैद्यकीय ज्ञान नाही.”
“…नाही.”
तो थोडं हसला.
मग म्हणाला—“म्हणजे त्या जिवंत होत्या हे तुम्ही खात्रीने सांगू शकत नाही.”
रमेश गोंधळला.
त्याच्या कपाळावर घाम दिसू लागला.
तो अडखळत म्हणाला—“…त्या… त्या श्वास घेत होत्या.”
वकील हलकंसं हसला.
“तुम्हाला तसं वाटलं असेल.”
कोर्टरूममध्ये पुन्हा हलकी कुजबुज सुरू झाली.
सरकारी वकील हळूच उभा राहिला. त्याने आपल्या टेबलावरची फाईल बंद केली, चष्मा सरसावला आणि न्यायाधीशांकडे पाहत म्हणाला—“माय लॉर्ड, आम्ही पुढचा साक्षीदार सादर करू इच्छितो.”
कोर्टरूममध्ये क्षणभर कुजबुज झाली. काही पत्रकारांनी पेन तयार ठेवले.
सरकारी वकील स्पष्ट आवाजात म्हणाला—“इन्स्पेक्टर देशमुख.”
मागच्या बाकांवर बसलेले लोक हलकेच वळून पाहू लागले. देशमुख हळूहळू पुढे आले. त्यांच्या चालण्यात घाई नव्हती, पण ठामपणा स्पष्ट दिसत होता. पोलिसांच्या गणवेशावर पडणारा ट्यूबलाईटचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावरील शांत गंभीरता अधिक ठळक करत होता.
ते साक्षीदारांच्या पिंजऱ्यात उभे राहिले.
कोर्टरूममध्ये हलकी हालचाल झाली. काही पत्रकार पुढे झुकले. कारण या संपूर्ण प्रकरणाचा तपास ज्यांनी केला होता, ते आता न्यायालयात प्रत्यक्ष साक्ष देणार होते.
न्यायाधीशांनी त्यांच्याकडे एक नजर टाकली.
सरकारी वकील पुढे आला.
“इन्स्पेक्टर देशमुख, तुम्ही या प्रकरणाचे तपास अधिकारी आहात का?”
देशमुखांनी स्थिर आवाजात उत्तर दिलं—
“हो.”
सरकारी वकील पुढे म्हणाला—
“तुम्ही तपास कधी सुरू केला?”
“रिया मोईत्रा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर.”
“आणि त्या तपासात तुम्हाला काय समजलं?”
देशमुख काही क्षण शांत राहिले. कोर्टरूममध्ये पसरलेली नजर त्यांच्याकडेच रोखलेली होती.
मग ते शांत आवाजात म्हणाले—“तपासादरम्यान आम्हाला समजलं की रिया मोईत्रा तिच्या कुटुंबाच्या भूतकाळाचा शोध घेत होती.”
कोर्टरूममध्ये हलकी कुजबुज झाली.
देशमुख पुढे म्हणाले—“तिने जुने रेकॉर्ड, जन्मनोंदी आणि ट्रस्टशी संबंधित कागदपत्रे शोधायला सुरुवात केली होती.”
सरकारी वकील विचारतो—“कशासाठी?”
देशमुख म्हणाले— “कारण तिला एक महत्त्वाचं सत्य कळलं होतं.”
कोर्टरूममध्ये पुन्हा हलचल झाली.
देशमुख पुढे म्हणाले—“तिला समजलं होतं की मोईत्रा कुटुंबाच्या ट्रस्टची एकमेव वारसदार तीच आहे.”
त्या शब्दांनी कोर्टरूममध्ये कुजबुज वाढली. पत्रकार वेगाने नोट्स लिहू लागले. काहींनी एकमेकांकडे पाहत मान हलवली.
सरकारी वकील थोडा थांबला.
“माय लॉर्ड, इतकंच.”
तो शांतपणे आपल्या जागेवर बसला.
क्षणभर शांतता पसरली.
मग बचाव पक्षाचा वकील हळूहळू उठला.
त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं, आत्मविश्वासपूर्ण स्मित होतं.
तो हळूच पुढे चालत देशमुखांसमोर उभा राहिला.
“क्रॉस-एग्झॅमिनेशन.”
तो शांत आवाजात म्हणाला.
मग त्याने देशमुखांकडे पाहिलं.
“इन्स्पेक्टर…”
तो थोडा थांबला.
“कारमध्ये झटापट झाली होती, हे तुम्ही मान्य करता का?”
देशमुख म्हणाले—
“हो.”
वकील लगेच पुढचा प्रश्न विचारतो—“म्हणजे त्या झटापटीदरम्यान रिया पडली आणि तिचं डोकं आदळलं—हे शक्य आहे?”
कोर्टरूममध्ये पुन्हा कुजबुज सुरू झाली.
देशमुखांनी काही क्षण उत्तर दिलं नाही.
मग ते शांतपणे म्हणाले—
“…हो.”
बचाव पक्षाचा वकील हलकंसं हसला. त्याने न्यायाधीशांकडे पाहिलं.
“माय लॉर्ड, माझा मुद्दा इथेच स्पष्ट होतो.”
तो म्हणाला—“ही घटना एक अपघात असू शकते.”
कोर्टरूममध्ये काही लोक मान हलवू लागले.
वकील आत्मविश्वासाने म्हणाला—“म्हणूनच माझ्या क्लायंटवर खुनाचा आरोप करणे चुकीचे आहे.”
तो मागे वळला.
“माय लॉर्ड, माझा मुद्दा संपला.”
त्याने विजयी नजरेने न्यायालयाकडे पाहिलं.
कोर्टरूममध्ये हलकी कुजबुज पसरली.
पण त्या क्षणी देशमुख अचानक पुढे झुकले.
त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात एक धार होती.
“पण…”
कोर्टरूम एकदम शांत झाली.
बचाव पक्षाचा वकील थांबला.
सगळ्यांच्या नजरा पुन्हा देशमुखांकडे वळल्या.
देशमुख हळू आवाजात म्हणाले— “कारमधील धक्का अपघात असू शकतो.”
ते काही क्षण थांबले.
मग त्यांनी पुढचं वाक्य उच्चारलं— “…पण त्यानंतर आरोपीने घेतलेला निर्णय अपघात नव्हता.”
कोर्टरूममध्ये अचानक ताण वाढला. बचाव पक्षाचा वकील भुवया उंचावून त्यांच्याकडे पाहू लागला.
“तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?”
देशमुखांनी शांतपणे उत्तर दिलं— “त्या धक्क्यानंतर रिया अजून जिवंत होती.”
कोर्टरूममध्ये एकदम कुजबुज उसळली. काही पत्रकारांनी डोकं वर उचललं.
देशमुख पुढे म्हणाले— “पण आरोपीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही.”
त्यांचा आवाज आता थोडा कठोर झाला.
“तिने मदत मागितली नाही.”
“तिने पोलिसांना कळवलं नाही.”
ते थोडे पुढे झुकले.
“तिने गाडी जंगलाच्या दिशेने वळवली.”
कोर्टरूममध्ये अचानक पूर्ण शांतता पसरली.
बचाव पक्षाचा वकील काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
देशमुख शेवटचं वाक्य म्हणाले—“आणि त्या निर्णयानेच हा अपघात एका गुन्ह्यात बदलला.”
त्या शब्दांनी—संपूर्ण कोर्टरूम जणू गोठून गेली.
कोर्टरूममध्ये काही क्षणांसाठी जणू काळच थांबला होता.
सरकारी वकिलाचे शब्द अजूनही हवेत तरंगत होते—
“आरोपीचा कबुलीजबाब.”
त्या दोन शब्दांनी संपूर्ण वातावरणाचं स्वरूप बदललं होतं. आतापर्यंत कुजबुजणारी कोर्टरूम अचानक स्तब्ध झाली. छतावर फिरणाऱ्या पंख्याचा एकसुरी आवाज आणि दूर कुठेतरी कागद हलल्याचा क्षीण खसखसाट — एवढंच ऐकू येत होतं.
मागच्या बाकांवर बसलेले पत्रकार एकदम पुढे झुकले. काहींनी घाईघाईने नोटपॅड उघडले. पेनांची टोकं कागदावर तयार थांबली. काहींच्या मोबाईलवर आधीच रेकॉर्डिंग सुरू झालं. कॅमेऱ्यांचे लेन्स हळूच आरोपींच्या बाकाकडे वळले.
कारण सगळ्यांना समजलं होतं—आता केस निर्णायक टप्प्यावर पोहोचली होती.
न्यायाधीशांनी समोरची फाईल उघडली. त्यांनी काही क्षण त्यातील कागदांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच निर्विकार शांतता होती. त्यांनी चष्म्याच्या कडेला हलकंसं हात लावलं आणि मग नजर हळूहळू आरोपींच्या बाकाकडे वळवली.
कोर्टरूममधील प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत होता.
न्यायाधीशांनी शांत, संयत आवाजात विचारलं—“आरोपीला काही सांगायचं आहे का?”
त्या प्रश्नानंतर कोर्टरूममध्ये पुन्हा एकदा पूर्ण शांतता पसरली.
जणू प्रत्येकाने एकाच वेळी श्वास रोखला होता.
मागच्या बाकांवर बसलेले पत्रकार स्थिर झाले. सरकारी वकील हलकासा पुढे झुकून बसला. बचाव पक्षाचा वकील हात छातीसमोर घालून शांतपणे आरोपीकडे पाहत राहिला.
आणि त्या क्षणी—सगळ्यांच्या नजरा एकाच दिशेला वळल्या.
इरा मोईत्रा.
इरा मोईत्रा काही क्षण तशीच स्थिर बसून राहिली.
तिचे हात अजूनही एकमेकांत घट्ट गुंफलेले होते. बोटांच्या सांध्यांवर ताण स्पष्ट दिसत होता. जणू त्या हातांनी आतापर्यंत स्वतःला सावरून धरलं होतं.
तिने हळूहळू डोकं वर केलं.
कोर्टरूममधील प्रत्येक नजर आता तिच्यावर खिळली होती. सरकारी वकील, बचाव पक्षाचा वकील, पत्रकार, मागच्या बाकांवर बसलेले लोक — सगळे तिच्याकडे पाहत होते.
काही क्षण ती काही बोलली नाही.
जणू शब्द शोधत होती.
मग तिच्या ओठांवरून एक छोटंसं उत्तर बाहेर पडलं—
“…हो.”
तिचा आवाज शांत होता. अगदी मंद.
पण त्या शांततेच्या आत एक खोल थकवा होता — अनेक दिवस, कदाचित अनेक वर्षं मनात साचलेल्या ओझ्याचा.
ती पुन्हा काही क्षण गप्प राहिली.
मग ती बोलू लागली.
“त्या रात्री कारमध्ये जे घडलं…”
ती थांबली. तिच्या डोळ्यांसमोर जणू त्या रात्रीचं दृश्य पुन्हा उभं राहिलं.
“…तो अपघात होता.”
कोर्टरूममध्ये हलकी कुजबुज झाली. काही पत्रकारांनी पटकन पेन चालवायला सुरुवात केली.
इरा पुढे म्हणाली—“रिया खूप रागात होती.”
तिच्या आवाजात आता हलकी थरथर होती.
“ती सतत ओरडत होती… माझ्यावर.”
ती काही क्षण थांबली.
“ती म्हणत होती की ती सगळं जगाला सांगणार आहे.”
कोर्टरूममध्ये बसलेले काही लोक एकमेकांकडे पाहू लागले.
इरा पुढे म्हणाली—“तिला सगळं समजलं होतं… आमच्या नात्याबद्दल. माझ्या भूतकाळाबद्दल.”
तिच्या डोळ्यांत पाणी दाटायला लागलं.
“ती म्हणत होती — ‘तू मला आयुष्यभर फसवलंस.’”
इरा हळूच श्वास घेत म्हणाली—
“मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.”
“पण ती ऐकत नव्हती.”
तिने हलकेच डोळे मिटले.
“तिने फोन काढला.”
“ती म्हणाली — ‘मी आत्ता मीडियाला फोन करते.’”
कोर्टरूममध्ये पुन्हा कुजबुज झाली.
इरा पुढे म्हणाली—
“मी तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.”
“आमच्यात झटापट झाली.”
तिच्या आवाजात आता स्पष्ट कंप होता.
“आणि मग…”
ती थांबली.
कोर्टरूममध्ये श्वास रोखल्यासारखी शांतता पसरली.
“…ती मागे फेकली गेली.”
“तिचं डोकं कारच्या दरवाजाच्या धातूच्या कडेला आदळलं.”
कदम मागच्या बाकावर बसून स्तब्ध ऐकत होता. त्याच्या हातातलं पेन कधीच थांबलं होतं.
इरा पुढे म्हणाली—“त्या क्षणी मला वाटलं ती बेशुद्ध झाली आहे.”
ती खाली पाहत होती.
“मी तिचं नाव घेतलं.”
“रिया… रिया…”
तिचा आवाज मंद झाला.
“पण ती हलली नाही.”
ती काही क्षण शांत राहिली.
मग ती पुन्हा म्हणाली—
“पण काही क्षणांनी…”
तिने हळूच डोकं वर केलं.
“…ती अजून श्वास घेत होती.”
कोर्टरूममध्ये हलकी हालचाल झाली. कुणीतरी मागच्या बाजूला खुर्ची हलवली.
इरा पुढे म्हणाली—
“मी घाबरले होते.”
“खूप.”
तिने दोन्ही हात घट्ट पकडले.
“माझ्या डोक्यात त्या क्षणी फक्त एकच विचार फिरत होता.”
ती हळू आवाजात म्हणाली—“…जर ती वाचली तर सगळं संपेल.”
कोर्टरूम पुन्हा शांत झाली.
“माझं आयुष्य.”
“माझं करिअर.”
“माझं नाव.”
तिने डोळे खाली केले.
“मी इतकी वर्षं जे उभं केलं होतं… ते सगळं एका क्षणात कोसळेल.”
ती काही क्षण काही बोलली नाही.
मग ती हळू आवाजात म्हणाली—
“…आणि म्हणून.”
तिने दीर्घ श्वास घेतला.
“…मी निर्णय घेतला.”
सरकारी वकील शांतपणे तिच्याकडे पाहत होता.
इरा पुढे म्हणाली—“मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही.”
त्या शब्दांनी कोर्टरूममध्ये पुन्हा ताण निर्माण झाला. काही पत्रकारांनी एकमेकांकडे पाहिलं.
इरा म्हणाली—“मी रमेशला फोन केला.”
“तो आला तेव्हा…”
ती थोडी थांबली.
“…रिया अजूनही तशीच पडली होती.”
तिने पुढे सांगितलं—
“आणि मग आम्ही गाडी तिथून काढली.”
“शहराच्या बाहेर.”
“जंगलाच्या दिशेने.”
कोर्टरूममध्ये पुन्हा शांतता पसरली.
इरा काही क्षण गप्प राहिली.
मग ती अतिशय मंद आवाजात म्हणाली— “…बाकी तुम्हाला माहित आहे.”
आणि त्या वाक्यानंतर—कोर्टरूममध्ये पुन्हा एकदा खोल, जड शांतता पसरली. न्यायाधीश काही क्षण निर्विकारपणे फाईलकडे पाहत राहिले.
समोर ठेवलेल्या कागदांवर त्यांच्या नजरा फिरत होत्या. कधी एखाद्या ओळीवर थांबत, कधी पुढे सरकत. कोर्टरूममध्ये त्या क्षणी एक वेगळीच शांतता होती—जणू प्रत्येकजण त्या कागदांतून बाहेर पडणाऱ्या निर्णयाची वाट पाहत होता.
काही क्षणांनी त्यांनी हलकेच फाईल बंद केली. मग त्यांनी नजर वर केली आणि सरकारी वकिलाकडे पाहिलं.
त्यांचा आवाज शांत, पण स्पष्ट होता— “अंतिम युक्तिवाद.”
सरकारी वकील हळूहळू उभा राहिला. त्याने आपला कोट नीट केला, टेबलावर ठेवलेली फाईल हलक्याशा हाताने सरकवली आणि न्यायाधीशांकडे पाहत बोलायला सुरुवात केली.
त्याचा आवाज आता आधीपेक्षा अधिक गंभीर होता.
“माय लॉर्ड, या प्रकरणात दोन गोष्टी पूर्णपणे स्पष्ट आहेत.”
कोर्टरूममध्ये पुन्हा एकदा संपूर्ण शांतता पसरली.
तो पुढे म्हणाला—“पहिली गोष्ट — कारमध्ये जे घडलं, तो धक्का… तो एक अपघात असू शकतो.”
तो थोडा थांबला.
त्याच्या शब्दांनी बचाव पक्षाचा वकील हलकासा मान हलवताना दिसला.
पण सरकारी वकील लगेच पुढे म्हणाला—“पण दुसरी गोष्ट—”
त्याने आवाज किंचित ठाम केला.
“आरोपीने त्यानंतर घेतलेला निर्णय अपघात नव्हता.”
कोर्टरूममध्ये बसलेले लोक पुन्हा पुढे झुकले.
सरकारी वकील पुढे म्हणाला—“त्या क्षणी आरोपीसमोर दोन पर्याय होते.”
तो हळू आवाजात, शब्द तोलून बोलत होता.
“पहिला — रियाला हॉस्पिटलमध्ये नेणं.”
“तिचं प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणं.”
तो थोडा थांबला.
मग त्याने दुसरा पर्याय उच्चारला—
“आणि दुसरा — स्वतःचं आयुष्य, स्वतःची प्रतिष्ठा वाचवणं.”
कोर्टरूममध्ये पुन्हा एक जड शांतता पसरली.
सरकारी वकील शांतपणे म्हणाला—
“…आरोपीने दुसरा पर्याय निवडला.”
त्याने हलकेच टेबलावर हात ठेवला.
“माय लॉर्ड, अपघात माणसाच्या हातात नसतो.”
तो पुढे म्हणाला— “पण त्या अपघातानंतर घेतलेला निर्णय—तो माणसाच्या हातात असतो.”
कोर्टरूममध्ये बसलेले काही लोक मान हलवू लागले.
सरकारी वकील शेवटचा वाक्य म्हणाला—“आणि त्या निर्णयानेच हा अपघात गुन्ह्यात बदलला.”
तो शांतपणे आपल्या जागेवर बसला.
कोर्टरूममध्ये काही क्षण पुन्हा शांतता पसरली.
मग बचाव पक्षाचा वकील हळूहळू उठला.
त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं आत्मविश्वासपूर्ण स्मित नव्हतं.
पण त्याचा आवाज अजूनही स्थिर होता.
“माय लॉर्ड, माझ्या क्लायंटने कबुली दिली आहे.”
तो म्हणाला.
“ती लपवत नाही की त्या रात्री तिने चुकीचा निर्णय घेतला.”
तो थोडा पुढे झुकून म्हणाला—“पण आपण हे विसरू नये की त्या क्षणी ती एक घाबरलेली स्त्री होती.”
तो पुढे म्हणाला—“तिच्या डोळ्यांसमोर तिचं आयुष्य कोसळत होतं.”
“तिच्यावर आरोपांचा, भीतीचा आणि घबराटीचा ताण होता.”
त्याने हलकासा हात वर केला.
“हो, तिने चुकीचा निर्णय घेतला.”
“पण त्यामुळे ती खुनी ठरत नाही.”
कोर्टरूममध्ये पुन्हा कुजबुज झाली.
तो शेवटी म्हणाला—“माय लॉर्ड, हा खून नाही.”
“हा एका घाबरलेल्या मनाचा दुर्दैवी परिणाम आहे.”
तो हळूच बसला.
कोर्टरूममध्ये पुन्हा एकदा ताण निर्माण झाला.
सगळ्यांच्या नजरा न्यायाधीशांकडे वळल्या.
न्यायाधीश काही क्षण शांत बसले.
त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता.
मग त्यांनी समोरची फाईल पुन्हा उघडली.
आणि निर्णय वाचायला सुरुवात केली.
“या प्रकरणातील पुरावे, साक्षी आणि आरोपीचा कबुलीजबाब लक्षात घेता—”
कदम मागच्या बाकावर बसून ऐकत होता.
त्याचा श्वास जड झाला होता.
कोर्टरूममध्ये पंख्याचा आवाजही आता जड वाटत होता.
न्यायाधीश पुढे म्हणाले—“न्यायालय या निष्कर्षावर पोहोचते की आरोपीने मदत न करण्याचा आणि गुन्हा लपवण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला.”
कोर्टरूममध्ये एकदम शांतता पसरली.
प्रत्येकजण पुढचं वाक्य ऐकण्यासाठी स्थिर झाला.
न्यायाधीशांनी शेवटी निर्णय उच्चारला—“आरोपी इरा मोईत्रा दोषी ठरवली जाते.”
त्या शब्दांनी कोर्टरूममध्ये हलकी कुजबुज पसरली.
मागच्या बाकांवर बसलेले पत्रकार लगेच नोट्स लिहू लागले. काहींनी मोबाईलवर मेसेज टाइप करायला सुरुवात केली.
आरोपींच्या बाकावर बसलेली इरा मात्र शांत होती.
तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता.
जणू हा निकाल तिला आधीपासूनच माहीत होता.
पोलिसांनी हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला.
ती हळूच उभी राहिली. ती एक क्षण मागे वळली.
कोर्टरूमच्या मागच्या बाजूला उभे असलेले देशमुख तिच्याकडे पाहत होते.
दोघांची नजर क्षणभर भिडली. त्या नजरेत शब्द नव्हते.
ना राग.
ना विजय.
पण एक गोष्ट स्पष्ट होती—सत्य अखेर बाहेर आलं होतं.
कोर्टरूमबाहेर पुन्हा गोंधळ सुरू झाला.
पत्रकार एकमेकांना धडकत बाहेर धावू लागले. कॅमेरे पुन्हा चालू झाले. प्रश्न हवेत उडू लागले.
कदम हळू आवाजात देशमुखांना म्हणाला— “सर… केस संपली.”
देशमुख काही क्षण शांत राहिले.
त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं.
सूर्य हळूहळू पश्चिमेकडे झुकत होता.
मग ते शांतपणे म्हणाले— “…नाही.”
कदमने भुवया उंचावल्या.
देशमुख पुढे म्हणाले— “आज फक्त न्याय झाला.”
ते काही क्षण थांबले.
“…पण त्या रात्रीची किंमत कोणालाच परत मिळणार नाही.”
कोर्टरूमच्या बाहेर मावळत्या सूर्याचा केशरी प्रकाश पसरत होता.
आणि त्या मंद प्रकाशात—
एक कथा अखेर आपल्या शेवटाकडे पोहोचत होती.
लागोपाठ येणारे भाग या कथेला
लागोपाठ येणारे भाग या कथेला अजून वेगवान आणि रोचक करत आहेत.
सगळं डिटेलिंग आवडलं
सगळं डिटेलिंग आवडलं
हा शेवटचा भाग का?
असा गुन्हा।केलेला।माणूस नंतर guilt मध्ये जात असेल।का असे मला वाटते, पण तसे होईल ह्याची खात्री नाहीच