राणमाशीनंतर आपण आता कामकरी माशीबद्दल माहिती घेऊ. (Worker Bee).
पोळ्यात सगळे काम कामकरी माश्या करतात हे ऐकुन होते. पण नेमके काय काम करतात आणि त्यांचा जीवनक्रम कसा असतो हे कळल्यावर माझा जबडा द मास्कमधल्या जिम कॅरेसारखा जमिनीवर पडुन गडाबडा लोळायला लागला.
मुळात मधमाशी हे प्रकरणच थक्क करणारे आहे आणि त्यातल्या कामकरी माश्या तर एकदम जबडापाडू आहेत.
आपण या प्रचंड कामसु माशीचा जन्म कसा होतो ते आधी पाहुया.
आपण आधीच्या भागात पाहिलेय की कोणाला जन्माला घालायचे हे ठरवुन त्याप्रमाणे राणी प्रत्येकाच्या विशिष्ट सेलमध्ये (cell) अंडे घालते. राणी व नरमाशीच्या सेलचा आकार वेगळा असतो, बाकी सगळे सेल कामकरी माश्यांचे. पोळ्यात सगळ्यात जास्त संख्याही त्यांचीच तर असते.
राणीमाशी प्रत्येक सेलमध्ये एक अंडे घालते. शिवणाच्या दोर्याइतके पातळ, दंडगोलाकार, १ ते १.५ मिमी लांब पांढरे अंडे सेलच्या तळाशी उभ्या अवस्थेत असते. सेलच्या बुडाला ते म्युकसने चिकटलेले असते. सर्व अंड्याना तिन दिवस उबायला लागतात. या कालावधीत आत भ्रुणाची वाढ होते. चौथ्या दिवशी अंड्याचे बाह्यआवरण विरघळते आणि पांढर्या रंगाची मोहरीएवढ्या आकाराची वेलांटीकार अळी दिसायला लागते.
अळीला हातपाय वगैरे काही नसते, डोळे नसतात. तिला काहीही काम करायचे नसते. (उदा. जसे फुलपाखराची अळीला स्वतःचे अन्न शोधुन खावे लागते). ती सेलच्या तळाला पडुन असते. तिला खायला घालायचे काम आयामाशी करते (Nurse Bee). कामकरी माशीच्या अळीला सुरवातीचे तिन दिवस मध, आंबलेले पराग व थोडी रॉयल जेली खायला मिळते.
नंतरचे तीन दिवस त्या अळीला वर्कर जेली आणि मध+परागाचे मिश्रण म्हणजे बी ब्रेड खायला मिळतो.
वर्कर जेलीमध्ये प्रोटिन कमी असतात ज्यामुळे माशीचे पुनरुत्पादन करु शकणारे अवयव नीट वाढत नाहीत. रॉयल जेलीत असणारे रॉयलॅक्टिन नावाचे एक प्रोटिन वर्कर जेलीत नसते त्यामुळे कामकरी माशीचे आयुष्य राणीच्या तुलनेत खुपच कमी होते. राणी २-३ वर्षे जगते तर कामकरी माशी साधारण दिड-दोन महिना. रॉयल जेलीची लिपिड लेव्हल खुप जास्त असते ज्यामुळे राणी पोळ्यावर हुकुमत गाजवत राहते, तुलनेत वर्कर जेलीत साखर जास्त असते ज्यामुळे कामकरी माशीला कष्टाची कामे न थकता सतत करत राहणे जमते.
अळीअवस्था साधारण ५-६ दिवस टिकते. हा सर्व वेळ अळी सेलच्या बुडाशी पडुन राहते आणि आयामाशीने वरुन टाकलेले अन्न खात राहते. कित्येकदा आयामाशी स्वतःच्या तोंडातुन थेट अळीच्या तोंडात अन्न देते. अळीची वाढ अतीवेगात होते, इतकी वेगात की तिचा आकार पाच दिवसात १५०० पटीत वाढतो व या वाढीदरम्यान ती किमान पाच वेळा कात टाकते.
वाढता वाढता वाढे, भेदिले सुर्यमंडळा करत सुटलेले हे बाळ जेव्हा त्याच्या सेलमध्ये मावणार नाही इतके वाढते तेव्हा बिल्डर बी सेलचे तोंड मेणाने बंद करते आणि आत अळी स्वतःभोवती कोष विणुन कोषावस्थेत निद्रिस्त होते.
या वेळेपर्यंत प्रत्येकाचा प्रवास सारख्याच दिवसांचा असतो. तीनही प्रकारच्या माश्या साधारण नवव्या दिवशी कोषावस्थेत जातात.
फरक पडतो तो कोषावस्था किती दिवस टिकते याचा. राणीमाशीत कोषावस्था सात दिवस टिकते व ती
अंड्यापासुन सोळाव्या दिवशी जन्माला येते तर कामकरी माशीची कोषावस्था १२ दिवस टिकते व ती अंड्यापासून
एकविसाव्या दिवशी जन्मते आणि नर माशी १५ दिवसांच्या
कोषावस्थेनंतर चोविसाव्या दिवशी जन्मते.
जन्मतःच कामकरी माशी आपल्या नावाला जागत कामाला लागते. माशी जन्माला आल्यापासुन परत निसर्गात विलिन होईपर्यंत पोळ्यात वेगवेगळी कामे करत राहते. कुठली कामे कुठल्या वयात करायची याचे वेळापत्रक आहे आणि हे काटेकोरपणे पाळले जाते. वयाच्या तिसाव्या दिवशी करायचे काम पहिल्या दिवशी करता येत नाही आणि पहिल्या दिवशी करायचे काम तिस दिवस वय असलेली माशी “मलाच सगळे करावे लागते, आताचे यंगस्टर्स काही कामाचे नाहीत” असे बडबडत करत बसत नाही. ज्या वयात जे योजलेय तेच काम प्रत्येकजण करतो. आपण आधी वयानुसार काय कामे होतात ते पाहु आणि नंतर हे असे का हे पाहू.
सफाई माशी (Cleaner Bee) वय १ ते २ दिवस :
जन्म झाला की कामकरी माशी सफाईमाशी म्हणुन काम सुरु करते. ती आधी स्वतःचा जन्म ज्यात झाला तो सेल साफ करते. आतला फाटलेला कोष व सेलवरचे मेणाचे आवरण ती खाऊन साफ करते. सेलमधुन माशी बाहेर पडली की तो सेल पुन्हा अंडे घालायला वापरता येतो. त्यामुळे आधी सेलची सफाई करणे आवश्यक असते.
राणीमाशी प्रत्येक सेलमध्ये जातीने फिरुन सेल्स साफ आहेत का हे सतत पाहात असते. तिच्या मते सेल साफ नसेल तर सफाई माशी तो परत साफ करते. राणीचा ओके स्टँप पडेपर्यंत तिला सेल साफ करावा लागतो. त्यानंतर ती ईतर सेल्स व पोळ्याच्या साफसफाईत भाग घेते.
पोळ्यात सतत जन्म व मृत्यु सुरुच असतात कारण राणी दिवसभर अंडी घालुन नवे जीव जन्माला घालत असते आणि कामकरीचे आयुष्य दिड-दोन महिन्यांचे असल्यामुळे वय झालेल्या माश्या मृत होत असतात. मेलेल्या माश्या पोळ्यातुन काढुन टाकणे, कधी अळ्याही मरतात त्या मेलेल्या अळ्या पोळ्यातुन काढुन टाकणे, इतर काही कचरा आढळल्यास तो काढुन टाकणे इत्यादी कामे सफाई माश्या सतत करत राहतात. माश्यांची लाळ, मेण व वनस्पतीचे भाग वापरुन बनवलेला प्रॉपॉलिस नावाचा चिकट गोंद वापरुन त्या तुटलेले, फाटलेले पोळे दुरूस्त करतात. व्यवस्थित राखलेले निरोगी पोळे म्हणजे त्यातल्या माश्या व राणीचे आरोग्य चांगले. अश्या पोळ्यात जन्मणार्या माश्या जास्त वेळ कार्यरत राहतात आणि राणीही जास्त वर्षे जगते.
तिसर्या दिवशीपासुन माशीच्या डोक्यातुन जेली पाझरायला लागते आणि माशी सफाईचे काम बंद करुन नर्सिंगचे काम सुरु करते.
आया माशी (Nurse Bee) वय ३-१२ दिवस :
तिसर्या दिवसापासुन सफाई माशी आया माशी म्हणुन काम करायला लागते. आया म्हणुन तिचे सगळ्यात महत्वाचे काम असते अळी असलेल्या प्रत्येक सेलमध्ये जातीनुसार सतत खुराक देत राहणे. हे करताना ती एका दिवसात एका सेलला कित्येक भेटी देते. एका निरिक्षणात एका आयाने एका सेलला एका दिवसात पंधराशे वेळा भेट दिलेली आढळलेली आहे. राणीला सतत रॉयल जेली खायला घालणे हे तिचे दुसरे महत्वाचे काम असते.
तिसर्या ते सहाव्या दिवसापर्यंत तिच्या डोक्यावरील ग्रंथीतुन वर्कर जेली पाझरते जे ती कामकरी अळीच्या सेलमध्ये देते. सहा ते बारा दिवसापर्यंत तिच्या ग्रंथीतुन रॉयल जेली पाझरते ज्याचा थोडा हिस्सा नरमाश्यांना मिळतो आणि बराच मोठा हिस्सा राणीला मिळतो. आया माशीच्या डोक्यावर हायपोफॅरिजिअल व मॅंडिब्युलर ह्या दोन ग्रंथी असतात. यातुन जेलीज पाझरतात ज्या ती राणी व इतरांना खायला घालते. आपले डोके ती राणीजवळ नेते आणि राणी जेली ओढुन घेते. बाकी माश्यांसाठी ती आम्बलेले पराग व मध वापरुन बी ब्रेड बनवते व खायला घालते.
याच कालावधीत साधारण सात ते अकरा या दिवसात ती राणीची सेविका (Queen Attendant) म्हणुनही काम पाहते. राणीची व्यक्तीगत सफाई, तिचे जेवणखाण पाहणे वगैरे कामे ती करते. राणीचे फेरोमोन पोळ्यांत पसरवायचे कामही सेविका करते.
साधारण १२ व्या दिवसापर्यंत तिच्या ग्रंथी आटतात आणि आयापण करायचे तिचे काम संपते.
गवंडी बी (Builder Bee): 13 ते १८ दिवस :
या वयोगटातली माशी मध्यमवयीन होणारी समजली जाते.
रॉयल जेली पाझरणार्या ग्रंथी सुकल्या की पोटाखालच्या जागेतुन मेण सुटायला सुरवात होते. मेण सुटणार्या माशीला गवंडी माशी म्हणतात. हे मेण वापरुन गवंडी माशी पोळे मोठे करते, फाटलेल्या किंवा खराब झालेल्या सेल्स दुरुस्त करते आणि इतर माश्यांकडुन मकरंद व पराग घेऊन तो योग्य त्या सेल्समध्ये ठेवते.
साधारण एक किलो मेण तयार करायला एका गवंडी माशीला
कमीत कमी १० किलो मध खावा लागतो. हे माशीच्या जातीप्रमाणे कमीजास्त होते. अर्थात पोळे करायला फार कमी मेण लागते. पुर्ण साइजचे पोळे करायला किलोभर मेण लागेल पण हे सगळे मेण एकच माशी बनवत नाही. असंख्य गवंडी माश्या मिळुन एक पोळे बनवतात.
मेण पोटाच्या खाली असलेल्या आठ ग्रंथींतुन पाझरते. दर बारा तासानी पातळ पोह्यासारखे आठ मेणाचे पापुद्रे या आठ ग्रंथीतुन पाझरतात. पापुद्र्याची लांबी माशीच्या वयावर अवलम्बुन असते. १७-१८ व्या दिवशी सगळ्यात लांब पापुद्रा बाहेर येतो. १९ साव्या दिवसानंतर मेण बनवण्याची क्षमता कमी होते. पण तशीच गरज पडली तर म्हातारी माशीही (म्हणजे ३६ दिवसाची) मेणपापुद्रे बनवायची क्षमता परत विकसित करु शकते.
असे दहा लाख पापुद्रे एकत्र केले तर कुठे एक किलो मेण मिळेल.
माश्या हे मेण तोंडात घेऊन चघळतात. त्यांची लाळ मिसळुन चावताना ऊष्णतेने मेण काम करण्याजोगे होते. ताजे मेण पांढरेशुभ्र असते. त्यात पराग, मध, मकरंद वगैरे साठवणे सुरु झाले की ते पिवळे पडते. जुने पोळे काळे पडते. एकतर त्यावर माश्या सतत चालत असतात. आणि तिन वर्षात त्या मेणात अळ्यांची त्वचा, मेणात रुतलेले कोष वगैरे साठुन मेण काळे पडते.
आपण आधीच्या भागात पाहिलेय की पोळ्याच्या वरच्या भागात पराग, मध वगैरे साठवलेला असतो आणि खालचा भाग ब्रुडसाठी वापरला जातो. फुलांच्या हंगामात पोळे खालुन वाढवले जाते, ब्रुड तिथे शिफ्ट केला जातो आणि वर रिकाम्या झालेल्या जागेत मध साठवला जातो. हंगामात राणी अंडीही भरपुर घालते कारण कामाला भरपुर हात म्हणजे सोंडी, ग्रंथी वगैरे वगैरे हवे असतात 
भरपुर रॉ मटेरिअल येतेय पण पोळे वाढवायला जागा अपुरी पडतेय अशी परिस्थिती ऊद्भवली तर राणी स्वार्मिंग करायचे ठरवते आणि नवी राणी बनवायची क्रिया सुरु होते. गवंडी माशी बाहेर जाऊन नवे पोळे बांधते आणि नवी राणी अंडी द्यायला लागायच्या आधी एक दिवस आधी अर्धी सेना घेऊन जुनी राणी नव्या पोळ्यात जाते.
पेटीत मधमाशीपालन करणार्या मधुपालकांना हंगामात ब्रुड फ्रेमींवर लक्ष ठेवावे लागते. जर क्विन सेल तयार झालेली दिसली तर पुढील धोका ओळखुन तशी तयारी करावी लागते. दुर्लक्ष झाले तर पोळे कधी अर्धे झाले कळणार नाही 
रखवालदार माशी (Guard Bee) वय १८ ते २१ दिवस :
या वयात पोचेपर्यंत माशीचे अर्धे आयुष्य संपलेले असते. शरिराची पुर्ण वाढ झालेली असते. पण अजुन माशी पोळ्याबाहेर पडलेली नसते. ती आता पोळ्याचे बाहेरील शत्रुंपासुन रक्षण करायला सज्ज होते. आपले पुढचे पाय उभे धरुन ती पोळ्याच्या दारात उभी राहते. पोळ्यात प्रवेश करणार्या प्रत्येक माशीचा गंध तपासुन जिचा गंध (फेरोमोन) पोळ्याच्या गंधाशी जुळतो केवळ तिलाच पोळ्यात प्रवेश दिला जातो. जिचा जुळत नाही तिला हाकलले जाते. अशी चुकुन आलेली माशी जर सोबत मकरंद व पराग घेऊन आलेली असेल तर तिला आत घेऊन माल उतरवुन मग हाकलले जाते असेही काही निरीक्षणात आढळले आहे
अशा मुद्दाम आत येणार्यांमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेल्या इतर मधमाश्या व इतर प्रकारच्या माश्या जसे गांधिलमाशी, कुंभारमाशी यांचा समावेश होतो. गंध हीच गुरुकिल्ली. ही जुळली नाही तर प्रवेश बंद. मोठे आक्रमण होतेय असे वाटले तर रखवालदार माशी एक वेगळा गंध सोडुन इतर रखवालदारांना बोलावते. सगळे मिळुन आक्रमकांवर झडप घालुन, त्यांना डंख मारुन किंवा त्यांना गुदमरवुन (Ballying) मारतात. माणसाच्या त्वचेत डंख अडकतो व माशी मरते. इतरांच्या बाबतीत तसे होत नाही. त्यामुळे एक माशी परतपरत डंख मारुन शत्रुंचा नाश करु शकते.
(क्रमशः)
मस्त!
मस्त!
इतकी सुव्यवस्थित नैसर्गिक रचना असणाऱ्या मधमाश्यांच्या समाजाला मानवनिर्मित मधपेटीत कसं काय सामावून जाता येतं, याची उत्सुकता आहे..
Mind blowing!! अतर्क्य
Wowww totally mind blowing!!! अतर्क्य वाटतंय अगदी. किती काम, तेही २१ दिवसांमध्ये!
“मलाच सगळे करावे लागते, आताचे यंगस्टर्स काही कामाचे नाहीत” >> हे वाचल्यानंतर खूप वेळ हसले
मस्त,
मस्त,
खरच थक्क करणारे आहे सारे !
मस्त,
मस्त,
खरच थक्क करणारे आहे सारे !>>>> +१
हा हि भाग छानच
हा हि भाग छानच
खरच थक्क करणारे आहे सारे ! >> सहमत
एवढी गुंतागुंतीची रचना कशी उत्क्रांत झाली असेल असा प्रश्न पडतो.
खरच थक्क करणारे आहे सारे ! >>
खरच थक्क करणारे आहे सारे ! >> सहमत
लेखमालिकाही फारच आवडली हे वे सां न.
अद्भुत जग, खरेच.
अद्भुत जग, खरेच.
अद्भुत , अविश्वसनीय ,
अद्भुत , अविश्वसनीय , चमत्कारीक आहेत मधमाश्या

अद्भुत खरच.
अद्भुत खरच.
मस्त होतेय मालिका.
मित्रांनो प्रतिसादांबद्दल
मित्रांनो प्रतिसादांबद्दल आभार
इतकी सुव्यवस्थित नैसर्गिक रचना असणाऱ्या मधमाश्यांच्या समाजाला मानवनिर्मित मधपेटीत कसं काय सामावून जाता येतं, याची उत्सुकता आहे..>>>>
काही मधमाशा अंधारात राहतात. पेटीत पाळतो त्या सगळ्या अंधारात राहणार्या आहेत. आत अंधार आहे तोवर त्यांना काही त्रास नाही.
अवाढव्य पोळी बांधणार्या माशा उजेडात राहतात. त्यांना पाळायचे धाडस माणुस करत नाही. युक्तीप्रयुक्तीने त्यांचे मध मात्र तो काढुन घेतो. हे करताना कधीकधी त्याच्या प्राणावरही बेतु शकते कारण ह्या उजेडातल्या माशांचा डंख विषारी असतो. आपण पुढे बोलुच या बिषयावर.