सावल्यांच्या जाळ्यात - भाग ९

Submitted by नितनवे on 7 March, 2026 - 12:45

सावल्यांच्या जाळ्यात - भाग ८

पूर्वभाग

देशमुख इराची कडक चौकशी सुरू करतात. चौकशीदरम्यान रिया आणि इरात त्या रात्री कारमध्ये तीव्र वाद झाल्याचे उघड होते; रिया तिच्या भूतकाळाबद्दल चौकशी करत होती आणि सत्य जाणून घेण्याचा हट्ट धरून बसली होती.
दरम्यान सापडलेल्या फोनच्या फॉरेन्सिक तपासातून एक जुना धागा समोर येतो—इराचा माजी ड्रायव्हर रमेश. पोलिस त्याला शोधून काढतात, आणि चौकशीदरम्यान तो कबूल करतो की त्या रात्री इराचा घाईघाईचा फोन आल्यावर तो पेनजवळ गेला होता—पण तो पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. चौकशीत ड्रायव्हर रमेश हळूहळू त्या रात्रीची खरी घटना सांगायला लागतो. कारमध्ये झालेल्या भांडणानंतर रिया गंभीर जखमी झाली होती आणि इराने घाबरून रमेशला मदतीसाठी बोलावले होते. जंगलात नेल्यानंतर रिया अजून जिवंत असल्याचे संकेत मिळतात, तरीही इराने परिस्थिती लपवण्यासाठी टोकाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. या कबुलीमुळे तपासाला निर्णायक वळण मिळते आणि देशमुखांना खात्री पटते की आता सत्य बाहेर येण्याच्या उंबरठ्यावर आहे.
*************************************************************************************************************************

भाग ९ — भूतकाळाची सावली

इंटरोगेशन रूममध्ये पसरलेली ती भयाण शांतता एखाद्या वादळापूर्वीच्या संथपणासारखी होती. छतावरच्या ट्यूबलाईटचा तो पांढरट, निर्जीव प्रकाश खोलीतल्या प्रत्येक गोष्टीला अधिकच गंभीर बनवत होता. टेबलावरच्या फाईल्स, अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास आणि समोर बसलेली इरा मोईत्रा — जणू एखादं तैलचित्र असावं, इतकं सगळं स्थिर होतं.

देशमुख खुर्चीत मागे रेलले होते. ते काहीच बोलत नव्हते. कारण त्यांना ठाऊक होतं — तपास यंत्रणेच्या प्रश्नांपेक्षा माणूस स्वतःच्या मनातल्या शांततेला जास्त घाबरतो.

शेवटी, त्या स्तब्धतेचा भंग करत इरानेच विचारलं, “आणखी काही विचारायचं आहे का, ऑफिसर?”

देशमुखांनी उत्तरासाठी काही सेकंद घेतले. मग अत्यंत धारदार आवाजात विचारलं, “रिया तुमच्या भूतकाळात नेमकं काय शोधत होती, मॅडम?”

इरा सावकाश म्हणाली, “…ती खूप प्रश्न विचारत होती.”

“कशाबद्दल?”

“…माझ्या जुन्या आयुष्याबद्दल. जे मी केव्हाच मागे सोडलं होतं.”

देशमुख काही क्षण शांत बसले होते.

खोलीत ट्यूबलाईटचा किरकिरणारा आवाज आणि कागदांच्या हलक्या सळसळीशिवाय दुसरं काही ऐकू येत नव्हतं.

मग त्यांनी टेबलावरची फाईल उघडली. खूप संथ हालचालीत.

जणू त्या फाईलमध्ये दडलेलं काहीतरी अत्यंत महत्त्वाचं होतं.

कदमची नजर त्या फाईलकडे खिळली होती.

देशमुखांनी आतून एक जुनाट, पिवळसर पडलेला कागद बाहेर काढला.

तो कागद त्यांनी टेबलावर ठेवला. आणि हलक्या हाताने इरासमोर सरकवला.

कागद टेबलावर घासत पुढे सरकताना जो हलका आवाज झाला… तो त्या शांततेत अनैसर्गिकपणे मोठा वाटला.

इराची नजर त्या कागदावर पडली.

पहिल्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर काहीच दिसलं नाही.

पण पुढच्याच क्षणी—तिचा श्वास अडखळला.

जणू कुणीतरी तिच्या छातीवर अचानक दगड ठेवला होता.

देशमुख तिच्याकडे निरखून पाहत होते.

मग त्यांनी शांतपणे म्हटलं—“जन्मनोंद.”

कदमचा पेन हलकासा थांबला.

देशमुख पुढे म्हणाले—“रिया मोईत्रा.”

खोलीत पुन्हा शांतता.

मग त्यांनी कागदावर बोट ठेवलं. “आईचं नाव.”

ते थोडे पुढे झुकले.

आणि प्रत्येक शब्द मुद्दाम हळू उच्चारला—“शुभांगी मोईत्रा.”

कदमची नजर एकदम वर गेली.

इऱाचा चेहरा मात्र अचानक पांढरा पडला होता. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती.

पण तिच्या डोळ्यांतलं घाबरलेपण लपवता येत नव्हतं.

देशमुख आता पूर्णपणे पुढे झुकले होते. त्यांचा आवाज आता मंद… पण अत्यंत धारदार होता.

“म्हणजे…”

ते थोडा विराम घेत म्हणाले—“…तुमची आई.”

तो इराकडे पाहू लागला.

देशमुखांनी पुढचा प्रश्न विचारला—“मग रिया तुमची मुलगी कशी असू शकते?”

हे ऐकताच कदमला अचानक काहीतरी लक्षात आलं. त्याच्या हातातील पेन थांबलं.

क्षणभर—ट्यूबलाईटचा किरकिरणारा आवाज अचानक खूप मोठा वाटू लागला.

इऱाने एक दीर्घ श्वास घेतला.

तिचे खांदे हलकेसे थरथरत होते. तिने नजर खाली झुकवली.

काही क्षण ती काहीच बोलली नाही.

मग इऱाच्या ओठांतून एक मंद कुजबुज बाहेर पडली— “…कारण ते सगळं एक खोटं होतं.”

कदमने आश्चर्याने देशमुखांकडे पाहिलं. देशमुख काही बोलले नाहीत. जणू त्यांना या उत्तराची आधीच पुसटशी कल्पना होती.

ते फक्त इराकडे पाहत राहिले.

मग इरा हळूहळू वर पाहू लागली.

तिच्या चेहऱ्यावर आता थकवा होता… आणि अनेक वर्षं दडवून ठेवलेल्या सत्याचं ओझं.

ती म्हणाली—“रिया माझी मुलगी नव्हती.”

इरा पुढे म्हणाली—

“…ती माझी बहीण होती.”

खोलीत जणू काळच थांबला.

इरा आता भूतकाळाच्या गर्तेत शिरली होती, “मी घर सोडून गेले तेव्हा मी खूप लहान होते. अनेक वर्षांनंतर जेव्हा मी पुन्हा आईकडे गेले, तेव्हा तिला अजून एक मुलगी झाली होती... रिया.”

“पण तुम्ही जगासमोर तिला तुमची मुलगी म्हणून का आणलं?”

इराने एक थंड कटाक्ष टाकला, ““कारण तेव्हा मी माझं नवीन आयुष्य उभं करत होते.”, “नवीन शहर. नवीन ओळखी. नवीन प्रतिष्ठा.”. मला माझं जुनं घर आणि ते आयुष्य जगाला दाखवायचं नव्हतं. म्हणून मी ठरवलं— रिया माझी मुलगी आहे असंच लोकांना कळायला हवं.”

देशमुखांनी आपल्या भुवया उंचावल्या, “म्हणजे इतकी वर्षं तुम्ही एका महाभयंकर खोट्यावर तुमचं साम्राज्य उभं केलं होतं.”

इरा काही बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर आता थकवा आणि पराभवाची सावली स्पष्ट दिसत होती. देशमुख पुन्हा पुढे झुकले, “रियाला हे सगळं कसं कळलं?”

“…ती इंटरनेटवर शोधत होती. जुने रेकॉर्ड्स, शाळेचे कागद, आईच्या नावाच्या नोंदी... आणि शेवटी तिला ते सत्य सापडलंच.”

खोलीत पुन्हा एकदा जड शांतता पसरली. देशमुखांच्या मनात आता चित्र स्पष्ट होत होतं. ही केवळ एका खुनाची केस नव्हती; हे एका अशा खोट्याचं ओझं होतं जे अनेक वर्षांपासून वागवलं जात होतं.

आणि आता, त्या खोट्याच्या ओझ्याखाली नाती चिरडली गेली होती.

खोलीत आता फक्त इराच्या हुंदक्यांचा आणि ट्यूबलाईटच्या किरकिरीचा आवाज येत होता. इराने तिचं सांगणं सुरू ठेवलं, पण आता तिचा आवाज एखाद्या तुटलेल्या तारेसारखा वाटत होता.

“…त्या दिवशी ती वादळासारखी माझ्या ऑफिसमध्ये शिरली. तिच्या हातात ते कागद होते… माझ्या अस्तित्वाचं खोटं उघड पाडणारे ते कागद. तिने ते माझ्या टेबलावर आदळले आणि ओरडली— ‘तू माझी आई नाहीस!’”

इराचे हात टेबलावर थरथरत होते. “मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा राग अनावर होता. ती म्हणाली, ‘इतकी वर्षं तू मला एका फसवणुकीत जगवलंस. जगाला वाटलंच पाहिजे की इरा मोईत्रा एक यशस्वी स्त्री आहे, पण तू तर स्वतःच्या बहिणीलाच स्वतःची मुलगी म्हणून विकलंस. मी आता गप्प बसणार नाही… मी आत्ता, याच क्षणी सगळ्या जगाला तुझं हे काळं सत्य सांगणार आहे!’”

देशमुख काही क्षण गप्प बसले. त्यांनी इराकडे एकटक पाहिलं.

“मग तुम्ही तिला कारमध्ये का नेलंत?” त्यांनी शांतपणे विचारलं.

इरा काही क्षण शून्यात पाहत राहिली. जणू त्या क्षणांच्या आठवणी पुन्हा तिच्यासमोर जिवंत होत होत्या.

“ती ऐकायलाच तयार नव्हती,” ती मंद आवाजात म्हणाली.
“ती म्हणाली— ‘चल, आपण आईकडे जाऊ. तुझ्यासमोर मला तिला जाब विचारायचाय.’”

ती थोडी थांबली.

“त्या क्षणी परिस्थिती इतकी ताणली गेली होती की आम्हाला कारमध्ये बसण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.”

इऱाने हळूच डोळे मिटले.

“पण प्रवास सुरू झाल्यानंतर तिचा राग अजून वाढत गेला.”

ती पुढे म्हणाली— “ती सतत बोलत होती… थांबतच नव्हती. तिच्या आवाजात इतका राग होता की मला वाटत होतं कारच्या बंद जागेत हवा सुद्धा जड झाली आहे.”

इरा म्हणाली— “अचानक तिने माझा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.”

ती हळू आवाजात म्हणाली— “तिला त्या क्षणीच माझ्या आयुष्याची लक्तरं वेशीवर टांगायची होती.”

खोलीत पुन्हा शांतता पसरली.

इरा पुढे म्हणाली— “ती माझ्यावर ओरडत होती— ‘माझं आयुष्य म्हणजे तुझ्यासाठी फक्त एक सोयीचं खोटं होतं का? तुला फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेची चिंता होती, नाही का?’”

देशमुख स्तब्धपणे ऐकत होते.

त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.

खोलीत फक्त इराचा आणि देशमुखांचा जड श्वास ऐकू येत होता.

त्या क्षणी—जणू संपूर्ण खोलीच त्या भूतकाळाच्या भाराखाली दबली होती.

"आणि मग…झटापट वाढली" इराचं वाक्य अचानक अर्धवटच थांबलं.

तिच्या हातांची थरथर आता लपवता येत नव्हती. काही क्षण ती नुसती टेबलाकडे पाहत बसली.

ती पुन्हा बोलायला लागली तेव्हा तिचा आवाज आतून कुठेतरी तुटून येत होता.

“कारमध्ये ती सतत ओरडत होती… थांबतच नव्हती. तिच्या आवाजात राग होता… पण त्याहून जास्त तिरस्कार.”

इरा पुढे म्हणाली—

“तिने फोन काढला आणि म्हणाली— ‘मी आत्ताच मीडियाला फोन करते.’”

ती क्षणभर थांबली.

“त्या एका वाक्याने… माझ्या डोळ्यांसमोर सगळं कोसळलं.”

तिचा श्वास जड झाला.

“माझं करिअर… माझी प्रतिष्ठा… मी वर्षानुवर्षांनी उभं केलेलं सगळं आयुष्य. मला वाटलं, एका क्षणात ते सगळं संपणार आहे.”

इऱाने दोन्ही हात कपाळावर ठेवले.

“मी तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.”

ती कुजबुजली.

“पण ती अजूनच भडकली. ती माझ्यावर ओरडत होती… म्हणत होती—‘तू मला आयुष्यभर खोटं सांगितलंस!’”

खोलीत फक्त इराचा जड श्वास ऐकू येत होता.

इराचे डोळे पाणावले होते, पण तिच्या आवाजात आता एक भयाण शांतता होती. "ती माझ्याकडे झेपावली… मी फोन पकडायचा प्रयत्न करत होते… आम्ही दोघी झगडत होतो.”

ती थांबली.

मग मंद आवाजात म्हणाली—

“…आणि मग मी तिला ढकललं.”

एक क्षण. फक्त एक क्षण.

“ती मागे फेकली गेली…”

इऱाचा आवाज आता कुजबुजल्यासारखा झाला होता.

“…आणि तिचं डोकं कारच्या दरवाजाच्या त्या धातूच्या पट्टीवर जोरात आदळलं.”

ती डोळे मिटून बसली.

“एक भयानक आवाज झाला.”

खोलीत शांतता पसरली.

“…आणि रिया खाली कोसळली.”

कदमचा श्वास अडकला.

देशमुखांची नजर अजूनही स्थिर होती.

काही क्षण कोणीच हललं नाही.

देशमुखांनी हळू आवाजात विचारलं —“आणि त्यानंतर?”

त्यांचा आवाज शांत होता. पण त्या शांततेतच प्रश्नाची धार होती.

“तुम्ही लगेच मदतीसाठी फोन केला नाहीत?”

इराने हळूहळू मान खाली घातली.

तिचे अश्रू आता थांबत नव्हते.

“नाही.”

ती पुटपुटली.

“तिथेच… तिथेच माझं दुसरं पाप घडलं.”

ती पुढे म्हणाली—

“त्या क्षणी मला रिया दिसत नव्हती.”

ती थांबली.

“मला फक्त माझं आयुष्य दिसत होतं.”

इऱाचा आवाज आता पूर्ण तुटला होता.

“माझं करिअर… माझी प्रतिष्ठा… मी उभं केलेलं सगळं जग.”

ती म्हणाली—

“मला वाटलं… जर मी पोलिसांकडे गेले… तर सत्य बाहेर येईल. आणि त्या सत्यासोबत… माझं आयुष्यही संपेल.”

तिने डोळे मिटले.

“मी घाबरले होते.”

मग ती हळू आवाजात म्हणाली—“मी इतकी स्वार्थी झाले होते… की त्या क्षणी मी रियाला वाचवण्याचा विचारही केला नाही.”

देशमुखांना आता संपूर्ण चित्र स्पष्ट झालं होतं. हा केवळ एक अपघात नव्हता, तर अनेक वर्षं दडवलेल्या सत्याचा हा हिंसक स्फोट होता.

देशमुख सावकाश खुर्चीतून उठले आणि म्हणाले, "आणि म्हणूनच तुम्ही रमेशला फोन केलात."

इराने मान झुकवून कबुली दिली. "हो."

"तिथून पुढे तुम्ही सत्यापेक्षा गुन्ह्याला निवडलंत." देशमुख खिडकीबाहेर पाहत पुटपुटले.

खोलीत पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली. कदमने आपल्या डायरीत काहीतरी नोंदवले, पण त्याचाही हात थरथरत होता.

भूतकाळाची सावली पूर्णपणे बाहेर आली होती.

सावल्यांच्या जाळ्यात - भाग १०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिखाण शैली चांगली आहे तुमची.

मूळ प्रसंगात खरी मुलगी ही बहीण म्हणून सांगण्यात यायचे.
त्यात स्वार्थी वृत्ती दिसते.
पण कथेत बहिण असून मुलगी सांगण्याच्या स्वार्थी फायदा काय आहे?

<<मूळ प्रसंगात खरी मुलगी ही बहीण म्हणून सांगण्यात यायचे.
त्यात स्वार्थी वृत्ती दिसते.
पण कथेत बहिण असून मुलगी सांगण्याच्या स्वार्थी फायदा काय आहे?>> मूळ प्रकरणात नात्यांची एवढी गुंतागुंत आहे कि डोकं चक्रावून जातं. त्यामुळे थोडंसं लेखनस्वातंत्र्य घेऊन विषय सोपा करण्याचा प्रयत्न केलाय.