शिमगा

Submitted by किरण कुमार on 7 March, 2026 - 06:05

"तुम्ही तिकडे जाणार आहात तर आमच्या मयेकर दांपत्याचा नमस्कार आर्यादुर्गा मातेला सांगाल का ?आता प्रवास झेपत नाही हो आम्हाला,देवीचे बोलावणे आले आहे पण शरीर साथ देत नाही"
मोडकळीस आलेल्या जीर्ण वाड्याच्या दारातून एक वृद्ध जोडपे हात जोडून विनवणी करत समोर उभे असलेले कुंदनने स्वप्नात पाहिले आणि त्याने निरोप पोहचवण्याची ग्वाही स्वप्नातच दिली. ते स्वप्न असले तरीही खाडकन जागे झाल्यानंतर हा प्रसंग प्रत्यक्ष समोर घडल्यासारखे त्याला वाटू लागले होते. ऐन उन्हाळ्यात पहाटे पहाटे पडलेले स्वप्न आणि त्याची उडालेली झोप ही कुंदनच्या आजवरच्या आयुष्यात घडलेल्या बऱ्याच आश्चर्यकारक घटनांपैकी एक होती.
गेल्याच आठवड्यात मोटरसायकलवर राजापूरजवळचे भालावली आणि हसोळ हे चिंतामणीचे गाव गाठून दोन मुक्काम करायचे, होळीचे विविध कार्यक्रम बघत आसपास भटकंती करायची असा भन्नाट बेत समूहाने केला होता.याआधीही कुंदन आणि त्याच्या मित्रांनी तिकडच्या भागात भटकंती केली असली तरी या वेळी आर्यादेवीची रात्रीची पालखी आणि होळीचे विविध खेळ हे आकर्षण असणार होते. दिवस उजाडल्यावर सर्वांनी पुण्यातून आपल्या मोटारसायकल बाहेर काढून वाऱ्याशी स्पर्धा सुरु केली. दिवसभरात जेवणासाठी जेमेतेम तासभर थांबा घेऊन सर्व मंडळी थेट राजापूर जवळच्या भालावली गावात पोहचली. गौरवच्या गाडीचा टायर पंचर सोडला तर दिवसभरात बाईक राईड छान झाली होती. प्रवासाने थकलेली मंडळी आता चिंतामणीच्या घराबाहेर चटईवरच पाठ टेकवून पहूडली होती. कुंदन,चिंतामणी, वैभव, गौरव, अभिजीत हे तसे पूर्वी ट्रेकींगच्या निमित्ताने एकत्र आले होते. आता बाईक रायडींगचे वेड सुरू झाल्यापासून त्यांनी बऱ्याच राइड एकत्र केल्या होत्या.सर्वजण स्वभावाने मनमिळावू होते. त्यातल्या त्यात अभिजित जरा वांड होता.आजच्या रात्री आराम करुन उद्याच्या होळी पौर्णिमेसाठी मंडळी सज्ज झाली होती.
कोकणातल्या शिमग्याच्या प्रथा घाटावरच्या संस्कृतीपेक्षा खूपच वेगळ्या आहेत हे सर्वांना चिंतामणीने आधीच सांगितले होते.दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर घरोघरी खेळ करणारी मंडळी येऊ लागली. यांचा खेळ म्हणजे पारंपारिक वेषभूषा करुन तालासुरात ठराविक गाणी म्हणत ठेका धरत सामुहीक नृत्य करणे असेच काहीतरी होते. सोबत पारंपारिक वाद्य आणि सनईच्या सुरांनी मधुर नाद उत्पन्न होत होता. गाण्याचे अर्थ तसे कुणालाच कळत नसले तरी ते कानाला फारच छान वाटत होते. डोक्यावर विशिष्ट आकाराची टोपी किंवा फेटा, अंगावर रंगबिरंगी लांबलचक सदर, धोतर आणि अनवाणी पाय असा त्या खेळ करणाऱ्या मंडळींचा पेहराव होता. त्यातला एक जण शंकासुर झाला होता. डोक्यावर शंकूच्या आकाराचा आकाराचा टोप, अंगभर काळाकुट्ट झब्बा घातलेला चांगला सहा फूटी उंचीचा एक सडपातळ इसम आजूबाजूच्या लहान पोरांना घाबरावयाचे काम अत्यंत चोख पार पाडत होता. खरे तर त्याला पाहून कुंदन आणि त्याचे मित्रही जरा दचकले होते. त्याने कुंदनच्याही खांद्यावर हात ठेवून असुरासारखे हा.. हा..हा..असे हास्यही केले होते.भूताखेतावार विश्वास ठेवणारा गौरव तर आधीच घाबरला होता. तो शंकासूर नेमका गौरवच्या जवळ गेला आणि त्याच्या कानात काहीतरी पुट्पुटला तसा गौरवला घाम फूटला.

"चला इथून, मला नाही थांबायचे इथे" गौरवने बाहेर येऊन थेट चप्पल घातली तसे इतरांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.
"काय झाले रे?.....काय म्हणाला शंकासुर ?" अभिजीतने हसत मोठ्या आवाजात विचारले तसा गौरव अजून चिडला
"मी निघालो मंदिरात, तुम्हाला यायचे तर या. मला इथे अजिबात थांबायचे नाही"
गौरवचे एकंदरीत वागणे पाहून काहीतरी गंभीर गोष्ट घडल्याची जाणीव सर्वांना झाली आणि ते गौरवच्या मागे चालू लागले. अभिजीतने मात्र पुन्हा एकदा गौरवला डिवचले " अरे काय झाले ? शंकासुराने कान चावला का काय तुझा"
"नंतर सांगतो, पहिले देवळात चला" गौरवने पावलांचा वेग वाढवला. इतरांनी तो विषय तिथेच सोडला आणि मंदिराच्या दिशेने प्रयाण केले. मंदिर तसे चांगले तासभर डोंगर चढल्यानंतर दिसू लागले तोपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच राहिल्या. गौरव मात्र शांतच होता त्याच्या अंगात जणू शंकासुर शिरुन त्याने मौन घारण केले होते.मंदिर जवळ येताच गौरव धावत आत शिरला आणि थेट आर्यादेवीच्या पायावर त्याने माथा टेकविला. बराच वेळ तो तिथेच घूटमळत होता.
कुंदन आणि बाकी मंडळी मंदिरात जाण्याआधी पाय धुवावे असे ठरवून शेजारच्या खोल विहिरीजवळ गेले. कोणीतरी दोन तीन बादल्या पाणी तिथे भरुन ठेवलेले त्यांना आढळल्याने त्यांनी तेच पाणी वापरले. हात पाय धुताना कुंदनची नजर सहज समोरच्या एका पडक्या वाड्याकडे गेली आणि तो मोठ्याने ओरडला " आयच्या गावात........."
सकाळी स्वप्नात बघितलेला वाडा हाच आहे याची खात्री झाल्याने तो गोंधळला. लांब गेलेल्या चिंत्याला त्याने हाक मारली आणि जवळ बोलावून घेतले. " चिंत्या, इथे मयेकर रहायचे का रे?
"हो रहायचे की.... पण जवळपास पंधरा- वीस वर्षापूर्वी, देवीची पूजा तेच करायचे आधी, मोठे भक्त होते" चिंतामंणी बोलत होता.
" पण तुला रे कसे माहीत, आला होतास का कधी इकडे"
"छ्या, मी कसला येतोय, पहिल्यांदाच आलो आहे या देवीहसोळ आणि भालावली गावात, अरे मला स्वप्न पडले होते आज पहाटे.... त्यात हा वाडा दिसला होता, मयेकर म्हातारा म्हातारीपण"
त्यांच्यामागे उभा राहिलेला अभिजीत अजूनही टिंगल करायच्या मूडमध्ये होता. " झालं, त्या गौऱ्याला शंकासुर झपाटला आणि तुला मयेकर.. चल चल.... काहीही शेंड्या लावू नकोस"

सहज कुणाचा विश्वास बसणार नाही हे कुंदनला अपेक्षित होते मात्र कुंदनने पोटतिडकीने त्या स्वप्नाचे वर्णन केले, मयेकर दांपत्य कसे होते याचेही वर्णन केल्याने चिंतामणीला मोठे आश्चर्य वाटले. पंधरा वीस वर्षापुर्वी हे मयेकर कुटुंब इथून गेले होते. ते आता कुठे आहेत?काय करत आहेत हे गावातल्या लोकांनाही सांगता येणार नाही अशी खात्री चिंतामणीला होती. तो वाडा तसाही कर्जातच विकला गेला होता पण मयेकर देवीचा मोठा भक्त असल्याने असे काहीतरी घडले आणि देवीला नमस्कार पोहचवायला कुंदनला सांगितले असेल असे आता चिंतामणीला वाटले. देवीच्या बाबतीत अनेकांना असे अनुभव आल्याचे त्याच्या ऐकण्यात आले होते. प्रथमच एखाद्या ओसाड गावात आलेला अभिजित मात्र हे सारे फक्त ऐकत होता त्याला त्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता वाटली नव्हती.
गोष्ट तशी गंभीर वाटत होती. पुढचा काही वेळ सर्वजण शांत झाले होते. सर्वजण मंदिरात शिरले. कुंदनला तिथे उगाचच गहिवरुन आल्यासारखे झाले होते. डोळे भरुन त्याने देवीची मूर्ती पाहिली. हात जोडले आणि
"हे आर्यादुर्गा देवी,मयेकर कुळ तुका नमस्कार करता" असे तो डोळे झाकून मोठ्याने म्हणाला. मराठवाड्याच्या दुष्काळी भागात वाढलेल्या कुंदनच्या तोंडून कोकणी स्वरातले ते उद्गार चिंतामणीला भलतेच आश्चर्यकारक वाटले. मात्र कुंदन साहित्यिक असल्याने त्याने कोकणातील साहित्यही वाचले असेल त्यातून असे काही बोलण्याचे सुचले असेल असे समजून चिंतामणी शांत बसला.
बाजूच्या पिंपळावर पानांची जोरदार सळसळ झाली.एक हलकी थंड वाऱ्याची झुळूक कुंदनला स्पशून गेली.
गौरव अजूनही देवीच्या पायाजवळच ध्यान लावून शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही भीती जाणवत होती. बाकीच्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि सर्वजण एकत्र बाहेर पडले. गौरव आता हळूहळू भानावर आला होता.
तो बोलू लागला शंकसुराने
" तुमची वेळ लागी पावला. बेगीन वचून देवीचे आशीर्वाद माग, फकत तीच तुका वाचयतली." असे सांगितल्यामुळे तो काही काळ बिथरला होता. काल बाईकवर येताना त्याच्या गाडीचा टायर अचानक पंचर झाला तरीही गाडी कुठेही न घसरता थोड्या अंतरावर जाऊन थांबली होती, एवढ्या वेगात असूनही गाडीला आणि त्याला काहीही झाले नाही ही त्या देवीचीच कॄपा होती असे गौरवला वाटले होते. गौरव शांत झाला असला तरी त्याला ठीकठिकाणी शंकासुर दिसू लागला होता. अध्येमध्ये तो आमच्यातल्या सहा फूट उंचीच्या वैभवला शंकासुर म्हणू लागला होता.
एव्हाना उन्ह उतरुन पौर्णिमेच्या चंद्राचा पुसट गोल आकाशात दिसू लागला होता. उंच झाडावर धनेश पक्ष्याची जोडी डोलीतून चोच बाहेर काढत टकटक आवाज करत होती. डोंगर उतारावरून येताना आचरेकराच्या अंगणात सकाळची खेळ करणारी मंडळी पुन्हा दिसली. तसा सगळा चमू तिकडे वळाला. त्यांच्यात शंकासुर मात्र दिसत नव्हता. चिंतामणीच्या ओळखीचे काही लोक तिथे भेटले तसे त्याने विचारले
"आण्णा सकाळचो शंकासुर खयं गेलो?"
आण्णा उत्तरले " तो अजितचा पूत... त्यो आपल्या हॉटेलांत गेल्लो आसतला. सांजवेळावर थंय खूब गिरायक आसतात, त्याचा धंदो कसो नाश करुं येतालो"
"त्याला भविष्य कळते का? सकाळी ह्याला काहीतरी सांगितले त्याने आणि घाबरवून सोडले" अभिजीत तसाही शांत बसणारा नव्हता त्याने पुढचा प्रश्न टाकला तसा आण्णा जोरजोरात हसला
" ताचो फुडार कसो आसा तें ताका खबर आसता? नव्या मनशांची फकाणा करता. तांतूतले खंयचेंच एकूय खरें नाय"
चिंतामणीने बाकीच्यांना अर्थ समजावत सांगितले "अरे काही कळत नाही त्याला.. नवीन माणूस दिसला की चेष्टा करतो. बाकी लोकं त्याला सिरिअसली घेत नाहीत, चला जाऊ घराकडे.. उगा डोक्याला शॉट.. आज पौणिमेच्या चंद्रात या कवी कुंदनच्या कविता ऐकू, पहाटे पहाटे देवीच्या पालखीला जाऊ"
सर्वजण हसत हसत घराकडे आले. संध्याकाळी चांदव्यात कवी कुंदन सुरु झाला
" कवितेचे शीर्षक आहे .. मयेकरांच्या वाड्यातला शंकासुर"
पुन्हा हास्यकल्लोळ सुरू झाला. गप्पा टप्पा करत शेजारच्या घरगुती खानावळीत झालेले पोटभर जेवण आणि मग चांदव्यात पडवीतच सारी मंडळी झोपायला आली. दिवसभर तसे फारसे श्रम झाले नसले तरी कुंदन सोडून सगळेच गाढ झोपले. कुंदनच्या डोक्यातून मयेकरांचा वाडा आणि मयेकर काय जात नव्हते. देवीच्या पुढे उभे राहिल्यानंतर काही काळ भान हरपल्याचे त्याला जाणवले होते.कोणतीतरी अदृश्य शक्ती त्याच्या आसपास फिरल्याची जाणीव त्याला दिवभरात खूप वेळा झाली होती. मयेकरांनी मलाच का निवडलं असेल? मी इथे येणार हे त्यांना कोणी सांगितले असेल आणि मयेकर सध्या कुठे आहेत काय करत आहेत असे एक ना अनेक प्रश्न त्याला कुशी बदलून विचार करायला भाग पाडत होते. कशीबशी त्याला उशीरा झोप लागली. पहाटे पहाटे ताशा, झांज, टाळ यांचा गजर गावभर घुमला. देवीची पालखी गावातून डोंगरावर मंदिरात जाणार होती. कुंदन आणि बाकी चमू हात पाय तोंड धुवून गर्दीत मिसळला. नेहमीपेक्षा मोठा आणि जरासा तांबूस झालेल्या चंद्राच्या साक्षीने पालखी मानाच्या लोकांच्या खांद्यावरुन निघाली. पालखीची प्रथा अनेक वर्षापासून चालत आली होती त्यामुळे यंदाही गाववाल्यांनी लोकवर्गणीतून आणि लोकश्रमातून पालखी मार्ग स्वच्छ केला होता.भक्तिमय वातावरणात पालखी मंदिराजवळ पोहचली.कुंदन त्याच्या मित्रांपासून कधीच वेगळा झाला होता. पालखीचा मान असणाऱ्या मोजक्या गावकऱ्यासोबत त्याला गाभाऱ्यात जाण्यापासून कोणीच रोखले कसे नव्हते हे ही नवलच. पालखीचे सर्व काही विधी एकामागे एक पार पडले. गाभाऱ्यात देवीला कुंदनसह सर्वांनी दंडवत घातला. सूर्य उगवायच्या वेळी मंदिरातील खेळ सुरु झाले. या वेळी दशावतारातील काही भाग, एकपात्री प्रयोग, काल पाहिल्यासारखे मधुर वाद्यासह सामुहीक नृत्य आणि गायन असे भन्नाट प्रकार कुंदन आणि त्याच्या मित्रांना प्रत्यक्ष बघता आले.म्हणता म्हणता कोकणातील शिमगा पार पडला. उरलेला दिवस गावाबाहेरच्या नेहमी तुडुंब भरुन असलेल्या डोहात मस्ती करण्यात सर्वांनी घालवला. संध्याकाळी थोडा श्रमपरिहार आणि जंगलाच्या रस्त्यावर चालणे झाले. रात्री सर्वजण गाढ झोपले.
तिसऱ्या दिवशी पहाटेच सर्वांनी मोटारसायकल काढल्या आणि नऊ तास रायडींग करत पुणे गाठले.एकमेकांना निरोप देत प्रत्येकाने आपले घर गाठले.कुंदन आपल्या घरात शिरताच हातपाय धुवून सोफ्यावर मांडी घालून बसला. खिडकीतून येणारा वारा समोर ठेवलेल्या वर्तमानपत्राचे वरचे पान उडवत होता. गेली तीन दिवस त्याने वर्तमानपत्र वाचले नव्हते. कितीही जुने असले तरीही त्याचे वाचून झाल्याशिवाय वर्तमानपत्र रद्दीत टाकायचे नाही ही त्याची घरी ताकीद असल्याने गेल्या तीनही दिवसांचे वर्तमानपत्र त्याला समोरच्या टिव्हीच्या शेजारी दिसले. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या कुंदनने आज मात्र सर्व वर्तमानपत्र वरवर चाळायचे ठरवले होते. तीन पाने पलटून झाली आणि वरच्या एका बातमीने तो अस्वस्थ झाला. ज्या दिवशी तो राजापूरला निघाला त्याच दिवासाचे ते वर्तमानपत्र होते बातमी होती
" मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघातात मयेकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू"
स्वप्नात पाहिलेले वृध्द जोडपे आणि बातमीतील फोटोमध्ये दिलेले दोन चेहरे अगदीच सारखे वाटत नव्हते. आपल्याबरोबर घडलेल्या प्रसंगांचा या बातमीशी थेट सबंध असावा असे त्याला मनोमन वाटत होते. कुंदनच्या डोळ्यात पाणी भरुन आले. जड डोळ्यानेच त्याने पूर्ण बातमी वाचली. अनंत मयेकर हे देखील साहित्यिक होते. कोकणी भाषेत त्यांनी विपुल लेखन केले होते. अपघात झाला तेव्हा ते अनेक वर्षानंतर आर्यादेवीच्या यात्रेला मुंबईवरुन निघाले होते मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
तसे असले तरी त्यांचा नमस्कार देवीपर्येंत पोहचला होता.कदाचित एका लेखकाने निरोप पोहचविण्यासाठी दुसऱ्या लेखकाची निवड केली असावी.या साऱ्या घटनेनंतर निसर्गातील या अद्भूत शक्तीची कल्पना कुंदनला आली होती.
राजापूरहून आल्यानंतर कुंदन एवढा शांत शांत का झाला आहे हा साहाजिक प्रश्न त्याच्या घरच्यांना आठवडाभर पडला होता.

- किरण कुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users