सावल्यांच्या जाळ्यात - भाग १
सावल्यांच्या जाळ्यात - भाग २
सावल्यांच्या जाळ्यात - भाग 3
सावल्यांच्या जाळ्यात - भाग ४
सावल्यांच्या जाळ्यात - भाग ५
सावल्यांच्या जाळ्यात - भाग ६
पूर्वभाग
आर्यन मेहताने रिया मोईत्रा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर इन्स्पेक्टर देशमुख तपास सुरू करतात. तपासात रियाचा शेवटचा संपर्क तिच्या आई इरा मोईत्राशी झाल्याचे उघड होते. सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्समधून रिया इराच्या कारमध्ये बसल्याचे स्पष्ट होताच संशय गडद होतो; पुढे फोनचे लोकेशन पेन हायवेपर्यंत गेल्याने देशमुख तपास अधिक आक्रमक करतात. पेनजवळील जंगलात जळालेल्या ठिकाणी मानवी अवशेष आणि रियाचे लॉकेट सापडताच प्रकरण साध्या बेपत्ता प्रकरणावरून गंभीर गुन्ह्याकडे वळते. इराच्या कॉल रेकॉर्डमधून एक अनोळखी नंबर समोर येतो; चेंबूरमध्ये तपासादरम्यान संशयित पळून जातो, मात्र त्याचा फोन पोलिसांच्या हाती लागतो आणि तपासाला पहिला ठोस बाह्य दुवा मिळतो. यानंतर देशमुख इराची कडक चौकशी सुरू करतात. चौकशीदरम्यान रिया आणि इरात त्या रात्री कारमध्ये तीव्र वाद झाल्याचे उघड होते; रिया तिच्या भूतकाळाबद्दल सत्य जाणून घेण्याचा हट्ट धरून बसली होती. दरम्यान सापडलेल्या फोनच्या फॉरेन्सिक तपासातून एक जुना धागा समोर येतो—इराचा माजी ड्रायव्हर रमेश. पोलिस त्याला शोधून काढतात त्यामुळे तपास एका निर्णायक वळणावर येऊन ठेपतो.
*************************************************************************************************************************
भाग ७ — पहिला तडा
टिळक नगरच्या त्या कोंदट खोलीत छतावरचा पंखा संथ गतीने फिरत होता, रमेश खुर्चीत खिळून बसला होता.
त्याने पाठीचा कणा ताठ करण्याचा प्रयत्न केला, पण भीतीपोटी त्याचे शरीर लाकडासारखे कडक झाले होते. कपाळावरून ओघळणारा घामाचा थेंब त्याच्या डोळ्यांच्या कडांशी येऊन थांबला होता, पण तो पुसण्याचे त्राणही त्याच्यात उरले नव्हते.
समोर देशमुख उभे होते. त्यांची भेदक नजर रमेश वर खिळली होती. बाजूला कदम शांतपणे उभे राहून रमेशच्या प्रत्येक सूक्ष्म हालचालीची नोंद घेत होते.
काही क्षण कुणीच बोलले नाही. देशमुखांनी शांतपणे खुर्ची ओढली आणि रमेशच्या अगदी समोर बसत म्हणाले, “रमेश… घाई करू नकोस. नीट विचार करून उत्तर दे.”
रमेशने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. “...साहेब, मी खरंच काही—”
देशमुखांनी हाताने त्याला थांबवले. “मी अजून तुझ्यावर आरोप केलेले नाहीत, रमेश. मला फक्त सत्य ऐकायचे आहे.”
रमेश गप्प झाला. टेबलाखाली त्याची बोटे एकमेकांत गुंफली गेली होती, त्यांची पकड अधिकच घट्ट झाली. देशमुखांनी फाईलमधून एक प्रिंटआउट बाहेर काढला आणि संथपणे रमेशसमोर सरकवला.
कॉल रेकॉर्ड.
त्या कागदावरची नावे आणि नंबर पाहताच रमेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याने चटकन नजर वर केली, पण देशमुखांच्या नजरेला नजर भिडताच त्याने पुन्हा खाली पाहिले.
“२४ एप्रिल,” देशमुख शब्दांवर जोर देत म्हणाले, “रात्री ९:१५… ९:२८… आणि १०:०२. हे तीन कॉल तुला आले होते.”
रमेशचा घसा कोरडा पडला. शब्द फुटेनासे झाले. देशमुख आता त्याच्या थोडे जवळ झुकले. त्यांचा आवाज आता अधिक भेदक झाला होता.
“तो इराचा फोन होता, बरोबर?”
खोलीत एक भयानक शांतता पसरली. रमेशने केविलवाणा नकार देण्याचा प्रयत्न केला, “...मला आठवत नाही, साहेब.”
देशमुखांच्या ओठांवर एक हलकी, गूढ छटा उमटली. हा पहिला बचाव होता, ज्याची त्यांना आधीच कल्पना होती. त्यांनी कदमांकडे खुणावले. कदमने एक टॅबलेट रमेशसमोर धरले. त्यावर लाल रंगाचा एक ठिपका मॅपवर चमकत होता.
“हा तुझा फोन आहे. ही तुझी लोकेशन आहे. आणि ही तीच वेळ आहे—” देशमुख क्षणभर थांबले आणि मग शब्दाचा घाव घातला, “—ज्या वेळी रिया मोईत्रा गायब झाली.”
देशमुखांनी आपली चाल बदलली. आता त्यांचा आवाज मृदू झाला होता, जणू एखादा मित्र सल्ला देत असावा.
रमेश… नाहक स्वतःला यात का अडकवतोयस? जे सत्य आहे ते सांगून टाक. अजूनही वेळ गेलेली नाही.”
हे भावनिक आवाहन अचूक ठरले. रमेशचे डोळे इकडे तिकडे फिरू लागले. तो आतून तुटत चालला होता. “साहेब…” तो पुटपुटला, “मॅडमने फक्त… फोन केला होता.”
“कशासाठी?” देशमुखांनी लगेच विचारले.
“...म्हणाल्या… जरा काम आहे.”
“कसलं काम?”
रमेश पुन्हा मौन झाला. पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आता ओरडून सांगत होते की तो काहीतरी लपवत आहे. देशमुख आता निर्णायक वळणावर आले होते. त्यांनी थेट मुद्दा छेडला.
“त्या रात्री तू पेणला गेला होतास.”
“नाही साहेब—” रमेशने चटकन नकार दिला.
टक्!
देशमुखांनी टेबलावर जोरात बोट आपटले. रमेश दचकला. “खोटं बोलू नकोस, रमेश!” देशमुखांचा आवाज आता मेघगर्जनेसारखा झाला होता.
पुढचे काही सेकंद ताण इतका वाढला की खोलीतलं वातावरण जणू तडकून जाईल असे वाटू लागले. अखेर रमेशचा संयम सुटला. त्याचा आवाज थरथरत फुटला.
“...साहेब, मी तिथे पोहोचलो तेव्हा—” तो थांबला.
“तेव्हा काय?” देशमुखांनी विचारले.
रमेशने डोळे घट्ट मिटून घेतले. “...उशीर झाला होता, साहेब.”
कदम आणि देशमुख यांनी एकमेकांकडे पाहिले. आता खरी माहिती बाहेर येणार होती.
“स्पष्ट बोल,” देशमुख हळूच म्हणाले.
“...मॅडम खूप घाबरलेल्या होत्या. कारमध्ये खूप भांडण झालं होतं,” रमेश रडवेल्या स्वरात सांगू लागला.
देशमुखांची नजर स्थिर झाली. त्यांनी शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला—
“रिया जिवंत होती तेव्हा तू तिथे होतास का?”
हा प्रश्न विचारताच रमेश पूर्णपणे थिजला. त्याचे ओठ हलले, पण शब्द बाहेर पडण्याऐवजी फक्त एक हुंदका बाहेर आला. देशमुखांना कळून चुकले की आता या प्रकरणाचा मुख्य दुवा त्यांच्या हाती लागला आहे.
“...साहेब...” त्याचा आवाज एखाद्या वाळलेल्या पानांसारखा थरथरला. “मी तिथे पोहोचलो, तेव्हा मॅडम खूप घाबरल्या होत्या.”
देशमुख काहीच बोलले नाहीत. त्यांची स्थिर नजर रमेशच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक स्नायूची हालचाल टिपत होती.
“कार रस्त्याच्या कडेला, त्या अंधारात उभी होती,” रमेश शब्दांना वाट करून देऊ लागला. “मॅडमच्या हातात फोन होता, पण त्या सतत स्क्रीनकडे पाहत होत्या... कोणाची तरी वाट पाहत असल्यासारख्या.”
देशमुखांनी अगदी शांतपणे, पण तितक्याच धारदार आवाजात विचारलं, “रिया कुठे होती?”
रमेश पुटपुटल्यागत म्हणाला, “...मला दिसली नाही ती.”
देशमुखांच्या नजरेत संशयाची पाल चुकचुकली. “तुला खात्री आहे?”, “रमेश... नीट आठवून सांग. ही वेळ पुन्हा येणार नाही.”
रमेशचा घसा पूर्णपणे बसला होता. त्याने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास उचलला, एक मोठा घोट घेतला आणि नजर जमिनीकडे खिळवून तो बोलू लागला, “...मॅडम म्हणाल्या, सगळं संपलंय... ती शांत बसत नाहीये.”
“ती म्हणजे रिया?”
रमेशने फक्त मान हलवली.
“मग पुढे काय झालं?” देशमुखांनी खुर्चीतून किंचित सरसावत विचारलं.
“मॅडम खूप अस्वस्थ होत्या साहेब. त्यांचं लक्ष सारखं आजूबाजूच्या जंगलाकडे जात होतं. मला पाहिल्यावर त्या ओरडल्याच... म्हणाल्या, 'रमेश, तू यायला खूप उशीर केलास'.”
देशमुखांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक उमटली. “तू काही विचारलं नाहीस त्यांना?”
रमेशने आपले ओठ गच्च दाबले. “...मी विचारलं होतं साहेब... मॅडम, काय झालंय नक्की? रिया कुठे आहे?”
पुन्हा शांतता. कदमने श्वास रोखून धरला होता. देशमुखांचा आवाज आता शून्यावर आला होता, “आणि त्यांनी काय उत्तर दिलं?”
रमेश काही काळ गप्प राहिला, मग त्याचा आवाज थरथरत उमटला, “...त्या म्हणाल्या... 'ती मला संपवणार होती'.”
कदमने आश्चर्याने देशमुखांकडे पाहिलं, पण देशमुखांचा चेहरा निर्विकार होता. “कोण?”
“...रिया.”
खोलीतली हवा आता अधिकच जड झाली होती. देशमुखांनी थोडा वेळ रमेशला न्याहाळलं आणि मग अचानक एक गुगली टाकली, “रमेश... प्रामाणिकपणे सांग, त्या वेळी रिया जिवंत होती का?”
हा प्रश्न एखाद्या वीजेसारखा रमेशवर पडला. त्याचा चेहरा पांढराफटक पडला. त्याने नजर चोरली. घड्याळाची टिक-टिक अधिकच जोरात ऐकू येऊ लागली.
“रमेश!” देशमुखांची हाक आता कठोर झाली होती. त्यांनी आपली नजर थेट त्याच्या डोळ्यांत रोखली. “ती जिवंत होती का?”
रमेशचे ओठ थरथरले, पण शब्द बाहेर येईनासे झाले. शेवटी त्याने हार मानली. “...मला माहिती नाही साहेब.”
देशमुखांच्या नजरेतली धार वाढली. “माहिती नाही की सत्य सांगायची भीती वाटतेय?”
रमेश गप्पच राहिला.
“नीट विचार कर रमेश. तुझा प्रत्येक शब्द तुझा गुन्हा ठरवू शकतो किंवा तुला वाचवू शकतो.”
रमेशने कपाळावरचा घाम पुसला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली, “...मी जेव्हा कारजवळ पोहोचलो, तेव्हा मॅडम बाहेर उभ्या होत्या. खूपच घाबरलेल्या. त्यांचं लक्ष सतत मागच्या सीटकडे होतं.”
“मागच्या सीटवर काय होतं?”
रमेश थांबला. त्याच्या श्वासाचा वेग वाढला होता. “...तिथे कोणीच नव्हतं.”
कदम दचकला. पण देशमुखांनी लगेच पकडलं, “तर मग रिया गेली कुठे?”
रमेशने डोळे घट्ट मिटले. “...मॅडम म्हणाल्या की ती कारमधून उतरली आणि पळत सुटली... त्या अंधाऱ्या जंगलात गायब झाली.”
देशमुखांनी त्याला न्याहाळलं. “आणि तुला ते खरं वाटलं?”
“...त्या वेळी वाटलं होतं साहेब.”
“आणि आता?”
रमेशने हळूच मान वर केली. त्याच्या नजरेतलं सत्य आता लपण्यासारखं नव्हतं. “...आता वाटत नाही.”
खोलीतलं वातावरण आता स्फोटक झालं होतं. “का वाटत नाही?” देशमुखांनी विचारलं.
रमेश काही क्षण शब्दांची जुळवाजुळव करत राहिला, मग अतिशय खालच्या आवाजात म्हणाला, “कारण साहेब... कारच्या मागच्या सीटवर काहीतरी पडलं होतं.”
“काय?”
“...एक स्कार्फ.”
देशमुखांच्या मनात आता चित्राचे तुकडे जुळू लागले होते. “रियाचा स्कार्फ?”
“...हो.”
काही क्षण खोलीत पूर्ण शांतता होती. देशमुखांना आता खात्री पटली होती की जंगलात कोणीच पळालं नव्हतं. त्या रात्री जे काही घडलं होतं, ते त्या गाडीतच घडलं होतं.
“रमेश... अजून काय पाहिलंस तू?”
रमेशने पुन्हा मान खाली घातली, पण यावेळी त्याचा आवाज अधिकच कातर झाला होता. “...मॅडमच्या हाताला खूप खरचटलं होतं साहेब... जणू कोणीतरी झटापट केली असावी... आणि...”
“आणि काय?”
रमेशने वर पाहिलं, त्याच्या डोळ्यांत आता पश्चात्तापाचे अश्रू होते. “...त्यांच्या हातावर... रक्त होतं.”
हे शब्द उच्चारताच खोलीत जणू काळ थांबला. हवेचा दाब वाढल्यासारखा वाटत होता. कदमने धाडस करून देशमुखांकडे पाहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही उघड प्रतिक्रिया नव्हती. ते एका दगडी पुतळ्यासारखे स्थिर होते.
देशमुखांनी शांत स्वरात विचारले, “तुला पूर्ण खात्री आहे, रमेश?”
रमेशने मान खाली घालून मान हलवली. “...हो, साहेब. मला ते स्पष्ट दिसलं.”
देशमुख एखाद्या शिकाऱ्यासारखे रमेशच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत होते. तपास अधिकारी म्हणून त्यांना हे माहीत होते की, भीती आणि खोटेपणा यात एक सूक्ष्म रेषा असते, आणि रमेशच्या डोळ्यांतल्या भीतीत खोटेपणाचा लवलेशही नव्हता.
“मग पुढे काय झालं?”देशमुखांनी विचारले.
मॅडम मला म्हणाल्या— 'रमेश, गाडी इथून तात्काळ हलवायची आहे'.”
कदमने तत्परतेने विचारले, “कुठे?”
“...जंगलाच्या अधिक आत,” रमेशने दबल्या आवाजात उत्तर दिले.
“आणि तू गाडी हलवलीस? त्या वेळी रिया कुठे होती?” देशमुख.
रमेशने आपली नजर पुन्हा जमिनीकडे फिरवली. “...मला दिसली नाही, साहेब. ती कुठेच नव्हती.”
देशमुखांनी टेबलावर हलकेच बोट आपटले . टक्. त्या आवाजाने रमेश दचकला. “रमेश, त्या वेळी गाडीत नक्की काय होतं?”
रमेशचा श्वास आता धापा टाकल्यासारखा झाला होता. त्याने डोळे मिटले आणि पुटपुटला, “...मागच्या सीटवर एक मोठं ब्लँकेट होतं.”
कदमचा चेहरा रागाने आणि आश्चर्याने ताठरला. देशमुख आता रमेशच्या अगदी जवळ झुकले. “ब्लँकेट? ते तिथे आधीपासून होतं की नंतर ठेवलेलं?”
रमेशने गोंधळलेल्या अवस्थेत मान हलवली. “...माहीत नाही साहेब. पण...” तो अचानक थांबला.
“पण काय? काय पाहिलंस तू?” देशमुखांनी विचारले.
रमेशचा घसा कोरडा पडला होता. त्याने कसेबसे शब्द बाहेर काढले— “...ते ब्लँकेट एका विचित्र पद्धतीने गुंडाळलेलं होतं. जणू काही... जणू काही त्याच्या आत कुणीतरी— किंवा काहीतरी— लपवून ठेवलं होतं.”
जंगल. गाडी. रक्ताने माखलेले हात. आणि आता हे संशयास्पद ब्लँकेट.
देशमुखांनी अत्यंत संयत पण भेदक आवाजात विचारले, “रमेश... त्या ब्लँकेटमध्ये काय होतं?”
रमेशचे डोळे भीतीने विस्फारले. तो काही क्षण सुन्न बसून राहिला, जणू त्या रात्रीच्या आठवणींनी त्याला पुन्हा एकदा त्याच अंधाऱ्या जंगलात ओढून नेले होते.
अखेर, त्याने थरथरत्या आवाजात कबुली दिली— “...साहेब, मी उघडून पाहिलं नाही. पण मला अंदाज आला होता...”
देशमुख आता थेट त्याच्या डोळ्यांत बघत होते. “कशाचा अंदाज?”
रमेशने डोळे घट्ट मिटले, जणू काही दृश्य तो पुन्हा पाहू इच्छित नव्हता. “...त्या रात्री...” तो कुजबुजला, “...काहीतरी खूप भयंकर घडलं होतं, साहेब. ज्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही.”
“…त्या रात्री काहीतरी खूप भयंकर घडलं होतं.”
गोष्ट रंगवायची हातोटी छान आहे
गोष्ट रंगवायची हातोटी छान आहे. कथा माहिती आहे पण तरी वाचायला मजा येतेय.
सहमत
सहमत
तुमच्या या प्रतिसादाबद्दल
तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! साधना, धनवन्ती.