मागे वळून बघता

Submitted by विद्याधीश on 3 March, 2026 - 05:56

(वृत्त - आनंदकंद)

कंठात सूर खळला, मागे वळून बघता
डोळ्यात चिंब गझला, मागे वळून बघता

मागेच राहिलो की, आलो पुढे कळेना
दिसले कुणी न मजला मागे वळून बघता

काटेच फार होते, मार्गात या तरीही
सुखकर प्रवास गमला, मागे वळून बघता

ध्यानात राहु दे रे, आख्यान ऑर्फियसचे
साऱ्या सुखास मुकला, मागे वळून बघता

नढळो नजर जराही, ध्येयावरून सखया
शर्यत ससा विसरला, मागे वळून बघता

स्वप्ने पहात गेले, सारे पुढे निघोनी
'विद्या' जुन्यात रमला, मागे वळून बघता

-विद्याधीश केळकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users